Saturday, September 11, 2021

हिंदू -मुस्लिम ऎक्याचे प्रतिक -प्रभानवल्लीचा बल्लाळगणेश

 हिंदू मुस्लिम ऎक्याचे प्रतिक -प्रभानवल्लीचा बल्लाळगणेश.

            


कोकणातील समाजजीवनात आणि समाजमनात श्री गणेश या देवतेला जेवढे स्थान आहे तेवढे स्थान आणखी दुसऱ्या देवतेला क्वचितच आहे. श्री गणेश ही अशी देवता आहे की,जिच्यापाशी गरीब-श्रीमंत असा भेदभाव नाही, बहुजन- महाजन असे गणद्वैत नाही. जातीपातीमधली उच्चनीचता नाही.हा सर्वांचाच देव. सर्वांना सुख देणारा आणि सर्वांचे दु:ख हरण करणारा. कोकणातील लांजा तालुक्यातही सांस्कृतिक व आध्यात्मिक एकतेचे आदर्श देणारे एक गणपतीचे प्रसिद्ध स्थान आहे.मुस्लीमपंथीय मुर्तीपूजाविरोधक असले तरी या गावातील मुस्लिम बांधव मात्र आपल्या कामाची सुरवात या पुरातन गणपतीला नतमस्तक होऊन करतात,एवढेच नव्हे तर या देवस्थानच्या ट्रस्टी  म्हणूनही या बाप्पाच्या प्रत्येक कार्यात हिराहिरीने सहभाग घेतात.कोकणातील हिंदू-मुस्लिम ऎक्याची परंपरा जोपासणारे हे पवित्र स्थान म्हणजे प्रभानवल्लीतील बल्लाळगणेश होय!

       विशाळगडाच्या पायथ्याशी वसलेले खोरं ,छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील सर्वाधिक महसुली उत्पन्न देणारा सुभा, कोकणातील लष्करी हालचालींवर नियंत्रण ठेवणारे ठाणे म्हणून शिवकाळात प्रभानवल्ली हे गाव नावारूपाला आले होते. त्याची साक्ष देणारी शिवकालीन गढीच्या खाणाखुणा गावात आजही पहायला मिळतात.साधारण ३१ वर्षापूर्वी  अज्ञातवासात गेलेल्या या स्वयंभू बल्लाळगणेशाची प.पूज्य रामचंद्र देसाई महाराज यांनी स्थानिक हिंदू -मुस्लिम बांधवांच्या सहकार्याने येथील गणेशखोरित छोटेखानी मंदिर उभारत प्रतिष्ठापना केली आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून महाराष्ट्रभर या देवस्थनाची ख्याती झाली.

    

 प्राचीन गणेशखोरे:--


   सह्याद्रीच्या कुशीत वसलेले  निसर्गसंपन्नस  प्रभानवल्ली हे खो-्यांचे गाव म्हणुन इतिहासप्रसिद्ध असून गाव खो-यांनी नटलेले आहे.भैरमखोरं,मुसळखोरं, गणेशखोरं,बनखोरं,निनकोखोरं ही प्रसिद्ध खोरी गावात आहेत. सद्यस्थितीत प्रभानवल्लीत बल्लाळगणेश ज्या भागात विराजमान आहे ,तेथे मुस्लिम समाजाची पूर्वापार वस्ती असून या भागाला गणेशखोरी असे म्हणतात.येथील मुस्लिमबांधवांना गणेशाचे हे पवित्र स्थान हिंदूंच्या आधीपासूच माहित होते.त्याची एक रंजक कथा आहे. मुस्लिमबहुल वस्ती असूनही या भागाला गणेशखोरी असे नाव असल्याने या दाट वनराईत गणपतीचे प्राचीन स्थान असावे असा अंदाज मुस्लिमबांधवांना होता. एके दिवशी तो एका गुराख्यामुळे खरा ठरला.या खो-यात गुरे चरणा-या गुराख्याला एके दिवशी ही मुर्ती दिसली.त्याने ती अचलुन गावातील पाठकोंड या परिसरात फेकून दिली.परंतु दुस-या दिवशी ती मूर्ती परत आपल्या मुळ ठिकाणी आली होती.या घटनेने मूर्ती फेकणा-या गुराख्याचे मानसिक संतुलन ढासळले.या अनूभुतीने येथील गणपतीचे स्थानमहात्म्य ओळखून तेथील सुमारे ५९ मुस्लिम कुटुंबे कोणत्याही नव्या कामाचा शुभारंभ करण्यापूर्वी या स्थानी येऊन श्रीफळ वाढवित असत.

     

 देसाई महाराजांचा दृष्टांत व मंदिर जीर्णोद्धार :--


 बल्लाळ गणेशाच्या जीर्णोद्धाराची कथा देखील तेवढीच रंजक आहे.मिठगवाणे ता.राजापूर येथील  देसाई नामक तरूणाने संन्यासत्व स्वीकारले.आणि आपल्या आध्यात्मिक साधनेने प.पूज्य देसाई महाराज म्हणून नावलौकिक ही कमविला.बत्तीस शिराळा ,सांगली येथे वास्तव्यास असणाऱ्या देसाई महाराजांना अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात झालेल्या दृष्टांतात - "बल्लाळगणेश रुपात मी मुचकुंदि ऋषींच्या तपोवनात. वास्तव्याला असून माझा लवकरात लवकर जीर्णोद्धार कर " असा दृष्टांत झाला .दृष्टांतातील गणपतीची शोधमोहिम तब्बल २६ ते २७ वर्षांनी प्रभानवल्ली येथे येऊन  पूर्ण झाली.माचाळ येथे मुचकुंदि ऋषींनी तपश्र्चर्या केलेली गुहा आहे हे कळताच त्यांनी विशाळगड, माचाळ, गजापूर, साखरपा, शिपोशी ,वेरवली हा परिसर पिंजून काढला.पुढे महाराज प्रभानवल्ली खोरनिनकोत पोहचल्यावर मुस्लिमबहुल असलेल्या गणेशखोरित फिरल्यावर दृष्टान्तात आपण फिरलो ती ही  जागा याची महाराजांना खात्री पटली.मग स्थानिक अमजदभाई शेरखान यांनी दाखविलेल्या ठिकाणी  त्यांनी आपल्या शिष्यांच्या व स्थानिकांच्या मदतीने गणेशाचा झरा,गणेशाचा वहाळ,व मुस्लिम बांधव वर्षानुवर्षे होते श्रीफळ वाढवायचे ती श्री गणेशाची जाळ तोडल्यावर त्यांना या ठिकाणी पुरातन काळातील श्री गणेशाची खंडित अवस्थेतील मुर्ती मिळाली. बल्लाळगणेश सापडल्याची बातमी वा-यासारखी अनेक गावात पोहचली.भक्त व भाविक पहाण्यासाठी गर्दी करु लागले.पुढे जीर्णोद्धार समिती स्थापन होऊन प.पूज्य देसाई महाराजांच्या मार्गदर्शनाखाली येथे स्वयंभू  बल्लाळगणेशाचे छोटे सुंदरसे मंदिर उभारण्यात आले.या मंदिरात व्यापकेश्र्वर ,गणपती व पार्वती अशा काळ्या पाषाणातील घडीव मूर्तींची स्थापना केली गेली.तसेच अक्कलकोट महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली.जीर्ण झालेली गणेशाची मूर्ती मागच्या बाजूला प्रदक्षिणेच्या वाटेवर प्रतिष्ठापित करण्यात आली. या ठिकाणी शोधमोहिमेवेळी १९ ते १२ जण जागचे हलवू शकणार नाहीत असा खंडीत नंदी ,श्री गणेशाचे सुबक नक्षीदार आसन मिळाले होते. एकूणच हे बल्लाळगणेशाचे मंदिर जरी छोटे असले तरी त्याचे महात्म्य मोठे आहे.गेल्या तीन दशकात या ट्रस्टच्या वतीने येथे देवाचा प्रकटदिन व स्थापना वाढदिवस मार्गशीर्ष कृ११ ते मार्गशीर्ष कृ१३ या काळात साजरा केला जातो.यावेळी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनाला येतात.



 सांस्कृतिक एकता जपणारा बल्लाळगणेश:--

    बल्लाळगणेश हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असून या खो-यातील मुस्लिम बांधवांना आपल्या मुहल्लाच्या मागे असलेल्या या देवस्थानाविषयी आस्था व अभिमान असून उत्सवाच्या वेळी ते मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात.उत्सवाच्या समाप्तीला दाखविण्यात येणारा नैवद्य मुस्लिम भक्त त्यांच्या घरातुन आणतात.दोन्ही लोकांचा समावेश असलेल्या बल्लाळगणेश ट्रस्टचे विद्यमान  पदाधिकारी रमजू अल्ली मुजावर यांनी सांगितले की, त्यांचे  वडील अल्ली अब्दुल मुजावर हे देसाई महाराजांसोबत या ठिकाणी वावरायचे.ते देखील त्यावेळच्या समितीवर सदस्य म्हणून होते.


 एकूणच प्रभानवल्ली  या गावात आल्यावर कोकण "स्वर्गीय कोकण " हि बिरुदावली का मिरवितो मनोमन हे पटते. नवसाला पावणाऱ्या बल्लाळगणेशमामुळे पर्यटन नकाशावर आलेल्या प्रभानवल्ली -खोरंनिनको गावात शिमगोत्सवात रंगणारा पाच पालखींचा उत्सव प्रसिद्ध असुन रत्नागिरीचा भूशी डॅम म्हणून वर्षासहलीसाठी पुढे येत असलेला मानवनिर्मित खोरंनिनको धरणाच्या सांडवावरील धबधबा ,श्री देवी लक्ष्मी, श्री देवी आदिष्टी,श्री देव मारुती ही मंदिरे,तसेच ऎतिहासिक बारव,आदिलशाहीकालीन गढी ही  आवर्जून पाहण्यासारखी असून गणेशोत्सवात स्वयंभू बल्लाळ गणेशाच्या दर्शनासोबतच निसर्गदेवतेचे रुप अनुभवत वर्षासहलीत चिंब भिजण्याचा आनंद घ्यायला स्वर्गीय सुंदर प्रभानवल्ली गाठायलाच हवे!


☘️☘️☘️☘️☘️☘️

   श्री विजय हटकर,

पर्यटन अभ्यासक -लांजा

           
 श्री देेेव बल्लाळेश्र्वर मदिर.






No comments:

Post a Comment