शिलाहारकालीन श्री हरिहरेश्वर व श्री शिवानंद स्वामी आश्रम पांगरे बुद्रुक राजापूर.
राजापूर,
पश्चिम किनारपट्टीवरील एक ऐतिहासिक बंदर! छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.या तालुक्यातील बारसू, सोलगांव, देवाचे गोठणे या किनारपट्टी च्या कातळ सड्यांवर अर्थात राजापूर लॅटराईट सरफेस भागात सापडलेल्या कातळखोद शिल्पांमुळे अश्मयुगात या भागात मानववस्ती असल्याचे सिद्ध झाले. त्यातच साधारण २०१८ मध्ये तालुक्यातील पांगरे बुद्रुक गावातील एका डोंगर उतारावर पुरातन शैव लेणी (एकाश्म मंदिरे ) सापडल्याने राजापूर पाचव्या - सहाव्या शतकात भारताच्या पश्चिम किनारपट्टी वरील पाशुपत संप्रदायाचे शैव केंद्र म्हणून पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर राजापूर परिसरातील एकाश्म मंदिरांचा अभ्यास करण्यासाठी राजापुरात आलेल्या इतिहास अभ्यासक अनिल दुधाने सर यांनी पांगरे बुद्रुक गावातील हरिहरेश्वर मंदिर परीसरात सापडलेल्या शिलाहारकालीन शिलालेखाचे वाचन केल्याने धूतपापेश्वरासाखी ऐतिहासिक शिवमंदिरे असलेले राजापूर हे पाचव्या सहाव्या शतकात पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख शैव केंद्र असल्याचे महत्वपूर्ण संशोधन पुढे येत आहे.
इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांनी राजापूरहून पुण्याला जाताना फोन करून पांगरे बुद्रुक येथे शिलालेख सापडल्याचे वृत्त कळविताच एक इतिहास अभ्यासक म्हणून त्याचा आनंद झाला. याच दरम्यान आमचे गुरुवर्य सुभाष लाड मुंबईहून लांजा येथे वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त आलेले असल्याने गुरुवारी त्यांच्या सोबत हा ऐतिहासिक दस्तऐवज पाहण्यासाठी राजापूर गाठले.राजापूर शहरातून राजापूर रोड रेल्वे स्टेशन रस्त्यावर साधारण ८ कि.मी. अंतरावर समृद्ध निसर्गाच्या कुशीत वसलेले पांगरे बुद्रुक गाव आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या पुलावरून डावीकडे वळल्यावर अर्जूना नदीच्या सोबतीने डोलणारी हिरवीगार भाताची खाचरे पाहत जाण्याचा अनुभव प्रसन्न करतो. काही वेळातच उष्णोदकासाठी प्रसिद्ध असलेले उन्हाळे गाव लागते. उन्हाळे गेल्यानंतर १०-१२ मिनिटातच आपण पांगरे बुद्रूक गावातील ग्रामदेवता निनादेवी मंदिर स्टॉप जवळ पोहचतो. रस्त्यालगत असणाऱ्या याच मंदिराच्या डाव्या बाजूला शिलाहार काळातील प्राचीन हरीहरेश्वर मंदिर व श्री स्वामी शिवानंद (टेंब्ये) महाराज आश्रम हा पवित्र परिसर वसलेला आहे.
या ठिकाणी पोहोचल्यावर सर्वप्रथम ग्रामदेवता निना देवीचे दर्शन घेतले.गाभाऱ्यात निनादेवीसह रवळनाथ व पावणा देवी विराजमान आहेत. या मंदिरातून दर्शन घेऊन रस्त्याच्या पलीकडे असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिरात आम्ही गेलो. एका बाजूने समृद्ध वनश्री,पायथ्याशी खळखळ संगीताच्या ठेक्यावर प्रवाहित असणारा नितळ ओढा व शांत रमणीय असे श्रीक्षेत्र हरीहरेश्वर लगतच श्री स्वामी शिवानंद (कृष्णाभाऊ टेंब्ये ) महाराजांचं पवित्र समाधीस्थान. सारा परिसर संतोषाचे उत्सर्जन करणारा आहे. प्रवेशव्दारापाशी असलेला ७०० वर्ष पुरातन अश्वत्थ वृक्ष आपले आस्थेने स्वागत करतो. फिकस रिलिजिओसा हे वैज्ञाज्ञिक नाव असणारा अश्वत्त्थ म्हणजे पिंपळ वृक्ष. हे इथे आल्यावर कळले. ब्रह्मांड पुराणात अश्वत्थाचे महात्म्य संगितले आहे. स्वतः ब्रह्मदेवाने हे महात्म्य नारदमुनीला संगितले आहे. नारदमुनींनी अश्वत्थाचे वर्णन करतांना संगितले की अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी स्वतः ब्रह्मदेवाचा वास असतो, मध्यभागी विष्णु तर टोकाला रुद्र रूपी महादेवाचा वास असतो. वृक्षाच्या दक्षिणेकडील पाना फांद्यांवर शूलपाणी, पश्चिमेकडील शाखा पानांवर निर्गुण स्वरूपी विष्णु तर उत्तरेकडील पाना फांद्यांवर ब्रह्मदेवाचे अधिष्ठान असते. इंद्रदेवाचे अधिष्ठान पूर्वेकडील शाखा पानांवर असते. अशा तर्हेने अश्वत्थ वृक्षाच्या चारही दिशांना ब्रह्मा, विष्णु, महेश व इंद्र्देवाचे अधिष्ठान रात्रंदिवस अखंडपणे असते. अशा प्रकारे संपूर्ण अश्वत्थ वृक्षच देवतांनी व्यापून टाकला आहे. गो-ब्राह्मण व समस्त ऋषिगण तथा वेदादी यज्ञ-यागाच्या देवता ह्या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी निरंतर वास करीत असतात. सर्व नद्यांची तीर्थे आणि सातही समुद्रांच्या देवता ह्या अश्वत्थ वृक्षाच्या पूर्वेकडील शाखेवर निरंतर वास करीत असतात. अ-कार शब्द हा अश्वत्थाच्या मुळाशी असतो, स्कंध शाखा येथे ऊ-कार स्वरूप तर फळ व पुष्पे येथे म-कार वर्ण असतो. असा अ ऊ म म्हणजे ॐ कार स्वरूपाचे तेथे वास्तव्य असते.
मंदिर परिसरात पाटाच्या पाण्याचे केलेले नियोजनही लक्षवेधी आहे. कोकणातील ग्रामीण जलव्यवस्थेचे दर्शन येते होते.पाटाचे पाणी व अश्वत्थ वृक्ष न्याहाळत साधारण २५ सोपान उतरून आपण मंदिरापाशी येतो. जांभ्या दगडातील बंदीस्त संरक्षित दीपमाळ आपले लक्ष वेधून घेते.कोकणात अनेक मंदिरांच्या दीपमाळा ऊन,वारा पावसाचे तडाखे खात झिजलेल्या पहायला मिळतात. याचा विचार करून इथल्या व्यवस्थापनाने दीपमाळ संरक्षित केल्याबदद्ल व साऱ्या परिसर नीटनेटका ठेवत,स्वच्छता जपत पावित्र्य राखल्याचे पाहून कौतूक वाटले. मनात कौतुकाची भावना ठेवतच आम्ही हरिहरेश्वर मंदिरात प्रवेश केला. सभागृह, अंतराल, आणि गर्भगृह अशी सर्वत्र दिसणारी स्थापत्य रचना इथेही पहायला मिळाली. सभागृहात नंदीचे दर्शन घेऊन गर्भगृहातील शिवपिंडी चे दर्शन घेतले. यालाच लोक श्री हरिहरेश्वर संबोधतात. गर्भगृहातील शिवलिंग साधारण २ फूट उंचीचे आहे.गाभाऱ्याच्या बाहेर दोन्ही भिंतीत मोठे कोनाडे आहेत. एका कोनाड्यात बैठ्या पार्वती ची सुंदर मुर्ती तर दुसऱ्या कोनाड्यात श्री गणपती बाप्पाची सुरेख मूर्ती आहे.
इंद्राला अभय देण्यासाठी निघालेल्या विष्णू व शिव यांचा अवतार म्हणजे हरिहरेश्वर. शैव व वैष्णव पंथीयांसाठी म्हणूनच हरिहरेश्वर ही पूज्य देवता. कोकणात हरिहरेश्वरचे लोकप्रिय मंदिर श्रीवर्धन येथे असून १२२२ - २४ मध्ये ते होईसळ राजा वीर नरसिंह दुसरा याच्या काळात बांधल्याचे उल्लेख सापडतात मात्र पांगरे बुद्रुक येथील मंदिर ११२५ मध्ये उभारले असल्याचे नुकत्याच प्रकाशात आलेल्या शिलाहार कालीन शिलालेखाने सिद्ध झाल्याने पांगरे येथील हरिहरेश्वर मंदिर प्राचीन असल्याचे लक्षात येते. मंदिराच्या चारही बाजूने कायम स्वरूपी छप्पर असलेला मंडप असून एका बाजुला पवित्र असे औदुंबराचे स्थान आहे. मंदिराच्या एका कोपऱ्यात ओट्याजवळच एक एकाश्म मंदिर, महत्त्वपूर्ण वीरगळ व गद्देगाळ आहेत. या गद्येगाळावरच या मंदिराचे प्राचीनत्व सिद्ध करणारा शिलालेख आहे. सन १९८५ मध्ये स्वामीभक्त श्रीधर आगाशे यांनी लिहिलेल्या 'श्री स्वामी शिवानंद' या पुस्तकात पृष्ठ क्रमांक तीनवर या शिलालेखाची व या मंदिराला भेट देऊनच छत्रपती शिवरायांनी राजापूरवर मोर्चा लावल्याचा उल्लेख आहे.मात्र याची त्रोटक माहिती पुस्तकात मिळते. त्यामुळेच इतिहास अभ्यासक अनिल दूधाणे यांनी गदेगाळावरील शिलालेखाचे नुकतेच केलेले वाचन महत्त्वाचे ठरते. या वाचनाने मंदिरासह राजापूरचे प्राचीनत्व अधोरेखित झाले आहे.
हा शिलालेख दोन ओळींचा असून देवनागरी लिपीत आणि मराठी भाषेत आहे.शिलालेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने त्याची अक्षरे पुसट झाली असून झिजली आहेत शिलालेखात कालोल्लेख शके १०८२ म्हणजे सन ११६० असून तो बाराव्या शतकातील दिसतो. मजकुरात एका देवाच्या पीठिका (हरिहरेश्वर मंदिराचा ) म्हणजे पाया घातल्याचा उल्लेख असून तो शिलाहार वंशातील सर्वश्रेष्ठ राजा मल्लिकार्जुन याचा आहे.तो स्वतःस सिलाहार नरेंद्र ,महासमंताधिपती, तगरपूर परमेश्वर, महामंडळेश्वर अशी बिरुदे धारण करत असे .मल्लिकार्जुन देवाची कारकीर्द सन ११५५-११६२ अशी होती. त्याचे उत्तर कोकणवर प्रणालक (पन्हालेकाजी )येथे राज्य होते त्याचे शके १०७८ चा चिपळूण (पन्हाळे)स्तंभ लेख तसेच वसई येथील शके १०८३ शिलालेख प्रसिद्ध आहेत त्याने शेजारील राज्यांवर अनेक स्वाऱ्या करून मोठा राज्यविस्तार घडवून आणला होता. या मल्लिकार्जुन देवाने मंदिराचा पाया घालून त्यास (भूदान ) काही जमीन दान केल्याचा शिलालेखात उल्लेख आहे.. लेखाच्या शीर्ष भागात शापवचन आहे मजकुरावर गधेगाळाची आकृति कोरून ते पूर्ण केलेले दिसते. मल्लिकार्जुन देवाच्या राजवटीतील हा तिसरा शिलालेख उपलब्ध झाला आहे.
==================================
शिलालेखातील मजकूर:
१. सके १०८२ विक्रम संव
२. त्सरे पिठिका
अर्थ: शालिवाहन शके १०८२ विक्रम संवत्सर म्हणजे सन ११६० साली पीठिकेचे म्हणजे बहुधा येथील हरिहरेश्वर देवालयाच्या पायाचे बांधकाम केले होते. ते कोणी केले त्यांची माहिती लेखात नाही मात्र त्यावेळी शिलाहार राजा मल्लिकार्जुन तेथे राज्य करत होता. त्याचे पन्हाळे व वसई येथील कोरीव लेख उपलब्ध आहेत. ही नोंद नष्ट करणाऱ्यासाठी गधेगाळाच्या रूपात शापवचन अंकित करण्यात आले आहे.
===================================
एखाद्या मंदिरास दान दिलेले असेल, वर्षासन दिले असेल तर त्याचा कोणी भंग करू नये म्हणून शिलाहार काळात गद्येगाळ उभारीत असत. यावर गद्य ( गाढव ) व स्त्रीचे शिल्प असते. या शिल्पाच्या वर चंद्र -सूर्य कोरले जातात.मंदिरात दिलेले वर्षासन किंवा दान आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत चालू राहील असा त्याचा अर्थ असतो. मोकळ्या जागेत शिलालेख लिहिलेला असतो. या शिलालेखात मुख्य मजकुर वा माहिती असते. गद्येगाळ शिल्पात मंदिरास दिलेले वर्षासन,दान कोणी मोडेल, त्याचा गैरवापर करेल त्याला दिलेली शापवाणी असते.
गद्यकाळ उभारण्याचा मुख्य उद्देश गावासाठी अथवा देवा साठी दान केलेल्या जमिनीचा कोणी दुरुपयोग करू नये अथवा त्यावर अतिक्रमण करू नये म्हणून या वर शाप लिहिलेला असतो. हा शिलालेख पाहून समाधान वाटले.मात्र तो उघड्यावर न ठेवता मंदिराच्या एका ओटयावर ठेवायला हवा.
कोकणात अनेक शिवालयांशी निगडित असणारी कथा इथे नाही.घाटावरील कुंदगोळचे टेंब्ये नामक एक मोठे व्यापारी तांब्या, गुलाल, खोबरे, राजापुरी पंचे यासाठी प्रसिद्ध असलेल्य राजापूर बंदरावर व्यापार करण्याकरीता येत असत.एकदा राजापूर बंदरावर व्यापार करण्याकरता त्यांचा तळ पडला असताना दोन चार दिवस झाले तरी त्यांच्या मालाला गिऱ्हाईक मिळेना,सौदा पटेना.आजवर त्यांच्या बाबतीत असे कधी झाले नसल्याने त्यांच्या मनात अनेक विचारांचे काहूर माजले आणि अशा व्यग्र मनस्थितीत त्यांचा डोळा लागला. जागा आली ती पहाटे पडलेल्या एका स्वप्नाने.स्वप्नात साक्षात भगवान शंकराने ज्या गावात तुमचा शेवटचा तांडा पडला होता, तिथे माझी स्थापना कर व तुही तेथेच राहा असे सांगितले.त्यावर टेंब्ये यांनी जाहीर केले की माझा माल जर उद्या संपला तर स्वप्नात आलेला दृष्टांत मी खरा मानून त्या ठिकाणी तुझी स्थापना करेन आणि काय आश्चर्य पुढच्या दिवशी त्यांच्या मालाला गिऱ्हाईक सापडले व तो हा हा म्हणता संपला.परत माघारी जाताना आपल्या सोबतच्या तांडा व सहकार्यांना टेंब्येंनी गावाकडे पाठवले व ते गृहस्थ पांगरी बुद्रुक येथे कायम वास्तव्यासाठी राहिले. व याच ज्ञात पुरुषाने या हरिहरेश्वराच्या मंदिराची पहिली घुमटी उभारली.आज या मूळ पुरुषाची वृंदावन - समाधी देवळाजवळच आहे.
श्री स्वामी शिवानंद आश्रम :-
श्री हरिहरेश्वराची पुजा अर्चा करणाऱ्या याच टेंब्ये कुटुंबात पुढे श्री कृष्णाभाऊ टेंबे यांचा जन्म झाला. कृष्णा भाऊंना दत्तावतार श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतीनी कृपा आशीर्वाद दिला. प.पू.टेंब्येस्वामींकडून १९०६ मध्ये कृष्णाभाऊ टेंब्येनी अनुग्रह घेतला. पुढे मार्तंड माणिकप्रभू, सिद्धारूढ स्वामी महाराज, अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज,स्वामी स्वरूपानंद महाराज,नारायण महाराज, माधवनाथ यांसारख्या महान विभूतींचे सानिध्य व आशीर्वाद त्यांना लाभले.या श्रद्धास्थानांच्या व प्रभू कृपेच्या बळावर व अथक उपासना आणि साधनेच्या जोरावर कृष्णा भाऊंनी आध्यात्मिक सिद्धी प्राप्त केली. लवकरच ते सिद्धयोगी बनले. साक्षात श्रीदत्त गुरूकडून पदकमलांचा त्यांना प्रसाद मिळाला. पुढे त्यांनी श्री शिवानंद टेंबे स्वामी महाराज हे आध्यात्मिक नामाभिदान धारण करून पांगरे बुद्रुक गावातूनच लोककल्याणाचा मार्ग स्वीकारला. अडचणींच्या कचाट्यात सापडून आपल्याकडे अगदी हताश अवस्थेत आगतिकनेने येणाऱ्याच्या मनावरील जळमटे दूर करून त्याला सन्मार्गावर आणून त्याचे मनोधैर्य वाढवून त्यांचे अत्यंत कल्याण साधण्याचे पवित्र कार्य, सर्वसामान्यांच्या शंकांचे,1 व्यथांचे निराकरण करण्याचे कार्य ब्रह्मभूत शिवानंद स्वामींनी केले. शिवानंद स्वामींसारखे एक दैदीप्यमान साधुत्व कोकणात जन्मले,तिथेच लोकसेवेत जगले. वावरले आणि आपल्या साधुत्वाचा डिंडिम न पिटता तिथेच निमाले.
श्री शिवानंद स्वामींच्या इच्छेप्रमाणे हरिहरेश्वर मंदिराच्या १ शेजारीच त्यांचे काळ्या पाषाणातील समाधी मंदिर उभारण्यात आले असून गर्भगृहातील समाधी व शिवानंद टेंबे स्वामी महाराजांची सात्विक मूर्ती दर्शन घेणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करते. स्वामींचा सहवास ज्यांना लाभला, त्यांच्या सात्विकतेची अगाध शक्तीची अनुभूती ज्यांना आली त्या भक्तमंडळीनी श्री स्वामी शिवानंद सेवा मंडळ मुंबई ची स्थापना केली आहे. त्यात उल्लेखनीय भाग कोल्हापूरचे थोर चित्र महर्षी श्री भालजी पेंढारकर यांचा आहे.
या मंडळाच्या माध्यमातूनच आश्रमातील सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन पाहिले जाते. आश्रमात नित्य नैमित्तिक पुजाअर्चा अभिषेक, यज्ञयाग आणि अन्नदान हे कार्यक्रम मुख्यत्वे करून होत असतात. समाधी मंदिरात भोजनशाळा, सभागृह तसेच स्वामींच्या वापरातील वस्तू जतन करून ठेवलेली एक खोली असून यामध्ये अनेक अमूल्य वस्तू पाहता येतात. सोबत सचित्र दर्शनातून शिरशिवानंद स्वामींचा प्रवास अनुभवता येतो. आश्रमात दत्त जयंती, महाशिवरात्री, श्री स्वामी शिवानंद जयंती,पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा हे वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
एकूणच हा सारा परिसर गूढ शांततेने भरलेला आहे. या ठिकाणी आल्यावर मनाला एक तृप्ती व आनंद अनुभवता येतो. तो शब्दात मांडता येत नाही. इथले शांत, रमणीय वातावरण व समृद्ध भवताल भक्तगणांना आकृष्ट करणारे आहे, तसेच गद्धेगाळ,वीरगळ,शिलालेख सारख्या ऐतिहासिक साधनांचे अवलोकन करणाऱ्या अभ्यासकांनाही हे मंदिर नक्कीच आवडण्याजोगे आहे. म्हणूनच इतक्या आडबाजूला एवढे सुंदर देवस्थान व संत महात्म्यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली ही देवभूमी बघायला मुद्दाम वाकडी वाट करूनच जायला हवे!
🚩🚩🚩🚩🚩
श्री विजय अरविंद हटकर.
लांजा - रत्नागिरी
No comments:
Post a Comment