Thursday, August 25, 2022

जीवनाला आकार देणारी पत्रमैत्री.

 

जीवनाला आकार देणारी पत्रमैत्री...


         मला लांजा बाजारपेठेतील शिरवटकरांच्या गोपीकुंज इमारतीत राहायला येऊन आता आठ वर्षाचा काळ लोटला आहे. या काळात  भिडस्त स्वभावाचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून लांज्यात प्रसिद्ध असलेले ८४ वर्षाचे चिरतरुण श्री गजाभाऊ आठवड्यातून मला दोनदा भेटायला सायंकाळच्या वेळेत येत असतात.साधारण वीस-पंचवीस मिनिटे साहित्य,समाजकारण,लांजा या विषयांभोवती गोलाकार फिरणाऱ्या गप्पा मारल्या की ते समाधानाने घरी परततात. गेली सहा -सात वर्षे त्यांचे हे येणे  समाधान देणारे आहे

              लांज्याची  जुनी बाजारपेठ म्हणजे  सोनार गल्ली, चव्हाटा गल्ली, पोस्ट गल्ली परिसर होय. असे बुजुर्ग सांगतात.यातील पोस्ट गल्लीत 'श्रीनिवास' नावाचे कौलारू घर लांजा तालुक्यातील साहित्यिकांचे, समाजवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचे,पत्रकारांचे साधारण १९६०ते २०१० या पाच दशकांचे केंद्र जणू! या घरातूनच सुवर्ण महोत्सव साजरे करणारे स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस आजही सुरू आहे.या सर्वांच्या धडपडी मागे आहे आहे एक रोखठोक व्यक्तिमत्त्व. ते म्हणजे गजाभाऊ वाघदरे! समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणारे साप्ताहिक आंदोलन चे संपादक, जनता दलाचे निष्ठावंत पाईक, स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस ते संचालक, समाज सुधारणांचा आग्रह धरणारा भिडस्त कार्यकर्ता, प्रेमळ भावबंधासह समाजातील वास्तव चित्रण करणारा सत्यनिष्ठ साहित्यिक ते प्रेमळ माणूस असे कितीतरी कांगोरे असलेले त्यांचे व्यक्तिमत्व.
        तर गेली सात ते आठ वर्ष ते नेहमी आठवड्यातून किमान दोन वेळा माझ्या घरी येतात.पहिल्या मजल्यावर मी राहत असल्याने भाऊ  जिन्याच्या वीसेक पाय-या संभाळून चढून येतात,तेव्हा मला फारच काळजी वाटते कारण त्यांनी वयाची गाठलेली ऐंशी वर्षे .ते नेहमी मला म्हणतात -

  " विजय , या तीन गल्लीत मला तुलाच भेटावेसे वाटते, तुझ्याशीच गप्पा माराव्याशा वाटतात, कारण तू साहित्य क्षेत्रात धडपडतो आहेस त्याचे कौतुक वाटते,बाकी पुस्तके  वाचायला वेळ कुणाला आहे सध्या?"
-  त्यांच्या या बोलण्याने आपल्या कामाला जाणणारे जेष्ठत्व अवतीभोवती आहे ही कल्पनाच अंगात अधिकची उर्जा निर्माण करते.गतवर्षी २०२२ ला त्यांचे  वयाच्या ८३ व्या वर्षी 'झाकोळ' हे आत्मकथन प्रसिद्ध झाले.त्याच्या समर्पणपत्रिकेत 'दुरितांचे तिमिर जाहो मधील दुरितांना अर्पण ' असे ते लिहितात, तेव्हा वंचित शोषित कष्टकरी,रयतेविषयी त्यांची आस्था पाहून अवाक व्हायला होते.
          अशा आमच्या छंदिष्ट भाऊंना पत्रलेखनाचाही मोठा छंद आहे.आजच्या ब्लाॅगचा तोच विषय आहे.मराठी विश्र्वातील अनेक साहित्यिक, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना गजाभाऊंनी असंख्य पत्रे लिहून पत्रमैत्री जोपासली आहे. तसेच त्यांचीही अनेक पत्रे त्यांना आली आहेत.मात्र मराठी माणूस दस्तऎवजीकरणाच्या फंद्यात पडत नाही या सिद्धांताप्रमाणे त्यांनीही ती संकलित करून ठेवलेली नाहित.आजच्या ई- मेल च्या काळातील पिढीला खरं  तर पत्रलेखन, आंतरदेशीय कार्ड, पोस्ट कार्ड म्हणजे काय असतं?  ती कशी लिहीतात? ती कोण आणतं? पोस्टमन म्हणजे कोण? या सा-यांची कल्पनाही नसेल.आज काळानुरुप पत्राची जागा ईमेल अर्थात संगणकीय पत्र व मोबाईलच्या लघुसंदेशाने पटकावलेय,तरीही आजही अनेकांनी पत्रमैत्री जोपासली आहे.या मध्ये साहित्य, सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी पुढे आहेत. खरंतर गजाभाऊ साहित्य विश्वात रमणारा माणूस आमचे ज्येष्ठ अक्षरस्नेही श्री नारायण जाधव यांनी कोरोनाच्या सक्तीच्या टाळेबंदीत चक्क पाचशेहून अधिक पृष्ठांची ' तुझ्या संदर्भांचे स्मरण चांदणे' ही उत्कट प्रेमाची अनुभूती देणारी कादंबरी लिहिली. गजाभाऊंनी ही कादंबरी माझ्याकडून जवळपास पाच ते सहा वेळा घेऊन जात त्याची आवर्तनेच केली जणू. पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणारी अनेक माणसे मी पाहिली आहेत, त्यात गजाभाऊ ही आहेत. उत्तम साहित्यकृतीचे वाचन करीत राहण्यासारखं दुसरे उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? हे जाणणारे भाऊ पुस्तक वाचल्यानंतर त्या लेखकाला आवर्जून पत्र लिहीतात,पुस्तकाविषयी अभिप्राय कळवितात,आवडल्यास भरभरून कौतुक करतात,त्रुटी असल्यास पुढील आवृत्तीत दुरुस्त करा असा प्रेमळ सल्लाही देतात. त्यांच्या या  उपक्रमामुळे अनेक लेखक-कवींशी पत्रमैत्रीतून त्यांचा स्नेहबंध दृढ झाला आहे.
       
        मधल्या काळात गजाभाऊंनी २०१०-१५  या पाच वर्षाच्या काळात साधारण वयाच्या सत्तरीनंतर दिवाळी अंकांसाठी अनेक कथा लिहिल्या. पुढे 'क्रौंच' या नावाने या कथा पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्या. साहित्यविश्वातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या या कथासंग्रहाचे कौतुक केले. दोन दिवसांपूर्वी पाच -सहा दिवस गजाभाऊ भेटले नाहीत, म्हणून त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी त्यांचे घर गाठले. तेव्हा भाऊ रत्नागिरीला गेले असल्याचे कळले.यावेळी काकींशी चर्चा करताना भाऊंच्या सोफ्यावर मला एक पत्र दिसले, उत्सुकतेने ते पत्र मी उचलले. ठाणे या साहित्याच्या बेटावरील एका दिग्गज  राजाभाऊ नामक साहित्यिकाचे ते  पत्र होते. गजाभाऊंचे समकालीन असणारे राजाभाऊ साहित्य क्षेत्रातील जाणकार आहेत हे त्यांच्या पत्रातील आशयसंपन्नता पाहूनच जाणवत होते.पत्रमैत्रीची आवश्यकता ,महत्त्व उलगडून सांगायला हे पत्र पुरेसे आहे.

     



   सन २०१६ साली लिहिलेले हे  राजाभाऊंचे पत्र म्हणजे मौलिक विचारधनच जणू! या पत्रातील ०३ निवडक विचार वाचकांसाठी या लेखात मांडतो आहे.
१)  'म्हातारपणी शैषव येतं हा  सामान्य नियम पण.   तारुण्य विरळ!'
   - या वाक्यातून सत्तरी नंतर आशयसंपन्न कथा लिहिणाऱ्या भाऊंच्या चिरतरुण मनाची प्रतिभेचे मुक्तकंठाने ते  प्रशंसा करतात.
२) जीवनातील विद्रुपासहीत वास्तव दाखवित वाचक, समाज यांना मांगल्याच्या श्रेयसाचं सतत भान देत व त्याचा ठसा उमटवण्याची धडपड करीत राहणं हे मोठं कठीण काम.काल्पनिक कथा ते काम अधिक सामर्थ्यपणे करू शकतात.म्हणूनच अशा काल्पनिक साहित्याचे महत्त्व अधिक.असे राजाभाऊ लिहितात त्या वेळी साहित्यविश्वातील काल्पनिक साहित्यप्रकार किती महत्त्वाचा आहे, त्याची नेमकी भूमिका कोणती आहे याची माहिती आपल्याला होते.

३) राजाभाऊ पत्राच्या शेवटी म्हणतात,
      - ' काळ नेहमीच बदलत असतो. तो अनुकूल असतो तेव्हा श्रेयसचा दिवा भव्य प्रकाश देईल; प्रतिकूल असेल तेव्हा मिणमिणता. श्रेयसाचे यात्रिक तो विझणार नाहीत एवढीच काळजी घेऊ शकतात. बस्स, रात्रीनंतर दिवस तसंच कलियुगा नंतर सतयुग येणारंच आहे. या प्रगाढ श्रद्धेत ईश्वर दडलेला आहे. या युगचक्राच्या संकल्पनेत आशा, दिशा, सामर्थ्य, प्रेरणा हे दडलेलं आहे.
        पत्रातील हा उतारा म्हणजे जीवनातील एक विशाल तत्त्वज्ञानच. माणसाचे आयुष्य ही सुखदुःखाची अतूट साखळी असते. असे अनेक प्रसंग माणसापुढे येत राहतात. ज्यात त्याला सोपा किंवा अवघड असे दोन मार्ग दिसतात. मार्गा प्रमाणे त्याचे फलित असते. वरकरणी सोप्या व कमी कष्टप्रद मार्गाने मिळणारे फलित ही सीमित असते तर अवघड व कष्टदायक मार्गाचे फलित निरंतर आणि दीर्घकालीन असते. प्रेयस म्हणजे सोपी व श्रेयस म्हणजे खडतर वाट निवडणे होय. प्रेयस हे  क्षणिक सुख भौतिक साधनातुन प्राप्त होते,तर श्रेयस हे सुख व्यक्ती समाधान व स्थितप्रज्ञ वृत्ती यातून प्राप्त करते. प्रेयसात न गुंतता श्रेयसाकडे जाणे हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असावे, असे भारतीय तत्त्वज्ञान गीतेच्या माध्यमातून सांगितले आहे. त्याला अनुसरूनच गजाभाऊनीही श्रेयसाचा मार्ग स्वीकारत जीवन जगल्याने  उतारवयात त्यांना निश्चितच समाधान मिळेल व त्यांच्या जीवनाचे सार्थक झाल्याचा प्रत्यय त्यांना येईल असा विश्वास राजाभाऊ मित्रत्वाच्या नात्याने गजाभाऊना देतात.खरं तर हे पत्र दोन मित्रांमधील वैचारिक आदानप्रदानचा उत्तम नमुना आहे.पत्रमैत्रीतुन अशा पद्धतीने मैत्री फुलते, बहरते. त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणारे संप्रेषण होत असते. जीवनातल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी दिशादर्शनही त्यात अंतर्भूत असते. पत्रमैत्रीतुन स्नेहाभावाचे, बंधुत्वाचे, परस्परांविषयी आदर भावनाचे संस्कार होत असतात.म्हणुनच यशस्वी वाटचाल करु इच्छिणा-या व्यक्तींनी मोठ्या यशस्वी माणसांशी पत्रमैत्री जोपासायला हवी असे न राहून वाटते.

     


       आमच्या लांजा शहरातील संवेदनशील लेखिका  विजयालक्ष्मी देवगोजी यांनी त्यांची नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेली मुलगी कु. मधुलिकेवर पत्रमैत्रीतूनच संस्कार करीत तिच्या जीवनातील ध्येयाची जाणीव तिला करून दिली.पुढे मधुलिका यूपीएससी परीक्षेत यश मिळवित आयआरएस या स्वत:च्या आवडीच्या क्षेत्रात करिअरची संधी मिळविण्यात यशस्वी झाली.तिच्या या ध्येयपूर्तीत आईने पाठवलेल्या पत्रांचा वाटा महत्त्वाचे असल्याचे ती नमूद करते. शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी पत्र किती निर्णायक भूमिका बजावू शकते याची जाणीव या आई-मुलीच्या पत्रमैत्रीतून आपल्याला कळते. श्रीमती देवगोजी यांनी पत्रलेखनातून देखील संस्कारांची शिदोरी पोहचविता येते,पत्रातुन केलेले मार्गदर्शन पाल्याला जीवनभर नंदादीपाप्रमाणे वाट दाखवित त्याचे भविष्य उजळविण्यास सहाय्यभूत ठरेल हे समाजाला सांगण्यासाठी मुलीला लिहिलेल्या पत्रांचे संकलन असलेले 'अशी घडली राजस्विनी ' हे पुस्तक लिहिले.भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू इच्छिणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आवर्जून वाचावे असेच हे पुस्तक आहे.खरं तर पत्रलेखनाचे महत्व सांगणारी पुस्तके मराठी वाड:मयात कमीच आहेत यामुळे या संस्कारशील पत्रप्रपंचाचा ठेवा असलेल्या पुस्तकाचे महत्व अधिक आहे.


      भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक पालक म्हणुन इंदिराजींना अशीच पत्रं पाठविली होती.ती पत्र जीवनात तत्वज्ञान सांगून गेली होती. उभं कसं रहावं, बोलावं कसं, वागावं कसं याचं मार्गदर्शन पंडितजीनी त्यांच्या पत्रातून केले आहे.मराठीतील प्रसिद्ध लेखिका सुरेखा पणंदीकर यांचे  ज्योत्स्ना प्रकाशनच्या माध्यमातून आजी -आजोबांची पत्रे नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले.या पुस्तकात नाना क्षेत्रातील थोरा- मोठ्यांनी आपल्या नातवंडाना लिहिलेल्या प्रेरणादायी पत्रांचे संकलन आहे.या पुस्तकाच्या ०५ -०६ आवृत्त्या निघाल्या आहेत.आशा भोसले ,उपराष्ट्रपती कृष्णकांत, सी.राजगोपालचारी,चंदू बोर्डे,पं.भीमसेन जोशी, मेजर जनरल.व्ही.नातू, कमलेश्र्वर यांसारख्या महनीय व्यक्तिमत्वांना आपल्या पुढच्या पिढीने आपला वारसा चालवावा यासाठी नेमके कसे मार्गक्रमण केले पाहिजे याविषयी नातवंडाना  मार्गदर्शन करण्यासाठी पत्रांचाच आधार घ्यावा असे वाटणे हे देखील पत्रलेखनाचे महत्व अधोरेखित करायला पुरेसे आहे.

    



        
            माझे पत्रकारिता व साहित्यिक वाटचालीतील मार्गदर्शक व कोकणच्या सांस्कृतिक राजधानीतील प्रज्ञावंत अभ्यासक श्री धीरज वाटेकर गत दोन दशकांहून अधिक काळ दिवाळीच्या मूहूर्तावर त्यांच्या वर्तुळातील स्नेही, मित्र, मार्गदर्शकांना शुभेच्छापर पत्र लिहुन पत्रमैत्री जोपासत आहेत,ही संकल्पना अनुकरणीय असल्याने आम्हीही गेल्या दशकभरात दिवाळीतचशुभेच्छापत्र  पाठवून पत्रमैत्री जोपासतो आहोत.याचा फायदा असा झाला की अनेक संपर्कात नसलेले मित्र, स्नेही पुन्हा संपर्कात येऊन नात्यातील गोडवा वाढीस लागला. असेच एक पत्रमैत्री जोपासणारे व्यक्तिमत्व चंदगड तालुक्यातील कुदनुर येथील चंद्रकांत कोकीतकर यांच्या पोतडीत तब्बल ४५० ज्येष्ठ साहित्यिकांनी स्वत:च्या हस्ताक्षरात त्यांना पाठविलेल्या पत्रांचा संग्रह आहे.आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने बारावी झालेल्या चंद्रकांतने मुंबई गाठले.तिथे एका कॅन्टिनमध्ये काम करताना वाचनाच्या आवडीतुन पुस्तक वाचल्यावर लेखकाला पत्र लिहिण्याचा छंद त्याला जडला.गेल्या १२ वर्षात या छंदातुन ' ऎसी अक्षरे रसिके मिळविन' हे सार्थ करित तब्बल ४५० हून अधिक पत्रांचा संग्रह आज त्याच्यापाशी आहे.यात कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे ,अरुण शेवते ,मंगेश पाडगावकर, रत्नाकर मतकरी,मधु मंगेश कर्णिक ,महानोर, नारायण सुर्वे ,केशव मेश्राम ,विं.दा.करंदीकर यांसारख्या दिग्गजांचा अक्षरठेवा असुन हे पाहून थक्क व्हायला होते.कोकीतकरांचा हा ठेवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. मात्र त्याचा उपयोग करुन घेणारे पुढे यायला हवेत.

     एकुणच, विधायक वाटचाल करु पाहणा-या व्यक्तींनी यशस्वी व्यक्तिमत्वांचा अभ्यास केल्यास त्यांच्या जीवनप्रवासात पत्रमैत्री लाभदायक ठरली असल्याचे लक्षात येईल.८४ वर्षीय गजाभाऊ,वात्सल्यमूर्ती विजयालक्ष्मी देवगोजी, प्रज्ञावंत अभ्यासक वाटेकर, यांच्या पत्रमैत्रीतुन आपणही अनुकरणीय पत्रमैत्रीस प्रारंभ करायला हवा ,त्यातुन वर्तमानात करावयाच्या वाटचालीचा वेध घेता येईल

श्री विजय हटकर.

लांजा -रत्नागिरी

8806635017



   
    





  

Wednesday, August 24, 2022

श्री संजय सीताराम सुतार एक लढवय्या कार्यकर्ता

एक लढवय्या कार्यकर्ता - श्री संजय सीताराम सुतार.

🥈🥈🥈🥈🥈🥈🥈



        'नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नसते.' ते स्वतः निर्माण करावे लागते. कर्तव्यपरायण व्यक्ती आपल्या ध्येयाला कर्तव्यबुद्धीची जोड देत आपले कर्तृत्व सिद्ध करते .राजापूर तालुक्यातील मुर गावचे माजी सरपंच, यशस्वी व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री संजय सुतार यांना भेटल्यास तना - मनात कर्तव्यबुद्धी भिनलेला माणूस भेटल्याचा आनंद होतो .त्यांची यशोगाथा कोकणातील नव्या पिढीला प्रेरणादायी आहे.


     राजापुरातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले ऐतिहासिक मुर गावात सामाजिक वारसा जोपासणा-या एका सामान्य कुटुंबात संजय सुतार यांचा जन्म झाला. बालपणापासूनच व्यवसाय करायचे स्वप्न पाहिलेल्या  संजयने १९९४ -९५ मध्ये दहावी झाल्यानंतर शिक्षण सोडले. व व्यवसायिक बनण्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी अविरत मेहनत, कल्पकता, सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर सन २००४  मध्ये "आई सुलोचना साॅ मिल ' ची मुहूर्तमेढ रोवली .लाकूड व्यवसायात उतरल्यावर स्वर्गीय सुंदर कोकणच्या निसर्गाला हानी पोहोचणार नाही हे तत्त्व त्यांनी कसोशीने पाळले. ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने लाकूडतोड करताना सर्वसामान्यांच्या वेळेचा अपव्यय होतो , अधिक भाग वाया जाऊन त्यांना आर्थिक नुकसान होते हे जाणून आई सुलोचना साॅ मिल च्या माध्यमातून आधुनिक यंत्राचा उपयोग करीत पाचल  पंचक्रोशीतील लोकांचे आर्थिक नुकसान टाळण्याचे काम केले.  या मिलच्या माध्यमातून शासनाने परवानगी दिलेल्या झाडांची किंवा जीर्ण झालेल्या झाडांची तोड ते करतात. लाकूड कापणाऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी वनविभागाकडून एक हजार झाडे देण्यात येतात.  या उपक्रमात सुतार अग्रक्रमाने पुढे असतात. वनविभागाकडून घेतलेली झाडे योग्य ठिकाणी लावून त्याचे संगोपन ते आत्मीयतेने करतात . या  व्यवसायात मिळणाऱ्या लाभांशा पैकी दहा टक्के रक्कम शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक क्षेत्रात ते खर्च करीत असतात. पर्यावरणस्नेही वृत्तीच्या सुतार यांनी प्रामाणिकपणा व मेहनतीच्या जोरावर आज दोन लाकूड गिरण्या यशस्वी उभ्या  केल्या आहेत .


          श्री संजय सुतार यांचे अख्खे कुटुंब राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांचे मोठे बंधू श्री भास्कर सुतार यांनी मूर ग्रामपंचायतीचे दोन वेळा सरपंचपद भूषविले आहे तर पंचायत समिती सदस्य म्हणूनही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांची वहिनी सौ निशिगंधा भास्कर सुतार विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आहेत. त्यांचे चुलत बंधू प्रवीण सुतार लांजा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक भान जपणारे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत . समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम करणाऱ्या कुटुंबात संजयरावांनाही 

इतरांच्या आयुष्यात आनंद घेण्यासाठी कार्यरत राहण्याचे बाळकडू मिळाले .मोठे बंधू भास्कर सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सुतार यांनी   गावाच्या राजकीय क्षेत्रात पदार्पण करीत २०१०  ते  २०२१ या दशकात गावाचे सरपंच पद भूषविले .या काळात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणाऱ्या सुतार यांनी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावात चांगल्या सुविधांचे जाळे विणले.


     सुतार यांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील कुपोषित मुलांना कुपोषण मुक्त केले. गावातील मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. अंगणवाडी शाळा डिजिटल केल्या. वाळवड धरण्यासाठी पाठपुरावा करीत निधी मंजूर करून घेतला. मूर सह परिसरातील अनेक शाळांना ई-लर्निंग साहित्य मिळवून दिले .मुर गावात शिक्षणासोबतच पायाभूत सुविधा निर्माण केल्याने त्यांच्या कारकिर्दीत मुर ग्रामपंचायतीला निर्मल ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त झाला. सरपंचांनी  क्रियाशील काम करावे यासाठी सकाळ, आग्रोवन यासारख्या राज्यातील महत्त्वाच्या  माध्यम समूहानी आयोजित केलेला परिषदेत सुतार नेहमी सहभागी होत असतात. या परिषदेत शेतकऱ्यांसाठीच्या अद्ययावत योजना व उपक्रमांची माहिती मिळते .तिथे मिळालेल्या माहितीचा उपयोग त्यांनी मुर गावातील शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे केला. ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सुतार यांनी राजापूर तालुका शिष्यवृत्ती परिक्षेसारखी अभिनव योजना राबविल्याने  शिष्यवृत्ती परिक्षेच्या गुणवत्ता यादीत मूरचे विद्यार्थी झळकल्याने  त्यांच्या कष्टाला फळ आले आहे . सन २०१७  जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्याचे यशस्वी  आयोजन त्यांनी सहका-यांच्या साथीने केले.या प्रदर्शनाच्या नियोजनबद्धतेमुळे आलेले मान्यवर ही प्रभावित झाले होते.

      संजय सुतार हे भास्कर सुतार सहकारी दूग्ध संस्थेचे  संचालक, ' ब '  वर्गातील इंद्रायणी  ग्रंथालयाचे अध्यक्ष आहेत. तसेच  उगवते तारे मंडळ हातदे , गांगो-रवळनाथ क्रीडा मंडळ जवळेथर,  रुग्ण कल्याण समिती सदस्य जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्र या संस्थांवर देखील ते कार्यरत. आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध सामाजिक  संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे .पाचल पंचक्रोशी सह राजापूर तालुक्याच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव योगदान देणा-या  संजय सुतार यांना संघाचा 'बॅ.नाथ पै पुरस्कार आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार २०२२ ' देऊन सन्मानित करण्यात आले हे वृत्त जेव्हा कळले तेव्हा ही निवड सार्थ असल्याचे वाटले.येणा-या काळात त्यांनी असेच विधायक काम करावे हीच शुभेच्छा.

💐💐💐💐💐💐

 *विजय हटकर*

 *लांजा*

Monday, August 1, 2022

खेळाच्या मैदानालाच घर मानणारे क्रीडाशिक्षक रवींद्र वासुरकर.

 खेळाच्या मैदानालाच घर मानणारे क्रीडाशिक्षक रवींद्र वासुरकर.



⛳🥅🥅🥅🥅🥅⛳

रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील आश्वासक नाव म्हणजे रवींद्र वासुरकर सर!  न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रवींद्र चंद्रकांत वासुरकर यांनी लांजा सारख्या ग्रामीण भागात आजवर अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवले आहेत. विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. खो-खो आणि कबड्डी हा श्वास मानणाऱ्या रविंद्र वासुरकर यांनी राष्ट्रीय पंच म्हणून विविध नामांकित स्पर्धांमध्ये काम केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीपर्यंत देणाऱ्या वासुरकर सर यांनी 'सराव आणि फक्त सराव ' या मंत्राने आगामी काळात राष्ट्रीय खेळाडूंना घडविण्याचा ध्यास घेतला आहे.आज त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा...


       समाजात वावरताना बऱ्याचदा असे आढळून येते की वडिलांनी सुरू केलेला एखादा व्यवसाय त्यांची मुले पुढे वारसा रूपाने चालवतात. त्यात प्रगती करतात आणि नावही कमवितात. मात्र जिद्द , चिकाटी आणि प्रचंड मेहनत या त्रिसूत्रीच्या बळावर स्वतःची वेगळी वाट निवडून त्यात शंभर टक्के यशस्वी होणारी माणसे फारच कमी असतात.न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लांजाचे क्रीडाशिक्षक रवींद्र वासुरकर हे त्यापैकीच एक. स्वतः राष्ट्रीय पंच असणाऱ्या रवींद्र वासुरकर यांनी ज्या क्षेत्रात काम करायचे त्या ठिकाणी झोकून देऊन काम करण्याच्या स्वभावामुळे आजवर 25 राष्ट्रीय खेळाडू घडविण्याची किमया साधली आहे. आपल्या सव्वीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी साधलेली नेत्रदीपक कामगिरी पाहता  कामाप्रती असणारी त्यांची निष्ठा आणि शाळेविषयी आस्था दिसून येते.


       दिनांक ०१ ऑगस्ट १९७१ साली रवींद्र वासुरकर  यांचा लांजा येथे जन्म झाला. वडील चंद्रकांत वासुरकर यांचे लांजा शहरात पानपट्टी चे दुकान होते. घरची परिस्थिती बेताची असल्याने लहानपणापासूनच त्यांना कमवा आणि शिका या तत्त्वावर शिक्षण घ्यावे लागले. कधीकधी वडिलांसोबतच लांजा ,अोणी ,वाटूळ ,राजापूर येथील आठवडा बाजारामध्ये पानसुपारी चे दुकान ते लावत असत. रविंद्र वासुरकर हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे आणि अभ्यासात हुशार असल्याने हा मुलगा आपल्या कुटुंबाचे नाव रोशन करेल याची खात्री वडील चंद्रकांत वासुरकर यांना होती. खेळाविषयी असणा-या आवडीमुळे रविंद्र वासुरकर यांनी दहावीला असताना कबड्डीची पंच परीक्षा दिली आणि या परीक्षेत चांगल्या गुणांनी ते उत्तीर्ण झाले.पुढे बारावीला असताना कबड्डी आणि खो-खो च्या राज्य पातळीवरील परीक्षा दिल्या आणि  या क्षेत्रात भविष्य घडवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

       

       बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीतील प्रसिद्ध शेक्षणिक केंद्र असलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. शैक्षणिक खर्चासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी एम. एस.नाईक फाऊंडेशनच्या नाईक इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये अर्धवेळ क्रीडाशिक्षक म्हणून  नोकरी पत्करली. सकाळी अकरा वाजेपर्यंत काॅलेज, त्यानंतर चार वाजेपर्यंत नोकरी व संध्याकाळी  चार ते आठ या वेळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर खेळाचा सराव असा त्यांचा दिनक्रम असे. या महाविद्यालयाचे शिक्षक मदन भास्करे  यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .त्यांच्या मार्गदर्शनाने खो-खो ,कबड्डी खेळामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळविले. सन १९९४ ला बी.ए. तर पुढील वर्षी बी.पी.एड.चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आणि दिनांक ०७ जुन १९९६ मध्ये ते लांजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून नोकरीत रुजू झाले. या प्रशालेचे ज्येष्ठ क्रीडाशिक्षक आरोलकर सर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले .जे क्षेत्र निवडले त्यासाठी आपले संपूर्ण योगदान राहिले पाहिजे असा वासुरकर सरांचा कटाक्ष असतो .त्यामुळेच प्रशालेत रुजू झाल्यानंतर त्यांनी कबड्डी,खो-खो या स्पर्धांमध्ये लांजा प्रशालेचे नाव उंचावले.या स्पर्धांमध्ये बक्षिसांची लयलुट करताना शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

        

       आपला विद्यार्थी या केवळ ज्ञानानेच नाही तर सर्व अंगांनी परिपूर्ण झाला पाहिजे, तो अष्टपैलु असला पाहिजे यासाठी रवींद्र वासुरकर सातत्यपूर्वक  मेहनत घेतात. यामुळेच शाळेचा कबड्डी, खो-खो संघ जिल्हा,  विभाग, राज्यस्तरावर चमकला आहे. वासुरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली कुर्णे,ता. लांजा येथील समीर घाग या  विद्यार्थ्याला आठवीत असताना राज्य पातळीवर खो खो स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली . त्याला पुढे २०१० मध्ये दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळाले. याच वर्षी प्रशालेच्या रोहित पाटील व युवराज खाके या  विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली खो-खो मध्ये बागलकोट येथील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. अशा प्रकारे रविंद्र वासुरकर यांच्या संपूर्ण योगदानामुळे आज लांजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खोखो खेळा मध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.


        रवींद्र वासुरकर  यांनी आपल्या कामामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा सारख्या छोट्या शहरातील आपल्या शाळेचे नाव जिल्हा, राज्य व राष्ट्रीयस्तरावर सातत्याने रोशन केले आहे.ही त्यांच्या कामाची खरी पोहोचपावती म्हणावी लागेल. शाळेचा क्रीडा विषयक दर्जा, गुणवत्ता वाढली पाहिजे त्या दृष्टीने त्यांची सतत धडपड सुरू असते. यासाठी ते दररोज पहाटे साडेपाचला शाळेच्या मैदानावर येतात. लांजा शहरातील आठवी , नववीतील मुलांचा ते ०९  वाजेपर्यंत कसून सराव घेतात तर तालुक्यातुन येणा-या  मुलांचा  ०९:०० ते ११:०० या वेळेत सराव करून घेतात. शाळा सुटल्यानंतर साडेपाच ते सात पर्यंत ते विद्यार्थ्यांचा क्रिकेट ,खो-खो ,कबड्डीचा सराव घेतात. त्याचबरोबर एम.सी.सी संचलन स्पर्धेत त्यांनी सलग दहा वर्षे प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर कवायत स्पर्धेत लांजा प्रशालेने बारा वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पातळीवरील कवायत  स्पर्धेत लांजा हायस्कूलने  रवींद्र वासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सलग आठ वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे.एकुणच क्रीडा क्षेत्रातील आपल्या यशात श्री महंम्मदशेठ रखांगी त्यांचा मोलाचा वाटा आहे असे ते नम्रपणे सांगतात.त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक ,संस्थाचालकांची भक्कम साथ यामुळेच आजवरचे यश मिळाल्याचे ते मानतात.


         या सृष्टीतील सर्वाधिक सक्रिय आणि प्रभावी जीव म्हणजे सूक्ष्मजीव.गतवर्षी अशाच कोव्हीड १९ नामक सुक्ष्म विषाणूने जगभर धुमाकुळ घातला आणि जागतिक आपत्ती अोढावली. या आपत्तीत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या व त्यांच्यासाठी झटणा-या कोरोना योद्ध्यांसाठी रवींद्र वासुरकर यांनी केलेले काम त्यांच्यातील देवदूताचा परिचर करुन देणारे ठरले.लांजा शहरात कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून  काम करणारे डाॅक्टर्स, नर्स, पोलिस,शिक्षक यांना रोज सकाळी वासुरकर सर स्वखर्चाने नाश्ता देण्याचे काम निस्पृ:हपणे करित होते.त्याचबरोबर शहरातील वाटसुरु, रस्त्यावरील भिकारी असो , क्वारंटाईन केलेले महानगरातुन आलेल्या चाकरमान्यांसाठी ही वासुरकर सर कोरोनाकाळात आधारस्तंभ बनले.त्यांच्या या निरपेक्ष कार्याचा लांजावासीयांनी यथोचित गौरव केला होता.सर शैक्षणिक, क्रीडाक्षेत्रासोबत लांजा शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही तितक्याच आत्मीयतेने वावरत असतात.त्यामुळेच त्यांचा लोकसंपर्क पाहून ,अनेकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहून त्यांच्या व्यापक जीवनदृष्टीचा प्रत्यय येतो.आज सर वयाची ५१ वर्षे पुर्ण करित आहेत.त्यांच्यावर नितांत  प्रेम करणा-या लांजावासीयांच्या वतीने आज त्यांना आपलेपणाच्या भावनेतुन सन्मानित केले जाणार आहे.

यानिमित्ताने त्यांना सदिच्छा देताना वासुरकर सरांचा यापुढला प्रवास आनंददायी होवो हीच श्रीचरणी प्रार्थना..

----------------------------------------

        *विजय हटकर* 

        सहाय्यक शिक्षक

    न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा

Thursday, July 14, 2022

के.आर.कंदी : एक साहित्यप्रेमी अधिकारी

 के.आर.कंदी : एक साहित्यप्रेमी अधिकारी




          मागणारे हात खूप असतात. देणारे थोडे असतात पण असतात. अपेक्षा न ठेवता ते देत राहतात.बँक आॅफ  इंडिया रत्नागिरीचे माजी उपविभागीय अधिकारी के.आर.कंदी यापैकीच एक! सर्वसाधारणपणे बँकेच्या अधिका-यांना वाणिज्य विषयक कीचकट कामातुन अजिबात सवड नसते.या  मंडळींचा साहित्य, कला, सामाजिक क्षेत्रात फार कमी वावर असतो असा माझ्यासह अनेकांचा समज आहे .पण या समजाला स्टेट बॅक आॅफ इंडिया मध्ये काम करतानाच सिने-नाट्य -लेखन क्षेत्रात भरारी घेणा-या नारायण जाधव व मनोज कोल्हटकर यांनी चुकीचे सिद्ध केले.यात आता आणखी एक नाव समाविष्ठ करावे लागेल ते म्हणजे के.आर.कंदी यांचे! बॅक आॅफ इंडिया रत्नागिरी च्या विभागीय उपव्यवस्थापक पदावर काम करताना तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी इथल्या साहित्य,शैक्षणिक चळवळीला बळ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.कर्तव्यदक्ष अधिका-यासोबत सहृदयी माणूस, आस्थावान साहित्यप्रेमी असलेल्या के.आर. कंदी यांच्याविषयी आठवणींचा सुखद स्नेहबंध...

      

           के.आर.कंदी आणि आमची भेट योगायोगाने झाली होती. २०२० च्या जानेवारीतील ही गोष्ट. रात्रीचे आठ वाजले होते.मालवणी बोलीला वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून सातासमुद्रापार नेणाऱ्या वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांची  भेट घेण्यासाठी आम्ही त्यांच्या माडबन गावातील निवासस्थानी पोहचलो होतो. काही महिन्यांनी नाटे येथे संपन्न होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद आपण भूषवावे असा नानांना आमचा आग्रह होता. अगंतूकपणे आलेल्या अाम्हा साहित्य चळवळीतील कार्यकर्त्यांच्या विनंतीचा नानांनी श्रद्धेय भावनेने स्वीकार करीत , माझ्या लाल मातीत रंगणाऱ्या साहित्योत्सवात संमेलनाध्यक्ष  म्हणुन मी येणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. त्यांच्या होकाराने आमचा जीव भांड्यात पडला. यावेळी बँक ऑफ इंडिया,माडबनचे शाखाधिकारी श्री विजय गवाणकर ,पत्रकार राजन लाड तेथे उपस्थित होते.पत्रकार उपस्थित आहेत या संधीचे सोने करीत आम्ही नानांच्या शुभहस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करीत नानांना आणखी एक आनंदाचा धक्का दिला. माडबनचे शाखाधिकारी विजय गवाणकर यांनीही संमेलनात शाखेचा स्टॉल लावू असे म्हणत आमचे रत्नागिरीतील वरिष्ठ अधिकारी  के.आर. कंदी  हे साहित्यप्रेमी असल्याचे सांगत त्यांची भेट घेण्याची सूचना केली. नानांनी संमेलनाध्यक्षपदासाठी होकार दिल्याने आनंदी झालेल्या आम्हा कार्यकर्त्यांना विजय गवाणकर यांनीही नकळतपणे मदतीचा हात पुढे केला होता. कार्य कोणतेही असो ,ते संपन्न होण्यासाठी माणसं उभी राहतात.देणारे न मागता देतात. ' घेणारे हात शुद्ध ,स्वच्छ असले की देणारे कमी पडत नाहीत ' याचा प्रत्यय विजय गवाणकर यांनी दिला.


       दुसऱ्याच दिवशी सकाळी रत्नागिरीच्या बँक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती कार्यालयातून फोन आला. समोरून कंदी सर स्वतः बोलत होते. रत्नागिरीत भेटायला या म्हणून त्यांनी निमंत्रण दिले. आम्हीही आढेवेढे न घेता त्याच आठवड्यात कंदी साहेबांना भेटायला त्यांचे कार्यालय गाठले. पाच सव्वा पाच फुट उंच, मुद्रेवर आश्‍वासक आभा, प्रेमळ प्रसन्न हास्य, सौम्य व अनोपचारिक बोलणं, मृदू व जिव्हाळ्याचा स्वर. या भेटीतच एका अनामिक आत्मीयतेचं नातं जुळलं... या भेटीत लांजा, राजापूर या दक्षिण रत्नागिरीतील ग्रामीण व दुर्गम तालुक्यात 1953 मध्ये स्थापन झालेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून गेली पाच वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन आम्ही करीत असल्याचे सांगत या संमेलनातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती त्यांना दिली. सोबत संघाचे अध्यक्ष आदरणीय सुभाष लाड सर होते. संघाचे साहित्यिक, शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रातील काम पाहून बँक ऑफ इंडिया आपल्या पाठीशी उभी राहील असे सांगत ग्रामीण मराठी साहित्य संमेलनासाठी  दहा हजार रुपयाच्या मदतीचा धनादेश देत आपल्या शब्दाला त्यांनी कृतीची जोड दिली. यावेळी झालेल्या साहित्यिक चर्चेतुन कंदी सर वेळ मिळेल तेव्हा लेखन कार्य आवडीने करतात हे उमगले. बँक ऑफ इंडिया सारख्या राष्ट्रीय बँकेत उपआँचलिक प्रबंधक या वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या कंदी सरांचे कार्यालय सत्कार्याला पूजा मानून क्रियाशील पणे वावरणाऱ्या सजग व्यक्तींसाठी नेहमीच खुले असते.बँकेच्या व्यस्त, धावपळीच्या दैनंदिनीतूनही  अशा चांगुलपणावर विश्वास ठेवत कार्यरत राहणा-या मंडळींसाठी ते आवर्जून वेळ काढतात. आलेल्यांचे मनस्वी स्वागत करतात. त्यावेळी त्यांच्या स्वरातील अगत्य आणि अार्जव मनात राहतो. विनम्रपणा मनाला भिडतो.



      पुढे यशवंत गडाच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक नाटे गावात संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यानी आवर्जून उपस्थिती लावली. संमेलनाच्या ग्रंथदिंडीत वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर,कातळशिल्प अभ्यासक व माजी माहिती उपसंचालक सतीश लळित, डाॅ.सई लळित, शिवव्याख्याते रविराज पराडकर,सिने-नाट्य अभिनेते व जेष्ठ लेखक नारायण दादा जाधव,वृंदा कांबळी, अॅड.मुक्ता दाभोळकर यांच्या मांदियाळीत ते समाधानाने वावरले. या संमेलनात बँकेचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणून नव्हे तर मायबोलीचा निस्सीम भक्त , साहित्यप्रेमी म्हणून त्यांचा सहजसुंदर वावर त्यांच्या निर्मळ व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा ठरला.

    

             ग्रंथ पूण्यसंपत्ती सर्वसुखी सर्वभूती ।।

       

         या वचनावर श्रद्धा असल्यानेच  प्रभानवल्ली येथील सहाव्या साहित्य संमेलनासह मोडी लिपीच्या प्रचारार्थ सुरू असलेल्या आमच्या 'मोडीदर्पण' दिवाळी अंकाला त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले.सरस्वतीचे उपासक असलेल्या कंदी सरांचे साहित्यप्रेम त्यांच्यापुरते सिमीत नाही.साहित्य वाचनातून मिळालेल्या सम्यक दृष्टीतून ज्या जिल्ह्यात बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी म्हणुन ते वावरतात तिथली साहित्य चळवळ गतिमान ठेवणा-या साहित्यसंस्थांच्या पाठीशी ते समर्थपणे उभे राहतात.इतक्या मोठ्या पदावर काम करुनही, इतका व्यासंग असुनही एखादी व्यक्ती केवढी ऋजू असू शकते! कधीही भेटले तरी शांत समंजसपणे बोलणे.दुस-याच्या अगदी छोट्या -छोट्या गोष्टींचे कौतुक करण्याचा स्वभाव! एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाने आपल्याला आदर वाटतो, पण त्याच व्यक्तीबद्दल इतके आतुन प्रेम, नितांत विश्वास वाटणे फार कमी व्यक्तींबद्दल होते, के आर.कंदी साहेब त्यापैकीच एक!



    अतिशय पारदर्शी अधिकारी म्हणुन कंदी साहेबांची ओळख आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असताना ग्रामीण भागात लघुव्यवसाय सुरु झाले पाहिजेत,नवउद्यमी तरुणाईच्या पाठीशी बॅकांनी उभे राहिले पाहिजे या विचारावर ते ठाम होते.यातुनच जिल्हाभरात त्यांनी बॅक आॅफ इंडिया नव्याने उद्योग सुरु करणा-यांसाठी एक पाऊल पुढे येऊन सहकार्य करेल हे दर्शविण्यासाठी मेळावे आयोजित केले.लांज्यातही असाच एक मेळावा त्यांनी आयोजित केला होता.यावेळी मेळावा संपल्यावर महाराष्ट्रात फणसकिंग म्हणुन नाव कमविलेल्या मिथीलेश देसाई या युवकाची फणसबाग पाहून त्यांनी माझ्या निवासस्थानी मला भेट दिली होती.एवढा मोठा अधिकारी घरी येण्याची ती पहिलीच वेळ होती.मात्र साध्या सात्विक स्वभावाच्या कंदी साहेबांनी आमचा साधासा पाहुणाचारही आपुलकीने स्विकारला आणि निरोप घेतला.ज्या ठिकाणी कंदी साहेबांची नियुक्ती होते त्या प्रदेशाचा सखोल अभ्यास करित तो सारा प्रांत भटकंतीच्या विशेष आवडीतुन धुंडाळत जाणुन घेणे हे त्यांचे आणखी एक विशेष! कोकणासारख्या स्वर्गीय प्रदेशात आल्यावर तर त्यांचे भटकंती प्रेम अधिकच फुलून आले. बँक आॅफ इंडियाचा इतका मोठा कामाचा व्याप असतानाही ज्या ज्या वेळी सुट्टी असेल तो दिवस घरामध्ये कुटुंबासह निवांतपणात न घालविता जवळच्या पर्यटन स्थळांना भेटी देत त्यांनी सत्कार्णी लावला. भटकंतीची आवड असणा-या माझ्याशी यातुनच त्यांचे अधिक मैत्र जमले.


    बँकिंग जबाबदा-या, कौटुंबिक जबाबदा-या, आणि साहित्यसेवा या तीनही आघाड्यांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले.बँक आॅफ इंडियाचा वाणिज्य परिघ ओलांडुन त्याबाहेरील चांगल्या कामांना पाठबळ देणा-या कंदी साहेबांचा काही महिन्यांपुर्वी फोन आला. - माझी हैद्राबादला बदली झाली असून दोनच दिवसात मी निघणार आहे.श्रीकृपेने पुन्हा नक्कीच भेटू, तुमचं कामातील सातत्य टिकवुन ठेवा,असा अधिकारवाणीतील शुभेच्छावजा बदलीची माहिती देणारा तो दुरभाष वरील संवाद होता.त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे शक्य झाले नाही.पण काही माणसे आपल्याला समृद्ध करतात. स्नेहधारेने चिंब भिजवुन टाकतात.आभाळ भरुन दिलेल्या या माणसांना आपण हृदयाच्या हळव्या कप्प्यात जपत असतो.माणुसपण जपणा-या कंदी साहेबांनीही या कप्प्यात अलगद जागा मिळवली आहे.ते आता हैद्राबादला गेल्यामुळे सातत्याने त्यांची भेट होणार नसली तरी त्यांनी प्रेमपुर्वक दिलेली मिल्टाॅनची पाणीबाॅटल रोज काॅलेजला जाण्यासाठी बाहेर पडताना माझ्यासोबत असते.त्या बाटलीतील पाण्याचा घोट पिताना कंदी सरांसोबतच्या सुखद आठवणींची स्मरणसाखळी मला सुखावुन जाते.

 


   आता हैद्राबाद येथेही सर आपल्या कामाची मुद्रा उमठवतील याची त्यांना जाणणा-या सर्वांनाच खात्री आहे.

माझ्यासह अनेकांच्या हृदयात स्थान मिळविणा-या के.आर.कंदी यांच्या हातून असेच सत्कार्य होवो व त्यांच्या हृदयातला सद्भावनेचा झरा असाच खळाळत राहो. हीच प्रार्थना!

----------------------------------------

विजय हटकर.

लांजा

८८०६६३५०१७




Sunday, June 26, 2022

महाराष्ट्र साहित्य परिषद लांजा शाखेचे उद् घाटन उत्साहात संपन्न.

 महाराष्ट्र साहित्य परिषद लांजा शाखेचे उद् घाटन उत्साहात संपन्न.


 समाजाने साहित्यभिमुख होण्याची गरज.                                                   - प्राध्या.मिलिंद जोशी


 लांजा  :-- 



 वाचनसंस्कृतीपासून दुर चाललेल्या लोकांपर्यंत साहित्य पोहचविण्यासाठी समाजानेच आता साहित्यभिमुख होण्याची गरज असून समाजात सगळीकडे पसरलेला झाकोळ मसाप च्या माध्यमातून दूर करुन प्रकाशवाटा दाखवायचे काम आपल्याला करावयाचे आहे  ,असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद ,पुणेचे कार्याध्यक्ष प्राध्या.मिलींद जोशी यांनी लांजा येथे केले.

 


           

       लांज्यातील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार दि.२५ जुन रोजी सायंकाळी ५:३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेच्या लांजा शाखेचे उद् घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी ते बोलत होते.यावेळी मसाप पुणेच्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार, ज्येष्ठ साहित्यिक व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.तानाजीराव चोरगे ,लोटिस्मा चिपळुणचे माजी अध्यक्ष प्रकाशजी देशपांडे, सुप्रसिद्ध कवी अरुण इंगवले, मसाप शाखा चिपळुणचे अध्यक्ष प्राध्या.संतोष गोनबरे ,लांजा शाखेचे अध्यक्ष विधिज्ञ विलास कुवळेकर आदी  मान्यवर उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेची ओळख  महाराष्ट्रभर व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती देताना समीक्षा संमेलन, विभागीय संमेलन, युवा संमेलन, शिवार संमेलन आदी वैशिष्ट्यपुर्ण संमेलने आयोजित केली जात असून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षाची सन्मानाने निवड होण्यामागे मसाप ची आग्रही भूमिका महत्वपूर्ण ठरल्याचे मत व्यक्त करित लांजा शाखेने लांजा परिसरातील महाविद्यालये, वाचनसंस्कृती निगडीत संस्थांशी अभिसरण करुन मसापच्या माध्यमातून साहित्यिक चळवळ उभारावी असे आवाहन प्राध्या.मिलिंद जोशी यांनी केले.

       


      यावेळी ज्येष्ठ साहित्यीक डाॅ.तानाजीराव चोरगे यांनी  आजच्या पिढीची मराठी भाषाविषयक असलेली अनास्था व्यक्त करताना टी.वी.वरील मराठी मालिकांमधून होत असलेला चुकीचा भाषाप्रचार त्याला कारणीभुत असल्याचे सांगत मसापच्या माध्यमातून  योग्य भाषेचा आग्रहासाठी आपल्याला ठोस पाऊले उचलावी लागतील असे सांगत शिक्षक व पालक वाचतांना दिसले तरच त्यांचे अनुकरण करणारी नवी पिढी वाचनसंस्कृतीकडे वळणार असल्याचे मत व्यक्त केले. यासाठीच स्थानिक प्रतिभेच्या कवडश्यांना योग्य संधी देण्याचे काम करणा-या महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेचा लाभ लांजावासीयांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी लांजा शाखेचे अध्यक्ष - विलास कुवळेकर, उपाध्यक्ष - विजयालक्ष्मी देवगोजी, सचिव -  विजय हटकर, निरंजन देशमुख, डाॅ.राजेश माळी या नव्या कार्यकारीणीला  मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.



    कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत मुंबई ,ठाणे ,पुणे ही साहित्याची प्रकाशबेटे असून यापासून कोसो दूर असलेल्या मात्र साहित्यिकांची समृद्ध परंपरा असलेल्या लांजा तालुक्यात साहित्यदीपाचा छोटा दीप प्रज्वलित व्हावा यासाठीच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेची स्थापना करित असल्याचे सांगत लांज्याच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा परिचय ॲड.विलास कुवळेकर यांनी उपस्थितांना करुन दिला. यासोबतच मसापच्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार आणि कवी अरुण इंगवले यांनी लांजा शाखेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन डाॅ.राहूल मराठे यांनी तर आभार विजय हटकर यांनी मानले. कार्यक्रमाला साप्ताहिक आंदोलन चे संपादक गजाभाऊ वाघदरे , जयवंतराव विचारे, डाॅ.महेश बावधनकर,  प्राध्या.धनंजय क्षीरसागर,डाॅ.राजेंद्र शेवडे , डाॅ.जालिंदर लोणके , प्राध्या.ऋषिकेश पाटील , नितीन कदम , प्रकाश हर्चेकर, झोरे ,उमेश केसरकर, डाॅ.माया तिरमारे, राकेश दळवी ,पराग शिंदे ,गुरुप्रसाद सनगर ,आदि साहित्यावर प्रेम करणारी मंडळी उपस्थित होती.

--------------------

मसाप लांजा शाखा उदघाटनसोहळ्याची क्षणचित्रे

दिपप्रज्वलन करताना प्रकाशजी देेेशपांडे

मसाप कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार यांचे स्वागत करताना डाॅ.राजेश माळी.


मार्गदर्शन करताना श्रीमती सुनिताराजे पवार


मार्गदर्शन करताना अरुण इंगवले.


लेखक प्राध्या.संतोष गोनबरेंचे स्वागत करताना कुवळेकर सर.


बहारदार निवेदनकर्ते डाॅ.राहूल मराठे.


आभार मांडताना विजय हटकर.

मान्यवरांसह मसाप लांजा टिम.


मार्गदर्शन करताना डाॅ.चोरगे सर.

डाॅ.तानाजीराव चोरगे दीपप्रज्वलन करताना.


८४ वर्षीय चिरतरुण लेखक संपादक गजाभाऊंची उपस्थिती.


माध्यमसमुहातील दखल :-





Monday, June 13, 2022

विजय हटकर लिखित "जनसेवक सुधाभाऊ " पुस्तकाचे लांजा येथे प्रकाशन

 विजय हटकर लिखित "जनसेवक सुधाभाऊ " पुस्तकाचे लांजा येथे प्रकाशन.



लांजा :- 

       एक आदर्श ग्रामसेवक ग्रामविकासाचा रथ किती उत्तम प्रकारे वाहू शकतो याचा आदर्श उभा करित सरकारी अधिका-यांसमोर जनसेवक सुधाभाऊ पेडणेकर एक मिसाल बनले अाहेत असे कौतुकोद्गार पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी लांजा काढले. 

       

      लांजा शहरातील नवोदित लेखक, पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी लिहिलेल्या "जनसेवक सुधाभाऊ" या पुस्तकाचे शिवस्वराज्यभिषेकाच्या शुभमूहुर्तावर पद्मश्री परशुराम गंगावणे व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष श्री एकनाथजी ढाकणे यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले.ग्रामीण भागातील जनतेकडून 'भाऊ' या जवळीक साधणा-या नावाने ओळखले जाणारे ग्रामसेवक गावोगावी कार्यरत असतात.केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक लोकहितार्थ योजना अडीअडचणीतील खेडेगावात आणि सामान्य ग्रामीण जनतेपर्यंत नेणारा तो महत्वाचा दूवा असतो.या पदाचे सामर्थ्य ओळखत ३१ वर्षाच्या सेवेत लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देतानाच सामाजिक बांधिलकी जपणा-या श्री सुधाकर उर्फ सुधाभाऊ जयराम पेडणेकर यांच्या सेवापुर्तीनिमित्त आयोजित केलेल्या सेवापुर्ती सन्मान सोहळा व ग्रामसेवक स्नेहमेळाव्याचे अौचित्य साधून विजय हटकर लिखित जनसेवक सुधाभाऊ या पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन करण्यात आले.

   


 

    यावेळी व्यासपीठावर ,उत्सवमूर्ती जनसेवक  सुधाकर पेडणेकर ,संघाध्यक्ष सुभाष लाड, उल्काताई विश्वासराव ,गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे ,उपाध्यक्ष नाथा पाटील,रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था संचालक अर्जून नागरगोजे, संजय दळवी, डाॅ.मंगेश हांदे ,शिवाजी पेडणेकर, कोकणी माणूसचे  संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर, माजी राज्यसचिव विजय खवळे ,संदिप हांदे, संजय लोखंडे, गणपत शिर्के ,महेंद्र साळवी, चेतन दाभोळकर, अरुण आपटे ,लेखक विजय हटकर , कीरण बेर्डे , प्रकाश हर्चेकर  आदि मान्यवर उपस्थित होते.

         

      लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र व तळवडे ता.राजापुरचे ग्रामविकास अधिकारी श्री सुधाकर पेडणेकर यांच्या जीवनाचा आलेख मांडणारे हे पुस्तकाचे महाराष्ट्भर वितरण करुन  ग्रामसेवक ग्रामोद्धाराचे कार्य कशा पद्धतीने करित असतात हे लोकांपर्यंत पोहचवुन ग्रामसेवकांना प्रतिष्ठा मिळवून देण्याकामी लेखक विजय हटकर व प्रकाशक सुभाष लाड यांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी करित जनसेवक सुधाभाऊंच्या ३१ वर्षाच्या निरपेक्ष वाटचालीचा गौरव करित नव्या पिढितील ग्रामसेवकांनी सुधाभाऊंंनी दाखविलेल्या पायवाटेवर चालत विकासाचा महामार्ग करावा असे आवाहन केले.लांजा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले विजय हटकर हे शैक्षणिक क्षेत्रासोबतच पर्यटन, इतिहास, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असून 'मोडीदर्पण' या दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक अाहेत. नाटककार ला.कृ.आयरे ,गुरुवर्य या दोन यशस्वी  पुस्तकानंतर विजय हटकर यांचे 'जनसेवक सुधाभाऊ ' हे तिसरे पुस्तक काल दिमाखदार सोहळ्यात प्रकाशित झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ग्रामसेवक स्नेहमेळाव्यात माजी सेवानिवृत्त ग्रामसेवक बंधू -भगिनी व ग्रामसेवकांंच्या कर्तृत्ववान मुलांचा सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमाचे निवेदन लेखक विजय हटकर यांनी तर आभार संजय लोखंडे यांनी मानले.

 


    



https://prahaarkonkan.com/?p=155756





Monday, May 2, 2022

संसाररथाची अष्टकपुर्ती.

 संसाररथाची अष्टकपुर्ती.



   अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर

   आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर..


      - माय मराठीतील सुप्रसिद्ध संत साहित्यिका बहिणाबाई चौधरी यांच्या 'अरे संसार संसार ' या कवितेतील ओळी आठवण्याचे कारण म्हणजे नुकतीच आमच्या संसाराची यशस्वी अष्टकपुर्ती झाली. सन २०१३ ते २०२२ या आठ वर्षाच्या काळात सुख ,दुःख, संघर्ष, भांडणं, अबोला यशापयशाची चव चाखता आली. मात्र या छोट्याशा प्रवासात 'मी' आणि 'ती ' कधी एक होऊन गेलो ते कळलेच नाही. औपचारिक शिक्षण न घेताही  निसर्गदत्त अनुभूतीतून शिक्षणाचं विद्यापीठ बनलेल्या बहिणाबाईंनी सोप्या सहज बोलीभाषेत संसाराचं साधं सरळ तत्त्वज्ञान मांडलं आहे.ज्या  पद्धतीने चुलीवर भाकरी तयार करताना स्त्रीच्या हाताला चटके बसतात, त्याप्रमाणेच सुखाची भाकरी खाण्यासाठी ऊन- वारा ,पाऊस,संघर्षाचे चटके सोसावे लागतात. ते सोसल्यावर मिळणाऱ्या यशाची चव काही वेगळीच असते !मात्र ती चाखण्यासाठी जोडीदाराची भक्कम साथ असावी लागते.मी याबाबत स्वतःला भाग्यवान समजतो कारण या अष्टपूर्ती  वाटचालीत सौ.पौर्णिमाची भक्कम साथ लाभल्याने थोरामोठ्यांनी सांगितलेला संसारगाड्याचा अन्वयार्थ समजून घेता आला. 

 

       संसार रथाची दोन चाकं म्हणजे नवरा आणि बायको.एक चाक थोडं कुचकामी असेल तर दुसऱ्या चाकाने जास्त भार  घ्यावा,असा सल्ला अनेक जेष्ठ व्यक्ती,  पतीच्या व्यसनाधीनतेमुळे ढकलाढकल करून संसारगाडा पुढे रेटणा-या स्त्रीयांना देताना आम्ही उभयतांनी पाहिला आहे. अशावेळी संसाररथ नीट चालायला हवा तर दोन्ही चाकांची  सारखीच शक्ती वापरात असायला हवी असं मत मांडणार्‍या पौर्णिमाला मी तुझे म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे असे म्हणून प्रतिसाद दिल्यावर, तिचे माझ्याकडे पाहून हसणे माझ्या उक्ती आणि कृतीतील पोलखोल करून टाकते.


      आमच्या शहरातील एका नामांकित जुनिअर कॉलेजात मी प्राध्यापक असल्याने सकाळ सत्रात भरणाऱ्या कॉलेजसाठी मला  सातलाच घर सोडावे लागते. लग्नानंतर सुरुवातीच्या तीन वर्षात पौर्णिमेच्या कर्तृत्वाला अवकाश मिळाला हवा या भूमिकेतून प्रथम जानकीबाई तेंडुलकर  महिलाश्रम सामाजिक संस्थेत व नंतर एका प्रख्यात हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजत तिला प्राध्यापक म्हणून मी नोकरी करण्यासाठी प्रोत्साहित केले.तिथे  नोकरीच्या काळात तिची १०:०० ही  कामावर जाण्याची वेळ असायची. या काळातही मी कामावर जाणार म्हणून भल्या पहाटे उठून आंघोळीला पाणी गरम करणे, फक्कड चहा करून देणे,कधी कधी माझ्या कपड्यांना इस्त्री करून देणे, रुमाल शोधून देणे ,दुपारी आल्यानंतर मला आयते ताट मिळावे  म्हणून जेवण तयार करून ठेवणे ही सर्वच कामे अगदी यंत्रवत करून ती कामावर जायची. मात्र सायंकाळी ती कामावरून आल्यावर तिला साधा गरमागरम फक्कड चहा करून दिल्याचे,कधीतरी  तिच्या साडी इस्त्री करून ठेवल्याचे मला आज आठवत नाही. संसारगाडा यशस्वीपणे हाकण्यात 'स्त्री'च जास्त शक्ती खर्च करीत असते हे मलाच नव्हे विश्वातील सारे नवरोबा संघटनेला पटेल, त्याची खात्री याबाबतचा विचार केल्यानंतर मला पटली.

       खरंतर प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री असते तसेच प्रत्येक यशस्वी संसारांमागे -प्रपंचमागे वा  सुखी कुटुंबामागेही कुटुंबाचा भक्कम कणा असलेली आदीमायारूपी स्त्रीच असते.देशाची पिढी घडविणा-या शाळा महाविद्यालयातील शिक्षिका ,प्राध्यापिका, सरकारी वा खाजगी कंपन्यांमध्ये काम करणा-या अधिकारी महिला, ,व्यवसायात स्वत:ला सिद्ध करणा-या यशस्वी उद्योजिका अथवा फुटपाथवर कष्ठाने भाजीव्यवसायासारखे तत्सम व्यवसाय करुन घर सांभाळणा-या महिला ही सारी 'स्त्री' शक्तीचीच प्रतिके आहेत.


      आज आठ वर्षानंतर मागे वळून पाहताना माझ्या यशस्वी विवाहाष्टकाचे  श्रेय पौर्णिमा व माझ्या आईला द्यावे लागेल. विनाअनुदानित तुकड्यांवर काम करणार्‍या शिक्षकाला असणाऱ्या तुटपुंज्या पगाराची जाणीव असल्याने लेकाच्या प्रपंचाला हातभार लागावा म्हणून फुटपाथवर बांगडी व्यवसाय करणारी माझी  माऊली आणि घरातील कामे आवरून मोकळ्या वेळेत शिवणकाम करून मिळणाऱ्या पैशाची बचत करुन घरखर्चाला हातभार लावणारी पोर्णिमा सारखी मेहनती गृहिणीच माझ्या जीवनाची खरीखुरी प्रेरकशक्ती आहेत. त्यांनी जर असहकार पुकारला असता तर मी शिक्षणाच्या जोडीने साहित्य- सांस्कृतिक- पर्यटन -सामाजिक क्षेत्रात आज जे काही नाव कमावले आहे ,यशस्वी सोपान पार केली आहेत ती करू शकलो नसतो, याची जाणीव मला या निमित्ताने झाली. खरं तर माझा पिंड सामाजिक कामाचा असल्याने मि सकाळसत्रातील काॅलेज आटपुन बाहेर पडलो की अधिकाधिक वेळ माझ्या सामाजिक साहित्यिक कामाला देत असतो.त्यामुळे घराकडे कधीकधी दुर्लक्षच होते.यामुळे ब-याचवेळा पौर्णिमा रुसते रागावतेही मात्र मी करित असलेल्या सकारात्मक कामाबाबत तीला मनोमनी आदरच आहे.हे लपून राहीलेले नाही.



     कधी कधी मनात विचार डोकावतो,जर घरातील स्त्रीयांनी असहकार पुकारला तर? कल्पनाच न केलेली बरी.सारखा-सारखा चहा लागणा-या माझ्यासारख्या बापुड्याचे काय हाल होतील. किती दिव्य सोसावे लागेल? चहा व जेवण करणे, भांडी कपडे धुणे.अरराराराराsss

नको रे बाबा, हा व्याप.

  

        फक्त जाणीवेने काय ओ , त्याला नेणिवेची म्हणजेच कृतीची जोड नको का?  तर ठरलं मग आजपासून यापुढील काळातही संसाराची  यशस्वी रौप्य- सुवर्णमहोत्सवपूर्ती  साजरी करावयाची असेल तर संसाररथाचं भक्कम चाक  असणाऱ्या जोडीदाराचा आत्मसन्मान राखायला हवा. घरातील सर्व कामे तिची एकटीची जबाबदारी नसून आम्हा दोघांची असल्याने जास्त नाही पण थोडीफार मदत तिला करायला हवी, महिन्यातला एखादा रविवार घरातल्या गृहिणींना किचन 'हॉलिडे 'घोषित करून एखादे खमंग रुचकर पदार्थांची मेजवानी असलेले आयते ताट त्यांना आपणहून बनवून वाढायला हवे. शक्यतो जमत असल्यास स्वत: केलेले कारण लाॅकडाऊन मध्ये अनेकांना होममिनिस्टरनी कामाला जुंपल्याच्या कथा सोशल मिडियावर व्हायरल झाल्या म्हणे ,अन्यथा बाहेरून आॅर्डर केलेले वाढायला हवे.जोडिदाराशी दोन प्रेमाचे शब्द बोलायला हवेत.सोबतीने नवरा म्हणुन असलेल्या जबानदा-या सक्षमपणे यशस्वी करुन दाखवायला हव्यात. तरच तिच्या नजरेत ' नवरा 'म्हणून आदरभाव बळावेल आणि संसाराची रेशीमगाठ सातजन्मासाठी घट्ट बांधली जाईल.


श्री विजय हटकर.


प्रसिद्ध अभिनेेेते श्री प्रभाकर मोरे यांच्यासह .

फुलांप्रमाणे माझे जीवन फुलविणारी समर्थ जोडिदार सौ.पौर्णिमा व आमचे फुलपाखरु कु.विधी.

अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...