Sunday, March 7, 2021

 

कर्तव्यदक्ष अधिकारी -सौ.प्रणाली रेडिज.

🚩🚩🚩🚩🚩🚩     
    जागतिक महिला दिन विशेष लेख 


         महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेला दाखला मिळवण्यासाठी  कार्यालयात गेल्यावर दाखला वेळॆत मिळाला नाही... 
परिणामी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला...
सरकारी काम आणि दहा वर्ष थांब ही मानसिकता बदलण्यासाठी आपण सरकारी अधिकारी झाले पाहिजे असे मनोमन वाटू लागले... 
मग ठरलं,अभ्यास आणि मेहनीतच्या जोरावर सरकारी अधिकारी बनायचं.. 
सर्वसामान्य जनतेची कामे वेळेत पूर्ण करून त्यांना दिलासा द्यायचा.. 
ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार करून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सरकारी अधिकारी झालेल्या लांजा तलाठी सजा च्या तलाठी सौ.प्रणाली राहूल रेडिज या यशस्वितेची यशोगाथा..

       तलाठी हा महसूल विभागाचा कणा असून महसूल विभागातील सर्व महत्वाकांक्षी निर्णय तलाठी यांचे  अहवालानुसार घेतले जातात व शासन स्तरावरील बहुतांशी योजना तळागाळापर्यंत पोहोचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात तलाठ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. अनेक तलाठी आपापल्या कार्यक्षेत्रात तळमळीने ग्रामविकास साधत असतात अशाच कर्तव्यनिष्ठ तलाठ्यांमध्ये लांजा सज्जाच्या तलाठी सौ. प्रणाली रेडीज यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
        ऐतिहासिक वारसा असलेल्या राजापूर येथे जन्मलेल्या सर्व प्रणाली रेडिज यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण राजापूर येथे झाले.पुढे रत्नागिरीतील सुप्रसिद्ध गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. तर कोल्हापूर येथे शासकीय संस्थेतून  जी.डी.सीए .हा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला.सातत्यपूर्वक अभ्यासाने त्यांचा शैक्षणिक आलेख नेहमीच चढता राहिला.शिक्षण सुरू असताना रेडीज यांना समाजकल्याण विभागाच्या वतीने कर्मचारी म्हणून काम करण्याची संधी चालून आली.  सौ रेडीज यांनी ती स्वीकारत सन १९९६ ते १९९९ ही तीन वर्षे शासकीय कार्यालयात काम केले पुढे सन २०१० मध्ये झालेल्या तलाठी परीक्षेत हा अनुभव कामी आला.सौ रेडीज यांनी तलाठी परीक्षेत प्रावीण्य मिळविले आणि राजापूर तालुक्यातील दसुर या गावी त्या तलाठी म्हणुन रुजू झाल्या. मनमिळाऊ स्वभाव,कामाविषयी निष्ठा, अभ्यासूवृत्ती ,सहकार्यशीलपणा या गुणांच्या जोरावर अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठविला. त्यामुळे दसुर ग्रामस्थांनाही एक कर्तव्यदक्ष अधिकारी गावच्या विकासासाठी मिळाल्याचा आनंद झाला.दसुर येथील ४ वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतरही लोकाग्रहास्तव १ वर्ष त्यांनी दसुर येथे काम केले.शासकीय सेवेच्या सुरवातीच्या ५ वर्षातच आपल्या रचनात्मक कामाने  ग्रामस्थांची मने जिंकणाऱ्या सौ.प्रणाली रेडिज यांच्या कार्याची दखल घेत राजापुरचे उपविभागीय अधिकारी श्री.सुशील खांडेकर यांनी  सौ.रेडिज यांना " उत्कृष्ट तलाठी " म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले.
      सौ.रेडिज यांनी गत ११ वर्षे तलाठी म्हणून राजापुर तालुक्यातील दसुर, कोंडेतर्फे सौंदळ या ठिकाणी तर लांजा तालुक्यातील मठ या गावी तलाठी म्हणून काम पाहिले असुन सध्या त्या लांजा येथे कार्यरत आहेत.ध्येयाशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती, कल्पकता व उपक्रमशीलतेच्या जोरावर तलाठी म्हणून काम करताना विविध गावातील लोकांशी त्यांनी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत.           
          सर्वसामान्यांची कामे वेळेत करणे, सरकारी योजनांची चोख अंमलबजावणी करणे,वसुली आणि इतर महसुली कामे वेळेत पूर्ण करणे हि खरं तर तलाठ्याची महत्वाची कामे. या कामांना न्याय देतानाच गत ११ वर्षाच्या कार्यकाळात सरकारी नोकरी करताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून ग्रामोद्धाराचे कार्य करणाऱ्या सौ.प्रणाली रेडिज यांना  उपविभागीय अधिकारी श्री खाडे ,श्री अभय करंगुटकर, व लांज्याच्या तहसीलदार सौ.वनिता पाटील मॅडम ,राजापुर तहसीलदार वराळी मॅडम यांनीही उत्कृष्ट तलाठी म्हणून सन्मानित केले आहे.
          माणूस हा कोणत्या क्षेत्रात, कोणत्या पदावर काम करतो हे महत्वाचे नसून त्याच्यातला चांगुलपणा व कामाचा दर्जा त्याची उंची ठरवित असतो.सौ.प्रणाली रेडिज यांनी देखील आपल्या कार्याने आपल्या पदाची उंची वाढविली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना सरकारी दाखला वेळेत न मिळाल्याने रेडिज यांची गैरसोय झाली होती.याच वेळी अधिकारी बनून सामान्य जनतेची कामे वेळेत करण्याचा त्यांनी संकल्प केला होता.आज एखाद्या गोरगरीब गरजवंताचे काम वेळेत पूर्ण झाले की त्यांच्या चेहऱ्यावर  संकल्पपूर्तीचे समाधान झळकत असते. त्यांच्या दप्तरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या कामाची त्या आस्थेने माहिती करुन घेतात व लवकरात लवकर त्याची कार्यवाही करतात. सौ.प्रणाली रेडिज यांच्या दप्तरात गेल्यावर आपल्याला आपल्या कामासाठी विनाकारण जास्तवेळ थांबावे लागत नाही , हा विश्वास आज लोकांमध्ये आहे आणि हिच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.एकूणच कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणा ही जीवनप्रणाली मानत अनुकरणीय कार्यातून समाजमनावर मुद्रा उमठविणा-या लांजाच्या तलाठी सौ.प्रणाली राहुल रेडिज यांना जागतिक महिला दिनानिमित्त सलाम..

    वि।ज।य।ह।ट।क।र
      ८८०६६३५०१७



No comments:

Post a Comment