Saturday, January 5, 2019



" बचतगट महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा राजमार्ग."
            विजय हटकर.
☘☘☘☘☘☘☘☘

लांजा:-
      ग्रामीण भागतील महिलांचा आत्मसन्मान जागृत करून त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यामध्ये बचत गटांनी लक्षणीय भूमिका बजावली असून बचतगट हा महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन ज्यूनियर काॅलेज लांजाचे सहाय्यक शिक्षक विजय हटकर यांनी केले.
           आर्थिक साक्षरता शिबीर अभियानांतर्गत बचत गट व डिजिटल साक्षरता या विषयावरील व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच कोलधे ग्रामपंचायत येथे पार पडला. विदर्भ कोकण ग्रामीण बँक व आर्थिक साक्षरता केंद्र,रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्री हटकर बोलत होते.कार्यक्रमाप्रसंगी  बँकेच्या व्यवस्थापिका सी.मेघना सुर्वे, ग्रामसेविका नंदिनी कांबळे,सहाय्यक रमेश वाघाटे,ग्रामपंचायत सदस्या जागृती कुंभार,प्रेरणा कांबळे, बँकमित्र विश्र्वजित तटकरे,बँकसखी मनस्वी कुरतडकर, कोतवाल गोपाळ लिंगायत,शशिशेखर पाध्ये आदि मान्यवर उपस्थित होते.
      यावेळी पुढे बोलताना श्री हटकर म्हणाले,बांग्लादेश मध्ये डाॅ.महंमद युनुस यांनी सर्वप्रथम बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याची चळवळ यशस्वी केल्यानंतर आता भारतात महिलांचे बचतगटाच्या माध्यमातून यशस्वी पणे सक्षमीकरण होत आहे.
महिलांच्या हातांना काम देणारे लाखो बचत गट आज महाराष्ट्रात कार्यरत आहेत.या बचतगटांच्या माध्यमातून महिलांमध्ये संवाद कॊशल्य, वेळ व्यवस्थापन, पैशाची सांगड,जबाबदारीची जाणीव, परिस्थिती हाताळण्याची कला,चोख व्यवहार, सहकार्य,यशस्वी होण्याची क्षमता आदी विविध गुणांचा विकास झाला आहे.या जोडीला ग्रामीण भागातील महिला डिजिटल साक्षर झाल्या तर त्यांना विविध बँका व शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे घेता येईल.या व्याख्यानातून श्री हटकर यांनी पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा निगम,प्रधानमंत्री सुरक्षा योजना,सुकन्या समृद्धी योजना,आयुष्यमान भारत,अटल पेन्शन योजना,आदि विविध योजनांची माहितीही बचत गटातील महिलांना करुन दिली.
      यावेळी बँक कर्मचारी, व कोलधे गावातील विविध बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
☘☘☘☘☘☘☘

No comments:

Post a Comment