Saturday, May 29, 2021

वात्सल्यमूर्ती आई

 वात्सल्यमूर्ती आई

सौ.अरूणा अरविंद हटकर.


भाग १ - 
           माझ्या आजी- आजोबांना 'वसंत' या मुलानंतर झालेली पहिली मुलगी सुधा म्हणजे माझी वात्सल्यमूर्ती आई होय.पुढे चार वर्षाच्या अंतराने लता व पुढे शोभा या दोन बहिणी झाल्या. आजी आजोबांंचा संसार असा सुंदर चालला असताना दृष्ट लागली. व १४ दिवसाच्या चिमुकल्या शोभा ला घेऊन आजीला घर सोडून निघून जावेे लागले.पुढे तिने दुसरा संसार थाटला.पण आजोबा घाबरले डगमगले नाहीत.बायकोच्या अभावी उघड्यावर पडलेल्या संसार त्यांनी एकट्याच्या खांद्यावर घेतला.व तेच मुलांसाठी आई बनले.आजोबांचे सांवंतवाडिच्या भाजीमार्केट मध्ये कटलरीचे दुकान.मग लहानग्यांच्या जेवणाचा प्रश्न जटिल.त्यात थकलेली आई पार वृद्धत्वाकडे झुकलेली.एका डोळ्याने तिला दिसायचं कमी झालेलं .अशा अवस्थेत दोन वेळची खानावळ त्यांनी मुलांसाठी सुरु केली.लहान मुलांचे आवरुन मग ते दुकानात जात.

       आजोबा व आजीचे प्रकरण कोर्टात गेले.व लता सहावर्षाची असताना त्यांचा घटस्फोट झाला. पण तो झाल्यानंतरहि लता थोडि सुजाण होईपर्यंत आजीकडेच राहिली. पण आई व वसंत मामा आजोबांकडेच होते.आईचे आजोळ गोव्याला बिचोली या छोट्या शहरवजा गावात.आजीने दुसरा संसार केल्याचे तिच्या डिचोलीतील भावांना आवडले नव्हते.म्हणून त्यांनी तिच्याशी बोलणे काही काळ बंद केले.पण आपल्या भाओजींबरोबर ते आपुलकीने वागले.त्यांच्यातील ममत्व कायम राहिले.आपल्या बहिणीच्या या चुकीच्या निर्णयामुळे आपल्या भाओजींवर संकट कोसळले आहे हे ओळखून आईच्या मामाने आई व वसंतला आपल्याकडे गोव्याला शिक्षणाला नेले.पण गोव्यात मामाला तीन मुलगे. तेथील कुटंबकबिला मोठा.त्यामुळे खाण्या पिण्याची आबाळ .त्यात या दोन भावंडांची भर.मामीचा स्वभाव मात्र थोडा कडक होता.पुढे आईची ( सुधा )  शाळा कायमची सुटली.व ती मामीला घरकामात मदत करू लागली.तर वसंत आपल्या मामेभावांसोबत शाळेत जाऊ लागला.पण मामीचा कडक स्वभाव व तिथले वातावरण वसंतला आवडायचे नाही. 

त्यातच गोव्यात पोर्तुगीजांनी उच्छवास मांडलेला.१५ आॅगस्ट १९४७ साली ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतुन भारत स्वतंत्र झाला परंतु अजुनही गोवा भारताचा भाग झाला नव्हता.गोवा, दीव -दमण हे विभाग पोर्तुगीजांच्या अंमलाखाली राहिले होते.यासाठी गोवा मुक्ती अभियानाच्या माध्यमातून स्थानिक कोकणी गोवेकरांसोबत महाराष्ट्रातील मराठी बांधवही पोर्तुगीजांच्या विरोधात उभा ठाकलेला.गोवामुक्तीसाठि गोवेकरांचे आंदोलन चाललेले. गोवामुक्तिसाठी गोवेकरांचे आंदोलन ऎन भरात आलेले..अशा परिस्थितीत चवताळलेल्या पोर्तुगिजांनी दडपशाहीचा मार्ग स्विकारला होता.आंदोलन दडपून टाकण्यासाठी पोर्तुगीज स्थानिक गोवेकरांवर बेछूट गोळीबार करायचे.म्हापसा, फोंडा ,बिचोलीम्,मडगांव, पणजी सगळीकडे सारखीच परिस्थिती होती.गोवा मुक्ती संग्रामात पुरुषांसह शेकडो स्त्रियाही सहभागी झाल्या होत्या.सत्याग्रहाच्या देखरेखीपासून प्रत्यक्ष सत्याग्रही तुकडीत सामील होऊन निर्भयपणे गोळ्या झेलण्यापर्यंत स्त्रियांचा सर्वंकष सहभाग होता.या सत्याग्रहिंना अमानुष मारहाण झाली,गोळीबार झाला. यात मंदा याळगी , कमला उपासनी , प्रभा साठे,  शांता राव यांसह असंख्य महिला धारातीर्थी पडल्या. आईच्या आजोळातील बिचोलीम मध्येही आंदोलन पेटले होते.यावेळी आई जवळपास ९ ते १० वर्षाची होती.पोर्तुगीज बिचोलीम् मध्ये वस्ती-वस्तीवर गोळीबार करायचे तेव्हा आईची मामी आपल्या मुलांसह वसंत व सुधाला घरातील शेणाने सारवलेल्या जमिनीवर लोटांगण घातल्यासारखे झोपवायची.कारण या लहानग्यांचे जुलमी पोर्तुगीजांच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीपासून रक्षण व्हावे.खरं तर ४५० वर्षापूर्वी पोर्तुगालचा 'अल्फान्सो आल्बूकर्क ' गोव्यात घुसला तेव्हा तिथे आदिलशहाची हुकुमत होती. सहा हजार मुसलमानांच्या रक्ताचा पाट वाजवून त्याने गोवा राज्य  जिंकले होते.त्याला गोवा प्रांतात स्वत:चे राज्य निर्माण करावयाचे होते सोबत व्यापार -उदीमही वाढवायचा होता.धर्मांतराची जबरदस्ती, जुलमी अत्याचार यातून पोर्तुगीजांनी आपले बस्तान गोव्यात बसविले होते.खरे तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लष्करी कारवाई करुन गोवामुक्ति शक्य होती, परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंनी लष्करी वापर न करण्याची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली होती.त्यांच्या या स्वप्नाळू धोरणाने गोवामुक्ति लांबली,व त्याचा त्रास गोवेकरांना सहन करावा लागला.

         या तणावग्रस्त परिस्थितीला आईचा भाऊ वसंत कंटाळला होता. भारत सरकारने १९६१ ला गोवा पोर्तुगीजांच्या गुलामीतुन मुक्त केला.व त्याचा भारतात विलीन होण्याचा मार्ग मोकळा झाला.पुढे सावंतवाडी व गोवा बससेवा सुरु झाली.व कंटाळलेल्या वसंतने १९६१ ला सावंतवाडी गाठली.भाऊ वसंतच्या अनुपस्थितीत आईचे हि गोव्यात लक्ष लागेना.त्यात मामीकडुन घरकामात मदत करूनही जाच होताच.कामात वेळ झाला तर मारहाण करायची.त्यामुळे पुढे दोन वर्षानी आईहि सावंतवाडिला परत बाबांकडे परत माघारी आली.आता मात्र आई खुश होती कारण बाबा व भाऊ वसंत सोबत ती आनंदात रहात होती.आई घरकामात लक्ष घालू लागली.तर मामाला ड्रायव्हिंग चे वेड असल्याने मुंबई गोवा ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवर तो क्लिन्नर म्हणून जाऊ लागला.पुढे तो ट्रक चालवायला शिकला.व ट्रान्सपोर्टच्या कंपनीत ड्रायव्हर म्हणून चिकटला तो कायमचाच!सावंतवाडी हे ऎतिहासिक राजे सावंत -भोसले यांचे संस्थानाचे शहर.खरं तर तिचे नाव सुंदरवाडी.नावाप्रमाणेच सुंदर असलेल्या सावंतवाडीचे देखणेपण सर्वश्रुत आहे.छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सावंतवाडीला स्वत:चा इतिहास तर आहेच शिवाय विशेष संस्कृतीही आहे.आईचे तर आपल्या या गावावर विशेष प्रेम.ब-याचवेळा गप्पांमध्ये कधी या सावंतवाडीचा विषय आला की आई गर्वाने सांगायची, - " माझी वाडी लय भारी आसा,त्याची सर तुमच्या गावाक नाय." 

      इकडे आईच्या आईला तीन आणखी मुले झाली .मुलगा संजय व मुलींची नावे अनुक्रमे बेबीनंदा व  मंगल ठेवण्यात आली.त्यांच्यासोबत शोभाहि तिकडेच रमली.तर मोठी झाल्यावर लता बाबांकडे माघारी फिरली.यावेळी च सावंतवाडी त गोविंद चित्रमंदिर सुरु झाले.आईला मराठी व हिंदी चित्रपट पहाण्याची विलक्षण आवड.त्यामुळे आजोबांना न सांगताच आई मैत्रिणिंसोबत चोरून पिक्चर बघायला जायची.आता सुधा (आई) , लता,वसंत हि सारी भावंडे मोठी  झाल्याने आजोबा हि निश्चिंत होते.त्यांनी घेतलेल्या कष्टाला फळ आले होते.व्यापारातहि चांगलाच जम बसला होता.सगळे कसे ठिक चालले होते.सुखाचे चार  क्षण आईच्या वाट्याला आले होते पण तिने ठरविले कि आपल्या दोन्ही भावंडाचा संसार फुलल्या शिवाय आपण लग्न करायचे नाही.व त्याप्रमाणेच प्रथम भाऊ वसंताचे लग्न व नंतर लता चे लग्न मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

      याच दरम्यान वडिलांचे भाऊ मारुती अर्थात भाईकाका घरांवर फवारणीचे काम करण्यासाठी कंत्राटी आरोग्यखात्यात काम करत होते.सावंतवाडीत ते कामावर असताना त्यांची भेट आईचे वडिल लक्ष्मण पाटील यांच्याशी झाली.व त्यातून त्यांनी मोठ्या भावासाठी आईचे स्थळ विचारले.स्वाभिमानी स्वभावाच्या आजोंबानी होकार दिला. व १२ डिसेंबर रोजी माझ्या आई - बाबांचे लग्न सावंतवाडी येथे उत्साहात पार पडले.व कु.सुधा लक्ष्मण पाटील आता सॊ.अरूणा अरविंद हटकर बनली. व ती सासरी लांजा तालुक्यातील तळवडे या एका दुर्गम खेड्यात आली.

      

 क्रमश...

भाग दोन :- (२)

         "अन्नपूर्णा आई"  


    माझी आई म्हणजे प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत! चार मुलांसकट संपूर्ण संसाराचा गाढा ओढण्याची जबाबदारी तिचीच होती.पण तिला त्याचं ओझं कधीच वाटलं नाहि.ते वाहण्यासाठी लांजा बाजारपेठेतल्या फुटपाथवर ती महिलांना बांगडी भरण्याचा व्यवसाय करायची.पण यात तिने कसला संकोच बाळगला नाही.या व्यवसायाच्या आधी तळवडे गावात राहत असताना गावोगावी डोक्यावर माश्याची टोपली घेऊन मासे विकणे, वडिलांसोबत घरी गावठी दारु विकणे हे ही व्यवसाय तिने केले.पण हा सगळाखटाटोप प्रपंचासाठीच होता. तुमच्या पोटात भुक असेल,डोक्यात कसलीही लाज नसेल आणि तुमच्या मनगटात जिद्द असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीतुन मार्ग काढू शकता ,अगदि कुठल्याही . हे माझ्या आईने सिद्ध केले होते. पुढे दारु विक्री बंद करुन आई- बाबा लांज्याला आले.व बाजारपेठेतील वाघद-यांच्या घरात भाडेकरु म्हणुन राहिले.इथेच ख-या अर्थाने प्रपंचाला सुरवात झाली.बाबांचे बाजारपेठेतील खालच्या नाक्यात पानपट्टी चे दुकान. त्यावेळी त्याला पानगादी म्हणायचे.या छोट्याश्या पानगादिवर बाबा लांज्यातील सहा जणांचा व गावातील पाच सहा जणांचे अशी दोन कुटुंब सांभाळायचे.तारेवरची कसरतच होती ती.

        एकेदिवशी शाळेत जाताना मी जेवणाचा नवीन टीफिन मला आई घेऊन दे म्हणून आईकडे तगादा लावला.तिने बाबांकडे त्यासाठी पैसे मागितले.पण त्यांनी वेळेवर दिले नाहि.म्हणून रागावलेल्या आईने माझ्या बाळाला टीफिन मि देणारच असे बांबाना सांगितले.पण बाबांच्या छोट्यशा व्यवसायात सारे भागत नव्हते याची जाणीवही तीला होती.यातूनच तिने बांगडी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.व. ईसानी स्टोअर्स या कटलरि व्यवसायिकाच्या मदतीने व्यवसाय सुरु केला व दोन दिवसांनी आईने मला बाजारातून नवा टिफीन आणुन दिला.तो मिळताच मला झालेल्या आनंदाने आईच्या डोळ्यात आनंदाश्रु दाटलेले होते.आजहि तो क्षण मला तसाच आठवतोय.मुलाच्या सुखासाठी फुटपाथवर बसून व्यवसाय करणाऱ्या आईचे ते रुप आठवले की तिच्या असीम कष्टाची जाणीव होते.

         तशी आई दिसायला मध्यमसर चणीची,सडपातळ शरिरयष्टीची ,सावळीशी ( कृष्णवर्णीय)  ही बाई! पण मनाने ती गॊरवर्णीयच म्हणायला हवी.घरच्या सर्व खाणा-या तोंडासाठी भरपेठ आणि चविष्ट खाणं तर करायचीच पण,  शेजार पाजारच्यांसाठी सुद्धा त-हेत-हेचे पदार्थ बनवून खायला घालायची.अगदी अन्नपुर्णाच म्हणा ना! तिच्या हातच्या  माश्याच्या कालवणाला तर चवच निराळी.पाहुणे किंवा माझे आत्येभाऊ  घरी आले कि ते आईला मच्छी फ्राय करायचा आग्रह धरायचे ,आईही त्यांच्या जिभेचे चोचले पुरवायची.

       मला आजही ते दिवस आठवतात आई गावा- गावात, आठवडा बाजाराला व्यापाराला जायची. मंगळवारी लांजा, बुधवारी पाचल किंवा पाली, गुरुवारी राजापूरच्या  बाजाराला पहाटे पाचला उठून अॅप्पे टेम्पोतून कटलरी माल व बांगड्यांचा हारा घेऊन जायची. राजापूर हे ऐतिहासिक शहर. शिवकाळातील प्रमुख बंदर व सध्याचे तालुक्याचे ठिकाण. येथील आठवडा बाजार सायंकाळी सहा सात पर्यंत भरत असल्याने तिला घरी लांज्याला यायला आठ ते नऊ वाजायचे. घरी आल्यानंतर ती लगबगीने अर्ध्या ते एक तासात गरमागरम जेवण बनवायची  व आम्हा लेकरांना वाढायची. दिवसभर सूर्यनारायणाचे चटके सोसत व्यापार करून थकलेल्या आईच्या चेहऱ्यावर आम्ही भावंडे जेवताना एक समाधानाची लहर असायची. घरट्यात असलेला चिमुकल्या पिल्लांना दाणा भरवताना जशी पक्षीण सुखावते तसाच भाव तिच्या चेहर्‍यावर असायचा.मी शिक्षण पूर्ण करुन लांजा हायस्कूलला  शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर ही आईने आपला हा व्यापार कधीच थांबवला नाही.ती नेहमी म्हणते अरे जोपर्यंत माझ्या हाताने होते आहे तोपर्यंत मी स्वावलंबीपणानेच जगणार!

  आज आई ७१ व्या वर्षात पदापर्ण करीत आहे.मधल्या काळात सन २००७ ला अपघातात माझा मोठा भाऊ मला कायमचा सोडून गेला.तर पुढे २०१३ मध्ये बाबाही मार्गस्थ झाले.त्यामुळे  कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.पण अशाही स्थितीत मला भक्कम आधार दिला तो आईनेच!त्यांची कमतरता मला तिने कधीच जाणवू दिली नाही.

   -  "आई घरातल्यांपैकी कुणाचीही जागा घेऊ शकते,

      पण आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही." 

हे वास्तव मला ख-या अर्थाने यामुळे उमगले.खरोखरच आई इतक्या सहजपणे कोणत्याही व्यक्तीची जागा घेऊ शकते आणि आपल्याला त्याची उणीवही, कमतरताही भासवून देत नाही. जीवनभर आपल्यावर भरभरुन माया, प्रेम, स्नेह लावणारी "आई" हे पृथ्वीवरील ईश्वराचं अस्तित्वच जणू! आणि म्हणूनच या भूतलावर तीची जागा मात्र कोणी घेऊ शकत नाही हेच खरे!

आई तुला सत्तराव्या वाढदिवसानिमित्त आभारभर शुभेच्छा.

क्रमशः 


वि।ज।य।

३० मे २०२१


भाग -०३

आईचा सत्कार

💐💐💐💐

      नरपंचायत लांजा, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व महिला बालकल्याण समिती अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला २०२० म्हणून माझ्या आई श्रीमती अरूणा अरविंद हटकर यांना सन्मानित करण्यात आले.

    गणेश मंगल कार्यालय लांजा येथे संपन्न झालेल्या या महिला मेळाव्याला उपनगराध्यक्षा सॊ.यामिनीताई जोईल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुषारजी बाबर,महिला बालकल्याण समिती सभापती श्रीमती सोनाली गुरव, रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध डाॅ.कल्पना मेहता, अॅड.धनश्री सुतार, प्राध्यापिका डाॅ.सुवर्णा  देऊसकर आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी डाॅ.कल्पना मेहता यांच्या शुभहस्ते आईला सन्मानित करण्यात आले.माझ्या सॊभाग्याने या कार्यक्रमाचे निवेदन करण्याची संधी मला मिळाल्याने आईच्या नावाची घोषणा करताना मन भरुन आले.आजवर तिने गाळलेल्या घामाचे,वेचलेल्या कष्टाचे असे सार्वजनिक कॊतुक प्रथमच झाल्याने खुप समाधान झाले.

    लांजा नगरपंचायतीच्या वतीने यावेळी नगरपंचायत हद्दितील १३ कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये श्रीम. अनुराधा राणे,प्राध्यापिका माधुरी गवळी,अॅड.लिना जेधे ,श्रीमती शलाका कापडी, श्रीम. सुहासिनी  सार्दळ, श्रीमती ऋचा  वेद्रे, श्रीम.विजयालक्ष्मी देवगोजी, श्रीमती अमिताभ कुडकर, श्रीम. सुप्रिया बापट, श्रीम.मनीषा घाटे ,श्रीम .शुभांगी वारेशी, श्रीम.मिनल सावंत यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

    ️आयुष्यभर संघर्ष करित, दारिद्याच्या छाताडावर बसून आईने आम्हा मुलांना नव्या विचारांची आव्हाने पेलण्याची ताकद दिली.वयाच्या सत्तरीनंतरही आजही ती घरी न बसता बांगडी व्यवसाय करते.प्रत्येक माणसाने स्वावलंबी असले पाहिजे हा आपल्या कृतीतून संदेश देणारी माझी आई म्हणूनच माझी आयकाॅन आहे.

       डोक्यावर बांगडी चा हारा घेऊन गावागावात महिलांना  बांगड्या भरून आईने आम्हा मुलांना उच्चशिक्षण दिले.म्हणुनच आज मी ज्युनिअर काॅलेज लांजा येथे एम.एड.पर्यंत शिक्षण घेऊन सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर बहिण सॊ.देवता पदवीधर असून कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, भरणे - ता.खेड येथे अधिक्षिका म्हणून कार्यरत आहे.कोणतेही शिक्षण नसतानाही विचारांनी सुशिक्षित असणा-या आईने निरपेक्षपणे अनेकांना प्रेम दिले.घरची मीठ - भाकरी प्रेमाने दिली. मधल्या काळात मोठ्या भावाचे  ( दादाचे) झालेले अपघाती निधन व बाबा ही कायमचे सोडून गेल्यावरही ती डगमगली नाही. हा काळ तसा आम्हा कुटुंबाचा पडता काळ होता.नियती रोज नवी परिक्षा घेत होती.पण आईने आम्हा सर्वांना सावरले.आम्हा भावंडाना ही भक्कम आधार दिला.यावेळि 

 " आई घरातल्यांपैकी कुणाचीही जागा घेऊ शकते,

   पण आईची जागा कुणीही घेऊ शकत नाही "  -या विचाराचा आम्हाला प्रत्यय आला.

     आई म्हणजे त्यागाचे आणि मायेचे महाकाव्य आहे. आई संस्कृती नावाच्या विद्यापीठाची अनभिषिक्त कुलगुरू असते.असे म्हटले तरि वावगे ठरणार नाही. तिने केलेल्या कष्टामुळेच आपण घडतो.आज जागतिक महिला दिनानिमित्ताने तिला अर्थात  माझ्या मुळ प्रेरणास्थानाला  पहिल्यांदाच  सन्मानित करण्यात आले.त्यामुळे हा दिवस ख-या अर्थाने संस्मरणीय ठरला





काही निवडक क्षणचित्रे :--













भाग -४

आईला पोलिसांनी पोलिसव्हॅनमध्ये बसवून पोलिस स्थानकात नेले.

आज एक जुलै 2021. कोरोना  वैश्विक संकटामुळे  भारतात आणि महाराष्ट्रात अजूनही सक्तीची टाळेबंदी (लाॅकडाऊन) सुरूच होती. या काळात खऱ्या अर्थाने कंबरडे मोडले त्या छोट्या-छोट्य व्यवसायिकांचे व फुटपाथवर बसणा-या फेरीवाल्यांचे.वर्ष उलटले  तरीही कोरोनासुराला आपण अटकाव घालू शकलो नव्हतो.रोजच्या रोज कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत होती.त्यामुळे सरकारही टाळेबंदी हठवायला तयार नव्हती. अशा काळात आलेले संकट दोन चार महिन्यात संपेल असा कयास बांधणा-या सर्वसामान्यांनी पोटाला चिमटा काढून बचत केलेला पैसा देखील संपला असल्याने चरितार्थ कसा चालवायचा  हा गंभीर प्रश्न आ वासून उभा राहिल होता.सरकार मदत करित होती पण ती तुटपुंजी स्वरूपाची होती.

     या तीव्र स्वरूपाच्या संकटामुळे एक ना एक दिवस मरणारच आहोत हा पवित्रा घेत अनेक व्यवसायिकांनी फुटपाथवरच्या फेरीवाल्यांनी दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला.मास्क व. सॅनिटायझर्सचा वापर करित ते स्वतः ला संभाळून पोट भरण्यासाठीच नाइलाजास्तव घराबाहेर पडले होते.अशा परिस्थितीत माझ्या आईने व सुरेखा शिर्के ,रतन भागवत या फेरिवाल्या महिलांनी फुटपाथवर आपली दुकाने लावायला सुरवात केली.फुटपाथवर बसायला बंदी असतानाही शासनादेश धुडकारुन दुकाने लावली म्हणून लांजा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षिका पाटील मॅडम यांनी पोलिस व्हॅनमध्ये बसवून आईसह त्या दोघीनांही पोलिस स्थानकात नेले.व समज देऊन सोडले.अशा पद्धतीने जीवनात पोलिसव्हॅन मध्ये बसण्याचा अनुभव माझ्या आईने घेतला.

      


     स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी समाजसुधारकांना जेलमध्ये जावे लागले, तर स्वातंत्र्योत्तर कालखंडात एकविसाव्या शतकात उद्भवलेल्या कोरुना वैश्विक संकटात टाळेबंदीने आर्थिक कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या तिघींना पोटाची खळगी भरण्याचा संघर्षामुळे पोलिसांनी पकडून नेले.

    माझा शेजारी मनोज पाटीलने मला या घटनेची माहिती दिली ,तेव्हा लगेचच आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतली. तिथे जाईपर्यंत माझे मन एखाद्या वावटळीत सापडल्यासारखे झाले. मी अजून शिक्षक म्हणून माझ्या प्रशालेमध्ये परमनंट नसल्याने आईला फुटपाथवर बसावे लागते आहे आणि आज तिला पोलिसांनी व्हॅनमध्ये बसवून नेले, यामध्ये मी स्वतःला दोषी मानले.

    माध्यमातील लेख

१) साप्ताहिक कोकण मिडिया-


साप्ताहिक कोकणी माणूस -



 

No comments:

Post a Comment