लांज्याचा सुपुत्र करणार आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिसंवादात भारताचे नेतृत्व
--------------------------------------------
युवा संशोधक सईद मुल्ला यांची आदर्शवत भरारी.
-----------------------------
पर्यायी इंधन म्हणून बयोगॅसची उपयुक्तता सिद्ध करणार लांज्याचे सुपुत्र तरुण संशोधक सईद मुल्ला.
Written By मोडीदर्पण टीम.
October 06 /2021
जागतिक बायोगॅस संघटना आणि भारतीय बायोगॅस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०७ आॅटोबर २०२१ रोजी संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिसंवादात कोकणचे सुपुत्र व युवा संशोधक सईद मुल्ल्ला 'भारतासारख्या विकसनशील देशात - बायोगॅस क्षेत्रातील संधी ' या विषयावर भारताची भूमिका मांडणार असुन कोकणातील लांजा तालुक्याचे सुपुत्र असलेल्या स ईद मुल्लांना आंतरराष्ट्रीय परिसंवादात भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने सा-या कोकणाला अभिमान वाटावा अशी दैदीप्यमान कामगिरी त्यांनी केली आहे.
भारतात जैविक इंधन असलेल्या बायोगॅस वापराला प्रोत्साहन मिळावे व देशातील ४०% कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या धोरणाला दिशा मिळावी या उद्देशाने दिनांक ०७ आॅक्टोबर २०२१ रोजी संपन्न होणा-या जागतिक बायोगॅस संघटना आयोजित आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिषदेचे उद्घाटन केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग बांधणी मंत्री नितीनजी गडकरी करणार असून या परिसंवादाला जागतिक बायोगॅस असोसिएशनच्य मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शार्लोट माॅर्टन, दक्षिण आशियाव ब्रिटिश हाय कमिशनवर डेप्युटी डायरेक्टर सानु -दे- लिना, आंतरराष्ट्रीय उर्जा एजन्सीचे जैव उर्जा अभ्यासक जेरेमी मुरहाऊस ,भारतीय बायोगॅस असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.आत्माराम शुक्ला ,उपमहाव्यवस्थापक अभिजित राजगुरु यांसह लांज्याचे सुपुत्र व देशातील जैव उर्जा क्षेत्रातील युवा अभ्यासक सईद मुल्ला यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
मानवाने एकविसाव्या शतकामध्ये अभूतपूर्व अशी तांत्रिक प्रगती साधली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सर्वच उपकरणांना कार्यान्वित करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते. पारंपरिक ऊर्जास्रोत- म्हणजेच मुख्यत: खनिज तेल व कोळसा यांची घटत जाणारी उपलब्धता आणि त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण हे नजीकच्या भविष्यात मानव व इतर सजीवांसाठी संहारक ठरू शकते. यामुळेच जगातील सर्वच प्रगत, प्रगतिशील आणि अप्रगत देश आज पर्यायी इंधनाच्या विविध मार्गाचा अवलंब करताना दिसतात. यादृष्टिने येणाऱ्या काळात मिथेनवर चालणारा बायोगॅस हे जैव इंधन स्वस्त ,स्वच्छ व कार्यक्षम ऊर्जा पुरविण्याच्या गुणधर्मामुळे महत्वाची भूमिका बजाविणार आहे.या दृष्टीनेच "भारतातील बायोगॅस क्षेत्रातील परिस्थिती व आगामी काळातील अमर्याद संधी" या विषयावर भारताच्या वतीने आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी युवाअभ्यासक सईद मुल्ला यांच्यावर सोपाविण्यात आली आहे.
लांजा तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर वसलेले देवधे हे अभ्यासक सईद मुल्ला यांचे मुळ गाव. गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.पुढे उच्च शिक्षणासाठी मुंबई चा मार्ग धरणा-या सईद मुल्ला यांनी बी.ई.( केमिकल इंजिनियरिंग) चे शिक्षण यशस्वी पूर्ण केल्यानंतर जैव इंधन क्षेत्रातील आव्हानांचा अभ्यास करण्याची संधी करिअर म्हणून निवडली.
आज भारतातील जैव इंधन क्षेत्रातील आघाडीचे उत्पादनतज्ञ असलेल्या मुल्ला यांना तेल आणि वायू उत्पादन, शुद्धीकरण उद्योग, उर्जा प्रकल्प, सिमेंट उद्योग, पाणी आणि उपयोगिता क्षेत्रातील १० वर्षापेक्षा जास्त अनुभव अाहे.
कोकणातील ग्रामीण भागात मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेऊन कमी वयात उत्तुंग यश मिळविलेल्या सईद मुल्ला यांची आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिसंवादात भारताच्या वतीने भुमिका मांडण्यासाठी निवड झाल्याचे वृत्त त्यांच्या देवधे या मुळ गावी समजताच ग्रामस्थांचा ऊर भरुन आला असुन त्यांनी आनंद व्यक्त केला.तर सईद चे बाबा गुलाम मुल्ला यांची याविषयीची " मेहनत रंग लायी " हि प्रतिक्रिया फारच बोलकी ठरली आहे. तरुण वयातच उज्वल यश मिळवित लांजा तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवणा-या सईद मुल्ला यांची जैव इंधन क्षेत्रातील गगनभरारी कौतुकास्पद असुन नव्या तरुणाईला आदर्शवत अशीच आहे.
नव्या तरुणाईला एक नवा आयकाॅन देणारा सईद मुल्ला यांच्या आईवडिलांना मोडीदर्पणचा सलाम.
विजय हटकर
No comments:
Post a Comment