Saturday, March 13, 2021

निसर्गरम्य म्हादोबा ...

 

निसर्गरम्य म्हादोबा ...

सुंदर निसर्ग आणि नीरव शांतता अनुभवायची असेल तर म्हादोबाला मुद्दाम जायला हवं.

 


       ब-याचवेळा आपल्याला एखाद्या ठिकाणी भेट द्यायची अतीव इच्छा असते.तिथे जाण्याचे मनसुबे ही आपण आखतो मात्र काहि ना काही कारणास्तव आपले मनसुबे उधळले जातात.व त्या ठिकाणी जाण्याची आपली इच्छा पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होतात.बरं,ब-याचवेळा आपल्याला जायची इच्छा असलेले ठिकाण अगदी जवळ हाकेच्या अंतरावर असूनही आपली इच्छापूर्ती होत नाही.मग भगवंताच्या इच्छेशिवाय आपण  कुठेही जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही गोष्टीला पूर्ण होण्यासाठी योग जुळावे लागतात या विचारांवर आपली श्रद्धा गाढ होते.  लांजा शहराच्या सीमेवर महामार्गालगत विस्तारलेल्या  शेतीशाळेच्या मागे डोंगरमाथ्यावर वसलेल्या श्री देव म्हादोबा ( महादेव)  चे आज वयाच्या पस्तीशीत महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर दर्शन झाले आणि भगवंताचे आज्ञेशिवाय काहीही घडत नाहि यावरिल विश्वास आणखी दृढ झाला.

      भारतात सर्वात पूजिला जाणारा देव म्हणजे देवाधिदेव महादेव शिव.अनंत लीलेने नटलेल्या महादेवाची लांजा शहरातही धनी केदारलिंग, श्री पॊलस्तेश्र्वर ही ऎतिहासिक मंदिरे असून मोठ्या भक्तिभावाने लांजावासीय माघ कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र म्हणून साजरी करतात. या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून व्रत केले जाते. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो.शंकराची पूजा ही शिवलिंग आणि मूर्तीच्या रुपात केली जाते. शिवलिंगाची पूजा करताना अनेक गोष्टींचा वापर केला जातो. शंकराची नियमित पूजा केल्यास  दारिद्र्य दूर होते, आरोग्य नीट राहते, स्वभाव शांत राहतो, समाजातला मान सन्मान आणि यश प्राप्ती होते.अशा या शिवाचे कितीही साकल्याने वर्णन केले तरीही दशांगुळे उरतोच.
     
         आज महाशिवरात्री निमित्त शहरापासुन  जवळच्या गवाणे गावातील सिद्धेश्वराच्या दर्शनाचा बेत आम्ही लहानग्या कु.विधी खातर आखलेला..हा बेत यशस्वी करुन घरी परतत असताना लांजा आगारातील वाहनचालक सन्मित्र सुधीर रेवंडकरांची सपत्निक भेट झाली.त्यांच्या बोलण्यातून ते गवाणे येथील शेतीशाळेच्या मागे असलेल्या टेकडीवरील म्हादोबा मंदिरात दर्शनात जात असल्याचे कळले.म्हादोबाच्या दर्शनाची माझीही अनेक वर्षाची इच्छा अपुर्णच होती.त्यात महाशिवरात्रीला जाण्याची विचारणा झाल्यावर नकार देणे अशक्यच होते.बरोबर  ५:३० वाजले होते.सूर्यदेवाचा मावळतीकडे जाण्याचा प्रवास सुरु झाला होता.पण टेकडिवरिल मंदिरापर्यंत गाडी जाते म्हटल्यावर मि आनंदाने सहमती दर्शवित त्यांच्या पाठोपाठ मार्गस्थ झालो. टु व्हीलर मुळे अवघ्या १० मिनिटातच आम्ही शेतीशाळेमागील टेकडीवर पोहचलो.टेकडीच्या माथ्यावरून दिसणारा अप्रतिम निसर्गवैभव व मन भुलवुन टाकणारा सूर्यास्ताचा देखावा पाहुन येथे आल्याचे समाधान मिळाले.या मावळत्या दिनकरासमोर नतमस्तक होत माथ्यावर उभारलेल्या छोट्या देऊळाकडे वळलो. देऊळाला गाभारा नसून  छोटेखानी उभारलेल्या सभामंडपातच डाव्या बाजुला जमिनीलगत गोलाकार सुंदर शिवपिंडी आहे. म्हादोबाच्या मंदिरातील शिवलिंगाचे मनोभावे सहकुटुंब दर्शन घेतल्यावर ‘रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी’ अशी अवस्था झाली.
        
     मंदिराचे पुजारी श्री सुनिल दाभोळकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर या स्वयंभू व जागृत स्थानाची उकल झाली ती अशी -सर्वसाधारण  पूर्वीच्या काळी एक गाय येथे येऊन पान्हा सोडायची.त्यामुळे ती घरी दूध देत नसे. त्याचा शोध घेताना ,ती टेकडीच्या माथ्यावरील येथे पान्हा सोडते असे दिसले.तेव्हा गुराख्याने त्या गायीला मारण्यासाठी कु-हाडिचा घाव घातला.त्या कु-हाडीचा घाव लिंगावर पडला असुन त्याची निशाणी आजही शिवलिंगावर आहे.  महादेव या नावाचा अपभ्रंश म्हादोबा  हा असावा असे वाटते.कदाचित स्थानिक बोलीभाषेत महादेवाचा  म्हादोबा असा अपभ्रंश झाला असावा.महाशिवरात्र  व श्रावणी सोमवारी भाविकांची दर्शनासाठी येथे गर्दी होते.
    
       म्हादोबाच्या टेकडीवरुन लांजा, गवाणे व देवधे या तीन गावांचे विहंगम दर्शन होते.या टेकडीच्या पायथ्याशी  निसर्गाचं अमर्याद वरदान लाभलेल्या गवाणे गावात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण व कृषी पर्यटनाचा विकास झाला असून जंगल बुक, कोकणगाभा अॅग्रो टुरिझम सेंटर,मारिया स्विमिंग पूल ,कॅश्यू हिल्स आॅफ कोकण,होम स्टे अॅग्रो टुरिझम,  रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था आदी दर्जेदार सुविधा पुरवणारी कृषी पर्यटन केंद्रे उभी राहिल्याने लांज्यात थांबुन येथील ग्रामीण पर्यटनाचा आनंद घेणा-या पर्यटकांच्या संखेत वाढ होत असुन हे चित्र सुखावह आहे.

           


मुंबई- गोवा महामार्गावर  असलेल्या लांजा शहारातुन रत्नागिरी कडे जाताना बेन नदी महामार्गाला आडवी येते.तिच्या सुंदर वळणानंतर निसर्गरम्य टेकडीच्या पायथ्याशी कृषी पदविका विद्यालय लांजा ही शेतकीचे शिक्षण देणारी शेतीशाळा शासनाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सन १९६९  मध्ये स्थापन केली. या शेतीशाळेच्या मागे असलेल्या टेकडीवर श्री देव म्हादोबाचे  पवित्र स्थान आहे.कोकण विभागाच्या कृषी शिक्षण ,कृषी संशोधन आणि कृषी विस्तार विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १८ मे १९७२ साली दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली.आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेली लांजा येथील शेती शाळा दापोली कृषी विद्यापीठात समाविष्ट करण्यात आली. तीचे नामकरण कृषी तंत्र विद्यालय,लांजा असे करण्यात आले.आज दापोली विद्यापीठांतर्गत १६ कृषी संशोधन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत ,या केंद्रात लांजा येथील कृषी तंत्र  विद्यालयाचा समावेश आहे.लांजा येथील कृषी तंत्र विद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्रासाठी जिल्हापरिषदेकडुन ७२ हेक्टर जागा विद्यापीठाकडे  हस्तांतरित करण्यात आली आहे.या जागेपैकी २९ हेक्टर जागेमध्ये टेकडी पसरली असुन या टेकडीच्या १० हेक्टर भागात सामाजिक वनीकरण विभागाद्वारा अकेशिया ची लागवड करण्यात आली आहे.तर १० हेक्टर क्षेत्र जंगल आच्छादित असुन ९ हेक्टरवर आंबा ,जुना आवळा व इतर झाडांची लागवड करण्यात आली असुन याच टेकडीच्या माथ्यावर श्री म्हादोबाचे जागृत व स्वयंभू देवस्थान आहे.हि टेकडी कृषी विद्यापीठाच्या अख्यातारिता खाली गेल्याने टेकडीवरील म्हादोबा मंदिर तसे दुर्लक्षित राहिले.त्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही.वर्तुळाकार वसलेल्या लांजा शहराच्या आजुबाजुने काहि महत्वाच्या टेकड्या आहेत.यापैकी गोंडेसखल, पौलतेश्र्वराची टेकडी,कुंभारवाडीतील गणपती टेकडी आदिंसह  म्हादोबाची टेकडीही रमणीय आहे.लांजा नगरपंचायतीने  भविष्यात्मक विचार करून या टेकड्यांवरील देवस्थांनाचा विकास करित टेकड्यांचे पर्यटनात्मक सुशोभीकरण करित प्रत्येक टेकडीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला तर नक्कीच लांजा शहराच्या सौंदर्यात भर पडेल.तसेच महामार्गावरील सुंदर, स्वच्छ शहर म्हणून लांज्याचा नावलौकिकही वाढेल.


@@@@@@@@@@@

वि।ज।य।ह।ट।क।र
लां।जा.
८८०६६३५०१७




No comments:

Post a Comment