Friday, January 11, 2019




तरुणांसोबत एक दिवस ...🌸🏵🎼🎭🎯

"तारुण्य ज्वलंत धमन्यांच अविरत स्पंदन " या उक्तीचा प्रत्यय रविवारच्या रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वार्षिक स्नेहसंमेलन२०१८ च्या निमित्ताने अनुभवता आला.खरच, तारुण्याची हि व्याख्या खुप बोलकी आहे. फक्त वयाने तरुण असण्यापेक्षा ज्याच्या धमन्यांमध्ये,सळसळत्या रक्तामध्ये काहि तरि सकारात्मक, विधायक  करण्याची अविरत स्पंदने वाहतात तोच खरा तरुण.
या स्नेहसंमेलनाचे निवेदन  करताना मला, अशाच निकोप  समाजनिर्माणा साठी वयाच्या साठिनंतरहि धडपडत आनंदि जीवनशैली अंगीकारणा-या प्रसन्नचित्त  साडेतिनशे
  तरुणांसोबत एक दिवस घालविता आला.आणि हा दिवस माझ्या सारख्या सतत नवीन शिकण्याचा ध्यास असलेल्या तरुणासाठि अविस्मरणीय ठरला.
         मनाने व कृतीने सदैव तरुण असणा-या रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे निवेदन करण्याची संधी न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे, संस्थाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक श्री जयवंतभाऊ शेट्ये यांच्यामुळे मिळाली. स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदी माजी जिल्हाधिकारी नंदकुमार जाधव तर प्रमुख अतिथी विजय बेर्डे सर, चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सॊ.सावित्री होमकळस मॅडम,खेडचे पी.एम.तलाठी, दापोलीचे घोसाळकर ,मंडणगडचे एस्.जी. गावडे, गुहागरचे व्ही.डी. खानविलकर, देवरुखचे डी.एस्.विभुते ,रत्नागिरिचे बी.व्ही.पांचाळ,लांज्याचे एस्.एस्.दांडेकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करणाऱ्या सभासदांचा व लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या जोडप्यांचा हृदयस्थ सत्कार करण्यात आला.
स्नेहसंमेलनात कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय ,लांजाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या "कोकण रेल्वे" पथनाट्याने कोकण रेल्वे निर्मितीचे स्वप्न साकारणा-या शिल्पकारांचे त्यामागचे धोरण व सध्याची रेल्वेची परिस्थिती व रेल्वेतील प्रवाशांची वर्तणूक यावर भाष्य केले.तर "वृक्षतोड" पथनाट्याने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या दोन्ही पथनाट्यांनी उपस्थितांची मने जिंकली.या पथनाट्याने स्नेहसंमेलनाच्या दुस-या सत्रात रंगत आली.यानंतर अनेक सभासदांनी भावगीते,पोवाडे, अभिनय, आपली मनोगते सादर केली.यामध्ये मंडणगडच्या श्री जाधव साहेब यांनी सादर केलेल्या "ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेब तुम्हाला अामुचा सलाम" या वंदनगीताने तर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.या स्नेहसंमेलनात आपली कला सादर करणाऱ्या या जेष्ठांचा उत्साह खरच वाखण्याजोगा होता.
     "जेष्ठ नागरिक असुया, स्पर्धा आणि द्वेष यापासून दूर राहिले, तर त्यांचे उर्वरित आयुष्य ते आरोग्यदायी आणि आनंददायी जगू शकतात". याचे प्रत्यंतर यानिमित्ताने अनुभवता आले. समाजाचे आपण  काही देणं लागतो या सामाजिक भावनेतून निवृत्त झाल्यानंतरहि पाणी बचत, ‘ग्लोबल वॉर्मिंग’ पर्यावरण संवर्धन, शिक्षण, सामाजिक प्रबोधन याबद्दल माहिती देऊन जेष्ठ नागरिक या क्षेत्रात आपले योगदान कसे देऊ शकतात आणि अशा समाजोपयोगी कामात सहभागी होऊन उर्वरित आयुष्य कसे आनंददायी जगतात हे पाहून फार समाधान वाटले, पण या देशात समाजाला दिशादर्शन करण्याचे काम करणाऱ्या या जेष्ठांना कुटुंबासाठी झिजल्यानंतर उतारवयात  वृद्धाश्रमाची वाट  पकडावी लागते याची वाढती आकडेवारि पाहून मन विषण्ण हि होते.
     विशिष्ट वय झाल्यानंतर मला जगून काय करायचे असा विचार मनामध्ये येतो; परंतु जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आनंदाने, प्रतिष्ठेने कसे जगायचे याचा मार्ग जेष्ठ नागरिकांनी शोधला पाहिजे. अनुवंशिकतेने मिळालेली तब्येत ही वयाच्या २५ वर्षापर्यंत पुरते; मात्र २५ ते ६० वयापर्यंत आपण जी हेळसांड करतो त्यावर आपले पुढचे आयुष्य अवलंबून असते. ज्यांची तब्येत चांगली त्यांना भाग्यवान समजले पाहिजे; मात्र, या चांगल्या तब्येतीचा समाजासाठी उपयोग करता आला पाहिजे. जेष्ठत्वाचा पाया फार लहानपणी तयार व्हायला हवा. तसे झाल्यास वृद्धत्व ही कटकट वाटणार नाही. तरुणपणीच्या अनेक गोष्टी आपल्याला आठवतात; मात्र त्या आपण आयुष्यातून पुसून टाकू शकत नाही. त्यामुळे घडलेल्या गोष्टींबद्दल जास्त खंत न करता वयाची दुसरी इनिंग जेष्ठांनी आनंदाने खेळली पाहिजे.’ असे माझे मत आहे.आणि या मताशी साधर्म्य साधणारे वयाच्या सत्तरि,पंच्याहत्तरितही विविध सामाजिक संस्थांसाठि झटणारी अनेक बुजूर्ग मार्गदर्शक मंडळि या उपक्रमातून. मला अनुभवता आली.या कार्यक्रमाचे यजमान श्री जयवंतभाऊ शेट्ये निवृत्त तहसीलदार असून आज पंच्याहत्तरि नंतरही लांजा शहरातील न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, महिलाश्रम लांजा, जिल्हा ग्राहक मंच, पेन्शनर्स संघटना आदि विविध संघटनांवर उत्साहाने काम करित आहेत. या स्नेहसंमेलनाला लाभलेले प्रमुख अतिथी श्री विजय बेर्डे सर लांजा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आहेत.लांज्याचे बुद्धिवैभव असणाऱ्या बेर्डे सर निवृत्ती नंतर लोकमान्य वाचनालयाचे उपाध्यक्ष पद सक्षमतेने संभाळतानाच विविध संस्थांमध्ये कार्यरत आहेत.
      एकूणच या संमेलनाने जेष्ठ मार्गदर्शकांची समाजाला दिशादर्शनासाठि असलेली आवश्यकता मनोमन पटली..विचारांने तरुण असलेल्या या जेष्ठांच्या सानिध्यातला हा दिवस नेहमीच आठवणीत राहिल.
                    श्री विजय हटकर



No comments:

Post a Comment