महाडचे चवदार तळे : आधूनिक तीर्थक्षेत्र
आधुनिक भारताच्या इतिहासात महाडचे नाव सुवर्णाक्षराने लिहिले गेले ते १९२७ साली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे, मुक्तिसंग्रामामुळे! महाडच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाने समतेकडे जाणारा एक महान यशस्वी इतिहास घडविला आहे.सामाजिक स्वातंत्र्य व समता प्रस्थापित होण्यासाठी कुरुक्षेत्र बनलेले महाडचे चवदार तळे आज महाराष्ट्रातील आधुनिक तीर्थक्षेत्र बनले आहे.महाडचा मानबिंदू म्हणजे चवदार तळे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक पाणवठ्याच्या सत्याग्रहामुळे चवदार तळ्याला इतिहासात एक आगळे महत्त्व प्राप्त झाले. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक पारतंत्र्याच्या संग्रामाची नौबत येथे झाडल्याने चवदार तळ्याला तेजोवलय प्राप्त झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे केंद्रबिंदू व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैभवशाली समाजक्रांतीचा तेजस्वी आरंभबिंदू ठरलेले कोकणातील ऎतिहासिक शहर म्हणजे महाड. मुंबई गोवा महामार्गावर वसलेले रायगड जिल्ह्यातील हे प्रमुख छोटेखानी शहर.सावित्री व गांधारी या नद्यांच्या संगमावर सुपीक,सकस काठावर दोन - तीन मैल परिघात पसरलेले महाड हे बंदरवजा शहर फार पुर्वीपासुन प्रसिद्ध आहे. सातवाहन, शिलाहार, यादव, निजाम, आदिलशहा,मराठे व अखेरीस इंग्रज अशा अनेक राजवटी महाडने पाहिल्या.एके काळी हे शहर महिकावती या नावाने ओळखले जात होते. शिलाहार राजा अनंतदेव यांच्या ११ व्या शतकातील शिलालेखानुसार महाडचा उल्लेख पालीपट्टण असा आला आहे.१६ व्या शतकात गव्हाच्या व्यापाराचे केंद्र असलेले महाड लोणारी कोळसा व तांदुळाच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध होते. दोन नद्यांचे सानिध्य असुनही पाण्याची टंचाई उन्हाळ्यात या शहराला तीव्रतेने जाणवत असते.याचे कारण म्हणजे सिंधुसागराचे पाणी नाकातोंडात शिरलेली सावित्री व गांधारी गोडे पाणी फिरवायला असमर्थ.त्यामुळेच शहराच्या स्थापत्यरचनेवेळी इथल्या नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या दूरदृष्टीने निर्मिलेली हावसतळे, चवदारतळे, काकरतळे,वीरेश्र्वराचे तळे,केतकी तळे,रुमाली तळे,चांभार तळे आणि कोटेश्र्वराचे तळे ही आठ तळीच जनसामान्यांच्या पाण्याचा मोठा आधार होता.या तळ्यांना धरूनच महाड शहर पुढे नावारूपाला आले.विकसित झाले.कालौघात यातील काही तळी नागरिकीकरणाच्या नावाखाली बुजविण्यात आली.
चवदार तळे :-
चवदार तळे हा शहराच्या उत्तरेला ज्या आठ मोठ्या तलावांभोवती महाडच्या विविध वस्त्या वसल्या आहेत त्यातील एक महत्त्वाचा तलाव. ५२५ फूट लांब आणि ३०० फूट रुंदीचा हा विस्तीर्ण जलाशय. एकूण क्षेत्रफळ ०३ एकर २४गुंठे आणि ७६ चौरसवार. रखरखत्या उन्हाळ्यातही या तलावाचे पाणी आटत नाही. चहुबाजूनी दगडाने बांधून काढलेल्या या तळ्याला ठिकठिकाणी दगडी पायऱ्यांनी बांधून काढलेले घाट आहेत.पूर्वी निम्म्या- शिम्या गावाला पाणीपुरवठा इथून व्हायचा. म्हणून तलावात पोहायला बंदी होती.फक्त वर्षातून गोकुळाष्टमीच्या दिवशी दोन दिवस ब्राह्मणी काला व गुजरी काला या दिवशी चवदार तळ्यात सर्व नागरिक स्त्री-पुरुषाला मनसोक्त पोहण्याची परवानगी असायची. चवदार तळे कुणी बांधले याची नोंद इतिहासात सापडलेली नाही. पण हे तळे फार प्राचीन असावे. या तळ्याकाठी प्राचीन काळी कागदी लोकांची म्हणजे हात कागद तयार करणाऱ्या लोकांची वस्ती होती असे म्हणतात. तत्पूर्वी महाड शहराच्या दक्षिणेकडून वाहणारी सावित्री नदी या तळाच्या मार्गाने वाहत असावी आणि कालौघात तीने आपला प्रवाह मार्ग बदलला असावा असाही एक तर्क आहे. तळ्यामध्ये जिवंत पाण्याचे झरे असल्याने ते कधीही पूर्ण कोरडे पडले नाही असे जाणकार सांगतात.चवदार तळ्यामध्ये १४ विहीरी आहेत असा लोकसमज, १९५८ सालाच्या उन्हाळ्यात तळे खूपच आटले होते, तेव्हा त्यातल्या १० विहीरींचा पत्ता लागला.१९४० च्या आवर्षण वर्षी तळ्यातल्या दोन विहिरींचे बांधकाम नगरपालिकेने केल्याची नोंद आहे.
तळ्याच्या व्युत्पत्तीबाबत असलेले मतप्रवाह :-
१) चौदा +दारे = चौदादार - या चौदा दारांवाटे तळ्यातील पाणी बाहेर येते म्हणून चवदारतळे असे नाव पडले.
२) महाडचे इतिहास प्रेमी नागरिक कै. सुंदरभाई बुटाला यांच्या मते, चौदा + आड( विहीरी) = चौदाड -चौदार- चवदार चवदार चवदार
३) या तळ्याचे पाणी चवदार लागते म्हणून याचे नामाभिदान चवदार तळे झाले असेही काही जाणकार सांगतात.
चवदार तळ्याचा मुक्तिसंग्राम :-
एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या पंधरा वर्षांत आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रशासनाच्या सोयीसाठी किंवा ब्रिटीशांच्या अतिंमतः फायद्यासाठी भारताची कायदेव्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पुढे युद्धात भाग घेणार्या ब्रिटनला आवश्यक उत्पादने वेगाने निर्मीत करण्यासाठी एका सुत्रबद्ध समाजाची गरज होती, भारतातला जातीवाद आणि मागास प्रथा अंतिमतः ब्रिटींशाच्या उत्पादनावर थेट परिणाम करीत असल्याने जिल्हापातळीवर आणि किमान घोडागाडीने जोडल्या गेलेल्या विकसित खेड्यांवर ब्रिटीशांनी आपले कायदे शक्य तितक्या प्रभाविपणे लावण्यास सुरुवात केली. इथल्या रुढी परंपरांमधुन भारतीयांना मुक्ती देण्याचा उद्देश मात्र ब्रिटीशांचा नव्हता, आपले साम्राज्य आणि उत्पादन वाढविण्यासाठी रुढीपरंपरांचा उपयोग होत असल्यास ब्रिटीश तो अवश्य करुन घेत होते, कित्येकदा समाजातल्या उच्चवर्णियांकडुन आपल्याला त्रास होउ नये म्हणुन उच्चवर्णियांच्या रुढींना अधिक चांगल्या प्रकारे उत्तेजनही देत होते. तरीही प्रशासनावरचा तणाव कमी व्हावा आणि आर्थिक व्यवहार सर्वसंमत होण्यासाठी मुलभुत परस्परव्यवहारही सर्वसंमत होणे गरजेचे असल्याने १९२३ साली तत्कालीन बॉम्बे लेजीस्लेटीव्ह काउंसीलने अस्पृश्यांना सार्वजनिक संसाधनांचा वापर करु देण्याची कायद्याने परवानगी दिली.
ह्या काळात महाड हे एका अर्थाने महत्वाची नगरपरिषद म्हणुन विकसित होऊ लागले होते. तिथुन दहा किलोमिटर अंतरावर असलेल्या दासगाव बंदरात मालाची वहातुकही चालायची आणि सैन्याची ये जा असायची. ह्यात कधीकाळी सैन्यात असलेल्या अस्पृश्यांचाही समावेश होता. ह्यातल्या काही सेवानिवृत्त सैनिकांनी त्यांच्या कम्युनिटीसाठी लहान मुलांची शाळा आणि प्रथमोपचारासाठी जागाही बांधली होती. मुख्य म्हणजे इथे ब्रिटीश इंडीया सबमरीन टेलीग्राफ कंपनीमार्फत तारेची सोय उपलब्ध होती. इतके सामाजिक परिवर्तन घडत असुनही ह्या लोकांना महाडच्या बाजारात मात्र पिण्याचे पाणी मात्र मिळत नसे, त्यांना तळ्यावरही प्रवेश नव्हता. १९२३ साली पारीत केलेल्या कायद्याचा आधार घेउन महाड नगरपरिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरबानाना टिपणीस ह्यांनी चवदार तळे अस्पृश्यांसाठी आदेश देउन खुले करविले होते परंतु ह्या निर्णयाला उच्चवर्णियांचा तीव्र विरोध होता. ह्याशिवाय तळ्याच्या आसपास अनेक उच्चवर्णियांचा पहारा व लक्ष असल्याने अस्पृश्यांना ठरवुनही पाणी पिणे शक्य नव्हते.
सुरबानाना टिपणीस ह्यांचे तरुण मित्र रामचंद्र बाबाजी मोरे हे ह्या परिस्थीतीवर काहीतरी तोडगा काढुन चवदार तळे सर्व जातीधर्मियांना खुले करता येईल ह्यासाठी प्रयत्नशील होते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती. १९२४ साली झालेल्या कुलाबा डिस्ट्रीक्ट डिप्रेस्ड क्लास मिशनच्या सभेत रामचंद्र मोरे ह्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेउन चवदार तळ्याबद्दलची स्थिती कथन केली. तळे सर्वांना खुले व्हावे ह्यासाठी सत्याग्रह हा एकमेव मार्ग उपलब्ध असल्याची सर्वांचीच खात्री पटली. हा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली होणार असला आणि त्यात अनंत चित्रे, गंगाधर सहस्त्रबुद्धे ,सुभेदार सवादकर, पोतनीस, पत्की, कमलाकर टिपणीस, चिंतोबा देशपांडे यांसारख्या अनेक परिवर्तनवादी उच्चवर्णियांचा पाठिंबा आणि थेट सहभाग असला तरी पाणी पिण्याचे मुलभुत कार्य अस्पृश्यांनाच करावे लागणार होते.
तिथं पोहोचल्यावर आधी महाडच्या चवदार तळ्याचं पाणी बाबासाहेब यांनी आपल्या ओंजळीनं प्यायलं आणि मग शेकडो कार्यकर्त्यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह ऐतिहासिक केला. यावेळेस बोलताना, “चवदार तळ्याचा सत्याग्रह हा आम्हीही इतरांप्रमाणेच माणसं आहोत, हे सिद्ध करण्याकरीता केला” असल्याचं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. पुढे बाबासाहेब म्हणाले होते की, “चवदार तळ्याचं पाणी प्यायल्याने तुम्ही किंवा मी अमर होणार नाही. आजवर आपण या चवदार तळ्याचं पाणी प्यायलो नव्हतो, म्हणून काही मेलो नव्हतो. चवदार तळ्याचा सत्याग्रह हा बंधुता वाढीस लागावी आणि जातीभेदाच्या भिंती संपुष्टात याव्यात यासाठी केलेला सत्याग्रह आहे” असं सांगितलं होतं. सार्वजनिक ठिकाणं, पाणवठे आणि चवदार तळं अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी झालेल्या सत्याग्रहात सवर्ण समाजातील नेते मंडळीही सहभागी झाली होती. या ऐतिहासिक सत्याग्रहात तीन हजारांहून अधिक लोक सहभागी झाल्याची सरकार दफ्तरी नोंद आहे. या सत्याग्रहानंतर हा दिवस समता दिन किंवा सामाजिक सबलीकरण दिन म्हणूनही ओळखला जातो.आतापर्यंत या देशात समतेसाठी अनेक आंदोलनं झाली, भारतीय राज्यघटनेने या देशातल्या सर्व जाती-धर्मांना समान हक्क प्रदान केला. पण पाण्याच्या प्रश्नावरुन जातीय आणि धार्मिक अस्मिता कशा उफाळून येतात याची उदाहरणं आपण आजही समाजात पाहतो आहोत. तथाकथित सवर्ण, उच्चधर्मीय, उच्चजातीय लोकांकडून केला जाणारा दुजाभाव, द्वेष, अत्याचार अजूनही समाजात पाझरताना दिसतो यामुळेच चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे या मुक्तिसंग्रामाचे महत्व एकविसाव्या शतकातही अधोरेखित होते.
सामाजिक तीर्थक्षेत्र :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक न्यायाच्या संग्रामामधील ’महाडचा लढा’ हे एक सुवर्णपान आहे. जनतेची तहान भागविणारे असंख्य पाणवठे आपल्या देशात आहेत. परंतु, सामाजिक न्यायाची तहान भागविणारा पाणवठा महाडमध्ये आहे. त्याचे नाव आहे ’चवदार तळे’.म्हणूनच या सामाजिक तीर्थक्षेत्रावर देशभरातील पर्यटकांचा, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा ओघ कायम चालू असतो. अलीकडे महाड नगर पालिकेकडून तळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तळ्याजवळ सभागृह व सुंदर बाग तयार करण्यात आली आहे. तळ्यात उंच कारंजी होती. ती आता बंद आहेत. मध्यभागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दहा फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. सुशोभीकरण, रस्ता व इतर कामांमध्ये तळ्यातील तीन विहिरी मातीत गाडल्या गेल्या. त्यामुळे तळ्यामध्ये सद्यस्थितीत केवळ ११ विहिरीच आहेत. चवदार तळ्याच्या सौंदर्यीकरण सुशोभीकरण आणि चवदार तळ्यातील पाण्याचे शुद्धीकरण करण्याकरिता अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला असलेल्या संकल्पनेनुसार महाडमध्ये देखील ती योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.सायंकाळच्या वेळेला महाडवासीयांसह पर्यटकांची मोठी गर्दी चवदार तळ्यापाशी आज पहायला मिळते.
डाॅ.बाबासाहेब अांबेडकरांचे जीवनचरित्र लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाच्या वतीने महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे.या स्मारकामध्ये वातानुकूलित प्रेक्षागृह, काॅन्फरन्स हाॅल,विपश्यना केंद्र,ग्रंथालयासह संग्रहालय देखील असुन या संग्रहालयातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची दूमीळ छायाचित्रे, कलाकृती,दीक्षाभूमी स्मारकाची काष्टप्रतिकृती आणि थायलंडमधुन आणलेली तथागत भगवान गौतम बुद्धांची पूर्ण आकाराची मूर्ती आहे.तर ग्रंथालयात दहा हजाराहून अधिक ग्रंथ आहेत. शहरात येणारे पर्यटक या स्मारकाला आवर्जून भेट देतात.मात्र महाडचा इतिहास लोकांपर्यंत ख-या अर्थाने पोहचविण्यासाठी पर्यटन दूत निर्माण करणे,स्मारकामध्ये स्लाईड शो किंवा माहितीपट दाखविणे यासारखे नवे नवे उपक्रम राबवावे लागतील. सोबतच महाड जवळील शिवतीर्थ रायगड, गांधारपाले लेणी,कोल बौद्ध लेणी,महेंद्रगड, वाळणकोंड,झुलता पुल, कवी परमानंद समाधी, कांगोरीगड, चंद्रगड, सव येथील उष्णोदक, वीरेश्र्वराचा छबिना उत्सव, वीर तानाजी मालसुरे समाधी, संत रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली शिवथर घळ यासारखी पर्यटन स्थळांचीही नियोजनबद्ध प्रसार मोहिम राबविल्यास ऎतिहासिक महाड ला पर्यटनदृष्ट्या महत्व प्राप्त होईल.
विजय हटकर,
लांजा -रत्नागिरी