Wednesday, September 27, 2023

जागतिक पर्यटन दिन विशेष

 कोकण पर्यटनात लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊया - विजय हटकर

 



जागतिक पर्यटन दिनानिमित्त ''कल्पना काॅलेज आॅफ हाॅटेल मॅनेजमेंट ,लांजा' या कौशल्याधारित शिक्षण देऊन कोकणातील विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करू पाहणाऱ्या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात 'कोकणातील पर्यटन क्षेत्रातील नव्या संधी ' या विषयावर जवळपास सव्वा तास विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोकणातील महत्वाच्या पर्यटनस्थळांसोबतच लांजा तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण माचाळ ,जावडे येथील ब्राम्हणी लेणी, मुचकुंदी परिक्रमा, ऎतिहासिक-सांस्कृतिक -हरित वनश्रीने परिपुर्ण डेस्टिनेशन प्रभानवल्ली-खोरंनिनको ,कोट येथील कातळशिल्पे, विविध महत्वपूर्ण मंदिरे,एकाश्म मंदिरे, देवराया,कृषी पर्यटन केंद्रे आदि शक्तिस्थळांची ओळख या क्षेत्रात आगामी काळात काम करणाऱ्या युवाशक्तिला देत लांज्याच्या पर्यटन विकासासाठी निर्माण केलेल्या लवेबल लांजा, रत्नसिंधू टुरीझमचे गत दोन वर्षातील कामाची माहिती दिली. तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या प्रसिद्धीसाठी सर्वप्रथम ती 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी प्रोत्साहन दिले.


     कोकणातील आत्मनिर्भर बनु पाहणा-या तरुणाईने नोकरीच्या मागे न  धावता स्वतः च्या स्वप्नांवर विश्र्वास ठेवत दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्कता,मेहनतीच्या जोरावर उद्यमशील कल्पनांना बळ द्यावे यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करावा असे आवाहन यावेळी केले.सोबत UNWTO च्या यंदाच्या थीमप्रमाणे हरित शाश्वत कोकण च्या रक्षणासाठी इथल्या लाल मातीवर प्रेम करणा-या प्रत्येकाने कटिबद्ध  राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.


        गेले दशकभर लांज्याचा पर्यटन विकासासाठी काम करताना आलेले अनुभव कथन करताना कोकणात राहूनही  यशस्वी  होत सातासमुद्रापार पोहचता येते याचे प्रतिक असणारे लांज्याचे सुपुत्र निलेश सुवारे, योगेश सरपोतदार, जयवंत विचारे,अमर खामकर आदींची माहिती देत सुरवातीचा काळ कोकणाबाहेर दहा-पंधरा वर्षे कार्यरत राहून तिथल्या समृद्ध अनुभवाच्या जोरावर कोकणातील लांजा तालुक्याच्या विकासासाठी काम करित कोकण पर्यटनात लवेबल लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊया ' असे आवाहन केले.यावेळी व्यासपीठावर कल्पना काॅलेज आॅफ हाॅटेल मॅनेजमेंट चे संस्थापक मंगेश चव्हाण सर, प्राचार्य विकी पवार सर, चव्हाण मॅडम आदी मान्यवर होते.तसेच हाॅटेल मॅनेजमेंट- हाॅस्पिटॅलिटी चे विद्यार्थी उपस्थित होते.



दै.सकाळ रत्नागिरी आवृत्ती दि.३०/०९/२०२३

पाहता श्रीमुख सुखावले सुख

पाहता श्रीमुख सुखावले सुख..




श्री गणपती ही देवताच ज्ञानाची , सर्व कलांची, विद्येची, प्रतिभेची अन् मानवी जीवनातील शुभंकराची.या वर्षी  आमच्या घरी तिचे आगमन काही कारणास्तव लांबले, मात्र आज गौरी अावाहनाच्या दिवशी बाप्पाची मोठ्या प्रेमाने, आस्थेने ,भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठापना केली.


     कोकणातील संस्कृतीचे भूषण असलेल्या भाद्रपद महिन्यातील घरगुती गणेशोत्सवाचे इथल्या जनमानसात  एक आगळे स्थान आहे.कोकणातील प्रत्येक माणूस या काळात एका वेगळ्याच धुंदित जगत असतो. आज बाप्पाच्या आगमनाने खरं तर लहानग्या विधीसह घरातील सारे अबालवृद्ध आनंदित झाले.मूळ गाव तळवडे येथे आजोबांनी सुरु केलेला परंपरागत गौरी विसर्जनापर्यंत स्थानापन्न होणारा बाप्पा लांज्यात मात्र दिड दिवसाचा झाला अाहे.मात्र त्यातील उत्साह, आनंद कमी झालेला नाही.लहानपणी गणपतीची मूर्ती आम्ही भावंडं निरखून -पारखून पहायचो व तेजस्वी, मनोहारी बाप्पाच्या दर्शनातून " पाहता श्रीमुख सुखावले सुख" असे प्रसन्न वाटायचे.आज कन्या कु.विधी जेव्हा बाप्पाकडे तशी पाहते तेव्हा गावातील कळीजकोपरा व्यापलेले ते  हृदयस्थ दिवस डोळ्यासमोर उभे राहतात.


सुखकर्ता श्रीगणेशाचा उत्सव आणि पुढील काळही आपणा सर्वांना मंगलमय आणि निर्विघ्नतेचा जावो, ही शुभेच्छा.


धाकटी आत्त्या सौ.माधवी मच्छिंद्रनाथ वाटेकर व परिवार श्रींचे दर्शन घेताना..




आमचे चुुुलते मारुती हटकर व जनार्दन भंडारेकाका.



गोपीकुंज ईमारतीत आमच्या बाप्पाचे आगमन.श्रींच्या मनोहारी मूर्तीसह सुरेशदादा शिरवटकर व रमेशदादा शिरवटकर.



महिलामंडळी.


श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत सतिश पवार ,सचिन हटकर,मंगेश हटकर,अक्षय भंडारे ,दशरथ गोसावी.



विसर्जन मिरवणूक. 




विजय हटकर. 
लांजा (रत्नागिरी)