Friday, March 3, 2023

सह्याद्रीचा स्वर्ग "माचाळ"

इको हिलस्टशन माचाळ :- 


      रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या निसर्गरम्य स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या माचाळ गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी रस्ता पोहोचला. त्यामुळे अजून तरी खऱ्या अर्थाने माचाळ पर्यटनसमृद्ध आहे. आता त्या गावाच्या विकासाची नवी दालने उघडणार आहेत. त्यातूनच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवे माचाळ हिल स्टेशन जगाच्या पर्यटन नकाशावर येणे आता दूर नाही, मात्र ” लोकल टू ग्लोबल माचाळ”च्या या विकासप्रकियेत १००-२०० वर्षांपूर्वीचे कोकणातील गाव कसे होते याची ओळख एकविसाव्या शतकात करून देणारी ‘माचाळची ग्रामीण संस्कृती’ जपायला हवी. कारण माचाळच्या आल्हाददायक, थंड हवेच्या गिरीस्थानासोबतच ग्रामीण संस्कृती जोपासणाऱ्या लोकजीवनातही जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती आहे. माचाळच्या याच शक्तिस्थानांचा शोध घेणारा लेख

………



        साडेतीन हजार फूट उंचीवरील माचाळ गाव कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या विशाळगडापासून एका दरीमुळे वेगळ्या झालेल्या सह्याद्रीच्या उंच डोंगररांगेतील सपाट माळरानावर वसले आहे. शिवकाळात ऐतिहासिक खेळणा (विशाळगड) या दुर्गाचा जोडदुर्ग म्हणून त्याची नोंद आहे. हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचे रस्ते, परिसरात पूर्णपणे पसरलेले धुके, थंड वातावरण, कोसळणारे धबधबे अशा सर्व गोष्टींनी वेढलेले थंड हवेचे माचाळ हे गाव आपल्याला पहिल्या भेटीतच आकर्षित करते.

         या गावाला ‘ब’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तसेच गावात जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेल्याने भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठीच नव्हे, तर ट्रेकर्ससाठी अनोखा अनुभव देणारे आहे.गावात पोहोचल्यावर शहरी गोंगाटापासून दूर आल्याची जाणीव होते. गाड्यांचा आवाज, प्रदूषण, माणसांची गर्दी, कामाचा व्याप या सगळ्यापासून दूर..


मुचकुंदी नदीचे उगमस्थान :-



     गुहेकडे जाताना वाटेत मुचकुंदी नदीचे उगमस्थान असलेले कुंड आहे.विशाळगडचा जोडदूर्ग असलेल्या किल्ले माचाळ वर उगम पावलेली ही नदी पुढे लांजा तालुक्याची जीवनवाहिनी बनत काठावरच्या गांवांना समृद्ध करित गावखडीजवळ सिंधुसागराला मिळते.या दरम्यान प्रभानवल्ली, साठवली, व गावखडी या ठिकाणी शिवकाळात किल्ले (गढी) उभारण्यात आले आहेत.

    


मुचकुंद ऋषींची गुहा व पौराणिक कथा :--



   गावाच्या डाव्या बाजूला पश्चिमेकडे किमान अर्धा तास चालत गेल्यावर मुचकुंद ऋषींची गुहा लागते. गुहेकडे चालत जाताना पायाल जळू चिकटून रक्त शोषून कधी मोकळ्या होतात, हे कळत नाही. म्हणून चालताना काळजी घ्यावी लागते. महाभारतात क्रोधिष्ट आणि आगीचा गोळा म्हणुन प्रसिद्ध पावलेल्या मुचकुंद ऋषींच्या गुहेजवळ गेल्यावर कालयवन दानवाला भगवान श्रीकृष्णाने मुचकुंद ऋषींद्वारे भस्मसात केले होते. त्या कथेच्या आठवणीला उजाळा मिळतो. 



मांधाता व मुचकुंद :-

       मांधाता (संस्कृत मान्धातृ) हा प्राचीन काळी होऊन गेलेला, इक्ष्वाकू वंशातील (सूर्यवंशातील) एक प्रसिद्ध राजा होय. त्याचा उल्लेख अगदी ऋग्वेदामध्येही सापडतो. मांधात्याच्या वडिलांचे नांव यौवनाश्व होते. ऋग्वेदातील एक सूक्तकर्ता (१०.१३४) ऋषी हा मांधाता यौवनाश्व आहे. महाभारत आणि पुराण साहित्यामध्ये येणाऱ्या उल्लेखांनुसार, कृतयुगात होऊन गेलेला युवनाश्व हा राजा पुष्कळ काळ निपुत्रिक राहिला होता. पुत्रप्राप्तीकरिता यज्ञ करण्याचेही त्याने ठरविले. एके रात्री तहानेने व्याकुळ झाला असता, अग्निशाळेत प्रवेश करून त्याने तेथील पाणी प्राशन केले. अर्थातच, त्याने हे कृत्य करताना केवळ आपल्या तहानेचा विचार केला होता; परंतु आपण कोणते पाणी पीत आहोत, ते जिथे आहे (अग्निशाळेत), तिथून घेण्यापूर्वी ऋषींना सांगून ते घ्यावे, इत्यादी विचार त्याने केला नाही. कालांतराने ऋषींना ही गोष्ट समजली आणि ते आश्चर्यचकित झाले. त्याचे कारण असे होते, की ते पाणी गर्भधारणा करून देणारे होते. एखाद्या स्त्रीने त्याचे प्राशन केले असता ती गर्भवती झाली असती; परंतु आता युवनाश्वानेच ते पाणी प्यायले होते. ऋषींना भीती होती, की स्त्री असो अथवा पुरुष, पाणी आपली दिव्यशक्ती दाखवेलच.


अर्थातच, त्या जलप्राशनाच्या परिणामस्वरूप राजाच्याच पोटात गर्भ वाढू लागला. सर्वांना हा प्रकारच अद्भुत आणि अतर्क्य असल्याने, पुढे जाऊन त्याची प्रसूती कशी करावी, हेदेखील कोणाला उमगेना. शेवटी युवनाश्व राजाच्या डाव्या कुशीतून गर्भ बाहेर काढावा लागला. जन्मानंतर मुलगा रडू लागला. त्या बाळाची भूक कशी आणि कोणी भागवावी, हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी साक्षात इंद्र त्या ठिकाणी आला आणि त्याने 'मां धाता', म्हणजे माझ्याकडून (दूध) पी असे सांगितले आणि आपले बोट पुढे केले. बाळाने बोट चोखणे सुरू केले असता, त्या बोटातून अमृतोपम दुधाची धारा स्रवू लागली आणि ती पिऊन बाळ तृप्त होऊ लागले; त्यामुळे त्या बाळाचे नावच मांधाता असे ठेवले गेले. स्वर्गीय दुधाची प्राप्ती झाल्यामुळे, अल्पावधीतच बाळाची अतिशय वृद्धी होऊन, तो एक किशोरवयीन तरुण बनला. शिवाकडे असलेले आजगव धनुष्य त्याला प्राप्त झाले. कालांतराने तो राजा बनला. केवळ इच्छा व्यक्त करण्याचा अवकाश, तिची पूर्ती होत असल्याने, आपल्या दिव्य शक्तींच्या साह्याने त्याने लवकरच जवळपास सर्व पृथ्वी आपल्या एकछत्री अंमलाखाली आणली. पुढे स्वर्गावर राज्य करण्याची मनीषा त्याला झाली; परंतु इंद्राच्या सांगण्यानुसार पूर्ण पृथ्वीची मालकी त्याच्याकडे नव्हती. लवणासुराचे राज्य त्याला मिळणे बाकी होते. ते प्राप्त करण्यासाठी त्याने लवणासुरावर स्वारी केली. लवणासुराने शिवाकडून मिळालेल्या अजिंक्य अशा त्रिशूलाच्या मदतीने मांधात्यास ठार केले.बौद्ध साहित्यातही मांधात्याचा चक्रवर्ती सम्राट म्हणून उल्लेख येतो. तो सात रत्नांचा अधिपती होता. उजव्या हाताचा स्पर्श करून त्याने डावा हात उंचावला असता, त्याच्या पायाशी आकाशातून रत्नांचा वर्षाव होई, अशी कल्पना आहे. 


मुचकुंद, ,कालयवन व भगवान श्रीकृ़ष्ण :-

            मांधात्याचा विवाह यादवराजा शशबिंदू याची कन्या बिंदुमती हिच्याशी झाला. मांधात्याच्या पुरुकुत्स, मुचुकुंद आणि अंबरीष अशा तीन मुलांचा उल्लेख आपल्याला सापडतो. त्यांपैकी मुचुकुंदाची कथा वैशिष्ट्यपूर्ण आहे.

       कंसवधाचा बदला घेण्यासाठी जरासंधाने अनेकवार मथुरेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सतरा हल्ल्यांचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, कालयवन नामक राजाच्या मदतीने त्याने पुन्हा आक्रमण केले. कालयवनाला रणांगणावर कधीही पराभव न होण्याचा वर प्राप्त झाला असल्याने, त्याने साहाय्य केले असता विजय निश्चित मिळण्याची जरासंधाला खात्री होती. याची कृष्णालादेखील कल्पना असल्याने, कालयवन आक्रमण करणार असल्याचे समजल्यावर, त्याने रातोरात द्वारका नगरी वसविली आणि मथुरेतील सर्व नगरवासीयांना तेथे हलविले. युद्धाचे दिवशी सकाळी कृष्ण एकटाच मथुरानगरीच्या द्वारी हजर झाला. कालयवन समोर आल्यावर, कृष्णाने रणांगणावरून पळ काढला. यावरूनच कृष्णाला रणछोड हे नाव प्राप्त झाल्याचे मानले जाते. आपल्याला घाबरून कृष्ण रणांगणातून पळून चालल्याच्या समजुतीने कालयवन भलताच खूश झाला आणि त्याने कृष्णाचा पाठलाग सुरू केला. कृष्ण धावत एका पर्वतावर गेला आणि एका गुहेत प्रवेश केला. तेथे झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर आपला शेला टाकून, कृष्ण एका कोपऱ्यात लपून बसला. काही वेळाने तेथे येऊन पोहोचलेल्या कालयवनाने झोपलेली व्यक्ती कृष्ण असल्याचा अंदाज अंगावरील शेल्यावरून केला आणि जोरात लत्ताप्रहार करून त्याला उठविले. झोपमोड झाल्याने क्रोधायमान झालेल्या त्या व्यक्तीने उठून दृष्टिक्षेप टाकल्याबरोबर, कालयवनाचे भस्म झाले.ही झोपलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, मांधात्याचा पुत्र मुचकुंद होती. मुचकुंदाला त्यानंतर विष्णुस्वरूपात दर्शन देऊन कृष्णाने उपदेश केला. युगांतर झाले असल्याने, मुचुकुंदाच्या काळचे जग आता पार बदलले होते. मुचुकुंदालादेखील पुन्हा संसारात पाऊल ठेवण्याची इच्छा उरली नव्हती. भगवान विष्णूच्या दर्शनाने त्याच्या सर्व मनीषा पूर्ण झाल्या होत्या आणि आता फक्त मुक्ती मिळावी, एवढीच इच्छा बाकी होती. कृष्णाने मुचुकुंदास बद्रिकेदारी जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. त्यानुसार राजा मुचुकुंद तपश्चर्या करू लागला आणि यथावकाश मुक्त झाला. मुचुकुंदाच्या दृष्टिक्षेपाने कालयवन नष्ट होण्याच्या या घटनेचे मूळ खूप पूर्वी, त्रेतायुगात घडलेल्या गोष्टीत होते.


     एकदा स्वर्गावर असुरांनी हल्ला चढविला असता, देवांच्या साह्यासाठी मुचुकुंद स्वर्गलोकी गेला. तेथे वर्षभर युद्ध करून त्याने असुरांचा पराभव करीत मोठाच पराक्रम गाजवला. असुरांवर विजय मिळाल्यानंतर प्रसन्न झालेल्या इंद्राने मुचुकुंदाला वरदान देऊ केले. पृथ्वीवर परतण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मुचुकुंदाच्या असे लक्षात आले, की पृथ्वीवर त्याचे राज्य आता अस्तित्वातच नव्हते. त्याचे कुटुंबीयही त्याला दिसेनात; त्यामुळे व्यथित झालेल्या मुचुकुंदाचे सांत्वन करीत इंद्राने त्याला सांगितले, की स्वर्गातील एक दिवस हा पृथ्वीवरील एका वर्षाइतका असतो. इतके दिवस युद्ध करण्याकरिता मुचकुंद स्वर्गात राहिला होता, तेव्हा पृथ्वीवर कैक वर्षे उलटून गेली होती. काळाच्या ओघात अनेक बदल घडून गेले होते. मुचुकुंदाने अशी इच्छा व्यक्त केली, की अनेक दिवस युद्ध करून थकल्याने आता त्याला दीर्घ काळ झोप हवी आहे. जो कोणी त्याला झोपेतून उठवेल, तो तत्क्षणी जळून नष्ट व्हावा आणि त्यानंतर मुचुकुंदास विष्णुदर्शन घडावे. इंद्राने तसा वर तत्काळ दिला. तोच मुचकुंद एका गुहेत जाऊन शेकडो वर्षे झोपला होता. हा वृत्तांत जाणणाऱ्या कृष्णाने मोठ्या युक्तीने रणांगणावर अजिंक्य असलेल्या कालयवनास त्या गुहेत आणून मुचुकुंदाच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने ठार करविले.

       आपल्या अलौकिक तेज सामर्थ्याच्या बळावर कालयवनाला ज्या गुहेत मुचकुंद ऋषीनी भस्मसात केले या घटनेची साक्षीदार असलेली  इतिहासातील ही प्रसिद्ध गुहा मुचकुंद ऋषींची गुहा म्हणून प्रसिद्ध पावली. माचाळ गावाच्या पश्चिमेस एका उंच डोंगरकड्यावर ही गुहा असून ग्रामस्थांनी या गुहेमध्ये श्रीकृष्ण ,मुचकुंद ऋषी व कालयवनाच्या पाषाण मुर्ती स्थापिल्या आहेत.या ठिकाणी त्याच काळातील महादेवाचे छोटेसे मंदिर असून महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो.या उत्सवाला कोल्हापूर,सांगली,साखरपा,देवरुख, लांजातील भाविक पर्यटकांसह मुंबई व चेन्नई स्थित असलेले माचाळवासीय चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. या ठिकाणावरुन दिसणारे विलोभनीय सौंदर्य आणि सूर्यास्त भुरळ घालतो. या ठिकाणी आगामी काळात भगवान श्रीकृष्णाचे भव्य मंदिर, श्रीकृष्ण स्टॅच्यू, या इतिहासप्रसिद्ध कथेची माहिती देणारे म्युझियम उभारल्यास लाखो पर्यटकांचा ओढा माचाळकडे वळेल.इतकी ताकद या ठिकाणी असल्याचे सातत्याने जाणवते.


विशाळगड ट्रेकिंग :-



किल्ले विशाळगड :-


माचाळाच्या पूर्वेस पाच किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात कोकण प्रांतातील ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे आणि धार्मिक ठिकाण म्हणजे किल्ले विशाळगड वसला आहे.पन्हाळगडाच्या वेढ्यावेळी गडावर अडकून पडले असताना छत्रपती शिवरायांना सुरक्षित असा वाटणारा किल्ला म्हणजे विशाळगड उर्फ खेळणा.

किल्ले विशाळगड समुद्रसपाटीपासून 3300 फूट उंचीवर वसला असून पूर्व आणि पश्चिम बाजूने गडावर येण्यास दोन मार्ग आहेत.माचाळ गावातून दक्षिणेकडे घोड्याचा टाप या ठिकाणाहून एक दरी उतरून कोकण दरवाजामार्गे विशाळगडावर पोहोचता येते. त्यासाठी किमान एक तासाची पायपीट करावी लागते. मात्र हा अनुभव सह्याद्रीच्या रांगड्या रूपाची जाणीव करून देतो.विशाळगडच्या पश्चिमेकडे असलेल्या कोकण दरवाजा या मार्गे माचाळहून वर्षानुवर्षे लोक पायी चालत विशालगडला जातात.हा मार्ग तसा खडतर आहे.कोकणातून माचाळच्या दिशेने आलेली ही वाट फारच अवघड असून अनेक तरुण हौशी मंडळी या मार्गाने साहसी पदभ्रमणाचा थरार अनुभवतात.

     दुसरा मार्ग म्हणजे पुर्वेकडील मार्ग होय.ज्याचा वापर कोल्हापूर, ,मलकापूर व आंबा मार्गे येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात करतात. विशाळगडाच्या चहुबाजूने खोल दर्या असून अरुंद पायवाटेने गडावर गडावर जावे लागते. गडाच्या पायथ्यापासून दृष्टिक्षेपास येणारा मुंढा दरवाजा आपणास बिकट मार्ग चढून येण्यास प्रेरित करतो. इंग्रजांनी 1844 च्या दरम्यान गडावरील प्रमुख ठिकाणे नष्ट केली आहेत.या किल्ल्यानेराजा भोज दुसरा यापासून ते १८४९ पर्यंत बरीच मोठी उलाढाल पाहिली.इतकेच नव्हे तर राजाराम महाराज चंदीस असताना महाराष्ट्राची राजधानी विशाळगड हीच होती.

       गडावर 350 हुन अधिक पायऱ्या चढून जावे लागते.  विशाळगडावर बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे बंधू फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी आहेत. महाराजांनी विशाळगडावरूनच आपण सुखरूप पोहोचलो असल्याचा इशारा देणाऱ्या पाच तोफा उडून बाजीप्रभूंना सुचित केले होते. येथून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर बाजीप्रभूंनी शर्थीचे प्रयत्न करून अडवलेली पावनखिंड आहे. गडावर अहिल्याबाई होळकर समाधी , बावनसती माळ ,पाताळनगरी, डीकमल, गंजीमाळ, भूपाळतळे, प्रशस्त असे महादेव मंदिर, मारुती व ध्यान मंदिर, वेताळ व तास टेकडी, कडेलोट व हजरत पीर मलिक रेहान अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. विशाळगड व माचाळच्या पायथ्याशी प्रभानवल्लीच्या घनदाट जंगलात शिर्के व शंकरराव मोरे यांनी बहामनी मलिक उत्तुजारला गनिमी काव्याचा प्रयोग करुन ठार केले.मराठ्यांच्या इतिहासातील गनिमि काव्याचा हा पहिला प्रयोग मानला जातो. हौशी पर्यटकांनी विशाळगडचा कोकण दरवाजा पाहून माघारी येणे चांगले मात्र गिर्यारोहणाची आवड व तयारी असलेल्या पर्यटकांनी  माचाळहून विशाळगडला जाणे ही अनूभूती आवर्जून घ्यावी अशीच आहे.यासाठी मात्र सोबत प्रशिक्षित मार्गदर्शक हवा.

    यासोबतच भिश्याचा कडा ,कोडबन हीदेखील आवर्जून पाहावी,त अशी स्थाने आहेत. माचाळच्या विस्तीर्ण पठारावर लपेटलेल्या धुक्याच्या शालीत कुठेही थांबले तरी स्वर्गात आल्याचा भास होतो. इथल्या पठारावरून खाली पाहिल्यानंतर हजारो फूट खोल दऱ्यांचे दृश्‍य अंगावर शहारे आणते.


ग्रामीण संस्कृती :-



    माचाळला जोडणारा रस्ता २०२१ मध्ये पूर्ण झाल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळच्या विकासकामाला आता गती येईल. जगापासून आजवर डिस्कनेक्ट असलेले माचाळ जोडण्यास मदत होईल, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ७० वर्षे तेथे पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नसल्याने तेथील सात्त्विक, पवित्रतेची अनुभूती देणारा निसर्ग आणि १००-२०० वर्षांपूर्वीचे कोकण कसे होते, हे सांगणारी वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण संस्कृती आजही टिकून आहे. गावातील उतरत्या छपराची चौपाखी कौलारू घरांची रचना, आतील मातीच्या जाडजूड भिंती, जुन्या लाकडी चौकटीवर (खांबावर) असलेले आडे, सारवलेल्या भिंती हे सर्व घरे १५० ते २०० वर्षे जुनी असल्याचा पुरावा देतात. प्रचंड घोंगावणाऱ्या वाऱ्यापासून घरांचे आणि माणसांचे रक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक घर चारही बाजूंनी गवताने कुडलेले आहे. यासाठी गवत आणि कारवीच्या काठ्या यांना बांबूच्या कामठ्यांनी जोडताना वनस्पतीच्या दोरांनी बांधणी केलेली सलटी केली जाते. या सलट्यां घराच्या चारही बाजूंनी लावल्या जातात. पावसाळा आणि हिवाळ्यातील आठ महिन्यांच्या काळात पडत असलेल्या थंडीपासून रक्षण व्हावे, म्हणून इथल्या प्रत्येक घरात आजही आपल्याला ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेला ‘पिरसा’ पाहायला मिळतो. काही घरात पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे असे दोन दोन ‘पिरसे’ दिसतात.



माचाळ हे मुचकुंद ऋषींचे गाव असल्याने तेथील ग्रामस्थ आपण ऋषी कुळातील असल्याचे अभिमामाने सांगतात. ऋषींचे कूळ असलेल्या गावात शेतीचे काम करण्यासाठी बैलाचा वापर केला जात नाही. माचाळला ही परंपरा कायम असून तेथील शेतकरी शेतीच्या नांगरणीसाठी रेड्याचा वापर करतात. ‘रेड्याचे जोते’ हे माचाळचे आणखी एक पारंपरिक वैशिष्ट्य! गावात सुमारे १००-११० घरे असून पाटील, मांडवकर, गोवळकर, भातडे, भिसे, भोसले, निबदे, नामे या आडनावाची कुटुंबे गुण्यागोविंदाने राहतात. माचाळ गावात असलेल्या मध्यवर्ती रस्त्याच्या उजव्या वरच्या बाजूस मांडवकर तर खालच्या बाजूला पाटील आडनावाची कुटुंबे राहतात. ईलर्निंगच्या काळात गावात आठवीपर्यंतच्या शिक्षणाची जेमतेम व्यवस्था असून मुलांना पुढील शिक्षणासाठी साखरपा, लांजा गाठावे लागते. अजूनही तेथे कोणत्याही कंपनीचा टॉवर उभारला गेला नसल्याने मोबाइलला रेंज नाही. पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोबाइल आणि इंटरनेट गरजेचे असले तरी सद्यःस्थितीत धावपळीच्या गतिमान युगात डिस्कनेक्ट जीवनाचा थोडा काळ तेथे आनंद घेता येतो.

        माचाळच्या पठारावर ग्रामस्थ मुख्यत्वे गव्हाचे पीक घेतात. सोबत भात, नागली ही पिकेही घेतली जातात. दुर्गमतेमुळे रोजगाराची फारशी संधी नसल्याने ग्रामस्थ तास-दीड तासाची पायपीट करून विशाळगडावर जातात. तेथे दूध, दही, लाकडांची मोळी विकतात. येत्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून निश्चितच माचाळचा कायापालट होणार असल्याने ही परिस्थिती बदलली जाईल. मात्र सद्यःस्थितीत गावातील तरुण उपजीविकेसाठी मुंबई आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्ये स्थायिक झाले आहेत. पाटील कुटुंबातील तरुण चेन्नईमध्ये सुवर्णव्यवसायात स्थिरावले असल्याचे गणेशोत्सवानिमित्ताने गावी आलेल्या धोंडू पाटील यांनी सांगताच त्यांचे कौतुक वाटले.


एकशेपाच वर्षांचे जोडपे :

            माचाळला प्रदूषणमुक्त निसर्गसौंदर्य आणि हिरवाई लाभल्याने येथील संघर्षमय जीवनपद्धतीतसुद्धा ग्रामस्थांचे सरासरी आयुर्मान जास्त असल्याचे दिसून येते. सरासरी आयुर्मान जास्त असलेले गाव हीदेखील माचाळची ओळख आहे. हिमालयाच्या कुशीत जशी शंभरी पार केलेली माणसे आपल्याला पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे माचाळला थोडेथोडके नव्हे तर तब्बल १०५ वर्षांचे एक जोडपे आहे. सखाराम रावजी भातडे आणि सौ. लक्ष्मीबाई सखाराम भातडे असे त्याचे नाव! त्यांना तीन मुले, तीन मुली, वीस नातवंडे आणि पतवंडे असा भला मोठा परिवार असून या आजी-आजोबांचा उत्साह अजून दांडगा आहे. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी शंभरी ओलांडली आहे, यावर विश्वास बसत नाही. गावातील शिमगा आणि गणेशोत्सवात गेली सत्तर वर्षे सखाराम आजोबा ताशा वाजवण्याचे काम करीत आहेत. यंदा १०५ व्या वर्षीही त्यांनी ही परंपरा मोडलेली नाही. माचाळच्या पर्यावरणीय निरोगीपणामुळेच तेथे दीर्घायुष्य लाभलेली अशी अनेक माणसे आपल्याला भेटतात. त्यांच्याशी संवाद साधला की जीवन जगण्याचे सोपे तत्त्वज्ञान आपल्यासमोर उलगडते. माचाळ पर्यटनाला आलेल्या पर्यटकांनी १०५ वर्षांच्या या जोडप्याला आवर्जून भेट देऊन त्यांच्या दीर्घायुष्याचे गुपित समजून घेतले पाहिजे. माचाळभेटीत त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह टाळता येत नाही.

ग्रामदैवत श्री देव भैरी :--




      माचाळ गावात रस्त्याच्या उजवीकडे मांडवकरांची वस्ती लागते. या वस्तीतून जाणाऱ्या पाखाडीने साधारण १० ते १५ मिनिट अंतर कापल्यावर घनदाट देवराई दृष्टीस पडते. आकाशाची स्पर्धा करणाऱ्या या वनराईतील उंचच-उंच वृक्षवल्लींच्या मधून जाणाऱ्या पाखाडिचे दृश्य भान हरवायला लावते.या पाखाडीने पुढे गेल्यावर देवराईच्या बरोबर मध्यभागी उंचावर वसलेले माचाळवासीयांचे श्रद्धास्थान अर्थात ग्रामदैवत श्री देवभैरीचे मातीचे शाश्वत कोकणचे प्रतिबिंब दाखवणारे मंदिर आहे.देवराईच्या हिरव्यागार रंगात लाल मातीचे देवालय पाहून काही क्षण लांबूनच हे मनोरम दृश्य येणारा प्रत्येक भाविक वा पर्यटक मनात साठवून घेतात.पुढे नकळत पाऊले मंदिराकडे वळतात. या मातीच्या इको हिलस्टशन  उघड्या सभागृहातच मध्यभागी  ग्रामदैवत भैरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे.ग्रामदेवत भैरीसोबत अजून काही देवतांच्या मूर्ती मंदिरात आहेत.गावातील प्रत्येक उत्सवाची सुरवात श्री देव भैरीला नमन करून केली जाते.या मंदिरात थंडिपासून संरक्षण व्हावे यासाठी पिरसा (शेकोटी) ची व्यवस्था केली आहे. ग्रामदैवत भैरीच्या मूर्तीजवळच गाभाऱ्याच्या लाकडी मंडपात जवळच एक ते दीड फूट उंचीची सुंदर  दीपलक्ष्मीची मूर्ती लक्ष वेधून घेते. गावातील एका माहेरवाशीणीने आपला नवस पूर्ण झाल्याच्या आनंदात ही दीपलक्ष्मीची सुंदर मूर्ती मंदिराला भेट दिली आहे. 



      मंदिराच्या आवारात दुसरे एक मातीचेच मंदिर असून गावावर आलेल्या संकटावेळी गावातील एका कर्तृत्ववान महिलेने त्याचा धैर्याने सामना केला. यावेळी तिला आपला एक हात गमवावा लागला.या सात्विक महिलेच्या सन्मानाप्रित्यर्थ हे मंदिर उभारण्यात आले असून सद्यस्थितीत मूर्ती थोडी भग्न झाली आहे.या मंदिरात प्रकाशनिर्मितीसाठी केलेली भिंतीतील त्रिकोणी  झरोक्याची व्यवस्था पाहण्याजोगी आहे.


माचाळची देवराई :-



         माचाळ गावातील महत्वाचे ठिकाण म्हणजे देवराई होय.घरासाठी जसं अंगण तसं गावासाठी देवराई हे जाणणा-या माचाळवासीयांनी आपली समृद्ध देवराई आजवर जपली आहे.ग्रामदैवत श्री देव भैरीची प्रतिष्ठापना त्याकरिताच देवराईत करण्यात आली असावी.गावाच्या दक्षिणेकडे असलेल्या डोंगरावर असलेल्या या घनदाट देवराईत प्राणी, पक्षी,अौषधी वनस्पती व वृक्षसंपदेचा अमूल्य ठेवा आहे.माचाळला हिरवंगार ,ताजंतवानं ठेवणारी ही देवराई पक्षी व प्राणी अभ्यासक-निरिक्षक व देवराईचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी उत्तम जागा आहे.


वन्यजीवन :-

माचाळ पठारावर सर्वसाधारणपणे खुरटी आणि कमी उंचीची झाडे दिसतात. आंबा, काजू, फणस अशासारखी कोकणात विपुल असलेल्या झाडांची वाढ माचाळला होत नाही, हे या भूमीचे आणखी एक भौगोलिक विशेष! चार-पाच वेगवेगळ्या उंचीच्या औषधी जांभळाची झाडे तेथे आहेत. तेथील देवराई जपण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केलेला असून कधीही न पाहिलेल्या असंख्य फुलपाखरांच्या, पक्ष्यांच्या दर्शनाने मनाला एक वेगळेच समाधान मिळते. गावातील डोंगराच्या बाजूने लाल मोठे खेकडे सापडतात. ब्राह्मणी, बेहडा, खारवी, जंगली कढीपत्ता अशा अनेक औषधी वनस्पती विपुल प्रमाणात दिसून येतात.


राजधनेशचा वावर :-



     मिनीमहाबळेश्र्बर संबोधिलेल्या हिलस्टेशनच्या स्वर्गीय निसर्गाची एकदा अनुभूती घेतली की पुन्हा पुन्हा पाउले माचाळकडे वळतात.माचाळ गावात प्रवेश करतानाच आमचे स्वागत करत मुचकुंद ऋषींच्या गुहामार्गाकडे झेपावलेला ग्रेट हॉर्नबिल (राजधनेश किंवा गरूडधनेश) आम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला होता.याचाच अर्थ इथे मोठ्या प्रमाणावर धनेश सारख्या दुर्मिळ पक्षाचे वास्तव्य आहे.हे लक्षात घेऊनच माचाळच्या पायथ्याशी असलेल्या पालू गावात विजय बेंद्रे नामक पर्यावरणस्नेही तरुण “हॉर्नबिल स्टे फॉरेस्ट होम”ची निर्मिती करत आहे. माचाळमधील दुर्मिळ असलेल्या ग्रेट हॉर्नबिलचा वावर पाहून पर्यटक जास्त सुखावतील. मजबूत बाकदार पिवळसर रंगाच्या आकर्षक चोचीच्या या पक्ष्याच्या अधिवासामुळे सह्याद्रीतल्या माचाळ पठारावर दुर्मिळ पक्ष्यांचा असलेला वावर सिद्ध झाला आहे.तसेच माचाळच्या पायथ्याशी वसलेल्या सालपे गावातील एक घाग नामक तरूणाने देखील कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे.


सापड लोककला :-  

    रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेली गावातील तरुण मंडळी गणेशोत्सव, शिमग्याच्या सणाला गावात हमखास येतात. याचे कारण परंपरा जोपासणारी वैशिष्ट्यपूर्ण सापड नृत्यकला. खरे तर उंचच उंच गिरीशिखरांवरच्या एकाकी वाड्या-वस्त्यांवरच्या मंदिरांची एक संस्कृती असते, त्यांचे काही नीतिनियम असतात. माचाळ गावात आपल्याला ते पाहायला मिळतात. गावात ब्राह्मणदेव, वडलोबा, विठ्ठलाई, भैरी, वाघजाई, जुगाई, उदगिरीदेवी आणि मालक देव असे आठ देवांचे एकत्रित मंदिर असून गावच्या दगडी चौकात एका चौथऱ्यावर त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणेशोत्सवात गावचे मुख्य गावकर पांडुरंग धोंडू पाटील यांच्या मोठ्याशा मध्यवर्ती घरातील ओट्यावर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीन दिवसांचा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवासाठी स्थानिक गावकरी पाटील यांच्या घरातील ओटीमागील मोठ्या भिंतीवर रंगीत खडूंनी सुबक पौराणिक चित्रे काढतात. आजच्या डिजिटल जमान्यातील डिजिटल बॅनरही फिका पडेल इतकी ही चित्रे उठावदार असतात. या भिंतीला लागून गावातील आठ देवतांची रूपे (चांदीचे मुखवटे) लावली जातात आणि मग सुरू होते वैशिष्ट्यपूर्ण जाखडी लोकनृत्य. या कार्यक्रमाची सुरवात ‘सापड’ नृत्याने होते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्यात सहभागी होऊन वर्षभराच्या कामासाठी बळ मिळवण्यासाठीच महानगरात गेलेल्या तरुणांची पावले माचाळला वळतात. माचाळचा गणेशोत्सव आणि सापडनृत्य हे कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी गोल्डन पॅकेज ठरू शकेल.

विविधरंगी फुलपाखरू:-




    गावातील मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात एका दगडावर वाघाचे शिल्प असून याविषयी माहिती घेतली असता डोंगरदऱ्यातील अरण्यपुत्रांची “वाघबारस” ही परंपरा तेथे साजरी केली जाते.


थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळचा विकास करताना हे सारे वेगळेपण जपावे लागेल. यासाठी माचाळच्या संवेदनाशील पर्यावरणाला हानिकारक ठरेल, अशा गोष्टी सुरवातीपासूनच रोखण्याकडे लक्ष पुरवावे लागेल. रायगड जिल्ह्यातील माथेरान हे संपूर्ण आशियातील एकमेव गिरीस्थान आहे, जेथे खासगी वाहनांना प्रवेश नाही. वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणून जपल्यानेच आजही माथेरान प्रदूषणमुक्त आहे. त्याच धर्तीवर माचाळची वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणून जाहीर करावे लागेल. डोंगरी विभागातून माचाळची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी लागेल. गावात रस्ता पोहोचला असला, तरी गावात प्रवेश करण्यापूर्वी लागणाऱ्या सपाट माळरानापर्यंतच खासगी वाहनांना प्रवेश दिला गेला पाहिजे. 

भिश्याचा कडा :-


        मुचकुंदि नदी ज्या पठारावरून प्रभानवल्लीच्य दिशेने खाली द-यांमध्ये झेपावते तिला भिश्याचा कडा संबोधतात.या पठारावरून ५०० फुट खोल दरित कोसळणाऱ्या मुचकुंदी नदीचे पाणी वा-याच्या प्रचंड झोतामुळे मागे येते.यामुळे इथे रिव्हर्स वाॅटरफाॅलचा आनंद लुटता येतो. सोबतच कोडबन हीदेखील आवर्जून पहावीत अशी स्थाने आहेत.माचाळच्या विस्तीर्ण पठारावर लपेटलेल्या धुक्याच्या शालीत कुठेही थांबले तरि स्वर्गात आल्याचा भास होतो.इथल्या पठारावरुन खाली पाहिल्यानंतर हजारों फूट खोल दऱ्यांचे दृश्‍य अंगावर शहारे आणते.

व्हिजीट विलेज :-



माचाळचा ग्रामीण बाज जपला पाहिजे तरच माचाळमधील मातीच्या पाऊलवाटांवर पाऊस सुरू झाल्यावर पावसात चालण्याचे स्वर्गसुख अनुभवता येईल. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत गारठल्यानंतर गावातील घराघरात असलेल्या पिरशासमोर बसून शेकोटीचा आनंद घेता येईल.'पिरसा' ग्रामीण लोकजीवनाचे अविभाज्य आयुध आहे.

रांजणखळग्याचा थरार :-



              उन्हाळ्यात माचाळला साहसी पर्यटनाचे थ्रील अनुभवता येईल.यादृष्टीने मुचकुंद ऋषींच्या गुहेजवळ उगम पावणारी मुचकुंदी नदी माचाळच्या ३५०० उंच फुट पठारावरून खाली प्रभानवल्लीकडे झेपावताना  अनेक ठिकाणी मोठाले रांजणखळगे तयार करते.मुचकुंदी माईच्या या रोमांचक प्रवासातील या निसर्गनवलाची सफर करणे साहसी    पर्यटनातील सर्वात मोठे थ्रील ठरु शकते.सद्यस्थितीत रत्नागिरिहून जिद्दी माऊंटेनिअरींग च्या माध्यमातून या रांजणखळग्याचा थराराची अनुभती अनुभवता येते.

 माचाळ पर्यटनाचे भविष्यातील माॅडेल :-

 माचाळला येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करणारे भव्य प्रवेशद्वार उभारून तेथेच लक्षवेधक अशा भगवान श्रीकृष्ण आणि मुचकुंद ऋषींच्या भव्य पुतळ्यांची निर्मिती करावी लागेल. माचाळला आलेला पर्यटक गावात राहावा, यासाठी येथील कला, संस्कृती जागतिक पर्यटकांसमोर मांडण्यासाठी नियोजित कलामहोत्सवांचे आयोजन करावे लागेल. ग्रामीण संस्कृतीचे आणि येथील स्वर्गीय निसर्गाची अनुभूती देणारे कल्पक संग्रहालय उभारावे लागेल. माचाळच्या विस्तीर्ण पठारावर असलेली विविध पर्यटन ठिकाणे पक्क्या पाखाड्या बांधून जोडावी लागतील. स्थानिक तरुणांना माचाळ पर्यटनदूत म्हणून प्रशिक्षण द्यावे लागेल. मुचकुंद ऋषींच्या गुहा परिसरात मुचकुंद ऋषी आणि कालिया असुराचा वध, भगवान श्रीकृष्ण आणि मुचकुंद ऋषींची भेट हे प्रसंग पर्यटकांसमोर मांडणाऱ्या छोट्याशा चित्ररूप सफर घडवून आणणाऱ्या ‘गिरीस्थान कलाकेंद्राची’ निर्मिती करता येईल. त्यातून ऐतिहासिक, पौराणिक पर्यटनस्थळ म्हणूनही माचाळचा विकास साधता येईल. ‘मुचकुंदी नदी परिक्रमेचा कार्यक्रम आखता येईल. त्याअंतर्गत नदीचे उगमस्थान सहलीच्या माध्यमातूनही पर्यटकांसमोर मांडता येईल. माचाळला गिर्यारोहण, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग, राफ्टिंगसारखे साहसी खेळ सुरू करता येऊ शकतील. माचाळचे पठार नैसर्गिक गोल्फ कोर्सच आहे. पूर्वापार सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशात घोडेस्वारी हे प्रवासाचे साधन होते. तेच साधन पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. सध्या मुंबई, पुण्यासारख्या महानगरी वातावरणात वाढलेल्या मुलांना खेडे कसे असते, हे दाखवण्याचा ‘व्हिजिट व्हिलेज’ हा पर्यटनप्रकार विकसित होत आहे. यासाठीही माचाळ उत्तम पर्याय ठरेल.

     एकूणच अशा पद्धतीने माचाळचा विकास साधताना स्थानिक लोकसहभाग महत्त्वाचा असावा. त्यासाठीच माचाळमध्ये स्वातंत्र्याच्या तब्बल ७० वर्षांनंतर रस्ता पोहोचल्यानंतर प्लास्टिक आणि प्रदूषणात वाढ करणाऱ्या, गर्भश्रीमंत निसर्गाची अपरिमित हानी करणाऱ्या पर्यटन विकासाऐवजी स्थानिकांच्या उत्थानाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून हिलस्टेशन माचाळसोबतच निसर्गसमृद्ध माचाळची ग्रामीण संस्कृती जोपासत ती जगापुढे आणणारे पर्यटन साकारावे लागेल. तरच स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एक आगळेवेगळे माचाळ गिरीस्थान जगाच्या पर्यटन नकाशावार येईल.


विजय हटकर

मुक्त पत्रकार-लेखक-संपादक

(संपर्क : ८८०६६३५०१७)





Monday, January 2, 2023

कातळगांव -जावडे येथील दूर्लक्षित लेणीसमूहाचे जतन अत्यावश्यक- डॉ.वैशाली वेलणकर

 कातळगांव -जावडे येथील दूर्लक्षित लेणीसमूहाचे जतन अत्यावश्यक-  डॉ.वैशाली वेलणकर


     कोकणातील प्रारंभिक काळातील वैशिष्ट्यपूर्ण शैव व वैष्णव प्रतिमा कातळगांव- जावडे, तालुका लांजा येथील लेणीसमूहात पाहायला मिळाल्या असून दख्खन व महाराष्ट्राच्या प्रारंभिक काळातील सर्व वैष्णव प्रतिमाशास्त्राची नव्याने मांडणी करण्याची क्षमता असलेले हे  दुर्लक्षित शिल्पवैभव "ऎतिहासिक वारसा स्थळ " म्हणून सरकार व लोकसहभागातून जपायला हवे, असे मत डेक्कन कॉलेज पुणे येथील ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासिका डॉक्टर वैशाली वेलणकर यांनी लांजा येथे व्यक्त केले.


      प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभाग -डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ पुणेच्या वतीने कातळगांव-जावडे लेणीसमूहाला डॉ.वैशाली वेलणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  अभ्यासगटाने  नुकतीच भेट दिली. कातळगांव-जावडे येथील या लेणीसमुहाचे संशोधन प्रसिद्ध झाले असून ही लेणी चौथ्या-पाचव्या शतकातील असल्याचे सिध्द झाले आहे. तसेच हिंदू धर्मातील कोकण किनारपट्टी वरील सर्वात प्राचीन लेणी समूह म्हणून कातळगांव -जावडे येथील लेणी संशोधनातून  समोर आलेली आहेत.या पार्श्र्वभूमीवर या लेणीसमुहाचा अधिकाधिक अभ्यास व्हावा या दृष्टीने  आयोजिलेल्या या अभ्यास गटात प्राध्यापक गोपाळ जोगे ,संशोधक सहाय्यक अमित पेंदाम, संशोधक विद्यार्थी चेतना गोसावी ,पुरातत्वशास्त्र विद्यार्थी तार्किक खातू,        प्रा. डॉ.अंजय धनावडे -एम.एम.जगताप कॉलेज महाड आदींचा समावेश होता. लांजा येथे या अभ्यासगटाचे आगमन झाले असता "लव्हेबल लांजा" या संस्थेचे  विजय हटकर व शिवगंध प्रतिष्ठानचे राजूदादा जाधव यांनी त्यांचे स्वागत केले व कातळगाव जावळे अभ्यास दौ-यात  स्थानिक संस्थांनी सहभाग घेऊन कातळगांव -जावडे येथील शिल्पसमृद्ध प्रतिमांचे महत्व तज्ञांकडून समजून घेतले. यावेळी अनुष्का जाधव ,अंकिता जाधव,सुमित गुरव, निशांत आचरेकर, गुरुप्रसाद धाडवे ,महेंद्र चव्हाण, आकाश आसोगेकर, आदी इतिहास प्रेमी सहभागी झाले होते.


       लांजा तालुक्यातील कातळगांव-जावडे येथील शिल्पवैभव कोकणच्याच नव्हे तर दख्खन व महाराष्ट्राच्या प्रारंभिक काळातील इतिहासाला नवा आयाम देणारे ठरणार असून या परिसरात झालेल्या अलीकडील संशोधनाने इतिहासाच्या आकलनाच्या कक्षा विस्तारल्या आहेत. कातळगांव-जावडे लेणीसमुहात आढळणारी विष्णूची भव्य मूर्ती ,शेषशायीविष्णू व शैव संप्रदायातील महत्त्वाचे अंकन केलेले कथानक या  सर्व शिल्पांकनाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून जांभ्या लालसर दगडात याची निर्मिती झाली आहे.मात्र गेली हजारो वर्षे ऊन-पावसाचा तडाका खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात ती झिजली आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या इतिहासाला नवा आयाम देणारे हे  शिल्पवैभव जतन करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी डाॅ.वैशाली वेलणकर यांनी व्यक्त केले.

        जावडे येथील या पुरातत्त्वीय स्थळाचे अभ्यासपूर्ण संशोधन करून पहिल्यांदा उजेडात आणण्याचे काम महाड येथील प्रा. डॉ. अंजय धनावडे यांनी २०१५ मध्ये केले. त्यांच्या मते या लेण्या त्रैकुटक आणि वाकाटक काळातील असून कोकणातील धर्म, इतिहास आणि पुराततत्विय दृष्ट्याअत्यंत महत्वपूर्ण आहेत. तज्ञांचे या लेणीसमुहाविषयीचे मत लक्षात घेऊन केंद्र सरकार च्या पुरातत्व विभागाने इकडे लक्ष देऊन सदर लेणी संरक्षित करावी अशी मागणी लवेबल लांजा या संस्थेच्या माध्यमातून स्थानिकांनी केली आहे

   ----------------------------------- 

प्राध्या.गोपाळ जोगे :- 

   या अभ्यास दौ-यात सहभागी झालेले डेक्कन काॅलेजचे  प्रा. गोपाळ जोगे यांनी या लेणीसमुहातील शैव आणि वैष्णव कथांचा उद्गम आणि त्यांचा पुरातत्त्वीय आणि मूर्तीशास्त्रीय पद्धतीने झालेला विकासाचा मागोवा सहसंशोधकांच्या मदतीने अलीकडेच तपशीलवार  मांडला आहे. चौथ्या पाचव्या शतकातील भारतीय मूर्ती कला यांमध्ये मोलाची आणि मूलभूत भर घालणाऱ्या शिल्पांचा आणि शिल्पपटाचा या ठिकाणी समावेश असल्याने या ठिकाणी आणखी संशोधन होण्याची गरज आहे असे मत प्राध्यापक गोपाळ जोगे यांनी व्यक्त केले .तसेच राज्य व केंद्र सरकारकडून या ऎतिहासिक वारसास्थळाला  लवकरच 'पुरातत्व ठेवा 'म्हणून दर्जा मिळवुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून स्थानिकांमध्ये प्रबोधन करून लोकसहभागातून याच्या संवर्धनाची मोहीम स्थानिक इतिहास अभ्यासक, इतिहासप्रेमी मंडळींनी करावी अशी अपेक्षा प्रा. डाॅ.गोपाळ जोगे यांनी व्यक्त केली.

------------------------------------------------------------









Friday, December 23, 2022

सत्येश्र्वराचा 'शीडम'

 

सत्येश्र्वराचा 'शीडम'

   


     झपाट्याने होणारे शहरीकरण, बेलगाम होत चाललेले औद्योगिकीकरण,भौतिक सुखाची असिम लालसा ह्या गोष्टींमुळे दूर्मीळ व जुन्या वृक्षांची संख्या सध्या सर्वत्र झपाट्याने कमी होताना दिसते. कोकणातही चौपदरीकरणाच्या नावाखाली विकासाचे विकासदूत कितीतरी दुर्मिळ व जुन्या वृक्षांच्या मुळावर उठलेले आपण पाहत असताना ,विस्तारलेली एखादे वृक्षवल्ली पाहिली की मनाला 'गारवा'' मिळतो. त्यातही  एखादा  ' हेरिटेज ट्री ' पहायला  मिळाला की होणारा आनंद अवर्णनीय!

      वनसमृद्धीने नटलेल्या कोकणातील लांजा तालुक्यातील वनगुळे गावात असाच एक हेरिटेज वृक्ष ६००-७०० वर्षे दिमाखात उभा आहे. गावचा पालनकर्ता श्री देव सत्येश्र्वराच्या प्रांगणात असलेला हा महाकाय वृक्षराज दूरूनच लक्ष वेधून घेतो. नजरेत न पावणाऱ्या या महाकाय वृक्षाचे नाव आहे 'शीडम'. महाविद्यालयीन जीवनात इतिहासाची आवड निर्माण झाल्यावर लांजाचा धांडोळा घेताना साधारण 2007 च्या आसपास याची पहिली भेट झाली.तेव्हापासून त्याने माझा काळीजकोपरा व्यापला आहे. साधारण सहाशे सातशे वयोमान असलेल्या या वृक्षाचे लक्षवेधी खोड त्रिकोणी (तिपाही)प्रकारातील असून इतके रुंद आहे की एखादी एसटी जणू त्या खोडातून सहजच इकडुन-तिकडे  जाईल.आश्चर्य वाटले ना? पण खरंच. इतके रुंद खोड हे वैशिष्ट्य असलेला हा शीडम पहिल्याच भेटीत माझा जिगरी दोस्त झाला.हा भलाकाय दूर्मीळ वृक्ष सत्येश्वराच्या प्रांगणात रुजल्यामुळे गावातील संकटांचे श्री देव सत्येश्वराने केलेल्या निवारणाचे साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी त्याला मिळाली.या शीडमाच्या अंगा-खांद्यावर गावातील कित्येक पिढ्या खेळून मोठ्या झाल्या असतील ,कितीतरी जुन्या जाणत्यांनी आयुष्याची शेवटची संध्याकाळ याच्या सनिध्यात घालविली असेल.तर कित्येक पिढ्यांनी सत्येश्र्वराला साक्ष ठेवून गावाच्या विकासाच्या चर्चा याच शीडमाच्या झाडाखालील पारावर केल्या असतील.श्रीदेव सत्येश्वराची इमाने-ईतबारे  घट्ट पाय रोवून सोबत करणारा निष्ठावान शीडम जणू गावातील पहिला गावकरीच! 
     
    उंचच उंच वाढलेल्या,  हिरव्यागार वैशिष्ट्यपूर्ण या दुर्मिळ झाडाला पाहणे म्हणजे अवर्णनीय अनुभवच.याचे स्थानिक नाव -'शीडम' असून त्याचे Botanical Name - Tetrameles Nudiflora R.Br. आहे.मंदिराच्या जीर्णोद्धार व  सुशोभिकरणावेळी मंदिराच्या आवारात थोडा भराव टाकण्यात आला .यामुळे सद्यस्थितीत शिडमाचे ६-७ फुट खोड आता जमिनीत लपले गेले आहे. सत्येश्वराच्या मंदिर परिसरात उभा असल्याने हा महाकाय शीडम कदाचित आजवर टिकून राहिला असावा.याकडे कुण्या दृष्टाची नजर गेली नसावी.कारण कोकणात माणसाने स्वतःच्या सोयीसाठी अनेक देवराया देवाचाच कौल घेऊन तोडून टाकल्या आहेत,हे आपण जाणतोच.

      


  डिसेंबरच्या २० तारखेला  मुंबई विद्यापीठाच्या पुरातत्व विद्याशाखेचा अभ्यास करणारे दोन विद्यार्थी 'कोकणातील ग्रामदेवतांचा अभ्यास' करण्यासाठी लांजा तालुक्यात आले असता पुन्हा एकदा अनेक वर्षांनी सत्येश्वरला भेट देण्याचा ,शीडमाशी हितगुज साधण्याचा  योग जुळून आला.यावेळी या मित्रासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.छानसा फोटो अभिषेक कडून काढून घेतला.खरं तर लांजा तालुक्यातील  वनगुळे हे माझे आवडत्या गावांपैकी एक गाव.त्याला कारणही तसेच.चारही बाजुंनी गोलाकार पसरलेल्या हिरव्यागार  डोंगरांच्या कुशीत पहुडलेले, निरव शांतता असलेले वनगुळे ज्यांना कोणाला स्वत:चाच शोध घ्यावयाचा आहे अशांसाठी सर्वोत्तम पर्याय असावे असे न राहून वाटते.इथला निसर्गात आपल्याला ताजेतवाने करण्याची ताकद आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय लेखक-पत्रकार-संपादक विजय कुवळेकर - व विधीज्ञ- साहित्यिक विलास कुवळेकर या बंधुंचे तसेच श्री वासुदेव महाराज कुवळेकर यांचे हे गाव. या गावाची दुसरी महत्वाची ओळख म्हणजे गावात असलेली हजारो वर्षापुर्वीची दोन एकाश्म मंदिरे होय.श्री आनंद भागवत सर यांच्या खाजगी जमिनीत ती उभी आहेत.या गावात कृषी पर्यटन, निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकासाला बराच वाव आहे.

          वनगुळ्यातील हा महाकाय शीडम वृक्ष  जुना व  दुर्मिळ असल्याने कोकणातील हेरिटेज ट्री मध्ये गणला जातो. असाच एक  दुर्मिळ महाकाय शीडम साधारण 300 वर्षे रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी गावातील महाकाली मंदिराच्या परिसरात उभा आहे. आजकाल सहसा न दिसणारे ,दुर्मिळ होणारे शीडम वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी  वनगुळे गावातील या शीडमाच्या झाडापासून त्याची रोपे तयार करून ती कोकणात लावली गेली पाहिजेत,असे केल्याने येणा-या काही वर्षात शीडमाचे वृक्ष निदान कोकणात तरी नामशेष होणार नाहीत आणि पुढच्या पिढीला त्रिकोणी (तिपाही) खोडाचा,उंचच उंच वाढणारा महाकाय शीडम वृक्षरुपी ठेवा म्हणजे काय याची माहिती व महत्व कळेल.
        

    विजय हटकर.

लांजा-रत्नागिरी - ८८०६६३५०१७

वनगुळे गावातील पर्यटनस्थळांची निवडक क्षणचित्रे :-

१)श्री देव सत्येश्र्वराचे देखणे देवालय
२)श्री देव सत्येश्र्वर.

३)तुलसीवृंदावन 


४) एकाश्म मंदिर १

 एकाश्म मंदिर २





Wednesday, November 16, 2022

कार्यमुद्रा उमटविणारे विजय पाटोळे सर.

 कार्यमुद्रा उमटविणारे विजय पाटोळे सर.


           काही माणसं स्थळ काळाच्या पुढे जाऊन आपल्या असामाज्ञ कर्तृत्वामुळे सभोवतालच्या विदारक आणि विपरित परिस्थितीवर मात करून आपली दिग्विजयी मुद्रा काळाच्या भाळी ठाशीवपणे कोरत असतात.मग त्या व्यक्तीचे क्षेत्र संशॊधन ,कला ,शिक्षण वा इतर कोणतेही असो.अशाच एका प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाने आपल्या रचनात्मक कार्याने लांजा तालुक्यात आपली मुद्रा कोरली आहे,ते व्यक्तिमत्व म्हणजे विजय पाटोळे सर होय!

        निसर्गसंपन्न तळवडे गावातील शिक्षणधुरिणींनी विद्येचे महत्व जाणून मुहूर्तमेढ रोवलेल्या ज.गं.पेडणेकर माध्यमिक विद्यालयात पाटोळे सरांनी गत साडे तीन दशकांहून अधिक काळ लिपिक म्हणुन यशस्वी काम केले आहे.एखाद्या विद्यालयातील लिपिक इतका विद्यार्थीप्रिय कसा असा प्रश्न या विद्यालयाला भेट देणा-या अनेकांना पडल्याशिवाय राहत नाही. याचे उत्तर विजय पाटोळेंच्या सर्वस्व झोकून देवून काम करण्याच्या वृत्तीत आहे.गावचेच नव्हे तर कोकणचे भूषण असलेल्या स्वर्गीय भाई पेडणेकरांचा प्रत्यक्ष सहवास लाभल्याने ,भाईंच्या कार्यपद्धतीचा प्रभाव पाटोळॆ सरांवर पडला.स्व.भाई पेडणेकरांनी रुजविलेल्या शिक्षणसंकुलात आपल्याला मिळालेली नोकरी म्हणजे अापले जगणे सार्थकी लावायला ग्रामदैवत गांगेश्र्वरानेच जणू दिलेली सुवर्णसंधी आहे हे वेळीच जाणलेल्या विजय पाटोळे सरांनी ३७ वर्षे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय,तळवडे या प्रशालेची कीर्ती सर्वदूर करण्यासाठी स्वत: झिजण्यातच धन्यता मानली.


    कोकणात शतकोत्तर नाट्यपरंपरा असलेली अनेक गावे आहेत.कारण कोकण ही नाट्यपंढरी आहे. कोकणच्या या लाल मातीनेच ला.कृ.आयरेंसारखा कामगार रंगभूमीवरचा शेक्सपियर मराठी रंगभूमीला दिला. पुरूषोत्तम बेर्डे,राजेश देशपांडे, दशरथ राणे, सुधीर मोघे, कृष्णकांत सावंत,अमोल रेडीज असे कितीतरी संपन्न लेखक दिग्दर्शक या मातीने दिले. विजय पाटोळेनाही लहानपणापासून अशीच नाटकाची विलक्षण आवड. या आवडीतूनच शिमगोत्सवात गावातील मांडावर(पारावर) होणाऱ्या नाटकातून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. गावक-यांकडून झालेल्या कौतुकातून पाटोळे सर ग्रामीण रंगभूमीकडे ओढले गेले. परिणामी अनेक नाटकातून अभिनय दिग्दर्शन अशा अष्टपैलू जबाबदाऱ्या त्यांनी लिलया सांभाळल्या. यातूनच सहकाऱ्यांसह त्यांनी गांगेश्वर कला,क्रीडा वृंद मंडळ,तळवडेची मुहूर्तमेढ रोवली. या मंडळाच्या माध्यमातून नाट्य स्पर्धा, एकपात्री, एकांकिका स्पर्धांसह क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे संपन्न झालेल्या बहुभाषिक राष्ट्रीय नाट्य स्पर्धेत ४० कलाकारांसह सादरीकरण करून परीक्षक व रसिकांची मिळवलेली दाद हा त्यांच्या आयुष्यातील "संस्मरणीय ठेवा" ठरला. या मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक हौशी कलाकारांना हक्काचा मंच मिळाला याचे श्रेय विजय पाटोळेंना द्यावेच लागेल.या मंडळाच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेत भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्राने त्यांना  'रत्नागिरी जिल्हा उत्कृष्ट युवा' पुरस्काराने सन्मानित केले.


डेेेेरवण युथ गेममध्ये राज्यस्तरिय खो-खो स्पर्द्धेतील मुलींच्या संघासह

         नाटकासोबतच लाल मातीतल्या कबड्डी,खो-खो या खेळांमध्येही विशेष आवड असल्याने शाळेतल्या विद्यार्थ्यांमधून उपजत गुण असलेले खेळाडू शोधून त्यांच्यातील खेळाडूला घडविण्याचे पाटोळे सर यांनी केलेले काम त्यांच्या अंतरंगातील सततचा 'जागता खेळाडू' चे प्रतीक आहे. कबड्डी व खो-खो खेळावरील प्रेमापोटी ते पंच परिक्षाही उत्तीर्ण झाले.सन १९९३ ते १९९५ ला प्रशालेचा मुलींच्या खो-खो संघाने जिल्हा स्पर्धेत विजयाची हॅट्रिक केली.यापुढे जाऊन मुख्यमंत्री चषक, डेरवण युथ गेम्स व विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रशालेची यशस्वी घौडदौड सुरु आहे.यापाठीमागे असणा-या श्रेयनामावलीतील विजय पाटोळे हे प्रमुख शिलेदार असल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे.जळगाव येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या किशोरी खो-खो गटासाठी रत्नागिरी जिल्हा संघाचे व्यवस्थापक म्हणुनही त्यांनी यशस्वी जवाबदारी सांभाळली आहे.कोकणातील मुले फक्त खेळातच नाही तर अभ्यासातही हुशार असतात.मात्र घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक मुलांना दुर्दैवाने  शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते.एकीकडे ज्ञानगंगा घरोघरी चा जोमाने प्रसार करणा-या महाराष्ट्रात अशा परिस्थितीने  होरपळलेली होतकरु मुलेही दिसतात.विजय पाटोळेंनी अशा अनेक प्रतिभावंत,अष्टपैलू मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन भक्कमपणे त्यांना मदतीचा हात दिला आहे.मात्र त्याची कुठेही वाच्यता न करता " निरिच्छ दातृत्वाचा " भाव कृतीतून जपला.

    

     शाळेच्या मधल्या सुट्टीत प्रशालेतील अनेक विद्यार्थी पाटोळे सरांच्या कार्यालयीन कक्षात जमा होऊन त्यांच्याशी आस्थेने बोलतात.आपल्या व्यक्तिगत अडचणी सांगतात.त्यांच्या भोवताली विद्यार्थ्यांची झालेली दाटीवाटी संस्कारक्षम मनावर संस्कार करण्यासाठी ते धडपडत असतात याचेच द्योतक आहे. आज आई-वडिलांकडे मुलांसाठी वेळच नाही त्यामुळे मुलांनी मोकळ व्हावं आणि योग्य तऱ्हेने घडावं यासाठी शिक्षकांवर खूप मोठी जबाबदारी येऊन पडली आहे,तळवडे हायस्कूलमध्ये शिक्षकांसह लिपिक असलेले विजय पाटोळेही ती जबाबदारी तळमळीने पार पाडत आहेत. ही बाब शिक्षणक्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अनुकरणीय वाटते. शाळेची हिशेब पत्रके, प्रशासकीय बाबींची सुस्थितीत मांडणी, योग्य नियोजन ,अद्ययावत रेकॉर्ड, विद्यार्थ्यांना विविध लाभांच्या योजनांची त्यांनी केलेली परिपूर्ती नेहमीच अधिकाऱ्यांच्या नजरेत भरली, याचा सुपरिणाम म्हणजेच माध्यमिक शिक्षण विभागाने राबविलेल्या साने गुरुजी गुणवत्ता विकास अभियानात प्रशालेने हॅट्रीक 



 तळवडे हायस्कूलमधून बाहेर पडलेले विद्यार्थी जेव्हा उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय,लांज्याला प्रवेश घेतात तेव्हा त्यांच्याशी साधलेल्या संवादात पाटोळे सरांविषयीचा आदरभाव, जिव्हाळा मला वारंवार अनुभवायला मिळतो. मुलांच्या हृदयात विराजमान असलेले विजय पाटोळे सर म्हणूनच जास्त प्रभावित करतात.


   ओघवती वक्तृत्व शैली त्याला व्यासंगाची जोड असलेले पाटोळे सर उत्तम निवेदक आहेत.तालुक्यातील अनेक संस्थांचे त्यांनी केलेले अभ्यासपुर्ण निवेदन या  क्षेत्रात काम करणा-या युवा वर्गासाठी आदर्शवत ठरावे असेच आहे. सन २९१६ मध्ये प्रशालेचे माजी  मुख्याध्यापक रामचंद्र जाधव सर सेवानिवृत्त झाले त्यावेळी प्रकाशित झालेल्या गौरवांकाचे मुख्य संपादक म्हणुन जबाबदारी  पाटोळे सरांनी यशस्वी करून दाखविली.या अंकाच्या संपादन मंडळात त्यांच्यासोबत काम करताना स्वत:चे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी ते करित असलेले प्रामाणिक प्रयत्न, इतरांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती,मनमिळाऊ स्वभावाची मला कल्पना आली.लांज्यासारख्या छोट्या शहरवजा तालुक्याच्या ठिकाणी मि विविध संस्थातुन करित असलेल्या कामाबद्दल कौतुक वाटणा-या पाटोळे सरांनी सातत्याने मला प्रोत्साहन दिले आहे.माझ्या कार्यशक्तिला प्रोत्साहनाचे खतपाणी घालून तिचे उपयोजन समाजासाठी व्हावे असे वाटणा-या लांज्यातील हक्काच्या पाठीराख्यांमधील पाटोळे सर हे महत्वाचे नाव आहे.

पााटोळे सरांचे जुुुने घर..


      माध्यमिक शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सुख-दु:खात सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना बळ देण्या-या पाटोळे सरांनी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.प्रसंगी विचारांच्या तत्वासाठी संघर्ष केला.आपल्या सहका-यांची काळजी घेणा-या पाटोळे सरांमधील नेतृत्व गुणांची कल्पना संघटनेच्या वरिष्ट पदाधिका-यांना आल्यानेच रत्नागिरी जिल्हा माध्यमिक सहकारी पतपेढीत संचालक म्हणुन काम करण्याची संधी त्यांना मिळाली.या संधीचे सोने केल्याने लवकरच पतपेढीच्या उपाध्यक्ष पदी त्यांची वर्णी लागली.प्रशासकीय अभ्यास व अनुभवाच्या जोरावर सहकार क्षेत्रातही आपली कार्यमुद्रा उमटविण्यात पाटॊळे सर यशस्वी ठरले.


  केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे।

  यत्न तो देव जाणावा । अंतरी धरितां बरें।


       -- या उक्तिप्रमाणे प्रयत्नवादामुळेच मानवी मनात स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.यातून कर्ते लोक तयार होतात.त्यामुळे माणुसपणाच्या भोवती जमलेली दैववादाची कोळीष्टके आपोआप नाहीशी होतात.यातुन पुरुषार्थी माणूस तयार होतो. समर्थांच्या वाड:मयीन सुत्राचा आपल्या जीवनात उपयोग केल्यानेच विजय पाटोळे सर आजवरच्या वाटचालीत यशस्वी झाले आहेत.सातत्यपूर्वक प्रयत्नानीच विविध क्षेत्रात काम करण्याची संधी त्यांना मिळाली.लांजा तालुका मराठा संघ,रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन, तळवडे ग्रामविकास मंडळ,विविध कार्यकारी सोसायटी,रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्य.शाळा संघटना,शाळा सेवक सहकारी पतपेढी आदी संस्थांना त्यांनी केलेल्या रचनात्मक कामाचा उपयोग झाला आहे.



       शाळेमध्ये लिपिक म्हणून काम करणारा मनुष्य शाळेचं दप्तर, पगारपत्रकं आणि वार्षिक जमाखर्च लिहिण्यापलीकडे जाऊन किती विविध प्रकारच्या कार्यात सहभागी होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे  विजय पाटोळे. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक कार्याचा एक छान लेखाजोखा या गौरवांकाच्या रूपाने साकारला जात आहे. विजयरावांनी विविध प्रकारच्या कार्यात केवळ भागच घेतला नाही, तर कितीतरी उपक्रम स्वतः सुरू केले; आणि इतरांसोबत काम करताना सर्वांबरोबर राहूनही स्वतःच्या कार्यक्षमतेची, कल्पकतेची आणि सार्वजनिक दृष्टीची मुद्रा उमटविली.एका अर्थाने त्यांचे चार दशकांचे सकारात्मक काम 'विजयपर्व'च जणू! म्हणुनच पाटोळे सरांचा गौरव होत असताना त्यांच्या शुभम व अभिनंदनीय गोष्टिंचा पट मांडण्याचा प्रयत्न केला.

       

     आगामी काळात पाटोळे सरांना निरामयी दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून समाजोद्धाराचे व विद्यार्थ्यांच्या विकासाचे सत्कार्य निरंतर घडो ही सदिच्छा.


विजय हटकर,-८८०६६३५०१७

लांजा,

     


श्री विजय पाटोळे गौरवांकाचे सुुुबक मुखपृष्ठ.

Wednesday, October 12, 2022

कोकणच्या इतिहासाचा नंदादीप मालवला...

 कोकणच्या इतिहासाचा नंदादीप मालवला...



     कोकणच्या इतिहासाला अविरत संशोधनातुन नवा आयाम देणारे ,असंख्य अभ्यासकांचे श्रद्धास्थान असलेले ९३ वर्षीय इतिहास संशोधक अण्णा शिरगांवकर यांचे काल (११ आॅक्टोबर)रोजी चिपळुण येथे निधन झाल्याचे वृ्त कळताच धक्का बसला.१६ जुलै २०२२ ला शिरगांव ता.चिपळुण येथे झालेल्या तासाहुन अधिकच्या भेटीत त्यांच्या बोलण्यातील आत्मविश्वासावरुन अण्णा शतक पुर्ण करतील असे वाटत असताना ९३ व्या वर्षी त्यांना मृत्यूने गाठले.त्यांच्या अशा जाण्याने कोकणच्या इतिहास, संस्कृती ,सामाजिक क्षेत्रात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.


    खरं तर अण्णांची झालेली पहिली भेट माझ्या आजही चांगलीच स्मरणात आहे.२५ डिसेंबर २०१५ रोजी मी आमच्या ज्युनियर काॅलेज लांज्याची शैक्षणिक सहल घेऊन दापोली तालुक्यातील दाभोळ या ऎतिहासिक गावाला भेट दिली होती.यावेळी कोकणातील शोधक पत्रकार व पर्यटन अभ्यासक म्हणुन दखलपात्र काम करणा-या श्री धीरज वाटेकर यांच्या माध्यमातून अण्णांच्या दाभोळ येथील "अपरान्त "निवासस्थानी सायं.६:३० च्या दरम्यान अण्णांची भेट झाली.यावेळी घराच्या अंगणात माझ्यासह सहलीत सहभागी झालेल्या ४१ मुलांनी इतिहास संशोधक अण्णांशी संवाद साधला.यावेळी अण्णांनी ४०:०० मिनीटाच्या व्याख्यानात इतिहासप्रसिद्ध दाभोळ बंदरांचा इतिहास आपल्या नर्मविनोदी शैलीत उलगडवला. यावेळी अण्णानी अनेक दशके अथक मेहनतीतुन कोकण धुंडाळुन जमा केलेला संग्रह व पुस्तकांचा खजिना आम्हाला दाखवित शिक्षक म्हणुन जास्तीत जास्त पुस्तके वाचा तरच समृद्ध पिढी घडवाल असा प्रेमळ सल्लाही दिला.या पहिल्याच भेटीत अथक संशोधनातुन कोकणच्या इतिहासाला नवा आयाम देणा-या  इतिहास संशोधक अण्णांच्या व्यक्तिमत्वाने आमच्या मनावर कायमचीच मोहिनी घातली.इतिहास - कोकण हे आमचेही आवडीचे विषय असल्याने पुढे अण्णांशी शिष्यत्वाचे नातेच जडले.

        

    इतिहासाच्या वेडापायी अख्खा कोकण पायथा घालून अण्णांनी ताम्रपट,शिलालेख ,प्राचीन मूर्त्या, हस्तलिखिते,दूर्मिळ पत्रे,शस्त्रे, नाणी शोधून काढत कोकणच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याचे काम करित कोकणला प्राचीन इतिहास नाही असे म्हणणा-या अभ्यासकांचे पुराव्यानिशी म्हणणे खोडून काढले. याकामी त्यांनी अथक मेहनतीतुन शोधलेल्या ९ ताम्रपटांनी तर मोठ्या इतिहास संशोधन संस्थाही अवाक झाल्या. कोकणच्या इतिहासावर अधिक संशोधन व्हावे ,नव्या तरुण अभ्यासकांनी याकडे वळावे यासाठी डाॅ.दाऊद दळवी, श्री रविंद्र लांड यांच्यासह त्यांनी कोकण इतिहास संशोधन परिषदेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. गेटवे आॅफ दाभोळ , शोध अपरान्ताचा, प्रकाशदीप , इकडचं तिकडचं, माॅरिशस,इस्त्राइल आणि युरोप , ऎतिहासिक दाभोळ-वर्तमान व भविष्य , शेव चिवडा इ.दर्जेदार पुस्तके लिहून मराठी वाड:मय व कोकणचा इतिहास या विषयात त्यांनी मौलिक भर घातली. इतिहासाबरोबरच मराठी भाषेवरील प्रेमापोटी कोमसाप च्या दापोली  शाखेला त्यांनी दिशा दिली.दापोलीत झालेल्या कोमसापच्या साहित्य संमेलनातील त्यांचे अध्यक्षीय भाषण कोकणातील मराठी साहित्य विश्र्वाची माहिती देणारे आहे.तेव्हाच्या सावंतवाडीपासुन मंडणगड पर्यंत पसरलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचे बांधकाम सभापती पद भुषवित त्यांनी राजकरणात तत्वनिष्ठता,वैचारिक अधिष्ठान जपत मोठा लोकसंग्रह निर्माण केला.मात्र जास्तवेळ ते राजकरणात रमले नाहीत.

   


      साधारण २०१६ च्या आसपास विजय,आपण लांज्याला कोकण इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन भरवुया अशी इच्छा व्यक्त करित या संदर्भात बैठक घेण्यासाठी रविंद्र लाड, सदाशिव टेटविलकर, प्रविण कदम, डाॅ.विद्या प्रभू ,डाॅ.अंजय धनावडे या मंडळींसह अण्णा लांज्याला आले होते.यावेळी लांजा महाविद्यालयात झालेल्या बैठकीत लांज्याचा आजवर पुढे न आलेला इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी लांजेकरांनी या परिषदेच्या आयोजनात पुढाकार घ्यावा असा आग्रह ही त्यांनी केला. मात्र तांत्रिक कारणांनी ती परिषद पुढे लांज्यात आयोजित करता न आल्याने अण्णांच्या अभ्यासपुर्ण व्याख्यानाची संधी मात्र आम्ही गमाविल्याची खंत मला अनेक दिवस बोचत राहीली.मात्र या नंतरही अण्णा मोबाईलवरुन आस्थेने संपर्क साधून वडिलकीच्या नात्याने चौकशी करितच राहिले.यामुळेच त्यांच्या साध्या ,निर्मळ स्वभावाने अनेकांना मोहिनी घातली.कोरोनाच्या वैश्र्विक संकटात मराठी भाषेतील अनेक दिवाळी अंक बंद पडण्याच्या मार्गावर असताना आम्ही मार्गदर्शक सुभाष लाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोडी लिपी चा प्रचार करणारा मोडीदर्पण दिवाळी अंक पुन्हा एकदा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला याचा अण्णांना आनंद झाला होता.कारण लाड सरांनी मुंबईत ' मोडी लिपी मित्र मंडळाची' स्थापना केली तेव्हा मोडी लिपीच्या प्रचारार्थ १९९७ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अण्णा प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.गतवर्षीच्या मोडीदर्पण दिवाळी अंकातील त्यांचा ' जुनं आता काय राहिलंय नाय!' हा विचार करायला प्रवृत्त करणारा लेख वाचून अनेक वाचकांनी लेख आवडल्याचे अभिप्राय कळवित अण्णांविषयी आदरभाव व्यक्त केला.

     खरं तर अण्णा ऎषोआरामी आयुष्य सहज जगले असते मात्र दाभोळच्या खाडीपरिसरातील वंचित,गरजू, बहुजन मुलांच्या भविष्याचा विचार त्यांच्यातील समाजसेवकाला स्वस्थ बसु देत नव्हता.या उपेक्षितांच्या आयुष्यात आनंदाचा मळा फुलविण्यासाठी अण्णांनी १९८३ ला सागरपुत्र विद्या विकास संस्थेची स्थापना केली.यामुळे अनेकांच्या जीवनाला दिशा मिळाली.अण्णांच्या सहवासात जीवनाचे नेमके प्रयोजन कळल्याने सागरपुत्र मधुन बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी आज सेवाव्रती भावनेनं समाजात कार्यरत आहे.अण्णांच्या त्यागाचं ते  अविट फळ आहे. नंदिनी काकूवर असलेल्या निस्सीम प्रेमाचे प्रतिक म्हणुन त्यांनी शब्दबद्ध केलेले आनंदिनी तर प्रत्येक पुरुषाने आपल्या जीवनातील स्त्री शक्तिकडे कसे पहावे याचा वस्तुपाठ घालून देणारेच आहे.मात्र त्यांच्या सगळ्या कार्यात सोबत असणारी नंदिनी काकू साथ सोडून गेल्यावर मात्र अण्णा आतून खचले होते.तरीही सहका-यांच्या साथीने त्यांनी आपल्या सहचारीणीचा प्रत्येक स्मृतिदिनाला साहित्यिक निर्मितीतून वाहिलेली आदरांजली ही वाड:मयीन चळवळीतील दूर्मिळ उदाहरण असावे.यामुळेच ते वेगळे ठरले.अखेरच्या श्वासापर्यंत स्मरणशक्ति,श्रवणशक्ति , चिंतन-मननशक्ति या त्यांच्या सर्व शक्ति शाबुत होत्या.हे त्यांचं आणि आपलं भाग्यच!


      सृष्टी फुलविण्यासाठी विध्यात्याने आपल्याला जन्माला घातले आहे हे जीवनाचे प्रयोजन समजलेली माणसे कामालाच पुजा मानून सतत कार्यमग्न असतात.ही कार्यमग्नताच खरी दीर्घायुषी जीवनाचे गुपित आहे.हे सहस्त्रचंद्रदर्शन  सोहळा अनुभवलेल्या व्यक्तींशी साधलेल्या सहजसंवादातून सहज उमगते. आयुष्यभर कार्यमग्न राहून स्वर्गीय सुंदर कोकणच्या इतिहासाला आयाम देणा-या ९३ वर्षीय इतिहास संशोधक , कोकणचा चालता बोलता कोष बनलेल्या अण्णा शिरगांवकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड यांच्यासह आम्ही १६ जुलै २०२२ रोजी म्हणजे साधारण तीन महिन्यापुर्वी शिरगांव येथे त्यांच्या मुलीच्या घरी सदिच्छा भेट घेतली. आयुष्यभर समाजासाठी, कोकणच्या इतिहासासाठी, वंचितांच्या शिक्षणासाठी झटलेल्या अण्णांचा सत्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा हे त्यामागचे प्रयोजन होते,मात्र आम्ही सत्कार करण्याआधीच त्यां भरभरुन देणा-या हाताने आम्हा तीघांच्या खांद्यावर आमच्या कार्याचे कौतुक म्हणुन आयुष्यभर पुरेल इतक्या मायेची ऊब देणारी शाल पांघरुन " सार्थकी जगणे " या संकल्पनेचा अर्थ उलगडवून दाखविला.अण्णांच्या या अनपेक्षित कृतीने डोळ्यात कृतज्ञतेच्या आसवांनी दाटीवाटी केली होती.सोबतच आम्ही करित असलेल्या बिनखुर्चीच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचेही त्यांनी कौतुक केले.हा क्षण कायमचाच हृदयात कोरुन गेला.आज सकाळी कोकणच्या इतिहासाला प्रकाशात आणणारा हा नंदादीप मालवल्याचे वृत्त कळताच धक्काच बसला.मात्र या नंदादीपाने दाखविलेल्या प्रकाशात कोकणचा इतिहास अधिक उठून दिसेल हे निश्चित! एकुणच 

 उत्कट भव्य तेंची घ्यावे।मळमळीत अवघेंचि टाकावे            निस्पृहपणे विख्यात व्हावे।भूमंडळी।

    याला अनुसरून जगणे जगणा-या अण्णांना मोडीदर्पण परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !


विजय हटकर

८८०६६३५०१७

Saturday, August 27, 2022

कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री दूर्गाराम गवस

 

कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री दूर्गाराम गवस.



      कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणजे समाजाचे भूषण! असे शिक्षक आपोआपच समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी अगत्याचा, आदराचा विषय बनतात.राजापूर तालुक्यातील स्वर्गीय सौंदर्य व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रिंदावण येथील सेनापती बापू गोखले विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री दुर्गाराम वामन गवस अशांपैकीच एक. गत ३४ वर्षे ०३ महिने ज्ञानदानाचे पवित्र काम अविरतपणे पार पाडत कर्तव्यदक्षता व कार्यशिक्षणाचा आदर्श वस्तुपाठ ठेवत शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे दुर्गाराम गवस सर २८ आ‌गस्ट २०२२ रोजी शिक्षक सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. या औचित्याने त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा लेख...

      रत्नागिरीच्या दक्षिणेकडे वसलेल्या राजापूर व लांजा या दुर्गम तालुक्यांच्या विकासासाठी गत सात दशके राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्था कार्यरत आहे.या संस्थेच्या वतीने सन २०२०साली नाटे,ता.राजापूर येथे संपन्न होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात देण्यात येणारा प्राध्यापक मधु दंडवते पुरस्कार प्रिंदावण हायस्कूलच्या गवस सरांना जाहीर झाला होता आणि त्यांच्यावर माघ महिन्यात कौतुकाच्या झडी बरसल्या. यावेळी राजापूर शाखेचे अध्यक्ष महादेव पाटील सर यांनीही गवस सरांविषयी कौतुकोद्गार काढल्याने त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता वाढली होती. संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या पत्रिका विशेषांकात पुरस्कारप्राप्त गवस सरांची माहिती प्रसिद्ध करण्याच्या हेतूने मी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला. फोनवर समोरून बोलणारे शांत ,निर्गवी, साध्या, सात्विक गवस सर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय या पहिल्याच अप्रत्यक्ष भेटीत मला आला. या पहिल्या भेटीपासून गेली दोन वर्षे मी सरांच्या संपर्कात असल्याने त्यांच्याशी जोडलेल्या स्नेहबंधातून गवस सरांनी खेड्यात राहून ज्ञानदान करताना निरलस कार्यातून  मोठा लोकसंपर्क जमविल्याची अनुभूती आम्हाला आली.

       पर्यटनसमृद्ध सावंतवाडी तालुक्यातील तळकट हे त्यांचे मूळ गाव. श्री  वामन गवस व सौ.मनोरमा या  शेतकरी दांपत्याच्या पोटी ०१ ऑगस्ट १९६४  रोजी त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती प्रतिकूल,खडतर.तरिही समाजसेवा हायस्कूल कोलझर, ता.दोडामार्ग येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.या कामी तळकट गावातील शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व श्री आबा देसाई यांनी दूर्गाराम गवस यांना मोठे सहकार्य केल्याचे ते सांगतात.  पुढे खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा येथे उच्च माध्यमिक शिक्षण यशस्वी पूर्ण करीत सावंतवाडी शहरातील पंचम खेमराज महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला. त्यावेळी गवस सरांचे मामा श्री. आर.एल. सावंत तिथल्या पोलीस ठाण्यात पोलीस म्हणून कार्यरत होते. या खाकी वर्दीतल्या सह्रदयी व्यक्तिमत्वाने दुर्गाराम गवस यांना पोटच्या मुलाप्रमाणे आधार दिल्याने सांस्कृतिक ,शैक्षणिक, साहित्यिक चळवळीचे अधिष्ठान असलेल्या सावंतवाडी शहरात सरांच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा मिळाली. सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभला.सावंतवाडी संस्थानच्या विकासाचे शिल्पकार असलेले शिवरामराजे भोसले यांनी सावंतवाडी परिसरात शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय तेथील लोकांचे दुर्भिक्ष्य संपणार नाही या जाणिवेने "दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाची" स्थापना केली.या  मंडळाच्या मार्फत ७५ हजार रुपये खर्च करीत पंचम खेमराज महाविद्यालयाची  मूहूर्तमेढ रोवली.या शैक्षणिक संकुलाचे फायदा सावंतवाडी दोडामार्ग भागातील गवस सरांसारख्या हजार विद्यार्थ्यांना झाला. पाच वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेलेल्या, सतत कार्यमग्न व सकारात्मक दृष्टी असलेल्या शिवरामराजे भोसले यांच्या विचारांचा दुर्गाराम गवस यांच्यावर प्रभाव पडला.उच्च शिक्षण घेऊन कोकणातील खेड्यापाड्यात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी शिक्षक बनण्याचा निर्धार त्यांनी केला. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाईसाहेब सावंत अध्यापक विद्यालय सावर्डे, ता. चिपळूण येथे त्यांनी बी.एड.ची पदवी १९८८ मध्ये प्राप्त केली. यावेळी राजापूर तालुक्यातील प्रिंदावण या गावात सुभाष सोनू मुंगी नावाचे क्रियाशील प्राथमिक शिक्षक काम करीत होते. प्रिंदावण गावातील सेनापती बापू गोखले विद्यामंदिरात हिंदी,भूगोल विषय शिक्षकाची जागा रिक्त असल्याचे त्यांनी गवस यांना कळविले .गावात मुंगी सरांच्या शब्दाला मान होता.१जुलै १९८८ रोजी त्यांची नेमणुक झाली.

करिअरचा प्रारंभ,सेवेची सुसंधी :--
             दोन दशके सरपंच म्हणून यशस्वी काम करणारे सामाजिक ,शिक्षणप्रेमी कार्यकर्ते श्री प्रभाकर उर्फ आप्पा सप्रे यांनी ज्ञानवर्धिनी प्रिंदावण संस्थेची स्थापना सहकाऱ्यांचा सहकार्याने केली व प्रिंदावण विद्यामंदिराची मुहूर्तमेढ रोवली. दूर्गाराम गवस यांचा अभ्यास आणि तयारी पाहून आप्पा सप्रे व  सर्व संचालकांनी ०१ जुलै १९८८मध्ये हिंदी व भूगोल विषय शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक आपल्या प्रशालेत केली. गेल्या चौतीस वर्षाच्या कारकिर्दीत दुर्गराम गवस यांनी आपली निवड किती योग्य होती हे वेळोवेळी सिद्ध केले आहे.
        १९९० च्या दशकात कोकणातील खेड्यापाड्यातील दुर्गमता पाहून इकडे नोकरी करणे एक आव्हानच होते. वाहतुकीची साधने मर्यादित होती. तालुक्याच्या ठिकाणाहून दिवसाला सकाळी एक  व सायंकाळी एक अशा दोनच एसटीच्या फेऱ्या असत. गावाला तालुक्याशी जोडणारे ते महत्वाचे माध्यम होते. खेडी दुर्गम असली तरी स्वयंपूर्ण होती. राजापूर तालुक्यातील आडवाटेला, स्वर्गीय सुंदर प्रिंदावण गाव हे तीन बाजूला उभे असलेले हिरवेगार डोंगर व एका बाजूने संथ वाहणारी शुक(सुख) नदी यांच्या सानिध्यात वसले आहे.गावाच्या मध्यभागी भटवाडी परिसरात एक छोटा पूल लागतो हा ओलांडला  की समोर डावीकडे सेनापती बापू गोखले यांनी जीर्णोद्धार केलेले प्राचीन  महादेव मल्लीकर्जून मंदिर तर उजवीकडे ग्रामदेवता श्री महालक्ष्मीचे देखणे मंदिर आहे. त्यांच्या समोरच्या छोट्याशा उंचवटा असलेल्या भागावर सेनापती बापू गोखले विद्यामंदीराची प्रशस्त इमारत उभी आहे. याचे बांधकाम गावकऱ्यांनी स्वतः केले आहे.
        शाळेच्या सुरुवातीच्या तीन वर्षाच्या काळात शाळेला अनुदान नव्हते, इमारतही नव्हती त्यावेळी दत्तात्रय प्रभूदेसाई यांच्या घराला पडव्या बांधून तात्पुरती शाळा सुरू करण्यात आली होती.अशा खडतर परिस्थितीत दूर्गाराम गवस सर आपल्या सहकारी शिक्षकांसह येथे विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न बनवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करित होते.त्या काळात शाळेत यायला मुले भरपुर होती पण प्रभुदेसाईंच्या घरातील तात्पुतत्या शाळेत जागा कमी पडत होती.आज काळ बदलला. जागा भरपुर आहे,देखणी इमारत आहे पण मुंबईला जाणा-या तरुणाईच्या संख्येत वाढ झाल्याने गावात शिकणा-या मुलांची संख्याच कमी आहे.आज पटसंख्या घसरत आहे, हे शल्य गवस सरांसह आज सर्वच गावक-यांना आहे.


      

दूर्गाराम गवस यांना मिळालेले पुरस्कार. :-
® राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई - प्राध्यापक मधु दंडवते आदर्श शिक्षक पुरस्कार
®राजापूर तालुका माध्यमिक अध्यापक संघ - आदर्श शिक्षक
® रत्नागिरी जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ - आदर्श शिक्षक
® सेनापती बापू गोखले प्रतिष्ठान प्रिंदावण - आदर्श शिक्षक पुरस्कार
----------------------------------------


शाळेशी जडले जन्माचे नाते :--

        शाळेच्या उभारणीच्या काळातील आठवणी जाग्या झाल्या की आजही गवस सर भावूक होतात.सुट्टी ला गावी गेलेले गवस सर त्यावेळी देवगड तालुक्यातील कोर्ले धालवली या ठिकाणी येऊन होडितून शुक नदी पार करुन शाळेत हजर होत,नाहीतर प्रिंदावण तिठ्यातून ०२ कि.मी. घाटी उतरत शाळेत दाखल होत,मात्र त्या दूर्गमतेतही विद्यार्थ्यांना घडविण्याचा आनंद त्यांना मिळत होता.खरं तर गवस सरांची जन्मभुमी सिंधूदूर्ग असली तरी कर्मभुमी प्रिंदावणमध्ये ते इतके रुळले होते  की प्रिंदावण हे त्यांचे दुसरे गावच जणू! 
        आपण ज्या परिसरात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतो त्याचे पावित्र्य राखायचे असेल तर ग्रामस्थांची मने शिक्षकाला जिंकावी लागतात.ज्ञानाचा वृक्ष वाढवावा लागतो.ज्ञानवृक्षाची देखभाल करावी लागते.गवस सरांची यादृष्टीने नेहमीच धडपड चाललेली असे.सेनापती बापू गोखले विद्यामंदिराच्या उभारणीवेळी गवस सरांनी सहका-यांसह गावात ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन निधी गोळा केला.सुट्टिमध्ये मुंबईस्थित चाकरमान्यांना भेटून शिक्षाणाचे महत्वाचे पटवून त्यांच्याकडून निधी उभा करण्यात संस्थाचालकांसह गवस सरही पुढे होते.या निधीतुनच शाळेच्या प्रशस्त वास्तूत आज प्रिंदावणसह  शेजारच्या बांदिवडे, उपळे, वाल्ये, या चार गावातील मुले आपल्या स्वप्नांना साकार करू पाहत आहेत.या इमारतीच्या उभारणीत बांदिवडे गावचे सूपूत्र  श्री शशिधर कोकाटे व प्रदीप यशवंत कोकाटे यांचे लक्षणीय योगदान लाभले.गवस सर ज्यावेळी इथे आले त्यावेळी आप्पा सप्रेंच्या घरातच त्यांचे वास्तव्य होते.पुढे महेश सप्रे यांच्याकडे त्यांचे वास्तव्य होते.या दरम्यान त्यांनी गावक-यांना आपलेसे करुन घेतले.लोकांशी कसे वागावे याबाबतची काही मूलभूत तत्वे प्रेमळ स्वभावाच्या गवस सरांकडून शिकण्यासारखी आहेत.शाळेत शिकविता शिकविता गावातील सामाजिक कामातही समरस झालेल्या गवस सरांची अध्यापनातील तळमळ, निष्ठा पाहून ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायतीच्या दोन खोल्यात त्यांची राहण्याची व्यवस्था केली.महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रातील कदाचित हे एक दुर्मिळ उदाहरण असावे.

         देशाला सर्वाधिक राष्ट्रपुरूष  देणाऱ्या बुद्धीजीवी कोकणभूमीत प्रचंड गुणवत्ता असलेली मुले आहेत,मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने कोकणी टक्का पुढे जात नाही, हे मराठेशाहीचे अखेरचे सरसेनापती असलेल्या नरवीर बापू गोखले यांच्या मूळ गावात काम करत असलेल्या गवस सरांच्या लक्षात आले.या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक आहे हे जाणून गवस सरांनी पालकांचा विश्वास संपादन केला.त्यामुळेच गेल्या ३४ वर्षाच्या कार्यकाळात त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देणारे  नव-नवे सर्जनशील उपक्रम राबविता आले.शिक्षण ही आनंदाची प्रक्रिया असावी याकडे त्यांनी लक्ष दिले. यासाठी दूर्गाराम गवस यांना रावसाहेब नाना पाटीलसर , अण्णासाहेब शिरोटे सर या सुरवातीच्या मुख्याध्यापकांनी स्वातंत्र्य दिले. १९९९-२००३ या कार्यकाळात मुख्याध्यापक म्हणून काम पाहणारे अण्णासाहेब शिरोटे सरांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यांच्या सहवासात लोकांशी सुसंवाद साधण्याचे कौशल्य, शाळेत दाखल झालेल्या अधिकारी वर्गाला कसे हाताळावे याबाबतचे बारकावे शिकता आल्याचे गवस सर आवर्जून सांगतात.त्यानंतर आलेल्या महावीर चकोते सर, सुरेश पाटील सर, अण्णासाहेब पाटील सर, रावसाहेब पाराज सर, दादा भगाटे सर, गणपती भोसले सर व सुभाष शिरहट्टी सर या सर्वच मुख्याध्यापकांच्या कार्यकाळात गवस सरांनी एक उमक्रमशील शिक्षक म्हणून काम केले तसेच त्यांचेही सहकार्य त्यांना मिळाले.मधल्या काळात साधारण १९९७ ला तत्कालिन कारणांमुळे प्रशाला आदर्श शिक्षण संस्था कोथळी,ता.शिरोळ जि.कोल्हापूर या संस्थेकडे  सोपविण्याचा निर्णय संस्थाचालकांनी घेतला.या स्थित्यंतराच्या काळातही मुलांची शैक्षणिक गुणवत्ता
टिकविण्यासाठी या विद्यामंदिरातील शिक्षकांनी कसोशीने प्रयत्न केले.या एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला शाळेचा एकुण निकाल ७०% च्या आसपास होता तो आज दोन सालानंतर १००% वर पोहचला आहे.
    

      पुस्तकमित्र बी.केे.गोंडाळ व गुुुणे सरांसह...

----------------------------------------
दूर्गाराम गवस सर यांनी काम केलेल्या संस्था  :-
® माध्यमिक शिक्षक संघटना ता.राजापूर - कार्यकारिणी सदस्य
® रत्नागिरी जिल्हा हिंदी शिक्षक संघटना - तालुकाध्यक्ष राजापूर
® जि.प.आदर्श शाळा तळकट नं.१ शतकमहोत्सवी समिती - अध्यक्ष
®सेनापती बापू गोखले विद्यामंदिर प्रिंदावण,शालेय समिती - सचिव
®सेनापती बापू गोखले युवा प्रतिष्ठान - सदस्य
®विठ्ठल रखुमाई मंदिर तळकट, कट्टा ,दोडामार्ग - माजी उपाध्यक्ष
® जवाहर नवोदय विद्यालय ,सांगेली - विद्यासमिती सदस्य
सन २०१४-१८

----------------------------------------

शाळा हेच घर,विद्यार्थी हेच सर्वस्व :--
         गेल्या ३४ वर्षाच्या कार्यकाळात राष्ट्रभाषा हिंदी या विषयाचे प्रभावी अध्यापन करित राष्ट्रभाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये आस्था निर्माण करण्यात गवस सर यशस्वी ठरले आहेत.गवस सरांनी राजापूर तालुक्याच्या हिंदी पंधरवडा या उपक्रमाचे यशस्वी आयोजन प्रशालेत केले आहे.त्याचबरोबर सन २०११ मध्ये राजापूर तालुका अध्यापक संघाचा मेळावा व शैक्षणिक सहविचार सभेचे आयोजन प्रिंदावण येथे करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.हिंदी सह भूगोल विषयाचे प्रभावी अध्यापन करणारे शिक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गवस सरांची दखल घेऊन शेठ नविनचंद माफतलाल विद्यालय खारेपाटण या प्रशालेने सरांना ०५ वर्षे एस.एस.सी.बोर्ड परिक्षा उपकेंद्रसंचालक, ०१ वर्ष केंद्रसंचालक म्हणुन काम करण्याची संधी दिली.त्याचबोरोबर भुगोल विषय परीक्षक, नियामक, मुख्यनियामक,हिंदी व भूगोल विषयाचे तज्ञ शिक्षक म्हणून त्यांनी यशस्वी कामकाज केले आहे.शाळा हेच घर व विद्यार्थी हेच सर्वस्व मानून त्यांनी आजवर वाटचाल केली आहे.
     
हवेहवेसे मुख्याध्यापक :--
            गवस सर ०१ जून २०२१ रोजी शाळेच्या मुख्याध्यापकपदी विराजमान झाले त्यावेळी माजी विद्यार्थी, ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.बांदिवडे, उपळे व प्रिंदावण गावातील ग्रामस्थांनी त्यांचा त्यावेळी ह्दद्य सत्कार केला.माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.मुख्याध्यापक पदाच्या वर्षभराच्या कालावधीतही त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याची ओळख आपल्या कामातून करुन दिली आहे.प्रिंदावण गावाभोवती असलेल्या डोंगरांमुळे शाळेच्या इमारतीचे पत्रे माकडांनी हौदोस घालून फोडले आहेत.यासाठी माजी विद्यार्थ्यांना  सरांनी साद घातली.परिणामी जवळपास सव्वालाखाहून अधिक निधी गोळा झाला आहे.या निधीतून पाऊसाळा संपल्यावर ईमारतीचे पत्रे बदलले जाणार आहेत.कोरोनाकाळात तालुक्यातील इतर शाळा बंद असताना या पंचक्रोशीत कोरोनाबाधीत रुग्णसंख्य मर्यादित असल्याने त्यांनी संस्था,सरपंच, ग्रामस्थ व सहका-यांच्या मदतीने प्रत्यक्ष शाळा सुरु ठेवून अध्यापन केल्याने ग्रामीण भागातील आॅनलाईन शिक्षणात येणा-या अडचणींचा इथल्या मुलांना सामना करावा लागला नाही.सरांच्या कालावधीत राष्ट्रीय सर्व्हेक्षण समितीने या शाळेतील दहावीचा वर्ग सर्व्हेक्षणासाठी निवडला होता.या न्यास समितीने ही सरांच्या नेतृत्वाखाली प्रशालेची घौडदौड पाहून त्यांचे विशेष कौतुक केले.आजवरच्या ३४ वर्षाच्या शैक्षणिक सेवेतील त्यांचे योगदान पाहून अनेक नामांकित संस्थांनी त्यांना गौरविले आहे, त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत राहिले आहेत मात्र त्यांनी विद्यार्थी हितालाच नेहमी प्रथम प्राधान्य दिले आहे.त्यामुळेच प्रिंदावण पंचक्रोशीत त्यांच्याविषयीचा आदरभाव वाढीस लागला आहे.गवस सरांना या वाटचालीत प्रशालेतील सहकारी  केसरकर सर,  मुणगेकर सर, बंडगर सर, भोंगण सर व लेखनिक विजय तिर्लोटकर यांची साथ मोलाची ठरल्याचे ते आवर्जून सांगतात.तसेच प्रिंदावण ,बांदिवडे, उपळे, वाल्ये गावतील ग्रामस्थांनी केलेले प्रेम  कधीच विसरता येणार नाही असे सांगताना गवस सर भावुक होतात.
      


श्री गवस सर कुुुुुुटुंबासह...
 

 
   कौटुंबिक जबाबदारीचे भान :--
       ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षाणाकडे लक्ष देतानाच त्यांच्या मुलांच्या संगोपनाकडेही त्यांनी विशेष लक्ष दिल्याने सरांच्या चिरंजीव अक्षय हा ५ वी, ८वी ,१० वी शिष्यवृत्तीत झळकला.आज अक्षय मरून इंजिनयर झाला असून सिंगापूर येथे बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर काम करतो आहे.तर सुकन्या कु.अनुष्का ही नवोदय मध्ये शिक्षण घेऊन सध्या चाणक्य मंडळ पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करित आहे.यामध्ये त्यांच्या सहचारिणी सौ.दक्षता गवस यांचा मोलाचा वाटा असल्याचे ते नमूद करतात.सौ. दक्षता गवस या उपक्रमशील प्राथमिक शिक्षिका म्हणुन शिक्षण क्षेत्रात परिचित अाहेत.राजापूर तालुक्यातील जुवाठी येथील प्राथमिक शाळेत त्यांनी ज्ञानादानाचे काम केले आहे.सध्यस्थितीत त्या सावंतवाडी येथे कार्यरत आहेत.
         सरांचे बंधू गोविंद उर्फ आबा वामन गवस उच्च विद्याविभूषित असून गोव्यात एका रासायनिक कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या पत्नी सौ.शीतल य प्राथमिक शिक्षिका आहेत.मुलगा आदित्य हा संगणक अभियांत्रिकी ( कम्प्युटर इंजिनिअरिंग) ची तयारी करत आहेत.गवस सरांच्या वाटचालीत त्यांची मोठी बहीण आश्विनी अशोक देसाई यांचा सिंहाचा वाटा आहे.दूर्गाराम गवस यांनी उच्च शिक्षण घेऊन स्थिरस्थावर व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले.दोन वर्षापूर्वी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.काका लिंगाजी गो.गवस यांचेही मार्गदर्शन सरांच्या वाटचालीला दिशादर्शक ठरले.आपल्या जीवनात सहकार्य करणा-या प्रत्येकाविषयीची कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते, आपल्याला कळत नकळतपणे अनेक जण सहकार्य करित असतात,त्यांची अपेक्षा असो वा नसो,त्यांच्याविषयी कृतज्ञता आपल्या मनात जागृत झाली की पुढचं सारं आयुष्य 'कृतघ्न' या शब्दाशिवाय पूर्णत्वास जाते असे मानणारे गवस सर आजच्या कृतज्ञता भावच हरविलेल्या जगात म्हणुनच दखल घेण्या योग्य वाटतात.
         एकूणच साचेबंद शिक्षणाच्या परिघाबाहेर जाऊन विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करतानाच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक गवस सर आज असंख्यांच्या मनात ज्ञनरुपी प्रकाशाचा दीप जागवत सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्ती ही खरं तर जगण्याची दुसरी आवृत्ती असते.तळकट गावातील ग्रामदैवत माऊली व म्हातारबा ,प्रिंदावण येथील मल्लिकार्जून व महालक्ष्मी तसेच सावंतवाडीतील श्री पाटेकर, श्री उपरलकर ,श्री स्थापेश्र्वर वर नितांत श्रद्धा असणारे गवस सर भविष्यातही शिक्षणासारख्या समाज उभारणीतल्या पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत राहतील हा विश्वास त्यांना ओळखणाऱ्या अनेकांच्या मनात आहे.सरांवर सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य प्रदीर्घ निरामयी आनंददायी जावो हीच शुभकामना!

🍀🍀🍀🍀🍀
     विजय हटकर.
      लांजा -रत्नागिरी.
   ८८०६६३५०१७

एकत्र कुुुुुुटुंबपद्धतीचे आदर्श उदाहरण - गवस कुटुंबिय...


अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...