के.आर.कंदी : एक साहित्यप्रेमी अधिकारी
मागणारे हात खूप असतात. देणारे थोडे असतात पण असतात. अपेक्षा न ठेवता ते देत राहतात.बँक आॅफ इंडिया रत्नागिरीचे माजी उपविभागीय अधिकारी के.आर.कंदी यापैकीच एक! सर्वसाधारणपणे बँकेच्या अधिका-यांना वाणिज्य विषयक कीचकट कामातुन अजिबात सवड नसते.या मंडळींचा साहित्य, कला, सामाजिक क्षेत्रात फार कमी वावर असतो असा माझ्यासह अनेकांचा समज आहे .पण या समजाला स्टेट बॅक आॅफ इंडिया मध्ये काम करतानाच सिने-नाट्य -लेखन क्षेत्रात भरारी घेणा-या नारायण जाधव व मनोज कोल्हटकर यांनी चुकीचे सिद्ध केले.यात आता आणखी एक नाव समाविष्ठ करावे लागेल ते म्हणजे के.आर.कंदी यांचे! बॅक आॅफ इंडिया रत्नागिरी च्या विभागीय उपव्यवस्थापक पदावर काम करताना तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी इथल्या साहित्य,शैक्षणिक चळवळीला बळ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.कर्तव्यदक्ष अधिका-यासोबत सहृदयी माणूस, आस्थावान साहित्यप्रेमी असलेल्या के.आर. कंदी यांच्याविषयी आठवणींचा सुखद स्नेहबंध...
के.आर.कंदी आणि आमची भेट योगायोगाने झाली होती. २०२० च्या जानेवारीतील ही गोष्ट. रात्रीचे आठ वाजले होते.मालवणी बोलीला वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून सातासमुद्रापार नेणाऱ्या वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांची भेट घेण्यासाठी आम्ही त्यांच्या माडबन गावातील निवासस्थानी पोहचलो होतो. काही महिन्यांनी नाटे येथे संपन्न होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद आपण भूषवावे असा नानांना आमचा आग्रह होता. अगंतूकपणे आलेल्या अाम्हा साहित्य चळवळीतील कार्यकर्त्यांच्या विनंतीचा नानांनी श्रद्धेय भावनेने स्वीकार करीत , माझ्या लाल मातीत रंगणाऱ्या साहित्योत्सवात संमेलनाध्यक्ष म्हणुन मी येणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. त्यांच्या होकाराने आमचा जीव भांड्यात पडला. यावेळी बँक ऑफ इंडिया,माडबनचे शाखाधिकारी श्री विजय गवाणकर ,पत्रकार राजन लाड तेथे उपस्थित होते.पत्रकार उपस्थित आहेत या संधीचे सोने करीत आम्ही नानांच्या शुभहस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करीत नानांना आणखी एक आनंदाचा धक्का दिला. माडबनचे शाखाधिकारी विजय गवाणकर यांनीही संमेलनात शाखेचा स्टॉल लावू असे म्हणत आमचे रत्नागिरीतील वरिष्ठ अधिकारी के.आर. कंदी हे साहित्यप्रेमी असल्याचे सांगत त्यांची भेट घेण्याची सूचना केली. नानांनी संमेलनाध्यक्षपदासाठी होकार दिल्याने आनंदी झालेल्या आम्हा कार्यकर्त्यांना विजय गवाणकर यांनीही नकळतपणे मदतीचा हात पुढे केला होता. कार्य कोणतेही असो ,ते संपन्न होण्यासाठी माणसं उभी राहतात.देणारे न मागता देतात. ' घेणारे हात शुद्ध ,स्वच्छ असले की देणारे कमी पडत नाहीत ' याचा प्रत्यय विजय गवाणकर यांनी दिला.
दुसऱ्याच दिवशी सकाळी रत्नागिरीच्या बँक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती कार्यालयातून फोन आला. समोरून कंदी सर स्वतः बोलत होते. रत्नागिरीत भेटायला या म्हणून त्यांनी निमंत्रण दिले. आम्हीही आढेवेढे न घेता त्याच आठवड्यात कंदी साहेबांना भेटायला त्यांचे कार्यालय गाठले. पाच सव्वा पाच फुट उंच, मुद्रेवर आश्वासक आभा, प्रेमळ प्रसन्न हास्य, सौम्य व अनोपचारिक बोलणं, मृदू व जिव्हाळ्याचा स्वर. या भेटीतच एका अनामिक आत्मीयतेचं नातं जुळलं... या भेटीत लांजा, राजापूर या दक्षिण रत्नागिरीतील ग्रामीण व दुर्गम तालुक्यात 1953 मध्ये स्थापन झालेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून गेली पाच वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन आम्ही करीत असल्याचे सांगत या संमेलनातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती त्यांना दिली. सोबत संघाचे अध्यक्ष आदरणीय सुभाष लाड सर होते. संघाचे साहित्यिक, शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रातील काम पाहून बँक ऑफ इंडिया आपल्या पाठीशी उभी राहील असे सांगत ग्रामीण मराठी साहित्य संमेलनासाठी दहा हजार रुपयाच्या मदतीचा धनादेश देत आपल्या शब्दाला त्यांनी कृतीची जोड दिली. यावेळी झालेल्या साहित्यिक चर्चेतुन कंदी सर वेळ मिळेल तेव्हा लेखन कार्य आवडीने करतात हे उमगले. बँक ऑफ इंडिया सारख्या राष्ट्रीय बँकेत उपआँचलिक प्रबंधक या वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या कंदी सरांचे कार्यालय सत्कार्याला पूजा मानून क्रियाशील पणे वावरणाऱ्या सजग व्यक्तींसाठी नेहमीच खुले असते.बँकेच्या व्यस्त, धावपळीच्या दैनंदिनीतूनही अशा चांगुलपणावर विश्वास ठेवत कार्यरत राहणा-या मंडळींसाठी ते आवर्जून वेळ काढतात. आलेल्यांचे मनस्वी स्वागत करतात. त्यावेळी त्यांच्या स्वरातील अगत्य आणि अार्जव मनात राहतो. विनम्रपणा मनाला भिडतो.
पुढे यशवंत गडाच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक नाटे गावात संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यानी आवर्जून उपस्थिती लावली. संमेलनाच्या ग्रंथदिंडीत वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर,कातळशिल्प अभ्यासक व माजी माहिती उपसंचालक सतीश लळित, डाॅ.सई लळित, शिवव्याख्याते रविराज पराडकर,सिने-नाट्य अभिनेते व जेष्ठ लेखक नारायण दादा जाधव,वृंदा कांबळी, अॅड.मुक्ता दाभोळकर यांच्या मांदियाळीत ते समाधानाने वावरले. या संमेलनात बँकेचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणून नव्हे तर मायबोलीचा निस्सीम भक्त , साहित्यप्रेमी म्हणून त्यांचा सहजसुंदर वावर त्यांच्या निर्मळ व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा ठरला.
ग्रंथ पूण्यसंपत्ती सर्वसुखी सर्वभूती ।।
या वचनावर श्रद्धा असल्यानेच प्रभानवल्ली येथील सहाव्या साहित्य संमेलनासह मोडी लिपीच्या प्रचारार्थ सुरू असलेल्या आमच्या 'मोडीदर्पण' दिवाळी अंकाला त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले.सरस्वतीचे उपासक असलेल्या कंदी सरांचे साहित्यप्रेम त्यांच्यापुरते सिमीत नाही.साहित्य वाचनातून मिळालेल्या सम्यक दृष्टीतून ज्या जिल्ह्यात बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी म्हणुन ते वावरतात तिथली साहित्य चळवळ गतिमान ठेवणा-या साहित्यसंस्थांच्या पाठीशी ते समर्थपणे उभे राहतात.इतक्या मोठ्या पदावर काम करुनही, इतका व्यासंग असुनही एखादी व्यक्ती केवढी ऋजू असू शकते! कधीही भेटले तरी शांत समंजसपणे बोलणे.दुस-याच्या अगदी छोट्या -छोट्या गोष्टींचे कौतुक करण्याचा स्वभाव! एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाने आपल्याला आदर वाटतो, पण त्याच व्यक्तीबद्दल इतके आतुन प्रेम, नितांत विश्वास वाटणे फार कमी व्यक्तींबद्दल होते, के आर.कंदी साहेब त्यापैकीच एक!
अतिशय पारदर्शी अधिकारी म्हणुन कंदी साहेबांची ओळख आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असताना ग्रामीण भागात लघुव्यवसाय सुरु झाले पाहिजेत,नवउद्यमी तरुणाईच्या पाठीशी बॅकांनी उभे राहिले पाहिजे या विचारावर ते ठाम होते.यातुनच जिल्हाभरात त्यांनी बॅक आॅफ इंडिया नव्याने उद्योग सुरु करणा-यांसाठी एक पाऊल पुढे येऊन सहकार्य करेल हे दर्शविण्यासाठी मेळावे आयोजित केले.लांज्यातही असाच एक मेळावा त्यांनी आयोजित केला होता.यावेळी मेळावा संपल्यावर महाराष्ट्रात फणसकिंग म्हणुन नाव कमविलेल्या मिथीलेश देसाई या युवकाची फणसबाग पाहून त्यांनी माझ्या निवासस्थानी मला भेट दिली होती.एवढा मोठा अधिकारी घरी येण्याची ती पहिलीच वेळ होती.मात्र साध्या सात्विक स्वभावाच्या कंदी साहेबांनी आमचा साधासा पाहुणाचारही आपुलकीने स्विकारला आणि निरोप घेतला.ज्या ठिकाणी कंदी साहेबांची नियुक्ती होते त्या प्रदेशाचा सखोल अभ्यास करित तो सारा प्रांत भटकंतीच्या विशेष आवडीतुन धुंडाळत जाणुन घेणे हे त्यांचे आणखी एक विशेष! कोकणासारख्या स्वर्गीय प्रदेशात आल्यावर तर त्यांचे भटकंती प्रेम अधिकच फुलून आले. बँक आॅफ इंडियाचा इतका मोठा कामाचा व्याप असतानाही ज्या ज्या वेळी सुट्टी असेल तो दिवस घरामध्ये कुटुंबासह निवांतपणात न घालविता जवळच्या पर्यटन स्थळांना भेटी देत त्यांनी सत्कार्णी लावला. भटकंतीची आवड असणा-या माझ्याशी यातुनच त्यांचे अधिक मैत्र जमले.
बँकिंग जबाबदा-या, कौटुंबिक जबाबदा-या, आणि साहित्यसेवा या तीनही आघाड्यांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले.बँक आॅफ इंडियाचा वाणिज्य परिघ ओलांडुन त्याबाहेरील चांगल्या कामांना पाठबळ देणा-या कंदी साहेबांचा काही महिन्यांपुर्वी फोन आला. - माझी हैद्राबादला बदली झाली असून दोनच दिवसात मी निघणार आहे.श्रीकृपेने पुन्हा नक्कीच भेटू, तुमचं कामातील सातत्य टिकवुन ठेवा,असा अधिकारवाणीतील शुभेच्छावजा बदलीची माहिती देणारा तो दुरभाष वरील संवाद होता.त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे शक्य झाले नाही.पण काही माणसे आपल्याला समृद्ध करतात. स्नेहधारेने चिंब भिजवुन टाकतात.आभाळ भरुन दिलेल्या या माणसांना आपण हृदयाच्या हळव्या कप्प्यात जपत असतो.माणुसपण जपणा-या कंदी साहेबांनीही या कप्प्यात अलगद जागा मिळवली आहे.ते आता हैद्राबादला गेल्यामुळे सातत्याने त्यांची भेट होणार नसली तरी त्यांनी प्रेमपुर्वक दिलेली मिल्टाॅनची पाणीबाॅटल रोज काॅलेजला जाण्यासाठी बाहेर पडताना माझ्यासोबत असते.त्या बाटलीतील पाण्याचा घोट पिताना कंदी सरांसोबतच्या सुखद आठवणींची स्मरणसाखळी मला सुखावुन जाते.
आता हैद्राबाद येथेही सर आपल्या कामाची मुद्रा उमठवतील याची त्यांना जाणणा-या सर्वांनाच खात्री आहे.
माझ्यासह अनेकांच्या हृदयात स्थान मिळविणा-या के.आर.कंदी यांच्या हातून असेच सत्कार्य होवो व त्यांच्या हृदयातला सद्भावनेचा झरा असाच खळाळत राहो. हीच प्रार्थना!
----------------------------------------
विजय हटकर.
लांजा
८८०६६३५०१७
No comments:
Post a Comment