Saturday, August 14, 2021

अजातशत्रू व्यक्तिमत्व श्री चंद्रकांत श्रीधर खामकर वाढदिवस विशेष लेख

 अजातशत्रू व्यक्तिमत्व श्री चंद्रकांत श्रीधर खामकर वाढदिवस विशेष लेख                   

१४  ऑगस्ट २०२१

✒️✒️✒️✒️✒️✒️

         'काही माणसांचे नाव उच्चारता क्षणी आपोआप नकळतपणे त्यांच्याविषयी आदरभाव जागृत होतो, तो वाढीस लागतो ही त्यांच्या कर्तृत्वाची निशाणी असते.' आपल्या स्वकर्तुत्त्वाने मुंबई महानगरपालिकेत उच्च पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्यात झोकून देऊन जनमानसात आदराचे स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे लांजा तालुक्यातील आरगांवचे सुपुत्र व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत उर्फ दादा श्रीधर खामकर होय .१४ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस आज वयाच्या ६८ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चंद्रकांत दादा खामकर यांच्या कार्याचा आढावा घेणारा विशेष लेख...


       १४ ऑगस्ट १९५४ रोजी आरगांव, तालुका लांजा येथे जन्मलेल्या चंद्रकांत दादांचे बालपण आरगांवातच गेल्याने कोकणच्या लाल मातीचा सुगंध आणि निसर्गाचा सहवास याचा फायदा त्यांच्या जडणघडणीत झाला. दादांचे वडील स्वर्गीय श्रीधर जयराम खामकर हे त्यावेळचे मोठे सामाजिक कार्यकर्ते होते.लांजा तालुक्यातील विविध सामाजिक संस्थेत तसेच आरगांवातील विविध संस्थांमध्ये त्यांनी नि:स्पृहपणे कार्य केल्याने बालवयातच चंद्रकांत खामकर यांना कुटुंबातच सामाजिक सेवेचे बाळकडू मिळाले. जिल्हा परिषद शाळा आरगांव नंबर १ येथे इयत्ता पाचवी पर्यंत शिक्षण घेऊन दादांनी मुंबईची वाट धरली. पुढे सहावी ते सातवी पर्यंतचे शिक्षण महानगरपालिकेच्या पवई येथील शाळेत घेऊन न्यू इंग्लिश स्कूल ठाणे येथे अकरावीपर्यंतचे म्हणजे जुनी एस एस सी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

       

          पुढे ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन हा डिप्लोमा यशस्वीपणे पूर्ण करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात स्वच्छता निरीक्षक या पदावर ते रुजू झाले. लाघवी स्वभाव , मृदू भाषेतील वक्तृत्व, प्रशासनावर पकड, प्रभावी संभाषण कौशल्य तसेच मधुर आर्जव या स्वभावामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेत  ते सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले.  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पन्नास लाखाहून अधिक माणसे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात परिणामी आरोग्याच्या अनेक जटील समस्या तेथे निर्माण झालेल्या आहेत त्यामुळेच मुंबईला एक 'स्वास्थ्यपूर्ण शहर' बनवण्यासाठी आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते. चंद्रकांत खामकर यांनी आरोग्य निरीक्षक या पदावर तब्बल ३९  वर्ष सेवा बजावताना ही बाब नेहमीच लक्षात ठेवली. स्वच्छता निरीक्षक या पदाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. सन १९९१ मध्ये त्यांनी कुर्ला येथे विभागीय जनगणना अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले पुढे सन २००१ व सन २०११ च्या जनगणनेत ही त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांचा यथोचित सन्मान केला तसेच देशातील आघाडीच्या 'टाइम्स ऑफ इंडिया' या वर्तमानपत्रात ते मानाने झळकले दूरदर्शनने तर त्यांची मुलाखत घेऊन त्यांनी झोकून देऊन केलेले जनगणनेचे कार्य लोकांसमोर आणले.पुढे ३१ मे २०१२ रोजी सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

        


      चंद्रकांत दादा आज वयाच्या सत्तरीकडे वाटचाल करीत आहेत. परंतु त्यांच्या नसानसात भिनलेला समाजसेवक अस्वस्थ असल्याने सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या कार्य कक्षा रुंदावल्या. जास्तीत जास्त वेळ गावाकडे राहणे त्यांनी पसंत केले. त्यामुळे ग्रामस्थांच्या सरकारी काम करण्यात येणाऱ्या अडचणी सोडवून देण्यासाठी ते वेळ देऊ लागले.आरगांव सर्वोदय जनता संघ, मुंबई ,श्री गांगेश्वर सेवा मंडळ -आरगांव, दत्तक पालक संघ रिंगणे -कोंडगाव, लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ या संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आरोग्य व धार्मिक क्षेत्रात त्यांनी विविध उपक्रम राबवले.    

              

         "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ "

         

  -- या संत वचनाप्रमाणे वर्तणूक असणारे चंद्रकांत दादा नावेरी  परिसरातील व्हेळ, रिंगणे ,कोंडगे येथील तीनही हायस्कूलच्या एस्.एस्.सीच्या विद्यार्थ्यांकरीता शिक्षण तज्ज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन सन २०१६ पासून स्वखर्चाने करीत आहेत, बोर्ड परिक्षेत या विद्यार्थ्यांना धवल यश मिळावे यासाठी दादा त्यांना सराव प्रश्नसंचाचे मोफत वितरण करतात.यामुळे आदर्श उत्तरपत्रिका कशी लिहावी याचे उचित मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाले आहे. आरगांव येथील अंगणवाडी क्रमांक ०५ शासनाच्या नियमाप्रमाणे डिजिटल करण्याकरता त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून ती पूर्ण केली, तसेच रुक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळ या माध्यमिक विद्यालयाला एक प्रोजेक्टर संच भेट देऊन या  विद्यालयाला डिजिटल बनविण्यात सहकार्य केले. अारगांवातील जिल्हा परिषदेच्या तीन प्राथमिक शाळा व दोन अंगणवाड्यातील स्वयंपाक गृह हे 'धूरमुक्त' करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. लोकवर्गणी जमवून भारत गॅस कंपनीचे पाच संच या प्रशालेंना त्यांनी मिळवून दिले. आरगांव परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील अनेक कुटुंबियांना उज्वल योजने मार्फत मोफत गॅस कनेक्शन त्यांनी मिळवून दिले व ''धूर मुक्त भारत'' योजनेच्या पूर्तीसाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलला. त्याचबरोबर गावातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी तळमळीने कार्य केले आहे. हे करताना चंद्रकांत दादांनी स्वतःच्या खिशात सर्वप्रथम हात घातला नंतरच त्यांनी इतरांना आवाहन केले. दादांनी स्वतःचा मोठेपणा किंवा सन्मानासाठी कधीच कुठलेही काम केले नाही. श्रद्धा ज्ञान देते, नम्रता मान देते, आणि योग्यता स्थान देते पण तिन्ही मिळाले तर त्या व्यक्तीला समाज सन्मान देतो.आपल्या कार्यातून सन्मानास पात्र असलेल्या दादांना जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर या संस्थेने 'राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार'  देऊन सन्मानित केले आहे.


            राजापूर लांजा तालुक्यातील सर्वात जुनी सामाजिक संस्था म्हणून मिरविणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईने चंद्रकांत दादांच्या अनुभवाचा फायदा समाजाला व्हावा याकरिता त्यांना संघाच्या कार्यात सक्रिय होण्याची विनंती केली. चंद्रकांत दादांनी ती नम्रतेने स्वीकारली. संघातर्फे राबवल्या जाणा-या विविध उपक्रमांमध्ये आणि ग्रामीण साहित्य संमेलनांमध्ये ते आवर्जून सहभागी होतात. मातृभाषेचे भरण-पोषण करण्यासाठी, ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हि साहित्य संमेलने आवश्यक आहेत असे मत ते व्यक्त करतात.व ती राबविणा-या सुभाष लाड व त्यांच्या सहका-यांचे मोकळ्या मनाने कौतुक करतात.

        वैश्विक संकटात कोरोना संसर्गाची टांगती तलवार आसपास असतानाही चंद्रकांत खामकर यांनी राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे राबविल्या गेलेल्या मदत कार्यात सक्रिय सहभाग घेतला.नावेरी परिसर ,पाचल- रायपाटण या भागातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर्स चे  वाटप करणे, या भागातील कोरोनारुग्णांचा सर्व्हे  करणाऱ्या अाशा सेविकांना रेनकोट वाटप करणे आदी विविध उपक्रम संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत त्यानी यशस्वी केले.यावेळी तरूणांना लाजवेल असे काम त्यांनी केले.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संघाने त्यांना २४ जानेवारी २०२१ रोजी विशेष समारंभात कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले.

       चंद्रकांत दादांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सामाजिक कार्यकर्त्या सोबतच एक सच्चा पर्यावरणप्रेमी लपला आहे. स्वर्गीय कोकणातील निसर्गाची गेल्या काही दशकांपासून होत असलेली लयलूट एक ना एक दिवस येथील स्थानिक कोकणी माणसाच्या मूळावर उठेल असे सांगत ते  वृक्षारोपणाचा जोरदार आग्रह धरतात.त्यांचे पर्यावरण विषयक  प्रेम पाहून राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबईने त्यांना पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष बनवले आहे. याचा फायदा घेत आगामी काळात लांजा राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लक्षावधी वृक्षलागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

       सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असताना कुटुंबवत्सल चंद्रकांत दादांनी घराकडे हे तेवढेच लक्ष दिले.त्यांचे सुपुत्र श्री दीपक व कन्या सौ.योगीनी दोघेही उच्चशिक्षित असून विधिज्ञ आहेत. तसेच बंधू श्री सुहास खामकर हे देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेत उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

       सत् विचारांची बैठक, वाडवडिलांकडून आलेला संपन्न वारसा आणि सत्कर्माची ओढ यामुळेच सेवानिवृत्तीनंतरही जनकल्याणाचे व्रत सुरू ठेवलेले चंद्रकांत दादा आज ६८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. दादांच्या कृतार्थ जीवनाचा पुढचा प्रवास आनंददायी होवो व त्यांचा अमृतमय सहवास लांजा तालुक्यातील विविध संस्थांना यापुढेही लाभो हीच प्रभु चरणी प्रार्थना.

💐💐💐💐💐

 विजय हटकर ,लांजा.

 ८८०६६३५०१७


No comments:

Post a Comment