Tuesday, February 4, 2025

 

भारतीय ऑर्गन निर्माता : उमाशंकर दाते.



श्री उमाशंकर दाते

मु.पो. आडिवरे, ता. राजापूर


   संगीतातील अत्यंत महत्वाचे वाद्य म्हणजे ऑर्गन! एकविसाव्या शतकात ऑर्गन हे वाद्य जगभरातून लुप्त होते की, काय अशी भिती असतानाच एका भारतीय संगीत शिक्षकाने ऑर्गन वाद्य बनाविण्यासाठी पुढाकार घेतला. इतकेच नव्हे तर 'मेड इन इंडिया' ऑर्गन वाद्य बनवून सातासमुदापार पाठवित एकविसाव्या शतकातील ऑर्गननिर्माता अशी ओळख प्राप्त केली आहे. हे संगीत शिक्षक म्हणजेच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील आडिवरे गावचे सुपूत्र श्री. उमाशंकर दाते होय..


     उमाशंकर दाते यांचा जन्म १४ जून १९७६ रोजी राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे सामान्य कुटुंबात झाला.त्यांचे शिक्षण १२ वी कला आणि संगीत विशारद असे झालेले आहे . प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण आडिवरे येथेच पूर्ण करून उच्च माध्यमिक शिक्षण राजापूर हायस्कूलमधून पूर्ण केले आहे.असे असले तरीही त्यांचा आजपर्यंतचा प्रवास खूप खडतर स्वरूपाचा आहे. सन १९९३मध्ये बारावी झाल्यावर घराची जबाबदारी असल्याने खासगी प्रवासी वाहतूक असा व्यवसाय करायला लागले,तो साधारण २००१ पर्यंत चालत होता परंतु नंतर हा उद्योग तेवढा फायदेशीर चालत नसल्याने जोडीला केबल नेटवर्कचा व्यवसाय चालू केला मात्र अत्याधुनिक विकसित तंत्रज्ञानामुळे DTH च्या सर्वदूर पोचल्याने तोही व्यवसाय बंद करावा लागला.वडिलांनी मोठ्या कष्टाने चालू केलेला इलेक्ट्रिकलचा व्यवसाय वडिलांचे वय झाल्याने त्यांनी पुढे चालू ठेवला.पुढे संगीताशी त्यांचे स्वर जुळलाने त्यांची प्रापंचिक गाडीही रुळावर आली.सन२०११ पासून ते राजापूर हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सेवेत आहेत. तसेच,महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरण समितीवर सदस्यही आहेत.


       बाळ दाते यांचा वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत संगीताशी तसा संबंध नव्हता पण १९९४ साली आडीवरेच्या श्री देवी महाकाली मंदिरातील एका भजनाच्या कार्यक्रमात संगीत सुरांशी त्यांचा अनामिक ऋणानुबंध जुळला. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे गुरुकडे जाऊन शिक्षण घेणे शक्य नसल्याने या आधुनिक युगातील  एकलव्याने चक्क नोटेशनची पुस्तक आणि सीडी यांनाच आपले गुरु मानले. झपाटून संगीत साधना केली आणि १९९९ साली आकाशवाणीची ऑडिशन पास होऊन राजमान्यता देखील मिळवली.


      सन २००२ मध्ये संगीत नाटक बघण्याचा दाते यांच्या जीवनात योग आला व त्यावेळेस बाळासाहेब यांनी ऑर्गन हे वाद्य प्रथमतः बघितले. या वाद्याच्या नादमाधुर्याने प्रभावित होऊन हे वाद्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे वाद्यच आता जगात कुठेही तयार होत नाही. यातूनच त्यांची अस्वस्थता वाढली व कलेसोबतच उद्यमशीलता जागी झाली. हे वाद्य इतिहास जमा होण्याची भीति तर होतीच परंतु यामुळे महाराष्ट्रातील संगीत नाटकांमध्ये मोठी पोकळी निर्माण होईल अशा काळात रीड ऑर्गन हे वाद्य संगीत नाटकाचा अविभाज्य भाग आहे,मराठी रंगभूमीवर जवळपास १०० वर्ष हे वाद्य वापरलं गेले आहे. परंतु हे वाद्य काही अगदी मोजक्याच लोकांकडे होते. त्यामुळे नवीन वादकांना इच्छा असूनही वाद्य उपलब्ध होत नव्हतं ही बाब उमाशंकर दाते यांच्या लक्षात आली. शतकभर सदरचे वाद्य वापरात असल्यामुळेच ते वाद्य आपलेच आहे असं वाटू लागले. पण वस्तुस्थिती फार वेगळीच आहे ,साधारण १८२७ ते १९५० या याकाळात हे वाद्य फक्त अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये तयार होत असे. भारतात मात्र हे वाद्य तयार झालंच नाही, त्यामुळे हे आज इतिहास जमा झालं होतं.

            

    ऑर्गन हे पाश्चात्य संगीतामधील अतिशय महत्त्वाचा पण गुंतागुंतीची रचना असलेले वाद्य.ख्रिसपूर्व २८५- २२२ काळात पाण्याचा ऑर्गन (वॉटर ऑर्गन ) नावाचे वाद्य शर्यती आणि खेळाच्या वेळी पुरातन ग्रीक व रोमन संस्कृतीत वाजवले जायचं.पुढे चर्चमध्ये या वाद्यानं आपल्या नादमाधुर्याने कायमचे स्थान मिळवलं आणि त्याला घरंदाजपणा आला. या ऑर्गन वाद्याचे थिएटर ऑर्गन, इलेक्ट्रिक ऑर्गन, रीड ऑर्गन असे अनेक भाऊबंद आहेत. यातील रीड ऑर्गन आणि भारतीय संगीतामधील पेटी किंवा हार्मोनियमचा अगदी जवळचा संबंध आहे. १७व्या शतकात रिड ऑर्गन ची निर्मिती असली तरी त्याला हार्मोनियम हे नाव आणि योग्य स्वरूप देण्याचे काम १८४० साली अलेक्झांडर या फ्रेंच माणसाने केलं आणि पट्ट्याने त्याचा पेटंटही घेऊन टाकलं. युरोपियन माणसांची ही दूरदृष्टी पाहून वाटतं तंतुवाद्यासारखी अनेक वाद्य तयार करणाऱ्या आपल्या भारतीय पूर्वजांनी याची पेटंट घेतली असती तर भारताला जगभर कर्ज वाटता आलं असतं,असो!


       इंग्रज राजवटीत भारतामधील चर्चमध्ये वाजवल्या जाणाऱ्या या धीरगंभीर आणि नादमधुर वाद्याला गोविंदराव टेंबे आणि बालगंधर्व यांच्या सारख्या सूररत्नपारखी दिग्गजांनी संगीत रंगभूमीवर सामावून घेतलं आणि एक सुवर्णयुग साकार केलं. पुढे काळाच्या ओघात इलेक्ट्रॉनिक्स वाद्यांनी या गुणवंत वाद्याचा नाद दडपला. पण हे होणं संगीत कलेला मान्य नसावं म्हणूनच या ऑर्गन उत्थापनाचं कार्य घडून आलं आडिवरे  गावातील बाळ दाते या मेहनती आणि गुणी कलावंताकडून.भारतात ऑर्गन बनत नसल्यामुळे सतत धडपडी करून मुंबईला एक ऑर्गन साऊंड बॉक्स त्यांनी मिळविला. अमेरिकेतील एका मित्राकडून ५० ऑर्गनचे रीडस मिळवले आणि अथक मेहनतीने २०१३ मध्ये भारतीय बनावटीचा पहिला ऑर्गन बनविला.त्यासाठी मिलिंग मशीनही तयार केले या वाद्यामध्ये खूप सुधारणा केल्या ,जवळपास ५० कि.ग्रॅ.वजन असलेल्या ऑर्गनचे वजन १४.५० कि.ग्रॅ.पर्यंत कमी केलं.त्यांनी आपल्या अभ्यासपूर्व व कौशल्यपूर्ण कामानं ऑर्गन वाद्य निर्मितीला नवसंजीवनी दिली.


    सर्वच भारतीयांची आणि विशेष करून महाराष्ट्राची व कोकणवासियांची मान गर्वाने ताठ व्हावी अशी संगीत क्षेत्रात फार मोठी कामगिरी उमाशंकर उर्फ बाळ दाते यांनी केली आहे. ज्यायोगे त्यांच्या या भरीव योगदानामुळे संगीत नाटकाची परंपरा अशीच पुढे जाण्यासाठी फार मोठी मदत झाली आहे. त्यांच्या कामाची दखल थेट Reed Organ Society USA या जागतिक आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली असून त्यांच्यावर मुखपृष्ठासह सविस्तर नऊ पानी लेख (आर्टिकल) सन २०१७ मध्ये प्रसिद्ध केला. त्यात स्पष्ट अस म्हटलं आहे की, ऑर्गन हे वाद्य आता भारतात नवीन श्वास घ्यायला लागलंय तसेच युरोपियन ROS नेही डच भाषेत लेख (आर्टिकल) प्रसिद्ध केले. डेव्हिड एस्टीस या व्यक्तीने स्वतः भारतात येऊन उमाशंकर दाते यांची भेट घेतली.त्यांच्या या कामाची दखल अनेक मान्यवर लोकांनी घेतली आहे. त्यामध्ये कै पद्मश्री तुळशीदास बोरकर, शंकरजी महादेवन , विशालजी भारद्वाज, पं. उल्हास कशाळकर, पं. सुरेश तळवलकर, पं. आनंद भाटे ,प्रसिद्ध ऑर्गन वादक आदित्य ओक, अमित पाध्ये डॉ. उदयजी निगुडकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री तेजश्री प्रधान, माजी मंत्री विनोद तावडे या आणि अशा अनेक दिग्गज लोकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विशेष कौतुक केले आहे . विशेष म्हणजे परमपूज्य स्वामी बालयोगी सदानंद महाराज (तुंगारेश्वर, वसई ) यांनीही भेट दिली आहे.


 भारतीय ऑर्गन निर्माता म्हणून भारतातील आघाडीच्या वृत्तपत्र माध्यमानीही दाते यांची दखल घेतली. यामध्ये Times of India, BBC, Abp माझा,न्यूज 18 लोकमत, झी 24 तास, लोकसत्ता, लोकप्रभा, महाराष्ट्र टाईम्स, पुढारी , सकाळ, प्रहार, तरुण भारत अशा अनेक माध्यमांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.याव्यतिरिक्त DD सहयाद्री वाहिनीवर विचारांच्या पलीकडे (beyond thoughts) या कार्यक्रमात बाळ दाते यांची मुलाखतही प्रसारित झाली आहे. गतवर्षी दिल्ली येथे आयोजित जागतिक पातळीवरील G20 summit 2023 च्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान दाते यांना मिळाला.परिषदेच्या रंगमंचावर पारंपरिक वेशभूषेत ऑर्गन वाद्यासह ते विराजमान झाले होते. तेथे त्यांनी आपली कला देश विदेशातील मान्यवरांसमोर सादर केली. एकुणच संगीतक्षेत्रातील ऑर्गन या महत्वपूर्ण वाद्य निर्मितीला नवसंजीवनी देण्याच्या  महत्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.दाते यांनी आजवर पन्नासहून अधिक ऑर्गन तयार केले असून अमेरिका,नेदरलँडसह विविध देशात त्यांचे ऑर्गन तेथील सांगतिक कार्यक्रमात सप्तसुरांची उधळण करीत आहेत.


      एकुणच भारतीय बनावटीचे आणि गुणवत्तेने कांकणभर सरस ऑर्गन तयार करून जागतिक संगीताच्या पटलावर भारतीय ऑर्गन निर्माता म्हणून ओळख प्राप्त करणाऱ्या श्री उमाशंकर दाते यांना सन २०२५ चा नाटककार ला. कृ. आयरे कलाश्री पुरस्कार संघाच्या १० व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला. एका योग्य पुरस्काराची उंची वाढविण्याऱ्या कलोपासकाला गौरवल्याने संघ कार्यकर्ता म्हणून मनस्वी आनंद झाला. उमाशंकर दातें सारखी व्यक्तिमत्वे कोकणचे नाव जगभर उंचावतात, तेव्हा त्यांचाविषयीचा आदरभाव वाढीस लागतो. संघाच्या दहाव्या संमेलनात त्यांना भेटून बोलता आले, त्यांच्यासोबत एक संस्मरणीय छायाचित्र काढता आले, सोबतच त्यांच्यातील गुणविशेषांचे आकलन करता आले. याचे समाधान झालेच मात्र अशा दिग्गजांच्या सहवासात तीन दिवसही सोन्याचे झाले!


💐💐💐💐

विजय हटकर

लांजा.









  


      


       

संघाचे दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलन.


संपादकीय ...


        गत दशकभरात स्वतःची वेगळी ओळख जपत कोकणातील ग्रामीण साहित्याची चळवळ नव्याने बांधण्यासाठी पुढाकार घेतलेल्या, सामाजिक बांधिलकीचे अधिष्ठान असलेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबईच्या अनुज्ञेनं यावर्षीचे दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मुंबई - गोवा महामार्गावर वसलेल्या,राजापूर तालुक्यातील स्वर्गीय सुंदर वाटूळ गावाला मिळाला आहे. या अक्षर सोहळ्याच्या निमित्ताने ' पत्रिका ' हा विशेषांक सानंद प्रकाशित झाला. या विशेषांकातील संपादकीय लेख ...




        संघाच्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे हे दहावे वर्ष असून हा सारस्वतांचा मेळा राजापूर व लांजा तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीच्या तिरावर वसलेल्या, मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील ऐतिहासिक नाव लाभलेल्या, राजापूर तालुक्यातील 'वाटूळ' या निसर्गसंपन्न गावात परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज मठ परीसरात भरणार आहे. वारकरी संप्रदायाची असंख्य वर्षांची परंपरा वाटूळ गावाने जोपासली आहे. गावातील श्री महादेव, आदिष्टी,रवळनाथ, गांगोदेव, जाकादेवी, विठ्ठल-रुक्मिणी, गगनगिरी महाराज मठ, महापुरुष, बौद्धविहार इत्यादी धार्मिक स्थळे सामाजिक सलोखा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत गावातील धरण,ब्राह्मण देव,वाघबीळ, तांबळवाडी कडा इत्यादी प्रेक्षणीय स्थळे पर्यटन दृष्ट्या भविष्यात नावारूपाला येऊ शकतात. गणेश चतुर्थी, शिमगा, जाकादेवी उत्सव, महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, संत तुकाराम बीज,दत्त जयंती, नवरात्रोत्सव, गोकुळ अष्टमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बौद्ध पौर्णिमा, रिक्षा संघटनेची श्री सत्यनारायण महापूजा यासारख्या उत्सवांमुळे वाटूळ गावाचे सामाजिक ऐक्य अबाधित राहिले आहे.

      

     कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, व्यापार, शेती, राजकारण इ. सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राच्या मातीची सेवा वाटूळ गावच्या असंख्य सुपुत्रांनी केली....गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आणि आदर्श विद्यामंदिर प्रशालेने असंख्य विद्यार्थी घडविले... विपुल निसर्गसंपदा आणि मुबलक पाणी लाभलेल्या वाटूळ गावाने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या असंख्य पांथस्थांना इतिहास काळापासून आश्रय दिला आहे. याची साक्ष देणारी धर्मशाळा आजही वाटूळ तिठ्यावर उभी आहे.वाटूळ गावच्या प्रथा, परंपरा, उत्सव धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे, सामाजिक ऐक्य इ. बाबी सर्वार्थाने जागतिक पटलावर प्रतिबिंबित व्हाव्यात या उदात्त हेतूने राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने दहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा हा प्रपंच आरंभिला आहे.


       १९३९ साली कृष्णाकाठी दत्ताचे पवित्र स्थान असलेल्या औंदूंबरला कवी सुधांशु आणि कथाकार म. बा. भोसले यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातले पहिले ग्रामीण साहित्य संमेलन भरविले होते.त्याचे अध्यक्ष महामहोपाध्याय द.वा. पोतदार होते. यानंतर छोट्या प्रारूपातील साहित्य संमेलने भरविण्याची जणू परंपराच राजभरात सुरु झाली. आज ३५०च्या आसपास संमेलने राज्यभरात भरविली जातात.एका अर्थाने ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पूरकच ठरत आहेत.महाराष्ट्रात दरवर्षी गावोगावी जी विभागीय, प्रादेशिक आणि अन्य छोटी संमेलने भरतात ती नवीन लेखक, कवी घडविण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त, फलदायी ठरत आहेत, यात शंका नाही. ती केवळ अभिजात साहित्य प्रकारातील संमेलने आहेत अशातील भाग नाही. मात्र या संमेलनातून अनेक नव्या वक्त्यांना आणि साहित्यिकांना प्रोत्साहन मिळते. यंदा ज्याच्या पुढाकाराने वाटूळ गावी संमेलन संपन्न होते आहे ते नव्या दमाचे कवी - कथाकार विराज चव्हाण हे देखील संघाचा संमेलनातून नावारूपाला आलेले आहेत. कोल्हापूर - बेळगाव सीमेवर वसलेल्या उचगाव, कारदगा, कुद्रेमुख, चामरा, बाळेकुंद्री, बेळगल्ली, मंडोली, माविगड, येल्लूर अशा १० सीमावर्ती गावातील ग्रामस्थ ही मायमराठी च्या संवर्धनासाठी कानड्यांच्या विरोध मोडून जेव्हा सातत्यपूर्वक साहित्य संमेलने भरवितात तेव्हा छाती अभिमानाने फुलते.


    तीन वर्षानी राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या दरम्यान अध्यक्ष स्थान भुषविणारे संघाचे अध्यक्ष व प्रसिद्ध कवी सुभाष लाड यांनी 'बिनखुर्चीच्या व्यासपीठाचे संमेलन ' म्हणून ग्रामीण मराठी संमेलनांचे गेली १० वर्षे यशस्वी आयोजन करून संस्थेला राजभरात ओळख मिळवुन दिली आहे. संघ साहित्यासह शिक्षण,संस्कृती, कला, आरोग्य, कृषी, पर्यटन, पर्यावरण क्षेत्रातही सातत्यपूर्वक काम करतो आहे. अनेक तरुण कार्यकर्ते संघाकडे आकृष्ठ होऊन ग्रामीण जागरणाच्या प्रक्रियेत आस्थेने काम करीत आहेत, हे कार्यमग्न संघाध्यक्ष सुभाष लाड यांचे यश आहे हे मान्य करावे लागेल. साहित्य - संस्कृती - कला विषयीची आणि कोकणात चांगलं काही घडावं, कोकणातले गुणीजन कोकणाला आणि इतर प्रांताना माहीत व्हावेत, यातून उगवत्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी यासाठीची त्यांची तळमळ आणि अशा सत्कार्यासाठी पदराला तोशिष लावून सुभाष लाड यांनी चालविलेल्या धडपडीला दाद द्यायला हवी. अशी झपाटलेली वेडी माणसंच नव्या वाटा शोधत असतात आणि निर्माण करत असतात, असे जाहिर कौतूक शिपोशी येथे संपन्न झालेल्या नवव्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष जेष्ठ लेखक,संपादक, पत्रकार विजय कुवळेकर यांनी संमेलनाध्यक्षीय भाषणात करून सुभाष लाड सरांचे केलेले कौतूक संघ कार्यकर्त्यांना प्रेरक ठरले आहे.


       साहित्यिकाला पडणारे प्रश्न हे सर्वसामान्यांचे असतात. त्यातून निर्माण झालेली कलाकृती म्हणजे साहित्य. त्यामुळे साहित्य ग्रामीण किंवा नागरी असे काहीच नसते.कोकणातील  सर्वच ज्येष्ठ व  नवोदित साहित्यिकांना, मराठीच्या चोखंदळ रसिकांना अखिल भारतीय साहित्य संमेलन सहभागी होता येत नाही. त्यामुळे कोकणातील खास करून ग्रामीण भागातील साहित्यिकांना साहित्य संमेलनाचा आनंद घेता यावा, साहित्यिकांमधील नवांकुराचे भरण पोषण व्हावे, खेड्यातील जनतेला संमेलनाचे स्वरूप समजावे व या अक्षर सोहळ्यातून मायमराठी विषयीचा अभिमान वृद्धिंगत व्हावा,  मराठी भाषा व संस्कृती प्रचारातीत मराठी माध्यमाच्या शाळेचे महत्व विशद करून दिवसेंदिवस कमी होणारी मराठी शाळांतील पटसंख्या वाढावी व बंद पडत असलेल्या मराठी शाळा सुरू व्हाव्यात असे विविधांगी उद्देश या संमेलनाचे असल्यानेच संमेलनाच्या नावामध्ये ग्रामीण शब्दाचा जाणीवपूर्वक समावेश केलेला आहे. या सोबतीने आपल्या कर्तृत्वाने भारतमातेची सेवा करणाऱ्या, राजापूरच्या सकस मातीतील थोर सुपुत्रांची ओळख कोकणातल्या नव्या पिढीला व्हावी हा देखील या संमेलनाचा उद्देश आहे.


     नुकताच माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्याचे परित्रकही काही दिवसांपूर्वीच जाहिरही झाले. मात्र सोशल मीडिया, इंटरनेट यांच्या अफाट वापराच्या काळात तरुणाईला ग्लोबल भाषेकडून मायमराठीकडे वळविण्याचे आव्हान मातृभाषेचे सोहळे आयोजित करणा-या संस्थांपुढे आहे. या दृष्टीने संघाच्या संमेलनात युवाईला महत्च दिले जात असून त्यांना दिली जाणारी संधी स्वागतार्ह आहे. महाविद्यालयीन तरुणाईसाठी ही अक्षरयात्रा त्यांच्या साहित्यिक उर्मीला जागविणारी ठरू पाहते आहे.या दृष्टीने जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. किर्तीकुमार पुजारांसारखी अभ्यासू अधिकारी ही आता स्वत:हून पुढे येत आहेत.मराठी भाषेच्या या उत्सवासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून  ग्रंथाली' या अभिनव वाचक चळवळीचे  संस्थापक व महाराष्ट्रीयन संस्कृतिवैभवाच्या खुणा जतन करण्याचा आगळावेगळा उपक्रम असलेल्या 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'चे  मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल सर यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच संत तुकाराम महाराजांचे १२ वे वंशज ह.भ.प. अमोल अशोक महाराज मोरे,सिनेदिग्दर्शक राजेश देशपांडे, सिनेनाट्य अभिनेते महेश कोकाटे, कोकणातील  अभ्यासू पत्रकार,लेखक धीरज वाटेकर,विधीज्ञ विलास कुवळेकर या सर्वच मान्यवरांची उपस्थितीने ' वाटूळ ' येथील दशकपूर्ती संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

              यंदा दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. पूर्ण गाव या संमेलनाकडे एक सोहळा म्हणून पाहत असून गावकऱ्यां पासून ते चाकरमानीही  मनापासून सहभागी होऊन साहित्याच्या रंगी रंगून जाणार आहे, यातच संघाच्या संमेलनांचे यश आहे.या संमेलनासाठी पत्रिकेत लेख देऊन अनेक नामवंतांनी सहकार्य केलं, तसेच सर्व साहित्यप्रेमी कार्यकर्ते,संमेलन समिती,सहयोगी संस्था,जाहिरातदार व वाटुळ परिसरातील सूज्ञ आस्थावान नागरिकांचे अमूल्य सहकार्य लाभलं म्हणूनच हा शारदेचा अक्षर सोहळा सिद्धीला जात आहे. उद्याच्या सशक्त सामर्थ्यवान मराठी पिढीसाठी आवश्यक असलेली ही साहित्याची दिंडी वाटूळ येथील वै.ह.भ.प. हरिभाऊ चव्हाण साहित्य नगरीत येणाऱ्या मराठी सारस्वतांसाठी आनंददायी पर्वणी ठरेल.

💠💠💠💠

विजय हटकर.

०१/०२/ २०२५




Wednesday, January 22, 2025

 व्यासंगी प्राचार्य हरपले...




  सन २००४ ते २००७ हा आमचा महाविद्यालयीन जीवनाचा काळ मंतरलेला होता. महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी आम्हाला प्रभावित केले होते.त्यापैकीच एक म्हणजे तत्कालीन प्राचार्य डॉ. सुधीर भोसले सर होय. व्यासंगी,प्रशासन कुशल भोसले सरांचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. प्रसन चेहरा, चेहऱ्यावर मिश्किल हास्य असलेले उंचपुरे भोसले सर बोलायला उभे राहिले की त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला शीतल विचारप्रवाह पुढे जाण्याची, ध्येय साध्य करण्याची प्रेरणा द्यायचा.


   भोसले सरांनी महाविद्यालयाचे प्राचार्यपद स्विकारले तो काळ महाविद्यालयाच्या उभारणीचा होता. नुकतेच उच्च शिक्षण देणारे सिनियर कॉलेज लांज्यातील शिक्षण धुरीणींनी अथक मेहनतीने सुंदर अशा निसर्ग समृद्ध वातावरणात आमराईत उभे केले होते. हा कसोटीचा काळ ठरला. प्रशासकीय कामांचा रेटा असतानाही त्यांनी अध्यापनाचे काम नित्यनियमाने केले. तो त्यांचा प्राणवायू होता. कॉलेजमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी होते.आजही तीच परिस्थिती कायम आहे. त्यांच्यामधील बलस्थाने आणि उणिवा याचा अदमास त्यांना होता. त्यांचा सर्वंकष विकास व्हावा म्हणून संस्थात्म पातळीवर त्यांनी निरपेक्ष प्रयत्न केले. कल्पकता, अभ्यासु वृत्तीच्या जोरावर संस्थाचालक, प्राध्यापक सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी भगिरथ प्रयत्न करत कॉलेजचा कायापालट केला.

    पदवीच्या तृतीय वर्ष कला शाखेसाठी मी हिंदी भाषा विषय निवडला होता.वर्षभर अभ्यासाकडे दूर्लक्ष व एकांकीका, पथनाट्ये याकडे लक्ष जास्त दिल्याने अंतिम परीक्षा १५ दिवसावर आली तरी अभ्यास करत नाही म्हणून नाराज झालेल्या एसएम चव्हाण सरांनी मला प्राचार्यांच्या दालनात उभे केले. माझी तक्रार भोसले सरांकडे केली मात्र सर अजिबात ओरडले नाहीत. त्यांनी शांतपणे तृतीय वर्ष अंतिम परीक्षेचे महत्त्व समजावून सांगत ध्येय साध्य करण्यासाठी उरलेल्या दिवसाचे नियोजन करून अभ्यास कर अशी प्रेरणा मला दिली. त्यासोबत माझ्या व्यक्तिगत परिस्थितीचे भान करून दिल्याने मी शेवटच्या टप्प्यात जोमाने अभ्यास केला.व कला शाखेत २००७ साली महाविद्यालया पहिला आलो.

 भोसले सरांनी दिलेला प्रेरणेमुळेच हे यश मिळविता आले होते.


     दिड वर्षापूर्वी नॅक कमिटीच्या भेटी दरम्यान प्राचार्य भोसले सर सीनियर कॉलेज लांजाला आले होते ती भेट शेवटची असेल असा विचारही त्यावेळी मनात आला नाही. आम्ही सर्वच माजी विद्यार्थ्यांनी अर्थात अभि राजेशिर्के, अतुल गुरव, दिगंबर मांडवकर व मी सरांसोबत उत्साहाने फोटो काढले होते. सर देखील त्यावेळी आनंदी होते.निवृत्तीनंतर येणारी अपरिहार्य मरगळ त्यांच्या सोबत वावरताना त्यावेळी कुठेच दिसली नव्हती. भोसले सरांनी त्यांच्या  एस.टी. प्रवासाचा एक भन्नाट किस्सा आम्हा मुलांना त्यावेळी सांगितलं होता. त्यात एसटी कंडक्टरला तर सर कसे फसवतात याचा सुंदर वर्णन होतं. आज मात्र सर आम्हा सर्वाना असेच फसवुन दिगंताचे प्रवासी झाले आहेत.खुप खोल खोल दाटुन आलय मनात, खुप लिहायचं होतं.. लिहीताही येत नाहिये.. थांबतो..

जाउद्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला..


भोसले सर तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली !!

🙏🙏🙏🙏🙏🙏


विजय हटकर, लांजा

२२.०१.२०२५



Friday, October 18, 2024

महाडचे चवदार तळे : आधूनिक तीर्थक्षेत्र

 महाडचे चवदार तळे :    आधूनिक तीर्थक्षेत्र



       आधुनिक भारताच्या इतिहासात महाडचे नाव सुवर्णाक्षराने लिहिले गेले ते १९२७ साली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे, मुक्तिसंग्रामामुळे! महाडच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाने समतेकडे जाणारा  एक महान यशस्वी इतिहास घडविला आहे.सामाजिक स्वातंत्र्य व समता प्रस्थापित होण्यासाठी कुरुक्षेत्र बनलेले महाडचे चवदार तळे आज महाराष्ट्रातील आधुनिक तीर्थक्षेत्र बनले आहे.महाडचा मानबिंदू म्हणजे चवदार तळे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक पाणवठ्याच्या सत्याग्रहामुळे चवदार तळ्याला इतिहासात एक आगळे महत्त्व प्राप्त झाले. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक पारतंत्र्याच्या संग्रामाची नौबत येथे झाडल्याने चवदार तळ्याला तेजोवलय प्राप्त झाले.

       छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे केंद्रबिंदू व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैभवशाली समाजक्रांतीचा तेजस्वी आरंभबिंदू ठरलेले कोकणातील ऎतिहासिक शहर म्हणजे महाड. मुंबई  गोवा महामार्गावर वसलेले रायगड जिल्ह्यातील हे प्रमुख छोटेखानी शहर.सावित्री व गांधारी या नद्यांच्या संगमावर सुपीक,सकस काठावर दोन - तीन मैल परिघात पसरलेले महाड हे बंदरवजा शहर फार पुर्वीपासुन प्रसिद्ध आहे. सातवाहन, शिलाहार, यादव, निजाम, आदिलशहा,मराठे व अखेरीस इंग्रज अशा अनेक राजवटी महाडने पाहिल्या.एके काळी हे शहर महिकावती या नावाने ओळखले जात होते. शिलाहार राजा अनंतदेव यांच्या ११ व्या शतकातील शिलालेखानुसार महाडचा उल्लेख पालीपट्टण असा आला आहे.१६ व्या शतकात गव्हाच्या व्यापाराचे केंद्र असलेले महाड लोणारी कोळसा व तांदुळाच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध होते. दोन नद्यांचे सानिध्य असुनही पाण्याची टंचाई उन्हाळ्यात या शहराला तीव्रतेने जाणवत असते.याचे कारण म्हणजे सिंधुसागराचे पाणी नाकातोंडात शिरलेली सावित्री व गांधारी गोडे पाणी फिरवायला असमर्थ.त्यामुळेच शहराच्या स्थापत्यरचनेवेळी इथल्या नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या दूरदृष्टीने निर्मिलेली हावसतळे, चवदारतळे, काकरतळे,वीरेश्र्वराचे तळे,केतकी तळे,रुमाली तळे,चांभार तळे आणि कोटेश्र्वराचे तळे ही आठ तळीच जनसामान्यांच्या पाण्याचा मोठा आधार होता.या तळ्यांना धरूनच महाड शहर पुढे नावारूपाला आले.विकसित झाले.कालौघात यातील काही तळी नागरिकीकरणाच्या नावाखाली बुजविण्यात आली.


चवदार तळे  :- 


             चवदार तळे हा शहराच्या उत्तरेला ज्या आठ मोठ्या तलावांभोवती महाडच्या विविध वस्त्या वसल्या आहेत त्यातील एक महत्त्वाचा तलाव. ५२५ फूट लांब आणि ३०० फूट रुंदीचा हा विस्तीर्ण जलाशय. एकूण क्षेत्रफळ ०३ एकर २४गुंठे आणि ७६ चौरसवार. रखरखत्या उन्हाळ्यातही या तलावाचे पाणी आटत नाही. चहुबाजूनी दगडाने बांधून काढलेल्या या तळ्याला ठिकठिकाणी दगडी पायऱ्यांनी बांधून काढलेले घाट आहेत.पूर्वी निम्म्या- शिम्या गावाला पाणीपुरवठा इथून व्हायचा. म्हणून तलावात पोहायला बंदी होती.फक्त वर्षातून गोकुळाष्टमीच्या दिवशी दोन दिवस ब्राह्मणी काला व गुजरी काला या दिवशी चवदार तळ्यात सर्व नागरिक स्त्री-पुरुषाला मनसोक्त पोहण्याची परवानगी असायची. चवदार तळे कुणी बांधले याची नोंद इतिहासात सापडलेली नाही. पण हे तळे फार प्राचीन असावे. या तळ्याकाठी प्राचीन काळी कागदी लोकांची म्हणजे हात कागद तयार करणाऱ्या लोकांची वस्ती होती असे म्हणतात. तत्पूर्वी महाड शहराच्या दक्षिणेकडून वाहणारी सावित्री नदी या तळाच्या मार्गाने वाहत असावी आणि कालौघात तीने आपला प्रवाह मार्ग बदलला असावा असाही एक तर्क आहे. तळ्यामध्ये जिवंत पाण्याचे झरे असल्याने ते कधीही पूर्ण कोरडे पडले नाही असे जाणकार सांगतात.चवदार तळ्यामध्ये १४  विहीरी आहेत असा लोकसमज, १९५८ सालाच्या उन्हाळ्यात तळे खूपच आटले होते, तेव्हा त्यातल्या १० विहीरींचा पत्ता लागला.१९४० च्या आवर्षण वर्षी तळ्यातल्या दोन विहिरींचे बांधकाम नगरपालिकेने केल्याची नोंद आहे. 


तळ्याच्या व्युत्पत्तीबाबत असलेले मतप्रवाह :-

१) चौदा +दारे = चौदादार - या चौदा दारांवाटे तळ्यातील पाणी बाहेर येते म्हणून चवदारतळे असे नाव पडले.

२) महाडचे  इतिहास प्रेमी नागरिक कै. सुंदरभाई बुटाला यांच्या मते, चौदा + आड( विहीरी)  = चौदाड -चौदार- चवदार चवदार चवदार

३)  या तळ्याचे पाणी चवदार लागते म्हणून याचे नामाभिदान चवदार तळे झाले असेही काही जाणकार सांगतात.


चवदार तळ्याचा मुक्तिसंग्राम :-



            एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या पंधरा वर्षांत आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रशासनाच्या सोयीसाठी किंवा ब्रिटीशांच्या अतिंमतः फायद्यासाठी भारताची कायदेव्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पुढे युद्धात भाग घेणार्‍या ब्रिटनला आवश्यक उत्पादने वेगाने निर्मीत करण्यासाठी एका सुत्रबद्ध समाजाची गरज होती, भारतातला जातीवाद आणि मागास प्रथा अंतिमतः ब्रिटींशाच्या उत्पादनावर थेट परिणाम करीत असल्याने जिल्हापातळीवर आणि किमान घोडागाडीने जोडल्या गेलेल्या विकसित खेड्यांवर ब्रिटीशांनी आपले कायदे शक्य तितक्या प्रभाविपणे लावण्यास सुरुवात केली. इथल्या रुढी परंपरांमधुन भारतीयांना मुक्ती देण्याचा उद्देश मात्र ब्रिटीशांचा नव्हता, आपले साम्राज्य आणि उत्पादन वाढविण्यासाठी रुढीपरंपरांचा उपयोग होत असल्यास ब्रिटीश तो अवश्य करुन घेत होते, कित्येकदा समाजातल्या उच्चवर्णियांकडुन आपल्याला त्रास होउ नये म्हणुन उच्चवर्णियांच्या रुढींना अधिक चांगल्या प्रकारे उत्तेजनही देत होते. तरीही प्रशासनावरचा तणाव कमी व्हावा आणि आर्थिक व्यवहार सर्वसंमत होण्यासाठी मुलभुत परस्परव्यवहारही सर्वसंमत होणे गरजेचे असल्याने १९२३ साली तत्कालीन बॉम्बे लेजीस्लेटीव्ह काउंसीलने अस्पृश्यांना सार्वजनिक संसाधनांचा वापर करु देण्याची कायद्याने परवानगी दिली.


      ह्या काळात महाड हे एका अर्थाने महत्वाची नगरपरिषद म्हणुन विकसित होऊ लागले होते. तिथुन दहा किलोमिटर अंतरावर असलेल्या दासगाव बंदरात मालाची वहातुकही चालायची आणि सैन्याची ये जा असायची. ह्यात कधीकाळी सैन्यात असलेल्या अस्पृश्यांचाही समावेश होता. ह्यातल्या काही सेवानिवृत्त सैनिकांनी त्यांच्या कम्युनिटीसाठी लहान मुलांची शाळा आणि प्रथमोपचारासाठी जागाही बांधली होती. मुख्य म्हणजे इथे ब्रिटीश इंडीया सबमरीन टेलीग्राफ कंपनीमार्फत तारेची सोय उपलब्ध होती. इतके सामाजिक परिवर्तन घडत असुनही ह्या लोकांना महाडच्या बाजारात मात्र पिण्याचे पाणी मात्र मिळत नसे, त्यांना तळ्यावरही प्रवेश नव्हता. १९२३ साली पारीत केलेल्या कायद्याचा आधार घेउन महाड नगरपरिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरबानाना टिपणीस ह्यांनी चवदार तळे अस्पृश्यांसाठी आदेश देउन खुले करविले होते परंतु ह्या निर्णयाला उच्चवर्णियांचा तीव्र विरोध होता. ह्याशिवाय तळ्याच्या आसपास अनेक उच्चवर्णियांचा पहारा व लक्ष असल्याने अस्पृश्यांना ठरवुनही पाणी पिणे शक्य नव्हते.

         

         सुरबानाना टिपणीस ह्यांचे तरुण मित्र रामचंद्र बाबाजी मोरे हे ह्या परिस्थीतीवर काहीतरी तोडगा काढुन चवदार तळे सर्व जातीधर्मियांना खुले करता येईल ह्यासाठी प्रयत्नशील होते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती. १९२४ साली झालेल्या कुलाबा डिस्ट्रीक्ट डिप्रेस्ड क्लास मिशनच्या सभेत रामचंद्र मोरे ह्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेउन चवदार तळ्याबद्दलची स्थिती कथन केली. तळे सर्वांना खुले व्हावे ह्यासाठी सत्याग्रह हा एकमेव मार्ग उपलब्ध असल्याची सर्वांचीच खात्री पटली. हा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली होणार असला आणि त्यात अनंत चित्रे, गंगाधर सहस्त्रबुद्धे ,सुभेदार सवादकर, पोतनीस, पत्की, कमलाकर टिपणीस, चिंतोबा देशपांडे यांसारख्या अनेक परिवर्तनवादी उच्चवर्णियांचा पाठिंबा आणि थेट सहभाग असला तरी पाणी पिण्याचे मुलभुत कार्य अस्पृश्यांनाच करावे लागणार होते.

         तिथं पोहोचल्यावर आधी महाडच्या चवदार तळ्याचं पाणी बाबासाहेब यांनी आपल्या ओंजळीनं प्यायलं आणि मग शेकडो कार्यकर्त्यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह ऐतिहासिक केला. यावेळेस बोलताना,  “चवदार तळ्याचा सत्याग्रह हा आम्हीही इतरांप्रमाणेच माणसं आहोत, हे सिद्ध करण्याकरीता केला” असल्याचं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. पुढे बाबासाहेब म्हणाले होते की, “चवदार तळ्याचं पाणी प्यायल्याने तुम्ही किंवा मी अमर होणार नाही. आजवर आपण या चवदार तळ्याचं पाणी प्यायलो नव्हतो, म्हणून काही मेलो नव्हतो. चवदार तळ्याचा सत्याग्रह हा बंधुता वाढीस लागावी आणि जातीभेदाच्या भिंती संपुष्टात याव्यात यासाठी केलेला सत्याग्रह आहे” असं सांगितलं होतं. सार्वजनिक ठिकाणं, पाणवठे आणि चवदार तळं अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी झालेल्या सत्याग्रहात सवर्ण समाजातील नेते मंडळीही सहभागी झाली होती. या ऐतिहासिक सत्याग्रहात तीन हजारांहून अधिक लोक सहभागी झाल्याची सरकार दफ्तरी नोंद आहे. या सत्याग्रहानंतर हा दिवस समता दिन किंवा सामाजिक सबलीकरण दिन म्हणूनही ओळखला जातो.आतापर्यंत या देशात समतेसाठी अनेक आंदोलनं झाली, भारतीय राज्यघटनेने या देशातल्या सर्व जाती-धर्मांना समान हक्क प्रदान केला. पण पाण्याच्या प्रश्नावरुन जातीय आणि धार्मिक अस्मिता कशा उफाळून येतात याची उदाहरणं आपण आजही समाजात पाहतो आहोत. तथाकथित सवर्ण, उच्चधर्मीय, उच्चजातीय लोकांकडून केला जाणारा दुजाभाव, द्वेष, अत्याचार अजूनही समाजात पाझरताना दिसतो यामुळेच  चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे या मुक्तिसंग्रामाचे महत्व एकविसाव्या शतकातही अधोरेखित होते.


सामाजिक तीर्थक्षेत्र :- 


          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक न्यायाच्या संग्रामामधील ’महाडचा लढा’ हे एक सुवर्णपान आहे. जनतेची तहान भागविणारे असंख्य पाणवठे आपल्या देशात आहेत. परंतु, सामाजिक न्यायाची तहान भागविणारा पाणवठा महाडमध्ये आहे. त्याचे नाव आहे ’चवदार तळे’.म्हणूनच या सामाजिक तीर्थक्षेत्रावर देशभरातील पर्यटकांचा, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा ओघ कायम चालू असतो. अलीकडे महाड नगर पालिकेकडून तळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तळ्याजवळ सभागृह व सुंदर बाग तयार करण्यात आली आहे. तळ्यात उंच कारंजी होती. ती आता बंद आहेत. मध्यभागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दहा फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. सुशोभीकरण, रस्ता व इतर कामांमध्ये तळ्यातील तीन विहिरी मातीत गाडल्या गेल्या. त्यामुळे तळ्यामध्ये सद्यस्थितीत केवळ ११ विहिरीच आहेत. चवदार तळ्याच्या सौंदर्यीकरण सुशोभीकरण आणि चवदार तळ्यातील पाण्याचे शुद्धीकरण करण्याकरिता अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला असलेल्या संकल्पनेनुसार महाडमध्ये देखील ती योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.सायंकाळच्या वेळेला महाडवासीयांसह पर्यटकांची मोठी गर्दी चवदार तळ्यापाशी आज पहायला मिळते.


      डाॅ.बाबासाहेब अांबेडकरांचे जीवनचरित्र लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाच्या वतीने महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे.या स्मारकामध्ये वातानुकूलित प्रेक्षागृह, काॅन्फरन्स हाॅल,विपश्यना केंद्र,ग्रंथालयासह संग्रहालय देखील असुन या संग्रहालयातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची दूमीळ छायाचित्रे, कलाकृती,दीक्षाभूमी स्मारकाची काष्टप्रतिकृती आणि थायलंडमधुन आणलेली तथागत भगवान गौतम बुद्धांची पूर्ण आकाराची मूर्ती आहे.तर ग्रंथालयात दहा हजाराहून अधिक ग्रंथ आहेत. शहरात येणारे पर्यटक या स्मारकाला आवर्जून भेट देतात.मात्र महाडचा इतिहास लोकांपर्यंत ख-या अर्थाने पोहचविण्यासाठी पर्यटन दूत निर्माण करणे,स्मारकामध्ये  स्लाईड शो किंवा माहितीपट दाखविणे यासारखे नवे नवे उपक्रम राबवावे लागतील. सोबतच महाड जवळील शिवतीर्थ रायगड, गांधारपाले लेणी,कोल बौद्ध लेणी,महेंद्रगड, वाळणकोंड,झुलता पुल, कवी परमानंद समाधी, कांगोरीगड, चंद्रगड, सव येथील उष्णोदक, वीरेश्र्वराचा छबिना उत्सव, वीर तानाजी मालसुरे समाधी, संत रामदास स्वामी यांच्या  वास्तव्याने पुनीत झालेली शिवथर घळ यासारखी पर्यटन स्थळांचीही नियोजनबद्ध  प्रसार मोहिम राबविल्यास ऎतिहासिक महाड ला पर्यटनदृष्ट्या महत्व प्राप्त होईल.


विजय हटकर,

लांजा -रत्नागिरी

Monday, October 7, 2024

“धामापुर तलाव” - महाराष्ट्रातील एकमेव जागतिक सिंचन वारसा स्थळ.

 “धामापूर तलाव” -

  महाराष्ट्रातील एकमेव जागतिक सिंचन वारसा स्थळ.


            भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जगातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीत सन २०२२ मध्ये समावेश झाला. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर लंडन, सिंगापूर, इस्तंबूल सह मानाने झळकत आहे. स्वच्छ निळेशार समुद्रकिनारे, सिंधुदुर्ग किल्ला,तारकर्ली ,देवबाग,थंड हवेचे ठिकाण असलेले आंबोली, स्कुबा ड्रायव्हिंग व समुद्र दर्शनाची झालेली सुविधा, आंतरराष्ट्रीय स्तराचे चिपी विमानतळ यासारख्या असंख्य गोष्टी सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस  वाढवित आहेत. सिंधुदुर्गच्या याच यूएसपीत 'जागतिक सिंचन वारसा स्थळ ' हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवित दाखल झालेला महाराष्ट्रातील पहिला हेरिटेज तलाव म्हणजे धामापूर होय.

               मालवण तालुक्यात वसलेले निसर्गसौदर्याने भरभरुन उधळण केलेले टुमदार गाव म्हणजे धामापूर! कुडाळहुन मालवणला जाताना १२ किलोमीटर अंतरावर हे  गाव वसले आहे. याच धामापुर गावात वसलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा व जिल्ह्यासह देशाचा मानबिंदू  असलेला ‘धामापूरचा तलाव’! मालवण हे  तालुक्याचे  ठिकाण धामापूरपासून १८ कि.मी. अंतरावर आहे.

® भगवती मंदिर :-
                  धामापूर गावात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम भगवती मंदिराकडे जाणारी कमान आपले लक्ष वेधून घेते.प्रवेशद्वारातून आत शिरून दगडी  पाखाडीने चढताना श्री भगवती देवीचे मंदिर दिसते.एैसपैस कौलारू बांधणीचे आई भगवतीचे हे मंदिर पाहुन प्रसन्न वाटते. मानवी जीवनात शक्तीच्या उपासनेला प्राचीन काळापासून अनन्य साधारण महत्व आहे. दु:खितांचे दु:ख दूर करणारी, भक्ताला शक्ती व युक्ती प्रदान करुन जीवनात येणाऱ्या संकटांना निर्भिडपणे सामोरे जाण्यासाठी धैर्य देणा-या, भगवतीमातेचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. धामापुर तलावाच्या बंधा-यावरच धामापुरचे ग्रामदैवत असलेल्या भगवतीचे देवालय दगड,चुना,गूळ अशा वस्तुंपासून सुमारे १५३० साली उभारण्यात आले. मंदिरामधील कोरीव कलाकुसरीमुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते. १६ व्या शतकातील हे मंदिर अजूनही आपले प्राचीन वैभव आणि धार्मिक महत्त्व टिकवून आहे. या मंदिराचा सभामंडप शके १८२७ मध्ये बांधला गेल्याचे उल्लेख आढळतात, ज्यामुळे मंदिराच्या संरचनेचा विस्तार आणि जीर्णोद्धार काळानुसार होत राहिला आहे.



 
                मंदिराच्या गर्भगृहात भगवती देवीची सुमारे चार फूट उंचीची पाषाणात कोरलेली मूर्ती आहे, जी अतिशय देखणी आणि कलात्मक आहे. देवी भगवतीला महिषासुरमर्दिनीच्या रूपात पाहिले जाते. मूर्तीचे शिव आणि शक्तीचे मिश्रण तिच्या हातातील आयुधांमधून स्पष्टपणे दिसते. एका हातात शंकराची आयुधे असून दुसऱ्या हातात शक्तीचे आयुधे आहेत. या चतुर्भुज मूर्तीचे सौंदर्य तिच्या विविध आभूषणांमधून आणि देखण्या रूपातून प्रकट होते. मंदिराचा गाभारा दगडी असून, सुरेख रंगरंगोटी केलेल्या लाकडी घडणीच्या मंदिरावरचे कौलारु छप्पर पारंपरिक सौंदर्यात भर घालते.या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचा कळस गर्भगृहावर नसून सभागृहावर आहे.पूर्वी हिंदू मंदिरे हि केवळ प्रार्थनास्थळे नव्हती तर त्या त्या गावातील प्रमुख न्यायव्यवस्थेचे केंद्र होती.धामापुरातील न्यायनिवाडे याच आई भगवतीच्या सभागृहात सोडवले जात असत.न्यायनिवाडा करताना सकारात्मक उर्जा सभागृहात आली पाहिजे या हेतूने मंदिराचा कळस सभागृहावर बांधण्यात आला असावा.मंदिरात दांडेकर देवता,रवळनाथ, जैनब्राम्हण,पावणाई(राजसत्ता), बाराचा पूर्व (पूर्वसत्ता) , घाडीवंश देवता हे बारापाच गावकरी-मानकरी ग्रामव्यवस्थेतील अवसारी खांब ही दिसून येतात.

® सातेरी देवी मंदिर :-



            देवी भगवतीच्या शेजारी सातेरी देवीचे अजून एक पवित्र स्थान आहे.सिंधुदूर्गात सातेरी देवीची वारूळ रूपात अनेक मंदिरे आहेत.त्यातीलच धामापूरातील हे एक अप्रतिम मंदिर.हि सातेरी देवी गावातील गावडे समाजाची कुलदैवत आहे.सातेरी देवीसोबतच तलावपरिसरात श्री देव नारायणाचे पवित्र स्थान असून दुस-याच बाजूला डोंगरात छोटेसे गणेशमंदिरही आहे.

® धामापूर तलावाचा इतिहास :-



   
      कुडाळ देशकर समग्र इतिहासात धामापुर तलावाच्या बांधकामाचा उल्लेख आहे.कुडाळ देशकरांची आद्य वसाहत असलेली कोकणातील जी मूळ १४ गावे कुडाळ प्रांतात आहेत ज्याला मूळ भुंकेचे' असे संबोधले जाते त्या १४ गावात धामापुरचा समावेश आहे. धामापुरचा तलाव विजयनगर साम्राज्याचे देशमुख नागेश देसाई यांनी सोळाव्या शतकात बांधल्याची माहिती यात मिळते. तलावाच्या एका बाजुला धामापूरचे ५७.४७ हेक्टरचे जंगल तर दुस-या बाजुला काळसे  गावाचे ४० हेक्टरचे जंगल असुन या दोन्ही जंगलांनी वेढलेल्या निसर्गरम्य भागात ६१ हेक्टरहून अधिक क्षेत्रात पसरलेला हा तलाव तत्कालिन देशमुख नागेश देसाई यांनी दूरदृष्टिने बांधल्याचे लक्षात येते. तलावाच्या बांधकामात दोन्ही गावातील ग्रामस्थांचे नागेश देसाई यांना सहकार्य लाभले.

      आता ज्या ठिकाणी तलावाचा विस्तीर्ण जलाशय आहे त्याच्या मध्यभागी पुर्वी मंदिर होते.मंदिराच्या बाजुला असलेल्या वहाळाचे पाणी कर्ली नदीला जाऊन मिळत असे.दोन्ही बाजूनी डोंगर असल्याने कालांतराने कर्ली नदीला मिळणारा हा जलस्त्रोत अडवण्याच्या दृष्टीने तिस-या बाजूला मातीचा बंधारा बांधला.यावेळी भगवतीचे हे मंदिर पाण्याखाली जाणार होते.त्यावेळी तत्कालिन राज्यकर्ते व ग्रामस्थ यांनी धामापूर तलावाच्या बंधा-यावरच रक्षणकर्ती भगवती देवीचे मंदिर उभारुन स्थापना केली.आज या तलावाला जवळपास ५०० वर्षे झाली आहेत.गावापासून थोड्या उंचावर असलेल्या या तलावाचे पाणी पुर्वी चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत हरण (छोटे कालवे) काढुन धामापूर व काळसे गावात शेती व  बागायतींसाठी सोडण्यात येई.या तलावामुळे मोठ्या प्रमाणात इथला परिसर सिंचनाखाली आला आहे.हिरव्यागार वनश्रीने नटला आहे.पाण्यातील भुजलपातळीत वाढ झाल्याने इथल्या विहिरींना पुर्वी मुबलक पाणी असायचे.एकविसाव्या शतकात हरणांची जागा पाईपलाईनने घेतली असुन धामापुरचा हा स्वच्छ जलस्त्रोत धामापुर काळसेसह मालवण शहराची सुद्धा तहान भागवतो आहे.

® तलावाशी निगडित दंतकथा :-



        तहानलेल्याची तहान भागवणारी,मोठमोठया गावांना पाणी पुरवणारी,काठावर पशुपक्षी आणि प्राण्यांना आसरा देणारी अनेक तलावं असतात… पण कधी सोन्याचे दागिने देणारे तलाव पाहिलेय का? ऐकून आश्चर्य वाटेल पण खरेच सोन्याचे दागिने देणारे तलाव अशी रंजक दंतकथा धामापुर तलावाशी संबधित आहे.असं म्हणतात की ,देवी भगवती ही इथल्या गावक-यांच्या सा-या गरजा पुरविते. धामापुरच्या तलावाविषयी दोन रंजक आख्यायिका सांगितल्या जातात. एक - पुर्वीच्या काळी एखाद्याला लग्नसमारंभासारख्या कार्यासाठी दागिने हवे असल्यास त्या गृहस्थाने या तलावाच्या काठी फुलांची एक परडी घेवुन यावे व फुलांनी भरलेली परडी पाण्यात सोडून द्यावी. ती परडी तलावाच्या मध्यभागी जावुन लुप्त होत असे व  दुस-या दिवशी त्या व्यक्तीने मागितलेले दागिने घेऊन परडी काठावर येत असे. ते दागिने घेताना नमस्कार करून ते परत केव्हा करणार हे देवीला सांगावे लागत असे. दुसरी अख्यायिका अशी सांगितली जाते की,ज्याला दागिने पाहिजेत त्या गृहस्थाने मंदिरात यायचे आणि आपल्याला आवश्यक असलेल्या दागिन्यां एवढी फुले मदिराच्या पुजा-याकडे देऊन तेवढे दागिने घेऊन जायचे आणि आपला कार्यक्रम पार पडला की ते दागिने परत पुन्हा मंदिरात जमा करायचे. मात्र एका परटाने मोहात पडून घेतलेले दागिने परत केलेच नाही. तेव्हापासुन देवीचा कोप झाला आणि दागिने मिळणेच बंद झाले.असेही म्हटले जाते की,ज्यांनी लोभापायी हे गैरकृत्य केले त्यांचे वंशजही गावात टिकले नाहीत.१८८८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ब्रिटीश गॅझेटियरमध्येही या आख्यायिकेचा उल्लेख आहे.तलावाच्या तळाशी भगवतीचे सोन्याचे मंदिर आहे असं मानतात.
            खरं तर त्या काळी मंदिर गावचं धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय केंद्रबिंदू असल्याने सोने मंदिरात ठेवले जात असावे.गरज लागली कि सोनं घ्यायचे व गरज संपल्यावर मंदिरात जमा करायचर.आजच्या काळी बॅकेच्या लाॅकरला जसे आपण सोने ठेवतो तसेच! मात्र देवाची भिती न बाळगता सोनं परत न करण्याचे वाईट कृत्य केल्याने पुन्हा असे चुकिचे कृत्य गावात होऊ नये,मानवी श्रद्धेला कुठेही ठेच पोहचु नये म्हणुन लग्नकार्यात सोनं देण्याची ही प्रथा बंद झाली असावी. या आख्यायिकेचा आजच्या वैज्ञानिक युगात असाही अर्थ लावला जाऊ शकतो की,सोनं हे धामापुर तलावापाशी विपुल कृषीधन,पशुधन व निसर्गसंपदा असल्याचे प्रतिक असावे.इथल्या समृद्धतेमुळे  गावक-यांना कुठे दूर जाण्याची कधी गरज भासली नसावी. त्यावेळचे धामापुर गाव स्वयंपुर्ण होते.

© तलावाची वैशिष्ट्ये :- 



                ' उरलं सुरलं धामापुरच्या तळ्यात '  ही म्हण तळकोकणात फार प्रसिद्ध आहे.याचा अर्थ असा आहे की १५३० साली हे तलाव बांधल्यापासून आजतागायत २०२४ पर्यंत कधीच सुकलेले (आटलेले) नाही.महाराष्ट्रात १९६५-६७ च्या दरम्यान मोठा दुष्काळ पडल्याची नोंद आहे.त्यावेळीही महाराष्ट्रात फक्त धामापुर व काळसे ही दोन गावे अशी होती की जिथे त्यावेळीही मुबलक प्रमाणात शेती झाली.इतके मुबलक पाणी या तलावात होते.म्हणुनच इतर कुठेही पाणी मिळाले नाही तरी धामापुरच्या तलावात तुम्हाला नक्की पाणी मिळेल हे सांगणारी ही म्हण तळकोकणात प्रचलित झाली.

  
       सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निर्मितीनंतर हिंदवी स्वराज्याचे आरमार बळकट व्हावे यासाठी उच्च प्रतीच्या जहाजबांधणीकडे आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी लक्ष दिले.जहाजबांधणीसाठी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळच उत्तम प्रतीचे लाकुड मिळावे यासाठी सरखेल कान्होजी आंग्रे यांनी धामापूर तलाव परिसरातील जंगल संरक्षित केले.या जंगलात जहाज बांधणीला उपयुक्त असलेली टिंबर ट्रीची लागवड जाणीवपूर्वक त्यांनी केली.त्याचा वापर पुढे स्वराज्याच्या आरमाराला होऊ शकला.

      अलीकडे नवीनच बांधलेली अनेक धरणे,जलाशये काही वर्षातच कोसळली गेल्याचे, त्यांचे बंधारे खचल्याचे , त्याला भेगा गेल्याचे दृश्य पहायला मिळते.मात्र ५०० वर्षे जुने असलेल्या या मातीच्या तलाव आजपर्यंत कधीच कोसळला नाही.यामागे रक्षणकर्ती भगवतीची कृपा असल्याची गावक-यांची श्रद्धा आहे.या गोड्या तलावाच्या रक्षणासाठी, तलावाच्या काठावरती तिवर या झाडांची लागवड जुन्या काळात लोकांनी केली. तिवराची झाडे मातीची धूप रोखतात. या गोड्या तलावाच्या काठावर तिव-यासारख्या वनस्पतींची लागवड करताना धामापुरातील पर्यावरणाचे या जलस्त्रोताचे रक्षण करण्यात तिवर किती महत्वाची भूमिका बजावेल याचा सखोल सांगोपांग विचार करणा-या, दूरदृष्टी असलेल्या पूर्वजांना मानावेच लागेल. तिवर या  वनस्पतींसोबतच तलावाच्या दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरांवरील समृद्ध वनश्रीमुळे पक्षी व वन्यप्राणी इथे मोठ्या प्रमाणात आहेत.तलावात मरळ, टोळ, रोहू, शिंगाडा, मळई , काळुंदर ,चेर असे मासे आढळतात तर भवतालात ससे,सांबर,भेकड,बिबट्याचा इथे वावर आहे.तर महाधनेश, खंड्या(odkf) भारद्वाज, कोतवाल, हळद्या, गायबगळा, इंडियन पिटा,युरेशियन मार्श,क्लिपर सारखे दूर्मिळ फुलपाखरु  यासारखे असंख्य पक्षी धामापुरच्या मुसाफिरीत सहज दर्शन देऊन जातात.१२५ प्रजातीच्या पक्षांची व १९३ प्रजातींच्या वनस्पतींची तज्ञांकडून या परिसरात नोंद करण्यात आली आहे.

® धामापूर तलावाच्या शाश्वत विकासासाठी स्यमंतक संस्थेचे कार्य :-



             'चुकला -माकला ढोर धामापूरच्या तळ्यात' ही तळकोकणातली प्रसिद्ध म्हण सर्वांनाच माहिती आहे. विपुल निसर्ग -संपदा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धामापूर तलावाने आजवर अनेक जीवांना आपल्या कुशीत आसरा दिला आहे आणि कित्येक शतकांपासून कोकणात मानाचा दर्जा मिळवला आहे. जुन्या -जाणत्या माणसांच्या बुद्धिमत्तेचे प्रतीक म्हणून आज धामापूर तलावाच्या रचनेकडे बघितले जाते.
धामापुर गाव तलावासह कातळशिल्पे,खाजन जमीन, नदी, डोंगर, जुनी मंदिरे,जंगल अशा अनेक गोष्टीनी समृद्ध असल्याने इथल्या भवतालाच्या शाश्वत विकासासाठी व कोकणातील शाश्वत ,शांत,आनंदी जीवनशैलीच्या प्रसारासाठी गावातील सचिन देसाई यांनी स्यमंतक संस्थेच्या माध्यमातुन जीवन शिक्षण विद्यापीठाची स्थापना केली. याच संस्थेच्या माध्यमातून कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या दस्तऐवजीकरणासाठी देसाई प्रयत्नशील आहेत.

           याच काळात २०१४ मध्ये  ४३.८० हेक्टर विस्तारलेल्या धामापूर तलाव क्षेत्रात १६०० काँक्रीट खांबाचा स्कायवाॅक बांधण्यात सुरुवात झाल्याने ५०० वर्ष जुन्या मानवनिर्मित जैवविविधतेने समृद्ध असलेल्या धामापूर तलावाच्या सौंदर्यात बाधा येईल हे सचिन देसाई यांच्या लक्षात आले.त्यांनी स्यमंतक संस्थेच्या माध्यमातुन सिंधुदुर्ग प्रशासनाची वर्षभर लढा दिला.पुढे  राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात पर्यावरण याचिका दाखल केली. त्याला यश आल्याने स्यमंतक संस्थेने धामापूर तलावासह सिंधुदुर्गातील पाणथळ जागांच्या संवर्धनाची मोहीम ' सिंधुदुर्ग वेटलँड'या पायलट प्रकल्पातून घेतली. यातूनच धामापूर तलावाचा तपशीलवार अभ्यास करून संपूर्ण अहवाल आय. सी.आय.डी ला सादर करण्यात आला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने धामापूर तलावाची पाणथळ जागा म्हणून नोंद देशाच्या पाणथळ नकाशावर प्रसिद्ध केली. धामापूरातील शाश्वत पर्यावरणीय समृद्ध खजिन्याचे महत्त्व देशाच्या लक्षात आल्याने पुढे धामापूरला हेरिटेज इरिगेशन साईट म्हणून मान्यता मिळावी यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू झाले आणि यातूनच २०२० साली धामापूर तलावाला 'जागतिक वारसा सिंचन स्थळ' म्हणून मान्यता मिळाली.या गौरवामुळे धामापुर तलावाच्या जतन संवर्धन मोहिमेला मोठे पाठबळ मिळाले. स्यमंतक संस्थेचा युवा कार्यकर्ता महंमद शेख हा आज धामापुर गावात येणा-या देश विदेशातील पर्यटकांना धामापूर तलाव किनारी सापडलेल्या दुर्मिळ सजीवांचा अधिवास, तलाव व मंदिराचा मौखिक आणि लिखित इतिहास, गावसमाज व मंदिराचा स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून झालेला अभ्यास, जुन्या काळातील सिंचन पद्धती अशा अनेक विषयांची सखोल माहिती  आपल्या अथक अभ्यासाच्या जोरावर विशद करतो तेव्हा आवाक व्हायला होते. 'पर्यटन आणि शांतता' ही यंदाची २०२४ ची जागतिक पर्यटनाची थीम आहे. आज सा-या जगाला आजच्या वेगवान, धावपळीच्या, तणावयुक्त काळात  शांततेची गरज आहे.यादृष्टिने महाराष्ट्रात शांततेसह शाश्वत पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर कोकण व कोकणातील धामापुरसारखी समृद्ध गावे सर्वोत्तम पर्याय ठरणार आहेत.
       खरं तर ,धामापूर तलाव हा केवळ एक पाण्याचा साठा नसून ५०० वर्षांपासून हस्तांतरित करण्यात आलेला जिवंत वारसा आहे,हे स्यमंतक संस्थेच्या लक्षात येताच या जिवंत वारशाचे अस्तित्व अबाधित राहावे आणि धामापूर तलाव रचनेतून दृग्गोचर होणारी कोकणातील जुन्या जाणत्या माणसाची अलौकिक दूरदृष्टी जगासमोर यावी या उद्देशाने "मी धामापूर तलाव बोलतोय " या लघुपटाची निर्मिती करण्यात आली.पुणे,मुंबई सह गोवा व कोकणातील ग्रामीण भागात या लघुपटातून धामापूर तलावाप्रमाणेच आपापल्या गावातील जलस्त्रोतांचे संवर्धन कसे करायचे याचा उलगडा अनेकांना येऊन अनेक गावात आज जलस्त्रोतांच्या संवर्धनाचे काम सुरु झाले आहे.सचिन देसाईंसारख्या कार्यकर्त्यांच्या रचनात्मक कामाचे हे यश म्हणावे लागेल.

® कातळशिल्पांचा शोध :-


           अलीकडेच धामापुरच्या सड्यावर कातळशिल्पांचा खजिना सापडल्याने हेरिटेज टुरीझमचे नवे दालन खुले होणार आहे.धामापूर गावच्या गोड्याचीवाडी हद्दीत चार चित्रकृत्या नुकत्याच प्रकाशात आल्या आहेत.कोकणात रत्नागिरी,सिंधुदुर्गसह गोव्यातल्या कातळ सड्यांवर गेल्या दोन दशकात अनेक ठिकाणी नवाश्मयुगातील कातळ शिल्पे सापडल्याने कोकणातील प्राचीन मानवी वस्तीचा एक दुवा सापडला आहे.धामापूरच्या सड्यावर सापडलेली कातळशिल्पे धामापूरचा इतिहास शिलाहार काळापासून चक्क नवाश्मयुगापर्यंत मागे नेऊ शकतात. सिंधुदुर्गात कुडोपी,हिवाळे,वानिवडे,आरे, किर्लोस,विर्डी या गावात यापूर्वीच कातळशिल्पे उजेडात आली आहेत. कोकणातील आठ कातळ शिल्प स्थळांना जागतिक वारसा स्थळ यादीत नुकतेच नामांकन मिळाले आहे,त्यामुळे आदीमानवाच्या या पुरातन पाऊलखुणा पाहण्यासाठी जगभरातील पुरातत्वीय अभ्यासक,इतिहासप्रेमी पर्यटक कोकणात येऊ लागले आहेत. या पर्यटकांनाही आता धामापूरकडे वळवता येईल.

धामापुरच्या 'पोय' मधील सफारी :-


      धामापूर तलावाचे पाणी नैसर्गिकरित्या एका ओढ्याच्या माध्यमातून कर्ली नदीला मिळते.हा  ओढा जेव्हा मळ्यात शिरतो तेव्हा स्थानिक भाषेत त्याला 'पोय' म्हटलं जातं. या पोयला पुढे शेतकरी बांधव पारंपारिकरित्या मातीचा बांध घालतात आणि पाणी अडवतात. या बांधाचा उपयोग तलावाचे शुद्ध पाणी अडवण्यासाठी व कर्ली खाडीचं खार पाणी तलावात न येण्यासाठी होतो. उन्हाळी शेतीसाठीही पोयमधील पाण्याचा उपयोग होतो.पोयमध्ये भरपूर पाणी अडवल्यामुळे परिपूर्ण जैविकसंपदा पाहायला मिळते.याच सुंदर पोयमधुन लहानशा बोटीतुन धामापुर तलावाच्या परिसरातील समद्ध निसर्गसंपदा अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळते.

          मे महिन्यात दरवर्षी प्रमुख शेतकरी हा मातीचा बांध फोडायचा ठरवतात.त्यासाठी दवंडी पिटली जाते. बांध फोडताना धामापूर,काळसे गावातील लोक एकत्रित येतात.काळसे गावातील लोक पुर्वी हा बांध बांधायला येताना वाजत गाजत मडक्यातुन दहिभात घेऊन यायचे.या मातीच्या बांधाचे एक वैशिष्ट्य म्हणजे बांध घालतानाबांधवसाला (स्थानिक देवता) गावकरी गा-हाणे घालायचे.बांध कोवळ व मातीच्या मिश्रणातुन घातला जायचा.कोवळे फायबरसारखेच काम करीत असल्याने बांध टणक बनायचा.या बांधातील पाणी भेडला माडाचा उपयोग पाईप म्हणुन करुन लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी केला जायचा.गावकरी दहिभातावे मडके वर्षभरासाठी त्या बांधात ठेऊन जायचे.पुढील वर्षी बांध फोडल्यावर मडक्यातील दहीभात गावक-यांना प्रसाद म्हणून वाटला जात असे.बांधायला ठेवलेल्या मडक्यातील  दहीभात वर्षभर टिकायचा हेच इथल्या इकाॅलाॅजीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

       महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. पु.ल.देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न १२ जून १९४६ रोजी झाले.सुनिताबाईंच्या आयुष्यावर प्रभाव होता तो त्यांच्या धामापूरच्या आजीचा.घरच्यांच्या मनाविरूद्ध पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर केलेल्या लग्नात तीच पाठीशी उभी राहिली. 'आहे मनोहर तरी ' या आत्मकथनात आजीचे अतुलनीय मानसिक धैर्य,खंबीरपणा आणि निष्ठा विशद करताना सुनीताबाई जिव्हाळ्याने भरून जातात.सुनीताबाईंनी एक माहेरवाशीण म्हणून धामापूरच्या तलावाचं वर्णन करताना या मालवणी मुलखाचे दर्शन घडविले आहे. सोयरा सकळमध्ये त्यांनी तर " यक्षाचे तळे" असं धामापूरच्या तलावाला म्हटले आहे.

     आज धामापूर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित आहे.तलावामध्ये नौकाविहाराची सोय उपलब्ध आहे.तलावाकाठी पर्यटकांसाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे पर्यटक निवास अाहे.गावात खाजगी होमस्टेसह हाॅटेल्स,लाॅजही उपलब्ध आहेत.तलावाच्या बाजूने जंगलसफारी, व पक्षी अभ्यासासाठी जंगलातुन जाणा-या पक्क्या पाखाड्या बांधण्यात आलेल्या आहेत.तलावाच्या काठी एकदा आपण बसलो की मंदिरातील घंटानाद,सुगंधी अगरबत्तीचा सुवास,पक्ष्यांचे आवाज,हिरवीगार वनश्री,वाहणारा थंडगार वारा आपल्या पंचेन्द्रियांना तृप्त करतात.खरं तर 'स्व' त्वाची सर्वोत्तम अनूभूती ही कोलाहलापासून, गजबजाटापासून दुर अशा निरव शांततेच्या सानिध्यात अनूभवता येते. शुद्ध,स्वच्छ प्रदुषणरहित हवेने ताजे -टवटवीत होता येते.तिथल्या निसर्गोत्सवातील चिरकाल आठवणी जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. यासाठीच आयुष्यात एकदा तरी धामापूर तलावाला भेट द्यायलाच हवी!

विजय हटकर,

लांजा -रत्नागिरी.

संदर्भ :-

गुं.फ.आजगांवकर :- कुडाळदेशकर गौड ब्राम्हणांचा संक्षिप्त इतिहास

मनोहर आजगांवकर - धामापूर तलाव सिंधूदूर्गाचा मानबिंदू ,कोकण मीडिया दिवाळी विशेषांक २०१८

प्रशांत हिंदळेकर - धामापूर तलावाला जागतिक सन्मान,दै.सकाळ,३० नोव्हेंबर २०२०

महाराष्ट्रात आणखी एका ठिकाणी सापडला कातळशिल्पांचा खजिना - दै.महाराष्ट्र टाईम्स,०२ आॅगस्ट २०२३

गोष्ट धामापुर तलावाची - कोकणी रानमाणूस व्लाॅग

-----------------------------------

लेखक परिचय :-

      लेखक विजय हटकर कोकणात गेली १७ वर्षाहून अधिक काळ शिक्षण, पत्रकारिता,ग्रंथालय,पर्यटन चळवळीत कार्यरत असून लवेबल लांजा, रत्नसिंधू टुरिझम व लोकमान्य वाचनालय लांजा या संस्थांचे संचालक आहेत. रत्नागिरीतील थंड हवेचे ठिकाण माचाळ याविषयी  'माझे माचाळ ' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले असून २० हुन अधिक विशेषांकाचे संपादन,  विविध माध्यमसमुहात त्यांचे अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाले आहेत.कोकणातील लांजा तालुक्यात  ग्रामीण पर्यटनाच्या विकासासाठी, कातळशिल्प संवर्धनासाठी ते कार्यरत आहेत.
संपर्क
:- ८८०६६३५०१७

--------------------------------------

छायाचित्रण सहाय्य - स्यमंतक संस्था धामापूर.



Thursday, September 12, 2024

गणेशोत्सव २०२४

।।गणेशोत्सव २०२४।।


            गणपती ही देवताच ज्ञानाची,सर्व कलांची,विद्येची, प्रतिभेची अन् मानवी जीवनातील शुभंकराची.मोठ्या प्रेमाने,आस्थेने आणि मनोभावे आपण तिला वंदना करतो.तिचे पूजन करतो.बाप्पाला नित्य स्मरतो.पण एवढ्यावरच हे थांबत नाही.संपत नाही.कारण पूर्वापार आपल्या वाडवडिलांपासून  चालत आलेल्या आपल्या मराठी संस्कृतीत गणेशोत्सवाला एक वेगळेच स्थान आहे.भाद्रपद महिन्यातील ते दहा दिवस सर्वांसाठीच भारलेले असतात.मंतरलेले असतात.कारण त्याभोवती गणेशभक्तीसोबतच राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचाही उत्कट अविष्कार होत असतो.तो वाढावा असा  या बाप्पाचा आशीर्वाद असतो.ते दहा दिवस आपण वेगळ्याच धुंदीत जगत असतो.हे सर्व वर्षानुवर्षे सुरु आहे.अन् म्हणुनच माझ्याच नव्हे तर आपणा सर्वांच्या मनात,हृदयात आणि ध्यानात गणपती बाप्पा ठाण मांडून बसला आहे.

             दरवर्षी प्रमाणे यंदाही आज ०७ सप्टेंबर रोजी श्री गणेशचतुर्थी निमित्ताने श्री गणरायाचे घरी आगमन झाले.

तळवडे ता.लांजा इथे लहानपणापासून मूळ घरी साजरा होणा-या बाप्पाच्या आठवणी मनात हृदयात ताज्या आहेत.काही वर्षांपासुन श्री गणरायाचा हा उत्सव लांज्यातील निवासस्थानी (दीड दिवसाचा ) यथाशक्ती सुरू आहे. लोकजीवनाला प्रचंड उर्जा देणारा ,लोकजीवनात चैतन्य फुलविणारा एक हा व्यापक लोकोत्सव म्हणुन मी गणेशोत्सवाकडे पाहतो.बाप्पाची निरपेक्ष सेवा पुढिल वर्षभर सकारात्मक काम करण्याची उर्जा प्रदान करीत असतो.


'सुखकर्ता' श्री गणेशाचा उत्सव आणि पुढील काळही आपणा सर्वांना मंगलमय आणि निर्विघ्नतेचा जावो ,हिच शुभकामना।


विजय हटकर

लांजा

क्षणचित्रे -

















Monday, September 2, 2024

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई आयोजित वृक्ष महोत्सव संपन्न.

विशेष बातमी:-

 राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई आयोजित वृक्ष महोत्सव संपन्न.

" हे माझे झाड" या संकल्पनेवर आधारीत वृक्ष महोत्सवात ५०० देशी  झाडांची लागवड.


शाश्वत कोकणच्या विकासासाठी इंडियन आॅईल कार्पोरेशनचे प्रायोजकत्व.



लांजा : 

        मुंबईतील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघातर्फे 'हे माझे झाड' या संकल्पनेवर आधारित वृक्षमहोत्सव आज व्हेळ (ता. लांजा) येथील रुक्मिणी भास्कर विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.  राजापूर तालुक्यातील वाटूळ ते संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे रस्त्यावर व्हेळ-विलवडे या भागात रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक वृक्षांच्या पाचशे रोपांची लागवड आज करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मोठे योगदान असलेल्या इंडियन ऑइल कंपनीने प्रायोजित केलेल्या हा वृक्षमहोत्सवात लांजा राजापुरातील वीसहून अधिक सामाजिक शैक्षणिक संस्थानी सहभाग घेतल्याने वृक्ष महोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला.


       'हे माझे झाड' उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची नवी दिशा या वृक्षमहोत्सवामुळे मिळेल, असे मत इंडियन ऑइल कंपनीतर्फे वरिष्ठ अधिकारी अनिल पेडणेकर यांनी केले. महोत्सवात सहभागी झालेल्या पाचशे विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एका झाडाचे रोप लावले. या झाडांचे संगोपनही विद्यार्थ्यांनी करावे, आसाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने एक ट्रीगार्ड बसवण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि निसर्ग यांच्यातील अनुबंध अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाच्या दिशेने प्रोत्साहित करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. वृक्षमहोत्सवामुळे तो सफल होईल. या उपक्रमासाठी कोकणातील वड, चिंच, पिंपळ, करंज, ताम्हण, काजरा यांसारख्या झाडांची निवड करण्यात आली आहे. ही झाडे केवळ सावली देणारी नसून पशुपक्ष्यांना निवारादेखील देतील. त्यामुळे या वृक्षारोपण उपक्रमाला पर्यावरणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. म्हणूनच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्याबरोबरच विविध पर्यावरणीय उपक्रमांचेदेखील प्रायोजन करते. व्हेळ येथील वृक्षमहोत्सव हाही त्याचाच एक भाग आहे. या उपक्रमामुळे पर्यावरणाच्या संरक्षणाला हातभार लागेल आणि भविष्यातील पिढ्यांना एक शुद्ध आणि सशक्त पर्यावरण उपलब्ध होईल, अशी अपेक्षाही इंडियन ऑइल कॉर्पोरेशनतर्फे व्यक्त करण्यात आली.



    दोन सत्रात संपन्न झालेल्या या महोत्सवात पहिल्या सत्रात व्हेळ गावातील रुक्मिणी भास्कर विद्यालयाच्या सभागृहात मान्यवर,पर्यावरण प्रेमी नागरिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीय उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.सुरुवातीला व्हेळच्या विद्यार्थ्यांनी वृक्षगान सादर केले. उद्घाटन समारंभापूर्वी पालखीतून वडाच्या झाडाची दिंडी काढण्यात आली.यानिमित्ताने प्रगतशील शेतकरी अमर खामकर,क्रियाशील शिक्षक महेंद्र साळवी, दिलीप पळसुलेदेसाई यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


        यावेळी  मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आणि त्या तुलनेत नव्याने झाडे लावण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी झाडे लावणे ही उद्याची नव्हे तर आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता कदम यांनी केले. तर,संघाध्यक्ष सुभाष लाड यांनी अध्यक्षीय मनोगतात वृक्षमहोत्सवाचा उद्देश स्पष्ट करताना आज जरी आपण या ५०० झाडांची लागवड करीत असलो तरी जेव्हा ख-या अर्थाने ही झाडे मोठी होतील, शीतल छाया देत पशु-पक्ष्यांना आधार देतील,वाटसरूनां सावली देतील,या रस्त्याच्या सौंदर्यात भर घालतील तेव्हाच या महोत्सवाचा उद्देश सफल होईल असे मत व्यक्त केले.


            व्हेळ परिसरातील व्हेळ, विलवडे, शिरवली, वाघणगांव गावातील प्राथमिक शाळांमधील मुले, व्हेळ हायस्कूल, लांज्यातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे विद्यार्थी,न्यू इंंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजाचा इको क्लबचे विद्यार्थी,कल्पना कॉलेजच्या विद्यार्थिनी, सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी व परिसरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी  एकाच वेळी ५०० रोपांची लागवड केली. वृक्षमहोत्सवात व्हेळ, विलवडे, वाघणगाव, आरगांव ,वाटूळ ग्रामपंचायती, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलवडे रेल्वे प्रवासी संघटना, विलवडे रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना, अपना बाजार, तांबे उपाहारगृह, लांजा डॉक्टर्स असोसिएशन,  ज्येष्ठ नागरिक संघटना या संस्थांनी वृक्षमहोत्सवाला सक्रिय सहकार्य केले.राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे सरचिटणीस प्रमोद पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर निवेदन विजय हटकर यांनी केले.

छायाचित्रे :-








अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...