Saturday, January 5, 2019






पुणे तिथे काय उणे
स्पेशल ट्रिप ब्लाॅग
थेट पुण्यातून ...
  (विजय हटकर)
🚍🚍🚍🚍🚍🚍🇮🇳🎯
  भाग०६
पर्वती व चिरतरुण सत्यनारायण दादा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
       
      पुणे फेरित दुस-या दिवशी पहाटे सहाच्या सुमारास पर्वती चढून पहाटेच्या वातावरणातील शांत रम्य पुणे पहायचे आम्ही ठरविले होते.तशा सूचनाही आदल्या रात्री मुलांना दिल्या. ठरल्याप्रमाणे सकाळी सहालाच संत गाडगेबाबा मठातील आमच्या रुमबाहेरुन विद्यार्थ्यांनी बेल वाजविली. व गाढ झोपेतुन अचानक जागे झाल्यावर मी व आनंद सर मात्र उडालोच. कारण मुलांना सूचना दिल्याप्रमाणे सर्व मुले दरवाजाबाहेर उभी होती.
आम्हाला बघताच सर्व मुले एकासुरात म्हणाली,
 - काय सर ,जाऊया ना पर्वती पहायला?आणि एकच हशा पिकला. आम्हिहि त्याला प्रतिसाद देत तुम्ही खाली थांबा,आम्ही आवरून आलो म्हणत पटापट आवरायला सुरवात केली.पहिल्या दिवशी दिवसभर फिरून सुद्धा मुले दुस-या दिवशी १४अंश सेल्सीयस वातावरण असलेल्या थंडिच्या वातावरणात तितक्याच थंड पाण्यांनी आंघोळ करुन तयार आहेत हे पाहून आश्चर्यच वाटले.पण आम्हि दिलेल्या सूचनेप्रमाणे तयार नसल्याने वाईटही वाटले.पण प्रत्येक गोष्ट ठरविल्याप्रमाणे झाली तर त्यातली मज्जाच निघून जाते म्हणतात.सकाळी ७:०० च्या सुमारास मग आम्हि सर्व जण पर्वतीकडे हिप हिप हुरैsss म्हणत रवाना झालो.
       पुण्याचे मुख्य आकर्षणा पैकि एक म्हणजे पर्वती.पुणे शहरातील सर्वांसह पर्यटकांनाही अावडणारे निसर्गरम्य ठिकाण. स्वारगेटपासून जवळच.पुणेकर सकाळ -संध्याकाळ फिरावयास.   व्यायाम करण्यासाठी नित्य पर्वती चढतातच.पर्वतीवरुन आपणांस गगनचुंबी  पुणे शहराचा आकर्षक देखावा पहावयास मिळतो.बरोबर दुर्बिण असल्यास पुणे शहराचा विहंगम देखावा पाहून वेगळाच आनंद मिळतो. तर या पर्वतीच्या  पाय-या देखील लांब आकर्षक आहेत.अशा पाय-यांना हत्ती पाय-या म्हणतात असे कुठे तरी ऎकले होते. इंग्लंडचे युवराज प्रिन्स आॅफ वेल्स,सातवे एडवर्ड हे हत्तीवरून पर्वतीवर गेल्याची नोंद आहे.  पर्वतीच्या पायथ्याशी पहिल्याच अर्थात "आप्पाची पायरी" या ठिकाणी सर्व मुलांना एकत्रीत करित पुण्यातील रम्यक्षेत्र पर्वती टेकडीवरील ऎतिहासिक ठिकांणांची माहीती श्री विजय हटकर यांनी  दिली.
पर्वतीवरिल ठिकाणे व इतिहास.
१) श्री देवदेवेश्र्वर मंदिर व पंचायतन -
       वास्तू शांतीच्या वेळेला गणपती व इतर देवतांची प्रतिष्ठापना केली जाते,त्याप्रमाणे इथे प्रत्यक्ष कायमस्वरूपी प्रतिष्ठा करण्यात आली आहे.श्री देवदेवेश्र्वराचे मंदिर सुंदर आहे.मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेले आहे. त्याचा कळस उंच व निमुळता असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपर्‍यात चार लहान मंदिरे आहेत ती सूर्यदेव (आग्नेय),गणेश (नैर्ऋत्य), अंबाबाई (वायव्य) आणि विष्णू (ईशान्य) यांना समर्पित आहेत.इ स १७६६ मध्ये माधवराव पेशव्यांनी ज्याच्यात चार लहान मंदिरे आणि एक मुख्य मंदिर यांचा समावेश होतो, असे हे शिव पंचायतन विकसित केले. मंदिरात भगवान शंकर, पार्वती आणि गणेश यांच्या धातूच्या मूर्ती आहेत. त्या तीन मूर्ती १७४९ मध्ये मुळात सोन्याच्या बनवलेल्या होत्या; १९३२मध्ये त्या चोरीला गेल्या व त्याजागी त्याच्या हुबेहूब दुसर्‍या अन्य धातूच्या मूर्ती ठेवल्या गेल्या. मुख्य मंदिराच्या पश्चिमेला भगवान कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. तिथे महिलांना प्रवेश वर्ज्य आहे. दि.२२ मार्च व २३ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र समान असतात.यावेळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण श्री देवदेवेश्र्वराच्या अंगावर (पिंडीवर)  पडतात.मंदिर बांधकामाच्या वेळि केलेले सुयोग्य दिशासाधन यामुळेच हा किरणोत्सव अनुभवास मिळतो.

२)श्री विष्णू मंदिर
         येथील विष्णू मंदिर वास्तविक लक्ष्मी -विष्णू मंदिर असे करावयाचे होते परंतु लक्ष्मीची मूर्ती योग्य वेळेत पोहचली नाही. त्यामुळे लक्ष्मी मंदिर वाईला आहे.पर्वतीवरिल विष्णू व वाईतील लक्ष्मी या दोन्ही मूर्तींची उंची समान आहे.दोन्ही सारख्याच प्रकारच्या पाषाणात कोरलेल्या आहेत.विशेष म्हणजे या दोन मूर्ती दोन वेगवेगळ्या मंदिरात स्थापन केल्या असल्या तरि त्यांची प्रतिष्ठापना एकाच पूर्वनियोजित मुहूर्तावर जेष्ठ शुद्ध १०शके१६८० दि.१३जून १७५८ रोजी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी केली आहे.या देवालयाची बांधणी फार प्रशस्त अशी आहे.ती एखाद्या मोठ्या खोलीसारखी आहे गर्भगारासारखी नाही.श्री विष्णूची  साडेचार फुट उंचीची पुर्णाकृती मूर्ती अत्यंत सुंदर आणि देखणी असून प्रथमदर्शनीच तिची छाप पडते.श्री  विष्णूच्या अत्यंत देखण्या मूर्तीपैकि हि एक अाहे. काजळासारख्या काळ्याशार अशा नेपाळमधील गंडकी नदीतील शालिग्राम शिळेची हि मूर्ती आहे.
३) नानासाहेब पेशवे यांची समाधी -
      पेशवाई (मराठी) साम्राज्य अर्ध्यापेक्षा जास्त भारतभर पसरले होते.हा काळ मराठेशाहीचा सुवर्णकाळ होता.यावेळी मराठ्यांचा ध्वज अटकेपार(आताच्या पाकिस्तानात) फडकला.व मराठी अंमल जवळजवळ भारतभर पसरल्याने "पुणे" हे भारतीय राजकारणाचे सत्ताकेंद्र बनले होते.या साम्राज्याच्या उभारणीत मोठा वाटा होता तो नानासाहेब पेशव्यांचा.इ.स.१९६१ मध्ये पानिपतवर झालेल्या रणधुमाळीत श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे जेष्ठ चिरंजीव विश्र्वासराव व धाकटे बंधू भाऊसाहेब हे दोघेही रणांगणात धारातीर्थ पडले.हा धक्का सहन न होऊन श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे पर्वतीवर दि.२३ जून १७६१ च्या रात्री निधन झाले.त्या ठिकाणी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे स्मारक उभारण्यात आलेले आहे.
४) पेशवे वाडा-
          पर्वतीच्या पाय-या चढून अाल्यानंतर श्री विठ्ठल मंदिर व पेशवा संग्रहालय या दोन्हीच्या मध्ये एक प्रवेशद्वार आहे तेच पेशवे वाड्याचे मुख्य द्वार होते.यास दिंडी दरवाजा म्हणत.याचे आत श्रीमंत सरकारांचा राहता वाडा होता.याचे बांधकाम इ.स.१७९५ च्या सुमारास झाले.पेशवे वाड्यातील माजघराच्या उत्तरेकडील अंगणात एक जाडजूड बांध्याचे सुमारे दोनशे -सव्वादोनशे वर्षाचे पांढऱ्या चाफ्याचे झाड आहे.
५) पेशवा संग्रहालय-
                 या संग्रहालयात पेशवेकालीन अनेक सुंदर आणि प्रेक्षणीय वस्तूंचा खजिनच आहे.इथे आमच्या विद्यार्थ्यांना येथील संग्रहालय प्रमुख श्री देशपांडे यांनी शस्तास्त्रे हाताळण्याची संधी दिल्याने शस्त्रास्त्रे वापरण्याचे तंत्र मुलांना समजले.

६) ८८वर्षीय चिरतरुण सत्यनारायण दादांची भेट-
        पर्वती टेकडी चढताना वाटेत आमच्यासोबत चालणाऱ्या एका सद्गृहस्थाला पर्वती चढणारे-उतरणारी तरुण मुले-  "गुरुजी जय श्री राम " हा नारा देत प्रणाम करुन जात असल्याने या गृहस्थाविषयी मनात आत्मीयता निर्माण झाली .व उत्सुकतेपोटि त्यांना नमस्कार करित
मि नाव विचारले.
त्यांनीही तितक्याच आत्मियतेने सांगितले.
-   मी सत्यनारायण राठि. या टेकडीवरील श्री हनुमान योगमंडळाचा अध्यक्ष असुन गेली ३७ वर्षे मी रोज सकाळी पर्वती टेकडीवर येतो.या येणा-या २४ डिसेंबरला मि अवघ्या ८८ व्या वर्षात पदार्पण करणार असल्याची माहिती त्यांनी दिल्यावर आम्हासर्वांना धक्काच बसला.कारण आमच्यासारख्या पस्तीशी न  ओलांडलेल्या तरुणांची २१०० फुट उंचावर वसलेल्या पर्वतीच्या १०३ पाय-या चढताना पुरती दमछाक होत असताना ८८ वर्षाचे सत्यनारायण दादा सहजपणे पर्वती पाय-या चढत होते.मनुष्याचा सर्वांगीण विकास (शरिराचा,मनाचा आणि आत्म्याचा) घडवायचा असेल तर योगासने हे सर्वोत्तम साधन आहे,हे सत्यनारायण दादांचे बोल ऎकुन त्यांच्या स्वस्थशरिर व प्रसन्नचित्त व्यक्तिमत्त्वाकडे पाहिल्यानंतर पटले.
      पर्वती टेकडि चढताना दादा आम्हाला उत्साहने योगाचे महत्व सांगत होते.त्यांच्या मते भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रत्येक मुलाला बालपणापासूनच म्हणजे वयाच्या चॊथ्या -पाचव्या वर्षापासूनच योगविद्येचे शिक्षण मिळाले पाहिजे. लहान वयात मुलांचे अंग लवचिक असते. त्यामुळे हि आसने त्यांच्या अंगी बाणविता येतात. व पुढे योगासने त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. योगासनांमुळे रोगप्रतिकारक शक्ती आश्चर्यकारक वाढते तसेच जगण्याची शक्तीहि प्रभावी होते.आपल्या बुद्धीची सर्जनशीलताहि योगाने वाढत असते आदि  विद्यार्थाना आवश्यक असलेली माहिती  सांगणा-या सत्यनारायण दादांच्या  बोलण्यात एक आत्मीयता जाणवत होती.हि आत्मीयता देशातील तरुणांच्या आरोग्यसंवर्धनाची होती.
      गेली ३७ वर्षे श्री सत्यनारायण राठि हे पहाटे सहाच्या सुमारास नित्यक्रमाने पर्वतीच्या पाय-या चढत हनुमान मंदिर गाठतात.व एक तास स्वत: योगासने करतात त्याचबरोबर इतरांनाही योगाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देतात.त्यांच्या या योगप्रसाराच्या कार्यामुळे सकाळी पर्वतीवर योगासने शिकायला येणा-या तरूणांच्या संख्येत वाढ झाली आहे. टेकडि चढल्यावर हनुमान मंदिरात हनुमान चालीसा म्हटल्यावर सत्यनारायण दादांनी आम्हाला भुजंगासन ,शीर्षासन, सर्वांगासन,कपालभारती सारख्या योगप्रकारांची प्रात्यक्षिके दाखवून अचंबित केले.
       आजच्या जगात झपाट्यानं वाटणारं ऒद्योगिकिकरण त्यामुळे    वाढणारे शहरिकरण , वाढते प्रदूषण व त्याच्या जोडीला कंप्यूटर वर बैठक आरामशीर वाढलेले काम यामुळे प्रचंड ताण निर्माण होतोय अशी ओरड तरुणांकडुन ऎकायला येत असताना "पुण्यासारख्या "महानगरात सुद्धा योग्य जीवनप्रणाली अवलंबिली तर स्वस्थशरिर व प्रसन्नचित्तपणाने दीर्घायुष्य जगता येऊ शकते याचा प्रत्यक्ष अध्ययन अनुभव आम्हा सर्वांना सत्यनारायण दादांच्या सहवासात पर्वती येथे मिळाल्याने पर्वती ची भेट ख-या अर्थाने अर्थपूर्ण व यादगार झाली.उत्तम आहार व उत्तम व्यायाम हा उत्तम नागरिक बनण्याचा आणि दीर्घायुष्याचा पाया आहे हि जाणीव "पर्वती व ८८ वर्षीय चिरतरुण सत्यनारायण दादांच्या भेटिने" अधिक स्पष्ट झाली.
 
     श्री विजय हटकर
    श्री आनंद भागवत
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
  क्रमश...

No comments:

Post a Comment