भाषा बोलू तरच जिवंत राहिल.
आज २२ फेब्रुवारी.देशाची राजधानी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज नगरीत साजरे होत असलेल्या ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस.कोकण प्रांतातील ग्रामीण साहित्य चळवळीला दिशा देणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष व माझे मार्गदर्शक,गुरुवर्य सुभाष लाड सर यांसह उपस्थित राहिलो.अभिजात मराठी भाषेच्या या ऐतिहासिक महोत्सवाचा तीनही दिवस आनंद आम्ही घेणार आहोत.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
माय मराठीच्या प्रांती आम्ही जन्म घेतला हे आमचे सौभाग्यच जणू! मातृभाषा राजभाषा याच खरे म्हणजे राष्ट्राचे मानदंड असतात.भाषा,साहित्य,कला,संस्कृती यांच्याबद्दल ज्यांना रास्त अभिमान वाटतो त्यांच्यातच राष्ट्राविषयी अभिमान निर्माण होत असतो. लोकभाषा हाच लोकशाहीचा कणा असतो. खरंतर आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा उशिराच मिळाला कारण दिल्लीकडे डोळे वटारले की हव्या त्या सवलती मिळतात हे तामिळनाडूला कळले ते आपल्याला अजूनही कळलेले नाही. दक्षिण भारतीय स्वतःचे, प्रांताचे प्राणतत्व जपून आहेत. पाच सहा दशका पूर्वीपासूनच ते विश्वतमिळ साहित्य संमेलने भरवतात. उत्तर भारतीयही विश्वहिंदी साहित्य संमेलन आयोजित करतात. आपण मात्रमाय मराठीला राष्ट्रभाषा तर दूरच राजभाषा म्हणून मिरवण्यात देखील खूप मागे पडलो.
इंग्रजांनी आपली भाषा सतत वापरली, ती जगभर वापरली.ते जेथे गेले तेथे तिचा वापर त्यांनी केला.म्हणून ती समृद्ध झाली, वाढली.जागतिक भाषा झाली.. भाषा समृद्धीचे इंग्रजांचे हे गमक देशाची राजधानी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतील साहित्य संमेलनात मराठी भाषिकांना कळावे हेच मराठी मुलखाबाहेर होणाऱ्या या संमेलनाचे मुख्य ध्येय असावे.अशी मराठी रसिक म्हणून माझी माफक अपेक्षा आहे. दिल्ली येतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याच विचाराने आम्ही सहभागी झालो आहोत.
मातृभाषेचा पुरस्कार हे ब्रीद प्रत्येक मराठी भाषिकाच्या धमन्या मधुन वहायला हवं.आपल्या राज्यात आपल्याच भाषेचे वर्चस्व असले तरच इतर आपल्यापुढे नमुन वागतील. मराठी युवा पिढीने इंग्रजी भाषेचा उत्तम अभ्यास करावा.पण इंग्रजी माध्यमांचा आग्रह धरू नये. हे धोरण संमेलनात आखण्याची गरज आहे. कारण आज आपल्याच राज्यात इंग्रजीच्या पुरस्कारामुळे आपल्याला नमून वागण्याची वेळ आली आहे.महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयां ना मराठी भाषा सक्तिची करावी. त्यांच्या राज्यात त्यांच्या भाषेत बोलण्याचा त्यांचा आग्रह असतोच ना? आज जेव्हा भारतीय युरोप अमेरिकेत जातात तेव्हा इंग्रजी भाषेतून व्यवहार करीत नाहीत का? तसेच मराठी भाषा येत नसेल तर परप्रांती यांना या राज्यात कोणत्यही सवलती देऊ नयेत. सत्ता व खुर्च्या संभाळप्यात गर्क असणाऱ्या नेतृत्वकर्त्यांनी मायमराठीच्या रक्षणा साठी निदान आता तरी जागे होऊन धोरणं आखावीत.या संमेलनातून विचारवंतांनी मराठी भाषेविषयी निश्चित धोरण नव्या पिठसमोर मांडायला हवं.लोकशाहीत लोककल्याणाच्या गाड्याला लोकभाषेच्या वंगणाखेरीज तशी कधीच गती देता येणार नाही.राजकारभारात मराठी भाषेला जुजबी महत्व देणे थांबवायला हवे.मराठी भाषिकांनी यापुढे दक्षिण भारतीयांप्रमाणे व्दिभाषा सूत्र स्वीकारून मराठीसह इंग्रजी असा भाषिक क्रम स्वीकारावा.
दिल्ली येथील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष व लोक साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका तारा भवाळकर यांनी संमेलनध्यक्षीय भाषणात भाषा बोललो तरच जिवंत राहील हे मत व्यक्त केले. मात्र ही जबाबदारी मराठी भाषा बोलणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांची आहे,त्यासोबत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध शासकीय निमशासकीय साहित्य संस्थांनी या संदर्भात अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने सजगतेने पाऊले उचलावीत,हीच माफक अपेक्षा आहे.सद्यस्थितीत महाराष्ट्र व राज्याबाहेर व परदेशातही अनेक मराठी संस्था आपापल्या परीने मराठी साहित्य संमेलनाचा आयोजन करीत असतात या संदर्भात अखिल भारतीय मराठी महामंडळाने याविषयीची माहिती संकलित करून या संस्थांच्या प्रतिनिधीनांही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलवायला हवे, कारण खऱ्या अर्थाने तळागाळात मराठी भाषा संवर्धनाचे काम या संस्था करीत असतात.
सरहद संस्थेचे युवा शिलेदार लेशपाल सह
मात्र सध्या इंग्रजाळलेल्या काळात राज्यात मराठीला पोषक वातावरण आहे असे म्हणण्यास वाव आहे. सरकारने मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून नुकतेच पुणे येथे विश्व मराठी साहित्य संमेलन साजरे केले आणि आज जागतिक राजभाषा दिनी दिल्लीतील तालकठोरा मैदानात ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे होते आहे, त्याचा निश्चितच आनंद वाटतो आहे. अपेक्षा इतकीच आहे की ही संमेलने फक्त दिखावू सोहळे न होता अभिजात मराठी भाषेच्या प्रसाराचे, चळवळीचे मुख्य केंद्र बनावे व राज्यात सद्यस्थितीत मराठी भाषेची होणारी गळचेपी थांबविण्याचा विचार तेथे व्हावा, बंद पडणाऱ्या मराठी शाळांना पुन्हा एकदा सुरु करण्यासाठीची धोरणे यात तयार व्हावीत, विद्यापिठीय विविध ज्ञानशाखा मराठीतून सुरु व्हाव्यात व अभिजात मराठीला जागतिक भाषेचे स्थान मिळवून देण्यात या सोहळ्यांचा उपयोग व्हावा.
वि।ज।य।ह।ट।क।र
दि।ल्ली।डा।य।री
२२.०२.२५