Tuesday, February 12, 2019

🖌रंगांचा किमयागार महेश करंबेळे🖌.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
नाटककार ला.कृ.आयरे कलाश्री पुरस्काराने श्री महेश करंबेळे सन्मानित. 
💐💐💐💐💐💐💐💐
          सुप्रसिद्ध चित्रकार महेश करंबेळे लांजा तालुक्यातील ऎतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोट गावचे सुपुत्र. आजच्या घडीला भारतातील ख्यातनाम चित्रकारांमधील एक असलेल्या श्री करंबेळे यांची चित्रे दुबई व मिलान (इटली)येथील आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात झळकली आहेत.मुंबई महानगराचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रांतून पहावयास मिळते.भारतातील सुप्रसिद्ध कला संग्रहकांकडे त्यांच्या कुंचल्यातून साकार झालेली चित्रे संग्रहात आहेत.कोकणच्या मातीशी नाळ जुळलेल्या श्री महेश करंबेळे यांनी आपल्या सशक्त चित्रांतून पद्मश्री भावना सोमय्यांसारख्या अनेक दिग्गजांना प्रभावित केले आहे.समीक्षक ,रसिक,कलासंग्रहकांची पसंती मिळविणाऱ्या ,रंगांचा किमयागार असलेल्या श्री महेश मकरंबेळे यांच्या कुंचल्यातील क्षमता वादातीत आहे.

         एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून पांढऱ्याशुभ्र कागदावर उमटून आलेलं चैतन्यदायी चित्र मनाला प्रसन्न करतं.रंग, रुप, जमीन,आकाश अगदी एखादी निर्जीव वस्तूही चित्रकार आपल्या चित्राद्वारे जिवंत उभी करतात.ठिपके आणि रेषांच्या सहाय्याने चित्रकार सॊंदर्याचा आविष्कार घडवितात.कागदावर उमटणाऱ्या प्रत्येक छटा अगदी भिन्न असतात.पण एकदा रंगाचा खेळ सुरू झाला की,पांढराशुभ्र कागद जिवंत वाटू लागतो.अशीच काहीशी जादू मुंबईतील सुप्रसिद्ध चित्रकार श्री महेश करंबेळे यांच्या चित्रात पहायला मिळते.मानवी जीवनातील विविध घटनांचे,मुंबई सारख्या महानगराचे प्रतिबिंब आणि वैशिष्ट्ये, मानवी भावनांचे विविध तरंग महेश करंबेळे यांच्या चित्रातून तुम्हाला अनुभवायला मिळतील.
          भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेले महेश करंबेळे लांजा तालुक्यातील ऎतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोट गावचे सुपुत्र. कोकणच्या या सुपुत्राने आपल्या कुंचल्यातून वयाच्या पस्तीशीतच जागतिक पातळीवरिल ख्यातनाम चित्रकार म्हणून आपल्या कलात्मकतेचा ठसा उमटविला आहे.भारतासह सातासमुद्रापार लंडन,फ्रान्स पोर्तुगाल,यु.के.,यु.एस.ए., आॅस्ट्रेलिया,दक्षिण आफ्रिका,सिंगापूर,जर्मनी, दुबई येथील विविध आंतरराष्ट्रिय चित्रकारांसोबत अनेक विषय चित्रबद्ध करित देशाचे नाव उज्वल केले आहे.
     रुपारेल काॅलेज, मुंबईमध्ये द्वितीय वर्ष कला पूर्ण झाल्यावर त्यांनी प्रणव आर्टस् इन्स्टिट्यूट मुंबईतून फाईन आर्ट चा अभ्यासक्रम सन २००५ मध्ये यशस्वी पूर्ण केला आणि अभिजात कलेची मूल्ये जोपासत वास्तववादी शैलीत प्रभावी रेखाटन,सूक्ष्म निरीक्षण, मुंबई महानगरचा व तेथील दैनंदिन जीवनाचा सखोल अभ्यास, मानवाकृतींचे योग्य आकलन,हावभाव व्यक्त करण्याची कसोटी व विषयानुरूप वातावरण निर्मिती या चित्रवैशिष्ट्यांच्या जोरावर विविध विषय आपल्या कुंचल्यातून प्रभावी हाताळले. महेश करंबेळे अस्सल मुंबईकर. मुंबईकर असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.आणि म्हणूनच आजच्या संगणकिय युगातहि मुंबई सारख्या महानगरातील सांस्कृतिक वारसा अबधित ठेवण्यासाठी त्यांनी मुंबईच्या सामाजिक,सांस्कृतिक, वास्तुशिल्प, वाणिज्य तसेच महानगरातील  दैनंदिन जीवनातील विविध घटनांवर  आधारित प्रभावी चित्रकृती त्यांनी रेखाटल्या आहेत. आॅईल,अक्राॅलिक व वाॅटर कलरच्या माध्यमातून त्यांनी रेखाटलेल्या राजाबाई टाॅवर,महात्मा फुले मंडई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, गेटवे आॅफ इंडिया या चित्रांतून या स्थळांचे जणू "प्रतिबिंबच " अनुभवायला मिळते.या जोडीने मुंबईकरांची दैनंदिन जीवनासाठीची संघर्षाची भावना,जिद्द,जगण्याच्या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न आदी मुंबईकरांच्या स्वभावाच्या सूक्ष्म पैलूंना छेडण्याचे धाडस महेश यांनी आपल्या शैलीतून केले आहे.नव्या आणि जुन्या मुंबईचे मिश्रण त्यांनी अतिशय कार्यक्षमतेने केले आहे.त्यामुळे त्यांची चित्रे पाहून मन प्रसन्न होते.
     श्री महेश करंबेळे यांची ललित कला अकादमी दिल्ली,नेहरू सेंटर आर्ट गॅलरी मुंबई, लीला आर्ट गॅलरी मुंबई, कमल नयन बजाज आर्ट गॅलरि मुंबई, चित्रे आर्ट गॅलरी नवी मुंबई, जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई, सायन्स सेंटर आॅफ आर्ट गॅलरी सूरत,आॅल इंडिया फाईन आर्टस् अॅन्ड क्राफ्टस् सोसायटी गॅलरी दिल्ली,ब्रश स्ट्रोक आर्ट गॅलरी पुणे   या भारतातील सुप्रसिद्ध आर्ट गॅलरींसोबतच सिद्धार्थ नेहरू वांगचूक कल्चरल सेंटर थिंफू - भुटान येथेही चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते.
             दुबईमध्ये दरवर्षी ' वर्ल्ड आर्ट दुबई' या आंतरराष्ट्रिय चित्रमहोत्सवाचे आयोजन केले जाते.जगभरातील जागतिक दर्जाचे चित्रकार आपली कला येथे सादर करतात.लाखो कलारसिक या महोत्सवाला भेट देतात.या चित्र प्रदर्शनात आपली चित्रे प्रदर्शित करण्यापूर्वी चित्रकाराला ती चित्रे दुबईच्या संयोजन समितीकडे पाठवावी लागतात.दुबईतील कला समीक्षकांच्या पसंतीसाठी उतरलेल्या चित्रांना या महोत्सवात सादरिकरणाची संधी दिली जाते.सन २०१७ व २०१८ मध्ये महेश करंबेळे यांची चित्रे  दुबईच्या समीक्षकांची पसंती मिळवून ' वर्ल्ड आर्ट दुबई' या महोत्सवात झळकली.त्यांच्या चित्रांनी विविध देशातील कलारसिकांना मोहिनी घातली.पोर्तुगाल,आॅस्ट्रेलिया, जर्मनी ,यु.के.,यु.एस.ए.,साऊथ आफ्रिका,सिंगापूर, दुबई इत्यादी देशातील कलारसिकांनी करंबेळेंची चित्रे विकत घेऊन आपला कलासंग्रह समृद्ध केला आहे.आजच्या घडिला भारतातील सुप्रसिद्ध आर्ट कलेक्टर (कला संग्रहक) हर्ष गोएंका, पद्मश्री प्राप्त समीक्षक  भावना सोमय्या,प्रताप नायर ,उद्योजक विजय भिमराजका,मराठी अभिनेता संदीप कुलकर्णी, मुंबई चे माजी महापौर दत्ता दळवी व सुनिल प्रभू अशा अनेक प्रतिष्ठितांच्या घरांच्या भिंती महेश करंबेळे यांच्या कुंचल्यातुन साकार झालेल्या चित्रांनी सुशोभित झाल्या आहेत.वयाच्या पस्तीशीत चित्रकला क्षेत्रात  यशाची शिखरे सर करणाऱ्या व सातासमुद्रापार आपल्या सुंदर चित्रांनी भारताची मान उंचावण्या-या चित्रकार महेश करंबेळे यांना नुकताच कोट,ता. लांजा येथे रंगलेल्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनात कोकणातील प्रतिष्ठेचा नाटककार ला.कृ.आयरे कलाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रंगांचा किमयागार असलेल्या श्री महेश करंबेळे यांच्या  भावी वाटचालीसाठी हार्दीक शुभचिंतन.
        💐💐💐💐

  -  विजय हटकर.
दै.तरुण भारत संवादमध्ये सदर ब्लाॅग व्यक्ती विशेष सदरात प्रसिद्ध झाला.
दै.पुढारी ने हि घेतली दखल.

दै.महासागर, पालघर ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्राने घेतली दखल.

2 comments:

  1. Fantastic art!
    आपण त्यांचे वर्णनही अगदी योग्य केले आहे. ग्रामीण भागातही इतके गुणी कलाकार आहेत हे आपल्या लेखामुळे कळले.
    आपण त्यांचे वर्णनही अगदी योग्य केले आहे.

    आपण त्यांना प्रकाशात आणण्याचे मोठे काम करत आहात हेही तितकेच महत्त्वाचे. गुणिजनांच्या कलाकृती जगासमोर आणणे हे पुण्यकर्मच आहे. आपले हार्दिक अभिनंदन सर!

    ReplyDelete