Sunday, March 31, 2019

फाफे गुरुजी व सुभाष लाड
गुरु-शिष्याची वेगळी जोडगोळी.
🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮

सस्नेह नमस्कार.
   🖋  आमचे मार्गदर्शक श्री  सुभाष लाड यांच्या सेवापुर्ती समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी आडवली येथे शनिवार दिनांक २९ मार्च रोजी  रात्री ८:३० ला पोहचलो. लाड सरांना  बालपणी ज्ञानदान करणारे ,सुसंस्काराचे धडे देणारे आडवली ता.लांजा येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री शिवराम फाफे यांची भेट घेतली.व आपले विद्यार्थी सुभाष लाड हे अापल्या विचारांचा वारसा पुढे चालवित एक यशस्वी शिक्षक म्हणून ०२ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत हि बातमी सांगितली. सरांच्या कार्याचा गॊरव म्हणून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला यायचे आहे हे सांगताच त्यांचे डोळे पाणावले.पाणावलेल्या डोळ्यांना सावरत मग फाफे गुरुजींनी १९७० च्या दशकातील रिंगणे गावातील त्यांच्या १३ वर्षाच्या शिक्षकी वाटचालीतील आठवणींना उजाळा दिला.एक -एक म्हणत मग अनेक आठवणींची मग फाफे गुरूजींनी केलेल्या चहा सोबत "चाय पे चर्चा" झाली.
    १९७० च्या काळातील रिंगणे गावातील ग्रामव्यवस्था, शैक्षणिक,सांस्कृतिक चळवळ त्यांच्या बोलण्यातून पुढे आली.
१) फाफे गुरुजींच्या काळातच रिंगणे हनुमान मंदिराच्या परिसरातील प्राथमिक शाळेच्या  इमारतीची पायाभरणी झाली.
२) फाफे गुरूजी गावात होणाऱ्या नाटकांचे नेपथ्य जबाबदारिसोबत पडदेहि उत्कृष्ट रंगवायचे.
३) रात्री हि मुलांना आपल्या खोलीत जमवून शिकवायचे.
४)वाहतूक व्यवस्था नसल्याने फाफे गुरुजी पायी चालतच आडवलीहून रिंगण्याला यायचे व सुट्टीला गावी आडवलीला जायचे.

४) गावात कोण आजारि पडला तर त्या रुग्णाला डोलीत बसवून जवळच्या पाचल, रायपटण येथील वैद्यकीय अधिका-याकडे नेण्याच्या कामीही फाफे गुरुजी आघाडिवर.
५) मुलांना शिकवायला आलेले फाफे गुरुजी १३ वर्षे रिंगणे गावात गावाचेच होऊन राहिल्याने गावातील ग्रामस्थांची  फाफे गुरुजींवर प्रचंड श्रद्धा होती
त्यामुळे गावचे न्यायनिवाडे, विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजनात फाफे गुरुजींचे मार्गदर्शन हमखास घेतले जात होते.
६) रिंगणे गावातील अनेक मुलांना तिमीराकडुन तेजाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणाऱ्या फाफे गुरूजीमुळेच सुभाष लाड यांचे माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले कारण दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी फाफे गुरुजीच सुभाष लाड यांना शिपोशी येथील न्यायमूर्ती आठल्ये विद्यामंदिरात घेऊन गेले होते.
७)रिंगणे शाळेत फाफे गुरुजींनी १९७८ मध्ये शारदोत्सव सुरू केला होता.सुभाष लाड शिपोशी येथे दहावीनंतर पुढिल शिक्षणाला गेल्यानंतर रिंगण्यातील उंबरवाडी शाळेतील शारदोत्सव बंद झाला.हे कळताच सुभाष लाडांनी लेखक श्री वसंत जाधव यांची "इथे बायका मिळतात" हे खळबळ माजविणारे नाव असलेली एकांकिका दिग्दर्शित करुन  बसविली त्याचा यशस्वी प्रयोग केला.व पुन्हा यशस्वीपणे शारदोत्सवाला सुरवात केली याकामी फाफे गुरुजींनी सुभाष लाड यांना तोलामोलाची साथ दिली.या कार्यक्रमाची पत्रिका, पोस्टर फाफे गुरुजींनी स्वत: तयार केली.लांजा येथून या कार्यक्रमाची पत्रिका स्वखर्चाने छापून आणली.
महारथी कर्ण हि पहिली एकांकिका बसवून सुभाष लाड यांना अभिनयाचा पहिला रंग फाफे गुरुजींनीच फासला.त्यामुळेच पुढे व्यासपीठावरील आत्मविश्वास,धैर्य,वक्तृत्व, अभिनय,इत्यादि गुण लाड यांच्यात विकसित झाले.
८) रिंगणे येथील सुभाष लाड यांच्या घराच्या भूमीपुजनाला फाफे गुरुजी उपस्थित होते.

९) लाड सरांशी जेव्हा जेव्हा बोलणे होते त्यावेळी कृतज्ञतापूर्वक फाफे गुरुजींचा उल्लेख त्यांच्या मुखातून येतो.
आज प्रत्यक्ष भेट घेता आल्याने आनंद प्राप्त झाला. फाफे गुरुजींच्या शेजारचे तळवडे हे माझे गाव असल्याने माझ्या घरातील सर्व जेष्टांना ते ओळखतात.  घरातून निघताना त्यांच्या चरणाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला.
व लाड सरांच्या कार्यक्रमाला नक्की यायचं आहे असं आग्रहाचं निमंत्रणहि दिलं.
त्यांच्या घरातून बाहेर पडलॊ तेव्ह रात्रीचे ९:३० झाले होते.
१०) लाड सर यांच्या सेवापूर्ती समारंभात माझी मायभूमी प्रतिष्ठान, मुंबई च्या वतीने सुभाष लाड यांना घडविणा-या श्री शिवराम फाफे गुरुजी यांचा अमृत महोत्सव उतसाहात साजरा करण्यात येणार आहे.ज्या समाजात एखादी व्यक्ती अमृतमहोत्सवी वर्ष पुर्ण करते याचा अर्थ तो समाजहि निरोगी आहे असाच होतो.व त्या निरोगी समाजाचा आपणहि एक घटक आहोत हि भावना वाढीस लागते.शरिरांने व विचारांनी निरोगी असणाऱ्या फाफे गुरूजींचा ह्रदयस्थ सत्कार यावेळी केला जाणार आहे.तरि आपण सर्वांनी श्री सूभाष लाड सर सेवापूर्ती कार्यक्रमासाठी नक्कीच यायचं आहे.

सृजनहो,

गुरू-शिष्याचं पवित्र नातं आपणहि जोपासलं पाहिजे.
आपल्याला घडविणा-या गुरुंविषयी कृतज्ञता भाव दाखविला पाहिजे.आपल्या व्यक्तीमत्वाला आकार देणा-या प्रत्येक मार्गदर्शकाचं स्मरण आयुष्यभर ठेवलं पाहिजे.त्यांनी दाखविलेल्या पगडंडीवरुन पुढे चालत विधायक कार्याचा महामार्ग निर्माण करायला हवा.
७६ वर्षाचे गुरु श्री शिवराम श्रीपाद फाफे गुरुजी व ५८ वर्षीय विद्यार्थी सुभाष लाड सर यांच्या गुरु-शिष्य संबंधातून हेच  अनुकरणीय ज्ञान आत्मसात करायला हवं।
      
   श्री विजय हटकर
   २९/०३/२०१९
   वेळ:-२३:४०
संस्कृती नावाच्या विद्यापीठाची आई अनभिषिक्त कुलगुरु:-
                      श्री गणपत शिर्के सर.
☘☘☘☘☘☘☘
"आई "पुस्तिकेचे  मान्यवरांच्या शुभहस्ते उत्साहात प्रकाशन.
@@@@@@@@@@@











शिक्षण नसतानाहि विचारांनी सुशिक्षित व आधुनिक असणा-या साध्या,सरळ,सात्विक ,प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या स्वर्गीय रुक्मिणीबाई महादेव लाड यांचा विचारांचा स्मृतीगंध "आई" पुस्तिकेच्या माध्यमातून समाजामध्ये दरवळत राहिल असे प्रतिपादन लांजा हायस्कुलचे मुख्याध्यापक गणपत शिर्के यांनी व्यक्त केले.

      वात्सल्यमूर्ती स्वर्गीय श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त स्वर्गीय रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या विचारांचा स्मृतीगंध जपण्यासाठी "आई" विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक २९ मार्च २०१९ रोजी उत्साहात झाले.यावेळि ते बोलत होते.यावेळि शिर्के सर म्हणाले सर्व प्राणीमात्रांमधील आईच्या ठिकाणी असणा-या जन्मजात गुण,व्यवहारज्ञान,दूरदृष्टी,समयसूचकता,निर्णयक्षमता इत्यादी गोष्टिंचा विचार केला तर ,आई ही केवळ हाडामांसाची व्यक्ती नसून संस्कृती नावाच्या विद्यापीठाची अनभिषिक्त कुलगुरु असते,असं म्हटलं तर वावगं होणार नाहि.स्वर्गीय आक्कांनी आपल्या मुलांना संघर्ष करुन उच्च शिक्षण देताना सुसंस्कारित केलेच त्याबरोबर सामाजिक भानहि दिले,यामुळेच आक्का इतरांपेक्षा वेगळ्या ठरल्या असे शिर्के सर म्हणाले. यावेळि व्यासपीठावर ओणी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री महादेव पाटील सर,उमेश केसरकर,सुभाष लाड,विजय हटकर,विजय लाड,रामदास पांचाळ,दीपक नागवेकर,इम्तियाज सिद्दिकि ,विजय तोडकरि आदि मान्यवर उपस्थित होते.
      रिंगणे ता.लांजा येथील सुप्रसिद्ध कवी श्री सुभाष लाड यांच्या मातोश्री श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांचे गेल्या वर्षी १० मार्च २०१८ रोजी निधन झाल्यानंतर आपल्या आईचा संस्काररुपी स्मृतीगंध जपण्यासाठी लाड कुटुंबियांनी लांजा तालुक्यातील पाच शाळांना एलईडि प्रोजेक्टर संच भेट दिले होते.याही वर्षी श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या  प्रथम स्मृतीदिनाचे ऒचित्य साधून "आई" या श्री विजय हटकर व श्री सुभाष लाड यांनी संपादित केलेल्या  पुस्तिकेचे प्रकाशन व जिल्हास्तरिय काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांच्या सत्कार व पारितोषिक प्राप्त कविंच्या कवितांच्या माध्यमातुन स्वर्गीय आक्कांना काव्यांजली अर्पण करण्यात आलई.."आई " या पुस्तिकेची  ग्रंथमित्र प्रकाशन मुंबई  व माझी मायभूमी प्रतिष्ठान ,मुंबई च्या वतीने निर्मिती करण्यात आली आहे.
       
      यावेळि सिमरन शेख ,निवेदिका माईल,रोशनी तोडकरि,शिल्पा लांजेकर,अभिज्ञा कदम,भाग्यश्री संसारे,दीपक नागवेकर,रामदास पांचाळ,उमेश केसरकर ,दिलिप चव्हाण ,इम्तियाज सिद्दिकि,स्नेहा डोंगरे आदि कविंनी आईविषयक कवितांचे वाचन करुन स्वर्गीय आक्कांना काव्यांजली अर्पण केली. जिल्हास्तरिय काव्यलेखन स्पर्धेचे परिक्षक उमेश केसरकर यांनी काव्य लेखनातील बारकावे सांगत आपल्या आईच्या विचारांचा वारसा जपणा-या लाड कुटुंबियांचे भरभरुन कॊतुक केले. ओणी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री महादेव पाटील यांनी गावखेड्यात राहुन जातीपलीकडचं मानव्य जोपासणा-या आक्कानी मानवतावादाचे संस्कार आपल्या मुलांवर केले.त्यांचे संस्काराचे फलित   सुभाष लाड सरांच्या माध्यमातुन आपल्या समोर आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सुभाष लाड यांनी आक्कांचे चरित्र पुस्तकाच्या रुपाने जगासमोर मांडणा-या पुस्तकाचे लेखक विजय हटकर यांचे आभार मानले.व आक्कांची जीवनगाथा उपस्थितांसमोर मांडली.

आपल्या पूर्वजांच्या स्मृती जोपासण्यासाठी फक्त वर्षश्राद्ध किंवा म्हाळवसात जेवणाच्या भोजनावळी घालतानाच त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत विधायक, समाजपयोगी कार्य केले पाहिजे असा संदेश लाड कुटुंबीय या माध्यमातून देत असल्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे मान्यवरांकडून कॊतुक होत आहे. यावेळी
वात्सल्यमूर्ती स्व.श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रम व त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन आणि पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल  लाड कुटंबीयांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले .कार्यक्रमाचे निवेदन श्री विजय हटकर यांनी केले.

Sunday, February 17, 2019

आता प्रतीक्षा प्रतिहल्ल्याची...
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


     तीन दिवसापूर्वी गुरूवारी दि.१४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:०० च्या दरम्यान जम्मू -काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात तब्बल ३०० किलो  स्फोटकांनी भरलेल्या युएसव्हि (चारचाकि) वाहनाद्वारे जैश -ए-महम्मदचा अतिरेकी आदिल दार याने सुट्टी संपवून काश्मीर खो-यात सेवेत रूजू होणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या वाहन  ताफ्यातील एका बसला धडक दिली व प्रचंड स्फोट झाला. भारतीय जवानांच्या (केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या)वाहन ताफ्यावर चढविलेल्या या भ्याड आत्मघातकी स्वरूपाच्या हल्ल्यात ४० जवान शहिद झाले असून या हल्ल्याच्या जखमा इतक्या खोल व गहि-या अाहेत की,त्या पुढची अनेक वर्षे भरुन निघणार निघणे शक्यच नाहि.भारतद्वेषाच्या भावनेतून सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालणा-या पाकिस्तानला धडा शिकविण्याची हिच योग्य वेळ असून पाकिस्तानचा योग्य तो बदला भारताने घेतला पाहिजे ही संतापाची, क्रोधाची भावना सर्व भारतीय नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.याच वेळी देशासाठी सर्वोच्च कोटीचा त्याग करून हॊतात्म्य पत्करणा-या ४० वीरजवानांच्या दु:खात सर्व राष्ट्रभक्त भारतीय सहभागी झाले असून दु:खाच्या संकटाच्या वेळी भारतीय नागरिकांनी घडविलेल्या अखंडतेचे, एकात्मतेचे दर्शनही अद्भुतच आहे,असेच म्हणावे लागेल.या एकतेतून अशा भ्याड हल्ल्याला  भारतीय कधीच घाबरणार नाहीत उलट ते भारतीय म्हणून आणखी घट्ट बंधनात बांधले जाऊन हातात हात घालून देशाच्या सार्वभौमत्वावर येणारे प्रत्येक संकट उडवून लावतात हा संदेश विरोधकांत पोहचल्याने त्यांची आणखीनच आग झाली असेल.

       दहशतवादी व त्यांना थारा देणाऱ्या पाकविरोधी प्रबळ संतापाची,बदल्याची भारतीयांची भावना लक्षात घेऊन देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या प्रत्येक शहिद जवानाच्या रक्ताच्या थेंबा -थेंबाचा हिशोब चुकता करु व यासाठी भारतीय लष्काराला सर्वाधिकार दिले असून पाकिस्तानला धडा शिकविल्याशिवाय शांत राहणार नसल्याचे सूचक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी केल्याने देशातील नागरिकांना आता प्रतीक्षा लागली आहे ती पाकिस्तानवर केल्या जाणाऱ्या प्रतिहल्ल्याची...जोपर्यंत भारत सरकार पाकिस्तानवर योग्य तो प्रतिहल्ला चढवीत नाहि तोपर्यंत नागरिकांच्या मनात खदखदत असलेला संताप, द्वेष व राष्ट्रीयत्वाची भावना जिवंत ठेऊन सरकारला राष्ट्रभान दाखविण्याची मोठी जबाबदारी आज प्रत्येकाची आहे हेही समजून घ्यायला हवे.
         एकविसाव्या शतकातील सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला ठरलेल्या पुलवामा हल्ल्यात ४० भारतीय जवान शहिद झाल्याची बातमी ऎकल्यापासून सारा देश हळहळला आहे.सर्व जगाला पोखरणाऱ्या दहशतवादाच्या सर्वाधिक झळा भारताला पोहचत आहेत.आणि म्हणुनच दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्व शक्तिंनी एकत्रित येऊन भारतासह काम करण्याची गरज आहे.तसेच पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र व जैश- ए- मोहम्मदचा  म्होरक्या मॊलाना मसुदा अझरला आंतरराष्ट्रिय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठी भारताने देखिल मुत्सद्देगिरिचा वापर करुन आंतरराष्ट्रिय राजकरणात एकटे पाडले पाहिजे.या दृष्टीने भारत सरकारने योग्य ती राजनैतिक पाऊले वेळेतच  उचलली आहेत.आंतरराष्ट्रिय व्यापारात पाकला दिलेला सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र अर्थात  ' मोस्ट फेवर्ड ' हा दर्जा काढून घेतला आहे.तसेच पाकिस्तान कडून केल्या जाणाऱ्या आयातीवर २०० टक्के सीमाशुल्क लावून आधीच डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का दिला आहे.पण यावरच थांबून चालणार नाहि .कारण पठाणकोट व उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनेहि तो सुधारल्याचे  दिसून आलेले नाहि.कारण कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. पाकिस्तानचेहि तसेच आहे.तेव्हा दहशतवादी संघटनांना पोसणा-या पाकड्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची हिच योग्य वेळ आहे.कारण चीन सोडून जगातील सर्वच सामर्थ्यवान राष्ट्रांनी भारताच्या बाजूने उभे राहण्याची तयारी दाखविली आहे.

           काश्मीर खो-यात उरिनंतरचा आजपर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला ठरला असून CRPF च्या ४० जवानांना आलेल्या वीरमरणाने सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या कमतरता व हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला असून अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभे ठाकले आहेत.
१) जम्मू - काश्मीर महामार्ग ही काश्मीर खो-याला उर्वरित भारताशी जोडणाऱि एकमेव जीवनरेखा आहे.त्यावर लष्करी आणि मुलकी वाहनांची अखंड वाहतूक चालू असते.लष्करी गाड्यांचा ताफा जाण्याआधी व दरम्यान घेण्याच्या खबरदारिबाबत एक परिपूर्ण कार्यपद्धती घालून देण्यात आली आहे.त्याचे दक्षतापूर्वक पालन का झाले नाहि हा न उलगडलेला सवाल आहे.जर त्याचे काटेकोर पालन झाले असते तर कदाचित हा धोका टाळता आला असता.
 २) २५०० च्या वर सैनिकांना घेऊन जाणाऱ्या ७८ गाड्यांच्या ताफ्यातील एका वाहनावर एवढी अभेद्य सुरक्षा व्यवस्था असताना आत्मघातकी हल्ला होतोच कसा?
३) ३०० किलो स्फोटकांनी भरलेली कार सुरक्षा रक्षकांच्या दृष्टिस कशी काय पडली नाहि ?
४) भारतमातेसाठि बलिदान देणाऱ्या वीरपूत्रांची हि बलिदानाची श्रृंखला थांबणार तरि कधी?
५) राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर भारत इस्त्रायल,अमेरिका, व शक्तशाली LTTE चा खात्मा करणाऱ्या छोट्याश्या श्रीलंकेप्रमाणे विनाकारण डिवचणा-या या विषारी सापाला (पाकला) कायमचं कधी ठेचणार?
६)प्रखर राष्ट्रवाद व देशहिताला आपण कधी प्राधान्य देणार? ७)लोकशाही देश आहे म्हणून हवे तसे  देशविरोधीमुक्ताफळं उधळणा-या अंतर्गत राष्ट्रदोह्यांचा बंदोबस्त कधी करणार?
का त्यांना मानवतावादाच्या नावाखाली मोकळेच सोडणार?
८)लष्कराप्रमाणे सशस्त्र पोलीस दलांची स्वतंत्र  हेरगिरीची यंत्रणा आपण उभारणार का?
९)लष्करी वाहतुकीसाठी ,आपण आधूनिक पर्यायांचा वापर करणार तरि कधी?
१०) काश्मीर खो-यातील कोवळ्या तरूणांना आपले आयुष्य मरणाच्या दारात फेकावे असे का वाटते?
११) या तरुणांच्या मनातील असंतोष बाजूला करुन त्यांचे मनपरिवर्तन करुन त्यांच्या हाताला काम उपलब्ध करुन त्यांना प्रगतीच्या वाटेवर कधी आणणार?
     असे एक ना अनेक प्रश्न मनी थैमान घालताहेत.काश्मीरला दिलेल्या विशेष राज्याच्या दर्ज्यामुळेच आज काश्मीरातील अनेकांच्या मनात भारतीयत्वाची भावना नाहिए,हे वास्तव आपण स्विकारून हा दर्जा रद्द करण्यासारखे धाडसी पाऊल उचलण्याची आवश्यकता आज निर्माण झाली आहे.गेली कित्येक वर्षे काश्मीर खो-यात कारवाया करण्यासाठी  पाकिस्तानकडून पर्याय म्हणून जैश-ए-मोहम्मद सारख्या अतिरेकी संघटनांचा वापर करण्यात येतो.या दहशतवाद्यांना पाकिस्तान आश्रय देतो हे आता जगासमोर सिद्ध झाले आहे.काश्मीरमध्ये फुटिरतावाद्यांनाहि भारतविरोधी गरळ ओकण्यासाठी परकिय आर्थिक रसद मिळते.याच्या जोरावर भारतात राहून इथले मीठ खाऊन याच भूमीचे ईमान विकणाऱ्या या पाकप्रणीत फुटिरतावादि दलालांचाहि बंदोबस्त करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे.या देशात राहून देशविरोधी कृत्य करणारे वा त्यात सामील होणारे, देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यांवर जोपर्यंत योग्य ती कारवाई होऊन या राष्ट्रदोह्यांचा खात्मा जोपर्यंत होत  नाहि तोपर्यंत असे भ्याड हल्ले होतच राहणार आहेत.आणि म्हणूनच आता वेळ आली आहे ती प्रतिहल्ल्याची..
     हा प्रतिहल्ला भारतविरोध करणाऱ्या  अंतर्गत व बाह्य दोन्ही शत्रुंवर योग्य वेळ येताच मुत्सद्दीगिरिने ,सावधानतेने चढविला तरच कुठेतरी या दहशतवादाला आळा बसेल.यासाठी योग्य ते नियोजनात्मक. धडक कारवाई करुन पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या तरच पुलवामातील ४० शहिद जवानांसह आजपर्यंत शहिद झालेल्या सर्वच वीरपुत्रांना ख-या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
मुंबई व ठाणे उपनगरातील प्रसिद्ध वर्तमानपत्र दै.महासागर ने मी लिहिलेला " आता प्रतीक्षा प्रतीहल्ल्याची " 

या  लेखाला शुक्रवार दिनांक २२ फेब्रुवारिच्या अंकात संपादकीय पानावर प्रसिद्ध केले.


    धन्यवाद 
दै.महासागर.
🙏🏻🙏🏻🙏🏻
💐💐💐💐💐💐💐

     श्री विजय हटकर
      लांजा.

Wednesday, February 13, 2019

"राष्ट्रसेवा " गुणाने एकरूप झालेला समाजच समृद्ध भारत निर्माण करेल.
                 :-विजय हटकर.
         
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳अार.एस.एस.शाखा लांजाच्या दिवाळि वर्गात "कुलूपबंद राष्ट्रभक्ति "या विषयावर विजय हटकर यांचे व्याख्यान संपन्न.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳




लांजा:-
        राष्ट्रभक्ती आॅप्शनला टाकता येत नाही ती आपल्या श्वासासहीत हिमोग्लोबिन सारखी भिनायला हवी.ती नेहमी आपल्या वागण्या ,बोलण्यात व आचरणात दिसली पाहिजे असे मत "कुलूपबंद राष्ट्रभक्ती" या विषयावर व्याख्यान देताना विजय हटकर यांनी व्यक्त केले.
        लांजा तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने 'कोकणगाभा कृषी पर्यटन केंद्र -गवाणे,ता.लांजा येथे दिवाळी संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय शिबीराच्या दुस-या दिवशी दुपार सत्रात विजय हटकर बोलत होते. यावेळी स्वयंसेवकाना मार्गदर्शन करताना हटकर म्हणाले की, गुणांची एकरूपता म्हणजे च राष्ट्रभक्ती असून सर्व समाज राष्ट्राची सेवा करणे या गुणाने एकरूप झाला तरच देश समृद्ध बनेल.आजच्या समाजात स्वार्थभाव हा वाढत असुन देशप्रेम लोप पावत चालले आहे आणि म्हणूनच आजच्या  विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील  राष्ट्रभक्ती नेहमी प्रज्वलित ठेवले पाहिजे.घरातील महिलामंडळी ज्याप्रमाणे एखाद्या कार्यक्रमावेळी घरच्या अलमारित कुलूपबंद केलेले सोन्याचे मूल्यवान दागिने बाहेर काढतात व कार्यक्रम संपन्न झाल्यावर पुन्हा कपाटात कुलूपबंद करतात.राष्ट्रभक्तीच्या बाबतीतही तसच काहीतरी आपलं झालय. शाळेत राष्ट्रगीत म्हणताना,१५ आॅगस्ट ,२६ जानेवारिला झेंडावंदन करताना,भारत -पाकिस्तानच्या मॅचवेळि, सर्जिकल स्ट्राईक वा युद्धाप्रसंगी आपल्या ह्रदयात बंद केलेली राष्ट्रभक्ती बाहेर पडते.व काहि वेळेनंतर ती शांत होते.परंतु सद्यस्थितीत चीन, पाकिस्तानसारखे शत्रू आपल्याविरोधात सतत गरळ ओकताना,कटकारस्थान रचत असताना आपली राष्ट्रभक्ती सतत तेवत ठेऊन समृध्द भारताच्या निर्मिती साठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे मत विजय हटकर यांनी व्यक्त केले.
        लांजा तालुक्यातील कोकणगाभा कृषी पर्यटन केंद्र गवाणे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा लांज्याचा दिवाळी संस्कार निवासी वर्ग दि. १६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०१८ उत्साहात सुरू आहे.या वर्गात सुमारे २१ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे.या वर्गांतर्गत स्वयंसेवकांचा बॊद्धिक,शारिरिक ,नैतिक, सांस्कृतिक, विकास साधण्यावर भर दिला जात असून या वर्गाचे व्यवस्थापन तालुका कार्यवाह सूर्यकांत सरदेसाई पाहत आहेत. या वर्गामध्ये दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सुप्रसिद्ध विधीज्ञ अभिजित अभ्यंकर यांचे वाचन प्रेरणा , सुप्रसिद्ध रंगकर्मी श्रीकांत ढालकर यांचे कला व पक्षीनिरीक्षण ,दिनांक १७ नोव्हेंबर रोजी श्रीधर पाटील यांचे सैनिकी शिक्षण याविषयी व्याख्यान संपन्न झाले. व्याख्यानाला विधीज्ञ राजेश गुरव, सुरेंद्र लाड, गॊरव शेट्ये,स्वयंसेवक वेद दामले ,प्रमूख शिक्षक निखिल आपटे, अथर्व हर्डीकर व रा.स्व.संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पै.एम. के.रखांगी स्मृतीगंध वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
☘☘☘☘☘☘☘
पै.एम. के.रखांगींचे कार्य आदर्शवत - मुख्या. गणपत शिर्के.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
माजी विद्यार्थी संघटनेचे कार्य कॊतुकास्पद.-प्राचार्य डाॅ.अरविंद कुलकर्णी.







लांजा:-
       पै.मेहमुद कादिर उर्फ एम.के.रखांगी यांच्या विचारांचा स्मृतीगंध पुढील पिढीत दरवळण्यासाठी माजी विद्यार्थी संघटना आयोजित "स्मृतीगंध वक्तृत्व स्पर्धा "मोलाची भूमिका बजावेल असे मत कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय ,लांजाचे प्राचार्य डाॅ.अरविंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
       न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजाचे माजी सचिव पै. एम.के.रखांगी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त माजी विद्यार्थी संघटना, लांजा ने स्मृतीगंध वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन लांजा हायस्कूलच्या विद्यार्थी सभागृहात  केले होते. याच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष जयवंत शेट्ये,श्रीराम वंजारे, विजय खवळे ,संजय तेंडुलकर, पत्रकार दिलीप मुजावर, पत्रकार सिराज नेवरेकर,मुख्या.गणपत शिर्के, विजय बेर्डे, उद्योजक अभिमन्यू पायरे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष परुषोत्तम साळवी, पत्रकार जगदीश कदम,राजेश शेट्ये, उपमुख्याध्यापक रमाकांत सावंत, संजय बुटाला,तसेच माजी विद्यार्थी  अभिजित राजेशिर्के, विनय बुटाला, विनोद बेनकर, प्रदीप नागराळे, निलेश चव्हाण,किर्ती कांबळे,आनंद भागवत, रामचंद्र भातडे, विवेक पंडित, अमोल मेस्त्री आदि उपस्थित होते.
         पै.एम.के.रखांगी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.संस्थेचे माजी सचिव व लांजा तालुका पत्रकार संघाची मुहूर्तमेढ रोवणारे पै.एम.के
रखांगी यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेत आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटाविला.व  योग्य समयी निवृत्त होऊन न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाच्या विकासासाठी पुढाकार घेतला.व कार्यवाही म्हणून आदर्शव्रत कार्य केल्याचे गॊरवोद्गार यासमयी मुख्या. गणपत शिर्के यांनी काढले. तर कोकण मर्कंटाईल बँकेचे संचालक दिलीप मुजावर यांनी एम.के.रखांगी तालुक्यातील अभ्यासू पत्रकार होते.त्यांनी पत्रकारितेच्या अवघड काळात रत्नागिरी टाईम्स व दै.सागर मधून उल्लेखनीय काम केल्याचे मत व्यक्त केले.
तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज नेवरेकर यांनी एम.कें .च्यापवित्र स्मृतीस अभिवादन करित माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
     माजी विद्यार्थी संघटनेतर्फे पै.एम.के.रखांगी स्मृतीगंध वक्तृत्व स्पर्धेचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर आयोजन करण्यात आले होते.यासाठी  उद्याचा भारत,माझ्या स्वप्नातील भारत, आजचा युवक,तरुणाई ,आदि विषय देण्यात आले होते.या स्पर्धेत जवळपास ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी       मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, देऊन गॊरविण्यात आले.
 स्पर्धेचा निकाल--
प्राथमिक गट.
सानिया मासाळ- प्रथम
ओम दळवी - द्वितीय
सेजल वाघाटे- द्तृतीय
अपूर्वा देसाई- उत्तेजनार्थ
श्रावणी यादव- उत्तेजनार्थ

माध्यमिक स्तर--
,श्रेया पाटील-प्रथम
अभिलाषा गावडे- द्वितीय
प्रज्ञा पालकर- तृतीय
अंकिता जाधव- उत्तेजनार्थ
सिद्धी चव्हाण-उत्तेजनार्थ

उच्च माध्यमिक स्तर

जुहिका शेट्ये- प्रथम
आर्यन कासारे - द्वितीय
आश्विनी जोईल- तृतीउ
साक्षी चव्हाण-उत्तेजनार्थ
आशिष मांडवकर -उत्तेजनार्थ.
      या कार्यक्रमाचे निवेदन विजय हटकर यांनी तर आभार प्रदीप नागराळे यांनी मानले.
सुप्रसिद्ध नाटककार दशरथ राणे यांनी लोकमान्य वाचनालय लांज्याला दिला आपल्या प्रसिद्ध नाटकांचा संच भेट.
@@@@@@@@@@
पन्नास हजार ग्रंथसंपदा पूर्ती उपक्रमात घेतला सहभाग.
 
अरविंद रुणकर यांनी स्वलिखित पुस्तकांचा संच दिला भेट.

लांजा :-
        येथील लोकमान्य वाचनालय, लांजे या संस्थेने सन २०१८ अखेर पन्नास हजार ग्रंथसंपदा पूर्ती  संकल्प जाहिर केला अाहे. या संकल्पात सहभाग घेऊन अनेक मान्यवर लोकमान्य वाचनालय ,लांजा या संस्थेला पुस्तके भेट देत असतानाच आज दिनांक १९ आॅक्टो.२०१८ रोजी लांजा - बोरथडे गावचे सुपुत्र व जेष्ट नाटककार श्री दशरथ राणे व लांजा -रुण गावचे सुपुत्र श्री अरविंद रुणकर यांनी आपल्या स्वलिखित नाटक व एकांकीकांच्या ३५ पुस्तकांचा संच लोकमान्य वाचनालय लांजाचे संचालक विजय हटकर ,ग्रंथपाल सी.स्मिता उपशेट्ये, सहा.ग्रंथपाल रामचंद्र लांजेकर यांना भेट दिला.
          श्री दशरथ राणे यांच्यावतीने  नाटककार, दिग्दर्शक श्री अरविंद रुणकर यांनी पुस्तकांचा संच भेट देत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक विजय हटकर यांनी त्यांचे आभार मानले.
            सुप्रसिद्ध नाटककार श्री दशरथ राणे यांना अखिल मराठी नाट्यपरिषदेने १९९९ साली नाटककार मा.आ.कामत स्मृती पुरस्कार आणि सन २०१७ साली मराठी नाटककार. संघ पुरस्कृत. प्र.म.तथा बापूसाहेब टिळक स्मृती  पुरस्कार देऊन गॊरविले  आहे.तसेच अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरिल  संस्थांनी पुरस्कार देऊन गॊरविले आहे.नाट्यलेखनाची अनेक पारितोषिके मिळविलेले नाटककार. श्री दशरथ राणे यांची यंदा कर्तव्य आहे,जावई चालून आला,लग्न शांतूच्या मव्हणीचं,देवाघरचा न्याय, सॊभाग्यलक्ष्मी, अग्निपरिक्षा, कहाणी रक्ताच्या  नात्याची, गुन्हेगार, गाव इनामी, अन्यायाचा कर्दनकाळ, वणवा सुडाग्नीचा,लॊकिक घराण्याचा,शिवशाहिचा विजयी  डंका, जपून टाक पाऊल जरा,इथे थांबली जीवनगंगा, पतिव्रता, सॊभाग्यदाता, देवमाणसं, दोस्ती वै-याची, सत्य उभे अंधारि, बायको असून देखणी, मधुचंद्राने  केला  घोटाळा,आदि नाटकांना नाट्यरसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.ग्रामीण रंगभूमी समृद्ध करणा-या श्री दशरथ राणे यांना लोकमान्य वाचनालयाच्या वतीने मनपूर्वक. धन्यवाद।
        यासाठी सहकार्य करणारे आमचे मार्गदर्शक श्री अमोल रेडिज यांचेही मनपूर्वक आभार।श्री अरविंद  रुणकर यांचेही आभार।
 "दीपपूजन व विधीचा वाढदिवस
💐💐💐💐💐💐💐💐
   







   'भा' म्हणजे तेज.'रत' म्हणजे मग्न.भारतीय म्हणजे तेजाच्या उपासनेत,म्हणजे साधना करण्यात जे मग्न आहेत ते.  उपासनेला भारतीय संस्कृतीत फार महत्वाचे स्थान दिले आहे.या तेजोमयी संस्कृतीचे प्रतीक म्हणजे 'दीप.' आजचा दिवस या दृष्टिने भारतीय संस्कृतीत खुप महत्वाचा अाहे,कारण आज आहे दीप अमावस्या.आषाढ महिन्यातील अमावास्येलाच 'दिव्यांची अमावस्या' म्हटले जाते. रात्रीच्या अंधाराला चीरवून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप भारतीयांच्या घरा-घरात मांगल्याचे प्रतीक म्हणून पूजला जातो.या दिवशी घरात जे दिवे वर्षभर प्रकाश देत रहातात त्यांची मोठ्या भक्तिभावाने व समारंभाने पूजा केली जाते.सोबत घरातील लहान मुलांचीही प्रेमपूर्वक ओवाळणी करून " आयुष्यमान हो" हा आशीर्वाद देण्याचा हा शुभदिवस.
             आमच्या दृष्टीने दीप अमावस्येचा हा दिवस खुप आनंदाचा दिवस.कारण तीन वर्षापूर्वी दिनांक १४ आॅगस्ट २०१५ रोजी दीप अमावस्येलाच दुपारी ४:०० वाजता आम्हा उभयतांना कन्यारत्नाचा लाभ झाला .गेली बारा वर्षे दिवाळीत आश्विनी अमावस्येला आम्ही फ्रेन्डस् ग्रुपच्या माध्यमातून गेली बारा वर्षे सातत्यपूर्वक लक्ष्मीपूजन अर्थात दीपलक्ष्मीच्या पुजनाच्या मुहूर्तावर लांजा शहरात कोकणातील सर्वात मोठा दीपोत्सव अकरा हजार पणत्या प्रकाशित करुन साजरा करीत आहोत. व याचेच फळ की काय म्हणून विधात्याच्या आशीर्वादाने दीपामावस्येच्या शुभदिनीच आमच्या घरि कु."विधीच्या" रूपाने दिपिकेचाच जन्म  झाला. म्हणुनच गेली तीन वर्षे दीपामावस्येला आम्ही जाणीवपूर्वक दीपलक्ष्मीचे पूजन करित आहे.आज कुमारी विधीचाहि तिथीप्रमाणे जन्मदिवस.तिचेही आम्हि सर्वांनी प्रेमाने ऒक्षण केले. व तिला खुप खुप मोठी हो हा आशीर्वाद सर्वांनी दिला.छोट्या विधीनेही आमच्या सोबत
        " भोदीपं ब्रम्हरुपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय: ।।
          "त्राही मां निर्यात घोरात् दीपज्योती नमोस्तुते।।
--हा श्लोक म्हणत दिपपूजन केले.

     वैदिक काळात ऋषीमहर्षींच्या आश्रमातील यज्ञवेदी व अग्निकुंडे हि धार्मिकांची यात्रास्थाने झालेली होती. यज्ञवेदी हा तत्कालीन समाजाचा मानबिंदू होता. ते त्यांचे श्रद्धास्थान होते.यज्ञवेदीतील अग्निदेवतेला साक्षी ठेवून ऋषी-महर्षींच्या आध्यात्मिक चर्चा- परिसंवाद घडत. वेद,ब्राम्हण्ये,उपनिषदे आणि संहिता जन्मास आल्या त्या अशा.भारताच्या महान सांस्कृतिक परंपरेचा उगम अशा रितीने यज्ञवेदीतील अग्निशलाकेतून झाला.कालांतराने या पवित्र आणि मंगल शलाकेने दीपाचे रूप धारण केले.
 अग्निज्योतिर्रविज्योंतिश्चन्द्र: ज्योतिस्तथैवच।
उत्तमस्सर्व ज्योतिबांनी दीपोsयम्।।
                                    स्कंदपुराण.
या दीपयुगाला सुरवात झाली ती अशी.- " सुर्याशसंभवो दीप:
दीपयुगाच्या सुरवातीपासूनच आजतागायत दीपाला जीवनातील मांगल्याचे, भक्तिचे ,अर्चनाचे आणि आशीर्वादाचे शुभलक्षण मानले गेले आहे.
           दीपपूजनाच्या या पवित्र दिवशी, कु.विधीच्या जन्मदिनी दरवर्षी एक नवा दीप आमच्या संग्रही करण्याचा आम्हि संकल्प केला आहे .गतवर्षी आम्ही वैशिट्यपूर्ण ॐकारदीप खरेदि केला तर यंदा भोवताली डायमंड असलेला बैठा आकर्षक दीप आमच्या दीपसंग्रहात सामील झाला. यंदा या सर्व दीपांची पूजा करताना हा डायमंड ने वेढलेला बैठा दीप प्रकाशित झाल्यावर आणखी आकर्षक दिसू लागला. तो सर्वांचे लक्ष वेधुन घेत होता.
      पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणा-या आपल्या समाजाने इतर सणांप्रमाणेच या उत्सवाचेही विकृतीकरण करित त्याला 'गटारी अमावस्या 'हे नाव बहाल केले.हे खेदजनक आहे. एकूणच तमसोsमा ज्योतीर्गमय ची आर्त याचना करणाऱ्या  मानवाला नेणिवेतून जाणीवेकडे ,अंधारतून प्रकाशाकडे व नश्वरतेतून अमृतत्वाकडे नेणाऱ्या दीपलक्ष्मीकडे एकच प्रार्थना,आमच्या लाडकि परि कु.विधीला सुखात, आनंदात ,ऎश्वर्यात ठेव।
-----------------------------------------
               विजय हटकर.
                  लांजा, रत्नागिरी.

साप्ताहिक कोकण मिडिया तील लेख..सन २८ जुलै २०२२
https://kokanmedia.in/2022/07/28/deepamavasyapoojan/



दीपपूजन २०२३ क्षणचित्रे 





अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...