कातळगांव -जावडे येथील दूर्लक्षित लेणीसमूहाचे जतन अत्यावश्यक- डॉ.वैशाली वेलणकर
कोकणातील प्रारंभिक काळातील वैशिष्ट्यपूर्ण शैव व वैष्णव प्रतिमा कातळगांव- जावडे, तालुका लांजा येथील लेणीसमूहात पाहायला मिळाल्या असून दख्खन व महाराष्ट्राच्या प्रारंभिक काळातील सर्व वैष्णव प्रतिमाशास्त्राची नव्याने मांडणी करण्याची क्षमता असलेले हे दुर्लक्षित शिल्पवैभव "ऎतिहासिक वारसा स्थळ " म्हणून सरकार व लोकसहभागातून जपायला हवे, असे मत डेक्कन कॉलेज पुणे येथील ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासिका डॉक्टर वैशाली वेलणकर यांनी लांजा येथे व्यक्त केले.
प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभाग -डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ पुणेच्या वतीने कातळगांव-जावडे लेणीसमूहाला डॉ.वैशाली वेलणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभ्यासगटाने नुकतीच भेट दिली. कातळगांव-जावडे येथील या लेणीसमुहाचे संशोधन प्रसिद्ध झाले असून ही लेणी चौथ्या-पाचव्या शतकातील असल्याचे सिध्द झाले आहे. तसेच हिंदू धर्मातील कोकण किनारपट्टी वरील सर्वात प्राचीन लेणी समूह म्हणून कातळगांव -जावडे येथील लेणी संशोधनातून समोर आलेली आहेत.या पार्श्र्वभूमीवर या लेणीसमुहाचा अधिकाधिक अभ्यास व्हावा या दृष्टीने आयोजिलेल्या या अभ्यास गटात प्राध्यापक गोपाळ जोगे ,संशोधक सहाय्यक अमित पेंदाम, संशोधक विद्यार्थी चेतना गोसावी ,पुरातत्वशास्त्र विद्यार्थी तार्किक खातू, प्रा. डॉ.अंजय धनावडे -एम.एम.जगताप कॉलेज महाड आदींचा समावेश होता. लांजा येथे या अभ्यासगटाचे आगमन झाले असता "लव्हेबल लांजा" या संस्थेचे विजय हटकर व शिवगंध प्रतिष्ठानचे राजूदादा जाधव यांनी त्यांचे स्वागत केले व कातळगाव जावळे अभ्यास दौ-यात स्थानिक संस्थांनी सहभाग घेऊन कातळगांव -जावडे येथील शिल्पसमृद्ध प्रतिमांचे महत्व तज्ञांकडून समजून घेतले. यावेळी अनुष्का जाधव ,अंकिता जाधव,सुमित गुरव, निशांत आचरेकर, गुरुप्रसाद धाडवे ,महेंद्र चव्हाण, आकाश आसोगेकर, आदी इतिहास प्रेमी सहभागी झाले होते.
लांजा तालुक्यातील कातळगांव-जावडे येथील शिल्पवैभव कोकणच्याच नव्हे तर दख्खन व महाराष्ट्राच्या प्रारंभिक काळातील इतिहासाला नवा आयाम देणारे ठरणार असून या परिसरात झालेल्या अलीकडील संशोधनाने इतिहासाच्या आकलनाच्या कक्षा विस्तारल्या आहेत. कातळगांव-जावडे लेणीसमुहात आढळणारी विष्णूची भव्य मूर्ती ,शेषशायीविष्णू व शैव संप्रदायातील महत्त्वाचे अंकन केलेले कथानक या सर्व शिल्पांकनाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून जांभ्या लालसर दगडात याची निर्मिती झाली आहे.मात्र गेली हजारो वर्षे ऊन-पावसाचा तडाका खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात ती झिजली आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या इतिहासाला नवा आयाम देणारे हे शिल्पवैभव जतन करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी डाॅ.वैशाली वेलणकर यांनी व्यक्त केले.
जावडे येथील या पुरातत्त्वीय स्थळाचे अभ्यासपूर्ण संशोधन करून पहिल्यांदा उजेडात आणण्याचे काम महाड येथील प्रा. डॉ. अंजय धनावडे यांनी २०१५ मध्ये केले. त्यांच्या मते या लेण्या त्रैकुटक आणि वाकाटक काळातील असून कोकणातील धर्म, इतिहास आणि पुराततत्विय दृष्ट्याअत्यंत महत्वपूर्ण आहेत. तज्ञांचे या लेणीसमुहाविषयीचे मत लक्षात घेऊन केंद्र सरकार च्या पुरातत्व विभागाने इकडे लक्ष देऊन सदर लेणी संरक्षित करावी अशी मागणी लवेबल लांजा या संस्थेच्या माध्यमातून स्थानिकांनी केली आहे
-----------------------------------
प्राध्या.गोपाळ जोगे :-
या अभ्यास दौ-यात सहभागी झालेले डेक्कन काॅलेजचे प्रा. गोपाळ जोगे यांनी या लेणीसमुहातील शैव आणि वैष्णव कथांचा उद्गम आणि त्यांचा पुरातत्त्वीय आणि मूर्तीशास्त्रीय पद्धतीने झालेला विकासाचा मागोवा सहसंशोधकांच्या मदतीने अलीकडेच तपशीलवार मांडला आहे. चौथ्या पाचव्या शतकातील भारतीय मूर्ती कला यांमध्ये मोलाची आणि मूलभूत भर घालणाऱ्या शिल्पांचा आणि शिल्पपटाचा या ठिकाणी समावेश असल्याने या ठिकाणी आणखी संशोधन होण्याची गरज आहे असे मत प्राध्यापक गोपाळ जोगे यांनी व्यक्त केले .तसेच राज्य व केंद्र सरकारकडून या ऎतिहासिक वारसास्थळाला लवकरच 'पुरातत्व ठेवा 'म्हणून दर्जा मिळवुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून स्थानिकांमध्ये प्रबोधन करून लोकसहभागातून याच्या संवर्धनाची मोहीम स्थानिक इतिहास अभ्यासक, इतिहासप्रेमी मंडळींनी करावी अशी अपेक्षा प्रा. डाॅ.गोपाळ जोगे यांनी व्यक्त केली.
------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment