व्यासंगी प्राचार्य हरपले...
सन २००४ ते २००७ हा आमचा महाविद्यालयीन जीवनाचा काळ मंतरलेला होता. महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी आम्हाला प्रभावित केले होते.त्यापैकीच एक म्हणजे तत्कालीन प्राचार्य डॉ. सुधीर भोसले सर होय. व्यासंगी,प्रशासन कुशल भोसले सरांचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. प्रसन चेहरा, चेहऱ्यावर मिश्किल हास्य असलेले उंचपुरे भोसले सर बोलायला उभे राहिले की त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला शीतल विचारप्रवाह पुढे जाण्याची, ध्येय साध्य करण्याची प्रेरणा द्यायचा.
भोसले सरांनी महाविद्यालयाचे प्राचार्यपद स्विकारले तो काळ महाविद्यालयाच्या उभारणीचा होता. नुकतेच उच्च शिक्षण देणारे सिनियर कॉलेज लांज्यातील शिक्षण धुरीणींनी अथक मेहनतीने सुंदर अशा निसर्ग समृद्ध वातावरणात आमराईत उभे केले होते. हा कसोटीचा काळ ठरला. प्रशासकीय कामांचा रेटा असतानाही त्यांनी अध्यापनाचे काम नित्यनियमाने केले. तो त्यांचा प्राणवायू होता. कॉलेजमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी होते.आजही तीच परिस्थिती कायम आहे. त्यांच्यामधील बलस्थाने आणि उणिवा याचा अदमास त्यांना होता. त्यांचा सर्वंकष विकास व्हावा म्हणून संस्थात्म पातळीवर त्यांनी निरपेक्ष प्रयत्न केले. कल्पकता, अभ्यासु वृत्तीच्या जोरावर संस्थाचालक, प्राध्यापक सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी भगिरथ प्रयत्न करत कॉलेजचा कायापालट केला.
पदवीच्या तृतीय वर्ष कला शाखेसाठी मी हिंदी भाषा विषय निवडला होता.वर्षभर अभ्यासाकडे दूर्लक्ष व एकांकीका, पथनाट्ये याकडे लक्ष जास्त दिल्याने अंतिम परीक्षा १५ दिवसावर आली तरी अभ्यास करत नाही म्हणून नाराज झालेल्या एसएम चव्हाण सरांनी मला प्राचार्यांच्या दालनात उभे केले. माझी तक्रार भोसले सरांकडे केली मात्र सर अजिबात ओरडले नाहीत. त्यांनी शांतपणे तृतीय वर्ष अंतिम परीक्षेचे महत्त्व समजावून सांगत ध्येय साध्य करण्यासाठी उरलेल्या दिवसाचे नियोजन करून अभ्यास कर अशी प्रेरणा मला दिली. त्यासोबत माझ्या व्यक्तिगत परिस्थितीचे भान करून दिल्याने मी शेवटच्या टप्प्यात जोमाने अभ्यास केला.व कला शाखेत २००७ साली महाविद्यालया पहिला आलो.
भोसले सरांनी दिलेला प्रेरणेमुळेच हे यश मिळविता आले होते.
दिड वर्षापूर्वी नॅक कमिटीच्या भेटी दरम्यान प्राचार्य भोसले सर सीनियर कॉलेज लांजाला आले होते ती भेट शेवटची असेल असा विचारही त्यावेळी मनात आला नाही. आम्ही सर्वच माजी विद्यार्थ्यांनी अर्थात अभि राजेशिर्के, अतुल गुरव, दिगंबर मांडवकर व मी सरांसोबत उत्साहाने फोटो काढले होते. सर देखील त्यावेळी आनंदी होते.निवृत्तीनंतर येणारी अपरिहार्य मरगळ त्यांच्या सोबत वावरताना त्यावेळी कुठेच दिसली नव्हती. भोसले सरांनी त्यांच्या एस.टी. प्रवासाचा एक भन्नाट किस्सा आम्हा मुलांना त्यावेळी सांगितलं होता. त्यात एसटी कंडक्टरला तर सर कसे फसवतात याचा सुंदर वर्णन होतं. आज मात्र सर आम्हा सर्वाना असेच फसवुन दिगंताचे प्रवासी झाले आहेत.खुप खोल खोल दाटुन आलय मनात, खुप लिहायचं होतं.. लिहीताही येत नाहिये.. थांबतो..
जाउद्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला..
भोसले सर तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली !!
🙏🙏🙏🙏🙏🙏
विजय हटकर, लांजा
२२.०१.२०२५