रघुनाथ उर्फ तात्या गुणे : नर्मदा परिक्रमेची परिपूर्ण माहिती देणाऱ्या मराठीतील पहिल्या पुस्तकाचे लेखक.
ज्यांना आयुष्याचा प्रयोजन समजलं आहे असे अनेक प्रतिभावंत समाजाच्या अनेक क्षेत्रात जाणिवेने पाय रोवून निष्ठेने काम करीत असतात. त्यांचं आयुष्याचं स्वतःचं एक तत्वज्ञान असतं.अशा सुहृदयांचा सहवासही अनेकांच्या जीवनाला दिशा देत असतो.असेच एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्हयात लांजा तालुक्यातील वेरळ गावात आहे, ते म्हणजे आदरणीय तात्या गुणे. लोकमाता महानदी नर्मदेच्या परीक्रमाने प्राप्त झालेल्या जीवन संचिताच्या जोरावर गत सहा दशकाहून अधिक काळ अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री.रघुनाथ उर्फ तात्या गुणे !
कोकणातील लांज्याजवळ मुंबई गोवा हम रस्त्यावर असलेल्या वेरळ या गावात तात्या गुणे यांचा जन्म ६ डिसेंबर १९४२ साली झाला. कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले तात्या गुणे वेरळ गावातच लहानाचे मोठे झाले. राजापूर हायस्कूल येथे इयत्ता अकरावी पर्यंतचे शिक्षण घेतल्यावर मुंबईतील प्रसिद्ध वेलिंग्टन व रुपारेल कॉलेजला त्यांनी उच्च शिक्षण घेतले. मात्र स्थापत्तशास्त्राच्या आवडीने सांगलीतील सेठ वालचंद इंजिनियरींग कॉलेजला प्रवेश घेऊन सखोल अभ्यास करून ते अभियंता बनले.आधुनिक विज्ञानाचा त्यांनी गाढा अभ्यास केला.पण अभियांत्रिकी व्यवसायात त्यांचे मन रमले नाही.काही काळ त्यांनी नोकरी केली तरी प्रपंच मांडला नाही.त्यांनी घर सोडले वा संन्याशाची वस्त्रे धारण केली ,असेही घडले नाही.पण त्यांच्या अंत:करणात अध्यात्माचा झरा सतत झुळझुळत होता.त्या मार्गाने ते कोठवर पोहचले हे आपल्याला सांगता येणार नाही,ते त्यांचे त्यांनाच माहित असेल.पण जे त्यांच्या संपर्कात येतात त्यांना त्यांची अनासक्त व निरहंकारी वृत्ती जाणवल्याशीवाय राहत नाही.
गुणे आपल्या कुटुंबातच कायम राहिले,अडल्यानडल्या वेळी अर्थाजन करून त्यांनी इतरांसाठि कष्टही घेतले आहेत.पण त्यातून स्वत:ला आर्थिक लाभ व्हावा अशा इच्छेचा स्पर्श त्यांना कधीही झाला नाही.ते आपल्याच आनंदात मग्न असतात.विश्वचालक परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेऊन कोणतीही भविष्याविषयी चिंता न करता ते वाटचाल करीत आहे.मनाची अशी निर्लेप वृत्ती फार दूर्मीळ असते.ती तात्या गुणेंच्या ठायी पहायला मिळते.पावसचे स्वामी स्वरूपानंद आणि माचणूरचे बाबामहाराज आर्वीकर अशा सत्पुरुषांशी तात्या गुण्यांचा निकटचा संपर्क आला.अशा संपर्कातून हे सत्व प्राप्त करून घ्यायचे असते ते त्यांनी आपलेसे केलेले आहे.ही सारी एक प्रकारची पुण्याई असते. तिच्या बळावर मनाची एक वासनाशून्य आणि ऎहिकाच्या अतीत पोचणारी वृत्ती आत्मसात करता येते. त्यामधून हळूहळू एक वेगळे व्यक्तिमत्व साकार होत असते. ते ओळखण्याची दृष्टी ज्याला असेल त्याला गुण्यांचे वेगळेपण जाणवल्याशिवाय राहणार नाही.
वाचनाची आवड असलेल्या तात्या गुणे यांचे गो. नि.दांडेकर आवडते लेखक. गोनिदांच्या स्मरणगाथा या पुस्तकात लोकमाता नर्मदेचे छान माहिती आहे. नर्मदामैय्येची ही माहिती वाचत्यानंतर तात्या गुणे यांना -
'रेवातीरे तपः कुर्यात् '
म्हणजे तपाचरणासाठी नर्मदामातेचे तीर सर्वश्रेष्ठ असल्याची जाणीव झाली व नर्मदेची परिक्रमा करण्याची अतीव इच्छा त्यांच्या मनी निर्माण झाली. पुढे चाळीशीच्या उंबरठ्यावर अर्थात साधारण १९८३ साली तात्या गुण्यांनी एका क्षणी उठलेल्या उर्मी सरशी नर्मदेची परिक्रमा करण्याचा रस्ता धरला. या परिक्रमेत स्वतःवर काही बंधने त्यांनी घालून घेतली आणि अनवाणी पायी चालत अंगावर दोन-तीन कपडे, एक पंचा, एक पातळशी शाल, एक तांब्या,वही आणि बॉलपेन आदि मर्यादित साधने घेऊन परिक्रमा केली. तीर्थस्थानांमध्ये लोकमाता सरितांना या संस्कृतीने बहाल केलेले पूज्यत्व खरोखर विलोभनीय आहे. या पूज्यत्वासह प्रत्ययाला येणारे अनुभवसिद्ध मातृत्व केवळ अवर्णनीय अल्हाददायक! भारतभूमीत नर्मदेचे महात्म्य फार थोर. वाशिष्ट संहितेनुसार माघ महिन्याच्या शुद्ध सप्तमीच्या दिवशी रविवारी दुपारी सूर्य मकर राशीमध्ये असताना आणि आश्विनी नक्षत्र सुरु असताना नर्मदा नदी मेकल पर्वतावर प्रकट झाली. नर्मदेच्या दर्शनाने ही मोक्षप्राप्ती होते अशी श्रद्धा जनमानसात आहे. नर म्हणजेच माणसाचा मद म्हणजे अहंकार दूर करणाऱ्या या शिवकन्येचीच पूर्ण परीक्रमा करण्याची परंपरा भारतात आहे.
याच लोकमाता नर्मदेच्या परिक्रमात आलेले विविध अनुभव 'नर्मदे हर ' या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शब्दबद्ध करून मराठी वाचकांसमोर १९९६ ला प्रसिद्ध केले. मराठी भाषेतील नर्मदेच्या परिक्रमेची परीपूर्ण माहिती देणारे हे पहिले पुस्तक ठरले. पुढे याच पुस्तकातून प्रेरणा घेऊन जगन्नाथ कुंटे यांनी नर्मदा परिक्रमा केली.व त्यावर पुस्तक लिहिले ज्याला फार प्रसिद्धी मिळाल्याने अनेक आस्थावान जिज्ञासू रसिकांनाही कुंटेचे पुस्तक पहिले वाटू लागले, मात्र राजु परुळेकरांनी ई टी.व्ही. वर सहजसंवाद या कार्यक्रमात जगन्नाथ कुंटेंची मुलाखत घेतली त्यात कुंटेनी गुणेंचा उल्लेख केल्याने रघुनाथ उर्फ तात्या गुणे यांचे नर्मदे हर हेच मराठीतील नर्मदा परिक्रमेची संपूर्ण माहिती देणारे पहिले पुस्तक असल्याचे सिद्ध झाले. नर्मदेच्या तीरावरील सारा परिसर येत्या काही वर्षात आधुनिक विज्ञानाच्या स्पर्शाने बदलून जाणार आणि तसे झाल्यावर आजवरची नर्मदा परिक्रमा इतिहास जमा होणार अशा या संधी काळात आणि विशुद्ध पावन असे आध्यात्मिक वातावरण बऱ्याच प्रमाणात शिल्लक असताना नव्वदच्या दशकात गुण्यांनी ही परिक्रमा केली आहे.आणखी पाच पंचवीस वर्षे उलटल्यावर पर्यावरणातील मनुष्याच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे केवळ स्मृती रूपाने उरणाऱ्या नर्मदा मैयाच्या परिसरातील एका वेगळ्या वैभवाचे दर्शन पुढील पिढ्यांना पुस्तकातून होण्यास मदत होणार आहे.रघुनाथ उर्फ तात्या गुणे यांचे हे लेखनकार्य धर्म हेच प्राणतत्व असलेल्या या देशासाठी, वैदिक संस्कृतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे.
लांजा तालुक्यातील देवधे गावातील आदर्श विद्यामंदिर देवधे या ज्ञानमंदिराच्या उभारणीत तात्या गुणे यांचा सिंहाचा वाटा आहे. या ज्ञानमंदिराच्या उभारणीमुळे पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदीप उजळण्यास मदत झाली. नर्मदा परिक्रमावासी रघुनाथ उर्फ तात्या गुणे यांचे आणखी एक महत्वाचे कार्य म्हणजे वेरळ गावातील श्री लक्ष्मी केशव देवस्थानाची निर्मिती होय. आधुनिक स्थापत्य व प्राचीन वैदिक संस्कृती यांच्या सुंदर मिलाफाने उभारलेल्या या मंदिरातील मुख्य व्दार व स्तंभावर कोरलेल्या काष्टशिल्पातून भारतीय वैदिक संस्कृतीची ओळख सहजपणे होते.
अध्यात्म त्यांच्या धमन्यातून वाहत आहे. वैदिक संस्कृतीचा विचार हा त्यांचा श्वास आणि ध्यासही आहे. साधनशुचिता व सभ्यता यांचा वस्तूपाठ निर्माण करताना अध्यात्मिक क्षेत्रात समाजाच्या कल्याणासाठी वावरणारे रघुनाथ उर्फ तात्या गुणे आता वयोपरत्वे थकले आहेत. यंदा त्यांनी ८३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या अध्यात्मिक क्षेत्रातील कृतार्थ वाटचालीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या संस्थेने ०३फेब्रुवारी २०२५ रोजी वाटूळ, ता. राजापूर येथे आयोजिलेल्या दहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात जीवनगौरव पुरस्कार २०२५ देऊन त्यांना सन्मानित केले.तेव्हा आपल्या मायभूमी साठी निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्यांचे संघठन असलेल्या संस्थेने गौरविल्याने ते आनंदित झाले.
श्रीबाबा आर्वीकरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर -
"आम्हीं काय केलें।व्हायचें तें झालें।
हरीनें ठेविलें।तैसें वागूं।।
या वचनाप्रमाणे त्यांची भाववृत्ती झालेली आहे.
नर्मदा परिक्रमावासी तात्या गुणे यांच्या कृतार्थ जीवनाचा पुढला प्रवास आनंददायी होवो यासाठी शुभेच्छा.
🚩💐💐💐💐
श्री. विजय हटकर
लांजा - रत्नागिरी
८८०६६३५०१७
No comments:
Post a Comment