Saturday, January 5, 2019






पुणे तिथे काय उणे.
स्पेशल ट्रिप ब्लाॅग
थेट पुण्यातून
   (विजय हटकर)
🚍🚍🚍🚍🚍🚍🇮🇳🎯
  भाग ०७
सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ व आंतरराष्ट्रीय केंद्र पुणे..
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
       
   " विद्येचे माहेरघर " हि पुण्याची खास ओळख.पुण्यात अनेक नामांकित शिक्षण संस्था असून ब-याच संशोधन संस्थाही आहेत. त्याखेरिज क्रीडा, योगविद्या,स्पर्धा परीक्षा, आयुर्वेद,प्राच्यविद्या, विज्ञान इत्यादी विषयांचे अध्यापन करणाऱ्या विविध संस्थाही येथे कार्यरत  आहेत.सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची संख्याही लक्षणीय आहे.या सर्व गोष्टींमुळे  पुण्याला "भारताचे आॅक्सफर्ड " संबोधितात.जगातील नामांकित आय.टी.कंपन्यांचे जाळेही पुण्यात विस्तारल्याने या शहराला आय.टी.शहर अशी नवी ओळख ही मिळाली आहे. इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर आपल्या पाल्याचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी,त्याच्या स्वप्नाना साकार करण्यासाठी पुण्याला पाठवायचा कल कोकणातील बहुसंख्य पालकांचा असतो.आणि म्हणूनच भविष्य घडविण्याच्या दृष्टीने पुणे सारख्या शिक्षणनगरित असलेली संधी पुण्याच्या दोन दिवसीय सहलीय विद्यार्थ्यांना जवळून अनुभवता यावी या हेतूने आम्ही दुस-या दिवशी दुपारी१२:०० ते २:०० हि वेळ पुणे विद्यापीठ परिसर पाहण्यासाठी निश्चित केली होती.
            जगभरातील उच्च शिक्षण संस्थांच्या दर्जाचे मानांकन करणाऱ्या टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकाविला आहे.तर पारंपारिक विद्यापीठाच्या क्रमवारीत ते बनारस हिंदू विश्र्वविद्यापीठ व जाधवपूर विद्यापीठासोबत संयुक्तरीत्या प्रथम क्रमांकावर आहे. हे मानांकन करताना अध्यापन, संशोधन,ज्ञानप्रसार,आंतरराष्ट्रीय भान असे महत्वाचे निकष पाहिले जातात. अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या विद्यापीठाचा परिसर अभ्यासायचा असेल तर तेथील स्थानिक तज्ञ सोबत असणे सोयीचे होते. त्याच्याशिवाय इतका मोठा परिसराची माहिती घेणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन या कामी आम्हि लांज्यातील स्थानिक नेतृत्व व आमचे मित्र श्री अजित यशवंतराव यांची मदत घेतली. कोकणातील मुले अभ्यासाच्या दृष्टीने पुणे विद्यापीठ परिसर अभ्यासायला जात आहेत समजताच श्री यशवंतराव यांनी त्यांचे पुण्यातील मित्र व विद्यापीठाचे सिनेट मेंबर्स श्री अभिजित बोके यांच्याशी संपर्क साधला.श्री बोके यांनीही सहकार्य करण्याचे कबूल केल्याने आमची चिंताच मिटली.विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी अजितरावांसारखी सुसंस्कृत व्यक्तिमत्वांची राजकरणात गरज का असते हे यावेळी मनोमन पटले.
       ठरल्याप्रमाणे दि.१९ डिसेंबर ला दुपारी १२:०० वाजता आम्हि सर्व पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळ पोहचलो. सोबत पुणे सहलीत सहकार्य करणारे विनायक राणेहि होते.सिनेट मेंबर श्री अभिजित बोके यांना महत्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागल्याने  त्यांच्याऎवजी त्यांचे मित्र श्री सोमनाथ लोहार व श्री दीपक पवार तत्परतेनं आले होते. मी सर्व विद्यार्थ्यांना या मार्गदर्शकांची ओळख करुन दिली.व त्यांनी बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानत पुणे विद्यापीठ अभ्यास सहलीचे महत्व विशद केले.
यानंतर श्री सोमनाथ लोहार यांनी आम्हा सर्वांसमोर  पुणे विद्यापीठाची  माहिती व इतिहास उलगडविला.

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-
       " पुण्यमयी दे आम्हाअक्षर वरदान,
       " ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान"
 या पुणे विद्यापीठाच्या गीताला जागत विद्यार्थ्यांना कर्मशील बनविणाऱ्या पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे येथे झाली.केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या शैक्षणिक धोरणांवर सातत्याने आपल्या कार्याचा प्रभाव पाडणारी संस्था म्हणून सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठाची ओळख आहे.पारंपारिक विचारांच्या जोडीने नव्याने समोर येणा-या विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी उपलब्ध असलेले अद्ययावत विभाग व वेगवेगळे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम या दोन महत्त्वाचा बाबींमुळे हे विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी कायमच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.नॅकचे A+ मानांकन प्राप्त या विद्यापीठांतर्गत पुणे, अहमदनगर नाशिक जिल्ह्यांसह दादरा नगर हवेलीच्या केंद्र प्रदेशातील महाविद्यालयांचा समावेश आहे.
     पुणे विद्यापीठ जगातील एक अत्यंत मोठे व सुप्रसिद्ध विद्यापीठ आहे. विद्यापीठात सुमारे 6.5 लाख विद्यार्थी, 42 शैक्षणिक विभाग, 12 आंतरविद्याशाखा व केंद्र, 6 स्वायत्त यूनिट्स, 6 अन्य शैक्षणिक व सेवा यूनिट्स, 20 अध्यासने, 8 राष्ट्रीय व प्रादेशिक केंद्र आहेत. 696 संलग्न महाविद्यालये, 287 मान्यताप्राप्त व्यवस्थापन संस्था, 121 मान्यताप्राप्त संशोधन केंद्र विद्यापीठाशी संलग्न आहेत. या विद्यापीठाची स्थापना 1949 साली झाली, डॉ. बाबासाहेब जयकर हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरु होते. आज या विद्यापीठाने विविध क्षेत्रात उत्कृष्टतेच्या व यशस्वीतेच्या संस्मरणीय पायऱ्या ओलांडून अनेक मानांकने प्राप्त केली आहेत. विद्यापीठाची संशोधन व प्रशिक्षण कार्यात उत्तम दर्जा असलेली अनेक यूनिट्स आहेत.
      शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये संशोधन संस्कृती रुजविण्यासाठी विद्यापीठ ‘इनोव्हेशन’ या संशोधन प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करते. महाविद्यालय पातळीवर पाठ्यक्रमात कौशल्य आधारित कार्यक्रमांच्या समावेशासाठी विद्यापीठाने कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली आहे. विद्यापीठ विभागांमध्ये श्रेणी पद्धतीची यशस्वी सुरुवात विद्यापीठाने केली आहे. विद्यापीठाने पाठ्यक्रम विकास केंद्राचीही स्थापना केली आहे. शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी विद्यापीठाने विदेशी सहयोग करार केले आहेत  अध्यापनामध्ये विविधता यावी, शिक्षकांची प्रगती व्हावी व अध्यापन, अध्ययन व मूल्यमापनात नवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा तसेच उच्च दर्जाचे संशोधन व्हावे असा या करारामागचा हेतू आहे.
    विद्यापीठ परिसर विद्यापीठाचा एकूण परिसर 490 एकरांचा असून त्यास अतिशय दुर्मीळ, सुंदर आणि चित्रपूर्ण वातावरण लाभले आहे. घनदाट हिरवळ, शोभिवंत ब्रिटिशकालीन कारंजे आणि पुणे विद्यापीठाची दिमाखदार इमारत, इत्यादी गोष्टी निसर्गप्रेमी, चित्रपट निर्माते, संगीतकार आणि ख्यातनाम लोकांचे आकर्षण केंद्र आहे. विद्यापीठाचा संपूर्ण परिसर असंख्य जुन्या वृक्षांनी व्यापलेला आहे.या वृक्षांची छाया, सौंदर्य आणि उत्साह निर्माण करणारे वातावरण विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधन करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करीत असते. पुणे विद्यापीठाने रास अल् खैमा (संयुक्त अरब अमिरात) येथे आपली शाखा सुरु केली असून 2009 पासून विद्यापीठाने तेथे ई-एम.बी.ए. आणि एम.बी.ए. चे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
   
 मुख्य इमारत :-
      विद्यापीठाची मुख्य इमारत ही विद्यापीठाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.
वास्तुकलेचा एक सुंदर नमुना असणाऱ्या या ऐतिहासिक इमारतीच्या आकाशाकडे भरारी घेणाऱ्या मनोऱ्यावर विद्यापीठाचा ध्वज फडकत असतो. विद्यापीठाच्या या इमारतीत कुलगुरुंचे कार्यालय, अधिष्ठाता कक्ष आणि दस्तावेज विभाग आहेत. विविध शैक्षणिक मंडळाच्या सभा ह्या मुख्य इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृह, संत ज्ञानेश्वर सभागृह, शिवाजी सभागृह आणि संत गाडगे महाराज सभागृह या चार प्रतिष्ठित व वैभवशाली सभागृहात होतात. मुख्य इमारतीचे मूळ वैभव जपण्यासाठी इमारतीच्या बांधकामाची काळजीपूर्वक सुधारणा सतत केली जाते. इतर इमारती विद्यापीठाच्या परिसरात भव्य व महत्त्वाच्या अशा अनेक इमारती आहेत. उदा. प्रशासकीय इमारत, सेट भवन, विविध पदव्युत्तर विभागांच्या इमारती, विद्यार्थी कल्याण मंडळ, स्पर्धा परीक्षा केंद्र, जयकर ग्रंथालय, खेर वाङ्मय भवन, मुद्रणालय, मुलांची व मुलींची वसतिगृहे, अनेक उपाहारगृहे, आरोग्य केंद्र आणि भोजनालय, इत्यादी. मास कम्युनिकेशन विभाग नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीत स्थलांतरित झालेला असून वाणिज्य शाखेसाठीसुद्धा नवीन इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले आहे.
  जयकर ग्रंथालय :-
           जयकर ग्रंथालय जयकर ग्रंथालय हे संदर्भ व माहिती ग्रंथांसाठीचे भारतातील सर्वोत्कृष्ठ ग्रंथालयापैकी एक आहे. जयकर ग्रंथालयात भारतीय आणि विदेशी मासिके घेतली जातात तसेच ग्रंथालयास काही नियतकालिके मोफत व बदली तत्त्वावरही मिळतात. ग्रंथालयात 4,96,436 पुस्तके आहेत आणि विविध विषयांवरील मासिकेही आहेत. महाविद्यालयांना, संस्थांना आणि शासकीय संस्थांना आंतरग्रंथालयीन सेवा जयकर ग्रंथालयातर्फे पुरविण्यात येते.
जयकर ग्रंथालयात प्राचीन भारताची संपत्ती असणारे लेखन पुस्तके व हस्तलिखितांच्या स्वरुपात जतन करुन ठेवले आहे. ग्रंथालयात संगणकीकृत नेटवर्क आहे तसेच डिजिटल ग्रंथालय व्यवस्थापन कार्यान्वित करण्याचे काम सुरु असून कार्यकारी व व्यवस्थापन मंडळांच्या सभेचे कार्यवृत्त व महत्त्वाचे दस्तावेज स्कॅन करण्यात आले आहेत. जेणेकरुन ते हवे तेव्हा लगेच उपलब्ध होऊ शकतील.

   ललित कला केंद्र गुरुकुल, पुणे:-
       देशभरातील सांस्कृतिक वारसा संवर्धित करणा-या विद्यापिठाच्या ललित कला अकादमीचे नाव आज जगभरात पोहचले आहे. भारतीय नाट्यशास्त्र,रंगभूमी संदर्भात नृत्य अभिनय संगीत याविविध अंगाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या या केंद्रात देशभरातील निवडक चित्रपट,  माॅडेलींग, जाहिरात, आदि क्षेत्रात भविष्य घडवु इच्छिणाऱ्या योग्यताप्राप्त विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो.
आमच्या महाविद्यालयातील अभिनय क्षेत्रात चमकणारा उदयोन्मुख सितारा म्हणून प्रसिद्ध असलेला कु. आर्यन हाही या  सहलीचा एक भाग होता. त्याची ललित कला केंद्र पाहण्याची खुप इच्छा होती. पुण्याला निघाल्यापासुन तो मला सारखं विचारायचा.सर,ललित कला केंद्राला जाऊया ना?
आर्यन सारख्या अभिनय क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्हि ललित कला केंद्राला भेट दिली.येथील मार्गदर्शक प्राध्यापक आम्हाला माहिती देतील का अशी भिती होती.पण या ललित कला अकादमीचे संचालक श्री चैतन्य कुंटे यांची भेट घेतल्यावर हि भिती उडूनच गेली. डाॅ.चैतन्य कुंठे यांनी मोकळेपणाने आपुलकीने आमच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत ललित कला केंद्राच्या अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया,येथून शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या नागराज मंजुळे सारख्या माजी विद्यार्थ्यांची माहिती देत आमच्या विद्यार्थ्यांना नाट्यशास्त्र विषयात करिअर असलेल्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. यामुळे आर्यनसारख्या विद्यार्थ्यांच्या मनात महानगरातील मोठ्या
 विद्यापीठात जाऊन आगामी काळात शिक्षण घेण्याचे आलेले दडपण नक्कीच कमी झाले.

स्पंदन युवा महोत्सव:-
            आमच्या विद्यापीठ भेटि दिवशीच विद्यापीठाच्या  आवारात 90 विद्यापीठातील 140 काॅलेजचा सहभाग असलेला पाच राज्यांचा  पश्चिम विभागीय युवास्पंदन युवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.याच्या उद्धाटनाला गिरिश कुलकर्णी येणार असल्याचे तिथे समजले.या एवढ्या मोठ्या महोत्सवाचा पॅन्डाॅल, रंगमंच, विविध गोष्टिंचे व्यवस्थापन पैलू श्री सोमनाथ यांनी विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले.या महोत्सवाची रांगोळी खुप आकर्षक होती.या महोत्सवाच्या रंगमंचावर जाऊन आम्हि सर्वांनी एक फोटो काढला.

 आंतरराष्ट्रीय केंद्र, पुणे:-
        आंतरराष्ट्रीय केंद्राद्वारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या सर्व प्रशासकीय कार्याचे समन्वयन केले जाते. पुणे विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी (944 विद्यार्थी) विविध देशांमधून येतात. 52 विविध देशांमधून आलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व संलग्न महाविद्यालयांमधून शिक्षण घेत आहेत.आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुणे विद्यापीठाची सर्व कार्य या केंद्रामार्फत केली जातात.
विद्यापीठाच्या अभ्यास सहलीत आम्हा सर्वांना जास्त भावले ते हे आंतरराष्ट्रिय केंद्रच.या इमारतीत सुप्रसिद्ध अभिनेता सोमानंदाने खानच्या बाॅडिगार्ड चित्रपटाचे
 चित्रिकरण झाले आहे हे विद्यार्थ्यांना कळताच त्यांनी इथे भरपुर सेल्फी काढले. श्री सोमनाथ लोहार यांच्यामुळेच या केंद्राला भेट देता आली.
      परदेशी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतून अध्ययन करण्यासाठी येथे विविध Bridge Course उपलब्ध करण्यात आले आहेत. अफगाणिस्तान, येमेन, इराण, इराक,कझाकिस्तान, चीन,श्रीलंका ,माॅरिशस,थायलंड,नेपाळ,नामेबिया,बांग्लादेश,यु.के.,दक्षिण कोरिया आदि विविध आखाती,पूर्व आशियायी, आफ्रकिन देशात भारतासारखे  इंग्रजी वातावरण नसल्याने इंग्रजी भाषा कॊशल्य आत्मसात करण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या या आंतरराष्ट्रीय केंद्रात बहुसंख्येने  विदेशी विद्यार्थी प्रवेश घेतात. भारतात राहून आपली इंग्रजी सुधारतात व जगाच्या बाजारपेठेत आपले स्थान पक्के करतात.या केंद्रात गेल्यानंतर येथील व्हर्च्युअल क्लासरुम मद्धे केंद्रातील प्राध्यापक बालाजी सर,भाविका मॅडम व वरिष्ठ प्राध्यापिका डाॅ.भारती मॅडम यांनी लांजा ज्युनिअर काॅलेजचे विद्यार्थी व विदेशी विद्यार्थी यांच्यात सुसंवाद घडवून आणला.आपण खुप भाग्यवान आहात कारण पुणे विद्यापीठासारख्या दर्जेदार शिक्षणसंस्था भारतात आहेत.आपण त्याचा लाभ घेऊन देशाचे नाव रोशन करा असा सल्ला या विदेशी मुलांनी यावेळी दिला.तर कोकणातील आमच्या मुलांना या सुसंवादातून कळून चुकले कि जगभरातील अनेक देशातील लोकांना इंग्रजी बोलता येत नाहि.व इंग्रजी भाषेचा दर्जा सुधारण्यासाठी ते भारतीय विद्यापीठातील Bridge Courses करतात.  यामानाने आपले इंग्रजी संवाद कॊशल्य चांगले असल्याची जाणीव विदेशी मुलांसोबत साधलेल्या सुसंवादाने विद्यार्थ्यांना झाल्याने त्यांच्या मनोबलात कमालीची वाढ झाली.हे आमच्या सहलीचे महत्वाचे फलित होते. कोकणातील मुले आंतरराष्ट्रीय केंद्र अभ्यासण्यासाठी आले आहेत हे समजताच या केंद्राचे संचालक डाॅ.विजय खरे स्वत: विद्यार्थ्यांना भेटायला उत्सुक होते.केंद्राने प्रकाशित केलेल्या "स्ट्रॅटेर्जिक फोरसाईट"या विशेषांकाची प्रत यावेळी डाॅ. खरे यांनी श्री विजय हटकर व आनंद भागवत यांना भेट दिली.व भविष्यात पुणे विद्यापीठात अध्ययनाला येण्याचे आमंत्रण दिले.

   श्री विजय हटकर.
   श्री आनंद भागवत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
क्रमश ....

No comments:

Post a Comment