गोमंतकीय घरे.
१९६१ मध्ये गोमंतक भूमी पोर्तुगीज जोखडातून मुक्त झाली तरी गोमांतक भूमीवरील पोर्तुगीज प्रभाव आजही अगदी उघडपणे ठळकपणे दिसून येतो या प्रभावातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गोव्यातील पोर्तुगीज धाटणीची सुंदर दुमदार कौलारू घरे.
यंदाच्या उन्हाळी सुट्टीत मडगावात आठ-दहा दिवस सुशेगात राहिलो.इथले आमचे स्नेही दशरथ नाईक हे टॅम्पो ट्रॅव्हलर चालवितात. एके दिवशी त्यांच्या गाडीचे काम करण्यासाठी मडगांव केपे रस्त्यावरील एका गॅरेजला त्यांनी गाडी उभी केली. गॅरेजच्या लगतचे पोर्तुगीज धाटणीचे घर इतके सुंदर होते की फोटो काढायचा मोह आवरला नाही.ते घर पोर्तुगीज वास्तूरचनेचा उत्तम नमुना होता. गोव्यात प्रामुख्याने तांबडा,पिवळा किंवा निळा यापैकी एका रंगात रंगवलेल्या बाह्यभिंती व जिथे जिथे दरवाजे व खिडक्या आहेत त्यांना पांढऱ्या शुभ्र रंगाची बॉर्डर दिलेली पहायला मिळते. घरांच्या बाह्य भिंतींवरील हा सुरेख कॉन्ट्रॉस्ट इथे येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो. दोनच रंगातली घरे हे इथल्या वास्तुकलेचे विशेष आहे. इथल्या बऱ्यापैकी श्रीमंत असलेल्या ख्रिस्तावांची घरे रस्त्याला खेटून कधीच नसतात. रस्त्यापासून आत, थोड्या अंतरावर प्रशस्त आवारात उभी असतात. जमिनीपासून तीन चार फूट उंच प्लिंथवर बांधलेल्या या घरांना मुख्य दरवाजा जवळ बाल्काव ( बाल्कनी ) असते, जेणेकरून सकाळी व सायंकाळ च्या वेळेला घरातील लोक रस्ता बघू शकतील, बाहेरच्या हालचाली टिपत बसून गप्पा मारू शकतील. वर्षभर आर्द्रता असलेल्या गोव्यात बाल्कावात बसल्यावर हवेचा झोत अंगावर यावा हाही त्यामागचा उद्देश असे. मुख्य दरवाज्याजवळ चार पाच पायऱ्या ही असतात.
घराच्या पायऱ्या घराच्या मालकाचे सामाजिक स्थान सांगतात. रुबाबदार पायऱ्या आणि त्यांची संख्या हे इथे श्रीमंतीचं लक्षण मानलं जातं.घराचे खांब, खिडक्या, व्हरांडे अधिकाधिक सुशोभित असतात. खिडक्यांच्या वर बसवलेला छपरी आडोसा हेही गोव्याच्या घरांचे वैशिष्ट्य आहे. मंगलोरी नळ्यांच्या वापराने खिडक्याना आणि पर्यायाने घराना देखणेपण आलेले दिसते. घराच्या आजुबाजूने,मागे पुढे बागेसाठी सोडलेली जागा व दोन्ही बाजूनी समान साधलेली मिती यामुळे पोर्तुगीज धाटणीची ही घरे अत्यंत उठून दिसतात. पांढऱ्या शुभ्र चकचकीत सिरॅमिक टाइल्स वरती गडद निळ्या रंगात व कर्सिव रोमन लिपीत लिहिलेली या घरांची नावे देखील फार आकर्षक असतात या टाइल्स ना आझूलेओज म्हटले जाते. घरात प्रवेश केल्यावर लागणारा मोठा दिवाणखाणा ( साला - दे - व्हजिता ) आणि त्याच्या अवतीभोवती असलेल्या इतर खोल्या ( स्वयंपाक खोली, शयनकक्ष ) अशी सर्वसाधारण रचना या घरांची असते.
या घरांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे तिथे असलेली कमालीची स्वच्छता. सुव्यवस्थितपणा हे गोमंतकीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. गंमत म्हणजे काळाच्या ओघात या पोर्तुगीत वास्तू रचनेने अशी काही मोहिनी घातली की गोव्यातले हिंदू लोकांची घरे देखील जवळपास तशाच धाटणीची आहेत.पोर्तुगीज काळात घरांना रंगरंगोटी करणे कायद्याने सक्तीचे होते असे ऐकायला मिळाले. घराच्या बाह्य भिंतींना रंग दिला नसल्यास घर मालकांना दंड होत असे. मात्र घर मालकांना घरच्या बाहेरच्या भिंतींना पूर्ण पांढरा रंग देता येत नसे, कारण पांढरा रंग हा पावित्र्याचा,आनंदाचा प्रतीक मानला जातो.त्यामुळे गोव्यात पांढरा रंग फक्त चर्च व चॅपेलच्या भिंतीला पूर्णपणे देण्यात येत असे. तसा नियमही होता, म्हणून कदाचित या रंगाचा वापर इथल्या लोकांनी घरांच्या रंगकामात फक्त दरवाजे खिडक्यांसाठी कल्पकतेने केला. परिणामी घरांचे सौंदर्य कसे खूलून दिसू लागले.आज पणजीतला 'फोंतैंईनेश ' भाग पोर्तुगीज धाटणींच्या सुंदर सुंदर वास्तू रचनांमुळे वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित झाला आहे. गोव्यात येणारे पर्यटक या भागात मोठ्या संख्येने येतात. इथल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या रंगबिरंगी सुंदर, सुबक घरांच्या सोबतीने आपला फोटो काढून कधी एकदा तो सोशल मीडियावर टाकतोय याची त्यांना घाई होत असते. म्हणून गोव्यावरचे रिल्स पाहताना आकर्षक पोर्तुगीज धाटणीच्या वास्तू रचनेमुळे वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळालेल्या या भागाच्या रिल्स अधिक पाहायला मिळतात. पणजीतील या वारसा स्थळाप्रमाणे गोव्यातील गावागावांमध्ये देखील अशाच पोर्तुगीज वास्तूरचना आपल्याला पाहायला मिळतात. इथे येणाऱ्या पर्यटकांनी समुद्र किनारे पाहण्या सोबतच या वास्तूरचना अधिक सूक्ष्मपणे पाहिल्या तरच पोर्तुगीची वास्तू रचनांची वैशिष्ट्ये त्यांना समजून घेता येतील.
🧩🧩🧩
श्री. विजय हटकर