Thursday, July 15, 2021

   न पटणारी एक्झिट..

 भावपूर्ण श्रद्धांजली रविंद्र साळुंखे 



💐💐💐💐💐 

         पवईतल्या हिरनंदानी गार्डनच्या हिरवळीवर बासरीचा मंद सूर आसमंत भारुन  टाकत होता. महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून आलेल्या  सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हिरानंदानीचे गार्डन एका बहारदार कार्यक्रमासाठी सज्ज झाले होते.आयोजकांची लगबग चालू होती.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साने गुरुजींचे पट्ट्यशिष्य श्री आण्णा क्षीरसागर, फाफे गुरुजी, लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक गणपत शिर्के ,माजी आमदार बाळ माने, प्रसाद पाटोळे ,अविनाश लाड ,,उल्काताई विश्वासराव  आदि मंडळींचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्याने काहि क्षणात कार्यक्रमाला सुरवात होणार होती.  निमित्त होते  राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष, बृह्नमुंबई महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षक सुभाष लाड यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे! कार्यक्रमाच्या काही क्षण अगोदर   कोकणातून येणा-या रेल्वेने  मुंबईतील या कार्यक्रमाला एक बुजूर्ग परंतू प्रसन्न व्यक्तिमत्त्व हिरानंदानी गार्डनवर लगबगीने येताना मि व्यासपीठावरुन पाहिले,माझी खात्री होताच मी व्यासपीठ सोडून त्यांच्या स्वागताला प्रवेशद्वारावर गेलो. 

     " साळुंखे साहेब आपले मनस्वी स्वागत असे मी म्हणताच या सभ्य गृहस्थाने कौतुकाने माझ्याकडे कटाक्ष टाकला. आपुलकीने आपले स्वागत झाले याच्या समाधानाने दिवसभर केलेल्या प्रवासाचे क्षीण त्यांच्या चेहऱ्यावरून निघून गेले होते.त्यांना आसनस्थ करून मी परत निवेदनासाठी व्यासपीठाकडे वळलो.सुभाष लाड सरांचा दिमाखदार सेवानिवृत्ती सोहळा संपल्यानंतर या सभ्य गृहस्थाने धावपळीतही न विसरता स्वागत केल्याबद्दल भेटून आभार मानत,आपण यापूर्वी भेटलो नसतानाही आपण मला कसे ओळखलात असा प्रश्न केला. यावर रत्नागिरी च्या सांस्कृतिक क्षेत्रात संकल्प कलामंचाच्या माध्यमातून भरिव योगदान देणाऱ्या रवींद्र साळुंखे सरांना सारा रत्नागिरी ओळखतो असे मी म्हणताच, एवढा काही मी मोठा नाहिए असे कृतज्ञतापुर्वक सांगणाऱ्या रवींद्र  साळुंखेंचा निरोप घेत मी कोकणात येण्यासाठी शिर्के सरांसोबत निघालो.

         रवींद्र साळुंखे या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वासोबत झालेली हि तीन वर्षापूर्वीची पहिली भेट,आज साळुंखे सर आपल्यात नाहीत ही बातमी ऎकल्यापासून डोळ्यासमोरुन हटायला तयार होत नाहिए. 

         तसं म्हटलं तर रवींद्र साळुंखे हे आमच्या लांजा तालुक्याचे कर्तृत्ववान सुपुत्र.लांजा तालुक्यातील निसर्गरम्य व ऎतिहासीक शिपोशी हे त्यांचे मुळ गाव.रत्नागिरीतल्या आॅक्टेल कंपनीत काम करताना आतला कलाकार स्वस्थ बसू देत नसल्याने नाट्यवेड जोपासण्यासाठी त्यांनी संकल्प कलामंच रत्नागिरी ची स्थापना केली आणि राज्यस्तरीय कामगार नाट्य स्पर्धेत विविध दर्जेदार नाट्यकृतीतुन लक्षवेधी भुमिका साकारत अभिनयाची  परितोषिके मिळवून रत्नागिरिचा  नावलौकिक वाढविला.आपल्या निरपेक्ष ,मनमिळाऊ ,नम्र ,स्वभावाने त्यांनी प्रचंड लोकसंग्रह गोळा केला होता.नुकतेच ते सेवानिवृत्त झाले होते. 

         


२१ जानेवारी २०२१ ला  रवींद्र साळुंखे सरांचा सुभाष लाड सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लांजा येथील आग्रे हाॅल ला सेवानिवृत्तपर सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी रवींद्र साळुंखेंसारख्या  एका जिवलग मित्राचा सन्मान करताना लाड सर खुप आनंदी होते.कारण ,"सेवानिवृत्ती म्हणजे जगण्याची दुसरी आवृत्ती असे मानणाऱ्या लाड सरांना खांद्याला खांदा लावून पूर्णवेळ  काम करणारा  एक सहकारी मिळाला होता. रवींद्र साळुंखेंनी देखील सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या

जन्मभूमी शिपोशीच्या विकासासाठी अधिक लक्ष घालण्यास सुरवात केल्याने ग्रामस्थही आनंदित होते.  " पैसा मुक्त निवडणूक" आणि संघाच्या ग्रामीण साहित्य संमेलनासाठी वेळ देण्याचे साळुंखेनी देखील कबूल केले असल्याने आम्हीही आनंदित होतो. 

         अशातच कोरोनाने अनेक आप्तस्वकीय गमावून बसल्याचे धक्के पचवित असताना रवींद्र साळुंखे पाॅझिटिव्ह आल्याच्या बातमीने आम्ही घाबरुन गेलो होतो परंतु कोरोनावर मात करित ते घरी परतल्याने आम्हीही आनंदित झालो होतो, पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही.पुन्हा त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलविले होते.मात्र येथे आयुष्याची शेवटची झुंज अपयशी ठरली.व आज सकाळी त्यांचे निधन झाले.

         रविंद्र साळुंखे जीवनप्रवासाच्या रंगभूमीवरुन जरी नश्वर देहाचा त्याग करित पंचतत्वात विलीन झाले असले तरी त्यांच्या आठवणी अनेकांच्या ह्रृदयात कायम घर करुन राहतील.त्यांच्या जाण्याने रत्नभूमी एका अष्टपैलू कलाकाराला मुकली तर आम्ही एका जिवलग,प्रेमळ  मार्गदर्शकाला हरवून बसलो आहोत.या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण साळुंखे कुटुंबियांसमवेत आहोत. या कठिण परिस्थितीतून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना बळ देवो ,हिच भगवंताकडे प्रार्थना. 

         मार्गदर्शक रवींद्र साळुंखे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

      🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐   

 विजय हटकर.

No comments:

Post a Comment