श्री उमाशंकर दाते
मु.पो. आडिवरे, ता. राजापूर
संगीतातील अत्यंत महत्वाचे वाद्य म्हणजे ऑर्गन! एकविसाव्या शतकात ऑर्गन हे वाद्य जगभरातून लुप्त होते की, काय अशी भिती असतानाच एका भारतीय संगीत शिक्षकाने ऑर्गन वाद्य बनाविण्यासाठी पुढाकार घेतला. इतकेच नव्हे तर 'मेड इन इंडिया' ऑर्गन वाद्य बनवून सातासमुदापार पाठवित एकविसाव्या शतकातील ऑर्गननिर्माता अशी ओळख प्राप्त केली आहे. हे संगीत शिक्षक म्हणजेच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील आडिवरे गावचे सुपूत्र श्री. उमाशंकर दाते होय..
उमाशंकर दाते यांचा जन्म १४ जून १९७६ रोजी राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे सामान्य कुटुंबात झाला.त्यांचे शिक्षण १२ वी कला आणि संगीत विशारद असे झालेले आहे . प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण आडिवरे येथेच पूर्ण करून उच्च माध्यमिक शिक्षण राजापूर हायस्कूलमधून पूर्ण केले आहे.असे असले तरीही त्यांचा आजपर्यंतचा प्रवास खूप खडतर स्वरूपाचा आहे. सन १९९३मध्ये बारावी झाल्यावर घराची जबाबदारी असल्याने खासगी प्रवासी वाहतूक असा व्यवसाय करायला लागले,तो साधारण २००१ पर्यंत चालत होता परंतु नंतर हा उद्योग तेवढा फायदेशीर चालत नसल्याने जोडीला केबल नेटवर्कचा व्यवसाय चालू केला मात्र अत्याधुनिक विकसित तंत्रज्ञानामुळे DTH च्या सर्वदूर पोचल्याने तोही व्यवसाय बंद करावा लागला.वडिलांनी मोठ्या कष्टाने चालू केलेला इलेक्ट्रिकलचा व्यवसाय वडिलांचे वय झाल्याने त्यांनी पुढे चालू ठेवला.पुढे संगीताशी त्यांचे स्वर जुळलाने त्यांची प्रापंचिक गाडीही रुळावर आली.सन२०११ पासून ते राजापूर हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सेवेत आहेत. तसेच,महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरण समितीवर सदस्यही आहेत.
बाळ दाते यांचा वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत संगीताशी तसा संबंध नव्हता पण १९९४ साली आडीवरेच्या श्री देवी महाकाली मंदिरातील एका भजनाच्या कार्यक्रमात संगीत सुरांशी त्यांचा अनामिक ऋणानुबंध जुळला. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे गुरुकडे जाऊन शिक्षण घेणे शक्य नसल्याने या आधुनिक युगातील एकलव्याने चक्क नोटेशनची पुस्तक आणि सीडी यांनाच आपले गुरु मानले. झपाटून संगीत साधना केली आणि १९९९ साली आकाशवाणीची ऑडिशन पास होऊन राजमान्यता देखील मिळवली.
सन २००२ मध्ये संगीत नाटक बघण्याचा दाते यांच्या जीवनात योग आला व त्यावेळेस बाळासाहेब यांनी ऑर्गन हे वाद्य प्रथमतः बघितले. या वाद्याच्या नादमाधुर्याने प्रभावित होऊन हे वाद्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे वाद्यच आता जगात कुठेही तयार होत नाही. यातूनच त्यांची अस्वस्थता वाढली व कलेसोबतच उद्यमशीलता जागी झाली. हे वाद्य इतिहास जमा होण्याची भीति तर होतीच परंतु यामुळे महाराष्ट्रातील संगीत नाटकांमध्ये मोठी पोकळी निर्माण होईल अशा काळात रीड ऑर्गन हे वाद्य संगीत नाटकाचा अविभाज्य भाग आहे,मराठी रंगभूमीवर जवळपास १०० वर्ष हे वाद्य वापरलं गेले आहे. परंतु हे वाद्य काही अगदी मोजक्याच लोकांकडे होते. त्यामुळे नवीन वादकांना इच्छा असूनही वाद्य उपलब्ध होत नव्हतं ही बाब उमाशंकर दाते यांच्या लक्षात आली. शतकभर सदरचे वाद्य वापरात असल्यामुळेच ते वाद्य आपलेच आहे असं वाटू लागले. पण वस्तुस्थिती फार वेगळीच आहे ,साधारण १८२७ ते १९५० या याकाळात हे वाद्य फक्त अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये तयार होत असे. भारतात मात्र हे वाद्य तयार झालंच नाही, त्यामुळे हे आज इतिहास जमा झालं होतं.
ऑर्गन हे पाश्चात्य संगीतामधील अतिशय महत्त्वाचा पण गुंतागुंतीची रचना असलेले वाद्य.ख्रिसपूर्व २८५- २२२ काळात पाण्याचा ऑर्गन (वॉटर ऑर्गन ) नावाचे वाद्य शर्यती आणि खेळाच्या वेळी पुरातन ग्रीक व रोमन संस्कृतीत वाजवले जायचं.पुढे चर्चमध्ये या वाद्यानं आपल्या नादमाधुर्याने कायमचे स्थान मिळवलं आणि त्याला घरंदाजपणा आला. या ऑर्गन वाद्याचे थिएटर ऑर्गन, इलेक्ट्रिक ऑर्गन, रीड ऑर्गन असे अनेक भाऊबंद आहेत. यातील रीड ऑर्गन आणि भारतीय संगीतामधील पेटी किंवा हार्मोनियमचा अगदी जवळचा संबंध आहे. १७व्या शतकात रिड ऑर्गन ची निर्मिती असली तरी त्याला हार्मोनियम हे नाव आणि योग्य स्वरूप देण्याचे काम १८४० साली अलेक्झांडर या फ्रेंच माणसाने केलं आणि पट्ट्याने त्याचा पेटंटही घेऊन टाकलं. युरोपियन माणसांची ही दूरदृष्टी पाहून वाटतं तंतुवाद्यासारखी अनेक वाद्य तयार करणाऱ्या आपल्या भारतीय पूर्वजांनी याची पेटंट घेतली असती तर भारताला जगभर कर्ज वाटता आलं असतं,असो!
इंग्रज राजवटीत भारतामधील चर्चमध्ये वाजवल्या जाणाऱ्या या धीरगंभीर आणि नादमधुर वाद्याला गोविंदराव टेंबे आणि बालगंधर्व यांच्या सारख्या सूररत्नपारखी दिग्गजांनी संगीत रंगभूमीवर सामावून घेतलं आणि एक सुवर्णयुग साकार केलं. पुढे काळाच्या ओघात इलेक्ट्रॉनिक्स वाद्यांनी या गुणवंत वाद्याचा नाद दडपला. पण हे होणं संगीत कलेला मान्य नसावं म्हणूनच या ऑर्गन उत्थापनाचं कार्य घडून आलं आडिवरे गावातील बाळ दाते या मेहनती आणि गुणी कलावंताकडून.भारतात ऑर्गन बनत नसल्यामुळे सतत धडपडी करून मुंबईला एक ऑर्गन साऊंड बॉक्स त्यांनी मिळविला. अमेरिकेतील एका मित्राकडून ५० ऑर्गनचे रीडस मिळवले आणि अथक मेहनतीने २०१३ मध्ये भारतीय बनावटीचा पहिला ऑर्गन बनविला.त्यासाठी मिलिंग मशीनही तयार केले या वाद्यामध्ये खूप सुधारणा केल्या ,जवळपास ५० कि.ग्रॅ.वजन असलेल्या ऑर्गनचे वजन १४.५० कि.ग्रॅ.पर्यंत कमी केलं.त्यांनी आपल्या अभ्यासपूर्व व कौशल्यपूर्ण कामानं ऑर्गन वाद्य निर्मितीला नवसंजीवनी दिली.
सर्वच भारतीयांची आणि विशेष करून महाराष्ट्राची व कोकणवासियांची मान गर्वाने ताठ व्हावी अशी संगीत क्षेत्रात फार मोठी कामगिरी उमाशंकर उर्फ बाळ दाते यांनी केली आहे. ज्यायोगे त्यांच्या या भरीव योगदानामुळे संगीत नाटकाची परंपरा अशीच पुढे जाण्यासाठी फार मोठी मदत झाली आहे. त्यांच्या कामाची दखल थेट Reed Organ Society USA या जागतिक आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली असून त्यांच्यावर मुखपृष्ठासह सविस्तर नऊ पानी लेख (आर्टिकल) सन २०१७ मध्ये प्रसिद्ध केला. त्यात स्पष्ट अस म्हटलं आहे की, ऑर्गन हे वाद्य आता भारतात नवीन श्वास घ्यायला लागलंय तसेच युरोपियन ROS नेही डच भाषेत लेख (आर्टिकल) प्रसिद्ध केले. डेव्हिड एस्टीस या व्यक्तीने स्वतः भारतात येऊन उमाशंकर दाते यांची भेट घेतली.त्यांच्या या कामाची दखल अनेक मान्यवर लोकांनी घेतली आहे. त्यामध्ये कै पद्मश्री तुळशीदास बोरकर, शंकरजी महादेवन , विशालजी भारद्वाज, पं. उल्हास कशाळकर, पं. सुरेश तळवलकर, पं. आनंद भाटे ,प्रसिद्ध ऑर्गन वादक आदित्य ओक, अमित पाध्ये डॉ. उदयजी निगुडकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री तेजश्री प्रधान, माजी मंत्री विनोद तावडे या आणि अशा अनेक दिग्गज लोकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विशेष कौतुक केले आहे . विशेष म्हणजे परमपूज्य स्वामी बालयोगी सदानंद महाराज (तुंगारेश्वर, वसई ) यांनीही भेट दिली आहे.
भारतीय ऑर्गन निर्माता म्हणून भारतातील आघाडीच्या वृत्तपत्र माध्यमानीही दाते यांची दखल घेतली. यामध्ये Times of India, BBC, Abp माझा,न्यूज 18 लोकमत, झी 24 तास, लोकसत्ता, लोकप्रभा, महाराष्ट्र टाईम्स, पुढारी , सकाळ, प्रहार, तरुण भारत अशा अनेक माध्यमांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.याव्यतिरिक्त DD सहयाद्री वाहिनीवर विचारांच्या पलीकडे (beyond thoughts) या कार्यक्रमात बाळ दाते यांची मुलाखतही प्रसारित झाली आहे. गतवर्षी दिल्ली येथे आयोजित जागतिक पातळीवरील G20 summit 2023 च्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान दाते यांना मिळाला.परिषदेच्या रंगमंचावर पारंपरिक वेशभूषेत ऑर्गन वाद्यासह ते विराजमान झाले होते. तेथे त्यांनी आपली कला देश विदेशातील मान्यवरांसमोर सादर केली. एकुणच संगीतक्षेत्रातील ऑर्गन या महत्वपूर्ण वाद्य निर्मितीला नवसंजीवनी देण्याच्या महत्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.दाते यांनी आजवर पन्नासहून अधिक ऑर्गन तयार केले असून अमेरिका,नेदरलँडसह विविध देशात त्यांचे ऑर्गन तेथील सांगतिक कार्यक्रमात सप्तसुरांची उधळण करीत आहेत.
एकुणच भारतीय बनावटीचे आणि गुणवत्तेने कांकणभर सरस ऑर्गन तयार करून जागतिक संगीताच्या पटलावर भारतीय ऑर्गन निर्माता म्हणून ओळख प्राप्त करणाऱ्या श्री उमाशंकर दाते यांना सन २०२५ चा नाटककार ला. कृ. आयरे कलाश्री पुरस्कार संघाच्या १० व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला. एका योग्य पुरस्काराची उंची वाढविण्याऱ्या कलोपासकाला गौरवल्याने संघ कार्यकर्ता म्हणून मनस्वी आनंद झाला. उमाशंकर दातें सारखी व्यक्तिमत्वे कोकणचे नाव जगभर उंचावतात, तेव्हा त्यांचाविषयीचा आदरभाव वाढीस लागतो. संघाच्या दहाव्या संमेलनात त्यांना भेटून बोलता आले, त्यांच्यासोबत एक संस्मरणीय छायाचित्र काढता आले, सोबतच त्यांच्यातील गुणविशेषांचे आकलन करता आले. याचे समाधान झालेच मात्र अशा दिग्गजांच्या सहवासात तीन दिवसही सोन्याचे झाले!
विजय हटकर
लांजा.
No comments:
Post a Comment