Thursday, April 15, 2021

मनमोहक शुभंकर

 मनमोहक शुभंकर...

(छायाचित्र - गुगल साभार)

     लांजा शहरात स्वरुपानंद वसाहत मधील श्री पवार सरांच्या इमारतीत (चाळीमध्ये) राहताना सकाळी व सायंकाळी नेहमीच शुभंकराचे दर्शन व्हायचं. अहो हिंदू संस्कृतीत भारद्वाज पक्षाचे दर्शन शुभ मानलं जाते.त्यामुळे त्याला शुभंकर हे नाव पडलं. भारद्वाजच्या दर्शनाने मी नेहमीच सुखवायचो.तसं पक्षीजगता विषयी कोकणात राहून सुद्धा मी अल्पज्ञानीच! पण भारद्वजाच्या रोजच्या दर्शनाने पक्षांच्या सुंदर विश्वाची माहिती करून घेण्याविषयी मनी ओढ निर्माण झाली. सोबत फेसबुक,व्हाॅट्सअप सारख्या सोशल मीडियावरील पक्षी-प्राणी समूहात मी दाखल झाल्याने पक्षांविषयी ची नवीन माहिती मिळत होती. यातच माझ्या दुबईच्या पीटर नामक मित्राने मला निकाॅनचा अत्याधुनिक डि.एस.एल.आर कॅमेरा भेट म्हणून दिल्याने माझ्या छंदाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली.

      पवार सरांच्या घरासमोर असलेल्या रस्त्यापलीकडे पाणथळ जागेत दाट झुडपांचा, वेलींचा परिसर बहरलेला होता. या झुडपांवर कूप-कूप-कूप  किंवा कुरूक- कुरूक- कुरूक असा घुमावदार आवाज करणारा भारद्वाज नेहमी विसावायचा.नेहमी एकट्याने येणारा हा कधी कधी जोडप्यानेही यायचा.या झुडुपांवर बसून आपल्याच विश्र्वात तल्लीन होऊन ते आपापसात असे बोलत की जणू शंखध्वनी फुंकला जातोय.त्यांच्या आवाजाने मग आमची तंद्री भंग व्हायची. सकाळी सकाळी आपलं छोट्या मोठ्या किटकांचं भक्ष्य त्यांना मिळालं की मग आनंदात ते आपल्या आहाराचा आस्वाद घेत बसायचे. चमकदार काळा रंग, तांबूस पिंगट रंगाचे पंख ,लांब निमूळती शेपूट , लालभडक डोळे ,काळी व किंचित बाकदार चोच यामुळे भारद्वाज अधिक सुंदर दिसतो. प्रथमदर्शनी भारद्वाज आपल्याला कावळ्या सारखाच दिसतो, पण नंतर त्याच्या अंगावरील तपकिरी रंगाची झाक आपल्याला तो भारद्वाज आहे याची जाणीव करून देते. 

      कोवळ्या उन्हात त्याचे झळाळते सोनेरी पंख पाहणे, आकाशात घुमणारी शीळ ऐकणे ही खूप आनंददायी अनुभूती असते. भारद्वाज याचे गोड गाणे आणि भवतालचा सारा निसर्ग अंत:करणात वेगळे तरंग उठवितो,आपले अस्तित्वही या सा-या आनंदसोहळ्यात विरघळू लागते. एकरूपतेची प्रचीती येऊ लागते. मी नोकरी करतो त्या न्यू इंग्लिश स्कूल,लांजा या शाळेच्या उत्तरेकडील कंपाउंड जवळ खैराची झाडे आहेत.या झाडांवरही असून -मधून त्याची हजेरी असते,आॅफतासाला मग भारद्वाजाला  न्याहाळत राहणं,त्याचं निरीक्षण करणं, हाच माझा उद्योग बनायचा.मात्र माझी चाहूल लागली की तो उडून जवळील दुस-या झाडावर बसायचा.मग चार पाच मिनिटाचा वेळ शुभंकराच्या सानिध्यात घालविल्याने आजचा दिवस आनंदात जाणार या विचाराने मी स्टाफरूमकडे वळायचो. 

     कोकणात मोठ्या संख्येने दिसणाऱ्या भारद्वाज यांचा वावर भारताबरोबर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार ,चीन, इंडोनेशिया पर्यंत सर्वत्र आढळतो. पानगळीची वने, गर्द झुडपे, शेतशिवार व बागांमध्ये भारद्वाज यांचे वास्तव्य असते. बोलीभाषेत भारद्वाज लालकावळा, सुलक्षणी, कुंभारकुकडी, कुक्कुडकुंभा, कुंभारकावळा इत्यादी नावाने ओळखला जातो.पक्षीवर्गाच्या क्यूक्यूलिफार्मिस गणाच्या क्युक्युलिडि कुलात भारद्वाजाचा समावेश होतो.कोकिळा, पावशा, चातकासारख्या पक्षांचाही समावेश याच कुळात होतो.याचे शास्त्रीय नाव सेंट्रोपस सायनेन्सिस ( Centropus Sinenisis) असून इंग्रजीत ग्रेटर कौकल ( Greater Coucal)असे आहे. 

       भारद्वाज हा एकेकटा किंवा जोडीने वावरतो. लहान मोठे कीटक व त्याच्या अळ्या, पाली ,सुरवंट ,सरडे, उंदराची पिले हे त्याचे मुख्य भक्ष्य आहे .याखेरीज तो पक्ष्यांची अंडी व पिले, फळे,बिया इ. खातो .तो ब-याचदा सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात उन्हामध्ये पंख वाळवत बसलेला दिसतो. सकाळी  व संध्याकाळी तो सक्रिय असतो. हा पक्षी ओळखायला अगदी सोपा आहे .झाडांमध्ये कूप-कूप-कूप असा आवाज आला की भारद्वाज आहे हे लगेच समजते. आणि गंमत म्हणजे एका पक्षाने आवाज काढायला सुरुवात केली की दुसरा पक्षीही त्याला आवाज काढून प्रतिसाद देतो आणि एकदा सुरुवात केली की मग १५-२० वेळा तरी ते आवाज काढतच राहतात

           आपल्या कामात शांतपणे रमणाऱ्या भारद्वाजाचा सप्टेंबर महिना हा विणीचा हंगाम असतो. उडण्याच्या संदर्भात हा पक्षी दुबळा असल्याने जमिनीपासून साधारण ०६ मीटर उंचीवर ते घरटे बांधतात. घरट्यात एकाच वेळी तीन ते पाच अंडी घालतात व स्वत: पिल्लांची काळजी घेतात .अंडी व पिल्लांच्या संगोपनाची जबाबदारी दोघे (नर -मादी ) पालक पार पाडतात हे विशेष! भारद्वाज स्वतःची म्हणूनच आब राखून असतो. बहुदा यामुळेच त्याला एक वेगळाच डौल असतो. निसर्गरम्य कोकणातील सुंदरवाडी, खेमसावंत-भोसले घराण्याची राजधानी व लाकडी खेळण्यांची बाजारपेठ म्हणून लोकप्रिय असलेल्या सावंतवाडीचा शहर पक्षी म्हणून 'भारद्वाज' निवडून आला .घनदाट झाडींनी समृद्ध नरेंद्र डोंगर व मध्यवर्ती असलेला मोती तलाव या वैशिष्ट्यांमुळे सावंतवाडी शहरात भारद्वाज मोठ्या संख्येने वास्तव्याला असावा,मलबारी कर्णा या पक्षाला हरवत त्याने या सुंदर शहराच्या शहरपक्षाचा मान मिळवला आहे.

           भारतात श्रद्धास्थानी  मानल्या गेलेल्या भारद्वाजाला 'भगवंताचे दूत' समजले जाते. त्याचे दर्शन नेहमीच शुभवार्ता घेऊन येते असाच समज  येथील लोकमानसात प्रचलित आहे. लहानपणी आम्हाला भारद्वाज ऋषींवरून या  पक्षाला भारद्वाज हे नाव पडले असे सांगितले जायचे,मात्र असा संदर्भ कुठे आढळत नाही.या पक्ष्याचे दिसणे, वागणे, चालणे सर्वच भारदस्त असल्याने या पक्ष्याला भारद्वाज हे नाव दिले गेले असावे. पक्षाचा पंख देवक म्हणून रेडे -पाटील आडनाव असलेले तसेच पूर्वापार चालत असलेल्या प्रथेप्रमाणे ज्यांचे दैवक भारद्वाजाचा पंख आहे तो मराठा समाज लग्न समारंभाला या पक्षाचा पंख पुजतात. टिटवी, होला, तितर, दयाळ, साळुंकि सारख्या छोट्या पक्षांचे घरटे उद्ध्वस्त करून त्यांच्या अंडी पिल्लांना पळवणार्‍या या शिकारी पक्षाला जनमानसात शुभंकर का समजले जाते याचा उलगडा मात्र अजुनही मला झालेला नाही.

        एके काळी सर्वत्र सहज दिसणा-या, धीरगंभीर आवाजाच्या ,आपल्या फक्त दर्शनाने आपल्या दिवसाची सुरवात मंगलमय करणा-या भारद्वाजाची विपुलता मानवी अतिक्रमणाने शहरातुन लक्षणीय घटत चालली आहे.सिमेंटची जंगले उभारताना भारद्वाज सारख्या पक्ष्याची असलेली आश्रयस्थाने( झाडे झुडपे ) तोडली जात आहेत.कोकणात मात्र अजूनही तो विपुलतेने पहावयास मिळतो हे आमचे भाग्यच! येणाऱ्या काळातही हे पक्षीवैभव जपण्यासाठी समृद्ध कोकण जपायला हवे!          

 🌳🌴🐦🐧🦆🌴🌳

  विजय हटकर,

     लांजा             

8806635017


10 comments:

  1. छान मांडलय...आपण भारद्वाज पक्ष्याचे यथार्थ वर्णन केले आहात....

    ReplyDelete
  2. भारद्वाज पक्षाबद्दल समग्र माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।कोकणी माणसाला कोखणचे पक्षीवैभव जपण्यासाठी केलेले आवाहनही भावले.

    ReplyDelete
  3. भारद्वाज पक्षाबद्दल समग्र माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।कोकणी माणसाला कोखणचे पक्षीवैभव जपण्यासाठी केलेले आवाहनही भावले.

    ReplyDelete
  4. खूप छान माहिती , भारद्वाज

    ReplyDelete
  5. भारद्वाज पक्ष्यांची खुपच छान माहिती दिली आहे

    ReplyDelete
  6. खूप छान माहिती आहे सर.मला सुद्धा भारद्वाज पक्षी नेहमीच आकर्षित करत आला आहे.त्याचे दिसणे आपल्यासाठी शुभ असते यामुळे तो नेहमीच लळा लावून जातो.

    ReplyDelete
  7. खूप छान माहिती. ठाकुर्ली ला गेली साडेतीन वर्षे जिथे मी राहत होतो त्या विवेक ज्योत सोसायटीच्या समोरील जंगलामध्ये बऱ्याच वेळा भारद्वाज पक्षाचे दर्शन मला होत असे.....
    सदानंद खामकर, ठाकुर्ली

    ReplyDelete
  8. खुपच सुंदर 😍💓

    ReplyDelete
  9. क्या बात है सर
    बहुत बढिया...
    पक्षी निरीक्षण छंद जोपासा
    इतर पक्षांनाही सामील करा...
    हार्दिक शुभेच्छा...
    👍👍💐💐💐💐💐

    ReplyDelete
  10. खूपच छान माहिती... माझा ही आवडता पक्षी आहे, भारद्वाज

    ReplyDelete