Saturday, May 1, 2021

पाच तपांचे सुभाषपर्व ..

 श्री सुभाष लाड षष्ट्यब्दीपूर्ती अभीष्टचिंतन सोहळा

🎊🎊🎊🎊🎊🎊

 वाढदिवस विशेष लेख -   पाच तपांचे सुभाषपर्व ..

🦚🦚🦚🦚🦚🦚

   



" सदा लोकहिता सत्त्क रत्नदीपा स्नोत्तमा" 

     - अर्थात जे सदैव लोकहित करण्यात मग्न असतात ते रत्नदीपा प्रमाणेच प्रज्वलित असतात.या उक्तीप्रमाणेच आयुष्यातला प्रत्येक क्षण लोकहितासाठी विनियोगात आणून रत्नदीपा प्रमाणे प्रज्वलित असणारे राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबईचे संस्थाध्यक्ष श्री सुभाष लाड यांनी कोरोना वैश्र्विक संकटात केलेले कार्य कौतुकास्पद व अनुकरणीय असेच आहे. कोरोनाच्या पडत्या  काळात ख-या अर्थाने जीवनात माणुसकीला सर्वोच्च स्थान देणाऱ्या लाड सरांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा अनेकांना झाला.या वैश्र्विक संकटात अनेकांसाठी आधारवड ठरलेल्या सुभाष महादेव लाड यांचा ०२ मे हा जन्मदिवस.  कोरोना काळातील त्यांच्या सत्कार्याचा यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.. 

       या सृष्टीतील सर्वाधिक सक्रिय आणि प्रभावी जीव म्हणजे सूक्ष्मजीव.गत वर्षी अशाच covid-19 नामक सूक्ष्म विषाणूने जगभर धुमाकूळ घातला आणि जागतिक आपत्ती उद्भवली. कोरणा विरुद्ध संपूर्ण देशासह महाराष्ट्र गेल्या सव्वा वर्षांपासून अधिक काळ लढा देत आहे. या महामारिच्या काळात अनकांचे आप्तस्वकीय सोडून गेले.तर कोरोना विरुद्ध लढणाऱ्या अनेक कोरोनायोद्ध्यांनाही आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले आहे. देशाची अर्थव्यवस्था जशी कोलमडली त्याचप्रमाणे अनेकांचे व्यवसाय -धंदे ही बंद पडले. कित्येकांच्या नोक-या  गेल्याने कुटुंब सांभाळायचे कसे या चक्रव्यूहात सापडलेल्यांची संख्या वाढू लागली. अशा काळात हतबल झालेल्या तरुणांच्या आत्महत्येच्या बातम्या सुभाष लाड यांना अस्वस्थ करु लागल्या. समाजभान जागृत असलेल्या लाड सरांच्या मनात असंख्य विचारांचे मोहोळ उठले.आणि त्यांनी आपल्या परीने ' खार ' होऊन अशक्यप्राय सेतू बांधण्यासाठी  प्रयत्न करण्याचे ठरविले.

१) राज्य आपत्कालीन निधी  - 

                     सामाजिक दायित्व असलेली माणसे विखुरलेल्या स्वरुपात का असेना समाजात आहेत यावर विश्वास असलेल्या सुभाष लाड यांनी कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या बांधवांना मदत करण्यासाठी संघाच्या माध्यमातून  "राज्यव्यापी आपत्कालीन निधी " उभारण्याचे ठरविले.याकरिता संपर्कात असलेल्या व सामाजिक संवेदना जागृत असलेल्या लोकांचा व्हाॅटसप ग्रुप बनवित सोशल मिडियाचा उपयोग कसा करावा याचा आदर्श परिपाठ देत लाखाच्या वर आर्थिक निधी संकलित केला. समाजाने दिलेले दान कृतज्ञतेच्या भावनेतून समाजालाच परत करावे या उदात्त भावनेतून आपण जमा केलेल्या आपद्कालीन निधीतून संकटात सापडलेल्या मातृमंदिर देवरुखच्या 'गोकुळ अनाथालयाला " समयोचित आर्थिक सहाय्य त्यांनी केले.

२) कोरोना संकटकाळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारी पातळी वरुन आवाहन करण्यात आले होते.याला प्रतिसाद देत सुभाष लाड यांनी संघातील सहकारी अनिल कारेकर ,गणेश चव्हाण विलास मुरुडकर यांच्यासह  मंत्रालयात जाऊन लेखाधिकारी शिरिष पालव यांच्याकडे मंत्रालयमुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रुपये ११,०००/- वर्ग केले.

३) कोरोना योद्ध्यांचा सन्मान :-

            कोरोना  काळात अनेकांनी कोरोना संसर्गाची टांगती तलवार आसपास असतानाही योग्य ती काळजी घेऊन कुणी आपल्या सेवेत प्रामाणिक राहून काम केले तर कोणी सामाजिक बांधिलकी म्हणून मदतकार्य केले. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी ,परिचारिका वर्ग,वाॅर्डबाॅईज , पोलीस दलातील अधिकारी ते हवालदार , सनदि अधिकारी ,गावागावातील कोव्हिड कृती दलातील सरपंच ,ग्रामसेवक ,तलाठी त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते हे  त्यांच्या परीने मदत कार्य व कोरोना रोखण्यासाठी जीवाची पर्वा न करता थेट रणांगणात लढताहेत याची जाणीव ठेवुन या कोव्हिड योद्ध्यांना नमन करण्यासाठी सुभाष लाड सर यांनी आपल्या सहका-यांच्या साथीने मुंबई तसेच लांजा -राजापुरातील विविध सामाजिक संस्था व व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून गौरव केला.

४) मास्कवाटप :- कोरोना विषाणूपासुन नागरिकांचा बचाव व्हावा याकरिता लाड सरांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात लांजा राजापूर या दोन तालुक्यात ३७०० मास्कचे वाटप करण्यात आले.

५) सॅनिटायझर्स स्टॅण्डचे वितरण :-

                 बाजारात सॅनिटायझर स्टॅण्डच्या किमती जास्त असल्याने लाड सर यांनी आपल्याला सुचलेल्या कल्पनेचे गणेश पांचाळ यांच्याशी  आदान प्रदान करित अल्प किमतीत उत्कृष्ट सॅनिटायझर स्टॅण्ड बनविले व त्याचे मोफत वितरण सरकारी रुग्णालये,ग्रामपंचायत कार्यालये,  माध्यमिक प्राथमिक शाळांमध्ये केले.

६) आशा सेविकांना रेनकोट वाटप :- 

              कोविड १९ महामारिच्या काळात मोठ्या संख्येने मुंबई -पुण्याहून सुरक्षेच्या कारणास्तव  चाकरमानी कोकणात गावी परतले.अशा काळात राजापूर लांजा या सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या दोन्ही तालुक्यातील आशासेविकांनी या काळात उत्कृष्ट कामकाज केले.कोकणात वाड्या, घरे हि एकमेकांपासून दूरवरच्या अंतरावर असतात.अशा वेळी मुसळधार कोसळणाऱ्या पावसात काम करणे आशासेविकांसाठी जिकरीचे असते.तरीही राष्ट्रकार्य समजून अल्प मानधनातही आशासेविका कोविड१९ रोखण्यासाठी तळमळीने काम करित आहेत .याची दखल घेऊन संघाच्या वतीने अध्यक्ष सुभाष लाड यांच्या संकल्पनेतून लांजा व राजापूर तालुक्यातील ३० आशासेविकांना कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले व रेनकोटचे वाटप करण्यात आले.

७) मासिक निवृत्तीवेतनचे गरजवंताना वाटप :-

               प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या  लाड सरांनी कोरोना काळात व्यवसाय - धंदे बंद पडल्याने, नोक-या गेल्याने हतबल झालेल्या आपल्या अनेक सहका-यांना मदतीचा हात दिला. त्यांना मिळणाऱ्या मासिक निवृत्तीवेतनाचा विनियोग करित अनेक सहका-यांना तब्बल सहा-सात महिने आर्थिक सहकार्य करित त्यांचा संसार चालविण्याचे काम केले.परंतु त्याची जाहिरात केली नाही. दुस-याचं दु:ख जो समजतो  तोच समाजसेवक होऊ शकतो असे म्हणतात, आपल्या सहका-यांसाठी पेन्शन म्हणून येणा-या सर्वच्या सर्व  ३० ते ३५ हजार रूपयांचा विनियोग करित खिसा रिकामा करणारा  लाड सरांसारखा संवेदनक्षम माणूस खिशात असतानाही खिशात हात न घालणा-या गर्दीत अधिक ह्रदयाला भिडतो.

८) जीवन संवर्धन फाऊंडेशन - गुरुकुल म्हसकळ, टिटवाळा साठी निधी संकलन:- 

               सामाजिक समस्यांनी व्यथित अशा बेघर मुलांसाठी जीवन संवर्धन फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने टिटवाळा पासून जवळच असलेल्या म्हसकळ गावात गुरुकुल उभारले आहे.येथील मुलांच्या भोजनाची गैरसोयीचे  वृत्त लाड सरांना समजताच त्यांनी सोहम संगीत विद्यालयाचे सुनिल बुवा जाधव यांच्या मदतीने कोरोना काळात या गुरूकुलात जाऊन फेसबुक लाइव्ह संगीत मैफिलीचे आयोजन केले व या गुरुकुल साठी अर्थ सहाय्य करण्याचे आवाहन केले.याला प्रतिसाद देत लाड सरांना प्रेरणास्थानी मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी भरभरुन मदत केल्याने या गुरुकुल ला कोरोनाच्या  पडत्या काळात लाड सरांच्या माध्यमातून भक्कम आधार मिळाला.सरांनी आपली नात कु.ब्रम्हस्मिचा वाढदिवस हि तिथे साजरा करित या बेघर मुलांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण केले.सरांच्या माध्यमातून या गुरुकुल मध्ये मदतीचा ओघ आता वाहतो आहे .यामुळेच  ख-या अर्थाने समाजातील विषमतेच्या तळाशी काम करणा-या  लाड सरांविषयी अनेकांच्या मनात  ममत्व आणि आदर दृढ होतो आहे.

९) कोरोना रुग्णांचे मनोबल वाढविण्याचे कामही  लाड सर करित आहेत.त्यांच्या संपर्कातील एखादि व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे कळताच त्याला संपर्क साधून त्याच्या मनातील कोरोनाविषयक भिती घालवून त्याचे मनोबल वाढविण्याचे काम लाड सर गेले काहि महिने तळमळीने करत आहेत.कारण कोरोनाच्या भिती ,दडपण,दहशतीने अनेक जण धारातीर्थ पडले असल्याने कोरोना रुग्णांचे मानसिक बळ वाढविणे गरजेचे असल्याचे ते मानतात.

१०)  कोरोना काळात स्वत:च्या जीवाची बाजी लावत कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डाॅक्टर्स,नर्सेस साठी अनेक  पी.पी.ई.किट,फेस शिल्ड चे  मोफत वाटप लाड सरांनी केले आहे.

           या संकटकाळात दिव्यांग विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य पुरविणे, मराठी भाषेतील अनेक वर्षाची परंपरा असलेले दिवाळी अंक यंदा  बंद पडत असताना मोडीदर्पण दिवाळी अंकाचे प्रकाशन करुन मराठी साहित्यरसिकांना दर्जेदार दिवाळी अंक उपलब्ध करून देणे,अनेकांच्या जन्मदिवशी  त्यांच्याविषयी लेख लिहून त्यांचे चरित्र समाजासमोर मांडत आगामी काळातही असेच सकारात्मक काम करण्यासाठी त्यांना  प्रेरणा देणे आदि अनेक छोट्या -मोठ्या गोष्टी निरपेक्षपणे केल्या आहेत.आणि म्हणुनच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यातला माणुसकीचा निर्मळ झरा इतरांनाही कळावा यासाठीच त्या आपल्यासमोर मांडल्या आहेत.  

          येशु ख्रिस्ताने ल्यूक ऑफ बायबल मध्ये सांगितलेली एक कथा आज मला आठवते आहे. एका प्रवाशाला लुटून, मारून अर्धमेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिलेलं असतं. तो प्रवासी ज्यू असतो. एक ज्यू  पाद्री  तिथे येतो,तो त्याला पाहतो.  पण त्याला मदत न करता पुढे निघून जातो. मग सॅमॅरिटन येतो.सॅमॅरिटन आणि ज्यू मंडळी या दोघांमध्ये विस्तव जात नसतो.पण तो शत्रुत्व विसरतो आणि त्या ज्यू ला मदत करतो. तो त्याला खायला अन्न देतो,त्याला कपडे देतो, त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढतो.. तिथून परोपकारी माणसाला ' गुड सॅमॅरिटन' असं म्हटलं जाऊ लागलं. असे  परोपकारी ' गुड सॅमॅरिटन आयुष्यात मला मूठभर का होईना ,पण भेटले.यात सुभाष लाड सरांचा क्रमांक खुप वरचा  आहे.कारण लोकांचं दु:खं,वेदना, संवेदना या जाणण्याचे काम धर्म ,जात, पंथ, विचारधारा यापलीकडे जाऊन त्यांनी केले आहे.फक्त जाणलेच नाही तर आपल्या परीने त्या कमी करण्यासाठी त्याला कृतीची जोड दिली आहे.

          ज्ञानदानासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असताना समाजसेवेच्या आंतरिक ओढिने राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई, माझी मायभूमी प्रतिष्ठान मुंबई, राणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्ट, नाटककार ला.कृ.आयरे ट्रस्ट ,मोडी लिपी मित्रमंडळ अशा अनेक क्रियाशील संस्था स्थापन करुन गत ४० वर्षे शिक्षण- कला-साहित्य -संस्कृती -सामाजिक क्षेत्रात निस्वार्थी, निस्पृह कार्य केले आहे.या दिर्घ वाटचालीत त्यांना अनेकांची साथ मिळाली आहे.त्यांच्या विधायक कामाच्या या प्रवाहात अनेक माणसे सामील झाल्याने ती चळवळ बनली आहे.  या पाच तपातील सुरुवातीची दोन तपे संघर्षात घालविल्यानंतर वात्सल्यमूर्ती आईने दिलेल्या संस्कार रुपी शिदोरीच्या जोरावर आत्मभान, समाजभान ,राष्ट्रभान जपत सुभाष लाड यांनी विधायक कामाचा डोंगर उभा केला आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवकाळात राज्य लिपी म्हणून मिरवणाऱ्या मोडी लिपीचे संवर्धन व प्रचार, कोकणातील गावागावात सात वर्षे अविरतपणे माय मराठीच्या अभिवृद्धीसाठी आयोजिलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचा जागर, ग्रंथ चळवळ, पुस्तक प्रदर्शने, वसुंधरेच्या रक्षणासाठी घेतलेला पुढाकार, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,शेतकरी मेळावे आदि कार्यक्रमांचा उल्लेख करावाच लागेल. मानव जातीवर उदात्त श्रद्धा असलेल्या व्रतस्थ लाड सरांचं निराळंपण त्यांच्या अशा निस्वार्थी, निस्पृह कार्यातून अधिक ठळक होऊन नव्या पिढीसमोर प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहे.पाच तपांचे हे यशस्वी सुभाषपर्व पुढच्या काळात अधिक जोमाने बहरेल,आणि सेवाधर्माचा प्रसार करेल याचा विश्वास मला आहे.  आज लाड सर आपल्या वयाची षष्ट्यब्दीपुर्ती करित आहेत.आगामी काळातही त्यांची किर्तीपताका अशीच फडफडत राहो आणि यानंतरचे त्यांचे आयुष्य प्रदीर्घ, निरामयी, आनंददायी होवो हीच शुभकामना.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 श्री विजय हटकर

 लांजा

 ८८०६६३५०१७

साप्ताहिक कोकण मिडियातील लेख पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://kokanmedia.in/2021/05/02/subhashladsixtyplus/




11 comments:

  1. अतिशय सुंदर लेख. विजय काकांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. सरांबद्दल खूप छान माहिती

    ReplyDelete
  3. लाड सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    'विजयधन' मी नेहमीच वाचतो. आजचा विषय सामाजिक कार्यकर्ते श्री. सुभाष लाड सर यांच्या बद्दल आहे. लाड सरांसोबत नेहमी रहावे त्यांना ऐकतच रहावे असे वाटते. सरांना दिलेल्या शुभेच्छा 'विजयधन' चे धन्यवाद! असेच सर्वोत्तम कार्य 'विजयधन' कडून व्हावे हिच सदिच्छा.

    ReplyDelete
  4. सन्माननीय लाड सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक अनेक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹.
    सरांच्या करायला सलाम 🙏.

    ReplyDelete
  5. अगदी छान लिहिलंय सर.... खऱ्या अर्थानं या कलयुगातील माणसात देव असणारा देवमाणूस म्हणजे आपले आदरणीय सुभाष सर... !!! खरं तर माझा त्यांच्याशी गेली 5 वर्ष सहवास आहे , पण प्रत्येक वेळेस खूप काही नवनवीन गोष्टी शिकलो त्यांच्याकडून आणि इथून पुढेही शिकेनच...! असाच प्रेमळ सहवास लाभत रहावा हीच इच्छा व्यक्त करत आदरणीय सुभाष सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!!

    ReplyDelete
  6. सर अतिशय सुंदर लेख

    ReplyDelete
  7. सामाजिक गुरू श्री सुभाष लाड सर यांच्या कोरोना काळातील कामाची केलेली गाथा आणि त्यांचे शब्दांकन खूप सुंदर आहे.

    ReplyDelete
  8. खुप खुप खूपच छान सर..

    आदर्श व्यक्तिमत्त्व बद्दल आदर्श लेख

    ReplyDelete
  9. अतिशय प्रेरक लेख. अंतर्मुख होऊन शक्य ते करायला उद्युक्त करणारा.

    ReplyDelete
  10. खूप छान लेख ,अभिनंदन व शुभेच्छा

    ReplyDelete
  11. खूप सुंदर लेख. ग्रेट कार्य.

    ReplyDelete