Tuesday, August 31, 2021

"वेरळचा कडा धबधबा"

🌊🌊🌊🌊 🌊 निसर्गरम्य आणि सुरक्षित

    "वेरळचा कडा धबधबा"



        महाराष्ट्रात वेरळ म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर औरंगाबादेतील  अजोड अद्भुत लेणी समूहाने प्रसिद्ध असलेले वेरूळ गाव उभे राहते.परंतु याच  नावाशी साधर्म्य असणारे एक गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आहे. सन २०१६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली  स्मार्ट ग्रामपंचायत हा बहुमान पटकावून चर्चेत आलेले वेरळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते म्हणजे तेथील मनमोहक कडा धबधब्याने। 

       परमेश्र्वराने भरभरुन दिलेल्या कोकणातील प्रत्येक गावच निसर्गसमृद्ध आहे.पावसाळ्यात तर त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून येते. मुंबई गोवा महामार्गावर वसलेले टुमदार असे वेरळ गाव असेच एक सुंदर निसर्गरम्य गाव. पावसाळ्यात नेहमीच्याच धबधब्यांवर वर्षा सहलींचे आयोजन करुन अथवा चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद घेऊन नव्या व हटके धबधब्याचा शोध घेणा-या भटक्यांसाठी अर्थात पर्यटकांसाठी वेरळचा कडा धबधबा हा उत्तम पर्याय आहे.आजपर्यंत मानवी कोलाहलापासून दूर असलेला हा शूभ्र फेसाळणारा जलप्रपात आपल्या  स्वागतासाठी आसुसला आहे.                                            

निसर्गरम्य कडा धबधबा :-

       कोकणातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील लांजा शहरातून मुंबई कडे जाताना अवघ्या १० कि.मी.अंतरावर अवर्णनीय सौंदर्य लाभलेलं वेरळ गाव वसलेलं आहे.या  गावात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेली कोकणी घरे ,व निसर्गसौंदर्य आपलं लक्ष वेधून घेते. गावातील मुख्य रस्ता अर्थात  वेरळ कणगवली रस्त्यावर डाकवे वाडी सोडल्यानंतर साधारण एक कि.मी.अंतरावर रस्त्यालगत श्री रवींद्र साळवी यांची आंबा व काजू लागवड केलेली बाग लागते.या बागेजवळ आल्यानंतर धबधब्याचा मोठा आवाज आपल्याला धबधब्याजवळ आल्याची खात्री देतो.येथे आपली दुचाकी वा चारचाकी वाहने थांबवावीत.व डाव्या दिशेला गर्द वनराईतील पायवाटेने आवाजाच्या दिशेने चालत गेल्यावर  वेरळचा कडा धबधबा आपले स्वागत करतो.

      धबधबा रस्त्यालगतच्या गर्द झाडित असल्याने जास्त चालावे लागत नाही.अदमासे पन्नास फुटावरून कोसळणा-या या  धबधब्याचे रूपडे  मनमोहक असून पहिल्याच नजरेत हा धबधबा मनात घर करतो. या धबधब्यावर जाण्यासाठी आॅगस्ट ते जानेवारी हा उत्तम काळ असून सामान्य निसर्गप्रेमी पर्यटक मात्र  हिवाळयापर्यंतही  धबधब्याचा आंनद घेऊ शकतो.याठिकाणी धबधब्याखाली उभे राहून मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो.येथील पांढरेशुभ्र तुषार मनाला उल्हासीत करतात. जानेवारीनंतर पाण्याचा झोत कमी होत जाऊन धारा बारीक होतात. कौटुंबिक सहलीसाठी कडा धबधबा उत्तम ठिकाण आहे.


 कसे जाल?

 मुंबई -गोवा महामार्गावरील वेरळ फाट्यापासून  फक्त २ कि.मी.अंतरावर असलेल्या या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी  पक्का रस्ता आहे.

१) लांजा- देवधे मार्गे - वेरळ 

     अंतर - १२ किमी.

२) रत्नागिरी - पाली - वेरळ

     अंतर - ३७ कि.मी.

कोकणी जेवणाची व्यवस्था :-

वेरळ गावामध्ये रवींद्र साळवी यांच्या घरी उत्तम कोकणी जेवण व नाष्ट्याची सोय आहे. धबधब्या जवळ त्यांचीच बाग असल्याने चेजिंगची सोयही आहे.याबरोबरच गावातील ग्रामस्थ श्री  मनोहर डाकवे यांच्याशी संपर्क साधल्यास उत्तम भोजनाची व्यवस्था होऊ शकते.

 रवींद्र साळवी - ९०११०००६७१ 

 मनोहर डाकवे - ९७६६९५९९८७


परिसरातील पर्यटन स्थळे :-

                     पर्यटन स्थळ होण्याची उत्तम क्षमता असलेल्या या गावचे ग्रामदैवत देवधनी रवळनाथाचे हिरव्यागार भाताच्या खेचरात असलेले सुंदर मंदिर, आधुनिक स्थापत्य आणि संस्कृती यांचा अनोखा संगम साधलेले वैशिष्ट्यपूर्ण असे लक्ष्मीकेशव देवस्थान,२६० वर्षे जुना असलेला ऎतिहासिक असा भवानीशंकर पाध्ये यांचा चौसीपी वाडा ही  ठिकाणेही पर्यटकांनी आवर्जून पहावीत.अविरत खळखळणा-या झ-याच्या (वहाळ) काठी वसलेल्या या  दोन्ही देवस्थानाच्या ठिकाणी अध्यात्मिक अनुभूतीची येणारी प्रचिती शब्दात मांडणे कठिण आहे.यासोबतच महामार्गावरिल वेरळ घाटाच्या पायथ्याशी श्री साईबाबांचे कोरीव मंदिर  नव्याने उभारले जात असून शिर्डी येथील साईबाबांच्या मुर्तीसारखी हुबेहुब मुर्ती येथे स्थानापन्न केली जाणार आहे.एकूणच एकदिवसीय पर्यटनसाठी वेरळ सह ,मठ येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ ,श्री क्षेत्र अवधूतवन व  उन्हाळे ( गरम पाण्याचे कुंड) हा परिसर पर्यटकांना साद घालतो आहे.   

     

@@@@@@@@@@@@@@

श्री।वि।ज।य।ह।ट।क।र।

-८८०६६३५०१७



No comments:

Post a Comment