एक लढवय्या कार्यकर्ता - श्री संजय सीताराम सुतार.
🥈🥈🥈🥈🥈🥈🥈
'नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नसते.' ते स्वतः निर्माण करावे लागते. कर्तव्यपरायण व्यक्ती आपल्या ध्येयाला कर्तव्यबुद्धीची जोड देत आपले कर्तृत्व सिद्ध करते .राजापूर तालुक्यातील मुर गावचे माजी सरपंच, यशस्वी व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री संजय सुतार यांना भेटल्यास तना - मनात कर्तव्यबुद्धी भिनलेला माणूस भेटल्याचा आनंद होतो .त्यांची यशोगाथा कोकणातील नव्या पिढीला प्रेरणादायी आहे.
राजापुरातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले ऐतिहासिक मुर गावात सामाजिक वारसा जोपासणा-या एका सामान्य कुटुंबात संजय सुतार यांचा जन्म झाला. बालपणापासूनच व्यवसाय करायचे स्वप्न पाहिलेल्या संजयने १९९४ -९५ मध्ये दहावी झाल्यानंतर शिक्षण सोडले. व व्यवसायिक बनण्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी अविरत मेहनत, कल्पकता, सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर सन २००४ मध्ये "आई सुलोचना साॅ मिल ' ची मुहूर्तमेढ रोवली .लाकूड व्यवसायात उतरल्यावर स्वर्गीय सुंदर कोकणच्या निसर्गाला हानी पोहोचणार नाही हे तत्त्व त्यांनी कसोशीने पाळले. ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने लाकूडतोड करताना सर्वसामान्यांच्या वेळेचा अपव्यय होतो , अधिक भाग वाया जाऊन त्यांना आर्थिक नुकसान होते हे जाणून आई सुलोचना साॅ मिल च्या माध्यमातून आधुनिक यंत्राचा उपयोग करीत पाचल पंचक्रोशीतील लोकांचे आर्थिक नुकसान टाळण्याचे काम केले. या मिलच्या माध्यमातून शासनाने परवानगी दिलेल्या झाडांची किंवा जीर्ण झालेल्या झाडांची तोड ते करतात. लाकूड कापणाऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी वनविभागाकडून एक हजार झाडे देण्यात येतात. या उपक्रमात सुतार अग्रक्रमाने पुढे असतात. वनविभागाकडून घेतलेली झाडे योग्य ठिकाणी लावून त्याचे संगोपन ते आत्मीयतेने करतात . या व्यवसायात मिळणाऱ्या लाभांशा पैकी दहा टक्के रक्कम शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक क्षेत्रात ते खर्च करीत असतात. पर्यावरणस्नेही वृत्तीच्या सुतार यांनी प्रामाणिकपणा व मेहनतीच्या जोरावर आज दोन लाकूड गिरण्या यशस्वी उभ्या केल्या आहेत .
श्री संजय सुतार यांचे अख्खे कुटुंब राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांचे मोठे बंधू श्री भास्कर सुतार यांनी मूर ग्रामपंचायतीचे दोन वेळा सरपंचपद भूषविले आहे तर पंचायत समिती सदस्य म्हणूनही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांची वहिनी सौ निशिगंधा भास्कर सुतार विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आहेत. त्यांचे चुलत बंधू प्रवीण सुतार लांजा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक भान जपणारे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत . समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम करणाऱ्या कुटुंबात संजयरावांनाही
इतरांच्या आयुष्यात आनंद घेण्यासाठी कार्यरत राहण्याचे बाळकडू मिळाले .मोठे बंधू भास्कर सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सुतार यांनी गावाच्या राजकीय क्षेत्रात पदार्पण करीत २०१० ते २०२१ या दशकात गावाचे सरपंच पद भूषविले .या काळात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणाऱ्या सुतार यांनी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावात चांगल्या सुविधांचे जाळे विणले.
सुतार यांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील कुपोषित मुलांना कुपोषण मुक्त केले. गावातील मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. अंगणवाडी शाळा डिजिटल केल्या. वाळवड धरण्यासाठी पाठपुरावा करीत निधी मंजूर करून घेतला. मूर सह परिसरातील अनेक शाळांना ई-लर्निंग साहित्य मिळवून दिले .मुर गावात शिक्षणासोबतच पायाभूत सुविधा निर्माण केल्याने त्यांच्या कारकिर्दीत मुर ग्रामपंचायतीला निर्मल ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त झाला. सरपंचांनी क्रियाशील काम करावे यासाठी सकाळ, आग्रोवन यासारख्या राज्यातील महत्त्वाच्या माध्यम समूहानी आयोजित केलेला परिषदेत सुतार नेहमी सहभागी होत असतात. या परिषदेत शेतकऱ्यांसाठीच्या अद्ययावत योजना व उपक्रमांची माहिती मिळते .तिथे मिळालेल्या माहितीचा उपयोग त्यांनी मुर गावातील शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे केला. ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सुतार यांनी राजापूर तालुका शिष्यवृत्ती परिक्षेसारखी अभिनव योजना राबविल्याने शिष्यवृत्ती परिक्षेच्या गुणवत्ता यादीत मूरचे विद्यार्थी झळकल्याने त्यांच्या कष्टाला फळ आले आहे . सन २०१७ जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्याचे यशस्वी आयोजन त्यांनी सहका-यांच्या साथीने केले.या प्रदर्शनाच्या नियोजनबद्धतेमुळे आलेले मान्यवर ही प्रभावित झाले होते.
संजय सुतार हे भास्कर सुतार सहकारी दूग्ध संस्थेचे संचालक, ' ब ' वर्गातील इंद्रायणी ग्रंथालयाचे अध्यक्ष आहेत. तसेच उगवते तारे मंडळ हातदे , गांगो-रवळनाथ क्रीडा मंडळ जवळेथर, रुग्ण कल्याण समिती सदस्य जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्र या संस्थांवर देखील ते कार्यरत. आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे .पाचल पंचक्रोशी सह राजापूर तालुक्याच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव योगदान देणा-या संजय सुतार यांना संघाचा 'बॅ.नाथ पै पुरस्कार आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार २०२२ ' देऊन सन्मानित करण्यात आले हे वृत्त जेव्हा कळले तेव्हा ही निवड सार्थ असल्याचे वाटले.येणा-या काळात त्यांनी असेच विधायक काम करावे हीच शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐
*विजय हटकर*
*लांजा*
No comments:
Post a Comment