Thursday, July 15, 2021

   न पटणारी एक्झिट..

 भावपूर्ण श्रद्धांजली रविंद्र साळुंखे 



💐💐💐💐💐 

         पवईतल्या हिरनंदानी गार्डनच्या हिरवळीवर बासरीचा मंद सूर आसमंत भारुन  टाकत होता. महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून आलेल्या  सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हिरानंदानीचे गार्डन एका बहारदार कार्यक्रमासाठी सज्ज झाले होते.आयोजकांची लगबग चालू होती.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साने गुरुजींचे पट्ट्यशिष्य श्री आण्णा क्षीरसागर, फाफे गुरुजी, लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक गणपत शिर्के ,माजी आमदार बाळ माने, प्रसाद पाटोळे ,अविनाश लाड ,,उल्काताई विश्वासराव  आदि मंडळींचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्याने काहि क्षणात कार्यक्रमाला सुरवात होणार होती.  निमित्त होते  राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष, बृह्नमुंबई महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षक सुभाष लाड यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे! कार्यक्रमाच्या काही क्षण अगोदर   कोकणातून येणा-या रेल्वेने  मुंबईतील या कार्यक्रमाला एक बुजूर्ग परंतू प्रसन्न व्यक्तिमत्त्व हिरानंदानी गार्डनवर लगबगीने येताना मि व्यासपीठावरुन पाहिले,माझी खात्री होताच मी व्यासपीठ सोडून त्यांच्या स्वागताला प्रवेशद्वारावर गेलो. 

     " साळुंखे साहेब आपले मनस्वी स्वागत असे मी म्हणताच या सभ्य गृहस्थाने कौतुकाने माझ्याकडे कटाक्ष टाकला. आपुलकीने आपले स्वागत झाले याच्या समाधानाने दिवसभर केलेल्या प्रवासाचे क्षीण त्यांच्या चेहऱ्यावरून निघून गेले होते.त्यांना आसनस्थ करून मी परत निवेदनासाठी व्यासपीठाकडे वळलो.सुभाष लाड सरांचा दिमाखदार सेवानिवृत्ती सोहळा संपल्यानंतर या सभ्य गृहस्थाने धावपळीतही न विसरता स्वागत केल्याबद्दल भेटून आभार मानत,आपण यापूर्वी भेटलो नसतानाही आपण मला कसे ओळखलात असा प्रश्न केला. यावर रत्नागिरी च्या सांस्कृतिक क्षेत्रात संकल्प कलामंचाच्या माध्यमातून भरिव योगदान देणाऱ्या रवींद्र साळुंखे सरांना सारा रत्नागिरी ओळखतो असे मी म्हणताच, एवढा काही मी मोठा नाहिए असे कृतज्ञतापुर्वक सांगणाऱ्या रवींद्र  साळुंखेंचा निरोप घेत मी कोकणात येण्यासाठी शिर्के सरांसोबत निघालो.

         रवींद्र साळुंखे या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वासोबत झालेली हि तीन वर्षापूर्वीची पहिली भेट,आज साळुंखे सर आपल्यात नाहीत ही बातमी ऎकल्यापासून डोळ्यासमोरुन हटायला तयार होत नाहिए. 

         तसं म्हटलं तर रवींद्र साळुंखे हे आमच्या लांजा तालुक्याचे कर्तृत्ववान सुपुत्र.लांजा तालुक्यातील निसर्गरम्य व ऎतिहासीक शिपोशी हे त्यांचे मुळ गाव.रत्नागिरीतल्या आॅक्टेल कंपनीत काम करताना आतला कलाकार स्वस्थ बसू देत नसल्याने नाट्यवेड जोपासण्यासाठी त्यांनी संकल्प कलामंच रत्नागिरी ची स्थापना केली आणि राज्यस्तरीय कामगार नाट्य स्पर्धेत विविध दर्जेदार नाट्यकृतीतुन लक्षवेधी भुमिका साकारत अभिनयाची  परितोषिके मिळवून रत्नागिरिचा  नावलौकिक वाढविला.आपल्या निरपेक्ष ,मनमिळाऊ ,नम्र ,स्वभावाने त्यांनी प्रचंड लोकसंग्रह गोळा केला होता.नुकतेच ते सेवानिवृत्त झाले होते. 

         


२१ जानेवारी २०२१ ला  रवींद्र साळुंखे सरांचा सुभाष लाड सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लांजा येथील आग्रे हाॅल ला सेवानिवृत्तपर सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी रवींद्र साळुंखेंसारख्या  एका जिवलग मित्राचा सन्मान करताना लाड सर खुप आनंदी होते.कारण ,"सेवानिवृत्ती म्हणजे जगण्याची दुसरी आवृत्ती असे मानणाऱ्या लाड सरांना खांद्याला खांदा लावून पूर्णवेळ  काम करणारा  एक सहकारी मिळाला होता. रवींद्र साळुंखेंनी देखील सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या

जन्मभूमी शिपोशीच्या विकासासाठी अधिक लक्ष घालण्यास सुरवात केल्याने ग्रामस्थही आनंदित होते.  " पैसा मुक्त निवडणूक" आणि संघाच्या ग्रामीण साहित्य संमेलनासाठी वेळ देण्याचे साळुंखेनी देखील कबूल केले असल्याने आम्हीही आनंदित होतो. 

         अशातच कोरोनाने अनेक आप्तस्वकीय गमावून बसल्याचे धक्के पचवित असताना रवींद्र साळुंखे पाॅझिटिव्ह आल्याच्या बातमीने आम्ही घाबरुन गेलो होतो परंतु कोरोनावर मात करित ते घरी परतल्याने आम्हीही आनंदित झालो होतो, पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही.पुन्हा त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलविले होते.मात्र येथे आयुष्याची शेवटची झुंज अपयशी ठरली.व आज सकाळी त्यांचे निधन झाले.

         रविंद्र साळुंखे जीवनप्रवासाच्या रंगभूमीवरुन जरी नश्वर देहाचा त्याग करित पंचतत्वात विलीन झाले असले तरी त्यांच्या आठवणी अनेकांच्या ह्रृदयात कायम घर करुन राहतील.त्यांच्या जाण्याने रत्नभूमी एका अष्टपैलू कलाकाराला मुकली तर आम्ही एका जिवलग,प्रेमळ  मार्गदर्शकाला हरवून बसलो आहोत.या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण साळुंखे कुटुंबियांसमवेत आहोत. या कठिण परिस्थितीतून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना बळ देवो ,हिच भगवंताकडे प्रार्थना. 

         मार्गदर्शक रवींद्र साळुंखे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

      🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐   

 विजय हटकर.

Sunday, June 20, 2021

विधी मराठी शाळेत जातेय ! - चर्चा झालीच पाहिजे .

 १५ जून ! शाळा प्रवेशाचा दिवस.यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेत होणाऱ्या जंगी स्वागताला इयत्ता पहिलीची मुले मुकली अाहेत, मात्र आॅनलाईनच्या अभिनव प्रयोगाने त्यांची शाळा सुरु झाली आहे.याच धर्तीवर मजबुरी म्हणून नाही तर अभिमानाने मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी मी मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे असे सांगणाऱ्या चिमुकल्या कु.विधी चा विडिओ व्हाॅटस् अप वर व्हायरल झाला आणि अनेकांनी तिचे कौतुक केले.

           विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या या विडिओने चिंतनशील मनाचे ज्येष्ठ समाजसुधारक, मातृभाषा प्रचारक श्री सुभाष लाड यांनी मराठी शाळांचे भवितव्य आणि शिक्षक- पालकांची भूमिका याविषयी अभ्यासपूर्ण लिहिलेला लेख-                

   


विधी मराठी शाळेत जातेय !  - चर्चा झालीच पाहिजे .

🎒🎒🎒🎒🎒🎒

       काल विधीची एक ध्वनीचित्रफीत पाहिली ,त्यात तिने आपण मराठी शाळेत नव्हे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रवेश घेतल्याचे सांगितले.माझ्यासारख्या अनेक मराठी प्रेमींनी त्याबद्दल झालेला आनंद व्यक्त केला आणि  विधीला शुभेच्छाही दिल्या .मग आता चर्चा झालीच पाहिजे असं का म्हणावं लागलं? 

        मित्रांनो कुणी कितीही भलावण केली तरी,ज्या परिस्थितीतून मराठी भाषिक शाळा जात आहेत आणि  मराठी भाषेची गळचेपी होते आहे हे चिंतनीय आहे.याचा दूरगामी विचार केल्यानंतर काही वर्षांनी मराठी भाषिक शाळा बंद पडलेल्या असतील.पोकळ अस्मितेचा बाजार मांडणारे एक स्थानिक भाषा म्हणून एखादी तासिका मराठीची ठेवा म्हणून आग्रह धरतील.उपकार केल्यागत राजकारणी त्याला मान्यता देतील.मराठी भाषादिन हा आताच्या दिखाऊ शिवजयंती उत्सवा सारखा साजरा करण्याची अहमिका सुरू होईल.गळ्यात टाय अडकवलेल्या पाल्याला किती छान मराठी बोलता येईल हे सांगणा-या महिलांची व्यासपीठावर गर्दी असेल.आज मंत्रालयाच्या दारात असलेली मराठी भाषा परदेशी संशोधकांच्या अभ्यासाचा विषय होऊन महाराष्ट्राच्या भूमीत परत फिरण्यासाठी ज्वलंत मराठी अभिमानी वीर सावरकरांचे "ने मजशी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला " हे पं.हृदयनाथ मंगेशकरांच्या दर्दभरी चालीतले गाणे आळवीत असेल.

      कुणी म्हणतील ही अतिशयोक्ती आहे.ज्यांनी आपली मुले इंग्रजी माध्यमात घालतांना आपण मराठीशी कोणती प्रतारणा करतो आहोत याचा जराही विचार केला नाही त्यांच्याकडून आणखी कोणती वेगळी अपेक्षा असू शकते? पण जे आपल्या आईची क्षणोक्षणी कृतज्ञतेने आराधना करतात त्यांना पावलोपावली मराठीची   अपराधीपणाची भावना टोचत असते म्हणूनच एखादी विधी जेव्हा सुहास्य वदने लडीवाळपणे "मी मराठी शाळेत शिकणार आहे " हे सांगते तेव्हा वसंत ऋतुमध्ये पालवी फुटलेल्या वृक्षाला डवरण्याची आशा पल्लवीत करते तसे मराठीप्रेमींचा आशावाद जागृत होतो.

         कोण आहे विधी ?स्वत:च्या अभिव्यक्तीला आकाश मोकळं करून आपल्या पंखांना आपणच ताकद देऊन स्वत:चा जीवन प्रवास स्वच्छंदपणे करू देणा-या सुजाण पालकांची ही प्रातिनिधीक कन्या आहे.तिच्या बोलण्यातला आशावाद ऐकला की आपली ही मुलगी असं बोलली पाहिजे असं वाटणा-यांसाठी ती दीपस्तंभ आहे.तिला हे मोकळे आकाश करून देणारेही आपल्यास माहित असणे आवश्यक आहे म्हणून त्यांचाही परिचय या चर्चेत झालाच पाहिजे.

         रत्नागिरी जिल्ह्यात उपक्रमशील प्रशाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'तु.पुं.शेट्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गेली अकरा वर्षे अध्यापक असलेले दोनदा एम्.ए.करूनही आता तिस-या विषयात एम्.ए.चा अभ्यास करीत असलेले श्री.विजय हटकर हे विधीचे वडील.इतिहासाचा शोध हा त्यांचा आवडता विषय.कोकण पर्यावरणात फेरफटका मारणे व त्याचा  सुक्ष्म अभ्यास हा त्यांचा छंद.सामाजिक कार्याच्या आवडीने अनेक सामाजिक संस्थात काम करतांना पुरोगामी महाराष्ट्राला अभिप्रेत असलेल्या नव्या विचारांची कास धरून उपक्रम राबविण्यात ते नेहमी पुढे असतात.ते उत्तम वक्ते आहेतच पण उत्तम निवेदक म्हणून अधिक परिचीत आहेत.त्यांचे प्राथमिक व  माध्यमिक शिक्षण लांजा येथे झाले आहे. कुडाळला त्यांनी बी.एड्. तर एम.एड्.चे शिक्षण सावर्डा - चिपळून येथे पुर्ण केले. त्यांची पत्नी ही सुद्धा पदवीधर आहे. 

           मराठीतून शिकून मला आवश्यक ते ज्ञान आणि  जगण्याची कला अवगत झाली आहे मग मी माझ्या मुलीला या समृद्धीच्या मार्गापासून दूर का करावे? आणि  म्हणूनच त्यांनी त्यांच्या घराजवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विधीला दाखल केले आहे.

         आता चर्चा जि.प. शाळांची. मी गेली अनेक वर्षात महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शाळा पाहण्याचा योग आला.सुंदर रंगरंगोटी केलेल्या , चित्रे आणि माहिती देणा-या फलकांनी सजलेल्या शाळा म्हणजे तेथील शिक्षकांनी मुलांना शाळेत रमविण्यासाठी केलेला यशस्वी खटाटोप पाहून कौतुक वाटले.सगळ्याच शाळांत संगणक असून मुलांना नवीन तंत्रज्ञान हाताळण्यासाठी शिक्षक स्वत: प्रशिक्षित आहेत.कोणत्याही खासगी शाळांतील शिक्षकांपेक्षा येथील शिक्षक एक पायरी पुढे आहेत कारण ते निवड प्रक्रियेतूनच घेतलेले असतात तसेच त्यांचा कामाचा आवाकाही मोठा असतो.शिक्षणेतर सरकारी काम इमाने इतबारे करून आपल्या मुलांनाही न्याय देण्याचे असे दुहेरी काम करतांना त्यांची दमछाक होते पण हरल्याची सुक्ष्म छटाही त्याच्या चेह-यावर असत नाही. हेच शिक्षण जर तो आपल्या विद्यार्थ्यांना देत असेल,माणूस म्हणून जगण्यासाठी जगाच्या बाजारात मुलांना उतरवणार असेल तर ते त्या विद्यार्थ्यांच्या फायद्याचे नाही काय ? पण या शिक्षकांकडून एक चूक होतांना दिसतेय,ती म्हणजे बरेच शिक्षक स्वत:च्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात किंवा कुठल्यातरी खासगी शाळेत टाकून आपल्याच अध्यापनावर अविश्वास दाखवत आहेत किंवा मराठी माध्यम कूचकामी आहे हे सिद्ध करताहेत.त्यांनी आतातरी जमिनीवर येऊन मी किती चांगला शिक्षक आहे हे दाखवून देण्याची एकही संधी गमावू नये, तसेच खेड्यात खितपत पडलेलो असतांना ज्या मराठी भाषेमुळे आपले जीवन घडले ती भाषा पुढच्या पिढीचे नुकसान करणार नाही याची खात्री लोकांना देण्याची गरज आहे.विद्यार्थी आहेत तो पर्यंत आपण शिक्षक असणार आहात म्हणून एकेक विद्यार्थी मिळवतांना आपला पाल्यही त्यात जमेस धरावा हे विसरू नका.एवढेच सांगणे आहे.कारण यातूनच मराठी माध्यमाच्या शाळा टिकतील व मराठी भाषाही! 

          आता खेडोपाड्यात गेलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांबाबत चर्चा ती काय करायची ? हे तर पैसे कमविण्याचे चांगले माध्यम असल्याने त्यांनी आपले धन गुंतवलेले आहे.यात कुठेही सामाजिक भान अभावानेही दिसत नाही.पहारेक-याला गुंगीचे औषध देऊन आतला माल लुटणा-या चाेरांसारखे यांचे आहे.१९६० च्या दशकांत आमच्या गावागावातले समाजधुरीण एकत्र आले आणि  माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था केली.बिचा-या गरीब अडाणी ग्रामस्थांनी जमेल तसा पैसा,झाडमाड देऊन त्या शाळा उभ्या राहण्यासाठी हातभार लावला. त्यात आमच्या पिढीपासूनचे विद्यार्थी गावात शिकून मोठे झाले.त्या गावक-यांना सामाजिक भान होते त्यांचे नेहमीच कृतज्ञ आहोत.आज इंग्रजीचे दुकान मांडणा-यांबद्दल कोण कृतज्ञता व्यक्त करणार आहे? आणि का करावी? हे भरमसाठ फिया आकारून पालकांना जेरीस आणतातच, त्यात तुमच्या मुलांना अधिक शिकवणीची गरज आहे सांगून त्यांचे साटेलेटे असलेल्या ट्युशन क्लासमध्ये पैसे भरावयास भाग पाडतात. एवढे करून आपल्या मुलाला बॅरिस्टर करण्याची तसेच डाॅक्टर करण्याची हमी देतात काय ? जास्त नको पण जगाच्या बाजारात स्वत:च्या हिमतीवर लाथ मारेन तिथे पाणी काढीन अशी धमक तरी निर्माण करू शकतील काय?

         यांनी आमच्या कोकणी संस्कृतीवरच घाला घातला आहे याचे प्रत्यंतर उद्या गावागावात निराधारांचे आश्रम उभे राहून त्यांत दहीवीपर्यंत मुलाचे दफ्तर आपल्या खांद्यावर घेऊन शाळेत जाणारे पालक उद्या  मुलगा विचारत नाही म्हणून आश्रयास जातील तेव्हा येईल. आमच्या मराठी संस्कृतीत वृद्ध आईबापांची सेवा करण्याचे शिकवले जाते तर पाश्चात्य संस्कृतीत बीनकामाच्या वृद्धांसाठी वृद्धाश्रमाची व्यवस्था असते.

        शिक्षण म्हणजे पैसे छापण्याचे मशिन तयार करणे नसून माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक त्या कौशल्याची रूजवण करणे होय.हे केवळ शाळेतच मिळते असे नाही तर विद्यार्थ्याच्या आजूबाजूच्या परिसरातून मिळत असते त्यासाठी त्या परिसराचा एक घटक होऊन जगायचे असते.समाजाशी एकरूप होण्यासाठी दोघांचीही एकच भाषा असावी लागते ती असते मातृभाषा म्हणूनच शिक्षणात मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व आहे.

      विधीला या मातृभाषेचा चांगला लाभ होईल आणि  मला कोण व्हायचं याचा निर्णय तिचं घेईल.तोपर्यंत तिची प्राथमिक बैठक पूर्णपणे पक्की झालेली असेल. 

        प्रत्येक घरातल्या विधीला तिला हासत खेळत बालपणाचा आनंद घेण्यासाठी प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतून द्यावे यासाठीच ही चर्चा.

        🚩🚩🚩🚩🚩 

       श्री सुभाष लाड- मुंबई 

       


Saturday, May 29, 2021

वात्सल्यमूर्ती आई

 वात्सल्यमूर्ती आई

सौ.अरूणा अरविंद हटकर.


भाग १ - 
           माझ्या आजी- आजोबांना 'वसंत' या मुलानंतर झालेली पहिली मुलगी सुधा म्हणजे माझी वात्सल्यमूर्ती आई होय.पुढे चार वर्षाच्या अंतराने लता व पुढे शोभा या दोन बहिणी झाल्या. आजी आजोबांंचा संसार असा सुंदर चालला असताना दृष्ट लागली. व १४ दिवसाच्या चिमुकल्या शोभा ला घेऊन आजीला घर सोडून निघून जावेे लागले.पुढे तिने दुसरा संसार थाटला.पण आजोबा घाबरले डगमगले नाहीत.बायकोच्या अभावी उघड्यावर पडलेल्या संसार त्यांनी एकट्याच्या खांद्यावर घेतला.व तेच मुलांसाठी आई बनले.आजोबांचे सांवंतवाडिच्या भाजीमार्केट मध्ये कटलरीचे दुकान.मग लहानग्यांच्या जेवणाचा प्रश्न जटिल.त्यात थकलेली आई पार वृद्धत्वाकडे झुकलेली.एका डोळ्याने तिला दिसायचं कमी झालेलं .अशा अवस्थेत दोन वेळची खानावळ त्यांनी मुलांसाठी सुरु केली.लहान मुलांचे आवरुन मग ते दुकानात जात.

       आजोबा व आजीचे प्रकरण कोर्टात गेले.व लता सहावर्षाची असताना त्यांचा घटस्फोट झाला. पण तो झाल्यानंतरहि लता थोडि सुजाण होईपर्यंत आजीकडेच राहिली. पण आई व वसंत मामा आजोबांकडेच होते.आईचे आजोळ गोव्याला बिचोली या छोट्या शहरवजा गावात.आजीने दुसरा संसार केल्याचे तिच्या डिचोलीतील भावांना आवडले नव्हते.म्हणून त्यांनी तिच्याशी बोलणे काही काळ बंद केले.पण आपल्या भाओजींबरोबर ते आपुलकीने वागले.त्यांच्यातील ममत्व कायम राहिले.आपल्या बहिणीच्या या चुकीच्या निर्णयामुळे आपल्या भाओजींवर संकट कोसळले आहे हे ओळखून आईच्या मामाने आई व वसंतला आपल्याकडे गोव्याला शिक्षणाला नेले.पण गोव्यात मामाला तीन मुलगे. तेथील कुटंबकबिला मोठा.त्यामुळे खाण्या पिण्याची आबाळ .त्यात या दोन भावंडांची भर.मामीचा स्वभाव मात्र थोडा कडक होता.पुढे आईची ( सुधा )  शाळा कायमची सुटली.व ती मामीला घरकामात मदत करू लागली.तर वसंत आपल्या मामेभावांसोबत शाळेत जाऊ लागला.पण मामीचा कडक स्वभाव व तिथले वातावरण वसंतला आवडायचे नाही. 

त्यातच गोव्यात पोर्तुगीजांनी उच्छवास मांडलेला.१५ आॅगस्ट १९४७ साली ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतुन भारत स्वतंत्र झाला परंतु अजुनही गोवा भारताचा भाग झाला नव्हता.गोवा, दीव -दमण हे विभाग पोर्तुगीजांच्या अंमलाखाली राहिले होते.यासाठी गोवा मुक्ती अभियानाच्या माध्यमातून स्थानिक कोकणी गोवेकरांसोबत महाराष्ट्रातील मराठी बांधवही पोर्तुगीजांच्या विरोधात उभा ठाकलेला.गोवामुक्तीसाठि गोवेकरांचे आंदोलन चाललेले. गोवामुक्तिसाठी गोवेकरांचे आंदोलन ऎन भरात आलेले..अशा परिस्थितीत चवताळलेल्या पोर्तुगिजांनी दडपशाहीचा मार्ग स्विकारला होता.आंदोलन दडपून टाकण्यासाठी पोर्तुगीज स्थानिक गोवेकरांवर बेछूट गोळीबार करायचे.म्हापसा, फोंडा ,बिचोलीम्,मडगांव, पणजी सगळीकडे सारखीच परिस्थिती होती.गोवा मुक्ती संग्रामात पुरुषांसह शेकडो स्त्रियाही सहभागी झाल्या होत्या.सत्याग्रहाच्या देखरेखीपासून प्रत्यक्ष सत्याग्रही तुकडीत सामील होऊन निर्भयपणे गोळ्या झेलण्यापर्यंत स्त्रियांचा सर्वंकष सहभाग होता.या सत्याग्रहिंना अमानुष मारहाण झाली,गोळीबार झाला. यात मंदा याळगी , कमला उपासनी , प्रभा साठे,  शांता राव यांसह असंख्य महिला धारातीर्थी पडल्या. आईच्या आजोळातील बिचोलीम मध्येही आंदोलन पेटले होते.यावेळी आई जवळपास ९ ते १० वर्षाची होती.पोर्तुगीज बिचोलीम् मध्ये वस्ती-वस्तीवर गोळीबार करायचे तेव्हा आईची मामी आपल्या मुलांसह वसंत व सुधाला घरातील शेणाने सारवलेल्या जमिनीवर लोटांगण घातल्यासारखे झोपवायची.कारण या लहानग्यांचे जुलमी पोर्तुगीजांच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीपासून रक्षण व्हावे.खरं तर ४५० वर्षापूर्वी पोर्तुगालचा 'अल्फान्सो आल्बूकर्क ' गोव्यात घुसला तेव्हा तिथे आदिलशहाची हुकुमत होती. सहा हजार मुसलमानांच्या रक्ताचा पाट वाजवून त्याने गोवा राज्य  जिंकले होते.त्याला गोवा प्रांतात स्वत:चे राज्य निर्माण करावयाचे होते सोबत व्यापार -उदीमही वाढवायचा होता.धर्मांतराची जबरदस्ती, जुलमी अत्याचार यातून पोर्तुगीजांनी आपले बस्तान गोव्यात बसविले होते.खरे तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लष्करी कारवाई करुन गोवामुक्ति शक्य होती, परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंनी लष्करी वापर न करण्याची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली होती.त्यांच्या या स्वप्नाळू धोरणाने गोवामुक्ति लांबली,व त्याचा त्रास गोवेकरांना सहन करावा लागला.

         या तणावग्रस्त परिस्थितीला आईचा भाऊ वसंत कंटाळला होता. भारत सरकारने १९६१ ला गोवा पोर्तुगीजांच्या गुलामीतुन मुक्त केला.व त्याचा भारतात विलीन होण्याचा मार्ग मोकळा झाला.पुढे सावंतवाडी व गोवा बससेवा सुरु झाली.व कंटाळलेल्या वसंतने १९६१ ला सावंतवाडी गाठली.भाऊ वसंतच्या अनुपस्थितीत आईचे हि गोव्यात लक्ष लागेना.त्यात मामीकडुन घरकामात मदत करूनही जाच होताच.कामात वेळ झाला तर मारहाण करायची.त्यामुळे पुढे दोन वर्षानी आईहि सावंतवाडिला परत बाबांकडे परत माघारी आली.आता मात्र आई खुश होती कारण बाबा व भाऊ वसंत सोबत ती आनंदात रहात होती.आई घरकामात लक्ष घालू लागली.तर मामाला ड्रायव्हिंग चे वेड असल्याने मुंबई गोवा ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवर तो क्लिन्नर म्हणून जाऊ लागला.पुढे तो ट्रक चालवायला शिकला.व ट्रान्सपोर्टच्या कंपनीत ड्रायव्हर म्हणून चिकटला तो कायमचाच!सावंतवाडी हे ऎतिहासिक राजे सावंत -भोसले यांचे संस्थानाचे शहर.खरं तर तिचे नाव सुंदरवाडी.नावाप्रमाणेच सुंदर असलेल्या सावंतवाडीचे देखणेपण सर्वश्रुत आहे.छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सावंतवाडीला स्वत:चा इतिहास तर आहेच शिवाय विशेष संस्कृतीही आहे.आईचे तर आपल्या या गावावर विशेष प्रेम.ब-याचवेळा गप्पांमध्ये कधी या सावंतवाडीचा विषय आला की आई गर्वाने सांगायची, - " माझी वाडी लय भारी आसा,त्याची सर तुमच्या गावाक नाय." 

      इकडे आईच्या आईला तीन आणखी मुले झाली .मुलगा संजय व मुलींची नावे अनुक्रमे बेबीनंदा व  मंगल ठेवण्यात आली.त्यांच्यासोबत शोभाहि तिकडेच रमली.तर मोठी झाल्यावर लता बाबांकडे माघारी फिरली.यावेळी च सावंतवाडी त गोविंद चित्रमंदिर सुरु झाले.आईला मराठी व हिंदी चित्रपट पहाण्याची विलक्षण आवड.त्यामुळे आजोबांना न सांगताच आई मैत्रिणिंसोबत चोरून पिक्चर बघायला जायची.आता सुधा (आई) , लता,वसंत हि सारी भावंडे मोठी  झाल्याने आजोबा हि निश्चिंत होते.त्यांनी घेतलेल्या कष्टाला फळ आले होते.व्यापारातहि चांगलाच जम बसला होता.सगळे कसे ठिक चालले होते.सुखाचे चार  क्षण आईच्या वाट्याला आले होते पण तिने ठरविले कि आपल्या दोन्ही भावंडाचा संसार फुलल्या शिवाय आपण लग्न करायचे नाही.व त्याप्रमाणेच प्रथम भाऊ वसंताचे लग्न व नंतर लता चे लग्न मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

      याच दरम्यान वडिलांचे भाऊ मारुती अर्थात भाईकाका घरांवर फवारणीचे काम करण्यासाठी कंत्राटी आरोग्यखात्यात काम करत होते.सावंतवाडीत ते कामावर असताना त्यांची भेट आईचे वडिल लक्ष्मण पाटील यांच्याशी झाली.व त्यातून त्यांनी मोठ्या भावासाठी आईचे स्थळ विचारले.स्वाभिमानी स्वभावाच्या आजोंबानी होकार दिला. व १२ डिसेंबर रोजी माझ्या आई - बाबांचे लग्न सावंतवाडी येथे उत्साहात पार पडले.व कु.सुधा लक्ष्मण पाटील आता सॊ.अरूणा अरविंद हटकर बनली. व ती सासरी लांजा तालुक्यातील तळवडे या एका दुर्गम खेड्यात आली.

      

 क्रमश...

भाग दोन :- (२)

         "अन्नपूर्णा आई"  


    माझी आई म्हणजे प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत! चार मुलांसकट संपूर्ण संसाराचा गाढा ओढण्याची जबाबदारी तिचीच होती.पण तिला त्याचं ओझं कधीच वाटलं नाहि.ते वाहण्यासाठी लांजा बाजारपेठेतल्या फुटपाथवर ती महिलांना बांगडी भरण्याचा व्यवसाय करायची.पण यात तिने कसला संकोच बाळगला नाही.या व्यवसायाच्या आधी तळवडे गावात राहत असताना गावोगावी डोक्यावर माश्याची टोपली घेऊन मासे विकणे, वडिलांसोबत घरी गावठी दारु विकणे हे ही व्यवसाय तिने केले.पण हा सगळाखटाटोप प्रपंचासाठीच होता. तुमच्या पोटात भुक असेल,डोक्यात कसलीही लाज नसेल आणि तुमच्या मनगटात जिद्द असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीतुन मार्ग काढू शकता ,अगदि कुठल्याही . हे माझ्या आईने सिद्ध केले होते. पुढे दारु विक्री बंद करुन आई- बाबा लांज्याला आले.व बाजारपेठेतील वाघद-यांच्या घरात भाडेकरु म्हणुन राहिले.इथेच ख-या अर्थाने प्रपंचाला सुरवात झाली.बाबांचे बाजारपेठेतील खालच्या नाक्यात पानपट्टी चे दुकान. त्यावेळी त्याला पानगादी म्हणायचे.या छोट्याश्या पानगादिवर बाबा लांज्यातील सहा जणांचा व गावातील पाच सहा जणांचे अशी दोन कुटुंब सांभाळायचे.तारेवरची कसरतच होती ती.

        एकेदिवशी शाळेत जाताना मी जेवणाचा नवीन टीफिन मला आई घेऊन दे म्हणून आईकडे तगादा लावला.तिने बाबांकडे त्यासाठी पैसे मागितले.पण त्यांनी वेळेवर दिले नाहि.म्हणून रागावलेल्या आईने माझ्या बाळाला टीफिन मि देणारच असे बांबाना सांगितले.पण बाबांच्या छोट्यशा व्यवसायात सारे भागत नव्हते याची जाणीवही तीला होती.यातूनच तिने बांगडी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.व. ईसानी स्टोअर्स या कटलरि व्यवसायिकाच्या मदतीने व्यवसाय सुरु केला व दोन दिवसांनी आईने मला बाजारातून नवा टिफीन आणुन दिला.तो मिळताच मला झालेल्या आनंदाने आईच्या डोळ्यात आनंदाश्रु दाटलेले होते.आजहि तो क्षण मला तसाच आठवतोय.मुलाच्या सुखासाठी फुटपाथवर बसून व्यवसाय करणाऱ्या आईचे ते रुप आठवले की तिच्या असीम कष्टाची जाणीव होते.

         तशी आई दिसायला मध्यमसर चणीची,सडपातळ शरिरयष्टीची ,सावळीशी ( कृष्णवर्णीय)  ही बाई! पण मनाने ती गॊरवर्णीयच म्हणायला हवी.घरच्या सर्व खाणा-या तोंडासाठी भरपेठ आणि चविष्ट खाणं तर करायचीच पण,  शेजार पाजारच्यांसाठी सुद्धा त-हेत-हेचे पदार्थ बनवून खायला घालायची.अगदी अन्नपुर्णाच म्हणा ना! तिच्या हातच्या  माश्याच्या कालवणाला तर चवच निराळी.पाहुणे किंवा माझे आत्येभाऊ  घरी आले कि ते आईला मच्छी फ्राय करायचा आग्रह धरायचे ,आईही त्यांच्या जिभेचे चोचले पुरवायची.

       मला आजही ते दिवस आठवतात आई गावा- गावात, आठवडा बाजाराला व्यापाराला जायची. मंगळवारी लांजा, बुधवारी पाचल किंवा पाली, गुरुवारी राजापूरच्या  बाजाराला पहाटे पाचला उठून अॅप्पे टेम्पोतून कटलरी माल व बांगड्यांचा हारा घेऊन जायची. राजापूर हे ऐतिहासिक शहर. शिवकाळातील प्रमुख बंदर व सध्याचे तालुक्याचे ठिकाण. येथील आठवडा बाजार सायंकाळी सहा सात पर्यंत भरत असल्याने तिला घरी लांज्याला यायला आठ ते नऊ वाजायचे. घरी आल्यानंतर ती लगबगीने अर्ध्या ते एक तासात गरमागरम जेवण बनवायची  व आम्हा लेकरांना वाढायची. दिवसभर सूर्यनारायणाचे चटके सोसत व्यापार करून थकलेल्या आईच्या चेहऱ्यावर आम्ही भावंडे जेवताना एक समाधानाची लहर असायची. घरट्यात असलेला चिमुकल्या पिल्लांना दाणा भरवताना जशी पक्षीण सुखावते तसाच भाव तिच्या चेहर्‍यावर असायचा.मी शिक्षण पूर्ण करुन लांजा हायस्कूलला  शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर ही आईने आपला हा व्यापार कधीच थांबवला नाही.ती नेहमी म्हणते अरे जोपर्यंत माझ्या हाताने होते आहे तोपर्यंत मी स्वावलंबीपणानेच जगणार!

  आज आई ७१ व्या वर्षात पदापर्ण करीत आहे.मधल्या काळात सन २००७ ला अपघातात माझा मोठा भाऊ मला कायमचा सोडून गेला.तर पुढे २०१३ मध्ये बाबाही मार्गस्थ झाले.त्यामुळे  कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.पण अशाही स्थितीत मला भक्कम आधार दिला तो आईनेच!त्यांची कमतरता मला तिने कधीच जाणवू दिली नाही.

   -  "आई घरातल्यांपैकी कुणाचीही जागा घेऊ शकते,

      पण आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही." 

हे वास्तव मला ख-या अर्थाने यामुळे उमगले.खरोखरच आई इतक्या सहजपणे कोणत्याही व्यक्तीची जागा घेऊ शकते आणि आपल्याला त्याची उणीवही, कमतरताही भासवून देत नाही. जीवनभर आपल्यावर भरभरुन माया, प्रेम, स्नेह लावणारी "आई" हे पृथ्वीवरील ईश्वराचं अस्तित्वच जणू! आणि म्हणूनच या भूतलावर तीची जागा मात्र कोणी घेऊ शकत नाही हेच खरे!

आई तुला सत्तराव्या वाढदिवसानिमित्त आभारभर शुभेच्छा.

क्रमशः 


वि।ज।य।

३० मे २०२१


भाग -०३

आईचा सत्कार

💐💐💐💐

      नरपंचायत लांजा, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व महिला बालकल्याण समिती अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला २०२० म्हणून माझ्या आई श्रीमती अरूणा अरविंद हटकर यांना सन्मानित करण्यात आले.

    गणेश मंगल कार्यालय लांजा येथे संपन्न झालेल्या या महिला मेळाव्याला उपनगराध्यक्षा सॊ.यामिनीताई जोईल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुषारजी बाबर,महिला बालकल्याण समिती सभापती श्रीमती सोनाली गुरव, रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध डाॅ.कल्पना मेहता, अॅड.धनश्री सुतार, प्राध्यापिका डाॅ.सुवर्णा  देऊसकर आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी डाॅ.कल्पना मेहता यांच्या शुभहस्ते आईला सन्मानित करण्यात आले.माझ्या सॊभाग्याने या कार्यक्रमाचे निवेदन करण्याची संधी मला मिळाल्याने आईच्या नावाची घोषणा करताना मन भरुन आले.आजवर तिने गाळलेल्या घामाचे,वेचलेल्या कष्टाचे असे सार्वजनिक कॊतुक प्रथमच झाल्याने खुप समाधान झाले.

    लांजा नगरपंचायतीच्या वतीने यावेळी नगरपंचायत हद्दितील १३ कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये श्रीम. अनुराधा राणे,प्राध्यापिका माधुरी गवळी,अॅड.लिना जेधे ,श्रीमती शलाका कापडी, श्रीम. सुहासिनी  सार्दळ, श्रीमती ऋचा  वेद्रे, श्रीम.विजयालक्ष्मी देवगोजी, श्रीमती अमिताभ कुडकर, श्रीम. सुप्रिया बापट, श्रीम.मनीषा घाटे ,श्रीम .शुभांगी वारेशी, श्रीम.मिनल सावंत यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

    ️आयुष्यभर संघर्ष करित, दारिद्याच्या छाताडावर बसून आईने आम्हा मुलांना नव्या विचारांची आव्हाने पेलण्याची ताकद दिली.वयाच्या सत्तरीनंतरही आजही ती घरी न बसता बांगडी व्यवसाय करते.प्रत्येक माणसाने स्वावलंबी असले पाहिजे हा आपल्या कृतीतून संदेश देणारी माझी आई म्हणूनच माझी आयकाॅन आहे.

       डोक्यावर बांगडी चा हारा घेऊन गावागावात महिलांना  बांगड्या भरून आईने आम्हा मुलांना उच्चशिक्षण दिले.म्हणुनच आज मी ज्युनिअर काॅलेज लांजा येथे एम.एड.पर्यंत शिक्षण घेऊन सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर बहिण सॊ.देवता पदवीधर असून कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, भरणे - ता.खेड येथे अधिक्षिका म्हणून कार्यरत आहे.कोणतेही शिक्षण नसतानाही विचारांनी सुशिक्षित असणा-या आईने निरपेक्षपणे अनेकांना प्रेम दिले.घरची मीठ - भाकरी प्रेमाने दिली. मधल्या काळात मोठ्या भावाचे  ( दादाचे) झालेले अपघाती निधन व बाबा ही कायमचे सोडून गेल्यावरही ती डगमगली नाही. हा काळ तसा आम्हा कुटुंबाचा पडता काळ होता.नियती रोज नवी परिक्षा घेत होती.पण आईने आम्हा सर्वांना सावरले.आम्हा भावंडाना ही भक्कम आधार दिला.यावेळि 

 " आई घरातल्यांपैकी कुणाचीही जागा घेऊ शकते,

   पण आईची जागा कुणीही घेऊ शकत नाही "  -या विचाराचा आम्हाला प्रत्यय आला.

     आई म्हणजे त्यागाचे आणि मायेचे महाकाव्य आहे. आई संस्कृती नावाच्या विद्यापीठाची अनभिषिक्त कुलगुरू असते.असे म्हटले तरि वावगे ठरणार नाही. तिने केलेल्या कष्टामुळेच आपण घडतो.आज जागतिक महिला दिनानिमित्ताने तिला अर्थात  माझ्या मुळ प्रेरणास्थानाला  पहिल्यांदाच  सन्मानित करण्यात आले.त्यामुळे हा दिवस ख-या अर्थाने संस्मरणीय ठरला





काही निवडक क्षणचित्रे :--













भाग -४

आईला पोलिसांनी पोलिसव्हॅनमध्ये बसवून पोलिस स्थानकात नेले.

आज एक जुलै 2021. कोरोना  वैश्विक संकटामुळे  भारतात आणि महाराष्ट्रात अजूनही सक्तीची टाळेबंदी (लाॅकडाऊन) सुरूच होती. या काळात खऱ्या अर्थाने कंबरडे मोडले त्या छोट्या-छोट्य व्यवसायिकांचे व फुटपाथवर बसणा-या फेरीवाल्यांचे.वर्ष उलटले  तरीही कोरोनासुराला आपण अटकाव घालू शकलो नव्हतो.रोजच्या रोज कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत होती.त्यामुळे सरकारही टाळेबंदी हठवायला तयार नव्हती. अशा काळात आलेले संकट दोन चार महिन्यात संपेल असा कयास बांधणा-या सर्वसामान्यांनी पोटाला चिमटा काढून बचत केलेला पैसा देखील संपला असल्याने चरितार्थ कसा चालवायचा  हा गंभीर प्रश्न आ वासून उभा राहिल होता.सरकार मदत करित होती पण ती तुटपुंजी स्वरूपाची होती.

     या तीव्र स्वरूपाच्या संकटामुळे एक ना एक दिवस मरणारच आहोत हा पवित्रा घेत अनेक व्यवसायिकांनी फुटपाथवरच्या फेरीवाल्यांनी दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला.मास्क व. सॅनिटायझर्सचा वापर करित ते स्वतः ला संभाळून पोट भरण्यासाठीच नाइलाजास्तव घराबाहेर पडले होते.अशा परिस्थितीत माझ्या आईने व सुरेखा शिर्के ,रतन भागवत या फेरिवाल्या महिलांनी फुटपाथवर आपली दुकाने लावायला सुरवात केली.फुटपाथवर बसायला बंदी असतानाही शासनादेश धुडकारुन दुकाने लावली म्हणून लांजा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षिका पाटील मॅडम यांनी पोलिस व्हॅनमध्ये बसवून आईसह त्या दोघीनांही पोलिस स्थानकात नेले.व समज देऊन सोडले.अशा पद्धतीने जीवनात पोलिसव्हॅन मध्ये बसण्याचा अनुभव माझ्या आईने घेतला.

      


     स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी समाजसुधारकांना जेलमध्ये जावे लागले, तर स्वातंत्र्योत्तर कालखंडात एकविसाव्या शतकात उद्भवलेल्या कोरुना वैश्विक संकटात टाळेबंदीने आर्थिक कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या तिघींना पोटाची खळगी भरण्याचा संघर्षामुळे पोलिसांनी पकडून नेले.

    माझा शेजारी मनोज पाटीलने मला या घटनेची माहिती दिली ,तेव्हा लगेचच आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतली. तिथे जाईपर्यंत माझे मन एखाद्या वावटळीत सापडल्यासारखे झाले. मी अजून शिक्षक म्हणून माझ्या प्रशालेमध्ये परमनंट नसल्याने आईला फुटपाथवर बसावे लागते आहे आणि आज तिला पोलिसांनी व्हॅनमध्ये बसवून नेले, यामध्ये मी स्वतःला दोषी मानले.

    माध्यमातील लेख

१) साप्ताहिक कोकण मिडिया-


साप्ताहिक कोकणी माणूस -



गणेशोत्सव २०२५ लांजा



 गणेशोत्सव २०२५



बाप्पाची मनोभावे आरती करताना


 

Saturday, May 1, 2021

पाच तपांचे सुभाषपर्व ..

 श्री सुभाष लाड षष्ट्यब्दीपूर्ती अभीष्टचिंतन सोहळा

🎊🎊🎊🎊🎊🎊

 वाढदिवस विशेष लेख -   पाच तपांचे सुभाषपर्व ..

🦚🦚🦚🦚🦚🦚

   



" सदा लोकहिता सत्त्क रत्नदीपा स्नोत्तमा" 

     - अर्थात जे सदैव लोकहित करण्यात मग्न असतात ते रत्नदीपा प्रमाणेच प्रज्वलित असतात.या उक्तीप्रमाणेच आयुष्यातला प्रत्येक क्षण लोकहितासाठी विनियोगात आणून रत्नदीपा प्रमाणे प्रज्वलित असणारे राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबईचे संस्थाध्यक्ष श्री सुभाष लाड यांनी कोरोना वैश्र्विक संकटात केलेले कार्य कौतुकास्पद व अनुकरणीय असेच आहे. कोरोनाच्या पडत्या  काळात ख-या अर्थाने जीवनात माणुसकीला सर्वोच्च स्थान देणाऱ्या लाड सरांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा अनेकांना झाला.या वैश्र्विक संकटात अनेकांसाठी आधारवड ठरलेल्या सुभाष महादेव लाड यांचा ०२ मे हा जन्मदिवस.  कोरोना काळातील त्यांच्या सत्कार्याचा यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.. 

       या सृष्टीतील सर्वाधिक सक्रिय आणि प्रभावी जीव म्हणजे सूक्ष्मजीव.गत वर्षी अशाच covid-19 नामक सूक्ष्म विषाणूने जगभर धुमाकूळ घातला आणि जागतिक आपत्ती उद्भवली. कोरणा विरुद्ध संपूर्ण देशासह महाराष्ट्र गेल्या सव्वा वर्षांपासून अधिक काळ लढा देत आहे. या महामारिच्या काळात अनकांचे आप्तस्वकीय सोडून गेले.तर कोरोना विरुद्ध लढणाऱ्या अनेक कोरोनायोद्ध्यांनाही आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले आहे. देशाची अर्थव्यवस्था जशी कोलमडली त्याचप्रमाणे अनेकांचे व्यवसाय -धंदे ही बंद पडले. कित्येकांच्या नोक-या  गेल्याने कुटुंब सांभाळायचे कसे या चक्रव्यूहात सापडलेल्यांची संख्या वाढू लागली. अशा काळात हतबल झालेल्या तरुणांच्या आत्महत्येच्या बातम्या सुभाष लाड यांना अस्वस्थ करु लागल्या. समाजभान जागृत असलेल्या लाड सरांच्या मनात असंख्य विचारांचे मोहोळ उठले.आणि त्यांनी आपल्या परीने ' खार ' होऊन अशक्यप्राय सेतू बांधण्यासाठी  प्रयत्न करण्याचे ठरविले.

१) राज्य आपत्कालीन निधी  - 

                     सामाजिक दायित्व असलेली माणसे विखुरलेल्या स्वरुपात का असेना समाजात आहेत यावर विश्वास असलेल्या सुभाष लाड यांनी कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या बांधवांना मदत करण्यासाठी संघाच्या माध्यमातून  "राज्यव्यापी आपत्कालीन निधी " उभारण्याचे ठरविले.याकरिता संपर्कात असलेल्या व सामाजिक संवेदना जागृत असलेल्या लोकांचा व्हाॅटसप ग्रुप बनवित सोशल मिडियाचा उपयोग कसा करावा याचा आदर्श परिपाठ देत लाखाच्या वर आर्थिक निधी संकलित केला. समाजाने दिलेले दान कृतज्ञतेच्या भावनेतून समाजालाच परत करावे या उदात्त भावनेतून आपण जमा केलेल्या आपद्कालीन निधीतून संकटात सापडलेल्या मातृमंदिर देवरुखच्या 'गोकुळ अनाथालयाला " समयोचित आर्थिक सहाय्य त्यांनी केले.

२) कोरोना संकटकाळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारी पातळी वरुन आवाहन करण्यात आले होते.याला प्रतिसाद देत सुभाष लाड यांनी संघातील सहकारी अनिल कारेकर ,गणेश चव्हाण विलास मुरुडकर यांच्यासह  मंत्रालयात जाऊन लेखाधिकारी शिरिष पालव यांच्याकडे मंत्रालयमुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रुपये ११,०००/- वर्ग केले.

३) कोरोना योद्ध्यांचा सन्मान :-

            कोरोना  काळात अनेकांनी कोरोना संसर्गाची टांगती तलवार आसपास असतानाही योग्य ती काळजी घेऊन कुणी आपल्या सेवेत प्रामाणिक राहून काम केले तर कोणी सामाजिक बांधिलकी म्हणून मदतकार्य केले. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी ,परिचारिका वर्ग,वाॅर्डबाॅईज , पोलीस दलातील अधिकारी ते हवालदार , सनदि अधिकारी ,गावागावातील कोव्हिड कृती दलातील सरपंच ,ग्रामसेवक ,तलाठी त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते हे  त्यांच्या परीने मदत कार्य व कोरोना रोखण्यासाठी जीवाची पर्वा न करता थेट रणांगणात लढताहेत याची जाणीव ठेवुन या कोव्हिड योद्ध्यांना नमन करण्यासाठी सुभाष लाड सर यांनी आपल्या सहका-यांच्या साथीने मुंबई तसेच लांजा -राजापुरातील विविध सामाजिक संस्था व व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून गौरव केला.

४) मास्कवाटप :- कोरोना विषाणूपासुन नागरिकांचा बचाव व्हावा याकरिता लाड सरांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात लांजा राजापूर या दोन तालुक्यात ३७०० मास्कचे वाटप करण्यात आले.

५) सॅनिटायझर्स स्टॅण्डचे वितरण :-

                 बाजारात सॅनिटायझर स्टॅण्डच्या किमती जास्त असल्याने लाड सर यांनी आपल्याला सुचलेल्या कल्पनेचे गणेश पांचाळ यांच्याशी  आदान प्रदान करित अल्प किमतीत उत्कृष्ट सॅनिटायझर स्टॅण्ड बनविले व त्याचे मोफत वितरण सरकारी रुग्णालये,ग्रामपंचायत कार्यालये,  माध्यमिक प्राथमिक शाळांमध्ये केले.

६) आशा सेविकांना रेनकोट वाटप :- 

              कोविड १९ महामारिच्या काळात मोठ्या संख्येने मुंबई -पुण्याहून सुरक्षेच्या कारणास्तव  चाकरमानी कोकणात गावी परतले.अशा काळात राजापूर लांजा या सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या दोन्ही तालुक्यातील आशासेविकांनी या काळात उत्कृष्ट कामकाज केले.कोकणात वाड्या, घरे हि एकमेकांपासून दूरवरच्या अंतरावर असतात.अशा वेळी मुसळधार कोसळणाऱ्या पावसात काम करणे आशासेविकांसाठी जिकरीचे असते.तरीही राष्ट्रकार्य समजून अल्प मानधनातही आशासेविका कोविड१९ रोखण्यासाठी तळमळीने काम करित आहेत .याची दखल घेऊन संघाच्या वतीने अध्यक्ष सुभाष लाड यांच्या संकल्पनेतून लांजा व राजापूर तालुक्यातील ३० आशासेविकांना कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले व रेनकोटचे वाटप करण्यात आले.

७) मासिक निवृत्तीवेतनचे गरजवंताना वाटप :-

               प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या  लाड सरांनी कोरोना काळात व्यवसाय - धंदे बंद पडल्याने, नोक-या गेल्याने हतबल झालेल्या आपल्या अनेक सहका-यांना मदतीचा हात दिला. त्यांना मिळणाऱ्या मासिक निवृत्तीवेतनाचा विनियोग करित अनेक सहका-यांना तब्बल सहा-सात महिने आर्थिक सहकार्य करित त्यांचा संसार चालविण्याचे काम केले.परंतु त्याची जाहिरात केली नाही. दुस-याचं दु:ख जो समजतो  तोच समाजसेवक होऊ शकतो असे म्हणतात, आपल्या सहका-यांसाठी पेन्शन म्हणून येणा-या सर्वच्या सर्व  ३० ते ३५ हजार रूपयांचा विनियोग करित खिसा रिकामा करणारा  लाड सरांसारखा संवेदनक्षम माणूस खिशात असतानाही खिशात हात न घालणा-या गर्दीत अधिक ह्रदयाला भिडतो.

८) जीवन संवर्धन फाऊंडेशन - गुरुकुल म्हसकळ, टिटवाळा साठी निधी संकलन:- 

               सामाजिक समस्यांनी व्यथित अशा बेघर मुलांसाठी जीवन संवर्धन फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने टिटवाळा पासून जवळच असलेल्या म्हसकळ गावात गुरुकुल उभारले आहे.येथील मुलांच्या भोजनाची गैरसोयीचे  वृत्त लाड सरांना समजताच त्यांनी सोहम संगीत विद्यालयाचे सुनिल बुवा जाधव यांच्या मदतीने कोरोना काळात या गुरूकुलात जाऊन फेसबुक लाइव्ह संगीत मैफिलीचे आयोजन केले व या गुरुकुल साठी अर्थ सहाय्य करण्याचे आवाहन केले.याला प्रतिसाद देत लाड सरांना प्रेरणास्थानी मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी भरभरुन मदत केल्याने या गुरुकुल ला कोरोनाच्या  पडत्या काळात लाड सरांच्या माध्यमातून भक्कम आधार मिळाला.सरांनी आपली नात कु.ब्रम्हस्मिचा वाढदिवस हि तिथे साजरा करित या बेघर मुलांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण केले.सरांच्या माध्यमातून या गुरुकुल मध्ये मदतीचा ओघ आता वाहतो आहे .यामुळेच  ख-या अर्थाने समाजातील विषमतेच्या तळाशी काम करणा-या  लाड सरांविषयी अनेकांच्या मनात  ममत्व आणि आदर दृढ होतो आहे.

९) कोरोना रुग्णांचे मनोबल वाढविण्याचे कामही  लाड सर करित आहेत.त्यांच्या संपर्कातील एखादि व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे कळताच त्याला संपर्क साधून त्याच्या मनातील कोरोनाविषयक भिती घालवून त्याचे मनोबल वाढविण्याचे काम लाड सर गेले काहि महिने तळमळीने करत आहेत.कारण कोरोनाच्या भिती ,दडपण,दहशतीने अनेक जण धारातीर्थ पडले असल्याने कोरोना रुग्णांचे मानसिक बळ वाढविणे गरजेचे असल्याचे ते मानतात.

१०)  कोरोना काळात स्वत:च्या जीवाची बाजी लावत कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डाॅक्टर्स,नर्सेस साठी अनेक  पी.पी.ई.किट,फेस शिल्ड चे  मोफत वाटप लाड सरांनी केले आहे.

           या संकटकाळात दिव्यांग विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य पुरविणे, मराठी भाषेतील अनेक वर्षाची परंपरा असलेले दिवाळी अंक यंदा  बंद पडत असताना मोडीदर्पण दिवाळी अंकाचे प्रकाशन करुन मराठी साहित्यरसिकांना दर्जेदार दिवाळी अंक उपलब्ध करून देणे,अनेकांच्या जन्मदिवशी  त्यांच्याविषयी लेख लिहून त्यांचे चरित्र समाजासमोर मांडत आगामी काळातही असेच सकारात्मक काम करण्यासाठी त्यांना  प्रेरणा देणे आदि अनेक छोट्या -मोठ्या गोष्टी निरपेक्षपणे केल्या आहेत.आणि म्हणुनच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यातला माणुसकीचा निर्मळ झरा इतरांनाही कळावा यासाठीच त्या आपल्यासमोर मांडल्या आहेत.  

          येशु ख्रिस्ताने ल्यूक ऑफ बायबल मध्ये सांगितलेली एक कथा आज मला आठवते आहे. एका प्रवाशाला लुटून, मारून अर्धमेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिलेलं असतं. तो प्रवासी ज्यू असतो. एक ज्यू  पाद्री  तिथे येतो,तो त्याला पाहतो.  पण त्याला मदत न करता पुढे निघून जातो. मग सॅमॅरिटन येतो.सॅमॅरिटन आणि ज्यू मंडळी या दोघांमध्ये विस्तव जात नसतो.पण तो शत्रुत्व विसरतो आणि त्या ज्यू ला मदत करतो. तो त्याला खायला अन्न देतो,त्याला कपडे देतो, त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढतो.. तिथून परोपकारी माणसाला ' गुड सॅमॅरिटन' असं म्हटलं जाऊ लागलं. असे  परोपकारी ' गुड सॅमॅरिटन आयुष्यात मला मूठभर का होईना ,पण भेटले.यात सुभाष लाड सरांचा क्रमांक खुप वरचा  आहे.कारण लोकांचं दु:खं,वेदना, संवेदना या जाणण्याचे काम धर्म ,जात, पंथ, विचारधारा यापलीकडे जाऊन त्यांनी केले आहे.फक्त जाणलेच नाही तर आपल्या परीने त्या कमी करण्यासाठी त्याला कृतीची जोड दिली आहे.

          ज्ञानदानासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असताना समाजसेवेच्या आंतरिक ओढिने राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई, माझी मायभूमी प्रतिष्ठान मुंबई, राणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्ट, नाटककार ला.कृ.आयरे ट्रस्ट ,मोडी लिपी मित्रमंडळ अशा अनेक क्रियाशील संस्था स्थापन करुन गत ४० वर्षे शिक्षण- कला-साहित्य -संस्कृती -सामाजिक क्षेत्रात निस्वार्थी, निस्पृह कार्य केले आहे.या दिर्घ वाटचालीत त्यांना अनेकांची साथ मिळाली आहे.त्यांच्या विधायक कामाच्या या प्रवाहात अनेक माणसे सामील झाल्याने ती चळवळ बनली आहे.  या पाच तपातील सुरुवातीची दोन तपे संघर्षात घालविल्यानंतर वात्सल्यमूर्ती आईने दिलेल्या संस्कार रुपी शिदोरीच्या जोरावर आत्मभान, समाजभान ,राष्ट्रभान जपत सुभाष लाड यांनी विधायक कामाचा डोंगर उभा केला आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवकाळात राज्य लिपी म्हणून मिरवणाऱ्या मोडी लिपीचे संवर्धन व प्रचार, कोकणातील गावागावात सात वर्षे अविरतपणे माय मराठीच्या अभिवृद्धीसाठी आयोजिलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचा जागर, ग्रंथ चळवळ, पुस्तक प्रदर्शने, वसुंधरेच्या रक्षणासाठी घेतलेला पुढाकार, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,शेतकरी मेळावे आदि कार्यक्रमांचा उल्लेख करावाच लागेल. मानव जातीवर उदात्त श्रद्धा असलेल्या व्रतस्थ लाड सरांचं निराळंपण त्यांच्या अशा निस्वार्थी, निस्पृह कार्यातून अधिक ठळक होऊन नव्या पिढीसमोर प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहे.पाच तपांचे हे यशस्वी सुभाषपर्व पुढच्या काळात अधिक जोमाने बहरेल,आणि सेवाधर्माचा प्रसार करेल याचा विश्वास मला आहे.  आज लाड सर आपल्या वयाची षष्ट्यब्दीपुर्ती करित आहेत.आगामी काळातही त्यांची किर्तीपताका अशीच फडफडत राहो आणि यानंतरचे त्यांचे आयुष्य प्रदीर्घ, निरामयी, आनंददायी होवो हीच शुभकामना.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 श्री विजय हटकर

 लांजा

 ८८०६६३५०१७

साप्ताहिक कोकण मिडियातील लेख पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://kokanmedia.in/2021/05/02/subhashladsixtyplus/




Thursday, April 15, 2021

मनमोहक शुभंकर

 मनमोहक शुभंकर...

(छायाचित्र - गुगल साभार)

     लांजा शहरात स्वरुपानंद वसाहत मधील श्री पवार सरांच्या इमारतीत (चाळीमध्ये) राहताना सकाळी व सायंकाळी नेहमीच शुभंकराचे दर्शन व्हायचं. अहो हिंदू संस्कृतीत भारद्वाज पक्षाचे दर्शन शुभ मानलं जाते.त्यामुळे त्याला शुभंकर हे नाव पडलं. भारद्वाजच्या दर्शनाने मी नेहमीच सुखवायचो.तसं पक्षीजगता विषयी कोकणात राहून सुद्धा मी अल्पज्ञानीच! पण भारद्वजाच्या रोजच्या दर्शनाने पक्षांच्या सुंदर विश्वाची माहिती करून घेण्याविषयी मनी ओढ निर्माण झाली. सोबत फेसबुक,व्हाॅट्सअप सारख्या सोशल मीडियावरील पक्षी-प्राणी समूहात मी दाखल झाल्याने पक्षांविषयी ची नवीन माहिती मिळत होती. यातच माझ्या दुबईच्या पीटर नामक मित्राने मला निकाॅनचा अत्याधुनिक डि.एस.एल.आर कॅमेरा भेट म्हणून दिल्याने माझ्या छंदाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली.

      पवार सरांच्या घरासमोर असलेल्या रस्त्यापलीकडे पाणथळ जागेत दाट झुडपांचा, वेलींचा परिसर बहरलेला होता. या झुडपांवर कूप-कूप-कूप  किंवा कुरूक- कुरूक- कुरूक असा घुमावदार आवाज करणारा भारद्वाज नेहमी विसावायचा.नेहमी एकट्याने येणारा हा कधी कधी जोडप्यानेही यायचा.या झुडुपांवर बसून आपल्याच विश्र्वात तल्लीन होऊन ते आपापसात असे बोलत की जणू शंखध्वनी फुंकला जातोय.त्यांच्या आवाजाने मग आमची तंद्री भंग व्हायची. सकाळी सकाळी आपलं छोट्या मोठ्या किटकांचं भक्ष्य त्यांना मिळालं की मग आनंदात ते आपल्या आहाराचा आस्वाद घेत बसायचे. चमकदार काळा रंग, तांबूस पिंगट रंगाचे पंख ,लांब निमूळती शेपूट , लालभडक डोळे ,काळी व किंचित बाकदार चोच यामुळे भारद्वाज अधिक सुंदर दिसतो. प्रथमदर्शनी भारद्वाज आपल्याला कावळ्या सारखाच दिसतो, पण नंतर त्याच्या अंगावरील तपकिरी रंगाची झाक आपल्याला तो भारद्वाज आहे याची जाणीव करून देते. 

      कोवळ्या उन्हात त्याचे झळाळते सोनेरी पंख पाहणे, आकाशात घुमणारी शीळ ऐकणे ही खूप आनंददायी अनुभूती असते. भारद्वाज याचे गोड गाणे आणि भवतालचा सारा निसर्ग अंत:करणात वेगळे तरंग उठवितो,आपले अस्तित्वही या सा-या आनंदसोहळ्यात विरघळू लागते. एकरूपतेची प्रचीती येऊ लागते. मी नोकरी करतो त्या न्यू इंग्लिश स्कूल,लांजा या शाळेच्या उत्तरेकडील कंपाउंड जवळ खैराची झाडे आहेत.या झाडांवरही असून -मधून त्याची हजेरी असते,आॅफतासाला मग भारद्वाजाला  न्याहाळत राहणं,त्याचं निरीक्षण करणं, हाच माझा उद्योग बनायचा.मात्र माझी चाहूल लागली की तो उडून जवळील दुस-या झाडावर बसायचा.मग चार पाच मिनिटाचा वेळ शुभंकराच्या सानिध्यात घालविल्याने आजचा दिवस आनंदात जाणार या विचाराने मी स्टाफरूमकडे वळायचो. 

     कोकणात मोठ्या संख्येने दिसणाऱ्या भारद्वाज यांचा वावर भारताबरोबर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार ,चीन, इंडोनेशिया पर्यंत सर्वत्र आढळतो. पानगळीची वने, गर्द झुडपे, शेतशिवार व बागांमध्ये भारद्वाज यांचे वास्तव्य असते. बोलीभाषेत भारद्वाज लालकावळा, सुलक्षणी, कुंभारकुकडी, कुक्कुडकुंभा, कुंभारकावळा इत्यादी नावाने ओळखला जातो.पक्षीवर्गाच्या क्यूक्यूलिफार्मिस गणाच्या क्युक्युलिडि कुलात भारद्वाजाचा समावेश होतो.कोकिळा, पावशा, चातकासारख्या पक्षांचाही समावेश याच कुळात होतो.याचे शास्त्रीय नाव सेंट्रोपस सायनेन्सिस ( Centropus Sinenisis) असून इंग्रजीत ग्रेटर कौकल ( Greater Coucal)असे आहे. 

       भारद्वाज हा एकेकटा किंवा जोडीने वावरतो. लहान मोठे कीटक व त्याच्या अळ्या, पाली ,सुरवंट ,सरडे, उंदराची पिले हे त्याचे मुख्य भक्ष्य आहे .याखेरीज तो पक्ष्यांची अंडी व पिले, फळे,बिया इ. खातो .तो ब-याचदा सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात उन्हामध्ये पंख वाळवत बसलेला दिसतो. सकाळी  व संध्याकाळी तो सक्रिय असतो. हा पक्षी ओळखायला अगदी सोपा आहे .झाडांमध्ये कूप-कूप-कूप असा आवाज आला की भारद्वाज आहे हे लगेच समजते. आणि गंमत म्हणजे एका पक्षाने आवाज काढायला सुरुवात केली की दुसरा पक्षीही त्याला आवाज काढून प्रतिसाद देतो आणि एकदा सुरुवात केली की मग १५-२० वेळा तरी ते आवाज काढतच राहतात

           आपल्या कामात शांतपणे रमणाऱ्या भारद्वाजाचा सप्टेंबर महिना हा विणीचा हंगाम असतो. उडण्याच्या संदर्भात हा पक्षी दुबळा असल्याने जमिनीपासून साधारण ०६ मीटर उंचीवर ते घरटे बांधतात. घरट्यात एकाच वेळी तीन ते पाच अंडी घालतात व स्वत: पिल्लांची काळजी घेतात .अंडी व पिल्लांच्या संगोपनाची जबाबदारी दोघे (नर -मादी ) पालक पार पाडतात हे विशेष! भारद्वाज स्वतःची म्हणूनच आब राखून असतो. बहुदा यामुळेच त्याला एक वेगळाच डौल असतो. निसर्गरम्य कोकणातील सुंदरवाडी, खेमसावंत-भोसले घराण्याची राजधानी व लाकडी खेळण्यांची बाजारपेठ म्हणून लोकप्रिय असलेल्या सावंतवाडीचा शहर पक्षी म्हणून 'भारद्वाज' निवडून आला .घनदाट झाडींनी समृद्ध नरेंद्र डोंगर व मध्यवर्ती असलेला मोती तलाव या वैशिष्ट्यांमुळे सावंतवाडी शहरात भारद्वाज मोठ्या संख्येने वास्तव्याला असावा,मलबारी कर्णा या पक्षाला हरवत त्याने या सुंदर शहराच्या शहरपक्षाचा मान मिळवला आहे.

           भारतात श्रद्धास्थानी  मानल्या गेलेल्या भारद्वाजाला 'भगवंताचे दूत' समजले जाते. त्याचे दर्शन नेहमीच शुभवार्ता घेऊन येते असाच समज  येथील लोकमानसात प्रचलित आहे. लहानपणी आम्हाला भारद्वाज ऋषींवरून या  पक्षाला भारद्वाज हे नाव पडले असे सांगितले जायचे,मात्र असा संदर्भ कुठे आढळत नाही.या पक्ष्याचे दिसणे, वागणे, चालणे सर्वच भारदस्त असल्याने या पक्ष्याला भारद्वाज हे नाव दिले गेले असावे. पक्षाचा पंख देवक म्हणून रेडे -पाटील आडनाव असलेले तसेच पूर्वापार चालत असलेल्या प्रथेप्रमाणे ज्यांचे दैवक भारद्वाजाचा पंख आहे तो मराठा समाज लग्न समारंभाला या पक्षाचा पंख पुजतात. टिटवी, होला, तितर, दयाळ, साळुंकि सारख्या छोट्या पक्षांचे घरटे उद्ध्वस्त करून त्यांच्या अंडी पिल्लांना पळवणार्‍या या शिकारी पक्षाला जनमानसात शुभंकर का समजले जाते याचा उलगडा मात्र अजुनही मला झालेला नाही.

        एके काळी सर्वत्र सहज दिसणा-या, धीरगंभीर आवाजाच्या ,आपल्या फक्त दर्शनाने आपल्या दिवसाची सुरवात मंगलमय करणा-या भारद्वाजाची विपुलता मानवी अतिक्रमणाने शहरातुन लक्षणीय घटत चालली आहे.सिमेंटची जंगले उभारताना भारद्वाज सारख्या पक्ष्याची असलेली आश्रयस्थाने( झाडे झुडपे ) तोडली जात आहेत.कोकणात मात्र अजूनही तो विपुलतेने पहावयास मिळतो हे आमचे भाग्यच! येणाऱ्या काळातही हे पक्षीवैभव जपण्यासाठी समृद्ध कोकण जपायला हवे!          

 🌳🌴🐦🐧🦆🌴🌳

  विजय हटकर,

     लांजा             

8806635017


Friday, April 2, 2021

विधीची रंगपंचमी

 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

    रंगात ही दंग,

 जणू इंद्रधनू अंतरंग।

 तिचा लोभस सत्संग,

 स्नेहरसाचा अभंग।

 जयपौर्णिमा ही दंग,

 इतुका तिचा व्यासंग।

 नदी गावाचं रे अंग , 

 लेक जीवनाचा सुगंध। 

 स्पर्श होताच मेघाचा,

 सुटे धरतीला मृदगंध।

 बाप लेकीचा ही आहे 

 भावस्पर्शी मर्मबंध।

 पंचमीचा हा सतरंग,

 चिंब भिजवी अंग -अंग।

 विधी खेळते सखींशी ,

 जणु हटकरांची दबंग।

🌈🌈🌈🌈🌈🌈  

 वि।ज।य।

०२ एप्रिल २०२१

रंगपंचमी. 



Saturday, March 13, 2021

निसर्गरम्य म्हादोबा ...

 

निसर्गरम्य म्हादोबा ...

सुंदर निसर्ग आणि नीरव शांतता अनुभवायची असेल तर म्हादोबाला मुद्दाम जायला हवं.

 


       ब-याचवेळा आपल्याला एखाद्या ठिकाणी भेट द्यायची अतीव इच्छा असते.तिथे जाण्याचे मनसुबे ही आपण आखतो मात्र काहि ना काही कारणास्तव आपले मनसुबे उधळले जातात.व त्या ठिकाणी जाण्याची आपली इच्छा पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होतात.बरं,ब-याचवेळा आपल्याला जायची इच्छा असलेले ठिकाण अगदी जवळ हाकेच्या अंतरावर असूनही आपली इच्छापूर्ती होत नाही.मग भगवंताच्या इच्छेशिवाय आपण  कुठेही जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही गोष्टीला पूर्ण होण्यासाठी योग जुळावे लागतात या विचारांवर आपली श्रद्धा गाढ होते.  लांजा शहराच्या सीमेवर महामार्गालगत विस्तारलेल्या  शेतीशाळेच्या मागे डोंगरमाथ्यावर वसलेल्या श्री देव म्हादोबा ( महादेव)  चे आज वयाच्या पस्तीशीत महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर दर्शन झाले आणि भगवंताचे आज्ञेशिवाय काहीही घडत नाहि यावरिल विश्वास आणखी दृढ झाला.

      भारतात सर्वात पूजिला जाणारा देव म्हणजे देवाधिदेव महादेव शिव.अनंत लीलेने नटलेल्या महादेवाची लांजा शहरातही धनी केदारलिंग, श्री पॊलस्तेश्र्वर ही ऎतिहासिक मंदिरे असून मोठ्या भक्तिभावाने लांजावासीय माघ कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र म्हणून साजरी करतात. या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून व्रत केले जाते. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो.शंकराची पूजा ही शिवलिंग आणि मूर्तीच्या रुपात केली जाते. शिवलिंगाची पूजा करताना अनेक गोष्टींचा वापर केला जातो. शंकराची नियमित पूजा केल्यास  दारिद्र्य दूर होते, आरोग्य नीट राहते, स्वभाव शांत राहतो, समाजातला मान सन्मान आणि यश प्राप्ती होते.अशा या शिवाचे कितीही साकल्याने वर्णन केले तरीही दशांगुळे उरतोच.
     
         आज महाशिवरात्री निमित्त शहरापासुन  जवळच्या गवाणे गावातील सिद्धेश्वराच्या दर्शनाचा बेत आम्ही लहानग्या कु.विधी खातर आखलेला..हा बेत यशस्वी करुन घरी परतत असताना लांजा आगारातील वाहनचालक सन्मित्र सुधीर रेवंडकरांची सपत्निक भेट झाली.त्यांच्या बोलण्यातून ते गवाणे येथील शेतीशाळेच्या मागे असलेल्या टेकडीवरील म्हादोबा मंदिरात दर्शनात जात असल्याचे कळले.म्हादोबाच्या दर्शनाची माझीही अनेक वर्षाची इच्छा अपुर्णच होती.त्यात महाशिवरात्रीला जाण्याची विचारणा झाल्यावर नकार देणे अशक्यच होते.बरोबर  ५:३० वाजले होते.सूर्यदेवाचा मावळतीकडे जाण्याचा प्रवास सुरु झाला होता.पण टेकडिवरिल मंदिरापर्यंत गाडी जाते म्हटल्यावर मि आनंदाने सहमती दर्शवित त्यांच्या पाठोपाठ मार्गस्थ झालो. टु व्हीलर मुळे अवघ्या १० मिनिटातच आम्ही शेतीशाळेमागील टेकडीवर पोहचलो.टेकडीच्या माथ्यावरून दिसणारा अप्रतिम निसर्गवैभव व मन भुलवुन टाकणारा सूर्यास्ताचा देखावा पाहुन येथे आल्याचे समाधान मिळाले.या मावळत्या दिनकरासमोर नतमस्तक होत माथ्यावर उभारलेल्या छोट्या देऊळाकडे वळलो. देऊळाला गाभारा नसून  छोटेखानी उभारलेल्या सभामंडपातच डाव्या बाजुला जमिनीलगत गोलाकार सुंदर शिवपिंडी आहे. म्हादोबाच्या मंदिरातील शिवलिंगाचे मनोभावे सहकुटुंब दर्शन घेतल्यावर ‘रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी’ अशी अवस्था झाली.
        
     मंदिराचे पुजारी श्री सुनिल दाभोळकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर या स्वयंभू व जागृत स्थानाची उकल झाली ती अशी -सर्वसाधारण  पूर्वीच्या काळी एक गाय येथे येऊन पान्हा सोडायची.त्यामुळे ती घरी दूध देत नसे. त्याचा शोध घेताना ,ती टेकडीच्या माथ्यावरील येथे पान्हा सोडते असे दिसले.तेव्हा गुराख्याने त्या गायीला मारण्यासाठी कु-हाडिचा घाव घातला.त्या कु-हाडीचा घाव लिंगावर पडला असुन त्याची निशाणी आजही शिवलिंगावर आहे.  महादेव या नावाचा अपभ्रंश म्हादोबा  हा असावा असे वाटते.कदाचित स्थानिक बोलीभाषेत महादेवाचा  म्हादोबा असा अपभ्रंश झाला असावा.महाशिवरात्र  व श्रावणी सोमवारी भाविकांची दर्शनासाठी येथे गर्दी होते.
    
       म्हादोबाच्या टेकडीवरुन लांजा, गवाणे व देवधे या तीन गावांचे विहंगम दर्शन होते.या टेकडीच्या पायथ्याशी  निसर्गाचं अमर्याद वरदान लाभलेल्या गवाणे गावात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण व कृषी पर्यटनाचा विकास झाला असून जंगल बुक, कोकणगाभा अॅग्रो टुरिझम सेंटर,मारिया स्विमिंग पूल ,कॅश्यू हिल्स आॅफ कोकण,होम स्टे अॅग्रो टुरिझम,  रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था आदी दर्जेदार सुविधा पुरवणारी कृषी पर्यटन केंद्रे उभी राहिल्याने लांज्यात थांबुन येथील ग्रामीण पर्यटनाचा आनंद घेणा-या पर्यटकांच्या संखेत वाढ होत असुन हे चित्र सुखावह आहे.

           


मुंबई- गोवा महामार्गावर  असलेल्या लांजा शहारातुन रत्नागिरी कडे जाताना बेन नदी महामार्गाला आडवी येते.तिच्या सुंदर वळणानंतर निसर्गरम्य टेकडीच्या पायथ्याशी कृषी पदविका विद्यालय लांजा ही शेतकीचे शिक्षण देणारी शेतीशाळा शासनाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सन १९६९  मध्ये स्थापन केली. या शेतीशाळेच्या मागे असलेल्या टेकडीवर श्री देव म्हादोबाचे  पवित्र स्थान आहे.कोकण विभागाच्या कृषी शिक्षण ,कृषी संशोधन आणि कृषी विस्तार विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १८ मे १९७२ साली दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली.आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेली लांजा येथील शेती शाळा दापोली कृषी विद्यापीठात समाविष्ट करण्यात आली. तीचे नामकरण कृषी तंत्र विद्यालय,लांजा असे करण्यात आले.आज दापोली विद्यापीठांतर्गत १६ कृषी संशोधन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत ,या केंद्रात लांजा येथील कृषी तंत्र  विद्यालयाचा समावेश आहे.लांजा येथील कृषी तंत्र विद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्रासाठी जिल्हापरिषदेकडुन ७२ हेक्टर जागा विद्यापीठाकडे  हस्तांतरित करण्यात आली आहे.या जागेपैकी २९ हेक्टर जागेमध्ये टेकडी पसरली असुन या टेकडीच्या १० हेक्टर भागात सामाजिक वनीकरण विभागाद्वारा अकेशिया ची लागवड करण्यात आली आहे.तर १० हेक्टर क्षेत्र जंगल आच्छादित असुन ९ हेक्टरवर आंबा ,जुना आवळा व इतर झाडांची लागवड करण्यात आली असुन याच टेकडीच्या माथ्यावर श्री म्हादोबाचे जागृत व स्वयंभू देवस्थान आहे.हि टेकडी कृषी विद्यापीठाच्या अख्यातारिता खाली गेल्याने टेकडीवरील म्हादोबा मंदिर तसे दुर्लक्षित राहिले.त्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही.वर्तुळाकार वसलेल्या लांजा शहराच्या आजुबाजुने काहि महत्वाच्या टेकड्या आहेत.यापैकी गोंडेसखल, पौलतेश्र्वराची टेकडी,कुंभारवाडीतील गणपती टेकडी आदिंसह  म्हादोबाची टेकडीही रमणीय आहे.लांजा नगरपंचायतीने  भविष्यात्मक विचार करून या टेकड्यांवरील देवस्थांनाचा विकास करित टेकड्यांचे पर्यटनात्मक सुशोभीकरण करित प्रत्येक टेकडीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला तर नक्कीच लांजा शहराच्या सौंदर्यात भर पडेल.तसेच महामार्गावरील सुंदर, स्वच्छ शहर म्हणून लांज्याचा नावलौकिकही वाढेल.


@@@@@@@@@@@

वि।ज।य।ह।ट।क।र
लां।जा.
८८०६६३५०१७




अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...