Saturday, January 5, 2019






पुणे तिथे काय उणे
स्पेशल ट्रिप ब्लाॅग
थेट पुण्यातून...
  (विजय हटकर)
🚍🚍🚍🚍🚍🚍🇮🇳🎯
  भाग ०४
राजा केळकर म्युझियमची श्रीमंती.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

        प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद हा असतोच. कुणाला फिरण्याचा ,कुणाला गाण्याचा, कुणाला अभिनयाचा तर कुणाला विविध वस्तू संग्रहित करण्याचा.मात्र छंद असला तरी तो जोपासण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोच असे नाहि.पण काहि जण आपल्या छंदालाच आपले ध्येय बनवितात व छंदोपासक बनून समाजासमोर एक नवा आदर्श उभा करतात.
    "उजाले अपने यादोंके
     साथ लेने दो..
    क्या पता किस गली
जिंदगी  की श्याम हो जाए"!
     या  कवी बशीर ब्रशच्या ओळी आठवणींच्या संग्रहाबाबत खुप काहि सांगून जातात.आठवण केवळ विचारच नाही तर वस्तुंसोबत सुद्धा निगडीत असते.अशा या सुंदर, दुर्मिळ, मूल्यवान, अजब ,अँटिक वस्तु आपल्या संग्रही ठेवण्याचा एक छंदच जडतो.वस्तूंच्या याच आठवणी व कुतुहलापोटी काही छंदवेडी माणसे मग आपलं अाख्खं आयुष्यच अशा संग्रहासाठी समर्पित करतात.
       मुळा व मुठा नदिच्या काठावर वसलेल्या प्राचीन पूण्यक म्हणजे पुण्यनगरितील अशाच एका छंदवेड्या श्री दिनकर केळकर यांनी इतिहासाचा अमूल्य ठेवा जतन व्हावा व पुढील पिढ्यांना त्याचा लाभ घेता यावा इतिहासाची प्रत्यक्ष ओळख त्यांना या दुर्मिळ वस्तूंतून व्हावी या उदात्त दृष्टिकोनातून जुन्या-पुराण्या वस्तूंचा संग्रह करण्यास सुरवात केली.१९२० मध्ये केळकर वाड्याच्या एका खोलीत सुरू झालेल्या या विधायक संग्रहातून पुढे भारतातीलच नव्हे तर जगभरातील संशोधक,तज्ञ,पुरातत्त्व तज्ञ, इतिहासप्रेमी,संस्कृतीप्रेमी नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे ठरलेले व आज पुणे शहराचे संचित असलेले,केळकर वाड्याच्या सर्व खोलीत विस्तारलेले २१ हजार वास्तुंचे तीनमजली भव्य संग्रहालय नावारुपास आले आहे.
           पुणे सहलीत मुलांना राजा दिनकर केळकर म्युझियम दाखवायचे आम्हि निश्चित केले होते.कारण आजच्या मुलांना पुरातन वस्तूच माहित नाहीत.अशा पुरातन वस्तु पाहताना हे काय पाहत आहोत असा प्रश्न हमखास नवीन पिढिला पडतो.विस्मृतीत गेलेला इतिहास अशा पुरातन शस्त्रास्त्रे,नाणी,देव देवतांच्या मुर्त्या, भांडिकुंडि यातून पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो.व गतकाळात घडून गेलेल्या  वैभवशाली,समृद्ध संस्कृती,परंपरा ज्ञात झाल्याने अभिमानाने उर भरून येतो. संग्रहालय या कामी महत्वाची भूमिका बजाविते. आणि म्हणूनच पुरातन वस्तुंच्या प्रेमाने भारावलेल्या काकासाहेब केळकरांनी पुराणवस्तूंचा  जमविलेला अमूल्य ठेवा विद्यार्थ्यांना दाखवून य देशाच्या वैभवशाली इतिहासाविषयी त्यांची जागरूकता वाढविणे, दुर्मिळ वस्तू,इतिहासाची अस्सल साधने दाखवून विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्तीचा,निरिक्षण शक्तीचा  विकास साधणे हेच आमचे ध्येय होते.
     आम्हि दुपारी ०३ च्या सुमारास सारसबागेतील खाऊगल्लीत थोडासा नाश्ता करुन बाजीराव रोडने अंदाजे ०१कि.मी.पायी चालत सरस्वती मंदिराजवळ पोहचली.व याच्या शेजारिल गल्लीतील तीन मजली राजा दिनकर केळकर संग्रहालयाची पाटि नजरेस पडताच समाधान झाले.संग्रहालयाची इमारत तीन मजल्याची आहे. इमारतीच्या वास्तूकडे बघितल्यानंतर आपण एखाद्या प्रशस्त वाड्यात प्रवेश करीत आहोत असे वाटते. संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अजस्त्र तोफ आहे. तसेच मंदिराच्या गोपुराचा भाग आणि भग्न दगडी हत्ती ठेवलेला आहे. प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला असलेले डॉ. केळकर यांचे चित्र आपले लक्ष वेधून घेते. काऊन्टरपाशी सर्व मुलांना एकत्रित करित केळकर म्युझियम कशा पद्धतीने पाहिले पाहिजे याची माहिती देत आपल्या एकुलत्या एक दिवंगत मुलाच्या कै.राजाच्या स्मृतीप्रीत्यर्थ या संग्रहालयाला राजा दिनकर केळकर म्युझियम हे नाव दिल्याचा इतिहास कथन केला. तर तेथील मॊल्यवान वस्तुना हात लावायचा नाहि इ.सुचना तेंडुलकर मॅडम यांनी दिल्या. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते या तत्वाप्रमाणेच आजच्या घडिला भारताचे भूषण ठरलेल्या केळकर संग्रहालयाच्या  उभारणीसाठि  दिनकर तथा काकासाहेबांच्या पत्नी कै.कमलाबाईंनीहि संसाराची,तब्येतीची तमा बाळगली नाहि.तसेच एखादी तांब्या-पितळेची  दुर्मिळ वस्तू घेण्यासाठि ,भारतभर भ्रमण करण्यासाठि काकासाहेंबाकडे पैसे नसतिल तेव्हा स्वत:चे सोन्याचे दागिने विकून,गहाण ठेऊन त्या बदल्यात ती वस्तू घेण्यासाठि  मोलाची साथ कशी दिली. तसेच या संग्रहालय उभारण्याच्या वेडापोटी कमलाबाईंना वारसाहक्काने मिळालेले करमाळ्याचे घर हि विकल्याची माहिती भागवत सरांनी मुलांना दिली.
      केळकर संग्रहालय पाहण्यासाठी दोन- तीन तासांची सवड काढूनच इथे आले पाहिजे.कारण इथे असलेल्या सुमारे २१००० अमूल्य वस्तूंमध्ये वैविध्य आहे.  काष्टशिल्पे, मुर्त्या, वस्त्रप्रावरणे,अडकित्ते,पाय घासण्याचे दगड, दिपशिल्पे,लाकडी कोरीवकाम व कलाकुसरीने थक्क करणारे विविध भव्य वाड्यांचे दरवाजे,पेंटिंग्ज,धातुंची भांडी,वैविध्यपूर्ण केस विंसरण्याच्या व वाळविण्याच्या फण्या,कुंकवाचे करंडे  गणेशशिल्पे  विवाहासाठि लागणारी भांडि,बैठे गंजिफासारखे प्राचीन खेळ, बाहुबली चित्रपटात कटप्पाने ज्याप्रकारचे चिलखत  घातले होते तशीच जुनी सुंदर चिलखते,अशा  विविध वस्तूंचा मोठा पारंपारिक संग्रह आहे. या वस्तूंचे इमारतीतील पंधरा दालनांमध्ये प्रदर्शन मांडण्यात अाले आहे.ती दालने अशी-
१.लाकडी कोरीवकाम व शिल्पे २.प्रसाधने ३.भारतीय चित्रकला ४.दीपशिल्पे ५.तांबुल साहित्यमूर्ती,धातूमूर्ती ६.खेळणी
७.भांडी ८.शस्त्रे व अस्त्रे ९.वाद्ये १०.मस्तानी महिलामहल ११.हस्तिदंत दालन
१२.दरवाजे विभाग १३.संदर्भ ग्रंथालय १४.संरक्षण प्रयोगशाळा १५.प्रकाशने
       संग्रहालयातील दिव्यांचा विभाग समृद्ध आहे. केळकर यांनी प्रथम दिव्यांचे प्रदर्शन भरवले होते. त्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहिल्यानंतर, त्यांना संग्रहालयाची कल्पना सुचली होती. दिव्यांच्या त्या विभागात प्राणी दिवे, पक्षी दिवे, पंचारत्या, उदबत्ती, घरे, कर्पुरारत्या, समया, लामण दिवे, मुघल दिवे पाहायला मिळतात. नेपाळी दिवे विभागात दहाव्या शतकातील ‘सूर्यदिवा’ हा आगळावेगळा, संपूर्ण वर्षाची माहिती देणारा दिवा आहे. त्यावर सात घोडे सात वार, बारा घोडे बारा महिने, तर दिव्यांच्या बारा ज्योती बारा राशी दर्शवतात. दिव्यावरील सूर्यनारायणाच्या पाठीमागील प्रभावळीमधील कळ्या म्हणजे सत्तावीस नक्षत्रे आहेत. त्या संग्रहालयातील आणखी एक आकर्षण म्हणजे मस्तानीमहाल. थोरल्या बाजीरावांनी मस्तानीसाठी महाल बांधला होता. त्यातील दरवाजे, चौकटी, खांब आणून, पूर्वी जसा होता तसाच महाल तेथे उभारला आहे.

संग्रहालयातील गौरवास्पद बाब म्हणजे तेथे असणारी वाद्ये. पन्नालाल घोष यांची बासरी, पु. ल. देशपांडे यांची सारिदा, हिराबाई बडोदेकर यांचे तानपुरे, बडे गुलाम अली खाँ यांची बीन. अशा थोरामोठ्यांचा स्पर्श झालेल्या वाद्यांनी ते दालन समृद्ध झाले आहे.

संग्रहालयात केरळ राज्यातील त्रिपुर येथील सतराव्या शतकातील मोठा दीपस्तंभ आहे. राजीव गांधी यांनी वॉशिंग्टन येथील ‘भारत महोत्सव प्रदर्शना’चे उद्घाटन त्या दीपस्तंभावर  दीपप्रज्वलन करून केले होते. त्याचबरोबर गुजरात, दक्षिण भारत, ओरिसा येथील दरवाजे व गुजरातेतील पाटण येथील वैशिष्टयपुर्ण खिडक्या तेथे पाहता येतात. त्याचबरोबर संगमरवरी व कुरूंदाच्या दगडाची सुंदर शिल्पे, तेराव्या व सोळाव्या शतकांतील श्रीविष्णू व सतराव्या शतकातील सूर्याची मुर्ती या गोष्टी विशेष पाहण्याजोग्या आहेत. तेथे असलेली तंजावरमधील रंगीत काचचित्रे भारतीय संस्कृतीच्या कलावैभवाचे दर्शन घडवतात. संग्रहालयात अडीचशे प्रकारची शस्त्रे व अस्त्रे आहेत. सोबत कथा उलगडणाऱ्या चित्रकथी शैलीतील पाच हजार चित्रेही तेथे पाहण्यास मिळतात.

केळकर यांच्या इतिहास व संस्कृती संवर्धनातील भरीव योगदानाबद्दल त्यांना भारत शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. त्यांना पुणे विद्यापीठीतर्फे डी.लिट. पदवीही बहाल करण्यात आली. त्याचबरोबर संग्रहालय क्षेत्रातील विशेष कामगिरीकरता हैदराबादच्या ‘सालारजंग म्युझियम’च्यावतीने दिलेले पहिले सुवर्णपदक, इचलकरंजीच्या ‘फाय फाउंडेशन’चा पुरस्कार, ‘इंडियन असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स’तर्फे करण्यात आलेला सन्मान, पुणे महानगरपालिकेतर्फे झालेला सत्कार, पश्चिम जर्मनीचा ‘इंडियन सेंटर फॉर एन्करेजिंग एक्सलन्स’ पुरस्कार असे विविध सन्मान त्यांना मिळाले. त्यांच्या कार्याची वेळीच दखल न घेतली गेल्याने त्यांना वयाच्या पंचाहत्तरीनंतर पुरस्कार मिळाले. त्यांच्या हयातीत त्यांना ‘त्रिदल संस्थे’चा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला होता, मात्र त्यांचे निधन झाल्याने त्यांना त्या पुरस्काराने मरणोत्तर गौरवण्यात आले.
        आजमितीला केळकर संग्रहालय पाहण्यासाठी दिवसाला सरासरी तीनशेजण येतात. वर्षाला सव्वा ते दीड लाख लोक त्या संग्रहालयाला भेट देतात. संग्रहालयाची पूर्णवेळ देखभाल केळकर यांचे नातू सुध्नवा रानडे पाहत आहेत. संग्रहालयातील वस्तूंच्या जतनासाठी, विशेष लक्ष पुरवले जाते. रानडे यांनी प्रत्येक वस्तू स्वच्छ पुसून लख्ख ठेवण्यावर आणि एकूणच परिसर स्वच्छ ठेवण्याकडे कटाक्ष ठेवलेला आहे. केळकर यांनी तो अमूल्य संग्रह राष्ट्राची संपत्ती असून, राष्ट्रास अर्पण करावा या भावनेने १९७५ साली महाराष्ट्र शासनास भेट दिला. शासनाकडून त्या संग्रहालयासाठी वार्षिक व्यवस्थापन निधी म्हणून ठरावीक रक्कम मिळते. संग्रहालयात सध्या एकोणीसजणांचा स्टाफ आहे. संग्रहालयाचा एकूण व्याप व त्याच्या देखभालीचा संपूर्ण खर्च पाहता शासनाकडून पुरेसा निधी मिळत नाही तरीही आपल्या आजोबांनी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून सुध्नवा रानडे त्या संग्रहालयाचे काम पाहत आहेत. कोणाकडे काही जुन्या, वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचा ठेवा असल्यास तो त्या संग्रहालयासाठी दान-देणगी स्वरूपात स्वीकारला जातो.
केळकर संग्रहालयातील वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांना परवानगी दिली जाते. देशी अभ्यासकांबरोबरच इंग्लंड, अमेरिका, जर्मनी या देशांतील अभ्यासकही संग्रहालयाला भेट देतात.या संग्रहालयाचे वस्तुवैभव पाहून राणी एलिझाबेथ यांनीही केळकरांच्या अचाट कार्याचे कॊतुक केले.
     केळकर संग्रहालयातील वस्तु डाॅ.दिनकर केळकरांच्या अचाट मेहनतीची जाणीव करून देतात. खाजगी पातळीवर राजाश्रयाशिवाय हि  इतके मोठे संग्रहालय साकारता येऊ शकते हे कॆळकरांनी जगाला दाखवून दिले.अख्खं आयुष्य हे संग्रहालय कसे बहरेल,समृद्ध होईल ,विविध वस्तु कशा मिळविता येतील यासाठीच व्यतीत करणा-या डाॅ. केळलरांनी सन १९९० मध्ये जगाचा निरोप घेतला पण आपल्या बेजोड कार्याने ते आजहि पुण्याच्याच नाहीत तर हे संग्रहालय पाहणा-या प्रत्येक संस्कृतीप्रिय भारतीयाच्या मना- मनात ते अमर झाले आहेत.एकूणच केळकर म्युझियम पाहुन बाहेर पडल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान आम्हाला दिसत होते.हे समाधान भारतीय समृद्ध इतिहासाचा अमूल्य  ठेवा पाहता आला याचे
होते हे निश्चित।
    🙏🏻संग्रहकार डाॅ.दिनकर केळकर यांना मानाचा सलाम🙏🏻
-----------
       श्री विजय हटकर,
      श्री आनंद भागवत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
क्रमश...

No comments:

Post a Comment