Friday, August 8, 2025

अक्षररेषा : एका निर्भिड व्यक्तिमत्वाच्या..

 अक्षररेषा : एका निर्भिड व्यक्तिमत्वाच्या..

💠💠💠💠💠💠

 गजाभाऊ वाघदरे प्रथम पुण्यस्मरण विशेष

०१/०३ /१९३८ ते ०८/०८/२०२ ४

💠💠💠💠💠


         मला लांजा बाजारपेठेतील शिरवटकरांच्या गोपीकुंज इमारतीत राहायला येऊन आता बारा वर्षाचा काळ लोटला आहे. या काळात  भिडस्त स्वभावाचा पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून लांज्यात प्रसिद्ध असलेले ८४ वर्षाचे चिरतरुण श्री गजाभाऊ आठवड्यातून मला दोनदा भेटायला सायंकाळच्या वेळेत येत असत.साधारण वीस-पंचवीस मिनिटे साहित्य,समाजकारण,लांजा या विषयांभोवती गोलाकार फिरणाऱ्या गप्पा मारल्या की ते समाधानाने घरी परतत. गेली सहा -सात वर्षे त्यांचे हे येणे समाधान देणारे होते. मात्र दोन वर्षापूर्वी वार्धक्यात आलेल्या अर्धांगवायूमुळे शरीराचा काही भाग प्रतिसादहीन झाल्याने ते वर्षभर घरातच अडकून पडले.व घरात स्वस्थ बसण्याची सवय नसलेले गजाभाऊ ०८ ऑगस्ट २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी दिगंताचे प्रवासी झाले. आज त्यांचा प्रथम स्मृतीदिन. यानिमित्ताने त्यांचाविषयीच्या आठवणींचा भावबंध...


              लांज्याची  जुनी बाजारपेठ म्हणजे सोनार गल्ली, चव्हाटा गल्ली, पोस्ट गल्ली परिसर होय. असे बुजुर्ग सांगतात.यातील पोस्ट गल्लीत 'श्रीनिवास' नावाचे कौलारू घर लांजा तालुक्यातील साहित्यिकांचे,समाजवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचे,पत्रकारांचे साधारण १९६०ते २०१० या पाच दशकांचे केंद्र जणू! या घरातूनच सुवर्ण महोत्सव साजरे करणारे स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस आजही सुरू आहे.या सर्वांच्या धडपडी मागे होते एक रोखठोक व्यक्तिमत्त्व, ते म्हणजे गजाभाऊ वाघदरे! समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणारे साप्ताहिक आंदोलन चे संपादक, जनता दलाचे निष्ठावंत पाईक, स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस ते संचालक, समाज सुधारणांचा आग्रह धरणारा भिडस्त कार्यकर्ता, प्रेमळ भावबंध सह समाजातील वास्तव चित्रण करणारा सत्यनिष्ठ साहित्यिक ते प्रेमळ माणूस असे कितीतरी कांगोरे असलेले त्यांचे व्यक्तिमत्व.


          तर गेली सात ते आठ वर्ष ते नेहमी आठवड्यातून किमान दोन वेळा माझ्या घरी येत असत.पहिल्या मजल्यावर मी राहत असल्याने भाऊ वीस एक जिने संभाळून चढून येतात तेव्हा मला फारच काळजी वाटायची कारण त्यांनी वयाची गाठलेली ऐंशी.ते नेहमी मला म्हणतात -

  " विजय , या तीन गल्लीत मला तुलाच भेटावेसे वाटते, तुझ्याशीच गप्पा माराव्याशा वाटतात, कारण तू साहित्य क्षेत्रात धडपडतो आहेस त्याचे कौतुक वाटते,बाकी पुस्तके  वाचायला वेळ कुणाला आहे सध्या?" -  त्यांच्या या बोलण्याने आपल्या कामाला जाणणारे जेष्ठत्व अवतीभोवती आहे ही कल्पनाच अंगात अधिकची उर्जा निर्माण करते.गतवर्षी २०२२ ला त्यांचे  वयाच्या ८३ व्या वर्षी 'झाकोळ' हे आत्मकथन प्रसिद्ध झाले.त्याच्या समर्पणपत्रिकेत 'दुरितांचे तिमिर जाहो मधील दुरितांना अर्पण ' असे त्यांनी लिहिले, तेव्हा वंचित शोषित कष्टकरी,रयतेविषयी त्यांची आस्था पाहून अवाक व्हायला झालेले.



          अशा आमच्या छंदिष्ट भाऊंना पत्रलेखनाचाही मोठा छंद होता.आजच्या ब्लाॅगचा तोच विषय आहे.मराठी विश्र्वातील अनेक साहित्यिक, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना गजाभाऊंनी असंख्य पत्रे लिहून पत्रमैत्री जोपासली  होती. तसेच त्यांचीही अनेक पत्रे त्यांना आलेली.मात्र मराठी माणूस दस्तऎवजीकरणाच्या फंद्यात पडत नाही या सिद्धांताप्रमाणे त्यांनीही ती संकलित करून ठेवलेली नाहित.आजच्या ई- मेल च्या काळातील पिढीला खरं  तर पत्रलेखन, आंतरदेशीय कार्ड, पोस्ट कार्ड म्हणजे काय असतं?  ती कशी लिहीतात? ती कोण आणतं? पोस्टमन म्हणजे कोण? या सा-यांची कल्पनाही नसेल.आज काळानुरुप पत्राची जागा ईमेल अर्थात संगणकीय पत्र व मोबाईलच्या लघुसंदेशाने पटकावलेय,तरीही आजही अनेकांनी पत्रमैत्री जोपासली आहे.या मध्ये साहित्य,सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी पुढे आहेत. खरंतर गजाभाऊ साहित्य विश्वात रमणारा माणूस आमचे ज्येष्ठ अक्षरस्नेही श्री नारायण जाधव यांनी कोरोनाच्या सक्तीच्या टाळेबंदीत चक्क पाचशेहून अधिक पृष्ठांची ' तुझ्या संदर्भांचे स्मरण चांदणे' ही उत्कट प्रेमाची अनुभूती देणारी कादंबरी लिहिली. गजाभाऊंनी ही कादंबरी माझ्याकडून जवळपास पाच ते सहा वेळा घेऊन जात त्याची आवर्तनेच केली जणू. पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणारी अनेक माणसे मी पाहिली आहेत, त्यात गजाभाऊ ही आहेत. उत्तम साहित्यकृतीचे वाचन करीत राहण्यासारखं दुसरे उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? हे जाणणारे भाऊ पुस्तक वाचल्यानंतर त्या लेखकाला आवर्जून पत्र लिहीत,पुस्तकाविषयी अभिप्राय कळवित,आवडल्यास भरभरून कौतुक करत,त्रुटी असल्यास पुढील आवृत्तीत दुरुस्त करा असा प्रेमळ सल्लाही देत. त्यांच्या याउपक्रमामुळे अनेक लेखक-कवींशी पत्रमैत्रीतून त्यांचा स्नेहबंध दृढ झाला होता.

        

        मधल्या काळात गजाभाऊंनी २०१०-१५  या पाच वर्षाच्या काळात साधारण वयाच्या सत्तरीनंतर दिवाळी अंकांसाठी अनेक कथा लिहिल्या. पुढे 'क्रौंच' या नावाने या कथा पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्या. साहित्यविश्वातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या या कथासंग्रहाचे कौतुक केले. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा पाच -सहा दिवस गजाभाऊ भेटले नाहीत, म्हणून त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी त्यांचे घर गाठले. तेव्हा भाऊ रत्नागिरीतील चिरायु हाॅस्पिटलला अतिदक्षता विभागात आहेत हे कळताच मला धक्काच बसला. भाऊंना नेमके काय वाटते आहे ही चौकशी काकूंकडे करताना भाऊंच्या सोफ्यावर मला एक पत्र दिसले, उत्सुकतेने ते पत्र मी उचलले. ठाणे या साहित्याच्या बेटावरील एका दिग्गज  राजाभाऊ नामक साहित्यिकाचे ते  पत्र होते. गजाभाऊंचे समकालीन असणारे राजाभाऊ साहित्य क्षेत्रातील जाणकार आहेत हे त्यांच्या पत्रातील आशयसंपन्नता पाहूनच जाणवत होते.पत्रमैत्रीची आवश्यकता ,महत्त्व उलगडून सांगायला हे पत्र पुरेसे आहे.


        सन २०१६ साली लिहिलेले हे  राजाभाऊंचे पत्र म्हणजे मौलिक विचारधनच जणू! या पत्रातील ०३ निवडक विचार वाचकांसाठी या लेखात मांडतो आहे.

 १)  'म्हातारपणी शैषव येतं हा  सामान्य नियम पण. तारुण्य विरळ!'

   - या वाक्यातून सत्तरी नंतर आशयसंपन्न कथा लिहिणाऱ्या भाऊंच्या चिरतरुण मनाची प्रतिभेचे मुक्तकंठाने ते  प्रशंसा करतात.

२) जीवनातील विद्रुपासहीत वास्तव दाखवित वाचक, समाज यांना मांगल्याच्या श्रेयसाचं सतत भान देत व त्याचा ठसा उमटवण्याची धडपड करीत राहणं हे मोठं कठीण काम.काल्पनिक कथा ते काम अधिक सामर्थ्यपणे करू शकतात.म्हणूनच अशा काल्पनिक साहित्याचे महत्त्व अधिक.असे राजाभाऊ लिहितात त्या वेळी साहित्यविश्वातील काल्पनिक साहित्यप्रकार किती महत्त्वाचा आहे, त्याची नेमकी भूमिका कोणती आहे याची माहिती आपल्याला होते.

३) राजाभाऊ पत्राच्या शेवटी म्हणतात,

      - ' काळ नेहमीच बदलत असतो. तो अनुकूल असतो तेव्हा श्रेयसचा दिवा भव्य प्रकाश देईल; प्रतिकूल असेल तेव्हा मिणमिणता. श्रेयसाचे यात्रिक तो विझणार नाहीत एवढीच काळजी घेऊ शकतात. बस्स, रात्रीनंतर दिवस तसंच कलियुगा नंतर सतयुग येणारंच आहे. या प्रगाढ श्रद्धेत ईश्वर दडलेला आहे. या युगचक्राच्या संकल्पनेत आशा, दिशा, सामर्थ्य, प्रेरणा हे दडलेलं आहे.

        पत्रातील हा उतारा म्हणजे जीवनातील एक विशाल तत्त्वज्ञानच. माणसाचे आयुष्य ही सुखदुःखाची अतूट साखळी असते. असे अनेक प्रसंग माणसापुढे येत राहतात. ज्यात त्याला सोपा किंवा अवघड असे दोन मार्ग दिसतात. मार्गा प्रमाणे त्याचे फलित असते. वरकरणी सोप्या व कमी कष्टप्रद मार्गाने मिळणारे फलित ही सीमित असते तर अवघड व कष्टदायक मार्गाचे फलित निरंतर आणि दीर्घकालीन असते. प्रेयस म्हणजे सोपी व श्रेयस म्हणजे खडतर वाट निवडणे होय. प्रेयस हे  क्षणिक सुख भौतिक साधनातुन प्राप्त होते,तर श्रेयस हे सुख व्यक्ती समाधान व स्थितप्रज्ञ वृत्ती यातून प्राप्त करते. प्रेयसात न गुंतता श्रेयसाकडे जाणे हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असावे, असे भारतीय तत्त्वज्ञान गीतेच्या माध्यमातून सांगितले आहे. त्याला अनुसरूनच गजाभाऊनीही श्रेयसाचा मार्ग स्वीकारत जीवन जगल्याने  उतारवयात त्यांना निश्चितच समाधान मिळेल व त्यांच्या जीवनाचे सार्थक झाल्याचा प्रत्यय त्यांना येईल असा विश्वास राजाभाऊ मित्रत्वाच्या नात्याने गजाभाऊना दिला होता.खरं तर हे पत्र दोन मित्रांमधील वैचारिक आदानप्रदानचा उत्तम नमुना  होते.पत्रमैत्रीतुन अशा पद्धतीने मैत्री फुलते, बहरते. त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणारे संप्रेषण होत असते. जीवनातल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी दिशादर्शनही त्यात अंतर्भूत असते. पत्रमैत्रीतुन स्नेहाभावाचे, बंधुत्वाचे, परस्परांविषयी आदर भावनाचे संस्कार होत असतात.म्हणुनच यशस्वी वाटचाल करु इच्छिणा-या व्यक्तींनी मोठ्या यशस्वी माणसांशी पत्रमैत्री जोपासायला हवी असे न राहून त्यावेळी मला वाटले.



      १९६० च्या दशकात कोकणात शिक्षणाच्या सोयीसुविधा आजसारख्या विकसित झाल्या नव्हत्या.अशा काळात गजाभाऊंनी खोरंनिनको, प्रभानवल्ली आणि वेरवली येथे अनट्रेन्ड प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करीत तेथील बालमनाला दिशा देण्याचे प्रयत्न केले.पुढे तालुक्याच्या ठिकाणी अर्थात लांजा शहरात असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये लिपिक म्हणून नोकरी केली.यावेळी लांजा हायस्कूलला त्यांचे मित्र आदम माफारी चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिवाय रखांगी सर व नाटेकरसर ही गुरूवर्य मंडळी असल्याने या लिपिक पदाच्या काळात त्यांना कोकणात नव्याने उभारलेल्या शिक्षण संस्थांच्या समोरील समस्या लक्षात आल्या.पुढे त्यांनी लिपिक पदाचा राजीनामा देत मुद्रण व्यवसायात स्वत:ला गुंतविले असले तरी लांजा हायस्कूलचा माजी विद्यार्थी म्हणून त्यांनी रखांगी सर व आदम मापारी या मित्रांसोबत खेड्यापाड्यात फिरून शैक्षणिक उठाव करित हायस्कूल चालविण्याच्या कामी सहकार्य केले.या साठी माजी विद्यार्थी संघाची स्थापना करित हायस्कूलच्या मदतीसाठी रिंगणे गावचे नाटककार मराठी रंगभूमीचे शेक्सपिअर ला.कृ.आयरे यांचे स्वराज्यरवि या ऎतिहासिक  नाटकाचा प्रयोग त्यांनी केला होता.या नाटकात शशिकांत पुरोहित आणि प्रभाकर देसाई यांनी स्त्री पात्राची भूमिका साकारली होती.हेच नाटक पहिल्या महाराष्ट्र दिनानिमित्तही गजाभाऊंनी शासनाच्या वतीने १ मे १९६० रोजी केले होते.या नाटकासाठी आदम मापारी, बापू शेट्ये सुरेश वाघदरे ,रामसिंग सर  यांनी सहकार्य केल्याने यातून हायस्कूलच्या विकासासाठी काही फंड उभा राहिला.एकूणच हायस्कुलच्या माध्यमातून गरीबीनं गांजलेली अन् मागास समाजातील मुलं शिकून पुढं यायला हवीत या साठीच त्यांची धडपड सुरु होती.

          लांजा तालुक्यातील वाचनालय चळवळ वृद्धिंगत करण्याचे त्यांचे कार्यदेखील दखलपात्र असेच आहे .शहरातील वर्धिष्णू संस्था लोकमान्य वाचनालय मध्यंतरीच्या काळात बंद पडलेली असताना तिला उभारी देण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच खावडी येथील वाचनालयही श्रीरामभाऊ देसाई यांच्या सहकार्याने पुन्हा सुरू केले. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या दक्षिण रत्नागिरीतील सर्वात जुन्या संस्थेने पत्रकारिता ,साहित्य क्षेत्रातील गजाभाऊंचे  कार्य पाहून त्यांना  राणी लक्ष्मीबाई चे मूळ गाव कोट ,तालुका लांजा येथे संपन्न झालेल्या पाचव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान  दिला .यावेळी त्यांनी केलेले अध्यक्षीय भाषण हे लांज्याच्या साहित्य चळवळीचा दस्तऐवज ठरावा इतके अभ्यासपूर्ण होते.या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित केले जाते. या चांगल्या कार्यक्रमाचे कौतुक करीत भाऊंनी आपले सन्मित्र व नामवंत कवी सुभाष लाड यांच्या प्रेमापोटी नाटे , ता. राजापूर येथे संपन्न झालेल्या सहाव्या ग्रामीण साहित्य संमेलनापासून साहित्य,पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी अक्षर मित्र पुरस्कार देण्याची घोषणा करीत त्याचा प्रायोजकत्व स्वीकारले होते. नामवंत अभिनेते व साहित्यिक नारायण जाधव यांसारख्या मान्यवरांना त्यामुळे गौरविता आले.


       सहकार क्षेत्रातही भाऊंनी  मार्गदर्शक भाई नारकर, बाळासाहेब पाटील, बबन मयेकर या सहकाऱ्यांच्या साथीने सह्याद्री गृहतारण सहकारी संस्था लांजा या संस्थेची उभारणी करीत तालुक्यात सत्तावीस सदनिका बांधल्या. व या २७ कुटुंबियांचे घराचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावला.  जनता सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा या सहकारी संस्थेच्या स्थापनेत भाऊंचे मोलाचे योगदान आहे. या पतसंस्थेच्या सुरुवातीच्या काळात या संस्थेसाठी भाऊंनी  बाजारात फिरून पिग्मी गोळा केली. मात्र त्यांनी मार्गदर्शक  भाई नारकरांप्रमाणेच  संचालक पदाचा अट्टाहास कधीच धरला नाही.

       गत पन्नास वर्षात वेगवेगळ्या कामांचा अनुभवाने माणसे ओळखण्यात आलेली परिपक्वता, सामाजिक - साहित्यिक क्षेत्रातील क्रियाशील समृद्धतेने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रौढता प्राप्त करून दिली. वयाच्या ८४व्या वर्षात देखील गजाभाऊंचा उरक आणि उत्साह अशक्य कोटीतला होता त्याचा एक अनुभव मला आला. तो असा की, गजाभाऊंचे सन्मित्र आणि मुंबई येथील सुप्रसिद्ध हॉटेल आस्वाद चे मालक श्रीकृष्ण सरजोशी यांच्या  हस्तलिखिताचे रुपांतर दिवस-रात्र एक करीत मुद्रितशोधन करीत त्यांनी पुस्तकात केले.या वयातही लेखन करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. म्हणूनच ८१ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या 'मळवाट' या कथेवर दिवाकर मोहितेंसारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने नुकताच कोकणात 'मनफितुर ' या चित्रपटाचे चित्रिकरण केले.लवकरच तो मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.८०व्या  वर्षानंतर लेखन केलेल्या कथेचे चित्रपट तयार होणं ही गोष्टच भाऊंच्या प्रतिभाशली लेखणीचे सामर्थ्य अधोरेखित करणारी आहे.लांजा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात भाऊंना पथदर्शक आणि दीपस्तंभ मानणारे सर्व क्षेत्रात वयोगटात आहेत त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.


          बॅ.नाथ पै ,प्राध्यापक मधु दंडवते यांचा सहवास त्यांचे  व्यक्तिमत्व व विचारांची बैठक पक्की करण्यास कारणीभूत ठरला. गजाभाऊ यांचा  पिंड सच्च्या पत्रकाराचा. सत्यम शिवम् सुंदरम् यावर आढळ निष्ठा असणा-या भाऊंना असत्याविषयी प्रचंड चीड आहे आणि म्हणूनच साप्ताहिक 'आंदोलन तुमचे आमचे ' च्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या अन्यायकारक घटना, भ्रष्ट व्यवस्था व सामाजिक विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुढा-यांवर ते आपल्या खास शैलीत अासूड ओढतात. साप्ताहिक आंदोलनाच्या माध्यमातून भाऊंनी  विशुद्ध पत्रकारितेचा ध्वज अधिक उंच उंच फडकवण्याचे केलेले काम कौतुकास्पद आहे.एकूणच लांजा हायस्कूल, ज्युनियर काॅलेज, सिनियर काॅलेज, विविध सेवाभावी सहकारी संस्था, ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी केलेला पाणीपुरवठा व्यवस्थेचा पाठपुरावा व त्यात मिळालेले यश हे त्यांच्या कार्याचे दीपस्तंभ आहेत. तीन वर्षापूर्वी झालेल्या त्यांच्या गौरव समारंभा वेळी  'झाकोळ' हे त्यांचे आत्मकथन प्रकाशित झाले होते. हे पुस्तक 'दुरितांचे तिमिर जावो मधील दुरितांना ' त्यांनी अर्पण केले आहे.आपल्या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेवरून दुरिंतांविषयी आस्था दाखविणारे गजाभाऊ म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे ठरतात.व आमच्यासारख्या क्रियाशील वावरणाऱ्यांना ते आदर्श वाटतात.गत वर्षी ८६ व्या वर्षात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि बघता बघता एक वर्षही पूर्ण झाले.आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गजाभाऊंमधल्या व्रतस्थ माणसाला विनम्र अभिवादन !!

🙏🙏🙏🙏🙏


श्री. विजय अरविंद हटकर

लांजा





No comments:

Post a Comment

आनंदाला भरती आणणारा उत्सव       श्री गणपती ही देवताच ज्ञानाची, सर्व कलांची, विद्येची, प्रतिभेची अन् मानवी जीवनातील शुभंकराची.या वर्षीही परंप...