कलोपासक बाळ ठाकूर
शनिवार, दि.०८ जानेवारी २०२२ रोजी माझ्या मोबाईलवर मार्गदर्शक सुभाष लाड सर यांचा मॅसेज आला आणि मला धक्काच बसला .काही काळासाठी मन सुन्न झाले.विश्वास बसेना म्हणुन मी या घटनेची खात्री करण्यासाठी त्यांना फोन केला तर ,मराठी साहित्यातील प्रज्ञावंत चित्रकार कलोपासक बाळ ठाकूर यांचे निधन झाल्याचे वृत्त खरे असल्याचे त्यांनी सांगितले आणि मनात त्यांच्या भेटीच्या ताज्या आठवणी दाटून आल्या. आयुष्याची संध्याकाळ सूखसमाधानाने भांबेड गावातील आपल्या मूळ निवासस्थानी जगणारे बाळ ठाकुर हे खुप काही करूनही प्रसिद्धीपासून दूर राहिले.
बाळ ठाकूर चित्रकार म्हणून दिग्गज किंवा मोठे होतेच पण त्याहीपेक्षा ते माणूस म्हणून अधिक श्रेष्ठ होते.म्हणूनच त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील साहित्य व चित्रजगत खरोखरच हळहळलेले पाहायला मिळाले. त्यासाठी एक महत्त्वाचे कारण होते ,त्यातील प्रत्येकाला आपल्या घरातील एक व्यक्ती गेल्याचे दुःख झाले होते . लोकसत्ता ,महाराष्ट्र टाईम्स किंवा सामना या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्र माध्यमांत सुहास बहुलकर,श्रीनिवास कुलकर्णी,अभिजित ताम्हणे, प्रा.मं.गो.राजाध्यक्ष, पुरूषोत्तम बेर्डे यांनी लिहिलेल्या लेखांत त्याचेच प्रतिबिंब पाहायला मिळाले.
२५ एप्रिल १९३० रोजी कोकणातील लांजा तालुक्यातील भांबेड या गावी बाळ ठाकूर यांचा जन्म झाला.भालचंद्र शिवराम ठाकूर हे त्यांचे मूळ नाव. पण साहित्य व जाहिरात क्षेत्रात ते बाळ ठाकुर या नावानेच प्रसिद्ध होते.त्यांचे वडिल शिवरामभाऊ हे लांजा तालुक्यातील प्रख्यात व्यक्तिमत्व. लांजा तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोठं काम केले आहे. लांजा शहरात न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेची मूहूर्तमेढ रोवणाऱ्या न्यू एज्युकेशन सोसायटीचे ते संस्थापकीय सदस्य होते.त्यांच्याच कर्तृत्वाचा वारसा बाळ ठाकूर यांच्यात उतरला होता.१९४७ मध्ये मॅट्रिक परिक्षा ते उत्तीर्ण झाले.शालेय वयात कधीतरी कोल्हापुरला गेल्यावर तेथील दवाखान्यात लावलेली निसर्गदृश्ये पाहून चित्रकार होण्याची उर्मी त्यांच्यात जागी झाली.पुढे मुंबईतील जे.जे स्कूल आॅफ आर्ट मध्ये मध्ये कमर्शियल आर्ट या अभ्यासक्रमासाठी त्यांना प्रवेश मिळाला.जे.जे.स्कुलने अनेक कलाकारांना कलादृष्टी व प्रयोगशील कलावृत्ती बहाल केली.उत्तमोत्तम चित्रकर्मी घडविणा-या या महाविद्यालयात बाळ ठाकूरांच्या आतील चित्रकाराला ख-या अर्थाने प्लॅटफॉर्म मिळाला.त्यातच मुंबईला फणसवाडीतील वा.रा.ढवळे यांच्या घरी ते मुक्कामाला होते.ढवळे हे मराठी प्रकाशन विश्र्वातील एक मोठे नाव.यामुळे वाड:मय, कला यासंबंधी एक व्यापक अवकाशाची अनुभूती त्यांना मुंबईतील सुरवातीच्या काळातच मिळाली.
मुंबईत सुरवातीला जे थाॅमसन ,उल्का ,ऎय्यर्स अशा संस्थांमधून इलेस्ट्रेटर म्हणून कामाला सुरवात केली. जाहिरात संस्थांबरोबरच प्रकाशन क्षेत्रातही त्यांची कामे सुरु होती.जाहिरात विश्र्वापेक्षा ते पुस्तकांची मुखपृष्ठ व रेखाटन करण्यात जास्त रमल्याने मुखपृष्ठकार म्हणून साहित्यविश्वात अजरामर झाले.मराठीतील नामवंत लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ व रेखाटने त्यांनी केली आहेत.जयंत दळवींचे 'चक्र', भालजी पेंढारकरांचे ' साधा माणूस ' , कमल पाध्ये यांचे ' बंध-अनुबंध ' , अनंत मनोहरांचे 'अरण्यकांड ' , कुसुमाग्रजांचे 'मुक्तायन ' , पु.ल.देशपांडे यांचे ' मैत्र ' अशा कित्येक दिग्गज लेखकांची पुस्तके बाळ ठाकुरांच्या सशक्त मुखपृष्ठ व रेखाटनांमुळे अधिक गाजली.भिन्न प्रकारच्या लेखकांसाठी त्यांनी तितक्याच भिन्नतेने रेखाटनांचा अविष्कार साकारला.
लक्ष्मीबाई टिळकांपासून बालकवी, मर्ढेकर, बा.भ.बोरकर अशा अनेक साहित्यिकांची व्यक्तिचित्रे त्यांनी साकारली. रहस्य रंजन , मौज , सत्यकथा, विवेक, सामना,वसुधा अशा प्रकाशन संस्थांसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.एकूणच मासिके व पुस्तकांच्या निर्मितीत ठाकूरांचे मुखपृष्ठ व आतील कथानकाला सशक्त बनविणारी रेखाटणे असणे म्हणजे पुस्तक दर्जेदार होणं हा विचार साहित्यविश्र्वात दृढ झाला होता.
स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रातील कलाक्षेत्रात विविध कलाप्रकार बहरले .नारायण केंद्रे , मकबुल फिदा हुसेन, कृष्णाजी आरा, दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर सुधीर पटवर्धन ,रवी परांजपे, सुहास बहुलकर, रवींद्र मिस्त्री वासुदेव कामत ,जी कांबळे ,वासुदेव गायतोंडे अशी एक ना अनेक कलावंतांनी महाराष्ट्राचे चित्रपरंपरा ही वटवृक्षाप्रमाणे दीर्घायुषी बनवली आहे. या वटवृक्षीकरणात बाळ ठाकूर यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. अनेक कलाकार वय उतरणीला लागले की, आता पूर्वीसारखे काम जमत नाही, शरिर थकले आहे असे सांगतात.मात्र बाळ ठाकूरांची नव्वदीतही पेन्सिल व ब्रशवरील पकड पाहून थक्क व्हायला व्हायचे. फक्त पेन्सिलच्या रेखाटनातून मानवी स्वभावाच्या भावना ,छटा त्यांनी सहजसुंदरतेने दर्शविल्या.विविध व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, स्थळचित्रे साकरताना कोणत्याही रंगांचा वापर न करता फक्त रेखाटनाचा कलात्मक वापर करून प्रतिभेच्या जोरावर ती कलाकृती उत्कृष्ट चितारण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. ठाकूर सर प्रकृतीने मृदू व स्वभावाने शांत ,मितभाषी असले तरी त्यांच्या चित्रांचा परिणाम हा कॅनव्हाॅसवर अतिशय ठळक व ठसठशीत असायचा.
मोडीदर्पण दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक म्हणून या अंक निर्मितीची जबाबदारी माझे मार्गदर्शक सुभाष लाड सर यांनी माझ्यावर सन २०२०मध्ये सोपवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोडीदर्पण दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर या अंकाविषयी साहित्य विश्वातून कौतुकाच्या प्रतिक्रिया आल्या. मराठा वृत्तपत्र संघ दादर -मुंबई ने या अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार देऊन सन्मानित केल्याने अधिकची प्रेरणा मिळाली.मोडीदर्पणचा हा दिवाळी अंक बाळ ठाकूरांना भेट देण्यासाठी मी आणि लाड सर भांबेड या त्यांच्या मूळ गावी गेलो होतो.त्यावेळी अंगणातील झोपाळ्यावर एका व्रतस्थाप्रमाणे बसलेल्या स्थितप्रज्ञ बाळ ठाकूरांना त्यांचा नातू अमरेश याने आमची ओळख करून दिली.त्यांच्याशी झालेल्या छोट्या संवादाने ९१ व्या वर्षातही त्यांची स्मरणशक्ती तल्लख असल्याचे जाणवले. मोडी सारख्या ऐतिहासिक वैभवशाली झाकोळलेल्या लिपीला आपण प्रकाशात आणत आहात याविषयी त्यांनी आमचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता आणि आमच्या मातीतील थोर सुपुत्र विषयी अभिमान म्हणून लाड सरांनी त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले यावेळी -- "मी कोणी मोठा नाहीए ,मी फार काही कार्य केले नाही " हे त्यांचे उद्गार त्यांच्या विचारांची उंची अधोरेखित करणारे होते.
खरं तर यंदाच्या प्रभानवल्ली येथे होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन लांजावासीयांना आपल्या मायभूमीतील या कलोपासाकाचा गौरव करण्याचा आनंद मिळणार होता.ही बातमी त्यांना जेव्हा राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष लाड सर यांनी भांबेड येथे सांगितली तेव्हा त्यांनी फक्त मंद स्मित हास्य केले. आज ते आपल्यात नाहीत तेव्हा त्यांना गौरवण्याची, व आपल्या मातृभूमीला स्वकार्यातून मोठं करणाऱ्या कलावंतांचा यथोचित सन्मान आता करायचा राहून गेला याची खंत आयुष्यभर लागून राहणार आहे.मात्र सन २०१७ साली डोंबिवली येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात थोर विज्ञानकर्मी डाॅ.जयंत नारळीकर यांच्यासह ठाकूर सरांना जीवनगौरव देऊन सन्मानित करण्यात आले होते, याचा आनंद मात्र आयुष्यभर समाधान देत राहील.
कोकणचे सुपुत्र म्हणून कोकणी माणसाला खरोखरच बाळ ठाकूरांविषयी मनातून अभिमान वाटत असेल, तर त्यांच्या लांजा तालुक्यातील निसर्गरम्य भांबेड या मूळगावी आयुष्यभर कलेची साधना करणाऱ्या कलोपासक बाळ ठाकूर यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे कला दालन उभे राहायला हवे . तीच बाळ ठाकूर सरांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल.
विजय हटकर.
भावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDelete