Friday, August 20, 2021

ऎतिहासिक डोलारखिंड

 ऎतिहासिक डोलारखिंड..



मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींप्रभूंसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले.या एका ऎतिहासिक घटनेने पावनखिंड मराठी इतिहासात अजरामर झाली.पण शिवकाळात वापरात असलेल्या, व्यापारी व मावळ्यांच्या वर्दळिने गजबजलेल्या काही खिंडी नंतर मात्र कायमच्याच अज्ञातवासात निघून गेल्या.अशीच एक ऎतिहासिक खिंड कोकणातील लांजा तालुक्यातील हर्दखळे-रिंगणे गावाच्या सीमेवर आहे ,जी  खिंड विशाळगड,स्वराज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या  सुभे प्रभानवल्ली- राजापूर,रायपटण, सौंदळ या ऎतिहासिक परिसरात घडलेल्या असंख्य ज्ञात-अज्ञात घटनेंची साक्षीदार आहे.या खिंडीचे नाव आहे डोलारखिंड.

           हर्दखळे व रिंगणे गावाच्या मध्यावर वसलेल्या सह्यगिरिच्या उपरांगेत असलेल्या दरीत डोलारखिंड आहे.या खिंडिपासून  हर्दखळ्याची धनगरवाडी अगदी हाकेच्या अंतरावर आहे.लांजा शहरापासून २५ कि.मी.अंतरावर वसलेल्या  जैववैविध्यसमृद्ध हर्दखळे गावात जाण्यासाठी पक्का सडक असून तो थेट हर्दखळ्यातील धनगरवाड्या पर्यंत जातो.या वाड्यातून 'डोलारखिंड' हाकेच्या अंतरावर असल्याने १० ते १५ मिनिटात डोलारखिंडित पायी पोहचता येते.खिंडीतून कोंडगे -रिंगणे,हर्दखळे गावांचा दिसणारा पॅनोरमा पटापटा फोटू घ्यायच्या मोहात पाडतो.डोलारखिंडीचे सौंदर्य खरं तर पावसाळ्यात व हिवाळ्यात पहायला खुप छान वाटतं.धुक्याने अंथरलेल्या ढगांच्या आच्छादनात याचं रुपडं देहभानाचा विसर पाडायला भाग पाडते.

       

डोलारखिंडीचे ऎतिहासिक महत्व :- 

                  राजापूर हे कोकणातील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बंदर होते येथून हिंदुस्तानचा अरब राष्ट्रांची व्यापार चालत असे.तेथे इंग्रजांची वखार होती. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडल्यावर छत्रपती शिवरायांनी १६६१ च्या सुरुवातीस कोकण मोहीम हाती घेतली आणि एकापाठोपाठ एक अशी कोकणातील सर्व महत्त्वाची ठाणी जिंकून घेतली. त्यात दाभोळ, परशुराम ,शृंगारपूर, संगमेश्वर ,देवरुख, पाली, प्रभावळी आणि  राजापूर बंदराचा  समावेश होता.राजापूरप्रमाणेच सुभे प्रभावळी( प्रभानवल्ली) हे देखील महत्वाचे ठाणे होते.राजापुरात इंग्रजी वखार होती त्याचप्रमाणे प्रभानवल्ली येथे आदिलशाही गढी(छोटेखानी किल्ला) होती.अर्जुना नदीच्या काठावर वसलेल्या राजापूर बंदरात उतरलेला आखाती देशातील माल देशावर नेण्यासाठी त्याकाळी दोन मार्गांचा उपयोग होत असे.राजापूर -रायपटण -अणुस्कुरा-कोल्हापूर हा पहिला मार्ग तर राजापुर- रायपटण - डोलारखिंड- प्रभानवल्ली-विशाळगड-मलकापूर हा दुसरा महत्वाचा मार्ग होता. देशावर तयार होणारे रेशमी तलम कापड,मसाल्याचे पदार्थ,ताग, लाख, मिरे मोहरी, लवंग, वेलची ,गहू ,धान्य ,तेलबिया या मालाची निर्यात राजापूर बंदरातून आखाती देशात होत असे.तर आखाती देशातून आयात केलेला खजुर ,लोकर,मनुका हा माल, इंग्लंडमध्ये तयार झालेले बाॅडक्लाॅथ नावाचे कापड राजापुरातून देशावर नेण्यासाठी अणुस्कुरासह डोलारखिंडिचाही उपयोग होत असे.तसेच याच डोलारखिंडितून कोकणातील स्थानिक जिन्नसअर्थात  कोकम, नारळ, मीठही देशावर पाठविले जात असल्याने  डोलारखिंडिला व्यापारी महत्व प्राप्त झाले होते.


     


सुभे राजापूर व प्रभावळी शिवकाळात सर्वाधिक महसूल देणारा सुभा होता याची माहिती पेशवे दप्तरात सापडलेल्या एका अप्रकाशित हिशोबाच्या कागदामुळे पुढे आली आहे.यावरील माहितीप्रमाणे २लाख २५ हजार होन महसूल राजापूर प्रभावळी  येथून स्वराज्यात जमा होत होता.तसेच दुसरी एक महत्वाची नोंद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभावळीचा सुभेदार जिवाजी गणेश सरदेसाई यास पाठविलेले आज्ञापत्र उपलब्ध आहे.यावरून शिवकाळात राजापूर व  प्रभावळी ऎश्वर्यसंपन्न व महत्वाचे सुभे असल्याचे लक्षात येते.या दोन्ही लगतच्या सुभ्यांमध्ये  दळणवळणासाठी डोलारखिंडिचा उपयोग होत होता.इतर मार्गांपेक्षा हा मार्ग अंतर कमी करणारा असल्याने हा मार्ग वर्दळीचा होता हे सिद्ध होते.

       


श्रद्धास्थळ डोर्लोबा :-

              डोलारखिंडित हर्दखळे, रिंगणेवासियांचं श्रद्धास्थान असणारा एक देव बसलाय, "डोर्लोबा" म्हणतात त्याला.पांढऱ्या शुभ्र स्फटिकासारख्या एका छोट्याश्या तांदळाला 'डोर्लोबा ' म्हणून आस्थेने या खिंडीतून जाणारा प्रत्येक वाटसरू नतमस्तक होतो.निसर्गाचं विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या या खिंडीतील हे श्रद्धास्थळ डोलारखिंडिच्या अंतरंगातील एक  लेणं आहे.



 ऎतिहासिक भडकंबा :-

             याच डोलारखिंडितून रिंगणे परिसरात उतरलेल्या यवनांसोबत येथील सरदार घराण्याची लढाई झाली होती.रिंगणे ग्रामरक्षणासाठी लढलेल्या सरदार घराण्यातील धारातीर्थी  पडलेल्या वीरपुरुषाचे स्मारक अर्थात भडकंबा आजही डोलारखिंडीच्या पायथ्याशी वसलेल्या रिंगणे गावातील जंगलात त्याची साक्ष देत,उन -पावसाचे तडाखे झेलत उभे आहे.भोवती असलेल्या जंगल परिसराला शिंद्यांचे बुरुड,राऊंतांचे बरुड अशी  नावे दिली आहेत. या परिसरात घरवंदं असे नाव असलेले ठिकाणही आहे.कोकणात घराच्या चौथ-याला घरवंदं असे म्हणातात.कदाचित शिवकाळात या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या पराक्रमी सरदार घराण्याचे चौथरे या ठिकाणी असावेत.याचा अर्थ या परिसरात शिंदे,राऊत, शिर्के ही सरदार घराणी अस्तित्वात असावीत.काळाच्या प्रवाहात ती स्थलांतरित झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


स्वातंत्र्यानंतरची डोलारखिंड :--

              विसाव्या शतकाच्या मध्यार्थात म्हणजेच १९६० ते १९९०  च्या दशकापर्यंत  या डोलारखिंडीचा उपयोग कुरंग - कोंडगे-रिंगणे -आरगांव येथील ग्रामस्थ हर्दखळे, प्रभानवल्ली, भांबेड ,कोर्ले, शिपोशी या परिसरात ये-जा करण्यासाठी करित असत.१९६०-७०-८० या तीन दशकात लांजा तालुक्यात शिक्षणाच्या सुविधा जेमतेम होत्या.शिपोशी येथे न्यायमूर्ती वैजनाथ आठल्ये यांनी सुरू केलेले विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय हे लांजा तालुक्याच्या पूर्व विभागातील महत्वाचे शिक्षणकेंद्र होते.रिंगणे, झर्ये,कुरंग, आरगांव ,कोंडगे येथील मुले याच डोलारखिंडितून हर्दखळे गावात उतरत.व पुढे भांबेड ,कोर्ले ,गोविळ मार्गे शिपोशीला शिक्षणाला जात असत.त्याकाळी फारशी वस्ती नसल्याने डोलारखिंडीतील घनदाट जंगल होते.आजही त्यात फारसा बदल झालेला नाही.सद्यस्थितीत  गुगल मॅप वरून डोलारखिंडीचा अभ्यास केल्यास त्याचे ऐतिहासिक महत्त्व सहज लक्षात येते. डोलारखिंडीच्या उत्तरेस कधी काळी राजधानी चे दिवस पाहिलेला विशाळगड, प्रभानवल्ली ,दक्षिणेस रायपाटण, राजापूर पूर्वेस अणुस्कुरा ,येळवण जुगाई व पश्चिमेस लांजा आहे. डोलारखिंड व बाजीप्रभूंच्या शौर्याने अमर झालेली पावनखिंड तर एका समान रांगेत दिसतात.

        दोन डोंगरांमधील अरुंद व खोल घळईतून  जाणा-या वाटेला 'खिंड' म्हणतात .रिंगणे व हर्दखळे या दोन गावांच्या  मध्ये असलेल्या डोंगरातून जाणारी डोलारखिंड त्या काळी अशीच अरुंद व खोल घळईसारखीच होती.सध्या पुण्याच्या एका खाजगी कृषी कंपनीने येथील पोषक हवामानाचा अभ्यास करून १२०० एकर जागा रबर लागवडीसाठी घेतली.व रबराची लागवड करताना डोलारखिंडीतील अरुंद वाट रुंद करीत रस्ता प्रयत्न केला आहे.

        या ऎतिहासिक महत्व असलेल्या खिंडितून पक्का रस्ता व्हावा यासाठी 'हर्दखळे डोलारखिंड मार्गे रिंगणे रस्ता समिती' मध्यंतरी स्थापन करण्यात आली होती.याचे अध्यक्ष  कॅप्टन श्रीपत काका विश्र्वासराव आणि उपाध्यक्ष शिवराम सखराजी पेडणेकर होते.या समितीद्वारे हर्दखळे डोलारखिंडी मार्गे रिंगणे, कुरंग रस्ता व्हावा हि मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष केला गेला, परंतू नंतर आरगांव मार्गे रिंगण्यात रस्ता झाल्याने डोलारखिंड रस्त्याची मागणी पाठी पडली.



       हर्दखळे गावातील निसर्गनवल असलेला सातरांजण धबधबा,धनगरवाड्यातील ग्रामीण ढंगाचे लोकजीवन, ऎतिहासिक डोलारखिंड ही एकदिवसीय भटकंती म्हणजे निसर्गसौंदर्याची अप्रतिम अनुभूती जणू! सह्याद्रीच्या डोंगररांगेत फिरताना अनेक नव्या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न करताना, घाम गाळून जंगल तुडवल्यानंतरच तिच्या अंतरंगातील वैशिष्ट्ये अनुभवता येतात.कधी कधी दडून बसलेला इतिहास डोळ्यासमोर येतो आणि आखलेली मोहिम सार्थकी लागल्याचा प्रत्यय येतो.'डोलारखिंडित ' गेल्यावर पुढे आलेल्या इतिहासाने सार्थकतेचा हाच प्रत्यय अनुभवता आला.

⛰️⛰️🏞️🏞️⛰️⛰️

विजय हटकर

८८०६६३५०१७

हर्दखळे गावातील खास आकर्षणे :---

१) सातरांजण धबधबा

 २) ऎतिहासिक डोलारखिंड व डोर्लेश्र्वर 

३) ISO मानंकित जि.प.पु.प्राथमिक शाळा हर्दखळे नंबर ०१.

४) हर्दखळे धरण परिसर

५)तोरणमाळच्या गर्द देवराईतील प्राचीन महादेव मंदिर

६) धनगर वाडी येथील कोकरे कुटुंबियांच्या घरी असलेला पिरसा. 

(धनगरवाड्यावरील सह्ययाद्रीपुत्र कु.वैभव कोकरे डोलारखिंड दाखवायला सोबत हवाच! )    

---------



------------------------------------------------

महाराष्ट्रातील काही खिंडींची नावे :-

१)पावनखिंड -पन्हाळा२) टोलारखिंड -हरिश्र्चंद्रगड

३)कात्राबाईची खिंड.  ४) पाचाडची खिंड-रायगड

५) कावळ्या -पावळ्याची खिंड

६)बाबापूर खिंड ७) घोलबारी खिंड

८) काळकाई खिंड ९) भैरवखिंड

१०) चांभारखिंड - महाड ११) गणेशखिंड

१२)अंबाड खिंड.  १३)सदाशिवगडखिंड

१४)डुक्करखिंड-पुणे .


3 comments:

  1. सुंदर व उपयुक्त माहिती

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर लेख.....
    आमच्या माहितीत भर पडली

    ReplyDelete