पर्यटन वाढीचा रत्नसिंधु मार्ग
रत्नागिरीत अलीकडेच पर्यटन विषयक परिषद झाली कोकणातील पर्यटनाला किती आणि कसा वाव आहे यावर या परिषदेत उहापोह झाला, अशा तर्हेच्या परिषदा अधून मधून होत असतात, पण त्यातून कृतिशील काम होत नाही कारण उपाय कितीही सुचवले गेले तरी ते प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रात अनेक व्यक्ती आपापल्यापरीने व्यवसायाला चालना देण्यासाठी तो वाढविण्यासाठी काही उपाय शोधत असतात, त्यावर काम करत असतात, आणि व्यक्तिगत पातळीवर यशस्वीही होत असतात. पर्यटनाच्या क्षेत्र हे असे एकट्याने काम करण्याचे नाही त्याला सामूहिक प्रयत्न आवश्यक असतात. त्यामुळे परिषदांमध्ये कितीही मुद्दे मांडले गेले तरी त्यातील प्रत्यक्षात किती येतात यावरच या परिषदांचे फलित अवलंबून असते. रत्नागिरीच्या परिषदेत उपस्थित राहिलेल्या लांज्यातील दोघा तरुणांनी मात्र त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
विजय हटकर आणि नितीन कदम या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रत्नसिंधू नावाची तूर्त तरी आभासी संस्था सुरू केली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील काही देवी क्षेत्रांना भेट देण्याची, एक दिवसाची सहल आयोजित केली आहे. त्यासाठी एका मिनीबसची व्यवस्था केली आहे, त्या करता येणारा खर्च पर्यटकांमध्ये विभागला जाणार आहे. त्यांचा हा प्रयत्न अत्यंत छोटा असला, तरी तो नक्कीच दिशादर्शक आहे. पर्यटनाच्या वाढीच्या दिशेने टाकलेले ते छोटेसे पाऊल आहे पण त्यातून अनेक गोष्टींना चालना मिळणार आहे. कारण सहल जाहीर केल्यानंतर अगदी दोन दिवसात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये मुंबई आणि गोव्यातील काहीजणांनीही सहलीत सहभागी होण्याची इच्छा दाखविली आहे, त्यावरून अशा वेगळ्या प्रयत्नांची गरज आहे हे लक्षात येते.
अनेकजण पर्यटनाला जातात. मोठमोठ्या आणि प्रसिद्ध ठिकाणांना भेट देत असतात. त्यांच्यासाठी टूर ऑपरेटर्स काम करतात.देश विदेशात अशा सहलींचे आयोजन केले जाते, पण अशी जगभ्रमंती करणार्या पर्यटकांनी आपल्याच परिसरातील अनेक ठिकाणी पाहिलेली नसतात, ती त्यांना पाहायची नसतात, असे नव्हे. पण त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणाऱ्या मार्गदर्शकाचा अभाव असतो. ती ठिकाणे लौकिक दृष्टया प्रसिद्ध नसली, तरी पर्यटनाचा मूळ हेतू साध्य करण्याची क्षमता या ठिकाणांमध्ये असते. कोकणातील प्रत्येक गावच मुळात सुंदर आहे. या गावाकडे जाणारे रस्ते सृष्टी सौंदर्याचा मनमुराद आनंद देतात. त्यामुळे प्रत्येक गावातच पर्यटनाला जाणे खूप आनंदाचे असू शकते पण अशा ठिकाणांची प्रसिद्धी पर्यटन स्थळ म्हणून होत नसते, हेच हेरून रत्नसिंधू संस्थेने, नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून, तालुक्यामधील देवीच्या मंदिराला भेट देण्यासाठी धार्मिक सहलीचे आयोजन केले आहे. सहलीत सहभागी होणाऱ्यांनी ही ठिकाणे पूर्वी पाहिले असतील किंवा नसतीलही, पण सहलीच्या निमित्ताने संबंधित गावाविषयी माहिती अनेकांपर्यंत पोहोचेल. पण अशा तऱ्हेच्या छोट्या सहलीचे आयोजन करण्याची दिशा अनेकांना मिळेल. ज्यांनी सहल आयोजित केली आहे, त्यांच्याकडे सोयीच्या दृष्टीने म्हणून कोणतीही साधने नाहीत. त्यांचे हॉटेल नाही, त्यांची स्वतःची बसही नाही, त्यांना स्वतंत्र मार्गदर्शक नेमलेला नाही, हे दोघेच मंदिराची माहिती पर्यटकांना देणार आहेत. कल्पकता असेल तर पर्यटनाच्या क्षेत्रात काय करता येऊ शकते, याचे हे अत्यन्त छोटे उदाहरण आहे, म्हणूनच ते मार्गदर्शक आहे.
*प्रमोद कोनकर*
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया. ८ ऑक्टोबर 2021)
No comments:
Post a Comment