Saturday, January 5, 2019







    पुणे तिथे काय उणे
स्पेशल ट्रीप ब्लाॅग
(विजय हटकर)
🚍🚍🚍🚍🚍🚍🇮🇳🎯
  भाग ०८
जंगली महाराज व पुण्याचा पुरातत्वीय खजिना पाताळेश्र्वर.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

      पुण्यातील शिवाजी नगर मधील एका गजबजलेल्या व वर्दळिच्या रस्त्याला जंगली महाराज असे थोडे भारिच नाव दिले गेले आहे.मि पहिल्यांदा पुण्यात गेलो तेव्हा या रस्त्यावरील नावाची पाटी पाहून माझ्या पुणेरी मित्राला विचारले होते -
    असे कसे रे तुम्ही पुणेकर?
रस्त्याला पण काहीही नाव देता.
पण त्यांने मला चांगलेच पुणेरी शैलीत झापले.तो म्हणाला अरे मित्रा या रस्ताच्या कडेला दत्यसंप्रदायातील सत्पुरूष असलेल्या महाराजांची समाधी आहे.व त्यांचे नाव जंगली महाराज आहे. पुणे सहलीत आम्हि या मंदिराला भेट दिल्यावर हि जुनी आठवण पुन्हा डोळ्यासमोर उभी राहिली.
     खरं म्हणजे कोणत्याही साधू -बाबा- महाराजांचे नाव घेताच त्यांच्या धर्माचा अंदाज लावता येतो.(साईबाबा सोडून) पण जंगली महाराज हे नाव ऎकून असा अंदाज लावणे फार कठिण आहे.मंदिर परिसर भर वर्दळिच्या भागात असताना सुद्धा निसर्गरम्य शांत रमणीय आहे.मंदिराबाहेरिल मोठी घंटा लक्ष वेधून घेते.महाराजांची प्रतिमा खुप सुंदर आहे. महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आम्हि मंदिराच्या सभामंडपात काहि क्षण विसावा घेतला.यावेळी मुलांना या मंदिराची माहिती विजय हटकर यांनी कथन केली.लिंगायत लोकांची वर्दळ इथे जास्त प्रमाणात असते.मंदिराच्या आवारात देवचाफ्याची सुंदर जकाडे असल्याने चाफ्याच्या सुगंधामुळे वातावरणात एक पवित्रता आढळते.

पुण्याचा पुरातत्त्वीय खजीना -पाताळेश्र्वर लेणी:-

        पुण्यातल्या भर गजबजलेल्या ,वर्दळिच्या जंगली महाराज रोडवर असलेला पुण्याचा पुरातत्वीय खजिना फारसा कुणाच्या खिजगणीत नाही. या आधी अनेकदा तिथे जाऊन आल्याने यंदाच्या पुणे सहलीत एकसंध कातळ छिनून लेणीमंदिराचा विशाल देखावा निर्माण करणाऱ्या प्राचीन पुरातत्वीय स्थापत्याची वैशिष्ट्ये  विद्यार्थ्यांसमोर मांडण्यासाठि मुलांना पुणे सहलीत दि.१९ डिसेंबर रोजी ४ च्या सुमारास आम्ही पाताळेश्र्वर लेणी पहायला नेले.
          पुणे शहराचा इतिहास बघायला गेलं तर इथे अनेक राजवटी नांदल्या!! त्यापैकी इसवीसनाच्या आठव्या शतकात पुणे परिसरावर राष्ट्रकूट राजवटीचा अंमल होता!! आणि साधारण त्याच कालावधीमध्ये भांबुर्डा गावठाणाजवळ (सध्याचे शिवाजीनगर, पूर्वी या भागाला भांबवडे म्हणले जायचे, त्याचे नामांतर इंग्रजांनी भांबुर्डे केले आणि पुढे आचार्य अत्रे यांच्या प्रयत्नांनी शिवाजीनगर असे नामकरण झाले). हे मंदिर जमिनीपासून साधारणपणे १.-२ मीटर खाली असल्याने कदाचित याला पाताळेश्वर असे नाव दिले असावे!
 'या लेण्याचे सध्याचे स्थान म्हणजे जंगली महाराज रस्त्यावरचे, जंगली महाराज मंदिराच्या शेजारि. पुणे शहराच्या हेरिटेज कमिटीने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा यादीत याचा समावेश जरी केला असला तर या मंदिराची सध्याची दुरावस्था बघता, वेळीच जर लक्ष दिले नाही तर हा वारसा सुद्धा काही वर्षांनी नष्ट होईल हे सांगायला काही वेगळ्या पंडिताची  गरज नाही!
     या लेण्यात जाण्यासाठी खडक फोडून पायऱ्या तयार केल्या आहेत! त्या उतरून गेल्यावर आपणासमोर येतो तो प्रांगणातील नंदीमंडप. साधारण ४ मीटर उंचीच्या आणि १२ जाडजूड खांबांवर, गोलाकार छत असलेला हा मंडप बांधलेला आहे! नंदी मोठ्या आकाराचा असून त्याच्या मानेभोवती नाग कोरलेला दिसतो! तसेच गळ्यामध्ये घंटांची माळ सुद्धा दिसते. या प्रांगणात डाव्या कोपऱ्यावर एक ओसरीवजा बांधकाम दिसत आणि त्याच्या पुढ्यात एक पाण्याचं टाके आहे. या गुहेची दोन खांब पुढे आणि मागे एक खोली अशी ही रचना आहे! या ओसरीच्या दाराशीच एक खोदलेले शिल्प दिसते अर्थात फार निरखून पाहिल्यावर काही अंदाज लावता येतात. प्रख्यात लेणीअभ्यासक जेम्स फर्गुसन याने या लेण्यांबद्दल काढलेल्या अभ्यासपूर्ण टिपणांमध्ये ही लेणी आठव्या शतकात (राष्ट्रकूट राजाच्या कालावधी मध्ये) झाली असावी असा निष्कर्ष नमूद केला आहे.
          पाताळेश्वराचे मुख्य लेणं  पाहण्यासारखे आहे! मुख्य लेण्याच्या पायऱ्या चढून जाताना उजव्या हाताला वरती एक अस्पष्ट होत चाललेला शिलालेख नजरेस पडतो! हा लेख देवनागरीमध्येच असला तरी तो पूर्ण वाचता येत नाही. पहिल्या ओळीतली 'श्री गणेशायनमः' ही अक्षरे तेवढी वाचता येतात. अनेक वर्षांच्या झिजीमुळे उरलेली अक्षरे अस्पष्ट झाली आहेत! या पायऱ्या चढून गेल्यावर तीन गर्भगृहे कोरलेला गाभारा आहे. पैकी मधल्या गाभाऱ्यात भोलेनाथ विराजमान आहेत. अत्यंत देखणी असे शिवलिंग पाहून मन प्रसन्न होते! तिन्ही गाभाऱ्याच्या  प्रवेशद्वारापाशी गदाधारी द्वारपाल आहेत. मात्र त्यांचे तपशील मिळत नाहीत. उजवावीकडे नंतर बसवलेली देवीची मूर्ती आहे आणि डावीकडील गाभाऱ्यात गणेशाची मूर्ती आहे! या तिन्ही गाभाऱ्यांना प्रदक्षिणा मारायला एक ओबडधोबड असा दगडी मार्ग आहे! मागे उजवीकडे अर्धवट खोदलेल्या ओवऱ्या आहेत! काही भिंतींवर पानाफुलांची नक्षी आहे.
    मुख्य मंडपातील पहिल्या दालनात उत्तरेकडे दोन खांबांमधील भिंतीवर शिवाची आणि विष्णूची शेषशायी मूर्ती खोदलेली आहे. शेषाच्या वर काही मानवी आकृती कोरलेल्या दिसतात. मात्र ही सारीच शिल्पे खराब अवस्थेत आहेत किंवा ती अपूर्ण असावीत. काही अभ्यासकांच्या मते या तिन्ही गाभाऱ्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची स्थापना करून हे ठिकाण पूजनीय करण्याचा प्रयत्न केला असावा! त्यामुळे जरी आज शिवा पार्वती आणि गणेश विराजमान झाले असले तरी पूर्वी येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अस्तित्व नाकारता येत नाहीत.
      मंदिराच्या आजुबाजुला सुंदर बगीचा बनविलेला आहे.येथील स्वच्छ वातावरणामध्ये मन प्रफुल्लित होतं.या बागेत एक पुरातन पिंपळाचा वृक्ष असून त्याच्या पारंब्यानी आपले पाय जमिनीत रोवून मुळ खोड कित्येक पटीने मोठं केलय.संभाजी नगर रेल्वेस्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या मंदिरात उत्सवकाळात प्रचंड गर्दी होते.
या मंदिराच्या आवारात या पुरातन स्थापत्यशास्त्राविषयी आम्हि मुलांना माहिती दिली.
आजपर्यंत जंगलात अथवा उंच डोंगर -पर्वतावर लेण्या खोदलेल्या असतात असे ऎकलेली  मुलेही पुण्यासारख्या महानगराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाताळेश्र्वर लेणीचा विशाल देखावा पाहून स्तंभित झाली.

    श्री विजय हटकर
    श्री आनंद भागवत
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
क्रमश...

No comments:

Post a Comment