Tuesday, February 4, 2025

      


       

संघाचे दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलन.


संपादकीय ...


        गत दशकभरात स्वतःची वेगळी ओळख जपत कोकणातील ग्रामीण साहित्याची चळवळ नव्याने बांधण्यासाठी पुढाकार घेतलेल्या, सामाजिक बांधिलकीचे अधिष्ठान असलेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबईच्या अनुज्ञेनं यावर्षीचे दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मुंबई - गोवा महामार्गावर वसलेल्या,राजापूर तालुक्यातील स्वर्गीय सुंदर वाटूळ गावाला मिळाला आहे. या अक्षर सोहळ्याच्या निमित्ताने ' पत्रिका ' हा विशेषांक सानंद प्रकाशित झाला. या विशेषांकातील संपादकीय लेख ...




        संघाच्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे हे दहावे वर्ष असून हा सारस्वतांचा मेळा राजापूर व लांजा तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीच्या तिरावर वसलेल्या, मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील ऐतिहासिक नाव लाभलेल्या, राजापूर तालुक्यातील 'वाटूळ' या निसर्गसंपन्न गावात परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज मठ परीसरात भरणार आहे. वारकरी संप्रदायाची असंख्य वर्षांची परंपरा वाटूळ गावाने जोपासली आहे. गावातील श्री महादेव, आदिष्टी,रवळनाथ, गांगोदेव, जाकादेवी, विठ्ठल-रुक्मिणी, गगनगिरी महाराज मठ, महापुरुष, बौद्धविहार इत्यादी धार्मिक स्थळे सामाजिक सलोखा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत गावातील धरण,ब्राह्मण देव,वाघबीळ, तांबळवाडी कडा इत्यादी प्रेक्षणीय स्थळे पर्यटन दृष्ट्या भविष्यात नावारूपाला येऊ शकतात. गणेश चतुर्थी, शिमगा, जाकादेवी उत्सव, महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, संत तुकाराम बीज,दत्त जयंती, नवरात्रोत्सव, गोकुळ अष्टमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बौद्ध पौर्णिमा, रिक्षा संघटनेची श्री सत्यनारायण महापूजा यासारख्या उत्सवांमुळे वाटूळ गावाचे सामाजिक ऐक्य अबाधित राहिले आहे.

      

     कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, व्यापार, शेती, राजकारण इ. सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राच्या मातीची सेवा वाटूळ गावच्या असंख्य सुपुत्रांनी केली....गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आणि आदर्श विद्यामंदिर प्रशालेने असंख्य विद्यार्थी घडविले... विपुल निसर्गसंपदा आणि मुबलक पाणी लाभलेल्या वाटूळ गावाने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या असंख्य पांथस्थांना इतिहास काळापासून आश्रय दिला आहे. याची साक्ष देणारी धर्मशाळा आजही वाटूळ तिठ्यावर उभी आहे.वाटूळ गावच्या प्रथा, परंपरा, उत्सव धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे, सामाजिक ऐक्य इ. बाबी सर्वार्थाने जागतिक पटलावर प्रतिबिंबित व्हाव्यात या उदात्त हेतूने राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने दहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा हा प्रपंच आरंभिला आहे.


       १९३९ साली कृष्णाकाठी दत्ताचे पवित्र स्थान असलेल्या औंदूंबरला कवी सुधांशु आणि कथाकार म. बा. भोसले यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातले पहिले ग्रामीण साहित्य संमेलन भरविले होते.त्याचे अध्यक्ष महामहोपाध्याय द.वा. पोतदार होते. यानंतर छोट्या प्रारूपातील साहित्य संमेलने भरविण्याची जणू परंपराच राजभरात सुरु झाली. आज ३५०च्या आसपास संमेलने राज्यभरात भरविली जातात.एका अर्थाने ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पूरकच ठरत आहेत.महाराष्ट्रात दरवर्षी गावोगावी जी विभागीय, प्रादेशिक आणि अन्य छोटी संमेलने भरतात ती नवीन लेखक, कवी घडविण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त, फलदायी ठरत आहेत, यात शंका नाही. ती केवळ अभिजात साहित्य प्रकारातील संमेलने आहेत अशातील भाग नाही. मात्र या संमेलनातून अनेक नव्या वक्त्यांना आणि साहित्यिकांना प्रोत्साहन मिळते. यंदा ज्याच्या पुढाकाराने वाटूळ गावी संमेलन संपन्न होते आहे ते नव्या दमाचे कवी - कथाकार विराज चव्हाण हे देखील संघाचा संमेलनातून नावारूपाला आलेले आहेत. कोल्हापूर - बेळगाव सीमेवर वसलेल्या उचगाव, कारदगा, कुद्रेमुख, चामरा, बाळेकुंद्री, बेळगल्ली, मंडोली, माविगड, येल्लूर अशा १० सीमावर्ती गावातील ग्रामस्थ ही मायमराठी च्या संवर्धनासाठी कानड्यांच्या विरोध मोडून जेव्हा सातत्यपूर्वक साहित्य संमेलने भरवितात तेव्हा छाती अभिमानाने फुलते.


    तीन वर्षानी राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या दरम्यान अध्यक्ष स्थान भुषविणारे संघाचे अध्यक्ष व प्रसिद्ध कवी सुभाष लाड यांनी 'बिनखुर्चीच्या व्यासपीठाचे संमेलन ' म्हणून ग्रामीण मराठी संमेलनांचे गेली १० वर्षे यशस्वी आयोजन करून संस्थेला राजभरात ओळख मिळवुन दिली आहे. संघ साहित्यासह शिक्षण,संस्कृती, कला, आरोग्य, कृषी, पर्यटन, पर्यावरण क्षेत्रातही सातत्यपूर्वक काम करतो आहे. अनेक तरुण कार्यकर्ते संघाकडे आकृष्ठ होऊन ग्रामीण जागरणाच्या प्रक्रियेत आस्थेने काम करीत आहेत, हे कार्यमग्न संघाध्यक्ष सुभाष लाड यांचे यश आहे हे मान्य करावे लागेल. साहित्य - संस्कृती - कला विषयीची आणि कोकणात चांगलं काही घडावं, कोकणातले गुणीजन कोकणाला आणि इतर प्रांताना माहीत व्हावेत, यातून उगवत्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी यासाठीची त्यांची तळमळ आणि अशा सत्कार्यासाठी पदराला तोशिष लावून सुभाष लाड यांनी चालविलेल्या धडपडीला दाद द्यायला हवी. अशी झपाटलेली वेडी माणसंच नव्या वाटा शोधत असतात आणि निर्माण करत असतात, असे जाहिर कौतूक शिपोशी येथे संपन्न झालेल्या नवव्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष जेष्ठ लेखक,संपादक, पत्रकार विजय कुवळेकर यांनी संमेलनाध्यक्षीय भाषणात करून सुभाष लाड सरांचे केलेले कौतूक संघ कार्यकर्त्यांना प्रेरक ठरले आहे.


       साहित्यिकाला पडणारे प्रश्न हे सर्वसामान्यांचे असतात. त्यातून निर्माण झालेली कलाकृती म्हणजे साहित्य. त्यामुळे साहित्य ग्रामीण किंवा नागरी असे काहीच नसते.कोकणातील  सर्वच ज्येष्ठ व  नवोदित साहित्यिकांना, मराठीच्या चोखंदळ रसिकांना अखिल भारतीय साहित्य संमेलन सहभागी होता येत नाही. त्यामुळे कोकणातील खास करून ग्रामीण भागातील साहित्यिकांना साहित्य संमेलनाचा आनंद घेता यावा, साहित्यिकांमधील नवांकुराचे भरण पोषण व्हावे, खेड्यातील जनतेला संमेलनाचे स्वरूप समजावे व या अक्षर सोहळ्यातून मायमराठी विषयीचा अभिमान वृद्धिंगत व्हावा,  मराठी भाषा व संस्कृती प्रचारातीत मराठी माध्यमाच्या शाळेचे महत्व विशद करून दिवसेंदिवस कमी होणारी मराठी शाळांतील पटसंख्या वाढावी व बंद पडत असलेल्या मराठी शाळा सुरू व्हाव्यात असे विविधांगी उद्देश या संमेलनाचे असल्यानेच संमेलनाच्या नावामध्ये ग्रामीण शब्दाचा जाणीवपूर्वक समावेश केलेला आहे. या सोबतीने आपल्या कर्तृत्वाने भारतमातेची सेवा करणाऱ्या, राजापूरच्या सकस मातीतील थोर सुपुत्रांची ओळख कोकणातल्या नव्या पिढीला व्हावी हा देखील या संमेलनाचा उद्देश आहे.


     नुकताच माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्याचे परित्रकही काही दिवसांपूर्वीच जाहिरही झाले. मात्र सोशल मीडिया, इंटरनेट यांच्या अफाट वापराच्या काळात तरुणाईला ग्लोबल भाषेकडून मायमराठीकडे वळविण्याचे आव्हान मातृभाषेचे सोहळे आयोजित करणा-या संस्थांपुढे आहे. या दृष्टीने संघाच्या संमेलनात युवाईला महत्च दिले जात असून त्यांना दिली जाणारी संधी स्वागतार्ह आहे. महाविद्यालयीन तरुणाईसाठी ही अक्षरयात्रा त्यांच्या साहित्यिक उर्मीला जागविणारी ठरू पाहते आहे.या दृष्टीने जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. किर्तीकुमार पुजारांसारखी अभ्यासू अधिकारी ही आता स्वत:हून पुढे येत आहेत.मराठी भाषेच्या या उत्सवासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून  ग्रंथाली' या अभिनव वाचक चळवळीचे  संस्थापक व महाराष्ट्रीयन संस्कृतिवैभवाच्या खुणा जतन करण्याचा आगळावेगळा उपक्रम असलेल्या 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'चे  मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल सर यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच संत तुकाराम महाराजांचे १२ वे वंशज ह.भ.प. अमोल अशोक महाराज मोरे,सिनेदिग्दर्शक राजेश देशपांडे, सिनेनाट्य अभिनेते महेश कोकाटे, कोकणातील  अभ्यासू पत्रकार,लेखक धीरज वाटेकर,विधीज्ञ विलास कुवळेकर या सर्वच मान्यवरांची उपस्थितीने ' वाटूळ ' येथील दशकपूर्ती संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

              यंदा दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. पूर्ण गाव या संमेलनाकडे एक सोहळा म्हणून पाहत असून गावकऱ्यां पासून ते चाकरमानीही  मनापासून सहभागी होऊन साहित्याच्या रंगी रंगून जाणार आहे, यातच संघाच्या संमेलनांचे यश आहे.या संमेलनासाठी पत्रिकेत लेख देऊन अनेक नामवंतांनी सहकार्य केलं, तसेच सर्व साहित्यप्रेमी कार्यकर्ते,संमेलन समिती,सहयोगी संस्था,जाहिरातदार व वाटुळ परिसरातील सूज्ञ आस्थावान नागरिकांचे अमूल्य सहकार्य लाभलं म्हणूनच हा शारदेचा अक्षर सोहळा सिद्धीला जात आहे. उद्याच्या सशक्त सामर्थ्यवान मराठी पिढीसाठी आवश्यक असलेली ही साहित्याची दिंडी वाटूळ येथील वै.ह.भ.प. हरिभाऊ चव्हाण साहित्य नगरीत येणाऱ्या मराठी सारस्वतांसाठी आनंददायी पर्वणी ठरेल.

💠💠💠💠

विजय हटकर.

०१/०२/ २०२५




No comments:

Post a Comment