Sunday, February 17, 2019

आता प्रतीक्षा प्रतिहल्ल्याची...
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


     तीन दिवसापूर्वी गुरूवारी दि.१४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:०० च्या दरम्यान जम्मू -काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात तब्बल ३०० किलो  स्फोटकांनी भरलेल्या युएसव्हि (चारचाकि) वाहनाद्वारे जैश -ए-महम्मदचा अतिरेकी आदिल दार याने सुट्टी संपवून काश्मीर खो-यात सेवेत रूजू होणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या वाहन  ताफ्यातील एका बसला धडक दिली व प्रचंड स्फोट झाला. भारतीय जवानांच्या (केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या)वाहन ताफ्यावर चढविलेल्या या भ्याड आत्मघातकी स्वरूपाच्या हल्ल्यात ४० जवान शहिद झाले असून या हल्ल्याच्या जखमा इतक्या खोल व गहि-या अाहेत की,त्या पुढची अनेक वर्षे भरुन निघणार निघणे शक्यच नाहि.भारतद्वेषाच्या भावनेतून सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालणा-या पाकिस्तानला धडा शिकविण्याची हिच योग्य वेळ असून पाकिस्तानचा योग्य तो बदला भारताने घेतला पाहिजे ही संतापाची, क्रोधाची भावना सर्व भारतीय नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.याच वेळी देशासाठी सर्वोच्च कोटीचा त्याग करून हॊतात्म्य पत्करणा-या ४० वीरजवानांच्या दु:खात सर्व राष्ट्रभक्त भारतीय सहभागी झाले असून दु:खाच्या संकटाच्या वेळी भारतीय नागरिकांनी घडविलेल्या अखंडतेचे, एकात्मतेचे दर्शनही अद्भुतच आहे,असेच म्हणावे लागेल.या एकतेतून अशा भ्याड हल्ल्याला  भारतीय कधीच घाबरणार नाहीत उलट ते भारतीय म्हणून आणखी घट्ट बंधनात बांधले जाऊन हातात हात घालून देशाच्या सार्वभौमत्वावर येणारे प्रत्येक संकट उडवून लावतात हा संदेश विरोधकांत पोहचल्याने त्यांची आणखीनच आग झाली असेल.

       दहशतवादी व त्यांना थारा देणाऱ्या पाकविरोधी प्रबळ संतापाची,बदल्याची भारतीयांची भावना लक्षात घेऊन देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या प्रत्येक शहिद जवानाच्या रक्ताच्या थेंबा -थेंबाचा हिशोब चुकता करु व यासाठी भारतीय लष्काराला सर्वाधिकार दिले असून पाकिस्तानला धडा शिकविल्याशिवाय शांत राहणार नसल्याचे सूचक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी केल्याने देशातील नागरिकांना आता प्रतीक्षा लागली आहे ती पाकिस्तानवर केल्या जाणाऱ्या प्रतिहल्ल्याची...जोपर्यंत भारत सरकार पाकिस्तानवर योग्य तो प्रतिहल्ला चढवीत नाहि तोपर्यंत नागरिकांच्या मनात खदखदत असलेला संताप, द्वेष व राष्ट्रीयत्वाची भावना जिवंत ठेऊन सरकारला राष्ट्रभान दाखविण्याची मोठी जबाबदारी आज प्रत्येकाची आहे हेही समजून घ्यायला हवे.
         एकविसाव्या शतकातील सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला ठरलेल्या पुलवामा हल्ल्यात ४० भारतीय जवान शहिद झाल्याची बातमी ऎकल्यापासून सारा देश हळहळला आहे.सर्व जगाला पोखरणाऱ्या दहशतवादाच्या सर्वाधिक झळा भारताला पोहचत आहेत.आणि म्हणुनच दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्व शक्तिंनी एकत्रित येऊन भारतासह काम करण्याची गरज आहे.तसेच पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र व जैश- ए- मोहम्मदचा  म्होरक्या मॊलाना मसुदा अझरला आंतरराष्ट्रिय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठी भारताने देखिल मुत्सद्देगिरिचा वापर करुन आंतरराष्ट्रिय राजकरणात एकटे पाडले पाहिजे.या दृष्टीने भारत सरकारने योग्य ती राजनैतिक पाऊले वेळेतच  उचलली आहेत.आंतरराष्ट्रिय व्यापारात पाकला दिलेला सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र अर्थात  ' मोस्ट फेवर्ड ' हा दर्जा काढून घेतला आहे.तसेच पाकिस्तान कडून केल्या जाणाऱ्या आयातीवर २०० टक्के सीमाशुल्क लावून आधीच डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का दिला आहे.पण यावरच थांबून चालणार नाहि .कारण पठाणकोट व उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनेहि तो सुधारल्याचे  दिसून आलेले नाहि.कारण कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. पाकिस्तानचेहि तसेच आहे.तेव्हा दहशतवादी संघटनांना पोसणा-या पाकड्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची हिच योग्य वेळ आहे.कारण चीन सोडून जगातील सर्वच सामर्थ्यवान राष्ट्रांनी भारताच्या बाजूने उभे राहण्याची तयारी दाखविली आहे.

           काश्मीर खो-यात उरिनंतरचा आजपर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला ठरला असून CRPF च्या ४० जवानांना आलेल्या वीरमरणाने सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या कमतरता व हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला असून अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभे ठाकले आहेत.
१) जम्मू - काश्मीर महामार्ग ही काश्मीर खो-याला उर्वरित भारताशी जोडणाऱि एकमेव जीवनरेखा आहे.त्यावर लष्करी आणि मुलकी वाहनांची अखंड वाहतूक चालू असते.लष्करी गाड्यांचा ताफा जाण्याआधी व दरम्यान घेण्याच्या खबरदारिबाबत एक परिपूर्ण कार्यपद्धती घालून देण्यात आली आहे.त्याचे दक्षतापूर्वक पालन का झाले नाहि हा न उलगडलेला सवाल आहे.जर त्याचे काटेकोर पालन झाले असते तर कदाचित हा धोका टाळता आला असता.
 २) २५०० च्या वर सैनिकांना घेऊन जाणाऱ्या ७८ गाड्यांच्या ताफ्यातील एका वाहनावर एवढी अभेद्य सुरक्षा व्यवस्था असताना आत्मघातकी हल्ला होतोच कसा?
३) ३०० किलो स्फोटकांनी भरलेली कार सुरक्षा रक्षकांच्या दृष्टिस कशी काय पडली नाहि ?
४) भारतमातेसाठि बलिदान देणाऱ्या वीरपूत्रांची हि बलिदानाची श्रृंखला थांबणार तरि कधी?
५) राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर भारत इस्त्रायल,अमेरिका, व शक्तशाली LTTE चा खात्मा करणाऱ्या छोट्याश्या श्रीलंकेप्रमाणे विनाकारण डिवचणा-या या विषारी सापाला (पाकला) कायमचं कधी ठेचणार?
६)प्रखर राष्ट्रवाद व देशहिताला आपण कधी प्राधान्य देणार? ७)लोकशाही देश आहे म्हणून हवे तसे  देशविरोधीमुक्ताफळं उधळणा-या अंतर्गत राष्ट्रदोह्यांचा बंदोबस्त कधी करणार?
का त्यांना मानवतावादाच्या नावाखाली मोकळेच सोडणार?
८)लष्कराप्रमाणे सशस्त्र पोलीस दलांची स्वतंत्र  हेरगिरीची यंत्रणा आपण उभारणार का?
९)लष्करी वाहतुकीसाठी ,आपण आधूनिक पर्यायांचा वापर करणार तरि कधी?
१०) काश्मीर खो-यातील कोवळ्या तरूणांना आपले आयुष्य मरणाच्या दारात फेकावे असे का वाटते?
११) या तरुणांच्या मनातील असंतोष बाजूला करुन त्यांचे मनपरिवर्तन करुन त्यांच्या हाताला काम उपलब्ध करुन त्यांना प्रगतीच्या वाटेवर कधी आणणार?
     असे एक ना अनेक प्रश्न मनी थैमान घालताहेत.काश्मीरला दिलेल्या विशेष राज्याच्या दर्ज्यामुळेच आज काश्मीरातील अनेकांच्या मनात भारतीयत्वाची भावना नाहिए,हे वास्तव आपण स्विकारून हा दर्जा रद्द करण्यासारखे धाडसी पाऊल उचलण्याची आवश्यकता आज निर्माण झाली आहे.गेली कित्येक वर्षे काश्मीर खो-यात कारवाया करण्यासाठी  पाकिस्तानकडून पर्याय म्हणून जैश-ए-मोहम्मद सारख्या अतिरेकी संघटनांचा वापर करण्यात येतो.या दहशतवाद्यांना पाकिस्तान आश्रय देतो हे आता जगासमोर सिद्ध झाले आहे.काश्मीरमध्ये फुटिरतावाद्यांनाहि भारतविरोधी गरळ ओकण्यासाठी परकिय आर्थिक रसद मिळते.याच्या जोरावर भारतात राहून इथले मीठ खाऊन याच भूमीचे ईमान विकणाऱ्या या पाकप्रणीत फुटिरतावादि दलालांचाहि बंदोबस्त करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे.या देशात राहून देशविरोधी कृत्य करणारे वा त्यात सामील होणारे, देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यांवर जोपर्यंत योग्य ती कारवाई होऊन या राष्ट्रदोह्यांचा खात्मा जोपर्यंत होत  नाहि तोपर्यंत असे भ्याड हल्ले होतच राहणार आहेत.आणि म्हणूनच आता वेळ आली आहे ती प्रतिहल्ल्याची..
     हा प्रतिहल्ला भारतविरोध करणाऱ्या  अंतर्गत व बाह्य दोन्ही शत्रुंवर योग्य वेळ येताच मुत्सद्दीगिरिने ,सावधानतेने चढविला तरच कुठेतरी या दहशतवादाला आळा बसेल.यासाठी योग्य ते नियोजनात्मक. धडक कारवाई करुन पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या तरच पुलवामातील ४० शहिद जवानांसह आजपर्यंत शहिद झालेल्या सर्वच वीरपुत्रांना ख-या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
मुंबई व ठाणे उपनगरातील प्रसिद्ध वर्तमानपत्र दै.महासागर ने मी लिहिलेला " आता प्रतीक्षा प्रतीहल्ल्याची " 

या  लेखाला शुक्रवार दिनांक २२ फेब्रुवारिच्या अंकात संपादकीय पानावर प्रसिद्ध केले.


    धन्यवाद 
दै.महासागर.
🙏🏻🙏🏻🙏🏻
💐💐💐💐💐💐💐

     श्री विजय हटकर
      लांजा.

No comments:

Post a Comment