Friday, July 25, 2025

 दीपज्योतिर्नमोऽस्तुते॥



प्रकाशाचे आकर्षण मानवी मनाला आदिम काळापासूनच आहे. अग्नी उष्णता आणि प्रकाश दोन्ही देतो. आपल्याकडे तर वैदिक काळात अग्नीला देवतास्वरूप मानले जाऊ लागले. आजही ही श्रद्धा कायम आहे. जगातील आद्य पारमार्थिक ग्रंथ असलेल्या ऋग्वेदाची सुरुवातच


अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् ।

 होतारं रत्नधातमम् ॥


अशी होते. बृहदारण्यक उपनिषदात 'तमसो मा ज्योतिर्गमय' अशी प्रार्थना आढळते. अग्नीला अज्ञानाचा अंधकार नष्ट करणाऱ्या तेजोमय ज्ञानरूपातही पाहिले जाते. अग्नीची ज्योत ही नेहमीच ऊर्ध्वगामीच असते. मशाल उलटी धरली तरी ज्योत वरच्या दिशेने जाते.


तेजाचीही उपासना केवळ दीपावलीमध्येच केली जाते, असे नाही. सर्व पूजा विधींमध्येही दिव्याचीही पूजा असते.आषाढ अमावास्येला दीप अमावास्या म्हटले जाते. हा आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण. दिव्यांना समर्पित असणाऱ्या याच शुभ दिनी सन २०१५ रोजी आम्हाला कन्यारत्नाचा लाभ झाला आणि तेव्हापासून आजतागायत गेली दहा वर्षे आम्ही दरवर्षी एक नवीन दिवा घेऊन दीपपौर्णिमा साजरी करत असतो. 


आमची लाडकी कन्या कु. विधीला आज दहा वर्षे हिंदू  तिथीप्रमाणे पूर्ण झाली. यानिमित्ताने घरी साजरा केल्या जाणाऱ्या दीपोत्सवाचेही हे दहावे वर्ष!


संस्कृती जपणाऱ्या आपणा सर्वांना दीप अमावास्येच्या हार्दिक शुभकामना!


- विजय अरविंद हटकर, लांजा

(८८०६६ ३५०१७)


https://www.facebook.com/share/p/153RKqt83y/


कु विधीची सन २०२४ - २५ ची क्षणचित्रे :


न्यू इंग्लिश स्कूल मधील विधीचा पहिला स्वातंत्र्य दिन सोहळा - हर घर तिरंगा अभियानात सहभाग.









Monday, July 21, 2025

 शिलाहारकालीन श्री हरिहरेश्वर व श्री शिवानंद स्वामी आश्रम पांगरे बुद्रुक राजापूर.



राजापूर,

पश्चिम किनारपट्टीवरील एक ऐतिहासिक बंदर! छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.या तालुक्यातील बारसू, सोलगांव, देवाचे गोठणे या किनारपट्टी च्या कातळ सड्यांवर अर्थात राजापूर लॅटराईट सरफेस भागात सापडलेल्या कातळखोद शिल्पांमुळे अश्मयुगात या भागात मानववस्ती असल्याचे सिद्ध झाले. त्यातच साधारण २०१८ मध्ये तालुक्यातील पांगरे बुद्रुक गावातील एका डोंगर उतारावर पुरातन शैव लेणी (एकाश्म मंदिरे ) सापडल्याने राजापूर पाचव्या - सहाव्या शतकात भारताच्या पश्चिम किनारपट्टी वरील पाशुपत संप्रदायाचे शैव केंद्र म्हणून पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर राजापूर परिसरातील एकाश्म मंदिरांचा अभ्यास करण्यासाठी राजापुरात आलेल्या इतिहास अभ्यासक अनिल दुधाने सर यांनी पांगरे बुद्रुक गावातील हरिहरेश्वर मंदिर परीसरात सापडलेल्या  शिलाहारकालीन शिलालेखाचे वाचन केल्याने धूतपापेश्वरासाखी ऐतिहासिक शिवमंदिरे असलेले राजापूर हे पाचव्या सहाव्या शतकात पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख शैव केंद्र असल्याचे महत्वपूर्ण संशोधन पुढे येत आहे.


 


   इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांनी राजापूरहून पुण्याला जाताना फोन करून पांगरे बुद्रुक येथे शिलालेख सापडल्याचे वृत्त कळविताच एक इतिहास अभ्यासक म्हणून त्याचा आनंद झाला. याच दरम्यान आमचे गुरुवर्य सुभाष लाड मुंबईहून लांजा येथे वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त आलेले असल्याने गुरुवारी त्यांच्या सोबत हा ऐतिहासिक दस्तऐवज पाहण्यासाठी राजापूर गाठले.राजापूर शहरातून राजापूर रोड रेल्वे स्टेशन रस्त्यावर साधारण ८ कि.मी. अंतरावर समृद्ध  निसर्गाच्या कुशीत वसलेले पांगरे बुद्रुक गाव आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या पुलावरून डावीकडे वळल्यावर अर्जूना नदीच्या सोबतीने डोलणारी हिरवीगार भाताची खाचरे पाहत जाण्याचा अनुभव प्रसन्न करतो. काही वेळातच उष्णोदकासाठी प्रसिद्ध असलेले उन्हाळे गाव लागते. उन्हाळे गेल्यानंतर १०-१२ मिनिटातच आपण पांगरे बुद्रूक गावातील ग्रामदेवता निनादेवी मंदिर स्टॉप जवळ पोहचतो. रस्त्यालगत असणाऱ्या याच मंदिराच्या डाव्या बाजूला शिलाहार काळातील  प्राचीन हरीहरेश्वर मंदिर व श्री स्वामी शिवानंद (टेंब्ये) महाराज आश्रम हा पवित्र परिसर वसलेला आहे.





     या ठिकाणी पोहोचल्यावर सर्वप्रथम ग्रामदेवता निना देवीचे दर्शन घेतले.गाभाऱ्यात निनादेवीसह रवळनाथ व पावणा देवी विराजमान आहेत. या मंदिरातून दर्शन घेऊन रस्त्याच्या पलीकडे असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिरात आम्ही गेलो. एका बाजूने समृद्ध वनश्री,पायथ्याशी खळखळ संगीताच्या ठेक्यावर प्रवाहित असणारा नितळ ओढा व शांत रमणीय असे श्रीक्षेत्र हरीहरेश्वर लगतच श्री स्वामी शिवानंद (कृष्णाभाऊ टेंब्ये ) महाराजांचं पवित्र समाधीस्थान. सारा परिसर संतोषाचे उत्सर्जन करणारा आहे. प्रवेशव्दारापाशी असलेला ७०० वर्ष पुरातन अश्वत्थ वृक्ष आपले आस्थेने स्वागत करतो. फिकस रिलिजिओसा हे वैज्ञाज्ञिक नाव असणारा अश्वत्त्थ म्हणजे पिंपळ वृक्ष. हे इथे आल्यावर कळले. ब्रह्मांड पुराणात अश्वत्थाचे महात्म्य संगितले आहे. स्वतः ब्रह्मदेवाने हे महात्म्य नारदमुनीला संगितले आहे. नारदमुनींनी अश्वत्थाचे वर्णन करतांना संगितले की अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी स्वतः ब्रह्मदेवाचा वास असतो, मध्यभागी विष्णु तर टोकाला रुद्र रूपी महादेवाचा वास असतो. वृक्षाच्या दक्षिणेकडील पाना फांद्यांवर शूलपाणी, पश्चिमेकडील शाखा पानांवर निर्गुण स्वरूपी विष्णु तर उत्तरेकडील पाना फांद्यांवर ब्रह्मदेवाचे अधिष्ठान असते. इंद्रदेवाचे अधिष्ठान पूर्वेकडील शाखा पानांवर असते. अशा तर्हेने अश्वत्थ वृक्षाच्या चारही दिशांना ब्रह्मा, विष्णु, महेश व इंद्र्देवाचे अधिष्ठान रात्रंदिवस अखंडपणे असते. अशा प्रकारे संपूर्ण अश्वत्थ वृक्षच देवतांनी व्यापून टाकला आहे. गो-ब्राह्मण व समस्त ऋषिगण तथा वेदादी यज्ञ-यागाच्या देवता ह्या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी निरंतर वास करीत असतात. सर्व नद्यांची तीर्थे आणि सातही समुद्रांच्या देवता ह्या अश्वत्थ वृक्षाच्या पूर्वेकडील शाखेवर निरंतर वास करीत असतात. अ-कार शब्द हा अश्वत्थाच्या मुळाशी असतो, स्कंध शाखा येथे ऊ-कार स्वरूप तर फळ व पुष्पे येथे म-कार वर्ण असतो. असा अ ऊ म म्हणजे ॐ कार स्वरूपाचे तेथे वास्तव्य असते. 





         मंदिर परिसरात पाटाच्या पाण्याचे केलेले नियोजनही लक्षवेधी आहे. कोकणातील ग्रामीण जलव्यवस्थेचे दर्शन येते होते.पाटाचे पाणी व अश्वत्थ वृक्ष न्याहाळत  साधारण २५ सोपान उतरून आपण मंदिरापाशी येतो. जांभ्या दगडातील बंदीस्त संरक्षित दीपमाळ आपले लक्ष वेधून घेते.कोकणात अनेक मंदिरांच्या दीपमाळा ऊन,वारा पावसाचे तडाखे खात झिजलेल्या पहायला मिळतात. याचा विचार करून इथल्या व्यवस्थापनाने दीपमाळ संरक्षित केल्याबदद्ल व साऱ्या परिसर नीटनेटका ठेवत,स्वच्छता जपत पावित्र्य राखल्याचे पाहून  कौतूक वाटले. मनात कौतुकाची भावना ठेवतच आम्ही हरिहरेश्वर मंदिरात प्रवेश केला. सभागृह, अंतराल, आणि गर्भगृह अशी सर्वत्र दिसणारी स्थापत्य रचना इथेही पहायला मिळाली. सभागृहात नंदीचे दर्शन घेऊन गर्भगृहातील शिवपिंडी चे दर्शन घेतले. यालाच लोक श्री हरिहरेश्वर संबोधतात. गर्भगृहातील शिवलिंग साधारण २ फूट उंचीचे आहे.गाभाऱ्याच्या बाहेर दोन्ही भिंतीत मोठे कोनाडे आहेत. एका कोनाड्यात बैठ्या पार्वती ची सुंदर मुर्ती तर दुसऱ्या कोनाड्यात श्री गणपती बाप्पाची सुरेख मूर्ती आहे.





      इंद्राला अभय देण्यासाठी निघालेल्या विष्णू व शिव यांचा अवतार म्हणजे हरिहरेश्वर. शैव व वैष्णव पंथीयांसाठी म्हणूनच हरिहरेश्वर ही पूज्य देवता. कोकणात हरिहरेश्वरचे लोकप्रिय मंदिर श्रीवर्धन येथे असून १२२२ - २४ मध्ये ते होईसळ राजा वीर नरसिंह दुसरा याच्या काळात बांधल्याचे उल्लेख सापडतात मात्र पांगरे बुद्रुक येथील मंदिर ११२५ मध्ये उभारले असल्याचे नुकत्याच प्रकाशात आलेल्या शिलाहार कालीन शिलालेखाने सिद्ध झाल्याने पांगरे येथील हरिहरेश्वर मंदिर प्राचीन असल्याचे लक्षात येते. मंदिराच्या चारही बाजूने कायम स्वरूपी छप्पर असलेला मंडप असून एका बाजुला पवित्र असे औदुंबराचे स्थान आहे.  मंदिराच्या एका कोपऱ्यात ओट्याजवळच एक एकाश्म मंदिर, महत्त्वपूर्ण वीरगळ व गद्देगाळ आहेत. या गद्येगाळावरच या मंदिराचे प्राचीनत्व सिद्ध करणारा शिलालेख आहे. सन १९८५ मध्ये स्वामीभक्त श्रीधर आगाशे यांनी लिहिलेल्या 'श्री स्वामी शिवानंद' या पुस्तकात पृष्ठ क्रमांक तीनवर या शिलालेखाची व या मंदिराला भेट देऊनच छत्रपती शिवरायांनी राजापूरवर मोर्चा लावल्याचा उल्लेख आहे.मात्र याची त्रोटक माहिती पुस्तकात मिळते. त्यामुळेच इतिहास अभ्यासक अनिल दूधाणे यांनी गदेगाळावरील शिलालेखाचे नुकतेच केलेले वाचन महत्त्वाचे ठरते. या वाचनाने मंदिरासह राजापूरचे प्राचीनत्व अधोरेखित झाले आहे.


     हा शिलालेख दोन ओळींचा असून देवनागरी लिपीत आणि मराठी भाषेत आहे.शिलालेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने त्याची अक्षरे पुसट झाली असून झिजली आहेत  शिलालेखात कालोल्लेख शके १०८२ म्हणजे सन ११६० असून तो बाराव्या  शतकातील दिसतो. मजकुरात एका देवाच्या पीठिका (हरिहरेश्वर मंदिराचा ) म्हणजे पाया घातल्याचा  उल्लेख असून तो शिलाहार  वंशातील सर्वश्रेष्ठ राजा मल्लिकार्जुन  याचा आहे.तो स्वतःस सिलाहार नरेंद्र ,महासमंताधिपती, तगरपूर परमेश्वर, महामंडळेश्वर अशी बिरुदे धारण करत असे .मल्लिकार्जुन देवाची कारकीर्द सन ११५५-११६२ अशी होती. त्याचे उत्तर कोकणवर प्रणालक (पन्हालेकाजी )येथे राज्य होते त्याचे शके १०७८ चा चिपळूण (पन्हाळे)स्तंभ लेख तसेच वसई  येथील शके १०८३ शिलालेख प्रसिद्ध आहेत त्याने  शेजारील राज्यांवर अनेक स्वाऱ्या करून मोठा राज्यविस्तार घडवून आणला होता. या मल्लिकार्जुन देवाने मंदिराचा पाया घालून त्यास (भूदान ) काही जमीन दान केल्याचा शिलालेखात उल्लेख आहे.. लेखाच्या शीर्ष भागात शापवचन आहे  मजकुरावर  गधेगाळाची आकृति कोरून ते पूर्ण केलेले दिसते. मल्लिकार्जुन देवाच्या राजवटीतील हा तिसरा शिलालेख  उपलब्ध झाला  आहे. 






==================================

शिलालेखातील मजकूर:

१. सके  १०८२ विक्रम संव

२. त्सरे पिठिका

अर्थ: शालिवाहन शके १०८२ विक्रम संवत्सर म्हणजे सन ११६० साली पीठिकेचे म्हणजे बहुधा येथील हरिहरेश्वर देवालयाच्या पायाचे बांधकाम केले होते. ते कोणी केले त्यांची माहिती लेखात नाही मात्र त्यावेळी शिलाहार राजा मल्लिकार्जुन  तेथे राज्य करत होता. त्याचे पन्हाळे व वसई येथील कोरीव लेख उपलब्ध आहेत. ही नोंद नष्ट करणाऱ्यासाठी गधेगाळाच्या रूपात शापवचन अंकित करण्यात आले आहे.

===================================


    एखाद्या मंदिरास दान दिलेले असेल, वर्षासन दिले असेल तर  त्याचा कोणी भंग करू नये म्हणून शिलाहार काळात गद्येगाळ उभारीत असत. यावर गद्य ( गाढव ) व स्त्रीचे शिल्प असते. या शिल्पाच्या वर चंद्र -सूर्य कोरले जातात.मंदिरात दिलेले वर्षासन किंवा दान आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत चालू राहील असा त्याचा अर्थ असतो. मोकळ्या जागेत शिलालेख लिहिलेला असतो. या शिलालेखात मुख्य मजकुर वा माहिती असते. गद्येगाळ शिल्पात मंदिरास दिलेले वर्षासन,दान कोणी मोडेल, त्याचा गैरवापर करेल त्याला दिलेली शापवाणी असते.

 गद्यकाळ उभारण्याचा मुख्य उद्देश गावासाठी अथवा देवा साठी दान केलेल्या जमिनीचा कोणी दुरुपयोग करू नये अथवा त्यावर अतिक्रमण करू नये म्हणून या वर शाप लिहिलेला असतो. हा शिलालेख पाहून समाधान वाटले.मात्र तो उघड्यावर न ठेवता मंदिराच्या एका ओटयावर ठेवायला हवा.


      कोकणात अनेक शिवालयांशी निगडित असणारी कथा इथे नाही.घाटावरील कुंदगोळचे टेंब्ये नामक एक मोठे व्यापारी तांब्या, गुलाल, खोबरे, राजापुरी पंचे यासाठी प्रसिद्ध असलेल्य राजापूर बंदरावर व्यापार करण्याकरीता येत असत.एकदा राजापूर बंदरावर व्यापार करण्याकरता त्यांचा तळ पडला असताना दोन चार दिवस झाले तरी त्यांच्या मालाला गिऱ्हाईक मिळेना,सौदा पटेना.आजवर त्यांच्या बाबतीत असे कधी झाले नसल्याने त्यांच्या मनात अनेक विचारांचे काहूर माजले आणि अशा व्यग्र मनस्थितीत त्यांचा डोळा लागला. जागा आली ती पहाटे पडलेल्या एका स्वप्नाने.स्वप्नात साक्षात भगवान शंकराने ज्या गावात तुमचा शेवटचा तांडा पडला होता, तिथे माझी स्थापना कर व तुही तेथेच राहा असे सांगितले.त्यावर टेंब्ये यांनी जाहीर केले की माझा माल जर उद्या संपला तर स्वप्नात आलेला दृष्टांत मी खरा मानून त्या ठिकाणी तुझी स्थापना करेन आणि काय आश्चर्य पुढच्या दिवशी त्यांच्या मालाला गिऱ्हाईक सापडले व तो हा हा म्हणता संपला.परत माघारी जाताना आपल्या सोबतच्या तांडा व सहकार्यांना टेंब्येंनी गावाकडे पाठवले व ते गृहस्थ पांगरी बुद्रुक येथे कायम वास्तव्यासाठी राहिले. व याच ज्ञात पुरुषाने या हरिहरेश्वराच्या मंदिराची पहिली घुमटी उभारली.आज या मूळ पुरुषाची वृंदावन - समाधी देवळाजवळच आहे.


श्री स्वामी शिवानंद आश्रम :-







              श्री  हरिहरेश्वराची पुजा अर्चा करणाऱ्या याच टेंब्ये कुटुंबात पुढे श्री कृष्णाभाऊ टेंबे यांचा जन्म झाला. कृष्णा भाऊंना दत्तावतार श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतीनी कृपा आशीर्वाद दिला. प.पू.टेंब्येस्वामींकडून १९०६ मध्ये कृष्णाभाऊ टेंब्येनी अनुग्रह घेतला. पुढे मार्तंड माणिकप्रभू, सिद्धारूढ स्वामी महाराज, अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज,स्वामी स्वरूपानंद महाराज,नारायण महाराज, माधवनाथ यांसारख्या महान विभूतींचे सानिध्य व आशीर्वाद त्यांना लाभले.या श्रद्धास्थानांच्या व प्रभू कृपेच्या बळावर व अथक उपासना आणि साधनेच्या जोरावर कृष्णा भाऊंनी आध्यात्मिक सिद्धी प्राप्त केली. लवकरच ते सिद्धयोगी बनले. साक्षात श्रीदत्त गुरूकडून पदकमलांचा त्यांना प्रसाद मिळाला. पुढे त्यांनी श्री शिवानंद टेंबे स्वामी महाराज हे आध्यात्मिक नामाभिदान धारण करून पांगरे बुद्रुक गावातूनच लोककल्याणाचा मार्ग स्वीकारला. अडचणींच्या कचाट्यात सापडून आपल्याकडे अगदी हताश अवस्थेत आगतिकनेने येणाऱ्याच्या मनावरील जळमटे दूर करून त्याला सन्मार्गावर आणून त्याचे मनोधैर्य वाढवून त्यांचे अत्यंत कल्याण साधण्याचे पवित्र कार्य, सर्वसामान्यांच्या शंकांचे,1 व्यथांचे निराकरण करण्याचे कार्य ब्रह्मभूत शिवानंद स्वामींनी केले. शिवानंद स्वामींसारखे एक दैदीप्यमान साधुत्व कोकणात जन्मले,तिथेच लोकसेवेत जगले. वावरले आणि आपल्या साधुत्वाचा डिंडिम न पिटता तिथेच निमाले.


     श्री शिवानंद स्वामींच्या इच्छेप्रमाणे हरिहरेश्वर मंदिराच्या १ शेजारीच त्यांचे काळ्या पाषाणातील समाधी मंदिर उभारण्यात आले असून गर्भगृहातील समाधी व शिवानंद टेंबे स्वामी महाराजांची सात्विक मूर्ती दर्शन घेणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करते. स्वामींचा सहवास ज्यांना लाभला, त्यांच्या सात्विकतेची अगाध शक्तीची अनुभूती ज्यांना आली त्या भक्तमंडळीनी श्री स्वामी शिवानंद सेवा मंडळ मुंबई ची स्थापना केली आहे. त्यात उल्लेखनीय भाग कोल्हापूरचे थोर चित्र महर्षी श्री भालजी पेंढारकर यांचा आहे.

या मंडळाच्या माध्यमातूनच आश्रमातील सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन पाहिले जाते. आश्रमात नित्य नैमित्तिक पुजाअर्चा अभिषेक, यज्ञयाग आणि अन्नदान हे कार्यक्रम मुख्यत्वे करून होत असतात. समाधी मंदिरात भोजनशाळा, सभागृह तसेच स्वामींच्या वापरातील वस्तू जतन करून ठेवलेली एक खोली असून यामध्ये अनेक अमूल्य वस्तू पाहता येतात. सोबत सचित्र दर्शनातून शिरशिवानंद स्वामींचा प्रवास अनुभवता येतो. आश्रमात दत्त जयंती, महाशिवरात्री, श्री स्वामी शिवानंद जयंती,पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा हे वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.


    एकूणच हा सारा परिसर गूढ शांततेने भरलेला आहे. या ठिकाणी आल्यावर मनाला एक तृप्ती व आनंद अनुभवता येतो. तो शब्दात मांडता येत नाही. इथले शांत, रमणीय वातावरण व समृद्ध भवताल भक्तगणांना आकृष्ट करणारे आहे, तसेच गद्धेगाळ,वीरगळ,शिलालेख सारख्या ऐतिहासिक साधनांचे अवलोकन करणाऱ्या अभ्यासकांनाही हे मंदिर नक्कीच आवडण्याजोगे आहे. म्हणूनच इतक्या आडबाजूला एवढे सुंदर देवस्थान व संत महात्म्यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली ही देवभूमी बघायला मुद्दाम वाकडी वाट करूनच जायला हवे!


🚩🚩🚩🚩🚩


 श्री विजय अरविंद हटकर.

 लांजा - रत्नागिरी








           


    





     


       


             




  






Wednesday, July 2, 2025

 गोमंतकीय घरे.



१९६१ मध्ये गोमंतक भूमी पोर्तुगीज जोखडातून मुक्त झाली तरी गोमांतक भूमीवरील पोर्तुगीज प्रभाव आजही अगदी उघडपणे ठळकपणे दिसून येतो या प्रभावातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गोव्यातील पोर्तुगीज धाटणीची सुंदर दुमदार कौलारू घरे.


     यंदाच्या उन्हाळी सुट्टीत मडगावात आठ-दहा दिवस सुशेगात राहिलो.इथले आमचे स्नेही दशरथ नाईक हे टॅम्पो ट्रॅव्हलर चालवितात. एके दिवशी त्यांच्या गाडीचे काम करण्यासाठी मडगांव केपे रस्त्यावरील एका गॅरेजला त्यांनी गाडी उभी केली. गॅरेजच्या लगतचे पोर्तुगीज धाटणीचे घर इतके सुंदर होते की फोटो काढायचा मोह आवरला नाही.ते घर पोर्तुगीज वास्तूरचनेचा उत्तम नमुना होता. गोव्यात प्रामुख्याने तांबडा,पिवळा किंवा निळा यापैकी एका रंगात रंगवलेल्या बाह्यभिंती व जिथे जिथे दरवाजे व खिडक्या आहेत त्यांना पांढऱ्या शुभ्र रंगाची बॉर्डर दिलेली पहायला मिळते. घरांच्या बाह्य भिंतींवरील हा सुरेख कॉन्ट्रॉस्ट इथे येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो. दोनच रंगातली घरे हे इथल्या वास्तुकलेचे विशेष आहे. इथल्या बऱ्यापैकी श्रीमंत असलेल्या ख्रिस्तावांची घरे रस्त्याला खेटून कधीच नसतात. रस्त्यापासून आत, थोड्या अंतरावर प्रशस्त आवारात उभी असतात. जमिनीपासून तीन चार फूट उंच प्लिंथवर बांधलेल्या या घरांना मुख्य दरवाजा जवळ बाल्काव ( बाल्कनी ) असते, जेणेकरून सकाळी व सायंकाळ च्या वेळेला घरातील लोक रस्ता बघू शकतील, बाहेरच्या हालचाली टिपत बसून गप्पा मारू शकतील. वर्षभर आर्द्रता असलेल्या गोव्यात बाल्कावात बसल्यावर हवेचा झोत अंगावर  यावा हाही त्यामागचा उद्देश असे. मुख्य दरवाज्याजवळ चार पाच पायऱ्या ही असतात.

घराच्या पायऱ्या घराच्या मालकाचे सामाजिक स्थान सांगतात. रुबाबदार पायऱ्या आणि त्यांची संख्या हे इथे श्रीमंतीचं लक्षण मानलं जातं.घराचे खांब, खिडक्या, व्हरांडे अधिकाधिक सुशोभित असतात. खिडक्यांच्या वर बसवलेला छपरी आडोसा हेही गोव्याच्या घरांचे वैशिष्ट्य आहे. मंगलोरी नळ्यांच्या वापराने खिडक्याना आणि पर्यायाने घराना देखणेपण आलेले दिसते. घराच्या आजुबाजूने,मागे पुढे बागेसाठी सोडलेली जागा व दोन्ही बाजूनी समान साधलेली मिती यामुळे  पोर्तुगीज धाटणीची ही घरे अत्यंत उठून दिसतात. पांढऱ्या शुभ्र चकचकीत सिरॅमिक टाइल्स वरती गडद निळ्या रंगात व कर्सिव रोमन लिपीत लिहिलेली या घरांची नावे देखील फार आकर्षक असतात या टाइल्स ना आझूलेओज म्हटले जाते. घरात प्रवेश केल्यावर लागणारा मोठा दिवाणखाणा ( साला - दे - व्हजिता ) आणि त्याच्या अवतीभोवती असलेल्या इतर खोल्या ( स्वयंपाक खोली, शयनकक्ष ) अशी सर्वसाधारण रचना या घरांची असते.




  या घरांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे तिथे असलेली कमालीची स्वच्छता. सुव्यवस्थितपणा हे गोमंतकीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. गंमत म्हणजे काळाच्या ओघात या पोर्तुगीत वास्तू रचनेने अशी काही मोहिनी घातली की गोव्यातले हिंदू लोकांची घरे देखील जवळपास तशाच धाटणीची आहेत.पोर्तुगीज काळात घरांना रंगरंगोटी करणे कायद्याने सक्तीचे होते असे ऐकायला मिळाले. घराच्या बाह्य भिंतींना रंग दिला नसल्यास घर मालकांना दंड होत असे. मात्र घर मालकांना घरच्या बाहेरच्या भिंतींना पूर्ण पांढरा रंग देता येत नसे, कारण पांढरा रंग हा पावित्र्याचा,आनंदाचा प्रतीक मानला जातो.त्यामुळे गोव्यात  पांढरा रंग फक्त चर्च व चॅपेलच्या भिंतीला पूर्णपणे देण्यात येत असे. तसा नियमही होता, म्हणून कदाचित या रंगाचा वापर इथल्या लोकांनी घरांच्या रंगकामात फक्त दरवाजे खिडक्यांसाठी कल्पकतेने केला. परिणामी घरांचे सौंदर्य कसे खूलून दिसू लागले.आज पणजीतला 'फोंतैंईनेश ' भाग पोर्तुगीज धाटणींच्या सुंदर सुंदर वास्तू रचनांमुळे वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित झाला आहे. गोव्यात येणारे पर्यटक या भागात मोठ्या संख्येने येतात. इथल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या रंगबिरंगी सुंदर, सुबक घरांच्या सोबतीने आपला फोटो काढून कधी एकदा तो  सोशल मीडियावर टाकतोय याची त्यांना घाई होत असते. म्हणून गोव्यावरचे रिल्स पाहताना आकर्षक पोर्तुगीज धाटणीच्या वास्तू रचनेमुळे  वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळालेल्या या भागाच्या रिल्स अधिक पाहायला मिळतात. पणजीतील या वारसा स्थळाप्रमाणे गोव्यातील गावागावांमध्ये देखील अशाच पोर्तुगीज वास्तूरचना आपल्याला पाहायला मिळतात. इथे येणाऱ्या पर्यटकांनी  समुद्र किनारे पाहण्या सोबतच या वास्तूरचना अधिक सूक्ष्मपणे पाहिल्या तरच पोर्तुगीची वास्तू रचनांची वैशिष्ट्ये त्यांना समजून घेता येतील.


🧩🧩🧩


श्री. विजय हटकर



Monday, June 30, 2025

 ध्येयापासून बाजूला न सरकलेली ' साधना '.



  

     एकविसावे शतक हे खऱ्या अर्थाने महिलांचे शतक आहे. ग्रामपंचायत सरपंच पदापासून मल्टिनॅशनल कंपनीच्या प्रमुख पदापर्यंत सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने आपली पात्रता सिद्ध केली आहे. शतक भरापूर्वी स्त्रीवादी चळवळीने स्त्री - पुरुष समानतेची ज्योत पटवली.तिच्या प्रकाशात स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या. आत्मशोध आणि स्वाभिमानाच्या वाटेवर चालताना त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाला वैभवशाली आकार दिला. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेत स्त्रियांभोवती असलेला शोषणाचा पोलादी पडदा त्यांनी आपल्या कर्तुत्वाने किलकिला केला. महानगरांपासून ते गावखेड्यापर्यंतही असंख्य स्त्रिया आत्मनिर्भर होऊन उंच भरारी घेत आहेत. अशाच यशस्वितांच्या यादीतील एक उत्साहवर्धक नाव म्हणजे उर्मिला माने विद्यालय, आसगे, ता. लांजाच्या मुख्याध्यापिका सौ. साधना बावधनकर मॅडम होय.



    समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्नता लाभलेल्या कोकणभूमीत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर समाजवादी चळवळीचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. बॅरिस्टर नाथ पै, प्राध्या. मधु दंडवते, ना. ग. गोरे, भाई वैद्य, मृणालताई यांना मानणारा युवा वर्ग मोठ्या संख्येने तयार झाला. लांजा तालुक्यातूनही माणसातल्या विवेकशक्तीवर अढळ श्रद्धा असणारे काही कार्यकर्ते पुढे आले, त्यातील अग्रगण्य नाव म्हणजे कै. ग. रा. तथा भाई नारकर !स्वातंत्र्योत्तर कालखंडात लांज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील विकासाला दिशा देण्यामध्ये भाई नारकरांचा मोठा वाटा होता. साधारण १९८० - ९० च्या दशकात माध्यमिक शिक्षणाची लांजा तालुक्यात असलेली दुरावस्था पाहून ग्रामीण भागाच्या विकासासाठी माध्यमिक विद्यालयांची उभारणी आवश्यक असल्याने समाजवादी विचारसरणीचे पाईक असलेले वि. ल. तथा भाई मयेकर यांनी हर्चे येथे बॅ.नाथ पै विद्यालय तर ग. रा. तथा भाई नारकरांनी आसगे येथे उर्मिला माने विद्यालयाची मुहूर्तमेढ आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने रोवली आणि हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानज्योत प्रज्वलित केली.आज या दोन्ही विद्यालयांनी जिल्हयाच्या शैक्षणिक क्षेत्रात नावलौकीक मिळविला आहे. भाई नारकरांनी रोवलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून या प्रशालेत २८ वर्ष  शिक्षिका म्हणून आणि ९ वर्षे मुख्याध्यापिका म्हणून शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी योगदान देणाऱ्या  सौ. साधना विनायक बावधनकर मॅडम आज दि. ३० जून २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत झाल्या. त्यानिमित हा प्रपंच...


      बावधनकर मॅडम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आष्टा या गावी ३० जून १९६७  रोजी झाला. त्यांचे  इ. तिसरीपर्यंतचे शिक्षण आष्टा येथेचे झाले. मात्र कोकणातील देवगड तालुक्यात आजोळी शिरगांव येथे वार्धक्यात जगणाऱ्या आजीची जबाबदारी व राजापूर एस.टी. डेपोत वडीलांची कंडक्टर म्हणून असलेली नोकरी या कारणास्तव त्यांच्या आई - वडीलांनी शिरगांव ला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. नांदगांव - कुणकेश्वर रस्यावर शिरगांव स्टॉपवर असलेल्या कौलारू घरात तीन अपत्यांसह त्यांचे आई वडील संसाराचा गाडा चालवित होते. त्यामुळे बावधनकर मॅडम यांचे ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण शिरगांव हायस्कूल येथे झाले. शाळेतील शिक्षक दिनाला शिक्षिका म्हणून अध्यापन करण्याची संधी मिळाल्यावर पुढे जाऊन शिक्षिका होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. या स्वप्नपूर्तीसाठी  १९८२ - १९८८ ही सात वर्षे इ. ११ वी ते पदवी व पुढे बी.एड. चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रोजचा शिरगांव ते देवगड हा ५२ कि.मी. चा प्रवास त्यांना करावा लागला.शिकण्याच्या या काळात घरच्या गरिबीतून वर आलेल्या बावधनकर मॅडमना परिस्थितीने लाचारी शिकविली नाही ; तर संघर्षासाठी ताकद पुरविली. अभ्यासा सोबतच खेळात कुशल असल्याने त्यांनी वालावलकर अध्यापक महाविद्यालयात १२ नोव्हे. १९८८ रोजी धावणे,थाळीफेक व  भालाफेक  या मैदानी खेळात सुयश प्राप्त करून महाविद्यालयाची 'आदर्श खेळाडू ' म्हणून बहुमान पटकाविला. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी त्यावेळी देवगड महाविद्यालय कोकणभर प्रसिद्ध होते. प्राचार्य शिर्के मॅडम, पांग्रडकर सर, श्रीराम काळे सर,जोशी मॅडम,एन.पी. पाटील सर,सातारकर मॅडम,सर्जेराव गर्जे सर यांसारख्या तज्ञ प्राध्यापक वर्गाच्या सहवासात साधना बावधनकर यांच्या व्यक्तिमत्वाची जडण - घडण झाली.




    १९८८ ला लांजा तालुक्यातील उर्मिला माने विद्यालय आसगे या समृद्ध वनश्रीच्या कुशीत वसलेल्या प्रशालेत बावधनकर मॅडम इंग्रजी,भूगोल विषय शिक्षिका म्हणून रुजू झाल्या व पुढे ३७ वर्षे त्यांनी या प्रशालेत समर्पित भावनेने सेवा केली. नव्वदच्या दशकात लांजा तालुका हा तसा अविकसित भाग अशी ओळख असलेला आणि म्हणून साधारण सदतीस वर्षांपूर्वी आसगे गाव एका स्त्रीने नोकरीसाठी स्वीकारणे हे एक आव्हानच होते.खेडेगाव असल्याने अपेक्षित सुविधा नव्हत्या त्यात भर म्हणजे विनाअनुदानित शाळा. या प्रतिकूल परिस्थितीत अध्यक्ष ग.रा.नारकर, आर. जी. चव्हाण, नाना मानकर आणि सर्व संचालकांनी दिलेल्या विश्वासाच्या जोरावर त्यांनी आपल्या अध्यापकीय सेवेला प्रारंभ केला.पुढे २७ जून१९९० रोजी साधना मॅडम  विनायक सखाराम बावधनकर या कर्तुत्वान युवकाशी विवाहबद्ध झाल्या.लग्नानंतर सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता, मात्र कर्तृत्ववान पतीची अखंड साथसोबत असल्याने बावधनकर मॅडम आत्मविश्वासाने त्याला सामोऱ्या गेल्या. त्यांचे उद्यमशील पती विनायकरावांनी सुद्धा सुरवातीपासुनच विविध व्यवसाय केले. मात्र अलीकडच्या काळात चिरेखाण व्यवसायात त्यांचा जम बसला. जसा-जसा काळ सरकत गेला तसे - तसे जीवनात 'श्रमप्रतिष्ठेला ' महत्त्व देणाऱ्या या दांपत्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले. त्यांची उच्चशिक्षित कन्या विनंती आणि जर्मनीत अभियंता असलेला वैभव ही दोन्ही मुले आपापल्या जीवनात आज स्थिरस्थावर आहेत आणि म्हणूनच बावधनकर दांपत्यांशी चर्चा करताना पती-पत्नी म्हणून त्यांची एकमेकांप्रती असलेली वचनबद्धता जाणवतेच, सोबतीने जीवनात गाठलेल्या ध्येयपूर्तीचा आणि सर्वांगिण साफल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना पाहून ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आमच्यासारख्या तरुणाईला त्यांच्या आजवरच्या वाटचाली विषयी कृतार्थ वाटते.

 


   खरं तर ८०- ९० च्या दशकात कोकणात तळागाळातील समाजापर्यंत ज्ञानगंगा पोहचविण्यासाठी अपार कष्ट घेणाऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व बावधनकर मॅडम करतात. बावधनकर मॅडम एक उत्तम निवेदिका आहेत. प्रशालेत रुजू झाल्यापासून अनेक वर्षे शाळेतील उपक्रमांचे निवेदन त्या करीत आल्या आहेत. सभाधीटपणा,कार्यक्रमाची माहिती, विचार प्रकट करणाची कला, निरीक्षणात्मक दृष्टी, आवाजातील चढ - उतार हे कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी आवश्यक असलेले गुण त्यांच्या ठायी आहेत. आसगे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, आसगे दरवर्षी संस्थापक ग. रा. नारकर यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी रत्नभूमीतील विधायक कार्य करणाऱ्या गुरुजनांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करते. कोकणभर ख्याती असलेल्या नियोजनबद्ध कार्यक्रमाची उंची ओघवती वक्तृत्व शैली व व्यासंगाची जोड असलेल्या बावधनकर मॅडमनी निश्चितच वाढवली आहे.  प्रशालेच्या भौतिक विकासासाठी, विद्यार्थांच्या सर्वांगिण विकासासाठी मॅडमनी आपल्या परीने मदतीचा भक्कम हात आजवर दिला आहे. मात्र त्याची कुठेही वाच्यता न करता  'निरिच्छ दातृत्वाचा ' भाव कृतीतून जपला आहे. इंग्रजी विषयाच्या तज्ञ मार्गदर्शिका म्हणून स्मार्ट पीटी प्रशिक्षणांतर्गत सलग सहा वर्षे मॅडमनी जिल्हयातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. 


   


बावधनकर मॅडम यांचे आयुष्य म्हणजे एका शिक्षिकेने ध्येयधुंद होऊन केलेली ज्ञानसाधनाच आहे. २८ वर्ष सहाय्यक शिक्षिका म्हणून आदर्शवत अध्यापन केल्यानंतर ०१ जून २०१६ रोजी सेवाज्येष्ठतेनुसार त्या मुख्याध्यापक पदी विराजमान झाल्या.स्त्रियांमध्ये एक स्वाभाविक गुण असतो. सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचा. स्वतःतील करुणा आणि ममत्व घेऊनच त्या प्रशासनात उतरतात.मुख्याध्यापक पदाच्या कार्यकाळात शिक्षण विभाग, संस्थाचालक शिक्षक, पालक, विद्यार्थी यांसह अन्य घटकांशीही त्यांनी उत्तम समन्वय राखला. प्रशालेचा परिसर सुंदर आणि आश्वासक राहील याचीही त्यांनी काळजी घेतली.उत्तम प्रशासना बरोबरच उपक्रमशील, क्रियाशील सहकारी शिक्षकांना त्यांच्या आवडीचं विद्यार्थी व प्रशाला हिताचं काम करण्यास स्वातंत्र्य देणे,विरोधी मतं व्यक्त करण्याची मुभा असणं आणि इतरांना त्यांच्या कामात मार्गदर्शनाबरोबरच प्रोत्साहन देणं हे बावधनकरांच्या कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य आहे.  मुख्याध्यापक पदी विराजमान झाल्यावर त्यांच्या कर्तुत्वाला झळाळी प्राप्त झाली. त्यांच्या नेतृत्वात प्रशालेत झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे सर्वच मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.

हर घर तिरंगा उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारीनी कौतुक केले. विविध क्रीडास्पर्धातील यशासह आषाढी एकादशी चित्ररथ, कोरोना गुढी, विधवा स्त्रीयांना सामावून घेणारे हळदी कुंकू, वृक्षारोपण, आजी - माजी मुख्याध्यापक मेळावा, माजी विद्यार्थांच्या सहकार्याने संस्था व शाळेच्या मदतीकरीता नाट्यप्रयोग आदी विविधांगी उपक्रम त्यांनी यशस्वी केले.मुख्याध्यापिका पदाच्या या काळात रावसाहेब पोळ,रवींद्र दळवी, उमेश यादव, संतोष चलोदे, जितेंद्र गावडे, प्रसाद माटल या शिक्षकांसह लिपिक संदीप चव्हाण, शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप मांडवकर या सर्वांचे त्यांना सहकार्य लाभले.खरं तर, आपण ज्या खूर्चीत बसतो ती खूर्ची वलयांकित असते. मात्र आपण तेव्हाच वलयांकित होतो जेव्हा आपण निष्ठेने काम करतो. बावधनकर मॅडम कामाप्रती असलेला निष्ठेमुळेच आज लोकाभिमुख झाल्या आहेत.


       बावधनकर मॅडम फक्त आदर्श शिक्षिका नाहीत तर समाजाच्या धारणांबद्दल आणि सामाजिक मूल्यांबद्दल जागृत असलेल्या संवेदनशील साहित्यिका देखील आहेत. त्यांनी लिहिलेल्या कविता,कथा, वैचारिक लेख ओघवते व भावनाप्रधान आहेत. प्रशासनाच्या व्यापामुळे गतकाही वर्षात त्या अधिक लिहू शकल्या नसल्या तरी सेवानिवृत्तीनंतरच्या नव्या टप्प्यात अधिक जोमाने आपला छंद जोपासतील याचा विश्वास वाटतो.  शिक्षण क्षेत्रासह साहित्य, संस्कृती क्षेत्रातही त्यांनी सेवाव्रती कार्य केले आहे. बावधनकर मॅडम यांचे आदर्शवत जीवन समाजाला दिशादर्शक ठरणारे आहे. त्यांच्या

आजवरच्या शैक्षणिक सामाजिक साहित्य क्षेत्रातील कामाची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, आसगे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आसगे,लांजा तालुका माध्यमिक अध्यापक संघ, लांजा तहसिल हिंदी अध्यापक संघटना आदी विविध संस्थांनी 'आदर्श शिक्षिका ' पुररकाराने त्यांना सन्मानित केले आहे.


   नाही पंढरीसी जाणे । नाही केली कधी वारी ।

   माझी कर्मभूमी हीच । माझी रोजची पंढरी ।।

  जेव्हा येतात लेकरे ।सुख दुःख सांगायला ।

  माझा विठठ्ल ची रोज । येतो मला भेटायला ॥


- या कवितेच्या ओळी खऱ्या अर्थाने बावधनकर मॅडम जगल्या आहेत.जगातील प्रत्येक देशात शाळांना अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र आपल्या भारतीय संस्कृतीने शाळांना 'ज्ञान मंदिराचा ' दर्जा बहाल केला आहे. त्यामुळे धार्मिक मंदिरांइतकेच या ज्ञानमंदिरांना पवित्र अधिष्ठान लाभले आहे. आजच्या बदललेल्या शिक्षक - विद्यार्थी नातेसंबंधात, मराठी माध्यमांच्या शाळांच्या दुरावस्थेत आणि प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या पाश्चात्य इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावातही  गुरुला प्रभूसमान मानण्याचे हे अधिष्ठान जपण्याचे कार्य साधना बावधनकर मॅडम सारखी व्रतस्थ व्यक्तिमत्वे करीत आहेत. साधना म्हणजे ध्येयप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न! साधना म्हणजे तप ! शालेय वयातच शिक्षिका बनून पिढी घडवून राष्ट्रसेवा करण्याचा ध्यास मनी बाळगलेल्या साधना बावधनकर मॅडमनी आयुष्यभर ज्ञानसाधना केली. योगी योगसाधना करतात, संगीतोपासक स्वरसाधना करतात तर कर्मयोगी कर्म मार्गाचे आचरण करताना ध्येयापासून बाजूला सरकत नाहीत. त्याप्रमाणेच बावधनकर मॅडमही ज्ञान साधनेच्या वाटेवरून चालताना कधीही मागे हटल्या नाहीत. समर्पित प्रयत्नांनी त्यांनी आपल्या ज्ञानसाधनेतून उद्याची सक्षम पिढी घडविताना स्वतःच्या जीवनालाही सुयोग्य दिशा देत घरातील ज्येष्ठांनी ठेवलेले 'साधना' हे नाव रुढार्थाने सार्थक केले आहे.


    एकुणच सदतीस वर्षाच्या शिक्षण सेवेत कोणतीही कुचराई न करता, निष्कलंक चारित्र्य जपलेल्या बावधनकर मॅडमना भाग्याची सेवानिवृत्ती घेण्याची संधी आज विधात्याने दिली आहे. आदरणीय बावधनकर मॅडम यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य प्रदीर्घ, निरामयी, आनंददायी होवो ही शुभकामना व्यक्त करताना बावधनकर मॅडममधील अव्दितीय ध्येयवेड्या शिक्षिकेला मनःपूर्वक दंडवत !


💐💐💐💐💐

श्री. विजय हटकर
लांजा - रत्नागिरी






Saturday, February 22, 2025

भाषा बोलू तरच जिवंत राहिल.

 भाषा बोलू तरच जिवंत राहिल.


आज २२ फेब्रुवारी.देशाची राजधानी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज नगरीत साजरे होत असलेल्या ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस.कोकण प्रांतातील ग्रामीण साहित्य चळवळीला दिशा देणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष व माझे मार्गदर्शक,गुरुवर्य सुभाष लाड सर यांसह उपस्थित राहिलो.अभिजात मराठी भाषेच्या या ऐतिहासिक महोत्सवाचा तीनही दिवस आनंद आम्ही घेणार आहोत.


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।।

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥


     माय मराठीच्या प्रांती आम्ही जन्म घेतला हे आमचे सौभाग्यच जणू! मातृभाषा राजभाषा याच खरे म्हणजे राष्ट्राचे मानदंड असतात.भाषा,साहित्य,कला,संस्कृती यांच्याबद्दल ज्यांना रास्त अभिमान वाटतो त्यांच्यातच राष्ट्राविषयी अभिमान निर्माण होत असतो. लोकभाषा हाच लोकशाहीचा कणा असतो. खरंतर आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा उशिराच मिळाला  कारण दिल्लीकडे डोळे वटारले की हव्या त्या सवलती मिळतात हे तामिळनाडूला कळले ते आपल्याला अजूनही कळलेले नाही. दक्षिण भारतीय स्वतःचे, प्रांताचे प्राणतत्व जपून आहेत. पाच सहा दशका पूर्वीपासूनच ते विश्वतमिळ साहित्य संमेलने भरवतात. उत्तर भारतीयही विश्वहिंदी साहित्य संमेलन आयोजित करतात. आपण मात्रमाय मराठीला राष्ट्रभाषा तर दूरच राजभाषा म्हणून मिरवण्यात देखील खूप मागे पडलो.


इंग्रजांनी आपली भाषा सतत वापरली, ती जगभर वापरली.ते जेथे गेले तेथे तिचा वापर त्यांनी केला.म्हणून ती समृद्ध झाली, वाढली.जागतिक भाषा झाली.. भाषा समृद्धीचे इंग्रजांचे हे गमक  देशाची राजधानी  दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतील साहित्य संमेलनात मराठी भाषिकांना कळावे हेच मराठी मुलखाबाहेर होणाऱ्या या संमेलनाचे मुख्य ध्येय असावे.अशी मराठी रसिक म्हणून माझी माफक अपेक्षा आहे. दिल्ली येतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याच विचाराने आम्ही सहभागी झालो आहोत.


मातृभाषेचा पुरस्कार हे ब्रीद प्रत्येक मराठी भाषिकाच्या धमन्या मधुन वहायला हवं.आपल्या राज्यात आपल्याच भाषेचे वर्चस्व असले तरच इतर आपल्यापुढे नमुन वागतील. मराठी युवा पिढीने इंग्रजी भाषेचा उत्तम अभ्यास करावा.पण इंग्रजी माध्यमांचा आग्रह धरू नये. हे धोरण संमेलनात आखण्याची गरज आहे. कारण आज आपल्याच राज्यात इंग्रजीच्या पुरस्कारामुळे आपल्याला नमून वागण्याची वेळ आली आहे.महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयां ना मराठी भाषा सक्तिची करावी. त्यांच्या राज्यात त्यांच्या भाषेत बोलण्याचा त्यांचा आग्रह असतोच ना? आज जेव्हा भारतीय युरोप अमेरिकेत जातात तेव्हा इंग्रजी भाषेतून व्यवहार करीत नाहीत का? तसेच मराठी भाषा येत नसेल तर परप्रांती यांना या राज्यात कोणत्यही सवलती देऊ नयेत. सत्ता व खुर्च्या  संभाळप्यात गर्क असणाऱ्या नेतृत्वकर्त्यांनी मायमराठीच्या रक्षणा साठी निदान आता तरी जागे होऊन धोरणं आखावीत.या संमेलनातून विचारवंतांनी मराठी भाषेविषयी निश्चित धोरण नव्या पिठसमोर मांडायला हवं.लोकशाहीत लोककल्याणाच्या गाड्याला लोकभाषेच्या वंगणाखेरीज तशी कधीच गती देता येणार नाही.राजकारभारात मराठी भाषेला जुजबी महत्व देणे थांबवायला हवे.मराठी भाषिकांनी यापुढे दक्षिण भारतीयांप्रमाणे व्दिभाषा सूत्र स्वीकारून मराठीसह इंग्रजी असा भाषिक क्रम स्वीकारावा.


 दिल्ली येथील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष व लोक साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका तारा भवाळकर यांनी संमेलनध्यक्षीय भाषणात भाषा बोललो तरच जिवंत राहील हे मत व्यक्त केले. मात्र ही जबाबदारी मराठी भाषा बोलणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांची आहे,त्यासोबत  मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध शासकीय निमशासकीय साहित्य संस्थांनी या संदर्भात अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने सजगतेने पाऊले उचलावीत,हीच माफक अपेक्षा आहे.सद्यस्थितीत महाराष्ट्र व राज्याबाहेर व परदेशातही अनेक मराठी संस्था आपापल्या परीने मराठी साहित्य संमेलनाचा आयोजन करीत असतात या संदर्भात अखिल भारतीय मराठी महामंडळाने याविषयीची माहिती संकलित करून या संस्थांच्या प्रतिनिधीनांही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलवायला हवे, कारण खऱ्या अर्थाने तळागाळात मराठी भाषा संवर्धनाचे काम या संस्था करीत असतात.


सरहद संस्थेचे युवा शिलेदार लेशपाल सह


     मात्र सध्या इंग्रजाळलेल्या काळात राज्यात मराठीला पोषक वातावरण आहे असे म्हणण्यास वाव आहे. सरकारने  मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून नुकतेच पुणे येथे विश्व मराठी साहित्य संमेलन साजरे केले आणि आज जागतिक राजभाषा दिनी दिल्लीतील तालकठोरा मैदानात ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे होते आहे, त्याचा निश्चितच आनंद वाटतो आहे. अपेक्षा इतकीच आहे की ही संमेलने फक्त  दिखावू सोहळे न होता अभिजात मराठी भाषेच्या प्रसाराचे, चळवळीचे मुख्य केंद्र बनावे व राज्यात सद्यस्थितीत मराठी भाषेची होणारी गळचेपी थांबविण्याचा विचार तेथे व्हावा, बंद पडणाऱ्या मराठी शाळांना पुन्हा एकदा सुरु करण्यासाठीची धोरणे यात तयार व्हावीत, विद्यापिठीय विविध ज्ञानशाखा मराठीतून सुरु व्हाव्यात व अभिजात मराठीला जागतिक भाषेचे स्थान मिळवून देण्यात या सोहळ्यांचा उपयोग व्हावा.


वि।ज।य।ह।ट।क।र 

दि।ल्ली।डा।य।री

 २२.०२.२५


Friday, February 21, 2025

 

देशाची राजधानी दिल्लीत करूया,

मायमराठीचा जागर!

दिल्ली! भारताची राजधानी.एकविसाव्या शतकातल्या सामर्थ्यवान भारताचा मानबिंदू! दिलवालोंकी दिल्ली असं म्हटलं जाणाऱ्या या शहराने प्रत्येक भारतीयचा काळीजकोपरा व्यापला आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक व राजकीयदृष्टया महत्वाचं असलेलं देशातील बहुसांस्कृतिक असे हे शहर! 

मायमराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर शारदेचा ९८ वा वार्षिक अक्षरसोहळा यंदा भारताची राजधानी दिल्ली येथे साजरा होतो आहे. गेली दहा वर्ष कोकणात ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड सर यांच्यासह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मी देखील दिल्लीला आलो आहे. गेली काही वर्ष संघर्षातून थोडीफार स्थिरता आल्यानंतर जाणीवपूर्वक दक्षिण भारत भटकलो पण उत्तरेत जाण्याचा योग मात्र येत नव्हता. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मुंबईच्या पुढे राज्याचे सीमा ओलांडण्याचा हा योग २० फेब्रुवारीला अर्थातच बाबांच्या स्मृतिदिनी जुळून आला.



मुंबई सेंट्रल स्टेशन बाहेर तिरंगा समवेत सेल्फी


दिल्लीला जाण्यासाठी पवईतून आम्ही मुंबईतील ट्रॅफिकची समस्या लक्षात घेऊन ०३:०० वाजताच घर सोडले.५:०५ मिनीटांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन वरून दिल्लीला जाणारी तेजस राजधानी गाडी सुटली आणि मनातल्या गाडीने सुद्धा वेग घेतला.



वैतरणा नदीच्या खोऱ्यातील विकास प्रक्रिया

बघता बघता गाडीने बोरीवली पार केलं. ६ः०० वाजता कातरवेळी वैतरणा नदीचे  दर्शन झाले. वैतरणा रेल्वे स्टेशनच्या पुढे दक्षिण आणि उत्तर असे वैतरणा नदीचे दोन प्रवाह पाहायला मिळाले. खरंतर आजवर इतिहास भूगोलाच्या पुस्तकात आणि इतर वेळेला गुगल व इतर सोशल माध्यमातून वैतरणा नदी विषयी वाचले होते पण आज प्रत्यक्षात दिल्लीच्या प्रवासाला निघाल्यानंतर मुंबई सोडल्यावर वैतरणा नदी पाहता आले त्याचं मनमुराद आनंद झाला मात्र देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईचा औद्योगिक आणि भौगोलिक विस्तार गत काही वर्षात वसईपर्यंत विस्तारला होता. तो आता त्याच्याही पुढे जात वैतरणा नदीच्या खोऱ्यातील समृद्ध कांदळवन संपवू पाहू लागला आहे. याची चिन्हे वैतरणा रेल्वे स्टेशनच्या बाहेरील फोकलॅंड जेसीबी ने सुरू असलेली विकासप्रक्रिया पाहताना मनात येत होता. पुढे लाड सरांशी साहित्यिक गप्पा रंगल्या आणि वापी, सुरत कधी आले हे कळलेच नाही. रात्री राजधानी ट्रेनमधील उत्तम भोजनाचा आनंद घेत झोपी गेलो. तेजस राजधानीचा मुंबई ते दिल्ली हा प्रवास सुखकर झाला आणि सकाळी नवी दिल्ली कधी आली ते कळलेच नाही.



  दिल्ली आणि मराठ्यांचा संबंध तसा फार जुना आहे.सतराव्या शतकात बाळाजी विश्वनाथ या पहिल्या पेशव्याने दिल्लीवर स्वारी करून दिल्लीचा पातशहा बदलून पुढे देशाचे भविष्य कोण घडवणार या प्रश्नाचे उत्तर दिले. पहिल्या बाजीरावाने तालकटोरा येथवर मजल मारून पातशहावर दबाव आणत आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊन मागे परतला. १७५२ साली मल्हारराव होळकरांनी पेशव्यांच्या वतीने पातशहाच्या रक्षणाचा ‘अहदनामा; नामक करार केला. पानिपतचे युद्ध मराठे लढले ते दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणासाठी. या काळात सदाशिवरावभाऊ पेशव्याने सानिकांचा पगार देण्यासाठी शाहे दरबाराचे चांदीचे छत फोडले पण तख्ताला तोशीस पोहोचू दिली नाही.

पुढे महादजी शिंदे या सेनानीने तब्बल वीस वर्ष पातशाहीवरच राज्य गाजवले. दोनदा पातशहाला तख्तावर बसवले १७९५ पासून पातशहा इंग्रजांच्या कह्यात गेला तर यशवंतराव होळकर यांनी १८०४ साली दिल्लीवर स्वारी करून पातशहाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात मराठ्यांनी पातशाही तख्त राखण्यासाठी आणि पातशहामार्फत आपली सत्ता राबवण्यासाठी तब्बल साठहून अधिक वर्ष शिकस्त केली. भारतीय स्वातंत्र्याचे नगारेही महाराष्ट्रातूनच निनादले.




मराठी साहित्य संमेलनाचे आकर्षक प्रवेशद्वार


 

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे, याचा प्रत्यय या ऐतिहासिक साहित्य संमेलनातून येणार आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.  मातृभाषा ही संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याचे सर्वात मोठे साधन आहे. आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनी याच मराठी अक्षर दिंडीतील एक वारकरी म्हणुन मी दिल्ली संमेलनात सहभागी झालो आहे, याचे मनस्वी समाधान आहे.

💠💠💠💠


विजय हटकर

८८०६६३५०१७



म.सा.प.पुण्याचे कार्याध्यक्ष प्राध्या. मिलिंदजी जोशी, संघाध्यक्ष सुभाष लाड सरांसह...

अनंताच्या वारीला मार्गस्थ अनंतराव…

  अनंताच्या वारीला मार्गस्थ अनंतराव…               जीवनाच्या प्रवासात काही व्यक्ती आपल्या कार्यामुळे मोठ्या ठरतात, तर काही आपल्या माणुसकीमुळ...