आनंदाला भरती आणणारा उत्सव
श्री गणपती ही देवताच ज्ञानाची, सर्व कलांची, विद्येची, प्रतिभेची अन् मानवी जीवनातील शुभंकराची.या वर्षीही परंपरेप्रमाणे आमच्या घरी तिचे उत्साहात आगमन झाले. सर्व कुटुंबियांचा उपस्थितीत बाप्पाची मोठ्या प्रेमाने, आस्थेने ,भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठापना केली.
कोकणातील संस्कृतीचे भूषण असलेल्या भाद्रपद महिन्यातील घरगुती गणेशोत्सवाचे इथल्या जनमानसात एक आगळे स्थान आहे.कोकणातील प्रत्येक माणूस या काळात एका वेगळ्याच धुंदित जगत असतो. आज बाप्पाच्या आगमनाने खरं तर लहानग्या विधी, देवसह घरातील सारे अबालवृद्ध आनंदित झाले.गावी बाप्पाला आवडणाऱ्या दूर्वा काढण्यासाठी आम्हा भावंडात क्रम लागायचे. गावी अर्थात तळवड्या ला दूर्वा भरपूर मिळायच्या. यंदा मात्र प्रथमच लांज्यासारख्या कोकणातील शहरातही दूर्वा विकत घ्याव्या लागल्या.मूळ गाव तळवडे येथे आजोबांनी सुरु केलेला परंपरागत गौरी विसर्जनापर्यंत स्थानापन्न होणारा बाप्पा लांज्यात मात्र दिड दिवसाचा झाला अाहे.मात्र त्यातील उत्साह, आनंद कमी झालेला नाही.लहानपणी गणपतीची मूर्ती आम्ही भावंडं निरखून -पारखून पहायचो व तेजस्वी, मनोहारी बाप्पाच्या दर्शनातून " पाहता श्रीमुख सुखावले सुख" असे प्रसन्न वाटायचे.आज कन्या कु.विधी जेव्हा बाप्पाकडे तशी पाहते तेव्हा गावातील कळीजकोपरा व्यापलेले ते हृदयस्थ दिवस डोळ्यासमोर उभे राहतात.
खरं तर गणेशोत्सवाच्या आठवणी निघाल्या की साहजिकच तळवडयाचे नाव येते. लांजा तालुक्यातील निसर्गरम्य तळवडे या गावातील मूळ घरी साधारण २००९ पर्यंत आम्ही गणेशोत्सव साजरा करायचो. त्यानंतर तिथले मातीचे कौलारू जुने घर कोसळल्याने मग लांज्याला आम्ही हा बाप्पाचा उत्सव सुरु केला. तळवडेचे मूळ घर क्षेत्रफळाच्या दृष्टीने फारच लहान होते. सुरवातीला पडवी, व आत तीन खोल्यांच्या या घरात प्रसंगी वीस - पंचवीस माणसे ही सहज राहत असत. तेव्हा पडवीत पावसाच्या पाण्याने जमिनीला ओल येऊ नये म्हणून करवंदीची सलटी लावलेली असत. भाद्रपद जवळ येऊ लागला की घराची साफसफाई करून मातीच्या भिंतीवर गावी राहणारी बेबी आत्या सुंदर नक्षीकाम करायची. देवघर पताक्यांच्या सुंदर नक्ष्यांनी सजविले जायचे. गणपती बसवायचे जुने आयताकृती टेबल रंगीबिरंगी कागदानी सजविले जायचे. दरवर्षी पेटीत जपून ठेवलेले कापडी छत, व पडदे लावून छान आरास केली जायची.बापाच्या आरती व पुजेसाठी लागणारी भांडी चौकवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर असणाऱ्या तळीवर आम्ही भावंडो धुवायला नेत असू. तळीकाठी रिंगाचे झाड असल्याने खाली पडलेल्या रिंगा गोळा करताना फार मजा यायची. या रिंगा व राखाडीने पुजेची तांब्या पितळेची भांडी लख्ख उजळून जायची. तेव्हा पितांबरी पावडर बाजारात आलेली नव्हती. एका बाजुला कातळसडा व दुसऱ्या बाजुला भाताची हिरवीगार शेतं यातल्या थोड्या खोलगट भागात असलेले हे तळे साती आसरांचे ( सप्त मातृकांचे ) जागृत स्थान होते. तळाच्या पहिल्या पायरीजवळूनच छोटासा पावसाळी ओढा व्हायचा. या पाण्यातच भांडी व कपडे धुतले जात असत. तर तळ्यातील गोड पाणी पिण्यासाठी वापरले जायचे. तळ्याच्या एका बाजुला असणारे कातळ आषाढ श्रावणात बरसलेल्या जलधारांमुळे सतरंगी इंद्रधनु प्रमाणे भासायचे. सोनसळी च्या नाजूक पिवळ्या फुलांनी तर गालिछा पसरलेला भास व्हायचा. त्यात छोटी - छोटी गोंडस लालसर मजेदार उमलणारी तेरड्याची फुले,रानकेवडा, रान गुलाब, भुईचाफा, कापसी, सुरंगी, तपकी, आर्किड,सडसडी आदी विविध रानफुले बहरून येत असत.रानफुलांचा हा रंगबिरंगी पुष्पोत्सव आम्हाला खूप आवडायचा. तेव्हा कोकणातल्या प्रत्येक गावातला सडा हा आजच्या कास पठारा एवढाच श्रीमंत होता. लाडक्या बाप्पाच्या उत्सवात मांडवीच्या सजावटीसाठी याच फुलांचा आम्ही उपयोग करायचो.गौरीपुजनाच्या दिवशी आमचे शेजारी मजवुले (जाधव ) व सावंतांच्या घरातील महिलामंडळ याच तळ्यावरून तेरड्याच्या गौरी पारंपारीक गाणी म्हणत घरी घेऊन जात असत. गणेशत्सवात आम्हा भावंडांना मायेची ओढ लावणारं हे तळं व तळ्याकाठचा परिसर मनाच्या हळव्या कोपऱ्यात आजही तसाच ताजा आहे.
भाद्रपद चतुर्थीच्या आदल्या दिवशी तयारी पूर्ण झाली की, बाळ्या बाबा ( धाकटे चुलते ), भाऊ दादा व आप्पांसह लांज्याला सुभाष शेटे सरांच्या चित्रशाळेतून गणपती आणायला जाण्यासाठी आम्ही बालमंडळी हट्ट धरायचो, पण ही मोठी मंडळी सुरुवातीला आम्हाला घेऊन जात नसत. मग आम्ही हिरमुखायचो. तळवड्यातील आमचं घर मुख्य हमरस्त्यालाच असल्याने लांज्यावरून तळवड्या सह शेजारच्या गावात डोक्यावरून चालत गणपती घेऊन येणारे गावकरी तळवडे फाट्यावरील अश्वत्थ वृक्षाच्या (पिंपळ ) छायेखाली थोडा वेळ विसावत असत. त्यामुळे अनेकांच्या घरातील बाप्पाचे दर्शन आम्हाला मात्र अगोदरच व्हायचे. गावातील काही प्रतिष्ठीत रावमंडळी ढोल - ताशांच्या गजरात बाप्पाला वाजत- गाजत घेऊन यायचे तेव्हा मी, दीपू, बापू, पिंकी या भावंडांसह धावत धावत रस्त्यावर जाऊन गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करायचो. खुप उत्साह आम्हा बालगोपाळात संचारलेला असायचा.यातच ज्येष्ठ मंडळी बाप्पाची पार्थिव मूर्ती घरी घेऊन आले की सगळ्यांचीच लगबग वाढायची. आई, काकी बाप्पाच्या आगमनाने आनंदून त्याची मनोभावे पुजा करायच्या. मग मोठ्या गजरात बाप्पाचे घरात आगमन व्हायचे. रात्रभर आम्ही बाप्पा उद्या मखरात विराजमान होणार या उत्कंठेने पेट्रोमॅक्सचा प्रकाशावर मखर सजावटीत काही राहिले नाही ना याकडे लक्ष द्यायचो.
यातच गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस यायचा. घरातील सर्व ज्येष्ठ मंडळींच्या देखरेखी खाली बाप्पा मखरात विराजमान व्हायचा. परसवातील जास्वंदाच्या फुलांचा हार बनविणे, दूर्वा व गणेशवेल आणने यात आम्ही गुंतून जायचो.बाळा बाबा बाप्पांची भक्तिभावाने पुजा करायचे. मखरात बाप्पांच्या दोन्ही बाजूंना मांडलेल्या समय रात्रंदिवस तेवत राहून प्रकाश देत असायच्या.समईतील तेलाकडे आमचे लक्ष असायचे. गौरी विसर्जनापर्यंत असलेल्या आमच्या बाप्पाला मग सहा-सात दिवस वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जायचा. त्या काळी घरी वीज नसल्याने पेट्रोमॅक्स बत्ती च्या उजेडात होणाऱ्या त्या काळच्या उत्सवाला एक वेगळीच मजा वाटायची. चतुर्थीला पार्थिव गणेशमूर्तीची स्थापना झाल्यावर दुपारच्या उकडीच्या मोदकासहित झालेल्या भोजनाने सुस्ती यायची.
तळवडे फाट्यावर 'तेव्हा सहा सात घरे होती. पण ती सगळी एकमेकांपासून लांब असल्याने सायंकाळ झाल्यावर शेवटची एसटी लांज्याला माघारी वळल्यावर घरोघरी आरतीला जाण्यासाठी सावंताच्या घरी आम्ही सर्व एकत्र यायचो. यात प्रामुखाने शांताराम काका पाटोळे,विजय व प्रकाश कोलापटे, मुंबईकर जाधव काका, सावंतबंधू व दीपू बापुसह मी आघाडीवर असायचो. बालपणी माझ्या सगळ्या आरत्या पाठ असल्याने सर्वच मंडळी माझं कौतुक करायचे.त्याने भारावून जाऊन मी अधिक उत्साहाने आरत्या म्हणायचो.
प्रसादाला साखर फुटाणे, पेढे,मोदक, सफरचंद, किंवा कापलेल्या केळ्यांचा प्रसाद मिळायचा. तसेच परसवात पिकलेल्या काकड्या व चिबुड ही मनसोक्त खायला मिळायचे. टाळ मृदुंगासहित होणाऱ्या या आरत्यांनी घरे दणाणून जायची. गणपतीला रात्री घरी जागरण व्हायला पाहिजे म्हणून वर्षातून फक्त सणाचे पाच- सहा दिवस मेंडीकोट हा पत्त्यांचा डाव रंगायचा. त्यात ताई आत्तेवर जर कोट झाला तर ती खुप चिढायची ते बघण्या सारखे असायचे. या खेळात बापुसुद्धा चिडायचा. आज या साऱ्या आठवणी आठवल्या तरी देखील हसायला येतं. खरं तर तेव्हाची परिस्थिती हालाखीची होती मात्र त्याही परिस्थितीत हसत मुखानं साजरा होणारा गणेशोत्सव मनाला उभारी द्यायचा.
या पाच - सहा दिवसात बेबी आत्तेच्या हाथची कुरडू व टाकळा या रानभाज्यांची चव चाखायला मिळायची. भाद्रपद सप्तमी किंवा अष्टमीला ज्येष्ठा गौरीच्या आगमन सोनपावलाने झाले की घरी तिला नैवेद्य म्हणून मांसाहारी नैवेद्य दाखवला जायचा. गौरीच्या निमित्ताने आम्ही सर्व भावंड एकत्र त्यादिवशी मांसाहारी पदार्थांवर ताव मारायचो. अशा उत्सवात गौरी विसर्जननापर्यंतचे सहा सात दिवस कसे भराभर जायचे हे कळायचे नाही. आणि गौरी विसर्जनाचा तो दिवस उगवायचा. तेव्हा आज सारखी अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती ठेवण्याची पद्धत गावात फारशी नव्हती. सायंकाळी चार ते पाच च्या दरम्यान ठरल्याप्रमाणे सवाद्य गौरीसह गणपतीची मिरवणूक निघायची. कोकण रेल्वेचा मार्ग झाल्याने गावातून नदीकडे जाणारा पारंपारीक विसर्जनाना मार्ग अडचणीचा वाटू लागल्याने गावकरीही तळवडे फाट्यावरूनच नदीकडे विसर्जनाला येत असत. त्यामुळे फाट्यावरची आम्ही सर्व मंडळी गावकऱ्यांच्या गणपतींची वाट पाहत असायचो. गावातील बहुसंख्य मराठ्यांसह कष्टकरी कुणबी समाजाचे गणपतीही एकत्र विसर्जनाला निघायचे. गावातील बाप्पाच्या मूर्तींची उंची त्याकाळी दोन-अडीच फुटापेक्षा अधिक नसायची. त्याकाळी मोठ्या मूर्ती आणण्याची स्पर्धा नव्हती. दिखाऊपणाला महत्त्वही नव्हते. महत्त्व होते ते श्रद्धेला. गावातील मानकऱ्यांसह गावकऱ्यांची वाजत गाजत विसर्जनाची मिरवणूक फाट्यावरती आली की आम्ही सर्वजण त्यात सहभागी व्हायचो आणि पक्क्या डांबरी सडकेने एका मागोमाग एक नदीवरील जितोरा ( जिवंत झरा ) या कोंडीकडे मार्गस्थ व्हायचो. प्रत्येक घरातील तरुण मंडळी डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन नदी घाटावर चालत जात असत. विसर्जनाच्या मिरवणुकीत श्री गणेशाची पारंपारीक गाणी गायली जायची. नदीवरील विसर्जन घाटावर गणपती बाप्पा आले की एका रांगेत सर्व मुर्त्या बसविल्या जायच्या. घरातील महिला मंडळी मुर्त्यांच्या मागे गौराईसह उभ्या रहायच्या.तर पुढील बाजुस पुरुषमंडळी असायची.सर्वांनी आणलेला प्रसाद वाटण्यासाठी एकत्र केला जायचा. प्रसाद व्यवस्था पूर्ण झाल्यावर मंगलमूर्ती मोरयाचा ध्वनी, गुलालाचा धुमाकूळ, मानकरी, गावकरी व गुरुवांचे जोरदार पारंपारिक नवस, बुटक्या ढेपेची लक्षवेधी गाणी व घोषणा व सरतेशेवटी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित केलेल्या आरत्या यामुळे विसर्जन घाट परिसर दणाणून जायचा. पुढे प्रत्येक घरातील पुरुष मंडळीनी बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी नदीपात्रात नेली की काठावर उभी असलेली सर्व मंडळी बाप्पाला साश्रुनयनाने भावपूर्ण निरोप देत असताना दुःखाची झालर सर्वांच्या नजरेवर दिसायची. गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या... अशी बाप्पाला आळवणी करत घराकडे परतण्याच्या मार्गावर पावले पडत असताना श्रींचे विसर्जन सुखरूपपणे पार पडल्याचे अपूर्व समाधान ज्येष्ठांच्या चेह -यावर दिसायचे. नोकरी-धंद्यासाठी मुंबईत राहणारे कोकणवासी एकमेकांच्या भेटी घेऊन आता शिमग्याला भेटू असे म्हणत घरी परतायचे. पावित्र्य व मांगल्य जपत साजरा केल्या जाणा-या तळवडेतील पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची साठवण ख-या अर्थाने आजही मनात परसवातल्या फुललेल्या लालसर जास्वंदासारखीच ताजी आहे.
'सुखकर्ता' श्रीगणेशाचा उत्सव आणि पुढील काळही आपणा सर्वांना मंगलमय आणि निर्विघ्नतेचा जावो, ही शुभेच्छा.
श्री.विजय हटकर
२७/०८/२०२५




No comments:
Post a Comment