Friday, November 26, 2021

लांज्यातील कोट गावात कोरीव कातळशिल्पांचा समूह.

 झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या सासरी आदिमानवाच्या पाऊलखुणा,लांज्यातील कोट गावात कोरीव कातळशिल्पांचा समूह.

---------------------------------------

सुभाष लाड,विजय हटकर आबा सुर्वे यांच्या शोधमोहिमेला यश

--------------------------------------



       झाशीच्या राणीचे सासर म्हणुन अल्पावधीत प्रसिद्धीस आलेल्या लांजा तालुक्यातील कोट गावात माचपठार नामक कातळसड्यांवर विपुल प्रमाणात कोरीव व देखण्या कातळशिल्पांचा समूह नुकताच प्रकाशात अाल्याने राणी लक्ष्मीबाईचे सासर म्हणून पुढे येणाऱ्या कोट गावाच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

        नुकतेच कोट गावचे माजी सरपंच आबा सुर्वे यांनी कोट गावात कोलधे -कोट गावच्या सीमेलगत असलेल्या "माचपठार" नामक कातळसड्यांवर पांडवकालीन आकृत्या असल्याची बाब राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, पर्यटन अभ्यासक विजय हटकर, महेंद्र साळवी यांच्या निदर्शनास आणुन दिली.हि बातमी समजताच सदर आकृत्या पांडवकालीन नसून कातळशिल्पांचा महत्वाचा ठेवा असावा हा प्राथमिक अंदाज काढून सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड, विजय हटकर कोट गावातील माचपठार या भागाला भेट दिली.यावेळी कोट गावचे सरपंच संजय पाष्टे, माजी सरपंच आबा सुर्वे, प्रणव वाघाटे उपस्थित होते.सदर पठारावरील आकृत्या पाहताच क्षणी हि पांडवकालीन शिल्पे नसून नवाश्मयुगात या ठिकाणी नांदत असलेल्या आदिमसंस्कृतीच्या या पाऊलखुणा अर्थात कातळशिल्पांचा समृद्ध  समूह असल्याचे सुभाष लाड व विजय हटकर यांनी ग्रामस्थांच्या लक्षात आणुन देत या ऎतिहासिक ठेव्याचे महत्व ग्रामस्थांना समजावून सांगितले.

        कोट गावाच्या पूर्वेकडे असलेला कातळसड्याला ग्रामस्थ  माचपठार म्हणून संबोधतात. कोलधे गावातुन कोट कडे जाताना लागणा-या सड्यावर पाष्टे कुटुंबियांच्या एकत्रित जमीनी असुन यालाच पाष्टे मंडळी माचपठार किंवा माचसडा म्हणतात.या ठिकाणी असलेल्या सड्यावर पाष्टे कुटुंबियांनी शेतघरे बांधली असुन पावसाळ्यानंतर पिकाची काढणी झाल्यानंतर झोडणी व मळणी करण्याचे    काम इथे केले जाते.ज्या ठिकाणी ग्रामस्थांनी शेतघरे बांधून भात झोडायला सुरवात केली आहे.त्याच जागेवर अनेक चित्र विचित्र आकृतीरुपी कातळशिल्पांचा अमूल्य खजिना  असून गावक-यांनी या पांडवकालीन आकृत्या असल्याचा समज  करुन घेतल्याने त्याचे संवर्धन केलेले नाही. परिणामी काहि कातळशिल्पांची हजारो वर्षे ऊन वारा पाऊसाचे तडाखे खाल्याने झिज झाली आहे,तर काही शिल्पे सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले.या ठिकाणी राजापूर तालुक्यातील  देविहसोळ गावात आर्यादुर्गा या मंदिराच्या जवळ आयताकृती असलेल्या लोकप्रिय कातळशिल्पाप्रमाणे आयताकृती गुढ भोमितिक रचना ,वाघाचे चित्र,पंजा  तसेच विविध पक्षी, प्राणी,मासे यांच्या प्रतिकृती असुन साधारण १५-२० कातळशिल्पांचा समूह येथे असण्याची शक्यता आहे.

          पुरातत्वीय दृष्ट्या खुप महत्वाची आणि या भागातील आदिम मानवी समुह व त्यांची वसतीस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकतील, अशी कोट सह लांजा तालुक्यातील भडे,हर्चे,लावगण, जावडे  सारख्या  अनेक ठिकाणी कातळशिल्पे आहेत. मात्र, त्यांचे तज्ञांकडुन वाचन होणे, अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे. असे केल्यास कोकण प्रदेशाच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. तसेच, पर्यटनदृष्ट्याही हे स्थळ विकसित केल्यास जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही त्याचा हातभार लागेल. असे मत यावेळी पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी व्यक्त केले. 

          राणी लक्ष्मीबाईचे सासर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऎतिहासिक कोट गावात राणी लक्ष्मीबाईच्या पराक्रमाला साजेसे राष्टीय पातळीचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या  रणरागिणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टचे अधयक्ष सुभाष लाड यांनी कोटमधील कातळशिल्पे पाहिल्यावर आनंद व्यक्त केला तसेच कातळशिल्पांच्या शोधमोहिमेमुळे कोट गावाच्या  ऎतिहासिक महत्वात वाढ झाली असुन कोट गावच्या पर्यटनविकासाठी या नवाश्मयुगातील अप्रतिम कातळशिल्पसमुहाची जपणूक  स्थानिक ग्रामपंचायतीने लोकसहभागातुन केली पाहिजे,असे मत सुभाष लाड यांनी व्यक्त केले.

          

या कातळशिल्प अभ्यासमोहिमेवेळी उपस्थित कोट गावचे सरपंच संजय पाष्टे, माजी सरपंच आबा सुर्वे यांनी या ठिकाणी असलेली शेतघरे व पिकझोडणीसाठी तयार केलेले खळे हटवून याची साफसफाई करुन कातळखोद अभ्यासकांना या कातळशिल्पांच्या अभ्यासासाठी पाचारण करणार असल्याचे सांगितले. सदर जागा रवींद्र सुरेश पाष्टे व पाष्टेबंधूंची असून या शोध मोहिमेमध्ये कोट गावचे रहिवासी आबा सुर्वे, संजय पाष्टे,रवींद्र सुरेश पाष्टे ,अरविंद मांडवकर,  यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे श्री. सुभाष लाड यांनी नमूद केले.






https://kokanmedia.in/2021/11/30/petroglyphsinkot/




साद -प्रतिसाद 

भाग -२

प्रतिसादाला उस्फुर्त कृतीची जोड ---

उक्ती आणि कृती यातील फरक 

लांजा तालुक्यातील कोट गावातील ग्रामस्थांच्या उस्फुर्त सहभागातून अश्मयुगीन कातळशिल्प उजेडात आणण्याचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला.

23 फूट लांब व 10 फूट उंच गवा रेडा, 18 फूट उंच व 6 फूट रुंद पक्षी आपण कधी पाहिला आहे का? आम्ही पाहिला कोट गावात असलेल्या कातळशिल्पांच्या रुपात. आणि हे शक्य झाले ते निव्वळ प्रतिसादाला कृतीची जोड देत कोट गावातील ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे.

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोट गावात जाणे झाले. हे गाव झाशीची राणी लक्ष्मी बाई यांच्या सासरकडचे मूळ गाव म्हणून सर्व ज्ञात आहे. या गावात कातळशिल्प सारखे काहीतरी आहे ही बाब गावचे ज्येष्ठ व्यक्ती शांताराम उर्फ आबा सुर्वे,अरविंद मांडवकर  यांनी निदर्शनास आणली. आणि मग सुरू झाली ती मोहीम. 

ठरल्या वेळेपेक्षा जरा अधिकच उशिरा या गावात पोहचलो. तरीदेखील गावाचे सरपंच श्री संजय पाष्टये आणि काही गावकरी वाट बघत थांबले होते. त्यांचे बरोबर गावच्या जवळच्या भल्या थोरल्या सड्यावरील कातळशिल्प परिसरात पोहचलो. हा परिसर शेतीचे दळे, मांगर, भाताच्या उडव्या, गवताच्या वरंडी, लाकडाच्या मोळ्या अशा गोष्टीने व्यापलेला. मध्येच असलेल्या मोकळ्या  जागेवर शेतीच्या कामासाठी सारवण घालेलेले होते. या सर्वांमधून कातळशिल्प आपले अस्तिव दाखवत होती. खूप मोठ्या प्रमाणात आणि कित्येक वर्ष मानवी हस्तक्षेप या परिसरात होता. या सर्वांतून कातळशिल्प शोधून ती संरक्षित करणे म्हणजे खूपच मोठे आव्हान होते. पण गावाचे सरपंच आणि गावकऱ्यांनी आमच्या हाकेला प्रतिसाद दिला.

जिथे गवताची एक काडी देखील एकडची तिकडे करायची झाली तर रामायण महाभारत घडते तिथे गावकऱ्यांनी स्वत:हून परिसरातील गोष्टी बाजूला करण्याचे ठरविले ही बाब निश्चितच आनंदाची होती.


सर्वांच्या सोयीचा दिवस ठरवून कातळशिल्प साफसफाई मोहीम ठरली. मी, धनंजय मराठे, केदार लेले, मकरंद केसरकर, अजिंक्य प्रभुदेसाई, श्री विजय हटकर आणि योगायोग म्हणजे आमच्या कातळशिल्प शोध संरक्षण आणि संवर्धन या विषयावर शॉर्ट फिल्म करण्याची इच्छा असलेले सायली खेडेकर, राहुल नरवणे आणि त्यांची टीम देखील आम्हाला सामील झाली. ठरल्याप्रमाणे गावात पोहचलो. आम्ही पोचायच्या अगोदरच गावातील आबालवृद्ध, महिला यांची 50 /52 जणांची टीम ठिकाणी हजर होती. खरे तर आम्हाला हा धक्काच होता. 

काय काय करावे लागणार आहे याचा अंदाज होता. जागेवर पोहचल्यावर सर्व गावकऱ्यांशी एकत्र संवाद झाला. कामाची रूपरेषा, काय करायचे आहे आणि काय करायचे नाही याबाबत माहिती दिली. त्यांच्या शंकांचे निरसन केले आणि मग आम्ही सर्वजण कामाला सुरवात केली. भाताच्या उडव्या, गवताच्या वरंडी, भराभर बाजूला होऊ लागल्या, परिसरात पसरलेली माती आणि अन्य बाबी बघता बघता बाजूला झाल्या. एकावेळी 100 पेक्षा अधिक हात काम करत होते. दिलेल्या सूचनांचे पालन करत सर्व गावकरी खूपच सफाईने काम करत होते. त्यांचे काम खरोखरच थक्क करणारे होते. 

एक एक करत कातळशिल्प आपले अस्तित्व दाखून लागल्या. पहिल्या टप्यातील परिसराची साफसफाई आटपल्यावर मग सुरू झाली कातळशिल्पांची प्राथमिक टप्यातील साफसफाई आणि मग कातळशिल्प बोलू लागली. 

2.5 फूट लांबीपासून 7 फूट लांबीपर्यंतचे विविध प्रजातीतील मासे, 6 फूट लांबीची घोरपडी सदृश्य आकृती, विविध प्रजातींचे प्राणी, पक्षी, मोठ्या आकाराची चौकोनी उठावाची रचना आणि काही अनाकलनीय तसेच लहान आकाराच्या भौमितिक रचना अशा 30 पेक्षा अधिक खोद चित्र रचनांचा समूह. 

या समूहातील वैशिष्टयपूर्ण रचना म्हणजे 3 फूट लांबी पासून 18 फूट लांबी पर्यंतच्या शिकारी पक्षांच्या रचना लक्षवेधक आहेत. पक्षाच्या डोक्यावरील आकर्षक तुरा, मजबूत पाय, 6 इंच लांबीच्या नख्या यावरून या पक्षाची भव्यता जाणवते. त्याच बरोबर तब्बल 23 फूट लांब व 10 फूट उंचीच्या गवा रेड्याची चित्ररचना एका नजरेत मावत नाही.  या गवा रेड्याची 2 फूट लांबीची वक्राकार शिंगे पाहिल्यानंतर नंतर त्याच्या ताकदीची कल्पना आपण करू शकतो. या सर्वांसोबत असलेली 12 फूट लांब व जवळपास तेवढीच रुंद भौमितिक रचना आपले लक्ष वेधून घेते.

आमच्या कातळशिल्प संशोधनातील काही ठोकताळे, नवीन विचारधारा या दृष्टीने कोट गावातील कातळशिल्प  निश्चितच महत्वपूर्ण आहेत. 


गावकऱ्यांना काहीतरी आहे याची कल्पना होती. पांडव कालीन काहीतरी असावे असा त्यांचा याविषयी समज. सर्व चित्र रचना जेव्हा आम्ही त्यांना समजून सांगितल्या तेव्हा ही मंडळी चकित झाली. ' सर आपण सांगाल त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू, आमचे संपूर्ण सहकार्य आपल्याला असेल ' सर्व गावकऱ्यांनी एका सुरात सांगितले. 

खरे म्हणजे या परिसरात आणखीही चित्र रचना असाव्यात याची खात्री, त्याबद्दल गावकऱ्यांना अधिक सूचना दिल्या. परिसरात अधिक सर्वेक्षण करणे गरजेचे आहे टप्याटप्याने त्या गोष्टी पूर्ण होतीलच.

अनेकांकडून मिळणाऱ्या कोरड्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर कोट गावातील सरपंच श्री संजय पाष्ट्ये आणि गावकऱ्यांनी प्रतिसादाला कृतीची जोड देत दाखवलेला विश्वास लाख मोलाचा आहे.


त्याबरोबर एकंदरच कोंकणातील कातळशिल्प विषयावर नानाविध कामे, अधिक संशोधनात्मक काम यांची नितांत गरज आहे. त्यासाठी आर्थिक स्वरूपाची मदत मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. शासन प्रशासन स्तरावरून अद्यापपर्यंत निराशाच आहे. अशा वेळी स्वतःहून पुढे येऊन आमच्या कामावर आधारित शॉर्ट फिल्म करण्यासाठी पुढे आलेली सायली खेडेकर, श्री राहूल नरवणे आणि त्यांच्या टीमचे मन:पूर्वक आभार.


कोट गावाचे सरपंच श्री संजय पाष्ट्ये आणि गावकरी यांचे अप्रतिम सहकार्य आणि आदरातिथ्य यासाठी आभार मानावेत तेवढे थोडेच. 


कोट गावातील कातळशिल्प परिसरातील भूभाग त्यावरील गावकऱ्यांचे शेतीभातीचे काम हे त्यांच्या मूलभूत जिविकेचे साधन. या सर्वांमध्ये हस्तक्षेप न करता, त्यांच्याच मदतीने हे कसे जपता येईल, येथील मांगर आणि अन्य वास्तू यांचा वापर करून येथील कातळशिल्प रचनांचे कसे संरक्षण करता येईल, यातून गावातील गावकऱ्यांना उपजीविकेचे साधन कसे निर्माण करता येईल या विचारांनी आणि चर्चेने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. 


वि.सू. येथे कोणाला जायचे असल्यास आम्हाला अथवा या गावाचे सरपंच यांना संपर्क करा.


सुधीर ( भाई) रिसबूड 

निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी









Wednesday, November 3, 2021

बेडकीहाळचा दसरोत्सव

 बेडकीहाळचा दसरोत्सव



   म्हैसुरचा दसरोत्सव माहित नाही असा माणुस भारतात सापडणार नाही ,पण याच कर्नाटक राज्यातील दुस-या क्रमांकाचा शाही दसरोत्सव बेडकीहाळ या एका ऎतिहासिक वारसा लाभलेल्या गावात साजरा होतो हे माहित असणारे मात्र फार कमी लोक कर्नाटकाबाहेर मिळतील.बेडकिहाळच्या याच वैशिष्ट्यपूर्ण शाही दस-याचा आढावा...


 बेडकीहाळ,

      कर्नाटकातील दुस-या क्रमांकाचा शाही दसरा जल्लोषात आयोजित करणारे दुधगंगा नदीच्या काठावर वसलेले निसर्गरम्य गाव! बेळगाव जिल्ह्यात निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथे आश्विन महिन्यात दस-याच्या दुस-या दिवशी भरणारी  सिद्धेश्वर यात्रा प्रसिद्ध अाहे.या यात्रेच्या निमित्ताने  बेडकिहाळला संपन्न होणारा संस्थानिक वारसा लाभलेला ऎतिहासिक दसरोत्सव म्हैसुर पाठोपाठ कर्नाटकातील दुस-या क्रमांकाचा दसरा मानला जात असल्याने बेडकीहाळचा दसरामहोत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक बेळगाव कोल्हापूर भागातुन येथे येत असतात.बेळगावातील चिकोडी ,निपाणी या ऎतिहासिक शहरांपासुन केवळ २०-२२ कि.मी.अंतरावर आणि कोल्हापुरपासुन ४५ कि.मी.अंतरावर बेडकीहाळ वसले आहे.हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमालगत भागात असल्याने येथे असलेल्या सिद्धेश्वराचा दसरोत्सव हा या भागातील एक महत्त्वाचा मेळा असून बेडकिहाळच्या सिद्धेश्वर यात्रेला हजारो भाविक येतात. बेडकिहाळ सिद्धेश्वर यात्रा अश्विन शुक्ल पक्ष एकादशी तिथीला किंवा कर्नाटकात पारंपारिक हिंदू चांद्र दिनदर्शिकेनुसार अश्विन महिन्यात चंद्राच्या वॅक्सिंग टप्प्यात अकराव्या दिवशी आयोजित केली जाते.या दसरोत्सवाच्या निमित्ताने गावात विविध स्पर्धांचे उत्साहात आयोजन केले जाते.विशेषकरून बेडकीहाळात भरवल्या जाणाऱ्या कुस्ती स्पर्धेत देशविदेशातील नामांकित पैलवान सहभागी होत असल्याने या उत्सवाला आता ग्लॅमर येऊ लागले आहे.इथल्या काळ्या कसदार मातीतील कुस्तीच्या स्पर्धेला कार्तिक काटे, बाला रफीक शैक, नितीन मदने, माऊली जमदाडे आणि अनेक भारतीय पैलवान सहभागी झाले आहेत. बेडकिहाळ कुस्तीच्या वैभवात भर घालण्यासाठी गेल्या वर्षी दोन रशियन पैलवानांनीही बेडकिहाल कुस्तीमध्ये भाग घेतला होता.तसेच सिध्देश्वर कुस्ती मैदानावर कबड्डी, मॅरेथॉन, व्हॉली बॉल, रांगोळी अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल दरवर्षी असते.यामुळेच इथला दसरोत्सव यात्रेकरुंसाठी आनंददायी पर्वणीच असते.

            

       


   घटस्थापना सुरु होताच संपूर्ण बेडकीहाळ गाव सुंदर दिव्यांनी सजवले जाते,गावातील सगळ्या रस्त्यांवर लावलेले पताक्यांची तोरणे इथे येणा-या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष वेधून घेतात.गावाचे रात्रीचे दृश्य सुंदर दिसते. दस-याच्या दुस-या दिवशी होणाऱा बेडकीहाळचा दस-याला ऎतिहासिक महत्व असुन कर्नाटकातील म्हैसूर च्या दस-यानंतर बेडकिहाळ च्या सिद्धेश्र्वराचा दसरा हा द्वितीय क्रमांकाचा दसरा म्हणून प्रसिद्ध आहे.दसरोत्सवाच्या निमित्ताने या दिवशी सिद्धेश्र्वर महाराज की जय ..हर हरच्या जयघोषात, सनई चौघडा करंडोलच्या गजरात क्षेत्र बेडकीहाळ नगरीचे ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्र्वर पालखीत विराजमान होऊन मानकरी, सेवेकरी व हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत गाव फिरायला बाहेर पडतो. आहे.सोबत अंबारीने सजलेला गजराज लक्षवेधुन  घेतो.मंदिरातून पालखी बाहेर पडल्यावर जुना बस स्थानक चौकात येते.या ठिकाणी  भाविक आपल्या लहान चिमुकल्यांना हत्तीच्या सोंडेला  नमन करायला लावतात.श्री सिद्धेश्र्वराचा तो आशीर्वाद मानला जातो.पुढे  पालखी आंघोळीसाठी नदीवेस मार्गे दुधगंगा नदीकडे रवाना होते.यावेळी काळ्याभोर सकस मातीतून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली ऊसाची शेती मनमोहक दिसते.बेडकीहाळची जीवनदायिनी दुधगंगा नदीच्या काठावर ग्रामदैवतांसाठी दोन कट्टे उभारण्यात आले आहेत. कठ्ठ्यावर श्री सिद्धेश्र्वर आणि  श्री देव विठ्ठल बिरोबाचे आगमन होताच परंपराप्रमाणे दोन्ही ग्रामदेवतांना  भक्तीभावाने आंघोळ घातली जाते व  नैवद्य दाखवून श्रीच्या पालखींचे पूजन करण्यात येते.यावेळी पालखी मानक-यांकडुन सोनं लुटण्याचा सार्वजनिक कार्यक्रम संपन्न होतो.दुधगंगेच्या काठावरिल हा रंगतदार सोहळा आवर्जून पहावा असाच आहे. नदिच्या पलीकडे चाँदपीर नावाने ओळखला जाणारा प्रसिद्ध दर्गा आहे .आपल्या कोकणात देव बाहेर पडल्यावर घराघरात जाऊन दर्शन देतो मात्र कर्नाटकातील बेडकीहाळ गावात एक वेगळीच प्रथा दिसते.इथे प्रत्येक वाडिवस्तीत उभारलेल्या दगडी भक्कम  कट्ट्यावर यावेळी पालखी स्थानापन्न केली जाते.म्हणजेच श्री देव सिद्धेश्र्वर विराजमान होऊन भक्तगणांना आशीर्वाद देतो.यावेळी ठिकठिकाणचे कट्टे झेंडूच्या लाल -पिवळ्या फुलांनी भक्तिभावाने सजविले जातात.ते पाहून कर्नाटकातील श्रद्धेय जीवनशैलीची अनूभूती येते. नदीवरील कार्यक्रम आटोपल्यानंतर पालखी बेडकीहाळ - बोरगांव मार्गावरून मुख्य सर्कल येथील कट्टा,कुस्ती मैदान कट्टामार्गे डवरी कट्ट्याकडे रवाना होते.या दसरोत्सवाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे बेडकिहाळच्या कोरवी समाजाचा सिद्धेश्र्वर बॅन्ड बाजा ! हे पथक कर्नाटकात प्रसिद्ध असुन तालबद्धता, पारंपारिक बाज यामुळे ते ऎकणे श्रवणीय ठरते.


डवरी कट्ट्यावरील पूजन :-

         


 नाथपंथीय समाजाची गावात थोडीफार वस्ती असुन डवरि या नावाने ती ओळखली जाते.काही वर्षााापूर्वी इथे मोठ्या संख्येने रहात असलेला नाथपंथीय समाज व्यवसायानिमित्त इथून कोल्हापुर,इस्लामपूर आदि पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित
झाला. गावातील डवरी काॅलनीतील कट्ट्यावर सिद्धेश्वराची पालखी वाजत गाजत येऊन स्थानापन्न होते.यावेळी पालखीचा कट्टा गोंड्याच्या लाल पिवळ्या फुलांनी इतका सुंदर सजविला जातो की तो पाहुन क्षणभर देहभान हरपायला होते.दस-याला  पश्चिम महाराष्ट्रातील गोसावी समाज मोठ्या संख्येने  श्री देव सिद्धेश्र्वराच्या दर्शनाला येतो.बेडकीहाळ येथील बाळू डवरी यांच्या घरी काळंबादेवीचे स्थान असुन सिद्धेश्र्वराच्या दर्शनासोबत आई कळंबादेवीची भक्तभावाने पूजाअर्चा करतात.बाळू डवरी यांच्या प्रेमळ अगत्यशील स्वभावाचे या यात्रेनिमित्ताने अनुभव घेता आला.

        

   ईनामदारांच्या वाड्यात श्रींचे पूजन :--

                  यानंतर रात्री आठ वाजता पालखी मिरवणूक रेणुका मंदिर मार्गे दसरा चौकातील विजयराव इनामदार सरकार यांच्या वाड्यात विराजमान होते.कोल्हापूर संस्थानाशी संबंधित असलेल्या या जगदाळे नामक सरदार घराण्याकडे आसपासची ३२ गावे इनाम देण्यात आली होती. जगदाळे सरदारांची ही गढी  गावात 'इनामदारांचा वाडा' म्हणून ओळखली जाते. गढीच्या उत्तर भागात बांधीव तलाव असून या तलावा कडून गढीत जाण्याचा मार्ग आहे. चौकोनी आकाराची ही गढी साधारण १.५ एकरवर पसरलेली असून गढीच्या चार टोकाला मोठे बुरुज आहेत. याच्या बुरुजात व तटबंदित संरक्षणाची कोणतीही सोय दिसून येत नाही. तटाची उंची साधारण १५ फुट असून बुरुजाची उंची २५ फूट आहे. गढीच्या मध्यभागी इनामदारांचा सुस्थितीतील चौसोपी वाडा आहे.वाड्याच्या बाजूला त्यांच्या वंशजांची घरे आहेत. रात्री दहा वाजता विजयराव इनामदार सरकार व बाळासाहेब इनामदार यांच्या परिवाराकडुन पूजा करण्यात येते.तर रात्री बारा वाजता शेजारच्या लहान वाड्यात इनामदार व    कुलकर्णींकडून पालखी पूजन व महाआरती केल्यानंतर पालखी मिरवणूक वाड्यातून बाहेर पडते.

     

दारूगोळा व रावणदहन कार्यक्रम :-

           पालखी इनामदारांच्या वाड्यातुन बाहेर पडल्यावर  गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चौकोनी तलावापाशी सुरु होतो दारूगोळा व रावणदहनाचा कार्यक्रम ! खरंतर हा कार्यक्रम म्हणजे बेडकीहाळ दसरोत्सवचा लोकप्रिय उत्तरार्ध. सर्वसाधारण दिवाळीला फटाक्यांची आतिशबाजी  सगळीकडे केली जाते,इथे मात्र  सिद्धेश्र्वर  देवस्थान समितीच्या वतीने  दसरोत्सवानिमित्ताने तलावापाशी फटाक्यांच्या अतिषबाजीचा मोठा  जाहीर कार्यक्रम रंगतो.हा दारुगोळा उत्सव  याची देही याची डोळा पहायला अलोट गर्दी जमते.मुंगी शिरायलाही जागा नसते यावेळी.हिंदू धर्मग्रंथानुसार यादिवशी भगवान श्री रामानं रावणावर विजय मिळवून लंकेवर विजय मिळविला.प्रभू श्री रामाच्या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला ' विजयादशमी ' असे संबोधतात.दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो.याचे प्रतिक म्हणून दारूगोळा कार्यक्रम संपल्यानंतर रावणदहनाचा कार्यक्रम संपन्न होतो.यासाठी तलावाच्या एका काठावर भला मोठा रावणाचा पुतळा तर दुस-या काठावर  रामाचा पुतळा उभारून गावातील तंत्रज्ञ कुशल मंडळीच्या कल्पकतेमुळे साक्षात प्रभू रामचंद्रच रावणाला बाण मारून त्याचे दहन करत असल्याचा काहीवेळ भास होतो.या नयनरम्य कार्यक्रमाच्या सांगतेनंतर मात्र विविध ठिकाणांहून आलेला यात्रेकरू परत माघारी वळायला लागतो.या दरम्यान श्रींची पालखी मिरवणुक पंत मदिर परिसराला भेट देते बरोबर पहाटे ५ वाजता तुळजा कट्ट्यावर येऊन स्थानापन्न होते.यानंतर मात्र गावचावडीमार्गे श्रींची पालखी मंदिरात आल्यावर प्रदक्षिणा कार्यक्रम संपन्न होतो.यावेळी उपस्थित मानक-यांना श्रीफळ व साखर वाटली जाते.आणि अकरा दिवस उत्साहात चाललेल्या बेडकीहाळच्या शाही दसरोत्सवाची सांगता होते.

           

       गेल्या दोन दशकात बेडकीहाळ गावानेही शहरीकरणाचा वेग पकडल्याने छोटेखानी बाजारपेठ असलेल्या या गावात महाविद्यालय, मेडिकल काॅलेज, जलशुद्धीकरण प्रकल्प, व्यंकटेश साखर कारखाना इ.उभे राहिले असून दुधगंगा नदीचा म्हैसुर गव्हरमेंटने बांधलेला जुना दगडी वैशिष्टयपूर्ण पुल,श्रीसिद्धेश्र्वर अर्थात आजोबा च्या देवस्थानाजवळ असलेले मारुती व लक्ष्मीचे एकत्रित छोटेस्वरुपाचे मंदिर,पंत मंदिर, बिरोबा मंदिर, विठ्ठल रूक्मिणी मंदिर,गणपती मंदिर, इनामदारांची गढी,तलाव, ऊसासोबतच तंबाखु ची शेती आदि ठिकाणे पाहण्यासारखी असून बेडकीहाळच्या दसरोत्सवात सहभागी होऊन सिद्धेश्वराचा आशीर्वाद घेताना गावातील ऎतिहासिक ठिकाणांना भेट देत इथले लोकजीवन अनुभवल्यास मराठी संस्कृती, परंपरा जपत  असलेला, मराठी भाषेचे वर्चस्व असलेला हा मराठा मुलुख भाषावर प्रांतरचना करताना कर्नाटकात गेला असला तरी मनाने मात्र महाराष्ट्रात आहे याचा प्रत्यय आपल्याला येतो.

     वि।ज।य।ह।ट।क।र

8806635017

बेडकीहाळ गावातील क्षणचित्रे -


श्री सिद्धेश्र्वर देवस्थानाचे आकर्षक प्रवेशद्वार.


बेडकीहाळ उत्सवात सहभागी ब्लाॅगर विजयधन यांचे डवरी कट्ट्याजवळचे छायाचित्र.


बेडकीहाळ दसरोत्सवाला उपस्थित भक्तसमुदाय.


डवरीकट्ट्याजवळील एका झाडावरील श्री गणेश.


बेडकीहाळ सर्कलवरील भव्य लक्षवेधी प्रवेशद्वार.



आजोबाची पालखी.


म्हैसुर संस्थानाने बांधलेला दुधगंगा नदीवरील भक्कम पुल.


नदिपुलावरिल म्हैसुर संस्थानचा राजचिन्ह असलेला स्तंभ


दुुुधगंगा नदीचे विस्तीर्ण पात्र.



गावातील मुख्य शिक्षणकेंद्र.


दुधगंगा नदीच्या काठावरील श्रींचा कट्टा.


श्री सिद्धेश्र्वर कुस्ती मैदान.


गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला तलाव.इथेच दसरोत्सवाचा सांगता समारंभ अर्थात रावणदहनाचा कार्यक्रम संपन्न होतो.


Sunday, October 10, 2021

पर्यटन वाढीचा रत्नसिंधु मार्ग

 

पर्यटन वाढीचा रत्नसिंधु मार्ग

 रत्नागिरीत अलीकडेच पर्यटन विषयक परिषद झाली कोकणातील पर्यटनाला किती आणि कसा वाव आहे यावर या परिषदेत उहापोह झाला, अशा तर्‍हेच्या परिषदा अधून मधून होत असतात, पण त्यातून कृतिशील काम होत नाही  कारण उपाय कितीही सुचवले गेले तरी ते प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रात अनेक व्यक्ती आपापल्यापरीने व्यवसायाला चालना देण्यासाठी तो वाढविण्यासाठी काही उपाय शोधत असतात, त्यावर काम करत असतात, आणि व्यक्तिगत पातळीवर यशस्वीही होत असतात. पर्यटनाच्या क्षेत्र हे असे एकट्याने काम करण्याचे नाही त्याला सामूहिक प्रयत्न आवश्यक असतात. त्यामुळे परिषदांमध्ये कितीही मुद्दे मांडले गेले तरी त्यातील प्रत्यक्षात किती येतात यावरच या परिषदांचे फलित अवलंबून असते. रत्नागिरीच्या परिषदेत उपस्थित राहिलेल्या लांज्यातील दोघा तरुणांनी मात्र त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

     

 विजय हटकर आणि नितीन कदम या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रत्नसिंधू नावाची तूर्त तरी आभासी संस्था सुरू केली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील काही देवी क्षेत्रांना भेट देण्याची, एक दिवसाची सहल आयोजित केली आहे. त्यासाठी एका मिनीबसची व्यवस्था केली आहे, त्या करता येणारा खर्च पर्यटकांमध्ये विभागला जाणार आहे. त्यांचा हा प्रयत्न अत्यंत छोटा असला, तरी तो नक्कीच दिशादर्शक आहे. पर्यटनाच्या वाढीच्या दिशेने टाकलेले ते छोटेसे पाऊल आहे  पण त्यातून अनेक गोष्टींना चालना मिळणार आहे. कारण सहल जाहीर केल्यानंतर अगदी दोन दिवसात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये मुंबई आणि गोव्यातील काहीजणांनीही सहलीत सहभागी होण्याची इच्छा दाखविली आहे, त्यावरून अशा वेगळ्या प्रयत्नांची गरज आहे हे लक्षात येते. 

         अनेकजण पर्यटनाला जातात. मोठमोठ्या आणि प्रसिद्ध ठिकाणांना भेट देत असतात. त्यांच्यासाठी टूर ऑपरेटर्स काम करतात.देश विदेशात अशा सहलींचे आयोजन केले जाते, पण अशी जगभ्रमंती करणार्या पर्यटकांनी आपल्याच परिसरातील अनेक ठिकाणी पाहिलेली नसतात, ती त्यांना पाहायची नसतात, असे नव्हे. पण त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणाऱ्या मार्गदर्शकाचा अभाव असतो. ती ठिकाणे लौकिक दृष्टया प्रसिद्ध नसली, तरी पर्यटनाचा मूळ हेतू साध्य करण्याची क्षमता या ठिकाणांमध्ये असते. कोकणातील प्रत्येक गावच मुळात सुंदर आहे. या गावाकडे जाणारे रस्ते सृष्टी सौंदर्याचा मनमुराद आनंद देतात. त्यामुळे प्रत्येक गावातच पर्यटनाला जाणे खूप आनंदाचे असू शकते पण अशा ठिकाणांची प्रसिद्धी पर्यटन स्थळ म्हणून होत नसते, हेच हेरून रत्नसिंधू संस्थेने, नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून, तालुक्यामधील देवीच्या मंदिराला भेट देण्यासाठी धार्मिक सहलीचे आयोजन केले आहे. सहलीत सहभागी  होणाऱ्यांनी ही ठिकाणे पूर्वी पाहिले असतील किंवा नसतीलही, पण सहलीच्या निमित्ताने संबंधित गावाविषयी माहिती अनेकांपर्यंत पोहोचेल. पण अशा तऱ्हेच्या छोट्या सहलीचे आयोजन करण्याची दिशा अनेकांना मिळेल. ज्यांनी सहल आयोजित केली आहे, त्यांच्याकडे सोयीच्या दृष्टीने म्हणून कोणतीही साधने नाहीत. त्यांचे हॉटेल नाही, त्यांची स्वतःची बसही नाही, त्यांना स्वतंत्र मार्गदर्शक नेमलेला नाही, हे दोघेच मंदिराची माहिती पर्यटकांना देणार आहेत. कल्पकता असेल तर पर्यटनाच्या क्षेत्रात काय करता येऊ शकते, याचे हे अत्यन्त छोटे उदाहरण आहे, म्हणूनच ते मार्गदर्शक आहे.

*प्रमोद कोनकर*

(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया. ८ ऑक्टोबर 2021)


Tuesday, October 5, 2021

लांज्याचा सुपुत्र करणार आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिसंवादात भारताचे नेतृत्व

--------------------------------------------

युवा संशोधक सईद  मुल्ला यांची आदर्शवत भरारी.

-----------------------------

पर्यायी इंधन म्हणून बयोगॅसची उपयुक्तता सिद्ध करणार लांज्याचे सुपुत्र  तरुण संशोधक सईद मुल्ला.


Written By मोडीदर्पण टीम.

October 06 /2021

   


  जागतिक बायोगॅस संघटना आणि भारतीय बायोगॅस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०७ आॅटोबर २०२१ रोजी संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिसंवादात कोकणचे सुपुत्र व युवा संशोधक सईद मुल्ल्ला 'भारतासारख्या विकसनशील देशात - बायोगॅस क्षेत्रातील संधी ' या विषयावर भारताची भूमिका मांडणार असुन कोकणातील लांजा तालुक्याचे सुपुत्र असलेल्या स ईद मुल्लांना आंतरराष्ट्रीय परिसंवादात भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने सा-या कोकणाला अभिमान वाटावा अशी दैदीप्यमान कामगिरी त्यांनी केली आहे


        भारतात जैविक इंधन असलेल्या बायोगॅस वापराला प्रोत्साहन मिळावे व देशातील ४०% कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या धोरणाला दिशा मिळावी या उद्देशाने दिनांक ०७ आॅक्टोबर २०२१ रोजी संपन्न होणा-या जागतिक बायोगॅस संघटना आयोजित आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिषदेचे उद्घाटन  केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग बांधणी मंत्री नितीनजी गडकरी करणार असून या परिसंवादाला जागतिक बायोगॅस असोसिएशनच्य मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शार्लोट माॅर्टन, दक्षिण आशियाव ब्रिटिश हाय कमिशनवर डेप्युटी डायरेक्टर सानु -दे- लिना, आंतरराष्ट्रीय उर्जा एजन्सीचे जैव उर्जा अभ्यासक जेरेमी मुरहाऊस ,भारतीय बायोगॅस असोसिएशनचे  अध्यक्ष डाॅ.आत्माराम शुक्ला ,उपमहाव्यवस्थापक अभिजित राजगुरु यांसह लांज्याचे सुपुत्र व देशातील जैव उर्जा क्षेत्रातील युवा अभ्यासक सईद मुल्ला यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

        मानवाने एकविसाव्या शतकामध्ये अभूतपूर्व अशी तांत्रिक प्रगती साधली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सर्वच उपकरणांना कार्यान्वित करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते. पारंपरिक ऊर्जास्रोत- म्हणजेच मुख्यत: खनिज तेल व कोळसा यांची घटत जाणारी उपलब्धता आणि त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण हे नजीकच्या भविष्यात मानव व इतर सजीवांसाठी संहारक ठरू शकते. यामुळेच जगातील सर्वच प्रगत, प्रगतिशील आणि अप्रगत देश आज पर्यायी इंधनाच्या विविध मार्गाचा अवलंब करताना दिसतात. यादृष्टिने येणाऱ्या काळात मिथेनवर चालणारा बायोगॅस हे जैव इंधन स्वस्त ,स्वच्छ व कार्यक्षम ऊर्जा पुरविण्याच्या गुणधर्मामुळे  महत्वाची भूमिका बजाविणार आहे.या दृष्टीनेच "भारतातील बायोगॅस क्षेत्रातील परिस्थिती व आगामी काळातील अमर्याद संधी"  या विषयावर भारताच्या वतीने आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी युवाअभ्यासक सईद मुल्ला यांच्यावर सोपाविण्यात आली आहे.


  लांजा तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर वसलेले देवधे  हे अभ्यासक सईद मुल्ला यांचे मुळ गाव. गावातील जिल्हा परिषदेच्या  मराठी माध्यमाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.पुढे  उच्च शिक्षणासाठी मुंबई चा मार्ग धरणा-या सईद मुल्ला यांनी बी.ई.( केमिकल इंजिनियरिंग) चे शिक्षण यशस्वी पूर्ण केल्यानंतर जैव इंधन क्षेत्रातील आव्हानांचा अभ्यास करण्याची संधी करिअर म्हणून निवडली.

आज भारतातील जैव इंधन क्षेत्रातील आघाडीचे उत्पादनतज्ञ असलेल्या मुल्ला यांना  तेल आणि वायू उत्पादन, शुद्धीकरण उद्योग, उर्जा प्रकल्प, सिमेंट उद्योग, पाणी आणि उपयोगिता क्षेत्रातील १० वर्षापेक्षा जास्त अनुभव अाहे. 

       कोकणातील ग्रामीण भागात मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेऊन कमी वयात उत्तुंग यश मिळविलेल्या सईद मुल्ला यांची आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिसंवादात भारताच्या वतीने भुमिका मांडण्यासाठी निवड झाल्याचे वृत्त त्यांच्या देवधे या मुळ गावी समजताच ग्रामस्थांचा ऊर भरुन आला असुन त्यांनी आनंद व्यक्त केला.तर सईद चे बाबा गुलाम मुल्ला यांची याविषयीची " मेहनत रंग लायी " हि प्रतिक्रिया फारच बोलकी ठरली आहे. तरुण वयातच उज्वल यश मिळवित लांजा तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवणा-या सईद मुल्ला यांची जैव इंधन क्षेत्रातील गगनभरारी कौतुकास्पद असुन नव्या तरुणाईला आदर्शवत अशीच आहे.


नव्या तरुणाईला एक नवा आयकाॅन देणारा सईद मुल्ला यांच्या आईवडिलांना मोडीदर्पणचा सलाम.

विजय हटकर 

 



Monday, October 4, 2021

दक्षिण काशीतील शक्तिपीठ-आडीवरेची महाकाली...

 दक्षिण काशीतील शक्तिपीठ-आडीवरेची महाकाली... 



पूर्वेकडे जैवविविधतेने समृद्ध सह्याद्री व पश्चिमेकडील अथांग अरबीसमुद्र यांच्यामध्ये वसलेली वैविध्यपुर्ण पुरातन मंदिरे यामुळे अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेला राजापूर तालुका "दक्षिण काशी " म्हणून प्रसिद्ध आहे.याच राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला निसर्गसौंदर्याने बहरलेल्या आडीवरे गावात ‘श्री महाकाली देवी’चं जागृत देवस्थान आहे. हिंदू धर्मीयांच्या प्राचीन परंपरेनुसार प्रत्येक गावाच्या सीमेवर काही रक्षक देवतांची स्थापना केली जाते. या प्राचीन परंपरेनुसार श्री महाकाली देवी ही राजापूर तालुक्यातल्या १४ गावांपैकी(पूर्वीच्या काळातल्या वाडयांचा विस्तार होऊन आता त्याचं एकेका गावात रूपांतर झालं आहे) आडिवरे या गावाची ग्रामदेवता आहे.नवरात्रीच्या निमित्ताने आडिव-याची महाकाली विषयी विशेष लेख..


        इ.सं. १११३ मध्ये शिलाहार राजवंशातील भोज राजाने दिलेल्या एका दानपत्रात आडिवरे या गावाचा उल्लेख `अट्टविरे` या नावाने आढळतो. अट्टविरे, म्हणजे बाजारपेठेचे गाव.त्याचा अपभ्रंश आडीवरे.भोज राजाने आडिवरे भागातील कशेळी गावच्या बारा ब्राह्मणांना त्याच गावाचे उत्‍पन्‍न दिले असे सांगितले जाते. ‘अट्टाविरे कंपण मध्यवर्ती कसेलिग्रामे’ असा उल्लेख असल्याचे इतिहासकार वि.का राजवाडे यांनी लिहिले आहे.याचा अर्थ हे गाव त्यापूर्वी पासून अस्तित्वात आहे. आडिवरे येथे शके १२५० म्हणजे इ.सं. १३२४ मध्ये हे महापीठ अस्तित्वात आले. आद्य शंकराचार्यांनी याची स्थापना केली असे मानतात. शके ११०० पर्यंत वाडापेठ आडीवरे येथे जैन लोकांची देवस्थाने व वस्ती होती.शंकराचार्यांनी जैन मतांचे खंडन करुन हिंदू देवतांची स्थापना करण्याचा क्रम योजला, व वाडापेठ येथे आल्यावर त्यांनी जैनांना तुमचे व आमचे देव एकच आहेत अशी समजूत घालून दोन्ही देवतांची स्थापना करु व पूजा तुम्ही करा असे सांगितले.मग जैनांचा ब्राम्हणदेव ,व महाकाली व योगेश्र्वरी अशा तीन देवतांची स्थापना येथे केली.व जैन मंडळींना हिंदूंमध्ये सामावून घेऊन त्यांच्याकडे पूजा सोपविली.




 मंदिरपरिसर

      श्री महाकाली देवस्थान हे मंदिर पंचायतन असून त्यात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रवळनाथ व नगरेश्वर यांचा समावेश आहे. महाकाली ,महालक्ष्मी व महासरस्वती या तीन बहिणी असून त्या एकाच मंदिरात तीन वेगवेगळ्या दिशांना आसनस्थ आहेत .श्री महाकालीची चतुर्भुज मूर्ती काळ्या दगडातील असून ती दक्षिणमुखी आहे. गळ्यात माळा, मस्तकावर पंचमुखी टोप, हातात डमरू, त्रिशूळ, तलवार व पंचपात्र आहे. देवीचे पौर्णिमा व अमावस्येला नारळाचे दूध व तेल याने मर्दन करून स्नान घाल्याण्याची प्रथा पाळली जाते. तर महासरस्वती उत्तराभिमुख आहे.  महाकालीच्या सभामंडपात ४ लाकडी खांब असून त्यावर लाकडी तुळ्या व वर लाकडी तक्तपोशी आहे.लाकडी तक्तपोशीवर अंदाजे २ बाय २ फुट आकाराची लाकडात कोरलेली ,पंचवीस काष्टशिल्पे आहेत.ही शिल्पे (चित्र) अनेक पौराणिक कथांवर आधारित प्रसंगांची व काही देवदेवतांची आहेत.आडिवरेला गेल्यावर तेथील देऊळ पाहताना तुमच्यातल्या भाविकासोबत रसिक, कलावंत माणुस जागृत असायला हवा. कारण मंदिरपरिसरातील सभामंडपात असलेली हे देखणे  कोरीव शिल्पवैभव व सभामडपातील खांबामध्ये असलेला छोटासा गणपती लक्षवेधी अाहे. रवळनाथाचे छोटेसे मंदिर महाकाली मंदिराच्या आवारातच आहे. नगरेश्वर हे मंदिर महाकाली मंदिरापासून सुमारे पन्नास मीटर अंतरावर आहे. नगरेश्वर हा या परिसराचा देव असून प्रथम नमस्काराचा मान त्याचाच आहे. देवीचे दर्शन घेताना सुरुवातीला नगरेश्‍वराचे दर्शन प्रथम घ्यावे त्यानंतर श्री देवी महालक्ष्मी ,श्री देव रवळनाथ त्यानंतर श्री महाकाली आणि महासरस्वती चे दर्शन घेण्याची प्रथा आहे. नगरेश्वर मंदिरात शेकडो वर्षांचे जुने नागोबाचे वारुळ असून ते छप्पर फोडून त्याच्याही वर गेले आहे एक थेंबही पाणी कळत नाही यात्रेकरूंच्या दृष्टीने हा एक मोठाच कुतूहलाचा विषय आहे.



 *आख्यायिका* :---

    आडीवरेच्या प्रसिद्ध महाकाली देवीचे माहेर वेत्ये हे समुद्रकिनारी असणारे सुंदर गाव आहे.  देवस्थाना पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वसलेल्या वेत्ये गावात  राहणाऱ्या जाधव यांच्या स्वप्नात एक दिवस श्री महाकाली आली. तिने सांगितले की, मी बाऊळ या ठिकाणी असून माझी राहण्याची व्यवस्था करा. स्वप्नातील दृष्टांत प्रमाणे जाधव यांनी बाऊळ  येथे जाऊन पाहिले असता तेथे खरोखरच  महाकालीची मूर्ती असल्याचे त्यांना दिसून आले. त्यावेळी आडिवरे गावावर तावडे घराण्याची सत्ता होती त्यामुळे जाधव यांनी ही गोष्ट तावडे यांच्या कानावर घातली. तावडे यांनी वाडा पेठ येथे स्वतःच्या जागेत श्री महाकालीची रीतसर प्रतिष्ठापना केली. तेव्हा पासून जेव्हा जेव्हा देवीच्या मनात येईल तेव्हा तेव्हा ती माहेरी जाते. बाऊळ येथे सापडली  म्हणून बाऊळ  हे तिचे माहेर.  हे ठिकाण वेत्येवाडीच्या सीमेवर असून समुद्रकिनारी आहे. माहेरी जाताना देवी तिच्या संपूर्ण लवाजम्यानिशी वाजत-गाजत जाते व तेथे थोडावेळ थांबून परत फिरते.


 *आंबेजोगाईची योगेश्र्वरी मुळ येथील असावी का?* 

              महाकालीच्या  डाव्या हाताला योगेश्वरी ची मूर्ती आहे. पूर्वी हे मंदिर योगेश्वरीचे होते.तीची मूर्ती बाजूला ठेवून नंतर येथे  महाकालीची मूर्ती बसविण्यात आली.योगेश्वरची मूर्ती काय कारणामुळे काढली याचा मात्र कोठेही उल्लेख नाही. परळी वैजनाथाशी कोकणातील योगेश्वरीचे लग्न ठरले.लग्नासाठी सगळे व-हाड आंबेजोगाईला गेले. योगेश्वरीला हे लग्न मान्य नव्हते म्हणून तिने अनेक क्लुप्त्या लढवून लग्नाचा मुहूर्त टाळला मात्र यामुळे भगवान शंकर चिडले व त्यांनी शाप दिला की सर्व व-हाडाचे पाषाणात रूपांतर होईल व योगेश्वरी देवी कायम कुमारी राहील.याप्रमाणे सर्व व-हाडाचे दगडात रूपांतर झाले आणि योगेश्वरी /जोगेश्वरी आंबेजोगाईला राहिली, अशी कथा आहे .या योगेश्वरी/जोगेश्वरी मुळेच त्या गावचे नाव आंबेजोगाई पडले. पूर्वी त्या गावचे नाव अंबानगर होते. या कथेचा संबंध वरील जोगेश्वरी/योगेश्र्वरीची मूर्ती बाजूला काढण्याशी असेल का ? कारण कोकणात जोगेश्वरीची अनेक मंदिरे आहेत पण कोणत्याही मंदिरातील मूळ जोगेश्वरी ची मूर्ती बाजूला काढून ठेवलेली नाही.



 *उत्सव* :--

           येथे दरवर्षी विजयादशमी मध्ये नवरात्र उत्सव केला जातो.आडिव-यात नवरात्र अनुभवायची ती देवीच्या लावण्यमयी रुपात आत्ममग्न होण्यासाठी. शारदातल्या नितळ पारदर्शी आल्हाददायकता या उत्सवाला लाभत असल्याने इथली घटस्थापनेपासुनची प्रत्येक रात्र वैशिष्ट्यपुर्ण असते.अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीत येथे मोठी यात्रा भरते.या यात्रेला मुंबई पुण्यासह महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या राज्यातुन भाविक दर्शनासाठी येतात.प्रतिपदेला घटस्थापना होते यावेळी वस्त्रालंकारांनी देवीला विभूषित केले जाते. दहाव्या दिवशी दसरा होतो या वेळी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.नवरात्र ,गुढीपाडवा, देव दीपावली व पौषपौर्णिमा असे वर्षातून चार वेळा देवीला वस्त्रालंकारांनी सजवले जाते. त्या वेळचे तिचे विलोभनीय दर्शन म्हणजे एक भाग्याची पर्वणीच असते. पुण्याच्या भक्तांनी बारा किलो चांदी वापरून केलेली " मयुरशिबिका " ही पालखी पहावयास येथे मिळते.मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिराच्या शेजारीच भाविकांना राहण्यासाठी ‘भक्त निवास’ बांधलं आहे. इथे गरम पाणी आणि शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था आहे.


जुनी विहीर
:-

महाकाली मंदिरासमोर एक जुनी गोलाकृती विहिर जतन केली असून त्यावर जुन्या काळात विहीरीचे पाणी काढण्यासाठी वापरला जाणारा वैशिष्टयपूर्ण  लाकडी ऊक्ति पद्धत पहायला मिळतो.पाणी काढण्याचे कोळंबा हे देखील मोट व रहाट याप्रमाणेच एक जुने साधन असुन सद्यस्थितीत ते इतरत्र पहावयास मिळत नाही.या विहिरीवर पाणी काढण्याचा मोह आलेल्या प्रत्येक पर्यटकाला होतो.हिचे स्वच्छ ,थंडगार अमृततुल्य पाणी पिल्यावर फिरताना आलेला थकवा कुठच्या कुठे पळुन जातो.

*जायचे कसेः* 

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.

रत्नागिरी पासून अंतर - रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी, आडीवरे ( ३४ किमी)

राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे मार्गे आडीवरे ( २८ किमी)

          

       कोकण म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो हिरवा निसर्ग, फेसाळणारा समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा आणि त्यातून जाणारी लाल मातीची पायवाट, कौलारू घरे व त्यातील अगत्यशील माणसे. असे हे कोकण अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील जागृत देवस्थाने, सुबक मंदिरे आणि देवदेवतांच्या थक्क करणार्‍या आख्यायिकांकरीता. आडीवरेतील महाकाली मंदिरालाही अशीच समृद्ध परंपरा लाभली आहे. याबरोबरच कशेळीतील कनकादित्य हे  सुर्यमंदिर , देवघळ समुद्रकिनारा ,तावडे भवन , वेत्ये गावातील स्वच्छ समुद्रकिनारा ,येथील आदिमसंस्कृती स्पष्ट करणाऱी कातळशिल्पे,  नाट्ये येथील पर्यटनसमृ्द्ध परिसर या सर्वांचे सुसुत्रबद्ध प्रेझेंटेशन झाले व पर्यटकांना योग्य सुविधा उपलब्ध झाल्यास राजापूर तालुक्यातील समुद्रकिना-यावरिल आडीवरे परिसर कोकणातील हाॅट डेस्टिनेशन ठरेल.


श्री विजय हटकर.

लांजा.




Wednesday, September 22, 2021

पर्यटनसमृद्ध माचाळची ग्रामीण संस्कृती जपायला हवी.

 पर्यटनसमृद्ध माचाळची ग्रामीण संस्कृती जपायला हवी. 


ग्रेट हाॅर्नबिलचा वावर शूभसंकेत

--------------------




रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या निसर्गरम्य स्वर्गीय माचाळ गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी रस्ता पोहोचल्याने खऱ्या अर्थाने पर्यटन समृद्ध माचाळच्या विकासाची नवी दालने उघडणार आहेत. यातूनच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवे माचाळ हिल स्टेशन जगाच्या पर्यटन नकाशावर येणे आता दूर नाही, मात्र " लोकल टू ग्लोबल माचाळच्या"  या विकासप्रकियेत १००-२०० वर्षापूर्वीचे कोकणातील गाव कसे होते याची ओळख एकविसाव्या शतकात  करुन देणारी 'माचाळची ग्रामीण संस्कृती' जपायला हवी,कारण माचाळच्या अल्हाददायक,थंड हवेच्या गिरिस्थानासोबतच ग्रामीण संस्कृती जोपासणा-या लोकजीवनातही जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती आहे.जागतिक पर्यटन दिनानिमित्त माचाळ पर्यटनाची दिशा ठरविणारा लेख...

   

    जागतिक पर्यटन दिनाच्या पार्श्र्वभूमीवर राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड,सुप्रसिद्ध संगीतकार सुनिल जाधव ,संघाच्या पर्यावरण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खामकर  यांच्यासोबत माचाळचा अभ्यासदौरा केला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मिनीमहाबळेश्र्बर संबोधिलेल्या हिलस्टेशन माचाळच्या स्वर्गीय निसर्गाची पुन्हा एकदा अनुभूती घेतली.माचाळ गावात प्रवेश करतानाच आमचे स्वागत करित मुचकुंदी ऋषींच्या गुहामार्गाकडे झेपावलेला ग्रेट हाॅर्नबिल (राजधनेश किंवा गरुडधनेश) आम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला.माचाळच्या पायथ्याशी असलेल्या पालू  गावात विजय बेंद्रे नामक पर्यावरणस्नेही  तरुण "हाॅर्नबिल स्टे फाॅरेस्ट होम "ची निर्मिती करित आहे.माचाळमधील दूर्मिळ असलेल्या ग्रेट हाॅर्नबिलचा वावर पाहून मि त्यामुळेच जास्त सुखावलो.मजबुत बाकदार पिवळसर रंगाच्या आकर्षक चोचीच्या या पक्षाच्या अधिवासामुळे सह्याद्रीतल्या माचाळ पठारावर दुर्मिळ पक्ष्यांचा असलेला वावर सिद्ध झाला.


      रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून अल्पावधीतच प्रसिद्धीस आलेले साडेतीन हजार फुट उंचीवरील माचाळ गाव कोल्हापूर -रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या विशाळगडापासून एका दरीमुळे वेगळ्या झालेल्या सह्याद्रीच्या उंच डोंगररांगेतील सपाट माळरानावर वसले असून शिवकाळात ऎतिहासिक  खेळणा (विशाळगड) या दूर्गाचा जोडदुर्ग म्हणून त्याची नोंद आहे . हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचे रस्ते, परिसरात असलेले पूर्णपणे धुके, थंड वातावरण, कोसळणारे धबधबे अशा सर्व गोष्टीनी वेढलेले थंड हवेचे माचाळ हे गाव  आपल्याला पहिल्या भेटीतच आकर्षित करते.या गावाला 'ब' दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून दर्जा दिल्याने तसेच गावात जाणा-या रस्त्याचे काम पुर्णत्वास गेल्याने  भेट देणा-या  पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.निसर्गसौदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठीच नव्हे तर ट्रेकर्ससाठी अनोखा अनुभव देणारे आहे.

 


      माचाळ गावात पोहचल्यावर शहरी गोंगाटापासून दूर आल्याची जाणीव होते.गाड्यांचा आवाज ,प्रदूषण, माणसांची गर्दी, कामाचा व्याप या सगळ्यापासून दूर..


मुचकुंदि ऋषींची गुहा :---

        गावाच्या डाव्या बाजूला पश्चिमेकडे किमान अर्धा तास चालत गेल्यावर मुचकुंदि ऋषींची गुहा लागते.गुहेकडे जाताना वाटेत मुचकुंदि नदीचे उगमस्थान असलेले कुंड आहे.गुहेकडे चालत जाताना जळू पायाला कधी चिकटून रक्त शोषून मोकळे होतात हे कळत नाही.म्हणून चालताना काळजी घ्यावी लागते.महाभारतात क्रोधीष्ट व आगीचा गोळा म्हणुन प्रसिद्ध पावलेल्या मुचकुंदि ऋषींच्या गुहेजवळ गेल्यावर  कालिया दानवाला भगवान श्रीकृष्णाने मुचकुंदि ऋषींद्वारे भस्मसात केलेल्या ऎतिहासिक कथेच्या आठवणीला उजाळा मिळतो.या दानवाला ज्या गुहेत मुचकुंद ऋषीनी भस्मसात केले त्या गुहेचा ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केला असून येथे श्रीकृष्ण व मुचकुंदि ऋषींच्या मुर्त्या उभारल्या अाहेत. येथे महाशिवरात्रीला होणाऱ्या उत्सवाला मोठ्या संख्येने भाविक भेट देतात.या ठिकाणावरुन दिसणारे विलोभनीय सौंदर्य व सूर्यास्त भुरळ घालतो.

     


  

विशाळगड ट्रेकिंग :--

       माचाळ गावातून दक्षिणेकडे घोड्याचा टाप या ठिकाणाहून एक दरी उतरून कोकण दरवाजामार्गे विशाळगडावर पोहचता येते.यासाठी कमीत कमी तास दिडतासाची पायपीट करावी लागते.मात्र हा अनुभव सह्याद्रीच्या रांगड्या रुपाची जाणीव करुन देतो.

 भिश्याचा कडा :-

          मुचकुंदि नदी ज्या पठारावरून प्रभानवल्लीच्य दिशेने खाली द-यांमध्ये झेपावते तिला भिश्याचा कडा संबोधतात.या पठारावरून ५०० फुट खोल दरित कोसळणाऱ्या मुचकुंदी नदीचे पाणी वा-याच्या प्रचंड झोतामुळे मागे येते.यामुळे इथे रिव्हर्स वाॅटरफाॅलचा आनंद लुटता येतो. सोबतच कोडबन हीदेखील आवर्जून पहावीत अशी स्थाने आहेत.माचाळच्या विस्तीर्ण पठारावर लपेटलेल्या धुक्याच्या शालीत कुठेही थांबले तरि स्वर्गात आल्याचा भास होतो.इथल्या पठारावरुन खाली पाहिल्यानंतर हजारों फूट खोल दऱ्यांचे दृश्‍य अंगावर शहारे आणते.



माचाळची ग्रामीण संस्कृती :-

       माचाळला जोडणारा रस्ता २०२१ मध्ये पूर्ण झाल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळच्या विकासकामाला आता गती येईल.जगापासून आजवर डिसकनेक्ट असलेले माचाळ जोडण्यास मदत होईल परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ७० वर्षे येथे पायाभूत सुविधा निर्माण झाली नसल्याने येथील सात्विक ,पवित्रतेची अनूभूती देणारा निसर्ग व १०० -२०० वर्षापूर्वीचे कोकण कसे होते हे सांगणारी वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण संस्कृती आजही येथे टिकून आहे.येथील उतरत्या छपराची चौपाखी कौलारु घरांची रचना,आतील मातीच्या जाडजुड भिंती , जुन्या लाकडी चौकटीवर (खांबावर ) असलेले आडं,सारवलेल्या भिंती हे सर्व येथील घरे १०० वर्षे जुनी असल्याचा पुरावा देतात. येथे असलेल्या प्रचंड घोंगावणा-या वा-यापासून घरांचे व माणसांचे रक्षण व्हावे यासाठी इथली प्रत्येक घरे हि चारही बाजूने गवताने कुडलेली आहेत. यासाठी गवत व कारवीच्या काठ्या यांना बांबूच्या कामठ्यांनी जोडतांना वनस्पती दोरांनी बांधणी केलेली सलटी केली जाते ,या सलट्यां घराच्या चारही बाजूने लावल्या जातात.पावसाळा व हिवाळा ऋतुतील आठ महिन्याच्या काळात पडत असलेल्या थंडीपासून रक्षण व्हावे, म्हणून इथल्या प्रत्येक घरात आजही आपल्याला ग्रामीण संस्कृतीचं प्रतीक असलेला ' पिरसा ' पहायला मिळतो.काही घरात पुरुषांसाठी व महिलांसाठी वेगवेगळे असे दोन दोन 'पिरसे'पहायला मिळतात.



       माचाळ हे मुचकुंदि ऋषींचे गाव असल्याने येथील ग्रामस्थ आम्ही ऋषी कुळातील असल्याचे अभिमामाने सांगतात.ऋषीचे कुळ असलेल्या गावात शेतीचे काम करण्यासाठी बैलाचा वापर केला जात नाही.माचाळलाही हि परंपरा कायम असून येथील शेतकरी शेतीच्या नांगरणीसाठी रेड्याचा वापर करतात.'रेड्याचे जोते' हे माचळचे आणखी एक पारंपारिक वैशिष्ट्य! गावात अदमासे १०० -११० घरे असून पाटील, मांडवकर, गोवळकर, भातडे ,भिसे ,भोसले,निबदे, नामे या आडनावाची लोकं गुणागोविंदाने राहतात.माचाळ गावात असलेल्या मध्यवर्ती रस्त्याच्या उजव्या वरच्या बाजूस मांडवकर तर खालच्या बाजूला पाटील आडनावाची कुटुंबे मोठ्या संख्येने राहतात. ई लर्निंगच्या काळात गावात शिक्षणाची जेमतेम ८ वी पर्यंत व्यवस्था असून मुलांना पुढील शिक्षणासाठी साखरपा, लांजा गाठावे लागते.अजूनही येथे कोणत्याही कंपनीचा टाॅवर उभारला गेला नसल्याने मोबाईल ला रेंज नाही.पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोबाईल व इंटरनेट गरजेचे असले तरी सद्यस्थितीत  धावपळीच्या गतिमान युगात डिसकनेक्ट जीवनाचा थोडा काळ इथे आनंद घेता येतो.

     माचाळच्या पठारावर येथील ग्रामस्थ मुख्यत्वे गहुचे पिक घेतात सोबत भात ,नागली ही पिकेही घेतली जातात.दूर्गमतेमुळे रोजगाराची फारशी संधी नसल्याने येथील ग्रामस्थ तास दिडतासाची पायपीट करुन विशाळगडला जातात.तेथे दुध ,दही ,लाकडी मोळी विकतात. येत्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून निश्चितच माचाळचा कायापलट होणार असल्याने ही परिस्थिती बदलली जाईल मात्र,सद्यस्थितीत गावातील तरुण उपजीविकेसाठी मुंबई व चेन्नई सारख्या महानगरांमध्ये स्थायिक झाले आहेत.येथील पाटील कुटुंबातील तरुण चेन्नई मध्ये सुवर्णव्यवसायात स्थिरस्थावर झाले असल्याचे गणेशोत्सवानिमित्त गावी आलेल्या धोंडू पाटील यांनी सांगताच त्यांचे कौतुक वाटले.



एकशे पाच वर्षाचे जोडपे :--

      माचाळला प्रदूषणमुक्त निसर्गसौंदर्य व हिरवाई लाभल्याने येथील संघर्षमय जीवनपद्धतीत सुद्धा ग्रामस्थांचे सरासरी आयुर्मान जास्त असल्याचे दिसून येते.सरासरी आयुर्मान जास्त असलेले गाव ही देखील माचाळचीओळख आहे.हिमालयाच्या कुशीत जशी शंभरी पार केलेली माणसे आपल्याला पहायला मिळतात त्याचप्रमाणे माचाळला थोडे थोडके नव्हे तर  तब्बल एकशे पाच वर्षाचे एक जोडपे आहे.

      श्री सखाराम रावजी भातडे आणि सौ लक्ष्मीबाई सखाराम भातडे असे त्यांचे नाव! यांना तीन मुले, तीन मुली व वीस नातवंडे व पातवंडे असा भला मोठा परिवार असून या आजी-आजोबांचा उत्साह अजून दांडगा आहे. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी शंभरी ओलांडली आहे यावर विश्वास बसत नाही .गावातील शिमगा व  गणेशोत्सवात गेली सत्तर वर्षे सखाराम आजोबा ताशा वाजवण्याचे काम करीत आहेत. यंदा 105 व्या वर्षीही त्यांनी ही परंपरा मोडलेली नाही.माचाळच्या पर्यावरणीय निरोगीपणा मुळेच तिथे सखाराम आजोबांसारखे अनेक दीर्घायुष्य लाभलेली माणसे आपल्याला भेटतात. त्यांच्याशी संवाद साधला की जीवन जगण्याचे सोपे तत्वज्ञान आपल्या समोर उलगडते.माचाळ पर्यटनाला आलेल्या पर्यटकांनी एकशे पाच वर्षाच्या या जोडप्याला आवर्जून भेट देऊनत्यांच्या दीर्घायुषीपणाचे गुपित समजून घेतले पाहिजे.माचाळभेटीत त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह टाळता येत नाही.


वन्यजीवन :--

      माचाळ पठारावर सर्वसाधारणपणे खुरटी व कमी उंचीची झाडे पहायला मिळतात आंबा, काजू , फणस अशासारखी कोकणात विपुल असलेली झाडांची वाढ होत नाही हे या भूमीचे आणखी एक भौगोलिक विशेष! चार -पाच वेगवेगळ्या साईजच्या अौषधी जांभुळाची झाडे इथे आहेत.या ठिकाणची देवराई जपण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केलेला असून येथे आल्यावर कधीही न पाहिलेल्या असंख्य फुलपाखरांच्या, पक्ष्यांच्या दर्शनाने मनाला एक वेगळेच समाधान मिळते. गावातील डोंगराच्या बाजूने लाल मोठे खेकडे आपल्याला सापडतात. तसेच ब्राह्मणी, बेहडा, खारवी,जंगली कडिपत्ता यासारख्या अनेक औषधी वनस्पती येथे विपुल प्रमाणात दिसून येतात.


सापड लोककला :-

         रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेली गावातील तरुण मंडळी गणेशोत्सव शिमग्याच्या सणाला गावात हमखास येतात, याचे कारण परंपरा जोपासणारी वैशिष्टपूर्ण सापड नृत्यकला. खरंतर उंच उंच गिरीशिखरांवरच्या एकाकी वाड्या-वस्त्यांवरच्या मंदिरांची एक संस्कृती असते, त्यांचे काही नीतिनियम असतात. माचाळ गावात आपल्याला ते पहायला मिळतात.माचाळात ब्राह्मण देव, वडलोबा,विठ्ठलाई , भैरी, वाघजाई ,जुगाई ,उदगिरी देवी आणि मालक देव असे आठ देवांचे एकत्रित मंदिर असून गावच्या दगडी चौकात एका चौथऱ्यावर त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणेशोत्सवात गावचे मुख्य गावकर श्री पांडुरंग धोंडू पाटील यांच्या मोठ्याश्या मध्यवर्ती घरातील ओट्यावर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीन दिवसांचा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात.या उत्सवासाठी स्थानिक गावकरी पाटील यांच्या घरातील ओठीमागील मोठ्या भिंतीवर  रंगीत खडूंनी सुबक पौराणिक चित्रे काढतात. आजच्या डिजिटल जमान्यातील डिजिटल बॅनर हि फिका पडेल इतकी ही चित्रं उठावदार असतात. या भिंतीला लागून गावातील आठ देवतांची रुपे (चांदीचे मुखवटे)लावली जातात आणि मग सुरु होते वैशिष्टपर्ण जाखडी लोकनृत्य.या कार्यक्रमाची सुरवात 'सापड' नृत्याने होते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्यात सहभागी होऊन वर्षभराच्या कामासाठी बळ मिळवण्यासाठीच महानगरात गेलेल्या तरुणांची पाऊले माचाळला वळतात. माचाळचा गणेशोत्सव व सापडनृत्य हे  कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी गोल्डन पॅकेज ठरू शकेल.

        यासोबतच गावातील मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात एका दगडावर वाघाचं शिल्प असून याविषयी माहिती घेतली असता डोंगरदऱ्यातील अरण्यपुत्रांची " वाघबारसं" ही परंपरा इथे साजरी केली जाते.

         

       थंड हवेचे ठिकाण म्हणुम माचाळचा विकास करताना हे वेगळंपण जपावं लागेल.यासाठी माचाळच्या संवेदनशील पर्यावरणाला हानीकारक ठरेल अशा गोष्टी सुरवातीपासूनच रोखण्याकडे लक्ष पुरवावे लागेल.'माथेरान' हे संपुर्ण आशियातील एकमेव गिरिस्थान आहे जिथे खाजगी वाहनांना प्रवेश नाही.वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणून जपल्यानेच आजही माथेरान प्रदुषणमुक्त आहे.याच धर्तीवर माचाळची वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणुन घोषणा करावी लागेल.डोंगरी विभागातून माचाळची  स्वतंत्र ग्रामपंचायत घोषित करावी लागेल.गावात रस्ता पोहचला असला तरी गावात प्रवेश करण्यापूर्वी लागण्या-या सपाट माळरानापर्यंतच खाजगी वाहनांना प्रवेश दिला गेला पाहिजे.म्हणजे माचाळचा ग्रामीण बाज जपता येईल, परिणामी माचाळमधील मातीच्या पाऊलवाटांवर पाऊस सुरु झाल्यावर पावसात चालण्याचे स्वर्गसुख अनुभवता येईल.हिवाळ्यात कडाक्याच्या थंडित गारठल्यानंतर गावातील घराघरात असलेल्या पिरश्यासमोर बसून शेकोटिचा आनंद घेता येईल.तसेच उन्हाळ्यात साहसी पर्यटनाचे थ्रील अनुभवता येईल.सोबतच माचाळचला येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करणारे भव्य प्रवेशद्वार उभारून तिथेच लक्षवेधक  अशा भगवान श्रीकृष्मुण आणि मुचकुंदि ऋषींच्या भव्य स्टॅच्यूची निर्मिती करावी लागेल. माचाळला आलेला पर्यटक येथे रहावा यासाठी येथील कला, संस्कृती जागतिक पर्यटकांसमोर मांडण्यासाठी नियोजित कलामहोत्सवांचे आयोजन येथे करावे लागेल.ग्रामीण संस्कृतीचे व येथील स्वर्गीय निसर्गाची अनुभूती देणारे कल्पक संग्रहालय येथे उभारावे लागेल.माचाळच्या विस्तीर्ण पठारावर असलेली विविध पर्यटन ठिकाणे पक्क्या पाखाड्या बांधून जोडावी लागतील.स्थानिक तरूणांना माचाळ पर्यटनदूत म्हणून प्रशिक्षण द्यावे लागेल.मुचकुंदि ऋषींच्या गुहा परिसरात मुचकुंदि ऋषी व कालीया असुराचा वध, भगवान श्रीकृष्ण व मुचकुंदि ऋषींची भेट हे ऎतिहासिक प्रसंग पर्यटकांसमोर मांडणारे छोटेसे चित्ररुप सफर घडवुन आणना-या 'गिरिस्थान कलाकेंद्राची' निर्मिती करता येईल.यातून ऎतिहासिक पर्यटन स्थळ म्हणूनही माचाळचा विकास साधता येईल.'मुचकुंदि नदी परिक्रमा अंतर्गत नदीचे उगमस्थान  सहलीच्या माध्यमातुनही पर्यटकांसमोर मांडता  येईल. माचाळला गिर्यारोहण, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग राफ्टींग सारखे साहसी खेळ  सुरू करता येऊ शकतात. तसेच माचाळचे पठार हे नैसर्गिक गोल्फ कोर्सच आहे. त्याशिवाय पूर्वापार सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशात घोडेस्वारी हे प्रवासाचे साधन होते. तेच साधन पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. सध्या मुंबई, पुण्यासारख्या काॅस्मोपाॅलिटन वातावरणात वाढलेल्या मुलांना खेडं कसं असतं हे दाखवण्याचा 'व्हिजिट विलेज ' हा पर्यटनप्रकार विकसित होत आहे.यासाठीही माचाळ उत्तम पर्याय ठरेल.एकूणच अशा पद्धतीने माचाळचा विकास साधताना स्थानिक लोकसहभाग महत्त्वाचा असावा.यासाठीच माचाळमध्ये स्वातंत्र्याच्या तब्बल ७० वर्षानंतर रस्ता पोहचल्यानंतर प्लॅस्टिक व प्रदूषणात वाढ  करणा-या, येथील गर्भश्रीमंत निसर्गाची अपरिमित हानी करणा-या पर्यटन विकासाऎवजी स्थानिकांच्या उत्थानाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करुन हिलस्टेशन माचाळसोबतच निसर्गसमृद्ध माचाळची ग्रामीण संस्कृती जोपासत ती जगापुढे आणणारे पर्यटन साकारावे लागेल.तरच स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एक आगळेवेगळे माचाळ गिरिस्थान जगाच्या पर्यटन नकाशावार येईल.


   विजय हटकर,

पर्यटन अभ्यासक- लांजा.







माचाळपठारावरिल पुुुष्षवैभव.
मुचकुंदि ऋषींची गुहा
सापडनृत्यावेळी देेेेेेवाची लावलेली रोपे व खडूचे पौराणिक चित्र
उन्हाळ्यातील कृृृषीसंस्कृती
मुचकुंदि नदीउगमक्षेत्र
सपाट विस्तिर्ण पठार
धुक्यात हरविलेला गणेेेशोत्सव.

शेकारलेल्या घरासोबतच फोटो घेण्याचा मोह इथे प्रत्येकाला होतो.

दैनिक कोकण मिडिया या अंकात प्रसिद्ध झालेला लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://kokanmedia.in/2021/09/27/machalthehillstation/