Thursday, August 5, 2021

एका समीक्षकाचे जाणे

  एका समीक्षकाचे जाणे ...

🪔🪔🪔🪔🪔🪔



 कोणाचाही मृत्यू दुःखकारकच असतो. पण काही व्यक्तींच्या मृत्यूने मात्र रितेपण येते. ०४ ऑगस्ट रोजी भाई बुटाला यांचे निघून जाणे माझ्याकरता तरी असे आहे .खरं तर मी काही त्यांच्या फार आतल्या वर्तुळात नव्हतो पण चांगली ओळख होती. पुढे त्यांचे चिरंजीव विनय बुटालांसोबत माजी विद्यार्थी संघटनेत सक्रियपणे काम करताना आमची मैत्री अधिक बहरली. या पाठी माझी पत्रकारितेतील आवड व त्यांच्या या क्षेत्रातील दीर्घ अनुभव हा समान धागा अधिक कारणीभूत होता. 


               रत्नागिरीतील गोखले नाक्यावरच्या छाया फोटो स्टुडिओत फोटोग्राफीचे प्राथमिक धडे गिरवित या व्यवसायातील तंत्रे आत्मसात केल्यानंतर साधारण चौतीस वर्षांपूर्वी २२ डिसेंबर १९८६ रोजी मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा गावात संजय उर्फ भाई विठ्ठलदास बुटाला यांनी छाया फोटो स्टुडिओची मुहूर्तमेढ रोवत लांजवासियांना छायाचित्रणाचे दालन खुले केले.तो जमाना होता कृष्ण-धवल कॅमेऱ्यांचा. लांज्यात त्यावेळी कोळेकर आणि भाई बुटाला हेच दोन प्रसिद्ध छायाचित्रकार होते. जे हजार शब्दात सांगता येत नाही ते केवळ छोट्याशा आकारात छापलेल्या छायाचित्रातून सांगता येतं हे छायाचित्रण कलेचे वैशिष्ट्य त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर लांजावासीयांत रुजवलं.या छोट्याश्या शहरातील अनेकांच्या जीवनातील आनंदाचे क्षण अचूक टिपत ते अविस्मरणीय करण्याचं काम केलं. त्यामुळेच ते लोकांच्या आवडीचे छायाचित्रकार बनले. आजही अनेकांच्या घरातल्या आलमारीत असलेले त्याकाळचे कृष्णधवल अल्बम पाहिले की, अत्तराच्या कुपीचे झाकण उघडल्यानंतर सुगंध दरवळतो व आसमंत भरून जातो तशाच पद्धतीने जुन्या काळातील अल्बम पाहून सुगंधी आठवणीत अनेक जण स्वतःलाच विसरून जातात. या वेळी हमखास सांगितलं जातं - “ अहो हे फोटो की नाही छाया फोटो स्टुडिओ चे भाई बुटाला यांनी काढले आहेत.”

      तो काळ छायाचित्रकारांसाठी  तसा खडतर होता एखाद्याचे छायाचित्र काढल्यानंतर कॅमेऱ्यातील निगेटिव्ह पाण्यात भिजविल्या जायच्या व नंतर फोटोपेपर वर फोटो प्रिंट केले जायचे. भाई बुटालांनी या खडतर काळातील कृष्णधवल छायाचित्रांच्या नाट्यमय छटांपासून ते रंगीत छायाचित्रांच्या सर्वरंगीपणा पर्यंत प्रवास करत स्वतःतील कलाकार नेहमीच जागा ठेवला. प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर छायाचित्रण व्यवसायातील बदलांना संधी मानत ते स्वीकारले. सोबतच कोकणातील आघाडीच्या वर्तमानपत्रांसाठीही त्यांनी छाया पत्रकार (प्रेस फोटोग्राफर) म्हणून कामही केले. शब्दात बातमी सांगणा-या काळात त्यांनी आपल्या बोलक्या छायाचित्रांतून लोकांना बातम्या सांगितल्या.  छायाचित्रण व्यवसाय करीत असताना भाई बुटालानी व्यावसायिक नीतिमत्ता कसोशीने जपली. ग्राहकांचे हित जोपासताना आपल्या परखड, बिनधास्त आणि प्रेमळ स्वभावाने अनेकांना मोहिनी घातली.


       पत्रकाराला एखाद्या गोष्टीचे समीक्षण करता आले पाहिजे,  योग्य ते योग्य म्हणताना चुकिंच्या गोष्टीवर आपली लेखणी निर्भिडपणे  चालविता आली पाहिजे असे सांगणा-या भाईंनी अनेक राजकीय पुढा-यांना परखड शब्दात सुनावताना मागे पुढे पाहिले नाही. त्यांच्या स्टुडिओत सामाजिक क्षेत्रांत काम करणाऱ्या एखादा नवखा सामाजिक कार्यकर्ता फोटो काढायला आला की, निरपेक्ष कार्यकर्ता कसा असावा याच्या मार्गदर्शनासोबतच अगोदर कुटुंबाकडे पहा असा प्रेमळ वडिलकीचा सल्लाही असायचा.निर्भीड ,निस्वार्थी , परखड ,बाणेदार भाई लांज्यातील राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवकांचे  खरेखुरे समीक्षक होते!

       असं म्हणतात, छायाचित्र प्रथम छायाचित्रकारांच्या मनावर उमटतं. आणि नंतर ते कॅमेराबद्ध होतं यासाठी छायाचित्रकाराला वेगळं मन असावं लागतं,अचूक आणि चौफेर नजर असावी लागते, तत्परते बरोबरच वेळेचे भान असावं लागतं हे सारं ज्याच्याकडे असते तो यशस्वी छायाचित्रकार बनतो. भाई बुटाला यासंदर्भात परिपूर्ण छायाचित्रकार होते.छाया फोटो स्टुडिओचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे. कॅमेराच्या पाठीमागे उभा राहून सुद्धा मनात घर करणा-या भाईंनी व्यवसायासोबतच सामाजिक भान जपत  विविध सामाजिक संस्थांमध्येही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठविला. व्यापारी संघटना, लांजा प्रेस क्लब,जेष्ठ नागरिक संघ, कोमसाप शाखा लांजा,लांजा नंबर ५ या शाळेची शिक्षक पालक संस्था आदी विविध संस्थांमध्ये त्यांनी दखलपात्र काम केले.सन १९९३ मध्ये लांजा शहरात व्यापारी संघटना स्थापन झाली.व्यापारांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविणा-या त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणा-या या संस्थेचे त्यावेळी भाई बुटाला सचिव होते.या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. जेष्ठ नागरिक संघाचेही ते संस्थापक होते.आजचे लांज्यातील इंटरनॅशनल स्कूल अर्थात लांजा नंबर ५ या शाळेत १९९३ ला पहिली शिक्षक -पालक संघटना स्थापन झाली.या संघटनेचे सदानंद देशमुख अध्यक्ष तर भाई पहिले सचिव होते.शिक्षक -पालक संघटनेच्या माध्यमातून लांजा नंबर ५ या शाळेला त्यांनी प्रार्थना मंडप बांधून दिला. त्याच्या उद्घाटनाला तत्कालीन सभापती  स्वर्गीय आबा  जाधव, तहसीलदार हिरवे साहेबांसोबत  शिपोशीतील क्रांतीकारक जी.आण्णा आठलेंच्या कुटुंबातील एक ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होती.हा प्रार्थना मंडप हजारो मुलांच्या आयुष्यातील संस्काराच्या पायाभरणीचा साक्षीदार ठरला.समाजातील चांगल्या कामांकडे भाईंचे बारिक लक्ष असायचे, ९० च्या दशकात शिष्यवृत्ती परीक्षेत लांज्यातील मुलांनी दैदीप्यमान कामगिरी केली.त्यामागे काही शिक्षकांची मेहनत होती हे अचून हेरलेल्या भाईंनी प्रेस क्लबच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात शिक्षकांचा सत्कार घडवून आणला.पुढे त्याचा पायंडा पडत गेला.दरवर्षी उत्तम शिक्षकांचे सत्कार होऊ लागल्याने इतरांनाही त्याची प्रेरणा मिळाली. कोकणातील साहित्यिकांचे हक्काचे  व्यासपीठ असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लांजा शाखेच्या स्थापनेतही त्यांचा ॲड.कुवळेकर, साप्ताहिक आंदोलनचे संपादक गजाभाऊ वाघदरेंसोबत  पुढाकार होता.


         आम्ही समवयस्क मित्रमंडळींनी सन २००४ मध्ये फ्रेंडस् ग्रुपची स्थापना केली.यामध्ये रेस्ट हाउसमधील मित्रांचा जास्त भरणा असल्याने रेस्ट हाऊस समोर असलेले संजय तुळसणकर यांचे जनरल स्टोअर्स आमचे कार्यालयच झाले होते.संध्याकाळच्या वेळेला आम्ही मित्रमंडळी संजयच्या दुकानात दांडिया स्पर्धा, दीपोत्सवाचे नियोजन करायला जमायचो.तेव्हा या दुकानामागेच रहात असलेले भाई बुटाला संध्याकाळचा फेरफटका मारायला यायचे व आम्हा पोरांची चाललेली ती धावपळ बघून मिश्कील हसायचे,  स्वतःचे वय विसरून आमच्यात मिसळून जायचे. आपल्या तरुणपणातील सामाजिक कामातील अनुभव सांगून आम्हांला प्रोत्साहित करायचे.माझी पत्रकारितेतील आवड पाहून या क्षेत्रातील खाचखळग्यांची ,आव्हानांची माहिती द्यायचे. 

      भाई बुटालांच्या हाती असलेल्या कॅमेराचे वेड बालपणापासूनच त्यांचा चिरंजीव विनयला लागले होते. आणि म्हणूनच छायाचित्रणाच्या वेडाला व्यवसायिक रूप देत विनयनेही भाईंच्या पाऊलावर पाऊल ठेवत छायाचित्रण व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय घेतला व वडिलांचा वारसा समर्थपणे जोपासत आज छाया फोटो स्टुडिओचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे.तर मोठे चिरंजीव परदेशात अनेक वर्षे वास्तव्य केल्यानंतर सध्या पुणे येथे मोठ्या कंपनीत स्थिरस्थावर झाले आहेत. सर्व काही ठिक असताना असे अघटित घडले.आज सकाळी त्यांचे जिवलग मित्र राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सुर्वे गुरुजींना फोन केल्यावर,' माझा निस्वार्थी मित्र मला कायमचा सोडून गेला' असे म्हणत त्यांनी फोनवरच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. "त्यांचा कातर आवाज आणि डोळ्यातील अश्रू" त्यांचे मित्रप्रेम व निस्वार्थी भाईंचे मोठेपण अधोरेखित करीत होते. गेले महिनाभर मृत्यूशी झुंज देणारे भाई जातानाही तडफेने लढले.चांगली चांगली माणसं मनाला चटका देऊन निघून जातात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. जीवनाच्या या खेळात अखेर नियती जिंकली. लांजावासीयांचा निस्वार्थी, निस्पृह, खराखुरा समीक्षक कायमचाच आसमंतात  निघून गेला. 

      स्वर्गीय भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 श्री विजय हटकर.

 लांजा , ८८०६६३५०१७

5 comments:

  1. Wow superb lekhni sir bhavpurn shradhanjli

    ReplyDelete
    Replies
    1. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

      Delete
  2. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

    ReplyDelete
  3. अतिशय समर्पक शब्दांत भाईंबद्दल माहिती मिळाली. श्री. हटकर सर धन्यवाद!
    भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

    ReplyDelete
  4. भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete