संगनाथेश्र्वराच्या घाटावर सर्वपित्री अमावस्येला अर्जूना नदीजलपूजन उत्साहात संपन्न.
पाचल :-
ज्या नदीच्या काठावर आपण जन्माला आलो,जिने आपले भरण-पोषण केले,जिच्या सुपिक काठावर स्वत:चे जीवन समृद्ध करतो ,त्या नदीलाच आपण गंगा,चंद्रभागा मानून तिची मुलाप्रमाणे सेवा केली पाहिजे ,अर्जूनामाई चे संवर्धन हे प्रत्येक राजापूरवासियाचे कर्तव्य असून ते प्रत्येकाने प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे असे प्रतिपादन राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई चे अध्यक्ष सुभाष लाड यांनी केले.
राजापूर तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या अर्जुना नदी व तिची उपनदी निवाचा नदीच्या संगमावर श्री क्षेत्र रायपटण गावातील संगनाथेश्र्वराच्या घाटावर सर्वपित्री अमावस्येच्या मूहूर्तावर रायपाटण, पाचल, तळवडे पंचक्रोशीसह लांजा राजापूर तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत अर्जूना नदीचे मोठ्या उत्साहात जलपूजन करण्यात आले.यावेळी सुभाष लाड बोलत होते.ते पुढे म्हणाले आपल्या नदीला कमी लेखल्यामुळेच या नद्यांना आपण कचरा वाहिनी करून टाकली आहे.हे आता बदलायला हवंय.जेव्हा आपला वावर नदीवर होईल तेव्हाच आपल्याला नद्यांची दुरावस्था लक्षात येईल.जमलेल्या वाळुच्या ढिगा-यांनी व कच-याच्या रांगोळ्यांनी घुसमटून गेल्याने तिला होणा-या वेदना आपल्याला जाणून घेता येतील.एकावेळी सर्रास कोणत्याही गावात बारमाही पुरूषभर उंचीचे काचेसारखे स्वच्छ दिसणारे नदीचे डोह अाता दिसेनासे झालेत.नद्यांचे होणारे हे प्रदुषण मानवी जीवनासोबत परिसंस्थेला हानिकारक असून यासाठीच प्रत्येक गावक-याने जलदूत बनायला हवे असे मत सुभाष लाड यांनी व्यक्त केले.
यावेळी रायपाटण येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या रेवणसिद्ध मठाचे रविशंकर शिवाचार्य महाराज, रायपाटणचे सरपंच महेंद्र गांगण,समाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी,पाचलचे सामाजिक कार्यकर्ते किशोर नारकर, तळवड्याच्या सरपंच गायत्री साळवी, पत्रकार शरद पळसुलेदेसाई ,विजय हटकर,प्रकाश हर्चेकर,महेंद्र साळवी, कल्पना काॅलेजचे संस्थापक मंगेश चव्हाण,माय राजापूरचे अध्यक्ष जगदिश पवार, मनोहर हरी खापणे महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्राध्यापक विकास पाटील,समृद्ध कोकणचे संतोष गांगण ,ओणी हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक एम.आर.पाटील,चंद्रकांत खामकर,प्रगतशील शेतकरी अमर खामकर,महादेव रोडे ,माजी मुख्याध्यापक विनोद करंदीकर, रायपाटणचे माजी सरपंच राजेश नलावडे, अनंत गांगण, आदर्श ग्रामसेवक सुधाकर पेडणेकर, ग्रा.स.समीक्षा चव्हाण,पोलिसपाटील महादेव नेवरेकर,पुरोहित राजेंद्र जोशी ,गजानन जोशी,संदिप गुरव, सुनिल गुरव,सचिन लाड,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नदीसंवर्धन या विषयावर बोलताना व्याख्याते विजय हटकर यांनी नद्या म्हणजे त्या त्या देशाच्या रक्तवाहिन्या असतात.त्यांच्या पात्रातून केवळ पाणीच वाहत नाही तर त्या-त्या प्रदेशाचे जीवनच वाहत असते.नद्या वाहताना आपल्या दोन्ही काठावरची भूमी सुजल संपन्न बनवितात असे सांगतानाच राज्यभरात नदीसंवर्धनाचे वैशिष्टपूर्ण प्रयोग करणा-या तसेच नदीच्या काठावर पर्यटन उद्योग ऊभारून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणा-या संस्था व कार्यकर्त्यांची माहिती देत राजापूरच्या पर्यटन व शाश्वत विकासाचा केंद्रबिंदू असणा-या अर्जूना नदीला स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने कटीबद्ध राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.तसेच रेवणसिद्ध मठाचे रविशंकर शिवाचार्य महाराज यांनी संघाच्या या पर्यावरणपूरक व भारतीय सर्वसमावेशक संस्कृतीचे उदाहरण असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करित अर्जूना नदी संवर्धन उपक्रमात यापुढेही सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.
एैतिहासिक वारसा लाभलेल्या श्री क्षेत्र रायपटण गावातील अर्जूना व निवाचा नदीच्या संगमावरील संगनाथेश्र्वर मंदिराच्या घाटावर अर्जूना नदीसंवर्धनाच्या उद्देशाने आयोजिलेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम अर्जूना नदीच्या पात्रातील पाण्याने भरलेल्या कलशाचे विधीवत पुजन गावकार महादेव शेट्ये यांनी सपत्निक केले.सोबतच घाटावर ठिकठिकाणी दिवे प्रज्वलित केल्याने श्री संगनाथेश्र्वर मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशात उजळून गेला होता.यानंतर अर्जूना नदीवर तीनेकशे लोकांच्या उपस्थितीत सामुहिक अारती करण्यात आली.यामध्ये संघाध्यक्ष सुभाष लाड यांनी रचलेल्या जय जय जलदाती या नदीविषयक व विजय हटकर यांनी रचलेल्या अर्जूनामाई या आरत्यांचे प्रथमच गायन सुनिलबुवा जाधव ,नागेश साळवी ,मंदार जाधव ,राजू कुलकर्णी यांनी
केले.नदीपूजनाला उपस्थित सर्वांनीच नदी स्वच्छ ठेवण्याची सामुहिक प्रतिज्ञा घेतली.कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक विकास पाटील यांनी केले.संघाच्या या नदीसंवर्धनांतर्गत नदीजलपूजन कार्यक्रमात या भागातील रायपटण, पाचल ,तळवडे ग्रामपंचायतींसोबत मनोहर हरी खापणे महाविद्यालय,कल्पना काॅलेज आॅफ हाॅटेल मॅनेजमेंट लांजा, माय राजापूर,समृद्ध कोकण आदी संस्थांनी सहभाग घेतल्याने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.
क्षणचित्रे :-
माध्यमातील दखल
१) आकाशवाणी पुणे -
https://youtu.be/Xv6dnWmcOMQ?t=331
No comments:
Post a Comment