Tuesday, August 6, 2024

कोकण विकासासाठी झटणारी निरपेक्ष संस्था :- राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई

 कोकण विकासासाठी  झटणारी निरपेक्ष संस्था :-

     राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई 

        आई जशी आपल्या प्रेमाच्या बळावर अपरिहार्य ठरते तशी समाज जीवनाशी समरस होणारी संस्था आपोआप आवश्यक ठरते. राजापूर आणि लांजा या दक्षिण रत्नागिरीतील दोन दूर्गम तालुक्यातील जनतेच्या परिवर्तनार्थ गत सात दशकांहुन अधिक काळ धडपडणारी व आपल्या विधायक कार्याने या दोन्ही तालुक्यातील समाज जीवनाशी समरस झालेली संस्था म्हणजेच राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई होय. या संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेणारा लेख...      

         राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई ही संस्था दक्षिण रत्नागिरीतील अर्थात लांजा राजापूर तालुक्याची एका अर्थाने शिखर संस्था म्हणावयास हवी. १९५३ मध्ये मुहूर्तमेढ रोवल्यानंतर गेली ७१  वर्षे दोन्ही तालुक्यांमधील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या या संस्थेने गत दोन दशकात आपल्या कामाचे स्वरुप बदलत साहित्य, शिक्षण, संस्कृती,कला, क्रीडा,आरोग्य,पर्यटनव पर्यावरण क्षेत्रात सातत्यपूर्वक काम करत या दोन तालुक्यातील समाजभान जपणारी लोकाभिमुख संस्था म्हणुन लौकिक प्राप्त केला आहे.संघाच्या विविधांगी उपक्रमांमध्ये शेतकरी मेळावे ,शेतकरी अधिवेशने, दोन्ही तालुक्यातील हायस्कूल मधून प्रथम क्रमांकाने एस.एस.सी परिक्षेत उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्याचा उपक्रम, हरित कोकणच्या निर्मितीसाठी व्यापक स्तरावर चळवळ,निरपेक्ष भावनेने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींना दिले जाणारे २५ हुन अधिक पुरस्कार, आपतग्रस्तांना तातडीने मदत कार्य, दोन्ही तालुक्यातील कलाकारांना संधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील लिहित्या हाताना आत्मभान व आत्मविश्वास मिळवून देणारी ग्रामीण साहित्य संमेलने,पर्यटन महोत्सव,ग्रंथ चळवळ ,दिनदर्शिका निर्मिती, यांसह स्वर्गीय सुंदर कोकणभूमीचा अभिमान नव्या पिढीत निर्माण करुन त्यांना कोकणच्या शाश्वत विकासात आपले योगदान देण्यासाठी प्रवृत्त करण्यासारख्या अनेक  उपक्रमांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

       "फाईंड ए नीड अँड डिस्कवर ए वे टू फील इट"

       अर्थात राजापूर लांजा तालुक्यातील समाजाच्या गरजेचे भान आणि ती पूर्ण करण्याच्या नेमक्या मार्गाचे ज्ञान असल्याने संघाने दोन तालुक्यांची प्रतिनिधी संघटना असल्याचे सिद्ध केले आहे.

संघाच्या महत्वाच्या उपक्रमांची माहिती :-

🌀  संस्थेसाठी झिजणा-या सदस्यांचा सत्कार :-

                              संस्था आणि कार्यकर्ते या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संस्था वाढते, फुलते, बहरते ती संस्थेच्या ध्येयाशी एकरूप झालेल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर. कार्यकर्त्यांतला जिव्हाळा आहे संस्थेच्या आरोग्याचे व जिवंतपणाचे मोठे लक्षण! सुदैवाने यशस्वीतेच्या परिमाणावर संघ मोठा होत असताना संघातील कार्यकर्त्यांमध्ये असलेला जिव्हाळा, प्रेम,विश्वासही दृढ होतो आहे. हे सुखावह चित्र आहे. सळसळत्या रक्तातील तरुणपेशींना गतिशील ठेवत अनेक कार्यकर्ते संस्था उभारण्यासाठी जीवाचे रान करतात. आपला ऐन उमेदीचा काळ खर्ची घालतात, परंतु असे कार्यकर्ते वृद्धत्वाकडे झुकल्यानंतर त्यांच्या योगदानाचा संस्थेच्या नव्या संचालकांना विसर पडतो.असे चित्र आपल्याला अनेक थोर मानवतावादी आणि यशस्वी समजल्या जाणाऱ्या संस्थेतही पहावयास मिळते मात्र राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई याबाबतीत निराळा म्हणावा लागेल.

    संघाच्या आजवरच्या वाटचालीत ज्यांच्या कर्तृत्वाचा, मार्गदर्शनाचा आणि सद्भावपूर्ण सहकार्याचा लाभ संघ कार्यकर्त्यांना मिळाला अशा ज्येष्ठ सदस्यांचे सुवर्ण, षष्ठ्यब्दी,अमृत महोत्सवी सोहळे संघाने वेळोवेळी आयोजित करून त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. यामध्ये  गजाभाऊ वांद्रे, ,मनु डाॅक्टर व तुकाराम चव्हाण यांचे पंच्याहत्तरीचे कार्यक्रम करुन त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली तर सुरेश पेडणेकर,विश्र्वंभर पांचाळ, मीनल दीक्षित,आबा सुर्वे,कीरण बेर्डे, गणपत शिर्के, सुभाष लाड ,सुधाकर पेडणेकर, अशा अनेक कार्यकर्त्यांचा, मार्गदर्शकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करीत संघाने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थांसमोर एक आदर्श उभा केला आहे. सभासदांच्या आयुष्यात एखादा अचानक प्रसंग उद्भवला तर त्यासाठी संघाला तत्काळ मदत करता आली पाहिजे या शुद्ध हेतूने संघाने विचारपूर्वक आखलेल्या सहस्त्र सदस्य योजनेचीही सुरुवात झाली असून ही योजना संघासाठी अविरत काम करणाऱ्या सदस्यांच्या आजारपणात सहकार्य करण्याचे हेतूने सुरू झाली आहे.या योजनेचेही अनेक मान्यवर कौतुक करीत आहेत.


🌀 ग्रामीण साहित्य संमेलने :-




            कोकणातील साहित्य प्रेमींना एकत्रित करुन निखळ साहित्याचा आस्वाद देणारी ग्रामीण धाटणीची साहित्य संमेलने  संघ गत नऊ वर्षे आयोजित करित असुन याविषयी कमालीचे कौतुक वाटणारे अनेक मान्यवर आता पुढे येत असुन या उपक्रमाचे ते भरभरुन कौतुक करीत आहेत. 'ग्रामीण साहित्य संमेलन' वगैरे शब्द ऎकायला गोड वाटत असले तरी ते प्रत्यक्षात आणणं ही सोपी गोष्ट नाही. कितीही म्हटलं तरी दोन-तीन दिवस अशा प्रकारचा मेळावा भरणं हे प्रचंड खर्चाचं काम आहे. ज्या कोकणाला एकेकाळी मनीऑर्डरचा प्रदेश म्हणून हिणावलं जात असे त्याच कोकणातील रसिक मनाच्या लोकांचे संघटन असलेली ही संस्था हा साहित्य उत्सव शासकीय अनुदानाशिवाय आणि कुठल्याही प्रकारचे प्रतिनिधी शुल्क न घेता आयोजित करीत आहे याचे जाहीर कौतुक कोकणचे बुद्धीवैभव प्रकाश देशपांडे यांनी तळवडे येथील संमेलनाध्यक्ष भाषणात करून संघाच्या संमेलन उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संघाच्या ग्रामीण साहित्य संमेलनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही वाद-विवाद न उद्भवणे आणि एकोप्याने सगळा उपक्रम संपन्न होणे. जिकडे-तिकडे वैचारिक राजकीय आणि जातीय विभागणी झालेली दिसत असताना, गावागावात तट पडलेले दिसत असताना संघाने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात अनेक विचारांचे,जाती,धर्माचे लोक एकत्र येतात. एक दिलाने काम करतात. विचारांचे आदान प्रदान करतात. हे कौतुकास्पद आहे.अनुकरणीय आहे. 



        १९९० नंतर या ग्रामीण साहित्य संमेलनांना महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने गती मिळाली.आज मायमराठीत संपन्न होणा-या अशा छोट्या मोठ्या संमेलनांची संख्या लक्षणीय वाढली आहे. ही संमेलने साहित्याच्या संवर्धनाला उपयुक्त ठरत आहेत.मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रात अशी अनेक संमेलन यशस्वीपणे संपन्न होत असताना बुद्धीजीवांचा प्रदेश प्रदेश अशी ओळख मिळवणाऱ्या कोकणात मात्र काही हाताच्या बोटावर मोजके येतील इतक्या संस्था अशी संमेलने आयोजित करतात यात कोमसाम च्या सोबतीने आता राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे नाव घ्यावे लागेल.संघाने सन २०१५ साली सैनिकांचे गाव अशी ओळख मिरविणा-या लांजा तालुक्यातील 'तळवडे' गावी पहिले संमेलन आयोजीत केले होते.यानंतर पाचल, लांजा, ताम्हाणे, कोट, नाटे, प्रभानवल्ली, तळवडे व यंदा शिपोशी या गावी संघाचे साहित्य संमेलन संपन्न झाले.क्रांतीज्योत रॅली,ग्रंथ दिंडी,परिसंवाद,गुणवंत विद्यार्थी सत्कार,पुस्तक प्रकाशन ,कर्तृत्ववान व्यक्तिंचा गौरव,कवि संमेलन,लोककला, मनोरंजन, नववधू सत्कार,आदी वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांमुळे व सुयोग्य नियोजनामुळे हि संमलने मराठी भाषेवर प्रेम करणा-या  साहित्यप्रेमींसांठी एक पर्वणी ठरली असून या समेलनांना वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर,ज्येष्ठ लेखक-संपादक विजय कुवळेकर, अँड.विलास कुवळेकर,प्रकाश देशपांडे,गजाभाऊ वाघधरे,दशरथ राणे ,सुरेश खटावकर ,अशोक लोटणकर आदी मान्यवर संमेलनाध्यक्ष म्हणुन लाभले असून कामगार नेते सदानंद शेट्ये, सिनेनाट्य अभिनेते नारायण जाधव, कवि प्रसाद कुलकर्णी ,ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर,कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर,पर्यावरण कार्यकर्ते चरित्र लेखक धीरज वाटेकर,कवी अरुण इंगवले,पितांबरी उद्योग समुहाचे रवींद्र प्रभुदेसाई,मालवणी बोलीचे साहित्य संमेलन भरविणारे सतिश लळित,प्राध्यापक वि.शं.चौघुले,इतिहास अभ्यासक रविराज पराडकर,सुनिल कदम,इन्फिगो आय केअर चे डाॅ.श्रीधर ठाकुरदेसाई,के.आर.कंदी साहेब यांसारख्या अनेक मान्यवरांनी लाल मातीत निर्माण होणा-या नवसाहित्यिकांना व्यासपीठ मिळवुन देणा-या ,बीन खुर्चीचे व्यासपीठ अशी ओळख मिरविणा-या  संघाच्या या अक्षरोत्सवाला पाठबळ दिले आहे.


🌀 शैक्षणिक उपक्रम :- 



           खेड्यातील होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने राजापूर व लांजा तालुक्यातील प्रत्येक हायस्कूल मधून एस.एस.सी.परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून रोख पारितोषिक देण्यासाठी १९७८साली  विद्यार्थी शिक्षण निधी योजना राबवण्यात संघाने सुरुवात केली. या योजनेत अनेक दानशूर व्यक्तींनी सहभाग घेऊन कायमस्वरूपी देणग्या दिल्या असून त्यांच्या व्याजातून दरवर्षी मनीऑर्डरने बक्षिसाची रक्कम त्या विद्यार्थ्यांना पाठवले जात असे. पुढे १९९५ पासून स्थानिक पातळीवर एखाद्या मध्यवर्ती शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पारितोषिक व प्रशस्तीपत्रक स्वीकारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवरांनाही बोलवले जाते. हा कार्यक्रम आजतागायत सुरू आहे.अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी तज्ञांची व्याख्याने, शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन, एस.एस.सी चा १००% निकाल लागणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार,चित्रकला, हस्ताक्षर, निबंध, रंगभरण,वक्तृत्व आणि विविध स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सुप्त आविष्काराच्या प्रकटीकरणासाठी संघाद्वारे आयोजित केल्या जातात. याचबरोबर बदलत्या अभ्यासक्रमाची ,नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती देण्यासाठी तज्ञांची व्याख्याने संघाच्या वतीने आयोजित केली जातात.


🌀विविध पुरस्कार :



                पुरस्कार प्रेरणा देतात. समाजाच्या विकासासाठी अनेक संस्था, व्यक्ती अव्याहतपणे काम करीत असतात.या व्यक्तींना आणि संस्थांना पुरस्काराने सन्मानित करून गौरविले तर त्यांच्या विधायक कार्याला सकारात्मक पाठबळ मिळते. त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो. हे लक्षात घेऊन संघाच्या वतीने ग्रामीण भागात प्रतिकुल परिस्थितिशी संघर्ष करीत ,मूल्यविवेक जपत,वेगळ्या वाटांवर चालत विधायक कार्यासह राष्ट्र निर्मितीचे कार्य करणाऱ्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक,प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, सरकारी व निमसरकारी कर्मचारी, महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात भरीव योगदान देणारे व्यक्ती व संस्थांचे कौतुक करण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्याचा उपक्रम संघाने हाती घेतला आहे. हे करीत असताना होऊन गेलेल्या किंवा हयात नसलेल्या थोरांचे समाज धुरिणांचे स्मरण करावे किंवा त्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करावा या हेतूने पुरस्कारांना त्यांची नावे देण्यात आली आहेत.  त्यांच्या नावे पुरस्कार पुरस्कृत करून त्यांचे चरित्र पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न संघ करीत आहे. मार्च २०१४ पासून सुरू केलेल्या या उपक्रमातून आजवर दोनशेहुन अधिक कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे.


🌀 शेतकरी मेळावे :- 


                विविध गावांमध्ये शेतकरी मेळाव्यांचे यशस्वी आयोजन सुरुवातीच्या कालखंडात संघाच्या वतीने करण्यात आले. शेतीविषयक सुधारणा, बागायतीचे महत्त्व, शेतीपूरक लघुउद्योग, भाजीपाला व कुक्कुटपालन, फुल शेती ,फळ प्रक्रिया आणि विविध विषयांवरचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना संघातील या मेळावातून सातत्याने करण्यात आले आहे. या मेळाव्यांना शेती विषयातील तज्ञ मार्गदर्शकांना प्राचारण करण्यात येत असे.१९६५ चा शेतकरी मेळावा भूतपूर्व कृषीमंत्री बाळासाहेब सावंत यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता.१९९४ ला वाटुळ येथे व २०१० मध्ये व्हेळ येथे शेतकरी मेळावा घेऊन नवीन बी बियाण्यांची व शेतीपूरक उद्योगधंद्यांची माहिती देण्यात आली. या मेळाव्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्याची प्रेरणा मिळाली असून अनेक नाव तरुण शेतीकडे वळले आहेत.सद्यस्थितीत शेतीत राबणा-या प्रगतशील शेतक-यांचा सतत शोध घेऊन त्यांचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवण्याचे काम संघ करतो आहे.महेश सप्रे,राजेंद्र पालये,अमर खामकर,वासुदेव घाग ,मारुती मुगुटराव, हनुमंत विचारे यांसारखे प्रगतशील शेतकरी संघाच्या कामाने प्रभावित होऊन संघाशी कायमचे जोडले गेले आहेत.


🌀सापड लोककला व माचाळ पर्यटन महोत्सव :-



                       रत्नागिरी जिल्ह्यातील गिरीस्थान किंवा थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपाला आलेला निसर्गरम्य, स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या माचाळ येथे  राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने गतवर्षी सापड लोककला व पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता.या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करणारे माचाळ हिल स्टेशन जागतिक पर्यटक नकाशावर यावे यासाठी प्रयत्न करण्यात आले.माचाळ येथील अल्हाददायक थंड हवा, ग्रामीण संस्कृती जोपासणारे लोकजीवन, माचाळचा इतिहास, मुचकुंदी नदीचा उगम तिथली रांजणखळगे, सारे वैशिष्ट्यपूर्ण आहे.निसर्गाशी नाते जोडणारे शाश्वत पर्यटन आजच्या लोकांना हवे आहे. भेसळमुक्त नैसर्गिक अन्न, शुद्ध हवा आणि त्याचबरोबर शुद्ध विचारांना साथ घडणारे पोषक वातावरण लोकांना हवे आहे. यादृष्टिने  माचाळ हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. माचाळ हिल स्टेशनचा विकास झाला ,इथे पर्यटन व्यसाय बहरल्यास लांज्याच्या अर्थकारणाला एक नवी दिशा मिळेल या हेतूने माचाळ मध्ये दरवर्षी पर्यटन महोत्सव घेऊन सरकारचे ,उद्योजकांचे लक्ष वेधणे ,ग्रामस्थांचे उद्बोधन  करण्याचे कार्य संघ करीत आहे.माचाळ सोबतच दक्षिण रत्नागिरीतील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी संघ उपक्रम राबवीत आहेत.


🌀आपतग्रस्तांना मदत :- 

        विविध नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी संघ सामाजिक जाणिवेतुन पुढाकार घेऊन मदत करण्याचे कार्य आजवर करीत आला आहे.१९५८ साली रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लोकांचे बेसुमार नुकसान झाले होते.त्यावेळी तत्कालिन संघ कार्यकर्त्यांनी त्यांच्या मदतीकरिता नाट्यप्रयोगाचे आयोजन करुन त्यातुन मिळालेला निधी मुख्यमंत्री कोकण रिलीफ फंडाकरीता देण्यात आला होता. काही वर्षापुर्वी चिपळूण मध्ये आलेल्या महापुरावेळी ही  संघाने चिपळूण मध्ये भरीव कार्य केले आहे.यासोबतच निराधार व्यक्ती,दिव्यांग व्यक्ती ,निराधारांना आधार देणा-या संस्थांसाठी हि संघ नेहमीच मदतकार्य करीत आला आहे.


🌀 नदीसंवर्धन :-



         कोकणातल्या जीवनदायिनी नद्यांचे संवर्धन व्हावे यासाठी संघ सातत्याने काम करीत असुन राजापुरातील तळवडे ,रायपटण येथे अर्जुना नदिच्या काठावर तर लांजा तालुक्यात काजळी नदिच्या काठावरील शिपोशी,बोरिवले गावात नदी जलपुजनाचे कार्यक्रम संघाने आयोजित केले आहेत.या गावतील ग्रामस्थांमध्ये या जलमातांविषयी आदरभाव निर्माण करून नद्या गाळमुक्त होऊन स्वच्छ ,प्रवाहित होऊन बारमाही कशा होतील यादृष्टीने संघ नियोजनपूर्वक कार्यरत आहे.बेनी, नावेरी, मुचकुंदी, अर्जुना, काजळी नद्या व तिच्या खो-यांमध्ये जलस्त्रोतांविषयी जनजागरणाचे संघाचे कार्य जाणीवपुर्वक सुरु आहे.



🌀वृक्षमहोत्सव :- 



           कोकणातील हरित वनश्रीची बेसुमार तोड गत काही वर्षात होऊ लागल्याने कोकणातील तापमानाचा पारा नवे उच्चांक गाठत आहे.एकेकाळी कोकणातील कोणत्याही गावात जाताना दिसणा-या घनदाट राया आता विरळ दिसु लागल्या आहेत. बेसुमार जंगलतोड केल्याने हिरवेगार डोंगर उघडे दिसु लागले आहेत.कोकणात विकासाच्या नावाने लाखो जंगली झाडांची तोड करण्यात आल्याने हरित कोकणचे शाश्वत सौंदर्य शापीत झाले आहे.येणा-या काळात याच वेगाने इथली जंगले स्वार्थी प्रवृत्तीच्या समुहाने संपविली तर बालकवींच्या कवितेतील कोकण इथे होता हे नव्या पिढीला सांगितल्यास त्यांना विश्वास बसणार नाही.म्हणुनच संघाने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला यंदापासुन व्यापक स्वरुप देऊन वृक्ष महोत्सवाच्या नावाखाली अनेक पर्यावरण प्रेमींना एकत्रित केले आहे.या कोकणप्रेमी  समुहाकडुन दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोकणी ,इथल्या वातावरणाला पुरक वृक्ष लागवड करून निदान लांजा राजापूर तालुके हिरवाईने समृद्ध करण्याचे ध्येय संघाने बाळगले असुन संघाच्या या उपक्रमाला अनेक नामांकित संस्थानी पाठिंबा दिला आहे.


         संघाच्या स्थापनेचा इतिहास देखील रंजक आहे. अखिल रिंगणे ग्रामस्थ मंडळ यांच्या पुढाकाराने नाटककार लाडकोजी कृष्णाजी आयरे यांनी  ०१ मे १९५३ ला भायखळ्याच्या राणी बागेच्या हिरवळीवर एक सभा घेतली. देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते.कोकणातील ापल्या गावखेड्यांचा विकास आपणच करूया या हेतूने या सभेमध्ये जमलेल्या लांजा व राजापूर तालुक्यातील मुंबईस्थित चाकरमानी समाजधुरीणांनी " राजापूर तालुका लांजे महल नागरिक संघाची"  स्थापना केली. संस्थेचे पहिले अध्यक्ष गोविंदराव चव्हाण आणि उपाध्यक्ष नाटककार लाडकोजी कृष्णाजी आयरे हे होते. संघाची कार्यकारिणी प्रत्येक वर्षी बदलत असायची .असे असले तरी  पासून १९९४ पर्यंत म्हणजेच ४० वर्षे अध्यक्षपद अध्यक्षपद भूषवण्याची संधी गोविंदराव चव्हाण यांना मिळाली. या काळात संघाला दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले.पुढे रघुनाथ चव्हाण ,गोपाळ सरफरे, रा.सु.खामकर,तुकाराम शिंदे, धोंडू खांडेकर यांनीही संघाचे अध्यक्ष पद भूषवित संघाच्या कामाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. यांच्यासह कुरंग मधील माधवराव गुजर, वाटुळचे श्रीधर चव्हाण,आरगांवचे श्रीधर खामकर, हरळचे ॲड.रा.आ.खामकर,तळवड्याचे सिताराम पळसुलेदेसाई, संघाचे २२ वर्षे सरचिटणीसपद सांभाळणारे आत्माराम मा. उर्फ आमं हांदे , अशा कार्यकर्त्यांनीही संघाच्या विकासात्मक वाटचालीत आपले योगदान दिले. मात्र एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकात संघाची धुरा सामाजिक कार्यकर्ते, अष्टपैलु व्यक्तिमत्व असलेल्या सुभाष लाड यांच्याकडे आली आणि त्यांच्या कुशल नेतृत्वात संघाने सातत्याने रचनात्मक कार्य करीत कोकणातील नामांकित ,प्रगतशील संस्था म्हणुन आपली मुद्रा उमटविली आहे. आज राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईच्या या कार्यात महेंद्र साळवी,प्रकाश हर्चेकर,गणेश चव्हाण,विराज चव्हाण,दिपक नागवेकर,प्रमोद मेस्त्री,प्रमोद पवार,मंगेश चव्हाण यांसारखी नवी तरुणाई देखील मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने संघाचा रथ आज यशस्वी घौडदौड करीत आहे.

          चैतन्याची फुलवा झाडे,

          द्या जगण्याला अर्थ नवा.

         अडले पडले उचला,

         ज्यांना आधाराचा हात हवा..

       या उक्तीप्रमाणे राजापूर लांजा तालुक्यातील निराधार नागरिकांना सावली देणारा आणि आपल्या कार्यातून सुसंस्कृत करणारा राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ,मुंबईचा उत्तरोत्तर उत्कर्ष होऊन ही संस्था यशाची शताब्दी पूर्ण करावी  हीच सदिच्छा.


🌀🌀🌀💠💠💠

विजय हटकर  -  ८८०६६३५०१७.

लांजा

🌀🌀🌀💠💠💠

साप्ताहिक कोकण मीडिया मधील लेख

दि.०९ आॅगस्ट २०२४ -










No comments:

Post a Comment