Wednesday, October 12, 2022

कोकणच्या इतिहासाचा नंदादीप मालवला...

 कोकणच्या इतिहासाचा नंदादीप मालवला...



     कोकणच्या इतिहासाला अविरत संशोधनातुन नवा आयाम देणारे ,असंख्य अभ्यासकांचे श्रद्धास्थान असलेले ९३ वर्षीय इतिहास संशोधक अण्णा शिरगांवकर यांचे काल (११ आॅक्टोबर)रोजी चिपळुण येथे निधन झाल्याचे वृ्त कळताच धक्का बसला.१६ जुलै २०२२ ला शिरगांव ता.चिपळुण येथे झालेल्या तासाहुन अधिकच्या भेटीत त्यांच्या बोलण्यातील आत्मविश्वासावरुन अण्णा शतक पुर्ण करतील असे वाटत असताना ९३ व्या वर्षी त्यांना मृत्यूने गाठले.त्यांच्या अशा जाण्याने कोकणच्या इतिहास, संस्कृती ,सामाजिक क्षेत्रात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.


    खरं तर अण्णांची झालेली पहिली भेट माझ्या आजही चांगलीच स्मरणात आहे.२५ डिसेंबर २०१५ रोजी मी आमच्या ज्युनियर काॅलेज लांज्याची शैक्षणिक सहल घेऊन दापोली तालुक्यातील दाभोळ या ऎतिहासिक गावाला भेट दिली होती.यावेळी कोकणातील शोधक पत्रकार व पर्यटन अभ्यासक म्हणुन दखलपात्र काम करणा-या श्री धीरज वाटेकर यांच्या माध्यमातून अण्णांच्या दाभोळ येथील "अपरान्त "निवासस्थानी सायं.६:३० च्या दरम्यान अण्णांची भेट झाली.यावेळी घराच्या अंगणात माझ्यासह सहलीत सहभागी झालेल्या ४१ मुलांनी इतिहास संशोधक अण्णांशी संवाद साधला.यावेळी अण्णांनी ४०:०० मिनीटाच्या व्याख्यानात इतिहासप्रसिद्ध दाभोळ बंदरांचा इतिहास आपल्या नर्मविनोदी शैलीत उलगडवला. यावेळी अण्णानी अनेक दशके अथक मेहनतीतुन कोकण धुंडाळुन जमा केलेला संग्रह व पुस्तकांचा खजिना आम्हाला दाखवित शिक्षक म्हणुन जास्तीत जास्त पुस्तके वाचा तरच समृद्ध पिढी घडवाल असा प्रेमळ सल्लाही दिला.या पहिल्याच भेटीत अथक संशोधनातुन कोकणच्या इतिहासाला नवा आयाम देणा-या  इतिहास संशोधक अण्णांच्या व्यक्तिमत्वाने आमच्या मनावर कायमचीच मोहिनी घातली.इतिहास - कोकण हे आमचेही आवडीचे विषय असल्याने पुढे अण्णांशी शिष्यत्वाचे नातेच जडले.

        

    इतिहासाच्या वेडापायी अख्खा कोकण पायथा घालून अण्णांनी ताम्रपट,शिलालेख ,प्राचीन मूर्त्या, हस्तलिखिते,दूर्मिळ पत्रे,शस्त्रे, नाणी शोधून काढत कोकणच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याचे काम करित कोकणला प्राचीन इतिहास नाही असे म्हणणा-या अभ्यासकांचे पुराव्यानिशी म्हणणे खोडून काढले. याकामी त्यांनी अथक मेहनतीतुन शोधलेल्या ९ ताम्रपटांनी तर मोठ्या इतिहास संशोधन संस्थाही अवाक झाल्या. कोकणच्या इतिहासावर अधिक संशोधन व्हावे ,नव्या तरुण अभ्यासकांनी याकडे वळावे यासाठी डाॅ.दाऊद दळवी, श्री रविंद्र लांड यांच्यासह त्यांनी कोकण इतिहास संशोधन परिषदेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. गेटवे आॅफ दाभोळ , शोध अपरान्ताचा, प्रकाशदीप , इकडचं तिकडचं, माॅरिशस,इस्त्राइल आणि युरोप , ऎतिहासिक दाभोळ-वर्तमान व भविष्य , शेव चिवडा इ.दर्जेदार पुस्तके लिहून मराठी वाड:मय व कोकणचा इतिहास या विषयात त्यांनी मौलिक भर घातली. इतिहासाबरोबरच मराठी भाषेवरील प्रेमापोटी कोमसाप च्या दापोली  शाखेला त्यांनी दिशा दिली.दापोलीत झालेल्या कोमसापच्या साहित्य संमेलनातील त्यांचे अध्यक्षीय भाषण कोकणातील मराठी साहित्य विश्र्वाची माहिती देणारे आहे.तेव्हाच्या सावंतवाडीपासुन मंडणगड पर्यंत पसरलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचे बांधकाम सभापती पद भुषवित त्यांनी राजकरणात तत्वनिष्ठता,वैचारिक अधिष्ठान जपत मोठा लोकसंग्रह निर्माण केला.मात्र जास्तवेळ ते राजकरणात रमले नाहीत.

   


      साधारण २०१६ च्या आसपास विजय,आपण लांज्याला कोकण इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन भरवुया अशी इच्छा व्यक्त करित या संदर्भात बैठक घेण्यासाठी रविंद्र लाड, सदाशिव टेटविलकर, प्रविण कदम, डाॅ.विद्या प्रभू ,डाॅ.अंजय धनावडे या मंडळींसह अण्णा लांज्याला आले होते.यावेळी लांजा महाविद्यालयात झालेल्या बैठकीत लांज्याचा आजवर पुढे न आलेला इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी लांजेकरांनी या परिषदेच्या आयोजनात पुढाकार घ्यावा असा आग्रह ही त्यांनी केला. मात्र तांत्रिक कारणांनी ती परिषद पुढे लांज्यात आयोजित करता न आल्याने अण्णांच्या अभ्यासपुर्ण व्याख्यानाची संधी मात्र आम्ही गमाविल्याची खंत मला अनेक दिवस बोचत राहीली.मात्र या नंतरही अण्णा मोबाईलवरुन आस्थेने संपर्क साधून वडिलकीच्या नात्याने चौकशी करितच राहिले.यामुळेच त्यांच्या साध्या ,निर्मळ स्वभावाने अनेकांना मोहिनी घातली.कोरोनाच्या वैश्र्विक संकटात मराठी भाषेतील अनेक दिवाळी अंक बंद पडण्याच्या मार्गावर असताना आम्ही मार्गदर्शक सुभाष लाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोडी लिपी चा प्रचार करणारा मोडीदर्पण दिवाळी अंक पुन्हा एकदा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला याचा अण्णांना आनंद झाला होता.कारण लाड सरांनी मुंबईत ' मोडी लिपी मित्र मंडळाची' स्थापना केली तेव्हा मोडी लिपीच्या प्रचारार्थ १९९७ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अण्णा प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.गतवर्षीच्या मोडीदर्पण दिवाळी अंकातील त्यांचा ' जुनं आता काय राहिलंय नाय!' हा विचार करायला प्रवृत्त करणारा लेख वाचून अनेक वाचकांनी लेख आवडल्याचे अभिप्राय कळवित अण्णांविषयी आदरभाव व्यक्त केला.

     खरं तर अण्णा ऎषोआरामी आयुष्य सहज जगले असते मात्र दाभोळच्या खाडीपरिसरातील वंचित,गरजू, बहुजन मुलांच्या भविष्याचा विचार त्यांच्यातील समाजसेवकाला स्वस्थ बसु देत नव्हता.या उपेक्षितांच्या आयुष्यात आनंदाचा मळा फुलविण्यासाठी अण्णांनी १९८३ ला सागरपुत्र विद्या विकास संस्थेची स्थापना केली.यामुळे अनेकांच्या जीवनाला दिशा मिळाली.अण्णांच्या सहवासात जीवनाचे नेमके प्रयोजन कळल्याने सागरपुत्र मधुन बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी आज सेवाव्रती भावनेनं समाजात कार्यरत आहे.अण्णांच्या त्यागाचं ते  अविट फळ आहे. नंदिनी काकूवर असलेल्या निस्सीम प्रेमाचे प्रतिक म्हणुन त्यांनी शब्दबद्ध केलेले आनंदिनी तर प्रत्येक पुरुषाने आपल्या जीवनातील स्त्री शक्तिकडे कसे पहावे याचा वस्तुपाठ घालून देणारेच आहे.मात्र त्यांच्या सगळ्या कार्यात सोबत असणारी नंदिनी काकू साथ सोडून गेल्यावर मात्र अण्णा आतून खचले होते.तरीही सहका-यांच्या साथीने त्यांनी आपल्या सहचारीणीचा प्रत्येक स्मृतिदिनाला साहित्यिक निर्मितीतून वाहिलेली आदरांजली ही वाड:मयीन चळवळीतील दूर्मिळ उदाहरण असावे.यामुळेच ते वेगळे ठरले.अखेरच्या श्वासापर्यंत स्मरणशक्ति,श्रवणशक्ति , चिंतन-मननशक्ति या त्यांच्या सर्व शक्ति शाबुत होत्या.हे त्यांचं आणि आपलं भाग्यच!


      सृष्टी फुलविण्यासाठी विध्यात्याने आपल्याला जन्माला घातले आहे हे जीवनाचे प्रयोजन समजलेली माणसे कामालाच पुजा मानून सतत कार्यमग्न असतात.ही कार्यमग्नताच खरी दीर्घायुषी जीवनाचे गुपित आहे.हे सहस्त्रचंद्रदर्शन  सोहळा अनुभवलेल्या व्यक्तींशी साधलेल्या सहजसंवादातून सहज उमगते. आयुष्यभर कार्यमग्न राहून स्वर्गीय सुंदर कोकणच्या इतिहासाला आयाम देणा-या ९३ वर्षीय इतिहास संशोधक , कोकणचा चालता बोलता कोष बनलेल्या अण्णा शिरगांवकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड यांच्यासह आम्ही १६ जुलै २०२२ रोजी म्हणजे साधारण तीन महिन्यापुर्वी शिरगांव येथे त्यांच्या मुलीच्या घरी सदिच्छा भेट घेतली. आयुष्यभर समाजासाठी, कोकणच्या इतिहासासाठी, वंचितांच्या शिक्षणासाठी झटलेल्या अण्णांचा सत्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा हे त्यामागचे प्रयोजन होते,मात्र आम्ही सत्कार करण्याआधीच त्यां भरभरुन देणा-या हाताने आम्हा तीघांच्या खांद्यावर आमच्या कार्याचे कौतुक म्हणुन आयुष्यभर पुरेल इतक्या मायेची ऊब देणारी शाल पांघरुन " सार्थकी जगणे " या संकल्पनेचा अर्थ उलगडवून दाखविला.अण्णांच्या या अनपेक्षित कृतीने डोळ्यात कृतज्ञतेच्या आसवांनी दाटीवाटी केली होती.सोबतच आम्ही करित असलेल्या बिनखुर्चीच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचेही त्यांनी कौतुक केले.हा क्षण कायमचाच हृदयात कोरुन गेला.आज सकाळी कोकणच्या इतिहासाला प्रकाशात आणणारा हा नंदादीप मालवल्याचे वृत्त कळताच धक्काच बसला.मात्र या नंदादीपाने दाखविलेल्या प्रकाशात कोकणचा इतिहास अधिक उठून दिसेल हे निश्चित! एकुणच 

 उत्कट भव्य तेंची घ्यावे।मळमळीत अवघेंचि टाकावे            निस्पृहपणे विख्यात व्हावे।भूमंडळी।

    याला अनुसरून जगणे जगणा-या अण्णांना मोडीदर्पण परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !


विजय हटकर

८८०६६३५०१७

No comments:

Post a Comment