Saturday, January 5, 2019


पुणे तिथे काय उणे
स्पेशल ट्रिप ब्लाॅग
थेट पुण्यातून...
    (विजय हटकर)
🚍🚍🚍🚍🚍🚍🇮🇳🎯

भाग ०२
प्रति तिरुपती बालाजी :
⛳⛳⛳⛳⛳⛳
पुण्याला फिरायला जायचे म्हटले की पुणे शहरासोबतच देहू ,आळंदी, सासवड, सिंहगड ,अष्टविनायकांपैकी मोरगावचा मोरेश्वर,थेऊरचा चिंतमणी, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्र्वर,लेण्याद्रिचा गिरिजेश्र्वर ,पुरंदरचा किल्ला,नारायणपूरचा एकमुखी दत्त अशी विविध ठिकाणे आपल्याला खुणावत असतात .हि सर्व ठिकाणे पहायची म्हटली तर चार पाच दिवसाचा वेळ काढायला हवा.व प्रत्येक दिवशी एकेक रुट करायला हवा .यात पुरंदरचा किल्ला,नारायणपुरचा एकमुखी दत्त,संत चांगदेव, नारायणेश्र्वर पाहण्याचा आपण बेत केला तर केतकावली गावात भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर व दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध दैवत श्री  बालाजीच्या  उभारलेल्या प्रतिरुपाचाहि समावेश करावा लागेल. आजकाल मंदिर बनविण्यामध्ये ही प्रतिरुप म्हणजे ‘च्या’ सारखे, क्लोन, कॉपी, नक्कल, पायरसी सारखे प्रकार वाढू लागले आहेत. जाऊ द्यात आपल्याला काय त्याचे. पण यामुळे अनेकांना लांब असणारी धार्मिक स्थळे आपल्या घरापासून काही अंतरावर बघण्याची संधी मिळते. त्यामुळे अशी प्रति रुपे अजून निर्माण झाली तर आमच्यासारख्या भटकंती करणा:यांची चंगळच होईल. प्रति शिर्डी (शिरगाव), प्रति पंढरपूर (पवनानगर, दुधिवरे खिंडीजवळ) अशा यादीत आता प्रति बालाजी (केतकावळे) हे नवीन नाव समाविष्ट झाले आहे.
              पुणे परिसरातून जेजुरी, सासवड, बनेश्वर, केतकावळे, किल्ले राजगड, तोरणा आदी ठिकाणांकडे जाणा:या  संख्या मोठी आहे. त्यामुळे खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर वाहनांची नेहमीच गर्दी व कोंडी होते. नशिबाने आम्हि सर्व लांजा ज्युनियर काॅलेजच्या मुलांची सहल घेऊन  गेलो तेव्हा गर्दी कमी होती.  कापुरहोळहून सकाळी ९.३० च्या आसपास बालाजी दर्शन घेण्यास निघालो. व्यंकटेश्वरा हॅचरीज या उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. बी. व्ही. राव यांचे तिरुपती हे कुलदैवत. सर्वसामान्य भाविकांना तिरु पतीला जाणं शक्य होत नाही म्हणून पुण्यात बालाजीचं मंदिर उभारावं, अशी त्यांची इच्छा होती. ही इच्छा ते असताना पूर्ण होऊ शकली नाही. पुढे त्यांची मुले व्यंकटेश राव, बालाजी राव व अनुराधा देसाई यांनी ती पूर्ण केली.  पुणे - बेंगलोर महामार्गावर पुण्यापासून 40 कि.मी. अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकावळे हे छोटंसं गाव. मंदिर डोंगराच्या पुरंदर किल्ल्याच्या मागील बाजूस एका छोटय़ाश्या डोंगराखाली आहे.  बालाजीचे मूळ मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुमला-तिरुपती येथे आहे.  येथील मंदिर सुमारे 2 ते 3 एकरांवर बांधलेलं आहे.  कापुरहोळला पोहचल्यावर वाहनतळावर गाडी लावली केली. ‘व्यंकट रमणा गोविंदा’ अशी तेलुगू भाषेतील गोड भजनं ऐकू येऊ लागली.
स्वच्छता व टापटिपपणा :
गाडीतळापासून मुख्य मंदिर थोडसे लांब आहे. प्रशस्त जागा, मोकळे वातावरण, ‘व्यंकट रमणा गोविंदा’चे भजन, असे मंगलमय वातावरण येथे अनुभवाला मिळाले. डाव्या बाजुला प्रसाधनगृहे होती. तर बॅग ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था होती. मंदिरात प्रवेश करतानाच समोर चप्पल स्टँड आहे. मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी नाही. दर्शन रांगेच्या आधीच टोकन देऊन आपले मोबाईल जमा करावे लागतात. संपूर्ण मंदिराला बाहेरून मोठा प्रदशिणा मार्ग आहे. पुरुष व महिलांसाठी अशा दोन रांगा आहेत. मंदिरात प्रवेश करतानाच पायरीवर पाणी सोडलेले आहे. आपोआप पाय स्वच्छ होऊनच भाविक पुढे जातो. मस्त कल्पना आहे ना. अशी मंदिर व्यवस्था आपल्याकडील मंदिरात सुद्धा व्हायला हवी. दान धर्मासाठी येथे मोठय़ा आकारातील हुंडय़ा ठेवलेल्या आहेत. मंदिराचा लाडूचा प्रसाद तर फारच छान असतो. एका द्रोणामध्ये भरून हा प्रसाद वाटप केला जातो. विशेष म्हणजे प्रसाद खाली सांडल्यास तो उचलण्यासाठी सेवा देणारे अनेक लोक येथे आहेत. अतिशय स्वच्छता येथे पहावयास मिळते. भाविकांची गर्दी येथे नेहमीच असते. मात्र गडबड, गोंधळ इथे दिसला नाही. मंदिरातर्फे  येथे मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी आहेत.  आपल्याकडील मंदिरात होणारी भाविकांची ढकलाढकली येथे नव्हती.
               श्री बालाजी हा विष्णूचा अवतार. बालाजीची मूर्ती ही काळय़ा दगडात घडवली असून कमळावर उभी आहे. मूर्तीचे चार हातात शंख, चक्र , गदा असून एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा आहे. कानांत सोन्याची कर्णफुलं  आहेत. उभट आकाराचा मुकुट आहे. सोन्याच्या विविध अलंकारांनी मूर्तीला सजविण्यात येतं. दिवसभरात मंदिरात तीन वेळा पूजा केली जाते. मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ व गरु ड मंदिर आहे.  त्यात विविध देवदेवता आहेत. मंदिराच्या चारही बाजूंना छोटी मंदिरं आहेत. त्यात वेणुगोपालस्वामी, नृसिंह, पद्मावती, सुदर्शनस्वामी, गोदामाता अशा देवता आहेत. मंदिराच्या डावीकडे कुबेर व वराहस्वामी यांची मंदिरं आहेत.  मंदिरावर उंच व भव्य गोपूर आहे. येथे वर्षातून दोन मोठे उत्सव साजरे केले जातात. एक वार्षिक उत्सव व दुसरा ब्रमोत्सव.  बालाजीला भाविकांनी केस वाहण्याची प्रथा आहे. तसा कल्याण कट्टा येथेही आहे.
या गावांमध्ये व परिसरात रिक्षा, जीप, सुमो, ट्रॅक्स वगैरे वाहनांची संख्या वाढली आहे.  बालाजी मंदिरात बालाजीचे दर्शन घेऊन आम्हि दुपारी  शिरवळमार्गे कात्रज बायपासला यायला निघालो. कारण पुढिल लोकेशन कात्रज सर्पोद्यान बघायला जायचे होते. वाटेत ३०५ रुपयांचा चांगलाच टोल भरला. तेथून पुढे अर्धा तास ट्रॅफिक जॅमचा अनुभव घेतला. व कात्रज सर्पोद्यानापाशी गाडीतून मुलांच्या गाणांच्या भेंड्यांच्या ठेक्यावर कधी पोहचली कळलेच नाहि.
क्रमश..

No comments:

Post a Comment