इको हिलस्टशन माचाळ :-
रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या निसर्गरम्य स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या माचाळ गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी रस्ता पोहोचला. त्यामुळे अजून तरी खऱ्या अर्थाने माचाळ पर्यटनसमृद्ध आहे. आता त्या गावाच्या विकासाची नवी दालने उघडणार आहेत. त्यातूनच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवे माचाळ हिल स्टेशन जगाच्या पर्यटन नकाशावर येणे आता दूर नाही, मात्र ” लोकल टू ग्लोबल माचाळ”च्या या विकासप्रकियेत १००-२०० वर्षांपूर्वीचे कोकणातील गाव कसे होते याची ओळख एकविसाव्या शतकात करून देणारी ‘माचाळची ग्रामीण संस्कृती’ जपायला हवी. कारण माचाळच्या आल्हाददायक, थंड हवेच्या गिरीस्थानासोबतच ग्रामीण संस्कृती जोपासणाऱ्या लोकजीवनातही जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती आहे. माचाळच्या याच शक्तिस्थानांचा शोध घेणारा लेख
………
साडेतीन हजार फूट उंचीवरील माचाळ गाव कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या विशाळगडापासून एका दरीमुळे वेगळ्या झालेल्या सह्याद्रीच्या उंच डोंगररांगेतील सपाट माळरानावर वसले आहे. शिवकाळात ऐतिहासिक खेळणा (विशाळगड) या दुर्गाचा जोडदुर्ग म्हणून त्याची नोंद आहे. हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचे रस्ते, परिसरात पूर्णपणे पसरलेले धुके, थंड वातावरण, कोसळणारे धबधबे अशा सर्व गोष्टींनी वेढलेले थंड हवेचे माचाळ हे गाव आपल्याला पहिल्या भेटीतच आकर्षित करते.
या गावाला ‘ब’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तसेच गावात जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेल्याने भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठीच नव्हे, तर ट्रेकर्ससाठी अनोखा अनुभव देणारे आहे.गावात पोहोचल्यावर शहरी गोंगाटापासून दूर आल्याची जाणीव होते. गाड्यांचा आवाज, प्रदूषण, माणसांची गर्दी, कामाचा व्याप या सगळ्यापासून दूर..
मुचकुंदी नदीचे उगमस्थान :-
गुहेकडे जाताना वाटेत मुचकुंदी नदीचे उगमस्थान असलेले कुंड आहे.विशाळगडचा जोडदूर्ग असलेल्या किल्ले माचाळ वर उगम पावलेली ही नदी पुढे लांजा तालुक्याची जीवनवाहिनी बनत काठावरच्या गांवांना समृद्ध करित गावखडीजवळ सिंधुसागराला मिळते.या दरम्यान प्रभानवल्ली, साठवली, व गावखडी या ठिकाणी शिवकाळात किल्ले (गढी) उभारण्यात आले आहेत.
मुचकुंद ऋषींची गुहा व पौराणिक कथा :--
गावाच्या डाव्या बाजूला पश्चिमेकडे किमान अर्धा तास चालत गेल्यावर मुचकुंद ऋषींची गुहा लागते. गुहेकडे चालत जाताना पायाल जळू चिकटून रक्त शोषून कधी मोकळ्या होतात, हे कळत नाही. म्हणून चालताना काळजी घ्यावी लागते. महाभारतात क्रोधिष्ट आणि आगीचा गोळा म्हणुन प्रसिद्ध पावलेल्या मुचकुंद ऋषींच्या गुहेजवळ गेल्यावर कालयवन दानवाला भगवान श्रीकृष्णाने मुचकुंद ऋषींद्वारे भस्मसात केले होते. त्या कथेच्या आठवणीला उजाळा मिळतो.
मांधाता व मुचकुंद :-
मांधाता (संस्कृत मान्धातृ) हा प्राचीन काळी होऊन गेलेला, इक्ष्वाकू वंशातील (सूर्यवंशातील) एक प्रसिद्ध राजा होय. त्याचा उल्लेख अगदी ऋग्वेदामध्येही सापडतो. मांधात्याच्या वडिलांचे नांव यौवनाश्व होते. ऋग्वेदातील एक सूक्तकर्ता (१०.१३४) ऋषी हा मांधाता यौवनाश्व आहे. महाभारत आणि पुराण साहित्यामध्ये येणाऱ्या उल्लेखांनुसार, कृतयुगात होऊन गेलेला युवनाश्व हा राजा पुष्कळ काळ निपुत्रिक राहिला होता. पुत्रप्राप्तीकरिता यज्ञ करण्याचेही त्याने ठरविले. एके रात्री तहानेने व्याकुळ झाला असता, अग्निशाळेत प्रवेश करून त्याने तेथील पाणी प्राशन केले. अर्थातच, त्याने हे कृत्य करताना केवळ आपल्या तहानेचा विचार केला होता; परंतु आपण कोणते पाणी पीत आहोत, ते जिथे आहे (अग्निशाळेत), तिथून घेण्यापूर्वी ऋषींना सांगून ते घ्यावे, इत्यादी विचार त्याने केला नाही. कालांतराने ऋषींना ही गोष्ट समजली आणि ते आश्चर्यचकित झाले. त्याचे कारण असे होते, की ते पाणी गर्भधारणा करून देणारे होते. एखाद्या स्त्रीने त्याचे प्राशन केले असता ती गर्भवती झाली असती; परंतु आता युवनाश्वानेच ते पाणी प्यायले होते. ऋषींना भीती होती, की स्त्री असो अथवा पुरुष, पाणी आपली दिव्यशक्ती दाखवेलच.
अर्थातच, त्या जलप्राशनाच्या परिणामस्वरूप राजाच्याच पोटात गर्भ वाढू लागला. सर्वांना हा प्रकारच अद्भुत आणि अतर्क्य असल्याने, पुढे जाऊन त्याची प्रसूती कशी करावी, हेदेखील कोणाला उमगेना. शेवटी युवनाश्व राजाच्या डाव्या कुशीतून गर्भ बाहेर काढावा लागला. जन्मानंतर मुलगा रडू लागला. त्या बाळाची भूक कशी आणि कोणी भागवावी, हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी साक्षात इंद्र त्या ठिकाणी आला आणि त्याने 'मां धाता', म्हणजे माझ्याकडून (दूध) पी असे सांगितले आणि आपले बोट पुढे केले. बाळाने बोट चोखणे सुरू केले असता, त्या बोटातून अमृतोपम दुधाची धारा स्रवू लागली आणि ती पिऊन बाळ तृप्त होऊ लागले; त्यामुळे त्या बाळाचे नावच मांधाता असे ठेवले गेले. स्वर्गीय दुधाची प्राप्ती झाल्यामुळे, अल्पावधीतच बाळाची अतिशय वृद्धी होऊन, तो एक किशोरवयीन तरुण बनला. शिवाकडे असलेले आजगव धनुष्य त्याला प्राप्त झाले. कालांतराने तो राजा बनला. केवळ इच्छा व्यक्त करण्याचा अवकाश, तिची पूर्ती होत असल्याने, आपल्या दिव्य शक्तींच्या साह्याने त्याने लवकरच जवळपास सर्व पृथ्वी आपल्या एकछत्री अंमलाखाली आणली. पुढे स्वर्गावर राज्य करण्याची मनीषा त्याला झाली; परंतु इंद्राच्या सांगण्यानुसार पूर्ण पृथ्वीची मालकी त्याच्याकडे नव्हती. लवणासुराचे राज्य त्याला मिळणे बाकी होते. ते प्राप्त करण्यासाठी त्याने लवणासुरावर स्वारी केली. लवणासुराने शिवाकडून मिळालेल्या अजिंक्य अशा त्रिशूलाच्या मदतीने मांधात्यास ठार केले.बौद्ध साहित्यातही मांधात्याचा चक्रवर्ती सम्राट म्हणून उल्लेख येतो. तो सात रत्नांचा अधिपती होता. उजव्या हाताचा स्पर्श करून त्याने डावा हात उंचावला असता, त्याच्या पायाशी आकाशातून रत्नांचा वर्षाव होई, अशी कल्पना आहे.
मुचकुंद, ,कालयवन व भगवान श्रीकृ़ष्ण :-
मांधात्याचा विवाह यादवराजा शशबिंदू याची कन्या बिंदुमती हिच्याशी झाला. मांधात्याच्या पुरुकुत्स, मुचुकुंद आणि अंबरीष अशा तीन मुलांचा उल्लेख आपल्याला सापडतो. त्यांपैकी मुचुकुंदाची कथा वैशिष्ट्यपूर्ण आहे.
कंसवधाचा बदला घेण्यासाठी जरासंधाने अनेकवार मथुरेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सतरा हल्ल्यांचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, कालयवन नामक राजाच्या मदतीने त्याने पुन्हा आक्रमण केले. कालयवनाला रणांगणावर कधीही पराभव न होण्याचा वर प्राप्त झाला असल्याने, त्याने साहाय्य केले असता विजय निश्चित मिळण्याची जरासंधाला खात्री होती. याची कृष्णालादेखील कल्पना असल्याने, कालयवन आक्रमण करणार असल्याचे समजल्यावर, त्याने रातोरात द्वारका नगरी वसविली आणि मथुरेतील सर्व नगरवासीयांना तेथे हलविले. युद्धाचे दिवशी सकाळी कृष्ण एकटाच मथुरानगरीच्या द्वारी हजर झाला. कालयवन समोर आल्यावर, कृष्णाने रणांगणावरून पळ काढला. यावरूनच कृष्णाला रणछोड हे नाव प्राप्त झाल्याचे मानले जाते. आपल्याला घाबरून कृष्ण रणांगणातून पळून चालल्याच्या समजुतीने कालयवन भलताच खूश झाला आणि त्याने कृष्णाचा पाठलाग सुरू केला. कृष्ण धावत एका पर्वतावर गेला आणि एका गुहेत प्रवेश केला. तेथे झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर आपला शेला टाकून, कृष्ण एका कोपऱ्यात लपून बसला. काही वेळाने तेथे येऊन पोहोचलेल्या कालयवनाने झोपलेली व्यक्ती कृष्ण असल्याचा अंदाज अंगावरील शेल्यावरून केला आणि जोरात लत्ताप्रहार करून त्याला उठविले. झोपमोड झाल्याने क्रोधायमान झालेल्या त्या व्यक्तीने उठून दृष्टिक्षेप टाकल्याबरोबर, कालयवनाचे भस्म झाले.ही झोपलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, मांधात्याचा पुत्र मुचकुंद होती. मुचकुंदाला त्यानंतर विष्णुस्वरूपात दर्शन देऊन कृष्णाने उपदेश केला. युगांतर झाले असल्याने, मुचुकुंदाच्या काळचे जग आता पार बदलले होते. मुचुकुंदालादेखील पुन्हा संसारात पाऊल ठेवण्याची इच्छा उरली नव्हती. भगवान विष्णूच्या दर्शनाने त्याच्या सर्व मनीषा पूर्ण झाल्या होत्या आणि आता फक्त मुक्ती मिळावी, एवढीच इच्छा बाकी होती. कृष्णाने मुचुकुंदास बद्रिकेदारी जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. त्यानुसार राजा मुचुकुंद तपश्चर्या करू लागला आणि यथावकाश मुक्त झाला. मुचुकुंदाच्या दृष्टिक्षेपाने कालयवन नष्ट होण्याच्या या घटनेचे मूळ खूप पूर्वी, त्रेतायुगात घडलेल्या गोष्टीत होते.
एकदा स्वर्गावर असुरांनी हल्ला चढविला असता, देवांच्या साह्यासाठी मुचुकुंद स्वर्गलोकी गेला. तेथे वर्षभर युद्ध करून त्याने असुरांचा पराभव करीत मोठाच पराक्रम गाजवला. असुरांवर विजय मिळाल्यानंतर प्रसन्न झालेल्या इंद्राने मुचुकुंदाला वरदान देऊ केले. पृथ्वीवर परतण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मुचुकुंदाच्या असे लक्षात आले, की पृथ्वीवर त्याचे राज्य आता अस्तित्वातच नव्हते. त्याचे कुटुंबीयही त्याला दिसेनात; त्यामुळे व्यथित झालेल्या मुचुकुंदाचे सांत्वन करीत इंद्राने त्याला सांगितले, की स्वर्गातील एक दिवस हा पृथ्वीवरील एका वर्षाइतका असतो. इतके दिवस युद्ध करण्याकरिता मुचकुंद स्वर्गात राहिला होता, तेव्हा पृथ्वीवर कैक वर्षे उलटून गेली होती. काळाच्या ओघात अनेक बदल घडून गेले होते. मुचुकुंदाने अशी इच्छा व्यक्त केली, की अनेक दिवस युद्ध करून थकल्याने आता त्याला दीर्घ काळ झोप हवी आहे. जो कोणी त्याला झोपेतून उठवेल, तो तत्क्षणी जळून नष्ट व्हावा आणि त्यानंतर मुचुकुंदास विष्णुदर्शन घडावे. इंद्राने तसा वर तत्काळ दिला. तोच मुचकुंद एका गुहेत जाऊन शेकडो वर्षे झोपला होता. हा वृत्तांत जाणणाऱ्या कृष्णाने मोठ्या युक्तीने रणांगणावर अजिंक्य असलेल्या कालयवनास त्या गुहेत आणून मुचुकुंदाच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने ठार करविले.
आपल्या अलौकिक तेज सामर्थ्याच्या बळावर कालयवनाला ज्या गुहेत मुचकुंद ऋषीनी भस्मसात केले या घटनेची साक्षीदार असलेली इतिहासातील ही प्रसिद्ध गुहा मुचकुंद ऋषींची गुहा म्हणून प्रसिद्ध पावली. माचाळ गावाच्या पश्चिमेस एका उंच डोंगरकड्यावर ही गुहा असून ग्रामस्थांनी या गुहेमध्ये श्रीकृष्ण ,मुचकुंद ऋषी व कालयवनाच्या पाषाण मुर्ती स्थापिल्या आहेत.या ठिकाणी त्याच काळातील महादेवाचे छोटेसे मंदिर असून महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो.या उत्सवाला कोल्हापूर,सांगली,साखरपा,देवरुख, लांजातील भाविक पर्यटकांसह मुंबई व चेन्नई स्थित असलेले माचाळवासीय चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. या ठिकाणावरुन दिसणारे विलोभनीय सौंदर्य आणि सूर्यास्त भुरळ घालतो. या ठिकाणी आगामी काळात भगवान श्रीकृष्णाचे भव्य मंदिर, श्रीकृष्ण स्टॅच्यू, या इतिहासप्रसिद्ध कथेची माहिती देणारे म्युझियम उभारल्यास लाखो पर्यटकांचा ओढा माचाळकडे वळेल.इतकी ताकद या ठिकाणी असल्याचे सातत्याने जाणवते.
विशाळगड ट्रेकिंग :-
किल्ले विशाळगड :-
माचाळाच्या पूर्वेस पाच किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात कोकण प्रांतातील ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे आणि धार्मिक ठिकाण म्हणजे किल्ले विशाळगड वसला आहे.पन्हाळगडाच्या वेढ्यावेळी गडावर अडकून पडले असताना छत्रपती शिवरायांना सुरक्षित असा वाटणारा किल्ला म्हणजे विशाळगड उर्फ खेळणा.
किल्ले विशाळगड समुद्रसपाटीपासून 3300 फूट उंचीवर वसला असून पूर्व आणि पश्चिम बाजूने गडावर येण्यास दोन मार्ग आहेत.माचाळ गावातून दक्षिणेकडे घोड्याचा टाप या ठिकाणाहून एक दरी उतरून कोकण दरवाजामार्गे विशाळगडावर पोहोचता येते. त्यासाठी किमान एक तासाची पायपीट करावी लागते. मात्र हा अनुभव सह्याद्रीच्या रांगड्या रूपाची जाणीव करून देतो.विशाळगडच्या पश्चिमेकडे असलेल्या कोकण दरवाजा या मार्गे माचाळहून वर्षानुवर्षे लोक पायी चालत विशालगडला जातात.हा मार्ग तसा खडतर आहे.कोकणातून माचाळच्या दिशेने आलेली ही वाट फारच अवघड असून अनेक तरुण हौशी मंडळी या मार्गाने साहसी पदभ्रमणाचा थरार अनुभवतात.
दुसरा मार्ग म्हणजे पुर्वेकडील मार्ग होय.ज्याचा वापर कोल्हापूर, ,मलकापूर व आंबा मार्गे येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात करतात. विशाळगडाच्या चहुबाजूने खोल दर्या असून अरुंद पायवाटेने गडावर गडावर जावे लागते. गडाच्या पायथ्यापासून दृष्टिक्षेपास येणारा मुंढा दरवाजा आपणास बिकट मार्ग चढून येण्यास प्रेरित करतो. इंग्रजांनी 1844 च्या दरम्यान गडावरील प्रमुख ठिकाणे नष्ट केली आहेत.या किल्ल्यानेराजा भोज दुसरा यापासून ते १८४९ पर्यंत बरीच मोठी उलाढाल पाहिली.इतकेच नव्हे तर राजाराम महाराज चंदीस असताना महाराष्ट्राची राजधानी विशाळगड हीच होती.
गडावर 350 हुन अधिक पायऱ्या चढून जावे लागते. विशाळगडावर बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे बंधू फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी आहेत. महाराजांनी विशाळगडावरूनच आपण सुखरूप पोहोचलो असल्याचा इशारा देणाऱ्या पाच तोफा उडून बाजीप्रभूंना सुचित केले होते. येथून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर बाजीप्रभूंनी शर्थीचे प्रयत्न करून अडवलेली पावनखिंड आहे. गडावर अहिल्याबाई होळकर समाधी , बावनसती माळ ,पाताळनगरी, डीकमल, गंजीमाळ, भूपाळतळे, प्रशस्त असे महादेव मंदिर, मारुती व ध्यान मंदिर, वेताळ व तास टेकडी, कडेलोट व हजरत पीर मलिक रेहान अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. विशाळगड व माचाळच्या पायथ्याशी प्रभानवल्लीच्या घनदाट जंगलात शिर्के व शंकरराव मोरे यांनी बहामनी मलिक उत्तुजारला गनिमी काव्याचा प्रयोग करुन ठार केले.मराठ्यांच्या इतिहासातील गनिमि काव्याचा हा पहिला प्रयोग मानला जातो. हौशी पर्यटकांनी विशाळगडचा कोकण दरवाजा पाहून माघारी येणे चांगले मात्र गिर्यारोहणाची आवड व तयारी असलेल्या पर्यटकांनी माचाळहून विशाळगडला जाणे ही अनूभूती आवर्जून घ्यावी अशीच आहे.यासाठी मात्र सोबत प्रशिक्षित मार्गदर्शक हवा.
यासोबतच भिश्याचा कडा ,कोडबन हीदेखील आवर्जून पाहावी,त अशी स्थाने आहेत. माचाळच्या विस्तीर्ण पठारावर लपेटलेल्या धुक्याच्या शालीत कुठेही थांबले तरी स्वर्गात आल्याचा भास होतो. इथल्या पठारावरून खाली पाहिल्यानंतर हजारो फूट खोल दऱ्यांचे दृश्य अंगावर शहारे आणते.
ग्रामीण संस्कृती :-
माचाळला जोडणारा रस्ता २०२१ मध्ये पूर्ण झाल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळच्या विकासकामाला आता गती येईल. जगापासून आजवर डिस्कनेक्ट असलेले माचाळ जोडण्यास मदत होईल, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ७० वर्षे तेथे पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नसल्याने तेथील सात्त्विक, पवित्रतेची अनुभूती देणारा निसर्ग आणि १००-२०० वर्षांपूर्वीचे कोकण कसे होते, हे सांगणारी वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण संस्कृती आजही टिकून आहे. गावातील उतरत्या छपराची चौपाखी कौलारू घरांची रचना, आतील मातीच्या जाडजूड भिंती, जुन्या लाकडी चौकटीवर (खांबावर) असलेले आडे, सारवलेल्या भिंती हे सर्व घरे १५० ते २०० वर्षे जुनी असल्याचा पुरावा देतात. प्रचंड घोंगावणाऱ्या वाऱ्यापासून घरांचे आणि माणसांचे रक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक घर चारही बाजूंनी गवताने कुडलेले आहे. यासाठी गवत आणि कारवीच्या काठ्या यांना बांबूच्या कामठ्यांनी जोडताना वनस्पतीच्या दोरांनी बांधणी केलेली सलटी केली जाते. या सलट्यां घराच्या चारही बाजूंनी लावल्या जातात. पावसाळा आणि हिवाळ्यातील आठ महिन्यांच्या काळात पडत असलेल्या थंडीपासून रक्षण व्हावे, म्हणून इथल्या प्रत्येक घरात आजही आपल्याला ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेला ‘पिरसा’ पाहायला मिळतो. काही घरात पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे असे दोन दोन ‘पिरसे’ दिसतात.
माचाळ हे मुचकुंद ऋषींचे गाव असल्याने तेथील ग्रामस्थ आपण ऋषी कुळातील असल्याचे अभिमामाने सांगतात. ऋषींचे कूळ असलेल्या गावात शेतीचे काम करण्यासाठी बैलाचा वापर केला जात नाही. माचाळला ही परंपरा कायम असून तेथील शेतकरी शेतीच्या नांगरणीसाठी रेड्याचा वापर करतात. ‘रेड्याचे जोते’ हे माचाळचे आणखी एक पारंपरिक वैशिष्ट्य! गावात सुमारे १००-११० घरे असून पाटील, मांडवकर, गोवळकर, भातडे, भिसे, भोसले, निबदे, नामे या आडनावाची कुटुंबे गुण्यागोविंदाने राहतात. माचाळ गावात असलेल्या मध्यवर्ती रस्त्याच्या उजव्या वरच्या बाजूस मांडवकर तर खालच्या बाजूला पाटील आडनावाची कुटुंबे राहतात. ईलर्निंगच्या काळात गावात आठवीपर्यंतच्या शिक्षणाची जेमतेम व्यवस्था असून मुलांना पुढील शिक्षणासाठी साखरपा, लांजा गाठावे लागते. अजूनही तेथे कोणत्याही कंपनीचा टॉवर उभारला गेला नसल्याने मोबाइलला रेंज नाही. पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोबाइल आणि इंटरनेट गरजेचे असले तरी सद्यःस्थितीत धावपळीच्या गतिमान युगात डिस्कनेक्ट जीवनाचा थोडा काळ तेथे आनंद घेता येतो.
माचाळच्या पठारावर ग्रामस्थ मुख्यत्वे गव्हाचे पीक घेतात. सोबत भात, नागली ही पिकेही घेतली जातात. दुर्गमतेमुळे रोजगाराची फारशी संधी नसल्याने ग्रामस्थ तास-दीड तासाची पायपीट करून विशाळगडावर जातात. तेथे दूध, दही, लाकडांची मोळी विकतात. येत्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून निश्चितच माचाळचा कायापालट होणार असल्याने ही परिस्थिती बदलली जाईल. मात्र सद्यःस्थितीत गावातील तरुण उपजीविकेसाठी मुंबई आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्ये स्थायिक झाले आहेत. पाटील कुटुंबातील तरुण चेन्नईमध्ये सुवर्णव्यवसायात स्थिरावले असल्याचे गणेशोत्सवानिमित्ताने गावी आलेल्या धोंडू पाटील यांनी सांगताच त्यांचे कौतुक वाटले.
एकशेपाच वर्षांचे जोडपे :
माचाळला प्रदूषणमुक्त निसर्गसौंदर्य आणि हिरवाई लाभल्याने येथील संघर्षमय जीवनपद्धतीतसुद्धा ग्रामस्थांचे सरासरी आयुर्मान जास्त असल्याचे दिसून येते. सरासरी आयुर्मान जास्त असलेले गाव हीदेखील माचाळची ओळख आहे. हिमालयाच्या कुशीत जशी शंभरी पार केलेली माणसे आपल्याला पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे माचाळला थोडेथोडके नव्हे तर तब्बल १०५ वर्षांचे एक जोडपे आहे. सखाराम रावजी भातडे आणि सौ. लक्ष्मीबाई सखाराम भातडे असे त्याचे नाव! त्यांना तीन मुले, तीन मुली, वीस नातवंडे आणि पतवंडे असा भला मोठा परिवार असून या आजी-आजोबांचा उत्साह अजून दांडगा आहे. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी शंभरी ओलांडली आहे, यावर विश्वास बसत नाही. गावातील शिमगा आणि गणेशोत्सवात गेली सत्तर वर्षे सखाराम आजोबा ताशा वाजवण्याचे काम करीत आहेत. यंदा १०५ व्या वर्षीही त्यांनी ही परंपरा मोडलेली नाही. माचाळच्या पर्यावरणीय निरोगीपणामुळेच तेथे दीर्घायुष्य लाभलेली अशी अनेक माणसे आपल्याला भेटतात. त्यांच्याशी संवाद साधला की जीवन जगण्याचे सोपे तत्त्वज्ञान आपल्यासमोर उलगडते. माचाळ पर्यटनाला आलेल्या पर्यटकांनी १०५ वर्षांच्या या जोडप्याला आवर्जून भेट देऊन त्यांच्या दीर्घायुष्याचे गुपित समजून घेतले पाहिजे. माचाळभेटीत त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह टाळता येत नाही.
ग्रामदैवत श्री देव भैरी :--
माचाळ गावात रस्त्याच्या उजवीकडे मांडवकरांची वस्ती लागते. या वस्तीतून जाणाऱ्या पाखाडीने साधारण १० ते १५ मिनिट अंतर कापल्यावर घनदाट देवराई दृष्टीस पडते. आकाशाची स्पर्धा करणाऱ्या या वनराईतील उंचच-उंच वृक्षवल्लींच्या मधून जाणाऱ्या पाखाडिचे दृश्य भान हरवायला लावते.या पाखाडीने पुढे गेल्यावर देवराईच्या बरोबर मध्यभागी उंचावर वसलेले माचाळवासीयांचे श्रद्धास्थान अर्थात ग्रामदैवत श्री देवभैरीचे मातीचे शाश्वत कोकणचे प्रतिबिंब दाखवणारे मंदिर आहे.देवराईच्या हिरव्यागार रंगात लाल मातीचे देवालय पाहून काही क्षण लांबूनच हे मनोरम दृश्य येणारा प्रत्येक भाविक वा पर्यटक मनात साठवून घेतात.पुढे नकळत पाऊले मंदिराकडे वळतात. या मातीच्या इको हिलस्टशन उघड्या सभागृहातच मध्यभागी ग्रामदैवत भैरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे.ग्रामदेवत भैरीसोबत अजून काही देवतांच्या मूर्ती मंदिरात आहेत.गावातील प्रत्येक उत्सवाची सुरवात श्री देव भैरीला नमन करून केली जाते.या मंदिरात थंडिपासून संरक्षण व्हावे यासाठी पिरसा (शेकोटी) ची व्यवस्था केली आहे. ग्रामदैवत भैरीच्या मूर्तीजवळच गाभाऱ्याच्या लाकडी मंडपात जवळच एक ते दीड फूट उंचीची सुंदर दीपलक्ष्मीची मूर्ती लक्ष वेधून घेते. गावातील एका माहेरवाशीणीने आपला नवस पूर्ण झाल्याच्या आनंदात ही दीपलक्ष्मीची सुंदर मूर्ती मंदिराला भेट दिली आहे.
मंदिराच्या आवारात दुसरे एक मातीचेच मंदिर असून गावावर आलेल्या संकटावेळी गावातील एका कर्तृत्ववान महिलेने त्याचा धैर्याने सामना केला. यावेळी तिला आपला एक हात गमवावा लागला.या सात्विक महिलेच्या सन्मानाप्रित्यर्थ हे मंदिर उभारण्यात आले असून सद्यस्थितीत मूर्ती थोडी भग्न झाली आहे.या मंदिरात प्रकाशनिर्मितीसाठी केलेली भिंतीतील त्रिकोणी झरोक्याची व्यवस्था पाहण्याजोगी आहे.
माचाळची देवराई :-
माचाळ गावातील महत्वाचे ठिकाण म्हणजे देवराई होय.घरासाठी जसं अंगण तसं गावासाठी देवराई हे जाणणा-या माचाळवासीयांनी आपली समृद्ध देवराई आजवर जपली आहे.ग्रामदैवत श्री देव भैरीची प्रतिष्ठापना त्याकरिताच देवराईत करण्यात आली असावी.गावाच्या दक्षिणेकडे असलेल्या डोंगरावर असलेल्या या घनदाट देवराईत प्राणी, पक्षी,अौषधी वनस्पती व वृक्षसंपदेचा अमूल्य ठेवा आहे.माचाळला हिरवंगार ,ताजंतवानं ठेवणारी ही देवराई पक्षी व प्राणी अभ्यासक-निरिक्षक व देवराईचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी उत्तम जागा आहे.
वन्यजीवन :-
माचाळ पठारावर सर्वसाधारणपणे खुरटी आणि कमी उंचीची झाडे दिसतात. आंबा, काजू, फणस अशासारखी कोकणात विपुल असलेल्या झाडांची वाढ माचाळला होत नाही, हे या भूमीचे आणखी एक भौगोलिक विशेष! चार-पाच वेगवेगळ्या उंचीच्या औषधी जांभळाची झाडे तेथे आहेत. तेथील देवराई जपण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केलेला असून कधीही न पाहिलेल्या असंख्य फुलपाखरांच्या, पक्ष्यांच्या दर्शनाने मनाला एक वेगळेच समाधान मिळते. गावातील डोंगराच्या बाजूने लाल मोठे खेकडे सापडतात. ब्राह्मणी, बेहडा, खारवी, जंगली कढीपत्ता अशा अनेक औषधी वनस्पती विपुल प्रमाणात दिसून येतात.
राजधनेशचा वावर :-
मिनीमहाबळेश्र्बर संबोधिलेल्या हिलस्टेशनच्या स्वर्गीय निसर्गाची एकदा अनुभूती घेतली की पुन्हा पुन्हा पाउले माचाळकडे वळतात.माचाळ गावात प्रवेश करतानाच आमचे स्वागत करत मुचकुंद ऋषींच्या गुहामार्गाकडे झेपावलेला ग्रेट हॉर्नबिल (राजधनेश किंवा गरूडधनेश) आम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला होता.याचाच अर्थ इथे मोठ्या प्रमाणावर धनेश सारख्या दुर्मिळ पक्षाचे वास्तव्य आहे.हे लक्षात घेऊनच माचाळच्या पायथ्याशी असलेल्या पालू गावात विजय बेंद्रे नामक पर्यावरणस्नेही तरुण “हॉर्नबिल स्टे फॉरेस्ट होम”ची निर्मिती करत आहे. माचाळमधील दुर्मिळ असलेल्या ग्रेट हॉर्नबिलचा वावर पाहून पर्यटक जास्त सुखावतील. मजबूत बाकदार पिवळसर रंगाच्या आकर्षक चोचीच्या या पक्ष्याच्या अधिवासामुळे सह्याद्रीतल्या माचाळ पठारावर दुर्मिळ पक्ष्यांचा असलेला वावर सिद्ध झाला आहे.तसेच माचाळच्या पायथ्याशी वसलेल्या सालपे गावातील एक घाग नामक तरूणाने देखील कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे.
सापड लोककला :-
रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेली गावातील तरुण मंडळी गणेशोत्सव, शिमग्याच्या सणाला गावात हमखास येतात. याचे कारण परंपरा जोपासणारी वैशिष्ट्यपूर्ण सापड नृत्यकला. खरे तर उंचच उंच गिरीशिखरांवरच्या एकाकी वाड्या-वस्त्यांवरच्या मंदिरांची एक संस्कृती असते, त्यांचे काही नीतिनियम असतात. माचाळ गावात आपल्याला ते पाहायला मिळतात. गावात ब्राह्मणदेव, वडलोबा, विठ्ठलाई, भैरी, वाघजाई, जुगाई, उदगिरीदेवी आणि मालक देव असे आठ देवांचे एकत्रित मंदिर असून गावच्या दगडी चौकात एका चौथऱ्यावर त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणेशोत्सवात गावचे मुख्य गावकर पांडुरंग धोंडू पाटील यांच्या मोठ्याशा मध्यवर्ती घरातील ओट्यावर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीन दिवसांचा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवासाठी स्थानिक गावकरी पाटील यांच्या घरातील ओटीमागील मोठ्या भिंतीवर रंगीत खडूंनी सुबक पौराणिक चित्रे काढतात. आजच्या डिजिटल जमान्यातील डिजिटल बॅनरही फिका पडेल इतकी ही चित्रे उठावदार असतात. या भिंतीला लागून गावातील आठ देवतांची रूपे (चांदीचे मुखवटे) लावली जातात आणि मग सुरू होते वैशिष्ट्यपूर्ण जाखडी लोकनृत्य. या कार्यक्रमाची सुरवात ‘सापड’ नृत्याने होते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्यात सहभागी होऊन वर्षभराच्या कामासाठी बळ मिळवण्यासाठीच महानगरात गेलेल्या तरुणांची पावले माचाळला वळतात. माचाळचा गणेशोत्सव आणि सापडनृत्य हे कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी गोल्डन पॅकेज ठरू शकेल.
विविधरंगी फुलपाखरू:-
गावातील मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात एका दगडावर वाघाचे शिल्प असून याविषयी माहिती घेतली असता डोंगरदऱ्यातील अरण्यपुत्रांची “वाघबारस” ही परंपरा तेथे साजरी केली जाते.
थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळचा विकास करताना हे सारे वेगळेपण जपावे लागेल. यासाठी माचाळच्या संवेदनाशील पर्यावरणाला हानिकारक ठरेल, अशा गोष्टी सुरवातीपासूनच रोखण्याकडे लक्ष पुरवावे लागेल. रायगड जिल्ह्यातील माथेरान हे संपूर्ण आशियातील एकमेव गिरीस्थान आहे, जेथे खासगी वाहनांना प्रवेश नाही. वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणून जपल्यानेच आजही माथेरान प्रदूषणमुक्त आहे. त्याच धर्तीवर माचाळची वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणून जाहीर करावे लागेल. डोंगरी विभागातून माचाळची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी लागेल. गावात रस्ता पोहोचला असला, तरी गावात प्रवेश करण्यापूर्वी लागणाऱ्या सपाट माळरानापर्यंतच खासगी वाहनांना प्रवेश दिला गेला पाहिजे.
भिश्याचा कडा :-
मुचकुंदि नदी ज्या पठारावरून प्रभानवल्लीच्य दिशेने खाली द-यांमध्ये झेपावते तिला भिश्याचा कडा संबोधतात.या पठारावरून ५०० फुट खोल दरित कोसळणाऱ्या मुचकुंदी नदीचे पाणी वा-याच्या प्रचंड झोतामुळे मागे येते.यामुळे इथे रिव्हर्स वाॅटरफाॅलचा आनंद लुटता येतो. सोबतच कोडबन हीदेखील आवर्जून पहावीत अशी स्थाने आहेत.माचाळच्या विस्तीर्ण पठारावर लपेटलेल्या धुक्याच्या शालीत कुठेही थांबले तरि स्वर्गात आल्याचा भास होतो.इथल्या पठारावरुन खाली पाहिल्यानंतर हजारों फूट खोल दऱ्यांचे दृश्य अंगावर शहारे आणते.
व्हिजीट विलेज :-
माचाळचा ग्रामीण बाज जपला पाहिजे तरच माचाळमधील मातीच्या पाऊलवाटांवर पाऊस सुरू झाल्यावर पावसात चालण्याचे स्वर्गसुख अनुभवता येईल. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत गारठल्यानंतर गावातील घराघरात असलेल्या पिरशासमोर बसून शेकोटीचा आनंद घेता येईल.'पिरसा' ग्रामीण लोकजीवनाचे अविभाज्य आयुध आहे.
रांजणखळग्याचा थरार :-
माचाळ पर्यटनाचे भविष्यातील माॅडेल :-
माचाळला येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करणारे भव्य प्रवेशद्वार उभारून तेथेच लक्षवेधक अशा भगवान श्रीकृष्ण आणि मुचकुंद ऋषींच्या भव्य पुतळ्यांची निर्मिती करावी लागेल. माचाळला आलेला पर्यटक गावात राहावा, यासाठी येथील कला, संस्कृती जागतिक पर्यटकांसमोर मांडण्यासाठी नियोजित कलामहोत्सवांचे आयोजन करावे लागेल. ग्रामीण संस्कृतीचे आणि येथील स्वर्गीय निसर्गाची अनुभूती देणारे कल्पक संग्रहालय उभारावे लागेल. माचाळच्या विस्तीर्ण पठारावर असलेली विविध पर्यटन ठिकाणे पक्क्या पाखाड्या बांधून जोडावी लागतील. स्थानिक तरुणांना माचाळ पर्यटनदूत म्हणून प्रशिक्षण द्यावे लागेल. मुचकुंद ऋषींच्या गुहा परिसरात मुचकुंद ऋषी आणि कालिया असुराचा वध, भगवान श्रीकृष्ण आणि मुचकुंद ऋषींची भेट हे प्रसंग पर्यटकांसमोर मांडणाऱ्या छोट्याशा चित्ररूप सफर घडवून आणणाऱ्या ‘गिरीस्थान कलाकेंद्राची’ निर्मिती करता येईल. त्यातून ऐतिहासिक, पौराणिक पर्यटनस्थळ म्हणूनही माचाळचा विकास साधता येईल. ‘मुचकुंदी नदी परिक्रमेचा कार्यक्रम आखता येईल. त्याअंतर्गत नदीचे उगमस्थान सहलीच्या माध्यमातूनही पर्यटकांसमोर मांडता येईल. माचाळला गिर्यारोहण, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग, राफ्टिंगसारखे साहसी खेळ सुरू करता येऊ शकतील. माचाळचे पठार नैसर्गिक गोल्फ कोर्सच आहे. पूर्वापार सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशात घोडेस्वारी हे प्रवासाचे साधन होते. तेच साधन पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. सध्या मुंबई, पुण्यासारख्या महानगरी वातावरणात वाढलेल्या मुलांना खेडे कसे असते, हे दाखवण्याचा ‘व्हिजिट व्हिलेज’ हा पर्यटनप्रकार विकसित होत आहे. यासाठीही माचाळ उत्तम पर्याय ठरेल.
एकूणच अशा पद्धतीने माचाळचा विकास साधताना स्थानिक लोकसहभाग महत्त्वाचा असावा. त्यासाठीच माचाळमध्ये स्वातंत्र्याच्या तब्बल ७० वर्षांनंतर रस्ता पोहोचल्यानंतर प्लास्टिक आणि प्रदूषणात वाढ करणाऱ्या, गर्भश्रीमंत निसर्गाची अपरिमित हानी करणाऱ्या पर्यटन विकासाऐवजी स्थानिकांच्या उत्थानाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून हिलस्टेशन माचाळसोबतच निसर्गसमृद्ध माचाळची ग्रामीण संस्कृती जोपासत ती जगापुढे आणणारे पर्यटन साकारावे लागेल. तरच स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एक आगळेवेगळे माचाळ गिरीस्थान जगाच्या पर्यटन नकाशावार येईल.
विजय हटकर
मुक्त पत्रकार-लेखक-संपादक
(संपर्क : ८८०६६३५०१७)
No comments:
Post a Comment